"ह्या मुलाला बुद्धीबळातले फारसे काही गम्य नाहीये. ह्याला पुढे ह्या खेळात काही भविष्य आहे असे मला वाटत नाही!" आपल्या बुद्धीबळ अकादामीमधे दाखल झालेल्या १२ वर्षाच्या मुलाबद्दल जगज्जेत्या मिखाईल बॉटविनिकने उद्गार काढले! नियतीची खेळी सुद्धा पहा कशी अगम्य असते, हाच मुलगा पुढे अतुलनील जगज्जेता झाला अनातोली कारपॉव आणि बॉटविनिकची भविष्यवाणी खोटी झाली!
'अनातोली' ह्या रशियन नावाचा अर्थ आहे 'सूर्योदय'! किती सार्थ ठरवले ना आपले नाव त्याने? १९५१ मधे पूर्वीच्या सोवियेत रशियामधल्या उराल प्रांतात जन्मलेल्या अनातोलीची बुद्धीबळाशी तोंडओळख झाली ती वयाच्या चौथ्या वर्षी. भराभर प्रगती करीत तो वयाच्या ११ व्या वर्षी कँडीडेट मास्टर झाला. १२ व्या वर्षी तो बॉटविनिक क्लबमधे दाखल झाला. तिथूनच त्याच्या खेळाला खरी झळाळी प्राप्त झाली. बुद्धिबळाच्या खेळातले बारकावे शिकताना, घरचा अभ्यास म्हणून बॉटविनिकने दिलेले कूटप्रश्न तो मन लावून सोडवीत असे. ध्यास आणि अभ्यास ह्या दोन्हीच्या जोरावर त्याने वयाच्या १५ व्या वर्षीच सर्वात तरुण सोवियेत नॅशनल मास्टर बनण्याचा पराक्रम करुन दाखवला आणि बोरिस स्पास्कीच्या विक्रमाशी बरोबरी केली. बुद्धीबळाबरोबरच तो एक कुशाग्र बुद्धिमत्तेचा विद्यार्थी देखील होता. उच्च माध्यमिक शिक्षणात सुवर्णपदक पटकावून तो गणितासाठी मॉस्को विद्यापीठात दाखल झाला. दरम्यानच्या काळात त्याने लेनिनग्राड येथे असलेल्या सेमियन फर्मन ह्या बुद्धिबळ प्रशिक्षकाकडे शिष्यत्व पत्करले होते. आपल्याला गुरुचा सहवास सातत्याने लाभावा ह्या हेतूने अनातोली मॉस्को सोडून लेनिनग्राडला गेला.
(ह्या सेमियन फर्मनची सुद्धा गंमतच आहे. कारखान्यात काम करणारा एक कामगार असलेल्या सेमियनने फावल्या वेळचा विरंगुळा म्हणून बुद्धीबळाला सुरुवात केली. त्यात त्याने प्रचंड प्राविण्य मिळवलं. इतकं की पांढर्या मोहोर्यांनी खेळताना तो जणू जगज्जेताच असे. पांढरी मोहोरी घेऊन खेळताना त्याने कुणाकुणाला हरवले होते ह्याची नुसती यादी बघितलीत तरी समजेल की तो काय चीज होता - एफिम गेलर, पॉल केरेस, वॅसिली स्मिस्लॉव, टायग्रान पेट्रोशियान, विक्टर कोर्चनॉय, बोरिस स्पास्की, डेविड ब्रॉन्स्टीन, मिखाईल ताल! ह्यातले जवळजवळ सगळे जगज्जेते होते! पण ह्या सेमियनचा कच्चा दुवा म्हणजे काळी मोहोरी. ती घेऊन ह्याला खेळताच येत नसे. त्यामुळे तो बुद्धीबळाच्या स्पर्धांमधे अर्धेच गुण मिळवी. त्याची फार प्रगती खेळाडू म्हणून झाली नाही. पण एक प्रशिक्षक म्हणून तो निर्विवाद उच्च होता. विशेषतः ओपनिंग्ज ही त्याची हातखंडा होती!)
