खिडकी पलीकडचं जग भाग 6

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in जनातलं, मनातलं
21 Mar 2017 - 12:16 am

भाग १ : http://www.misalpav.com/node/39159

भाग 2: http://www.misalpav.com/node/39179

भाग 3: http://www.misalpav.com/node/39196

भाग 4
: http://www.misalpav.com/node/39212

भाग 5:
http://www.misalpav.com/node/39222

खिडकी पलीकडचं जग भाग 6

गौरी पार गोंधळून गेली होती. हे सगळ तिच्या समजुतीच्या बाहेर होत. एकीकडे तिला तिच्या आई-बाबांना कायमच सोडून नव्हत जायच आणि दादाजी कितीही म्हणाले की ती परत येऊ शकते तरीही तिला परत येता येइल का याची खात्री वाटत नव्हती. दुसरीकडे ओरसची काळजी वाटत होती. कारण आतापर्यंत ती देखील त्याच्याशी भावनेने जोडली गेली होती. ओरस तिचा खूप खास मित्र झाला होता. शेवटी तिने दादाजीना विचारल,"तुम्हीच सांगा दादाजी मी नक्की काय करू?"

दादाजी हसले. म्हणाले,"गौरी आमच्या जगात प्रत्येकजण स्वतः चा निर्णय स्वतःच घेतो. मी काय सांगू?"

गौरी शांत झाली. विचार करत बसून राहिली. दादाजिंना वाटले तिला यायची इच्छा नाही. ते मागे वळले आणि चालू लागले. गौरीने दादाजीना जाताना बघितल आणि हाक मारली,"दादाजी थांबा ना."

दादाजी थांबले आणि मागे वळले. गौरीने निर्णय घेतला. "मी येते दादाजी. आत्ता... लगेच. तुमची रात्र लवकर संपेल पण माझ्या इथली नाही. आता कुठे 11 वाजत आहेत इथे. म्हणजे मी ओरसला भेटून नक्की परत येऊ शकेन. हो न दादाजी?" गौरीने दादाजींकडे आशेने बघत म्हंटले.

दादाजी दोन मिनिट शांत उभे राहिले आणि मग तिच्या दिशेने हात उघडून म्हणाले,"गौरी ये!"

गौरी क्षणभर गोंधळली. कारण अधु पायानी ती त्या जगात कशी उतरणार होती ते तिच तिलाच माहीत नव्हतं. पण मग तिने हिम्मत केली. तिने स्वतःच संपूर्ण वजन हातावर तोलल आणि प्रयत्नपुर्वक स्वतःला खिड़कीच्या कट्यावर खेचल. मग तिच्या व्हील चेयरवर बसल्यावर ज्या प्रमाणे ती तिचे पाय हाताने खेचायची तसे तिने स्वतःला खेचले. ती आता खिड़कीत बाहेर पाय सोडून बसली होती. तिला खिडकी बाहेरून एक अनामिक खेच जाणवत होती. तिने दादाजीकड़े बघितले. तिला घरातून बोलताना ते खूप नीट दिसत होते. पण आता मात्र ते धुरकट वाटत होते. नक्की कुठे आणि कसे उभे आहेत ते तिला समजत नव्हतं. त्यांना बघायला ती थोड़ी अजुन पुढे सरकली आणि तिचा तोल गेला. तिच्या लक्षात आल की तिचा तिच्या जगाशी संपर्क तुटला आहे. तिला वाटल ती खोल .गर्तेत पड़ते आहे. तिने हात हवेत फ़ेकले आधारासाठी. ती खूप घाबरली. मागे वळून परत खिड़कीचा आधार शोधायला लागली. तिला परत जायच होत... आईच्या कुशीत शिरायच होत... तिची छाती पार दडपून गेली होती...... या अनामिक भितिशी ती एकटी तोंड देऊ शकत नव्हती. खूप घाबरली होती गौरी... मागे मिट्ट अंधार होता आणि पुढे फ़क्त आणि फ़क्त धूसर प्रकाश! असा किती वेळ गेला कोण जाणे. तिने डोळे घट्ट मिटून घेतले होते आणि ती मनातल्या मनात दादाजिंना हाका मारत होती.

.........................आणि अचानक तिला जाणवल की तिला कोणीतरी दोन्ही हातात तोलल आहे. तिने हळूच डोळे उघडले. ती दादाजिच्या कुशीत होती. त्यांनी तिला लहान बाळाला दोन्ही हातात उचलाव तस उचलून घेतल होत आणि ते शांतपणे चालत होते.

"दादाजी?" तिने प्रश्नार्थक हाक मारली त्यांना. ते हसले.

"अग, किती घाबरलीस? तू ओरससाठी येते आहेस की मी तुझ्यासाठी त्याला आणायला हव अस वाटायला लागल मला." दादाजी म्हणाले.

