पाश्शेहजाराच्या गोष्टी: १. बचत गट

आतिवास's picture
आतिवास in जनातलं, मनातलं
11 Nov 2016 - 3:39 pm

“आज रामा कशापायी आलाय तुझ्यासंगं गटाच्या मीटिंगला? आपलं ठरलंय न्हवं पुरूषमाणसांना नाय येऊ द्यायचं म्हणून?” बचत गटाची अध्यक्ष असलेल्या कांताने जरा जोरातच विचारलं.

“राम राम अध्यक्षीणबाई. दादांनी सांगितलं हिकडं यायला म्हणून आलो बगा. आता तुमी नगं म्हणत असालसा तर जातो की लगेच माघारी. आपलं काय काम नाय बा, दादांचं हाये,” रामा बेरकीपणानं म्हणाला.

दादा म्हणजे प्रस्थ. केवळ गावातलं नाही तर पंचक्रोशीतलं. गेली अनेक वर्ष खासदार असलेल्या आण्णांच्या रोजच्या बैठकीतले. दादांच्या सल्लामसलतीविना आण्णांचं पान हलत नाही म्हणे. म्हणजे निदान दादा आणि त्यांची माणसं तरी असचं सागंतात.

“आता या कमळवाल्याला हितं काय करायचंय? केली की भर सगळी मागच्या विलेक्शनला, अजून दोन वरीसबी न्हाय झाली तर ...” शेवंता कुजबुजली. पण ते ऐकून अलका फणफणली. बाया कलकल करायल्या लागल्या. कोण कॉंग्रेसची, तर कोण भाजपची तर कोणी सेनेची. गलका व्हायला लागला. ते पाहून कांता म्हणाली, “उगा का भांडताय बायांनो? कधी ते हातवाले असतात तर कधी तेच कमळवाले असतात. आज येक आला, उद्या दुसरा येईल. आपण कशाला बरबाद करायची आपली एकी?” बाया हसल्या. रामापण हसला.

“काय निरोप आहे दादांचा?” कांताने विचारलं.

“काय न्हाई. दादा म्हणले किती दिवस शंभराचीच बचत करणार बाया? हजार-दोन हजार टाका की म्हन्ले आता. दिपाळीतून वाचले असतील ते पुडं सक्रातीला मिळतील.” रामा म्हणाला.

“ अरे बाबा, दादा मोठा माणूस हाये. आमी शंभरच कसंतरी करून वाचिवतोय, हजार कुठनं आणायचे बाबा? झाड नाही पैशाचं आमच्या दारात. सांग जा जाऊन तुझ्या दादास्नी.” रखमाआजी फिस्कारली. रखमा दादांची लांबच्या नात्यातली चुलती होती. तिचं असलं बोलणं दादा मनावर न घेता हसण्यावारी नेतील हे आख्ख्या गावाला माहिती. त्यामुळे सगळे हसले.

“मंग काय तर! सांगायला काय होतंय त्यास्नी. दादा देणारेत का पैसे?” आणखी एकीने धीर करून विचारलं.

“तेच तर सांगाया आलतू. दादा म्हणले दोन दोन हजार देतील दादा प्रत्येक बाईला.” रामा म्हणाला.

“अन अट काय? परत कदी द्यायचे? व्याज किती?” प्रश्नांचा भडिमार झाला रामावर.

“अट एकच. पयशे लगोलग गटाच्या खात्यात जमा करायचे. याज बीज काय नाय. जमलं तसं सा मैन्यांनी परत करायचे. कुणाला परत करायचे नसतील तरी बी चालंतंय. आपल्या गावच्या बायांची बचत वाढली पायजे असं दादांना लई दिसांपासून वाटतंय बगा.” रामाने सांगितलं.

बायांची नजरानजर झाली. फुकट मिळतंय तर कशाला सोडा – असा विचार प्रत्येकीच्या मनात आला. तसंही दादा नेहमी ओरबाडून घेतो, आज देतोय म्हणजे काहीतरी भानगड असणार असाही विचार त्यांच्या मनात आला.

“आम्ही काय लिखापढी करणार नाही बघ,” कांताने ठासून सांगितलं.

“काय गरज नाही अध्यक्षीणबाई. दादांकडून भाऊबीज समजा,” असं म्हणून रामाने पिशवीतून पाचशेच्या नोटांचा गड्डा बाहेर काढला.

रामाच्या वाटच्या ऐशी नोटा आज संपल्या. अजून एक महिना बाकी आहे.

आसपासच्या गावातल्या बचत गटांचा हिशोब रामाने मनातल्या मनात सुरू केला.

हे ठिकाणविरंगुळा

प्रतिक्रिया

संदीप डांगे's picture

11 Nov 2016 - 3:41 pm | संदीप डांगे

सह्ही... जबरदस्त! ;)

शाम भागवत's picture

11 Nov 2016 - 3:45 pm | शाम भागवत

मस्त.

