मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

किनवा (Quinoa) ढोकळा

रुपी · · पाककृती
dhokla किनवा (Quinoa) हे प्रथिनांचे उत्तम स्रोत असलेले धान्य आहे. भरपूर प्रमाणात प्रथिने असलेल्या राजगिर्‍याच्याच कुटुंबातल्या या धान्याला आहारात जमेल तेवढ्या जास्त प्रमाणात समाविष्ट करण्याचा आजकाल बर्‍याच जणांचा कल असतो. आकाराने बाजरीच्या आणि रंग ज्वारीच्या दाण्यासारखा असा याचा दाणा असतो. quinoa याला विशिष्ट अशी चव नसली तरी खाताना काहींना थोडी उग्र अशी वाटू शकते. शिवाय यापासून बनवता येणारे फार पदार्थ माहीत नसल्यामुळे याचा नक्की कसा समावेश करावा असा प्रश्नच असतो. मिश्र धान्यांची खिचडी बनवून मी त्यात किनवा नेहमीच घालते. आणखी नवीन काही बनवता येईल का म्हणून जरा शोधाशोध केली असता डोसा, पुलाव अश्या पदार्थांमध्ये तांदुळाऐवजी बरेच जण किनवा वापरतात हे दिसले. आणखी शोध घेतल्यावर एक ढोकळ्याची पाकृ मिळाली, त्यात थोडे बदल करुन प्रयत्न करुन पाहिला आणि बनलेला ढोकळा फारच आवडला. त्याची ही पाककृती. साहित्यः अर्धी वाटी किनवा, अर्धी वाटी मूग डाळ, पाव वाटी हरभरा डाळ, अर्धा इंच आले, १-२ हिरव्या मिरच्या, हळद, मीठ, अर्धा चहाचा चमचा सोडा, फोडणीसाठी: २ चमचे तेल, १ हिरवी मिरची - मोठे तुकडे करुन, मोहरी, जीरे, तीळ, कढीपत्ता, पाणी, आवडत असल्यास १ चमचा साखर, कोथिंबीर, खोबरे कृती: हरभरा डाळ धुवून साधारण २ तास (किंवा गरम पाण्यात अर्धा तास) भिजत घाला . मूग डाळ, किनवा धुवून अर्धा तास भिजत घाला. पाणी काढून मिक्सरमध्ये डाळी, किनवा, आले, हिरवी मिरची सर्व बारीक करुन घ्या. हळद, मीठ घालून एकत्र करुन घ्या. सोडा घालून पुन्हा एकदा मिश्रण हलवून घ्या. ताटाला तेलाचा हात लावून घ्या. त्यात हे मिश्रण ओतून साधारण १५ मिनिटे झाकण ठेवून वाफवून घ्या. दुसरीकडे फोडणी करण्यासाठी तेल गरम करा. त्यात मोहरी, तीळ, कढीपता, मिरचीचे तुकडे घाला. गार झाल्यावर तोन-तीन चमचे पाणी आणि त्यात साखर घाला. ढोकळा गार झाल्यावर वड्या पाडा. त्यावर चमच्याने फोडणी आणि साखरेचे पाणी पसरवून घ्या. वरुन कोथिंबीर, आवडत असेल तर खोबरे घाला. केचप, चटणी बरोबर खा किंवा वाफाळत्या चहाबरोबर याचा आस्वाद घ्या :) dhokla1

वाचन 9177 प्रतिक्रिया 0