पाश्शेहजाराच्या गोष्टी: २. नोट

Primary tabs

आतिवास's picture
आतिवास in जनातलं, मनातलं
15 Nov 2016 - 8:34 am

गोष्टी

तशी थंडी अजून जोरदार पडत नसली तरी नोव्हेबरमध्ये सकाळी सहाची वेळ म्हणजे थंडीची वेळ. नाशिककडं जाणा-या एसटी बसमधले प्रवासी खिडक्या बंद करून बसले होते आणि बरेचसे झोपेत होते.

सोमवार सकाळची बस म्हणजे दोन दिवस पुण्यात येऊन परत जाणारे कॉलेजचे विद्यार्थी, काही बँकवाले आणि कंपनीत काम करणारे काही नोकरदार लोक, काही सरकारी कर्मचारी. त्यांच्या बसायच्या जागाही ठरलेल्या.

बसचे चालक-वाहक ठरलेले त्यामुळे तसे सगळे चेह-याने एकमेकांना ओळखतात, काही नावानिशीही ओळखतात हे “ते आले बघा पाटील साहेब, चल आता” असं वाहक चालकाला म्हणाला त्यावरून लक्षात आलं.

पाटलांच्या मागोमाग एक म्हातारी चढली. ती चढताना पाटलांनी तिची पिशवी हातात घेतली होती, म्हणून आधी कंडक्टरला वाटलं की पाटलांची आई-मावशी-चुलती कोणीतरी असलं ती.

पण तसं काही नव्हतं. जागेवर बसायच्या आधीच म्हातारी कडोसरीचे पैसे काढत म्हणाली, “नाशकाला जाती ना रं बाबा ही यष्टी? आर्दं तिकिटं दे मला.”

“आज्जे, जरा दमानं घे. बस तिकडं जागेवर. आलोच मी पैसे घ्यायला,” कंडक्टर जरा त्रासलेल्या आवाजात म्हणाला.

शिवाजीनगर स्थानकातून बस बाहेर पडली. चालक-वाहकाच्या गप्पा रंगात आल्या होत्या. नाशिक फाट्यावर आणखी एक दोन प्रवासी चढले. बस पुढं निघाली. मग कंडक्टर तिकिटं द्यायला आला. बहुतेक प्रवाशांनी तिकिटाचे नेमके पैसे आणले होते, त्यामुळे कंडक्टर खुषीत होता.

आज्जीबाईने एक नोट पुढं केली. कंडक्टरने घेतली आणि तो चमकला.

“म्हातारे, पाश्शेची नोट चालत न्हाय आता. दुसरे पैसे काढ.” कंडक्टर शांतपणे म्हणाला.

म्हातारी घाबरली. “चांगली नवीकोरी नोट हाये की बाबा. येकबी डाग न्हाय. न चालाया काय झालं?” ती अवसान आणत म्हणाली. सुरकुत्यांनी वीणलेल्या तिच्या चेह-यात दोन आठ्यांची भर पडली.

“कालपरवा टीवी बघितला न्हाय का? मोदी साहेबांनी सांगितलं की ही पाश्शेची नोट चालणार नाही आता म्हणून. सारखं सांगतायत की समदे लोकं.” कंडक्टरने तिला समजावून सांगितलं.

“अरं द्येवा, आता काय करू मी? बुडलं की माजं पैसं आता,” आजीबाईने जोरदार हंबरडा फोडला. म्हातारीच्या आवाजाने एसटीतले सगळे टक्क जागे झाले.

“आजीबाई, बुडले नाही पैसै. बँकेत नायतर पोस्टात जावा, बदलून मिळेल. आधार कार्ड आहे ना, ते घेऊन जावा सोबत, समदे मिळतील पन्नासच्या न्हायतर वीसच्या नोटांमध्ये. लगेच मिळणार, काळजी नको.” एका प्रवाशाने आजीला धीर दिला. मग काही लोक आपापसात एटीएमच्या रांगांबद्दल तक्रारवजा सुरांत बोलायला लागले. तर आणखी काही लोक त्यांना देशप्रेमाचं महत्त्व पटवून द्यायला लागले. ‘सरकारच्या धोरणांना विरोध म्हणजे देशद्रोह नाही’ असा एक सौम्य आवाज त्या गजबजाटात बहुधा कुणाच्याही कानी पडला नाही.