यशोधरा's picture

11 Nov 2016 - 3:47 pm | यशोधरा

झक्कास! आणि अचूक.

शाम भागवत's picture

11 Nov 2016 - 3:51 pm | शाम भागवत

अचूक?
बायका आता इतक्या अडाणी नाही राहिल्या. बचत गट चालू स्थितीतला असेल तर नक्कीच नाही.

यशोधरा's picture

11 Nov 2016 - 3:55 pm | यशोधरा

ओके :)

अन्नू's picture

11 Nov 2016 - 4:03 pm | अन्नू

=)) =))

किसन शिंदे's picture

12 Nov 2016 - 10:05 am | किसन शिंदे

अगदी हेच म्हणतो. =))

ग्रेंजर's picture

11 Nov 2016 - 4:10 pm | ग्रेंजर

मस्त!!!!!! असं होऊ शकतं का पण??

शाम भागवत's picture

11 Nov 2016 - 4:51 pm | शाम भागवत

होत असेलही कदाचित. पण एक नक्की. बचत गटाच्या बायकांना वापरून घेऊन असे होणे शक्य नाही. बचत गटाच्या बायका रोखठोक बोलतील. निम्मे तुमचे निम्मे आमचे. एकी, नियमित बैठका, पुरूषांच्या अनुपस्थितीमुळे मनातले विचार स्पष्टपणे मांडण्याची संधी. पैशाचे व्यवहार कळायला लागणे वगैरे खूप फरक पडला आहे. मनकी बातची खूप टिंगल झालीय पण अनेक देशपातळीवरील प्रश्न ओझरते का होईना बायकां ना कळायला लागले आहेत व त्यावर त्यांचे आपापसात त्यांच्या कुवतीप्रमाणे बोलणेही होते. त्यांना आता एक हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे. खरे म्हणजे शहरातील सुशिक्षित व नोकरी करणाऱ्या बायकांनी मधून मधून त्यांच्यात मिसळून आपल्या अनुभवाचा व ज्ञानाचा फायदा त्यांना करून दिला पाहिजे.
मला वाटते सुरंगींची कोकणात शेती करणाच्या बाबतीत एक लेखमाला आहे. त्याच माझ्यापेक्षा जास्त याबाबत सांगू शकतील.
अशी कामे करणारा एखादा शहरी बचत गट निर्माण झाला तर ते खूप मोठे पाऊल असेल. असो.

मात्र या बायकांपैकी एकीने जरी चुगली केली तर तो दादा बाबा अण्णा आयकर अधिकाऱ्यांच्या रडारवर येणार हे नक्की.

आनंदी गोपाळ's picture

11 Nov 2016 - 10:03 pm | आनंदी गोपाळ

मात्र या बायकांपैकी एकीने जरी चुगली केली तर तो दादा बाबा अण्णा आयकर अधिकाऱ्यांच्या रडारवर येणार हे नक्की.

पैसे बाया भरताहेत.

अण्णाने भाऊबीज दिली आहे. नो लिखापढी. भाऊबीजेची किम्मत तुम्हाला नाही समजत. तुम्ही मेट्रोत राहता. व सेलही आहे.

शाम भागवत's picture

12 Nov 2016 - 10:05 am | शाम भागवत

:))

शाम भागवत's picture

12 Nov 2016 - 10:41 am | शाम भागवत

सत्तेच्या किंवा पैशाच्या गुर्मित या दादा वगैरे लोकांनी बऱ्याच स्त्री पुरूषांची दुष्मनी केलेली असते. त्यातल्या कुणीही चुगली करू शकतो हो. आणि या बचतगटातील एखादीची जर छेड काढली असेल तर भाऊबीज मिळाली यास्तव ती त्याला माफ करेल हे संभवत नाही.

कुठल्याही कामात लोकसहभाग असणे हे तत्व पाळले तरी भष्टाचार / अयोग्य गोष्टी कमी व्हायला लागतात. जलयुक्त शिवारात लोकसहभाग असल्यामुळे भ्रष्टाचाराला मोठ्या प्रमाणात आळा बसल्याचे वाचले होते. लोकसहभाग याचाच दुसरा अर्थ पारदर्शकता असा घेतला तरी चालेल.

