"२००३ वर्ल्डकप क्रिकेटचा अंतिम सामना. भारत वि ऑस्ट्रेलिया! भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्वीकारलेली. स्टेडियम प्रेक्षकांनी खचाखच भरलेले. तेवढ्यात ऑस्ट्रलियन ओपनर्स ऍडम गिलख्रिस्ट आणि मॅथ्यू हेडन मैदानात येत आहेत. भारतीय कप्तान सौरव गांगुली संघासोबत चर्चा करतोय. आज एक नवीन बॉलर भारतातर्फे पदार्पण करतोय. गांगुलीने त्याच्या हातात नवीन चेंडू सोपवला. कोण हा नवीन बॉलर? ह्याचे नावही फारसे ऐकलेले नाही. अजून कॅमेरा त्याच्यावर गेला नाहीये. दुरून तो रन-अप घेताना दिसतोय. हळूहळू कॅमेरा त्याच्या जवळ जातोय. अरे देवा !! भारताचा नवीन बॉलर !!!!................मी !! ?????"
खडबडून मी झोपेतून जागा होतो. जंजीर मध्ये अमिताभ जागा होतो अगदी तस्सा! "बीस साल से ये जंजीर" च्या चालीवर "बीस साल से ये मॅच" असले काहीतरी विचार माझ्या डोक्यात सुरु होतात. सगळं अगदी जंजीरसारखंच! फरक असेल तर तो एवढाच की जंजीरमध्ये अमिताभ पूर्ण सिनेमाभर अजितच्या मागे खाऊ की गिळू या नजरेने धावत असतो. पण इथं हेडन -गिलख्रिस्ट माझ्यामागे धावतायेत असं वाटते. अरे काय चाललंय काय ??? एकवेळ माझा स्वतःच्या स्वप्नांवर कंट्रोल नाही हे समजू शकतो पण गांगुलीलासुद्धा कळू नये?? स्वप्नातही मला गिलख्रिस्टसमोर बॉलिंगला उभं करण्याइतपत अक्कल गहाण ठेवलीये का त्यानी? अहो आमच्या आंतर-गल्लीय मॅचमध्येसुद्धा मला बॉलिंग करू देत नव्हते.म्हणजे बॅटिंग करू देत होते असंही काही नाही! माझी फील्डीन्ग पोझीशनसुद्धा क्रिकेटच्या कुठल्याही पुस्तकात सापडणार नाही अशीच असायची. वेगवेगळ्या बॅट्समनच्या क्षमतेनुसार जिकडे बॉल मारण्याची शक्यता कमी तिथेच माझी नेमणूक व्हायची. जिथं कमी तिथं आम्ही ! गल्ली क्रिकेटमध्ये एक बरं असतं की प्रत्येकाची खेळातील भूमिका ही आपसूकच ठरते. म्हणजे बघा, जो फास्टर नाही पण प्रसंगी बॉलिंग करतो तो स्पिनर ! मग त्याचे बॉल सुतासारखे सरळ पडलेत तरी हरकत नाही.जो दिसायला तगडा तो बॅट्समन. त्याच्या बॅटींगचं तंत्र एकचं, दिसला की हाण अन नाही दिसला तरी हाण ! जो बॅटींग-बॉलिंग काहीही करू शकत नाही पण आवाज करू शकतो तो ऑलराउंडर! आणि आमच्यासारखा नुसताच उत्साही कोणी असला की तो फील्डर! पण ह्या सगळ्यांपेक्षा महत्त्वाचा असतो तो संघाचा चीफ स्ट्रॅटेजिस्ट. आमच्या टीमचा स्ट्रॅटेजिस्ट गल्लीतल्या दुसऱ्या टीमच्या आधी मैदान कसे बळकावयाचे इथपासून ते त्याच टीमबरोबर असलेली अकरा रुपये पैजेची मॅच कशी जिंकायची ह्या सगळ्या 'स्ट्रॅटेज्या' ठरवायचा . पण असं असतानाही माझं संघातलं महत्व अनन्यसाधारण होतं. त्याचं कारण म्हणजे मैदानाला लागूनच असलेल्या एका बंगल्यात बॉल वारंवार जायचा. तिथल्या चिंचोळ्या गल्लीत जाण्यायोग्य शरीरयष्टी फक्त माझ्याकडे होती! बऱ्याच वेळेला तर त्या बंगल्याची भिंत हीच माझी फिल्डिंग पोझीशन असायची. त्या भिंतीवर बसून मी कितीतरी भावी श्रीनाथ,कुंबळे,अझर अन कांबळी बघितले.("सचिन" हे मानाचं पद मात्र मी कधीही कोणाला दिले नाही आणि देणारही नाही!) त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणजे, माझं सोडा पण आमच्या गल्लीतले सगळे भावी दिग्गजसुद्धा त्या मैदानाची चौकट कधी ओलांडू शकले नाहीत.असो.