गौरी हसली. "बर गौरी आता तुझी तू चालतेस का? मी अस तुला उचलून नेल तर ओरस गोंधळून जाईल." दादाजी म्हणाले.

गौरीचा चेहेरा एकदम उतरला. "दादाजी तुम्हाला ओरसने सांगितल नाही का? माझा एक अपघात झाला होता अलीकडे. त्यामुळे माझे पाय अधु आहेत." गौरी म्हणाली.

"ओह हो का? नाही बोलला तो मला. अपघात अलीकडे झाला होता म्हणजे तुला त्या अगोदर चालता येत होत न?" दादाजीनी विचारल.

गौरी हसत म्हणाली,"हा काय प्रश्न झाला दादाजी? मी जन्मने अधु नव्हते. अहो शाळेत सगळ्या स्पोर्ट्समधे भाग घ्यायचे मी. अगदी पहिली नाही आले, पण एक चांगली स्पोर्ट्स गर्ल होते मी."

"बर. मग चल तुला जमेल. मी हात धरतो तुझा." अस म्हणून दादाजीनी गौरीला काही कळायच्या आत एकदम त्यांच्या बाजूला उभ केल. ती खूप गोंधळली... आपण आता तोल जाऊन पडू अस तिला वाटल. तिने आधारासाठी दादाजींच्या दिशेने हात फेकले. पण मग तिच्या लक्षात आल की ती पूर्वी.... म्हणजे अपघाताच्या अगोदर ती जशी सहज उभी राहायची तशीच ती आत्ता देखील तिच्या दोन्ही पायांवर उभी होती..... दादाजींच्या आधाराशिवाय! तिचा विश्वासच बसत नव्हता. तिने आवंढा गिळला आणि दादाजिंकडे बघितल. ते गालातल्या गालात हसत होते.

"चल गौरी. ओरस वाट बघत असेल. मी त्याला म्हंटल होत की मी तुला आणायचा प्रयत्न करिन. आणि तुला ही वेळेत परत जायच असेल न."

गौरीने एकदा दादाजिंकडे बघीतल. आणि विश्वासाने पाऊल उचलल. गौरी पूर्वीसारखी चालु लागली. आता तिला आश्चर्य वाटल नाही. तिने दादाजींकडे बघितल आणि तिच्या लक्षात आल की खिडकीतून दादाजी जितके उंच वाटत होते ते त्याहूनही उंच आहेत. तिने दादाजींचा हात धरला आणि म्हंटल,"दादाजी मला सांगाल हे सगळ नक्की काय आहे? ओरस आणि इथली इतर जी माणस दिसतात ती आमच्या जगातल्या माणसांसारखीच आहेत. भाषा देखील एकाच आहे. पण तुम्ही मात्र यासगळ्यांपेक्षा वेगळे आहात."

"खरय गौरी... आमच्या जगात आणि तुमच्या जगात फारसा फरक नाही. फ़क्त प्रवाह थोड़ा वेगळा आहे." अस म्हणून मग क्षणभर थांबले आणि परत बोलायला लागले. "प्रवाह म्हणजे काळ. दूसरा थोड़ा फरक म्हणजे आम्ही तुमच्या जगापेक्षा खूप जास्त प्रगत आहोत. तुमच्याकडे अनेक देश आहेत आणि त्यांना चालवणारी वेगळी सरकारं आहेत. आमच जग एकत्र बांधलेल... एकच आहे. आम्ही बुद्धीच्या, हुशारीच्या आणि स्थिर मनाच्या निकशावर आमच्या जगातली मुलं निवडतो आणि त्यांना योग्य ते किंवा अस म्हणू आवश्यक ते शिक्षण देतो. एकदा आमची खात्री झाली की ही मुलं तयार झाली आहेत की मग आम्ही हे आमच प्रगत जग त्यांच्या हातात सुपुर्द करतो. आमच्या जगात उत्तम बुद्धि असलेली मूलं लाहानपणीच शोधून वेगळी केली जातात. त्यांना आम्ही वेगवेगळ्या प्रकारे त्यांच्याही नकळत शिकवत असतो. आम्ही अनेको वर्षे प्रयत्न करून विविध शोध लावले आहेत. त्यामुळे या जगात आजार, दु:ख, वेदना नाहीत. तसे कोणी भांडत देखील नाहीत. पण तरीही इथे आयुष्याला एक जिवंतपणा आहे. सर्व-साधारण आयुष्य आहे इथे देखील. लोकं रोज नोकरीला जातात. संसार करतात. जी मुलं वेगळी केली जातात त्यांच आयुष्य सुरवातीला जरी इतरांसारखं असाल तरी मग ते वेगळ होत. ओरस असाच वेगळा निवड झालेला मुलगा आहे. पण अजुन त्याला वहन प्रवाहात सामिल केलेल नाही. म्हणून तर मी त्याची काळजी घ्यायला त्याच्या बरोबर असतो. माझ्यासारखे अजून काही दादाजी इथे कार्यरत आहेत. आम्ही काही एकक मात्र अनेको प्रवाह अजुन आहोत. तुला समजेल अस सांगायचं तर मला मृत्यू नाही... माझ वय वाढत नाही... मी गेले अनेक प्रवाह असाच आहे. ओरस सारखी अनेक मुले मी तयार केली आहे. तेच माझ काम आहे. माझ्यासारखे जे दादाजी आहेत ते सर्व मिळून पुढची पिढी तयार करण्याच काम करतात."