कोणत्याही निवडणुकीत पैशाला खूप महत्व असते. असे पैसे बाळगणारे प्रत्येक पक्षात असतात. व निव्वळ त्याआधारे निवडणुकीची तिकीटे व मंत्रीपदेही मिळवतात. बऱ्याच जणांना गुन्हेगारी पार्श्वभूमी असूनही त्यांची मदत निवडणुकीत पैसे उभारणीसाठी घ्यायला लागते. येत्या ४-५ महिन्यात होणाऱ्या निवडणुकीत या सर्वांचे महत्व खूप कमी झालेले असेल. व जस जसे या लोकांचे महत्व कमी होत जाते त्या प्रमाणात लोकांची भिती कमी होऊन लोक पुराव्यासकट तक्रार दाखल करायला तयार होतात.असो.

शाम भागवत's picture

12 Nov 2016 - 10:50 am | शाम भागवत

तुमच्या या पोस्टीमुळे काही नविन मुद्दे सुचून ते मांडता आले याबद्दल आपले आभार.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Nov 2016 - 4:21 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आवडली. क्लास.

-दिलीप बिरुटे

प्रीत-मोहर's picture

11 Nov 2016 - 4:22 pm | प्रीत-मोहर

सहमत

महासंग्राम's picture

11 Nov 2016 - 4:26 pm | महासंग्राम

एक प्रश्न ५००-१००० च्या नोटा बंद झाल्यात तर आता का स्वीकारतील बचतगट वाले.??? .. कारण ५००-१००० बंद झालेत हि बातमी खेडोपाडी पसरली आहे. इथे शहरातलय लोकांना अजून तेवढी स्पष्टता नाही, खेड्यातली गोष्ट दूरच.

(वरील लेख ५००-१०००च्या नोटा बंद झाल्यानंतरच हे संभाषण आहे असं समजतो आहे )

संदीप डांगे's picture

11 Nov 2016 - 4:34 pm | संदीप डांगे

सामान्य माणसाला पाचशे च्या चार नोटा आपल्या खात्यात भरायला कसला त्रास नाहीये.

महासंग्राम's picture

11 Nov 2016 - 4:58 pm | महासंग्राम

हो ते मान्य पण पण फुकटच दुखणं कोण ओढवून घेईल. विशेषतः खेड्यातील लोक जास्ती करून महिला पैशांच्या बाबतीत जास्त जागरूक असतात. ते वरच्या लेखात पण आलेलं आहे ना.

सस्नेह's picture

11 Nov 2016 - 4:36 pm | सस्नेह

पण बचत गटवाल्या लै हुशार झालेत आता. अशा नाय फसत !

नाखु's picture

12 Nov 2016 - 9:44 am | नाखु

पण आमच्या भागात फक्त नगरसेवकांनी (आजी माजी-पाजी-भावी उत्साही) बचत गट कागदोपत्री तग धरून आहेत त्यांच्यात नक्की असा झोल होऊ शकतो

अजया's picture

11 Nov 2016 - 7:16 pm | अजया

कथा आवडली.

असले तथाकथीत समाजसेवक लै डोक्यात जातात. एकजात ढोंगी आणि पाखंडी असतात.

मारवा's picture

11 Nov 2016 - 7:56 pm | मारवा

गैरफायदा घेतला जाणं नक्कीच शक्य आहे.
पण तराजुत टाकुन फायदा तोटा तोलल्यास
फायदाच या निर्णयाचा जास्त आहे.
थोडं फायदा या अंगाने एखादी कथा टाकावीशी वाटतेय.
बघतो.
किंवा जमल्यास कविता.
कसे चोर एनजीओंनी जमवलेला काळा पैसा निकामी झाला. अस काहीस.

सतिश गावडे's picture

11 Nov 2016 - 11:04 pm | सतिश गावडे

बचत गटाच्या बायका इतक्या भोळ्या नसतात हो.
बचत गट ही सहकार तत्वावर चालणारी "मायक्रो फायनान्स" सिस्टीम आहे. ती चालवणारे इतके साधे भोळे असतील असे तुम्हाला का वाटले?

डॉ सुहास म्हात्रे's picture

12 Nov 2016 - 1:17 am | डॉ सुहास म्हात्रे

आजच अश्याच एका प्रकाराचा कायप्पावर सचित्र संदेश पाहिला...

In Kxxxr* this morning, the local MLA and few politicians have given money to women in a meeting Rs 3 lacs per head as a loan.

Everyone thought they are doing yeomen service till they realized that all the notes were Rs 1000 and Rs 500. They told them that there is a minor issue. The notes have to be exchanged in bank by individuals by producing ID's.

The loans are interest free for 6 months.

Criminal minds have already started working on overdrive

* : बातमीची सत्यता पटवून घ्यायला काही पर्याय नसल्याने जागेचे नाव संपादीत केले आहे.

समी's picture

12 Nov 2016 - 11:54 am | समी

बातमी खरी आहे पण आत्ताची नाहि...

पैसा's picture

15 Nov 2016 - 8:45 am | पैसा

आपल्या देशात लोक भयानक कल्पक आहेत. काहीही करू शकतात!