आजीच्या आजूबाजूचे प्रवासी मात्र तिला धीर देण्याचा प्रयत्नात मग्न होते. “खातं आहे का बँकेत? तिकडं भरून टाका म्हणजे फार रांगेत उभारायची पण कटकट नाही. पैशे कुटं जात नाहीत तुमचे. या पाश्शेऐवजी शंभर-पन्नास-वीसच्या नोटा वापरायच्या आता काही दिवस.” आणखी एकाने सल्ला दिला.

म्हातारी सावरली. “असं म्हनतायसा? बुडणार न्हाय ना पैशे? बदलून देताना कट न्हाय ना द्यावा लागणार? झ्याक हाये की मंग. पर इतका कुटाना कशापायी करतोय म्हनायचा तो मोदीबाबा?” म्हातारीच्या या प्रश्नावर सहप्रवासी हसले. मग दोन-तीन लोकांनी म्हातारीला समजावून सांगायचा प्रयत्न केला. महागाई, भ्रष्टाचार, पाकिस्तान हे तीन शब्द म्हातारीला ओळखू आले. मग म्हातारीने लोकांचं बोलणं समजल्यागत मान डोलवली. पण बरेच शब्द म्हातारीच्या डोक्यावरून गेले. ‘पैसा काळा कुटं असतुया व्हयं’ या म्हातारीच्या उस्फूर्त प्रतिक्रियेवर लोक पुन्हा हसले. सगळे हसताहेत हे पाहून म्हातारीही हसायला लागली. ‘मोदीबाबाचं भलं होवो’ असा तिने तोंड भरून आशीर्वादही दिला.

“कुणी तुम्हाला पाश्शेहजारच्या नोटा द्यायला लागलं तर घेऊ नका बरं आज्जी,” एका कॉलेजकुमाराने प्रेमळ सल्ला दिला.

म्हातारी मनापासून हसली. “अरं लेकरा, मला कोण द्यायला बसलंय पैशे? काडून घ्यायला बगतेत समदे. मालक मेले माजे तवापासून सरकार मला पैशे देती दर म्हैन्याचे म्हैन्याला. समद्यांची माज्या पेन्शनीवर नजर असतीय.  देवाला जायचं म्हणून हेच लपवून ठेवलेले. हरवायला नकोत म्हणून परवाच नातवानं एक नोट करून आणली बाबा पाश्शेची. त्यो न्हाय का फटफटीवर आलता मला सोडाया, तो नातू. घे रे मास्तरा, दे तिकिट.” म्हातारी मूळ पदावर आली.

कंडक्टर म्हणाला, “घ्या. सगळं रामायण झाल्यावर म्हातारी विचारतेय रामाची सीता कोण ते.” प्रवासी हसले.

“म्हातारे, ही नोट घरी घेऊन जायची. त्या साहेबांनी सांगितली तशी पोस्टात न्हायतर बँकेत जाऊन बदलून घ्यायची. आता ती नोट आत ठेव अन् दुस-या नोटा काढ. कार्ड हाये ना? शंभर न चाळीस रूपये दे.” कंडक्टर म्हणाला.

“दुसरी नोट न्हाय रे लेकरा. येवढीच हाये.” म्हातारी काकुळतीने म्हणाली.

काय बोलावं ते कंडक्टरला सुचेना. आजूबाजूचे प्रवासीही चपापले.

“आजी, असं करू नका. मास्तरला सरकारचा हुकूम आहे. न्हाय घेता येत तेस्नी पाश्शेची नोट. शोधा जरा, सापडंल एखादी शंभराची नोट,” एका प्रवाशाने समजावलं.