माझ्यासाठी क्रिकेट हा खेळण्यापेक्षा बोलण्याचा खेळ अधिक होता. मैदानात अंधार असला तरी माझ्यातला क्रिकेटतज्ञ(!)तेंव्हा फुल फॉर्ममध्ये फटकेबाजी करायचा. तिथे क्रिकेटपेक्षा आमचा जाज्वल्य देशाभिमान जास्त डोकावयाचा ही गोष्ट वेगळी! मॅकग्राथपेक्षा श्रीनाथ काकणभर सरस कसा हे पटवण्यासाठी मी तासोनंतास भांडलो आहे. किमान मैदानाबाहेर तरी व्येंकटेश प्रसादला जयसूर्यापासून वाचवण्यासाठी मी माझ्या परीने किल्ला लढवला आहे. खरं म्हणजे, प्रसाद हा भरतनाट्यम कलाकार होण्याऐवजी चुकून गोलंदाज झाला असं माझं स्पष्ट मत आहे. पण आमिर सोहेल प्रकरणामुळे प्रसादने आमच्या हृदयात कायमस्वरूपी स्थान मिळवले. आणि जयसूर्यासमोर प्रसाद म्हणजे 'कसायाच्या दावनीले बांधली जशी गाय' इतका केविलवाणा वाटायचा. त्या परिस्थितीत त्याचा बचाव करणे हे आमचे आद्यकर्तव्य होते. ९६ सालच्या एका कसोटीत अॅलन डोनाल्डने सचिनचा उडवलेला त्रिफळा हा सचिनपेक्षा जास्त माझ्या जिव्हारी लागला होता. त्या बॉलवर उपाय शोधण्यासाठी मी स्वतः त्या पद्धतीने बाद होऊन पाहिले आहे (अर्थात माझी नेहमीची बाद होण्याची पद्धत काही वेगळी नव्हती!) नंतर कधीतरी द्रविडने डोनाल्डच्या उडवलेल्या चिंध्या मी "गब्बरसिंग तुम एक मारोगे तो हम चार मारेंगे" अश्या ऐटीत साजऱ्या केल्या होत्या. डोनाल्ड, अँब्रोस ह्या लोकांसमोर मला गब्बरसिंग आजही सज्जन वाटतो. कारण गब्बर कमीत कमी सांगून तरी मारायचा. इकडं अँब्रोससमोर सिद्धू,जडेजा आपापला स्टान्स बदलेपर्यंत स्टम्प्स उडालेले असायचे. मुळात सिद्धू,जडेजा ही नवाबी थाट असलेली माणसं. आता सकाळी ९:३० ला नेट प्रॅक्टिस सुरु करायच्या वेळी जर थेट सामनाच सुरु झाला तर त्याला ते तरी काय करणार! (ह्याच सिद्धूनी नंतर वेस्टइंडीजमध्ये जाऊन द्विशतक ठोकल्यावर आंम्ही हातापायाची बोटं तोंडात घातली होती!)