तर अशा गुरुच्या पायाशी बसून अनातोलीने बुद्धीबळाचे उच्चशिक्षण सुरु ठेवले. झपाट्याने महत्त्वाच्या स्पर्धा जिंकत त्याने १९७१ साली मॉस्कोतली अलेखाईन मेमोरियल स्पर्धा जिंकली. मग मात्र त्याचा समावेश अतिउच्च खेळाडूंच्या वर्तुळात झाला! जगज्जेत्याला आव्हान देण्यासाठी ज्यातून खेळाडू निवडला जातो अशा 'कँडिडेट मास्टर्स' स्पर्धेसाठी त्याची निवड झाली ती १९७४ मधे. त्यावेळचा जगज्जेता होता बॉबी फिशर!
कँडिडेट मास्टर्स मधे कारपोवची गाठ पडली ती माजी जगज्जेत्या बोरिस स्पास्कीशी. स्पास्की आपली चटणी करणार हे जाणूनच कारपोव स्पर्धेत उतरला. अपेक्षेप्रमाणे स्पाकीने काळ्या मोहोर्यांनी खेळताना पहिला डाव खिशात घातला. पराकोटीचा चिवट आणि झुंजार खेळ करत कारपोवने ६ डवात ४-१ असा विजय मिळवला हा स्पास्कीसाठी धक्का होता. आता कारपोवची गाठ बुजुर्ग खेळाडू विक्टर कोर्चनॉय ह्याच्याशी होती. अनुभवी कोर्चनॉय बरोबर तब्बल १९ सामन्यांची मालिका खेळून कारपोव ३-२ असा विजयी ठरला आणि झाला बॉबी फिशरचा आव्हानवीर!
कारपॉव-फिशर अशी दोन दिग्गजांची लढत अनुभवायला बुद्धीबळवेडे आसुसले होते पण इथे एक चमत्कारिक प्रकार घडला. फिशर हा विक्षिप्त खेळाडू म्हणून प्रसिद्ध होताच त्याने एक अट घातली की पहिला खेळाडू जो दहा डाव जिंकेल तो विजेता आणि ९-९ बरोबरी झाली तर मात्र विजेतेपदाचा मुकुट फिशरकडेच राहील! अशी कारपोववर अन्याय करणारी अट मान्य होणे शक्यच नव्हते. आंतरराष्ट्रीय बुद्धीबळ महासंघाने (फिडे) ह्याला आक्षेप घेतल्याने फिशरने आपला मुकुट उतरवला. अशा रीतीने जग एका रोमहर्षक लढतीला मुकले. कारपोवचे पारडे जड होते त्याने ही अट मान्य करायला हरकत नव्हती, तो जिंकलाच असता असा नंतर अनेकांचा होरा होता पण लढत झाली नाही हे मात्र खरे. अशारीतीने जगज्जेतेपदासाठी एकही सामना न खेळता कारपॉव जगज्जेता झाला (१९७५)!
१९७८ मधे त्याला त्याचे विजेतेपद टिकवण्यासाठी पुन्हा कोर्चनॉयसोबत लढावे लागले. हा सामना फिलिपाईन्स येथे झाला. कारपॉवचा टीम मेंबर म्हणून आलेल्या डॉ. झुखार ह्याने कॉर्चनॉयला भर सामन्यात संमोहित (हिप्नॉटाईज) करायचा प्रयत्न करणे, तो फलद्रूप होऊ नये म्हणून कॉर्चनॉयने आरसे बसवलेला चष्मा घालून खेळणे, खुनाचा गुन्हा नावार असलेल्या दोघा इसमांना आपले टीममेंबर्स म्हणून सामन्याच्या ठिकाणी आणणे अशा अनेकविध वैचित्र्यपूर्ण घटनांनी ही स्पर्धा गाजली! सुरुवातीला आघाडी घेतलेला कारपॉव सहज बाजी मारणार असे वाटतानाच अचानक मुसंडी मारुन कॉर्चनॉयने त्याच्या तोंडचे पाणी पळवले होते. (हे सगळे सामने ह्या ठिकाणी बघता येतील.