म्हातारीकडं खरंच दुसरी नोट नव्हती. म्हातारी रडकुंडीला आली. प्रवासीही भांबावले. एकटी म्हातारी, तिच्यासोबत कुणी नाही. तिला न धड अक्षरओळख. ना पोराचा फोन नंबर तिला माहिती. काय करायचं आता?  कुणाला काही सुचेना. सगळे गोंधळले.

तोवर चालकालाही या गोंधळाचा अंदाज आला. त्याने रस्त्याच्या कडेला गाडी थांबवली आणि तोही चर्चेत सामील झाला.

“लेट हर गेट डाऊन. आय वील बी लेट फ़ॉर ....” म्हणणा-या एका भपकेबाज युवकाकडे सगळ्यांनीच वळून रागाने पाहिलं. तो गप्प बसला.

“घ्या हो कंडक्टर तुम्ही ही नोट. तीस डिसेंबरपर्यंत आहे की वेळ. भरून टाका बँकेत. हाय काय आन नाय काय,” एकाने सल्ला दिला.

“तसं नाही करता येत मला, साहेब. ड्यूटी संपली की पैसे जमा करावे लागतात. तिकडं कॅशियर घेणार नाही पाश्शेची नोट. तुम्हीच कुणीतरी घ्या ती नोट आन द्या म्हातारीला शंभराच्या नोटा.” कंडक्टरने आपलं संकट दुस-यांवर ढकललं.

सगळ्यांच्या नजरा पाटील आणि जोशींकडं वळल्या. दोघंही ‘स्टेट बँक’वाले.

शेजारी-पाजारी, नातलग, ओळखीचे लोक, बायकोच्या ऑफिसमधले सहकारी, पोरांच्या मित्रांचे पालक, बहिणीच्या सासरचे लोक ... या सगळ्यांच्या ‘पाहिजे तितक्या नोटा बदलून मिळण्याच्या’ अपेक्षांचं ओझं घेऊन ते मागचे पाच दिवस जगत होते. तीस डिसेंबर फार दूर होतं अजून.

पाटील जोशींच्या कानात काहीतरी कुजबुजले. जोशींनी मुकाट्याने मान हलवली.

तेवढ्यात “आपण सगळे थोडीथोडी वर्गणी काढू. आजींना तिकिट काढून देऊ. चालेल का?” असं म्हणत एका कॉलेज युवतीने वीसची नोट काढली. प्रश्न वीस-पन्नासचा नव्हता, नोटांचा होता. म्हणून तातडीने बरेच प्रवासी परत झोपी गेले. तरी बघताबघता काही नोटा जमा झाल्या. ‘आजींना उतरवा’ असं म्हणणा-यानेही वीस रूपये दिले. बक्कळ साडेचारशे रूपये जमा झाले.

“आजी हे घ्या तिकिट आणि हे बाकीचे पैसे ठेवा वरच्या खर्चाला. ते पाश्शे ठेवून द्या आता.” पाटील म्हणाले.

“देवा, नारायणा, तुजी किरपा रं समदी. या समद्यांना सुखी ठेव रं बाबा,” आजींनी डोळे मिटून हात जोडले.

प्रवास पुढं सुरू झाला.

“आजी, त्या पाश्शेच्या नोटेचं आता काय करायचं?” उजळणीसाठी एकानं विचारलं.

“परत येयाला लागतीलच की पैशे. तवा त्या मास्तरला दीन नोट, न्हायतर मोडून घीन नाशकात. माजा पैसा काय काळा नव्हं, मी काय मोदीबाबाला ही नोट देणार नाय.” आजीबाई विजयी स्वरांत, ठामपणे म्हणाल्या.

सहप्रवासी एकमेकांची नजर चुकवत आणि हसू लपवत फेसबुक- व्हॉट्सऍपवर किस्सा सांगायला मोबाईलकडं वळले.