गौरी दादाजींचा हात धरून चालत होती. तिला दादाजी जे सांगतात ते सगळ समजत होत. पण तरीही स्विकारण थोड अवघड वाटत होत. ती दादाजींच बोलण एकून विचारात पडली होती. त्यामुळे ती किती चालली किंवा कुठे आली ते तिला कळले देखील नाही. अचानक दादाजी थांबले आणि म्हणले, "गौरी आपण पोहोचलो."

गौरी विचारातून जागी झाली आणि समोर बघायला लागली. समोर एक अति प्रचंड इमारत उभी होती. इमारत म्हणाण्यापेक्षा एक चिरेबंदी वाडाच होता तो. काळ्याभोर दगडांचा, कौलारु आणि तरीही उंच. मोठ-मोठ्या खिडक्या आणि दरवाजे होते त्या वाड्याला. खिड़क्या-दरवाजांवर कोरीव काम केलेल्या महिरपी होत्या. रात्र असूनही त्या वाड्याभोवती एकप्रकारचा उजेड प्रसवत होता. त्यामुळे तो वाडा गुलाबी-निळ्या उजेडात प्रकाशमान झाला होता. एका वेगळ्याच दिमाखात उभा होता तो वाडा आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर. दादाजीनी गौरीचा हात सोडला आणि समोरच्या दरवाजाशेजारी असणारा जाड दोर ओढला. आत खोल कुठेतरी घंटानाद झाला. आतून दरवाजाजवळ कोणीतरी आल्याचा आवाज झाला आणि त्या प्रचंड मोठ्या वाड्याचा तसाच मोठ्ठा दरवाजा हळूहळू उघडला गेला. आत अजुन एक दादाजी उभे होते. गौरी चमकली आणि दोघांमधल साम्य बघुन चक्रावून गेली. तिच्या शेजारचे ओरसचे दादाजी हसले. "माझा प्रवाह स्नेही" त्यांनी ओळख करून दिली. गौरी त्या दुस-या दादाजिंकडे बघुन हसली आणि तिने नमस्कार केला. "तूच का ग...व......री?" त्या दादाजीनी विचारल. "हो! पण ग...व....री... नाही गौरी." तिने हसत उत्तर दिल. तेही मजेत हसले. "चल ओरस तुझी वाट बघतो आहे" अस म्हणून ते चालु लागले.

क्रमश:

कथा

प्रतिक्रिया

छान, पण भाग थोडे मोठे टाक ना. कथा हळुहळु पुढे सरकतीये असं वाटतंय ( म्हणजे ती आपल्या वेगाने सरकतीये, माझी आपली उगाच घाई)

एस's picture

21 Mar 2017 - 12:37 am | एस

+१.

ज्योति अळवणी's picture

21 Mar 2017 - 12:38 am | ज्योति अळवणी

हा भाग थोडा लहान झाला खरा. पण पुढचा भाग शेवटचा असेल. त्यामुळे तो पंच टिकवण्यासाठी इथे थोडं compromise केलं आहे. थोडं सांभाळून घ्या!

ज्योति अळवणी's picture

21 Mar 2017 - 12:38 am | ज्योति अळवणी

हा भाग थोडा लहान झाला खरा. पण पुढचा भाग शेवटचा असेल. त्यामुळे तो पंच टिकवण्यासाठी इथे थोडं compromise केलं आहे. थोडं सांभाळून घ्या!

इडली डोसा's picture

21 Mar 2017 - 1:43 am | इडली डोसा

अजुन वाढवली असती एक दोन भाग तरी चालली असती. छान ग्रीप घेतली आहे कथेनं.

मराठी कथालेखक's picture

21 Mar 2017 - 12:46 pm | मराठी कथालेखक

गौरी हो या गवरी
है तो ओरस की नवरी :)

वेल्लाभट's picture

21 Mar 2017 - 12:55 pm | वेल्लाभट

चांगलं लिहिलंय. रोचक कथा.