१९८० च्या दशकात कारपॉवचा खेळ हा सर्वोच्च स्थानी होता. त्याच्या खेळात मिखाईल तालसारखे चमत्कृतीपूर्ण बलिदान किंवा अलेखाईनसारखे आश्चर्यकारक धक्के देणारी काँबीनेशन्स नसत. पण एकसारख्या दबावाने हळूहळू प्रतिस्पर्ध्याला जेरीला आणून, त्याच्या खेळातल्या अतिशय सूक्ष्म अशा कच्च्या दुव्यांचा आधार घेऊन आपले स्थान बळकट करत नेणारा दीर्घ मुदतीचा खेळ दिसतो. कोणताही धोका न पत्करता आपल्या मोहर्यांच्या मगरमिठीत हळूहळू आवळत नेऊन, गुदमरवून थंडपणे डाव संपवणे हे त्याच्या खेळाचे वैशिष्ठ्य म्हणावे लागेल.
कारपॉव एकेकाळी सर्वेसर्वाच होता. रशियन संघाकडून त्याने सहा बुद्धीबळ ऑलिंपियाड मधे भाग घेतला होता आणि सहाही वेळा रशियाने सांघिक सुवर्णपदक मिळवले.
१९८४ च्या जागतिक लढतीत कास्पारोव विरुद्ध खेळलेला एक डाव बघा. आपल्या मोहोर्यांची आणि प्याद्यांची अभेद्य तटबंदी लावून प्रतिस्पर्धीचूक कधी करतोय ह्यावर तो डोळा ठेवून असे. एका चुकीला एक बढत अशा रीतीने हळूहळू डाव कब्जात घेऊन अंतिमतः विजय मिळवणे हे ध्येय असे ते तो साध्य करी.
कास्पारोवने ८४ सालच्या ह्या स्पर्धेत हरवेपर्यंत तो एक अभेद्य खेळाडू म्हणून ओळखला गेला. त्याचे टोपणनाव 'बोआ काँस्ट्रिक्टर' असे होते. म्हणजे एकप्रकारचा अजगर. आवळून, गुदमरवून ठार मारणारा!
त्याने त्याचे नाव सार्थ केले.
व्यक्तिशः म्हणाल तर कारपोव हा माझा फारसा आवडता खेळाडू नाही! ह्याचे कारण असे असू शकेल की तो कॉपीबुक स्टाईलने जात असे. धक्कादायक खेळी करणे, एखादे बलिदान देऊन प्रतिस्पर्ध्याला विस्मयचकित करुन अपूर्व खेळ्यांच्या जोरावर सामना जिंकणे ही मिखाईल ताल किंवा अलेखाईनची जादू त्याच्याकडे नव्हती! त्याचा खेळ हा पोझिशनल गेम प्रकारातला होता. पटाच्या मध्यातले चार चौकोन ताब्यात ठेवणे, कर्णात बसलेला उंट, प्याद्यांची तटबंदी, कॅसल केलेला राजा, मोकळ्या पट्यांचा तातडीने ताबा घेणे, मारामारी करुन पटावरचा ताण मर्यादित राहील ह्याची काळजी घेणे असे सगळे प्रकार तो अवलंबे. त्याच्या खेळावर कॅपाब्लांकाच्या खेळाचा प्रभाव जाणवतो.
नाही म्हणायला काही वेळा त्याने अचूक बलिदानाने धक्कादायक विजय प्राप्त केलेले आहेत. १९८३ सालच्या लिनारेस स्पर्धेतला त्याचा हंगेरियन ग्रँडमास्टर सॅक्स बरोबरचा हा डाव बघितला की ह्याची प्रचिती येते.
पण सर्वसाधारणपणे आपण चूक करायची नाही, प्रतिस्पर्ध्याचा डाव ताबडतोब ओळखून हाणून पाडायचा हे तंत्र अवलंबल्याने प्रतिस्पर्ध्याने चिडून जाऊन हल्ला चढवला किंवा काही आततायी खेळ केला रे केला की त्याचा फायदा घेत पुढे सुटायचे हे त्याचे तंत्र होते. अर्थात त्याला नमवायला नाविन्यपूर्ण आणि धडाकेबाज खेळ करणारा कास्पारोवसारखा खेळाडू व्हावा लागला ह्यातच काय ते आले!
१९७५ ते ८५ आणि पुन्हा १९९३ ते ९९ असा तब्बल १६ वर्षे चँपियन असलेला हा महान खेळाडू बुद्धीबळाच्या इतिहासात नाव कोरलेला आहे ह्यात शंका नाही!
चतुरंग
प्रतिक्रिया
10 Feb 2009 - 11:38 am | अवलिया
उत्तम लेख.