भारतीय संघाने क्रिकेटच्या सगळ्या पैलूंवर केलेल्या प्रयोगांची संख्या गिनीज बुकात नोंद होण्यासारखीच आहे. सोळा महिन्यात पाच विकेटकीपर बदलण्याचा भारतीय संघाचा विक्रम/प्रयोग अजूनही अबाधित आहे. दीप दासगुप्ताला विकेटकीपर म्हणून उभे करणे ह्याला प्रयोग म्हणावे की सुसाईड अटेम्प्ट ह्यावर तज्ञांमध्ये दुमत आहे. डोळ्याला पट्टी बांधूनसुद्धा धोनीने दासगुप्तापेक्षा चांगली कीपिंग केली असती! इन्जुअर्ड श्रीनाथच्या जागी रिप्लेसमेंट म्हणून ऑफ स्पिनर नोएल डेव्हिडला त्रिनिनादला पाठवणे हा तर ड्युएल मीनिंग जोक होता. कारण वेगवान गोलंदाजाला फिरकीने रिप्लेस करणं विनोदी असलं तरी एका फिरकीपटूला पदार्पणासाठी वेस्ट इंडीजला पाठवणं ही त्याहून मोठी थट्टा होती. ज्याला जे जमतं ते सोडून बाकी सगळं करायला लावणं ही भारतीय परंपरा क्रिकेटमध्येही इमानेइतबारे पाळल्या गेली. ऑलराऊंडर शोधण्याच्या नादात इरफान पठाणसारख्या उमद्या गोलंदाजाच्या हाती बॅट देऊन,"भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे" असं सांगणं हा त्यातलाच प्रकार होता.सलामीवीरांची समस्या तर कसोटी क्रिकेटच्या उदयापासूनच आपल्याला भेडसावत आहे. त्यामुळे नयन मोंगियाला एखाद्यावेळी सलामीला पाठवणे समजू शकतो. पण म्हणून काय वनडेत सचिनच्या डेझर्ट स्टॉर्म खेळीच्या वेळी वन डाऊन पोझीशनलासुद्धा मोंगियाला पाठवायचं? तेही संघात अझर,लक्ष्मण,जडेजा,कानिटकर असताना!! सचिनला जनतेने 'देवत्व' का दिले असावे ह्याचा यावरून अंदाज येऊ शकतो. ह्याच कारणाने द्रविडही संतपदापर्यंत पोहोचला. कसोटीत द्रविडची वन डाऊन पोझीशन ही ऍज गुड ऍज सलामीवीराचीच होती. कारण बॉलचा लाल रंग उतरेपर्यंत एखादातरी माई का 'लाल' सलामीवीर परतलेला असायचा. तसं पाहिलं तर द्रविडने मैदानावर अंपायर सोडून इतर सर्व भूमिका निभावल्या असतील !
भारतीय संघ ते टीम इंडिया हे स्थित्यंतर आम्ही ह्याची देही ह्याची डोळा बघितले आहे. ह्यात कितीतरी जय-पराजय,शह-काटशह अनुभवले. आता क्रिकेटची 'ती' पिढी बदलली. आजही क्रिकेट बघितल्या जाते. पण जुनी पिढी जशी आमच्या तेंडुलकर मध्ये त्यांचा गावस्कर शोधायची, तसेच आम्हीही आजच्या विराटमध्ये कालचा सचिन शोधतो.गावातल्या मैदानाजवळचा तो बंगला आणि ती भिंत आजही तशीच आहे. फक्त त्या चिंचोळ्या गल्लीत बॉल मारायला आणि शोधायला आता कोणीही नाही !
--चिनार
http://chinarsjoshi.blogspot.in/
प्रतिक्रिया
3 Jan 2017 - 7:47 pm | फारएन्ड
धमाल लिहीले आहे. जवळजवळ प्रत्येक वाक्याला त्या त्या वेळच्या घटना आठवल्या (ज्या मला आठवतात त्यावरून तरी अचूक आहेत. ९६ चा सचिन चा त्रिफळा, जडेजा-सिद्धू च्या अॅम्ब्रोज ने उडवलेल्या दांड्या म्हणजे १९९६ च्या वर्ल्ड कप मधली गेम - याच गेम मधे सचिन स्ट्राइक घ्यायला सतत आतुर होता अॅम्ब्रोस व इतरांसमोर) आणि जाम हसलो. अजून लिहा क्रिकेटवर.
जयसूर्या-प्रसाद हे देशी व लंकेच्या खेळपट्ट्यांवर अगदी खरे असले, तरी एक मिनि-देशाभिमानी उत्तर येथे चालणार असेल तर - हाच प्रसाद जेव्हा स्विंग मिळत असे तेव्हा जगातील सर्व ग्रेट फलंदाजांना नाचवत असे.
4 Jan 2017 - 9:46 am | चिनार
सहमत
3 Jan 2017 - 10:03 pm | तुषार काळभोर
नव्वदीतल्या आठवणी जागवल्या!
3 Jan 2017 - 10:15 pm | फेरफटका
दीप दासगुप्ता विकेटकीपर पेक्षा गोलकीपर असल्याचा भास अधिक व्हायचा. बॉल अडल्याशी मतलब, तो कलेक्ट केलाच पाहीजे अशी अट नव्हती त्याची.
