किनवा (Quinoa) हे प्रथिनांचे उत्तम स्रोत असलेले धान्य आहे. भरपूर प्रमाणात प्रथिने असलेल्या राजगिर्याच्याच कुटुंबातल्या या धान्याला आहारात जमेल तेवढ्या जास्त प्रमाणात समाविष्ट करण्याचा आजकाल बर्याच जणांचा कल असतो. आकाराने बाजरीच्या आणि रंग ज्वारीच्या दाण्यासारखा असा याचा दाणा असतो.
याला विशिष्ट अशी चव नसली तरी खाताना काहींना थोडी उग्र अशी वाटू शकते. शिवाय यापासून बनवता येणारे फार पदार्थ माहीत नसल्यामुळे याचा नक्की कसा समावेश करावा असा प्रश्नच असतो. मिश्र धान्यांची खिचडी बनवून मी त्यात किनवा नेहमीच घालते. आणखी नवीन काही बनवता येईल का म्हणून जरा शोधाशोध केली असता डोसा, पुलाव अश्या पदार्थांमध्ये तांदुळाऐवजी बरेच जण किनवा वापरतात हे दिसले. आणखी शोध घेतल्यावर एक ढोकळ्याची पाकृ मिळाली, त्यात थोडे बदल करुन प्रयत्न करुन पाहिला आणि बनलेला ढोकळा फारच आवडला. त्याची ही पाककृती.
साहित्यः
अर्धी वाटी किनवा,
अर्धी वाटी मूग डाळ,
पाव वाटी हरभरा डाळ,
अर्धा इंच आले,
१-२ हिरव्या मिरच्या,
हळद,
मीठ,
अर्धा चहाचा चमचा सोडा,
फोडणीसाठी:
२ चमचे तेल,
१ हिरवी मिरची - मोठे तुकडे करुन,
मोहरी,
जीरे,
तीळ,
कढीपत्ता,
पाणी,
आवडत असल्यास १ चमचा साखर,
कोथिंबीर,
खोबरे
कृती:
हरभरा डाळ धुवून साधारण २ तास (किंवा गरम पाण्यात अर्धा तास) भिजत घाला .
मूग डाळ, किनवा धुवून अर्धा तास भिजत घाला.
पाणी काढून मिक्सरमध्ये डाळी, किनवा, आले, हिरवी मिरची सर्व बारीक करुन घ्या.
हळद, मीठ घालून एकत्र करुन घ्या.
सोडा घालून पुन्हा एकदा मिश्रण हलवून घ्या.
ताटाला तेलाचा हात लावून घ्या. त्यात हे मिश्रण ओतून साधारण १५ मिनिटे झाकण ठेवून वाफवून घ्या.
दुसरीकडे फोडणी करण्यासाठी तेल गरम करा.
त्यात मोहरी, तीळ, कढीपता, मिरचीचे तुकडे घाला.
गार झाल्यावर तोन-तीन चमचे पाणी आणि त्यात साखर घाला.
ढोकळा गार झाल्यावर वड्या पाडा.
त्यावर चमच्याने फोडणी आणि साखरेचे पाणी पसरवून घ्या.
वरुन कोथिंबीर, आवडत असेल तर खोबरे घाला.
केचप, चटणी बरोबर खा किंवा वाफाळत्या चहाबरोबर याचा आस्वाद घ्या :)
प्रतिक्रिया
1 Oct 2016 - 7:41 am | यशोधरा
फोटो अगदी मस्त! इथे भारतात मिळेल का हे धान्य? करुन पाहिले असते.
1 Oct 2016 - 7:45 am | रुपी
पुण्यात गोदरेज नेचर्स बास्केट येथे मिळेल बहुतेक.
1 Oct 2016 - 7:48 am | यशोधरा
बघते, धन्यवाद!
1 Oct 2016 - 5:40 pm | पद्मावति
खूप छान कल्पना आहे किनवाचा वापर करण्याची. मस्तं दिसताहेत. नक्की करून पाहणार.
1 Oct 2016 - 5:46 pm | रेवती
वेगळी पाकृ. माझ्याकडे ३ वर्षांपूर्वीचा किन्वा आहे. एकदा त्याची खिचडी करून झाल्यावर पुन्हा काय करावे ते समजत नव्हते. आत समजले.
1 Oct 2016 - 5:50 pm | एस
ढोकळ्यावर तीळ हा प्रकार वेगळाच वाटतोय. करून पाहायला हरकत नाही. एके ठिकाणी 'तेलाचा द्यावा' इथे 'तेलाचा हात द्यावा' असे वाचावे. हे वाक्य वाचताना काही क्षण अडखळलो होतो. ;-)
1 Oct 2016 - 6:00 pm | स्वाती दिनेश
ढोकळा मस्त दिसतो आहे,
स्वाती
1 Oct 2016 - 6:06 pm | अभ्या..
अरे ह्याचा असा उपेग आहे होय. ब्येस्ट ब्येस्ट.
कुठेतरी पाह्यलेले मी. क्विनोआ असे वाचलेले. किन्वा मस्त आहे नाव.
1 Oct 2016 - 9:44 pm | इशा१२३
छान दिसतोय ढोकळा!किनवा शोधण आल.
1 Oct 2016 - 9:44 pm | इशा१२३
छान दिसतोय ढोकळा!किनवा शोधण आल.
1 Oct 2016 - 10:01 pm | निओ१
"किनवा" म्हण्जे काय ?
1 Oct 2016 - 11:37 pm | रुपी
मराठीतून लिहिण्याचा प्रयत्न म्हणून प्रश्न विचारला असेल तर जमलं आहे. :)
खरंच प्रश्न पडला असेल तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर सुरुवातीच्या चार ओळींतच आहे :)
3 Oct 2016 - 7:58 pm | निओ१
खुपदा वाचुन पण नाही समजले.
1 Oct 2016 - 11:40 pm | रुपी
रेवतीताई, नक्की करुन पाहा. सोडा अजून थोडा सढळपणे घालावा लागेल कदाचित :)
स्वातीताई, पद्मावति, अभ्या भाऊ, इशा धन्यवाद!
एस भाऊ, चूक लक्ष्यात आणून दिल्याबद्दल धन्यवाद, दुरुस्त करुन द्यायला सांगते.
2 Oct 2016 - 8:48 pm | पैसा
मस्त पाकृ!
2 Oct 2016 - 8:54 pm | अजया
छान पाकृ.
किन्वा कोणत्याही माॅलमध्ये मिळते हल्ली.तसंच फॅब इंडियाच्या दुकानात आॅर्गॅनिक सेक्शनला आजच पाहिले.
3 Oct 2016 - 7:05 pm | अनन्न्या
किनवाचा फोटो दिसत नाहीय.
3 Oct 2016 - 9:05 pm | त्रिवेणी
मस्त फोटो एकदम.ढोकळा प्रचंड आवडतो मला.