--अवलिया
10 Feb 2009 - 11:48 am | घाटावरचे भट
असेच म्हणतो
11 Feb 2009 - 7:55 am | टारझन
चला ... शेवटी लेख आला ... थँक्स चतुरंग साहेब .
10 Feb 2009 - 11:49 am | विंजिनेर
लेख उत्तम आणि प्रवाही आहे.
एकूण लिखाणाची पद्धत विकीपिडीयावर असलेल्या चांगल्या दर्जाच्या लेखांत वापरलेल्या पद्धती सारखी आहे असं वाटलं.
बाकी शीर्षक पाहून अंमळ गोंधळलो होतो. बोआ काँस्ट्रिक्टर हा अमेझॉन नदीच्या खोर्यात असलेला लांबलचक असा साप/अजगर असतो (ना?)
10 Feb 2009 - 2:10 pm | भडकमकर मास्तर
अमेझॉन नदीच्या खोर्यात असलेला लांबलचक असा साप/अजगर असतो (ना?)
कार्पोवच्या खेळण्याच्या पद्धतीनुसार त्याला असं नाव पडलं असावं बोआ ...असा आपला एक अंदाज...
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
10 Feb 2009 - 2:12 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
अजगराचं नाव का दिलं हे लेखातच लिहिलं आहे.
बुद्धीबळातलं फार काही कळत नाही, पण कारपॉव्हचा छोटेखानी परिचय आवडला.
अदिती
आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.
10 Feb 2009 - 2:34 pm | विंजिनेर
खरंच की! पुन्हा एकवार नजर फिरवल्यावर कळाले
10 Feb 2009 - 12:47 pm | परिकथेतील राजकुमार
खुप आवडला.
कारपोवचा खेळ बघितला की द्रविडची हमखास आठवण येते. अतिशय शिस्तबद्ध, भक्कम बचाव, खराब चेंडुची वाट बघण्याची तयारी आणी आपल्या खेळाने गोलंदाजाला जेरीस आणणे.
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य
10 Feb 2009 - 5:51 pm | बिपिन कार्यकर्ते
रंगा, मस्त लेख. पण कोणे एके काळी कास्पारॉव्ह वर लिहायचं प्रॉमिस केलं होतंस ते कधी जमेल तेव्हा पूर्ण कर रे बाबा... :)
बिपिन कार्यकर्ते
10 Feb 2009 - 6:44 pm | चतुरंग
चतुरंग
10 Feb 2009 - 5:54 pm | श्रावण मोडक
छान...!!!
10 Feb 2009 - 6:45 pm | प्रमोद देव
रंगाशेठ कारपॉवचा परिचय आवडला. बुद्धीबळ आणि त्याचा इतिहास,त्यातले नावाजलेले खेळाडू आणि त्यांचे गाजलेले डाव ह्या बाबतीतला आपला व्यासंग थक्क करणारा आहे.
10 Feb 2009 - 7:25 pm | संदीप चित्रे
कार्पोव्ह आणि कास्पारोव्हच्या लढतींबद्दल पेपरमधे नेहमी वाचलेले आठवतंय.
>> एकसारख्या दबावाने हळूहळू प्रतिस्पर्ध्याला जेरीला आणून, त्याच्या खेळातल्या अतिशय सूक्ष्म अशा कच्च्या दुव्यांचा आधार घेऊन आपले स्थान बळकट करत नेणारा दीर्घ मुदतीचा खेळ दिसतो.
अरे, म्हणजे क्रिकेटच्या भाषेतला ग्लेन मॅकग्रा झाला की !!
मॅकग्रा एका मुलाखतीत म्हणाला होता -- बॅट्समनला सतत ऑफ स्टंपच्या थोडा बाहेर टप्पा टाकत रहायचं... तो चुका करतोच :)
(विशी आनंद चाहता) संदीप
10 Feb 2009 - 7:49 pm | प्राजु
कारापॉव ची छान ओळख करून दिलीत. उत्तम.
मला बुद्धीबळ येत नाही.. आणि आवडत नाही त्यामुळे कधी शिकायचा प्रयत्नही केला नाही.
पण आपला लेख आवडला. अशा बुद्धीबळातील दिग्गजांची ओळख करून घ्यायला आवडेल.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
10 Feb 2009 - 8:50 pm | लिखाळ
मस्त लेख. कारपॉवची छान ओळख करुन दिलीत.