दस्तुरखुद्द 'देव' विकेट वर असताना पिंच हीटर पाठवणे ह्या कलाकृतीला मॅच लाईव्ह पहात असताना सुद्धा आम्ही सलाम केला होता. डॉन मधे प्राण सारख्या खतरनाक कैद्याबरोबर तो एक 'काका' नावाचा अती-मवाळ, काटकुळ्या शरीर-यष्टीचा कैदी होता. प्राण बरोबर तुरूंग शेअर करण्याच्या दर्जाचा काय गुन्हा ह्याने केला असेल असा प्रश्न पडायचा. तेच एग्झॅक्ट फीलिंग मोंगियाला सचिन विकेटवर ऑसीज ची पिसं काढत असताना पिंच हीटर म्हणून येताना पाहून आलं होतं.
बाकी गगन खोडा, देवांग गांधी, सुजिथ सोमसुंदर, डेव्हिड जॉन्सन, डोड्डा नरसैय्या गणेश, आशीष कपूर, अमय खुरासिया, जतिन परांजपे, अतुल बेदाडे, पारस म्हांब्रे अशा कित्येक यातना भारतीय क्रिकेटरसिकांनी भोगल्या आहेत.
4 Jan 2017 - 9:01 am | स्पार्टाकस
>>>>>>
रोहन गावस्कर, श्रीधरन श्रीराम, अजय शर्मा, नोएल डेव्हीड, मनवा प्रस्साद, शरणदीप सिंग, हरविंदर सिंग, इक्बाल सिद्दीकी, टीनू योहानन, विजय भारद्वाज, जेकब मार्टीन, भरत अरूण, रशिद पटेल, अरुणलाल हे भारतीय प्रेक्षकांनी भोगलेले आणखीन काही भोग,
परंतु या सगळ्याचा कळस म्हणजे
विक्रम राठोड
आणि
अशोक डिंडा!
4 Jan 2017 - 9:13 am | गणामास्तर
देबाशिष मोहंती, सदागोपन रमेश, शिवसुंदर दास, थिरु कुमारन, विजय दहिया, समीर दिघे आणि लक्ष्मीरतन शुक्ला पण ऍड करा यादीत.
4 Jan 2017 - 9:44 am | चिनार
धन्यवाद !!
ह्यातली बऱ्यापैकी नावे डोळ्यासमोर होती पण वैयक्तिक टीका शक्यतो टाळायची होती.
पाहिलेल्या,खेळलेल्या आणि अनुभवलेल्या क्रिकेटमधून विनोद फुलवण्याचा हा एक प्रयत्न आहे.
4 Jan 2017 - 5:11 pm | मित्रहो
एक वेळ शाळेतल्या मधल्या बेंचावर बसनाऱ्या मुलींची नावे आठवतील पण ही नावे कठीण आहे. एक तो मराठी पोरगा सुद्धा होता एक चौकार मारुन हिरो झाला होता पण नंतर दिसला नाही. नागपूरचा प्रशांत वैद्यही होता. आम्हाला केवढ कौतुक त्याच त्यावेळेला. क्रिकेट हा आळसी लोकांचा खेळ याचे उदाहरण म्हणून अशोक मल्होत्रा का कोण होता. कदाचित थोडा आधी असावा मदनलाल वगेरे सोबत.
काही सांगता येत नाही यातले सारे आता कुठल्यातरी क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी वगेरे असतील. धोनी चित्रपट बघताना एक जाणवले त्याच्या बरोबरीने किंवा त्याच्याही पुढे कितीतरी नावे आली. आज ते कुठेही नाही. अशाच नावांमुळे भारताने कितीतरी धोनीं गमावले असतील.
5 Jan 2017 - 5:34 pm | किसन शिंदे
हृषीकेश कानिटकर! ढाका इथे पाकिस्तानबरोबरच्या फायनल मॅचमध्ये साकलेन मुश्ताकच्या बॉलवर चौकार मारून फायनल जिंकून दिली होती त्याने. लख्ख आठवलं. :)
6 Jan 2017 - 1:17 am | फारएन्ड
हृषीकेश कानिटकर ची डोमेस्टिक मधे अजून एक मोठी कामगिरी आहे. तो महाराष्ट्राची रणजी टीम सोडून राजस्थानच्या रणजी टीम चा कप्तान झाला. २०११ आणि २०१२ च्या सीझन्स ना त्याने या अंडरडॉग्ज टीम ला रणजी करंडक मिळवून देण्यात कप्तान म्हणून मोठा हातभार लावला. राजस्थान ने आधी कधीही हा करंडक जिंकलेला नाही. अमेरिकेत अशा डोमेस्टिक कामगिरीबद्दल चित्रपट वगैरे निघतात :). भारताचा व राजस्थान चा माजी खेळाडू आकाश चोप्राने यावर सुंदर पुस्तक लिहीलेले आहे. बाय द वे आकाश चोप्रा छान लिहीतो.
https://www.amazon.com/Out-Blue-Rajasthans-Road-Ranji/dp/9350291703
5 Jan 2017 - 11:04 pm | चांदणे संदीप
काय राव मास्तर!