विरंगुळाहे ठिकाण

प्रतिक्रिया

पैसा's picture

15 Nov 2016 - 9:09 am | पैसा

:)

यशोधरा's picture

15 Nov 2016 - 9:37 am | यशोधरा

मस्त, खुसखुशीत! :)

योगी९००'s picture

15 Nov 2016 - 9:37 am | योगी९००

छान गोष्ट..!!

असाही एक शेवट चालला असता..
सहप्रवासी एकमेकांची नजर चुकवत आणि हसू लपवत फेसबुक- व्हॉट्सऍपवर किस्सा सांगायला मोबाईलकडं वळले. आणि आज्जीबाई मनातल्या मनात हसल्या आणि पुढच्या प्रवासासाठी त्यांनी ती नोट जपून ठेवली.

नाखु's picture

15 Nov 2016 - 3:26 pm | नाखु

जव्हेरगंज पद्धत्,निसो पद्धत आणि मंदार कात्रे पद्धतीने लिहिली पाहिजे.

अता मूळ अवांतर गोष्ट आवडली पण आप्लया गोष्टीत आंजीला शोधायची सवय आहे पण अता आज्जी सापडली.

आंजी पंखा नाखु

ग्रेंजर's picture

15 Nov 2016 - 3:15 pm | ग्रेंजर

मस्त गोष्ट!!!!!!

पाटीलभाऊ's picture

15 Nov 2016 - 4:25 pm | पाटीलभाऊ

छान लिहिलंय

ही दिशाभुल का केली आहे या गोष्टीच्या माध्यमातून?
हे नाही समजले.

सुज्ञ's picture

17 Nov 2016 - 12:09 am | सुज्ञ

त्यांना दिशाभूल नक्कीच करायची नसेल पण ती होण्याची खूप शक्यता वाटते. याचे कारण गोष्टीत एक तांत्रिक उणीव आहे.

अशा गोष्टी घडणार असे कदाचित माहीत असल्यानेच सरकार ने एसटी व अन्य जीवनावश्यक ठिकाणी जुन्या नोटा स्वीकारण्यास परवानगी ठेवली आहे. मी या दिवसात दोन वेळेस यष्टी ने जाऊन दोन्ही वेळेस पाचशे च्या नोटा खपवल्या.

असो . गोष्ट वाचून कोणीही दिशाभूल करून घेऊ नये.

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 Nov 2016 - 12:14 am | डॉ सुहास म्हात्रे

मस्तं गोष्ट !

अशी अडचणीत सापडलेली माणसे आणि त्यांना मदत करणारी माणसे यांच्या कथा माध्यमांत येत आहेत. हे माणूसकीचे हृद्य दर्शन मनाला नक्की सुखद आहे.

मात्र अनेक सरकारी संस्थानांत (एसटीत व रेल्वेतही) जुन्या नोटा चालतात.

अर्धवटराव's picture

17 Nov 2016 - 1:29 am | अर्धवटराव

.

साहेब..'s picture

17 Nov 2016 - 8:47 am | साहेब..

+1

बाजीप्रभू's picture

17 Nov 2016 - 6:56 am | बाजीप्रभू

गोष्ट खूप छान, खरी असावी बहुतेक.
खरी असल्यास अर्थक्रांतीच्या अनिल बोकीलांनी मांडलेला तर्क इथे लागू पडतो.
आपल्या भारतातील व्यवस्था जेव्हा काही कारणाने निकामी होतात तेव्हा भारतीयांची मूळ वृत्ती (दैवी वृत्ती) वर येते. आज्जीला वर्गणी काढून देणारे, एटीमच्या लाईनमधे लोकांना चहा वाटणारे आणि इतकं सारं पब्लिक रस्त्यावर येऊनही शांतता पाळणारे लोक हे या वृत्तीचं उधाहरण आहे.

अत्रुप्त आत्मा's picture

17 Nov 2016 - 8:28 am | अत्रुप्त आत्मा

मर्मभेदक!

नमकिन's picture

17 Nov 2016 - 8:46 am | नमकिन

ला घडलेली गोष्ट आहे असे समजतो