असे लेख वाचायला आवडतील.. आधीचेही आवडले होते :)
-- लिखाळ.
10 Feb 2009 - 9:18 pm | धनंजय
बुद्धिबळातले काही न समजाणार्या मलासुद्धा याच्या अजगर-विळख्यांबद्दल थोडी कल्पना आली.
तुमचे बुद्धिबळावरचे लेख नेहमीच आवडतात.
11 Feb 2009 - 12:14 am | पिवळा डांबिस
बुद्धिबळातले काही न समजाणार्या मलासुद्धा याच्या अजगर-विळख्यांबद्दल थोडी कल्पना आली.
आम्हीही सहमत.
तूच पूर्वी मला दिलेल्या चेस-गेम्सच्या साईटवर मी वरचेवर जात असतो! "आजचा नवा गेम" बघायला!
तुमचे बुद्धिबळावरचे लेख नेहमीच आवडतात.
अतिशय सहमत.
चांगला विषय आहे रंगा! आणि तू तो वर्णन करतोसही छान!
अजून लिही या विषयावर!
माझ्या शुभेच्छा!!
11 Feb 2009 - 6:57 am | शितल
१०१ % सहमत. :)
11 Feb 2009 - 7:16 am | घाटावरचे भट
असेच म्हणतो.
11 Feb 2009 - 4:36 am | बेसनलाडू
(निर्बुद्ध)बेसनलाडू
11 Feb 2009 - 6:17 am | एकलव्य
झकास चिटुकला लेख आवडला! बुद्धिबळपटूंचे रशियात पीक येण्याचे काय कारण असावे याचे नेहमीच मला कोडे पडलेले आहे.
(बुद्धिबळ-वेडा) एकलव्य
11 Feb 2009 - 7:02 am | विंजिनेर
या कोड्याचं उत्तर कदाचित चीन मधे जागतिक दर्जाचे जिमनॅस्टिक्स आणि टेबल टेनिसपटु का निर्माण होतात किंवा भारताचा "राष्ट्रीय खेळ" क्रिकेट का आहे यात मिळेल :)
11 Feb 2009 - 7:10 am | सहज
१९७८ मधे त्याला त्याचे विजेतेपद टिकवण्यासाठी पुन्हा कोर्चनॉयसोबत लढावे लागले. हा सामना फिलिपाईन्स येथे झाला. कारपॉवचा टीम मेंबर म्हणून आलेल्या डॉ. झुखार ह्याने कॉर्चनॉयला भर सामन्यात संमोहित (हिप्नॉटाईज) करायचा प्रयत्न करणे, तो फलद्रूप होऊ नये म्हणून कॉर्चनॉयने आरसे बसवलेला चष्मा घालून खेळणे, खुनाचा गुन्हा नावार असलेल्या दोघा इसमांना आपले टीममेंबर्स म्हणून सामन्याच्या ठिकाणी आणणे अशा अनेकविध वैचित्र्यपूर्ण घटनांनी ही स्पर्धा गाजली! सुरुवातीला आघाडी घेतलेला कारपॉव सहज बाजी मारणार असे वाटतानाच अचानक मुसंडी मारुन कॉर्चनॉयने त्याच्या तोंडचे पाणी पळवले होते.
धतिंग!
रंजक लेख आवडला.
11 Feb 2009 - 8:05 am | रामदास
परीचय आवडला.माझ्या समजूतीप्रमाणे त्याची ताकद मनाच्या बळकटीत होती ज्यामुळे लांबलचक चालणार्या गेम मध्ये त्याचा मानसीक तोल जाणे, घाईघाईत चुकीची खेळी करणे अशा गोष्टी त्याच्या हातून व्हायच्या नाहीत.विळ्खा हळूहळू आवळत नेणे हा त्याच्या स्ट्रॅटेजीचा भाग होता.(चूभूद्याघ्या)
12 Feb 2009 - 2:15 pm | विसोबा खेचर
रंगा, नेहमीप्रमाणेच सुंदर लेख.. तुझ्या व्यासंगाला प्रणाम!
कास्पाराववरच्या लेखाची आतुरतेने वाट पाहतो आहे. आपण साला त्याचा जाम फ्यॅन आहे! :)
तात्या.