मोहंतीची बॉलींग ॲक्शन निदान आयसीसीच्या (कुठल्यातरी) स्पर्धेच्या वेळी जाहिरातील्या ॲनिमेशनमध्ये वापरली होती! इट्स अ काईन्ड ऑफ अचिव्हमेंट! ;)
Sandy
10 Jan 2017 - 3:25 pm | प्रसन्न३००१
दिनेश मोंगिया ला कसे विसरलात ???? २०१३ च्या वर्ल्ड कप मध्ये तर तो बॅटिंग करतोय का था-थय्या-थय्या करतोय हेच उमगत न्हवतं
या सगळ्या खेळाडूंमध्ये मात्र एकाला उगाच बकरा केलं गेलं असं वाटतंय... तो म्हणजे आकाश चोप्रा
4 Jan 2017 - 5:19 pm | अद्द्या
सुनील जोशी विसरला .
हा माणूस " स्पिनर " का म्हणवतो ते अजून नाही समजलं
4 Jan 2017 - 5:53 pm | चिनार
याहून कहर म्हणजे २००३ च्या वर्ल्डकपमध्ये लक्ष्मणला वगळून दिनेश मोंगियाला घेतले होते.
4 Jan 2017 - 12:06 pm | रातराणी
मस्त! खुसखुशीत लिहिता!
5 Jan 2017 - 5:19 pm | प्रान्जल केलकर
तसं पाहिलं तर द्रविडने मैदानावर अंपायर सोडून इतर सर्व भूमिका निभावल्या असतील !>>>>> :D
5 Jan 2017 - 5:41 pm | किसन शिंदे
लेख अतिशय खुसखूशीत लिहीलाय. फास्ट बोलिंग करताना मॅकग्राथची स्टाईल कॉपी करायचो, अर्थात चेंडू स्विंग वैगेरे लांबची गोष्ट, स्टंपच्या दिशेने पडायचा हेच माझ्यासाठी खूप असायचं. ;) आणि तेवढ्या भांडवलावरच चाळीतली पोरं मला 'मॅक्ग्रा' म्हणून बोलायची. =))
6 Jan 2017 - 11:50 am | खेडूत
झक्कास लिवताय हो दादा!चौकार षटकार आवडले..!
कणेकरांचे एक असं कांहीतरी वाक्य आठवले: 'नाईन डाऊनला मणिंदरसिंग बॅट घेऊन मैदानात जायचा ते फक्त एक प्रथा म्हणून....
तुम्ही पण इतक्यावर थांबू नका राव.
6 Jan 2017 - 12:51 pm | चिनार
धन्यवाद !!
6 Jan 2017 - 10:29 pm | Jack_Bauer
ह्यात राजेश चौहान आणि त्याची ती एक (कदाचित एकमेव ) सिक्स हेही आठवलं ..
7 Jan 2017 - 1:14 pm | पैसा
एकदम खुसखुशीत!
10 Jan 2017 - 3:29 pm | प्रसन्न३००१
जुनी पिढी जशी आमच्या तेंडुलकर मध्ये त्यांचा गावस्कर शोधायची, तसेच आम्हीही आजच्या विराटमध्ये कालचा सचिन शोधतो.
डिट्टो फिलिंग
11 Jan 2017 - 9:42 am | चाणक्य
लिहिलंय. मजा आली वाचताना.
11 Jan 2017 - 10:09 am | साहेब..
तुमचे लेख मस्त असतात.
30 Jan 2017 - 10:44 am | अभिजीत अवलिया
भारी. खुप मजा आली. जुने दिवस आठवले.
30 Jan 2017 - 11:10 am | संजय क्षीरसागर
त्यामुळे हिस्टरी शून्य माहिती आहे. पण चिनारनी पोस्ट एकदम झकास लिहीली आहे. लगे रहो फिल्ड पे.
30 Jan 2017 - 12:02 pm | राही
एकदम कुरकुरीत ताजे लेखन. क्रिस्पी आणि चविष्ट.
क्रिकेटचा गेल्या वीस-पंचवीस वर्षांचा सगळा इतिहास झरझर डोळ्यांसमोरून सरकला.
31 Jan 2017 - 1:37 pm | नरेश माने
मस्त लिहिलंय एकदम खुसखुशीत!