प्रिय पु ल काका

शीतल जोशी's picture
शीतल जोशी in जनातलं, मनातलं
8 Nov 2015 - 3:25 pm

प्रिय पु ल काका ,

लहानपणी ,मला रोज रात्री गोष्टी ऐकत झोपायची सवय होती , मग मी हळू हळू मोठी झाले , गोष्ट ऐकायची सवय मात्र कायम राहिली , पण तो जादू करणारा आवाज आता बदलला होता , तो होता तुमचा … पुलकीत आवाज . माणूस लिखाणानी आणि आपल्या आवाजांनी कायम अमर आणि चिरंजीवी राहू शकतो हे तुम्हीच दाखवून दिले . आयुष्यात असे किती पण अवघड, उदास प्रसंग आले , आणि असे वाटले कि आज तरी काय झोप लागणार नाही आणि वाचायचा मूड पण नाहीये तर तुमचे कोणतही कथाकथन किंवा एकपात्री निवडावे आणि ऐकावे , मन प्रसन्न होते , आणि माणूस नावाच्या प्राण्यात पुन्हा एकदा प्रेमात पडते . तुमच्या काही काही लिखाणानी माझ्या वर फार सूक्ष्म संस्कार केले आहेत . तुम्हाला गम्मत सांगू , तुमचे चितळे मास्तर मला खरच भेटले होते , ज्यांनी मला शिकवले , आणि माझ्या बाबा न हि , ते पण कोणता हि विषय उत्कृष्ट शिकवू शकायचे , आणि तेव्हा पासून तुमची हि सगळी पात्रे , माणसे अगदी पूर्ण नाही तरी थोडी बहुत तरी सापडायला लागली . तुमच्या मुळे , माणसे वाचायचा छंद जडला . नाटके खरे तर बघायची असतात (तशी मी घरात कधी कधी ती करते सुद्धा ), पण ती वाचायची आवड मला का लागली माहितीये , कारण तुमचे "तुज आहे तुजपाशी " , माझ्या हातात पडले, आणि मी पुन्हा पुन्हा वाचून काढले . मी खूप नाटके पहिली किंवा वाचली त्या नंतर , पण का ठावूक या नाटकाशी माझे वेगळे नाते आहे , तीच पात्रे मला दरवेळी नवे काही तरी देवून जातात . काकाजी , आचार्य, उषा , सतीश , गीता , श्याम जणू माझे कुटुंबातले च आहेत . दर वेळी वाचताना , प्रत्येक मधला एक नवा विचार आणि भूमिका सापडते आणि जगण्याचा अर्थ हि
तुमचा "नंदा प्रधान ","बबडू " "तो ", "भय्या नागपूरकर "माझ्या मनाला फार चटका लावून गेले . एक मात्र नक्की ह, "ती फुलराणी" मधील "तुला शिकवीन चांगलाच धडा " हे स्वगत , नाटकात काम करायची आवड असलेल्या प्रत्येकाला , लहान पाणी करून पाहावे असे वाटतच , आणि ती फुलराणी मात्र पक्की आपली मराठी वाटते बर का , भाषांतर असून हि . प्रवास वर्णन हे किती रंजक असू शकते ते पण तुम्हीच सांगितले ,त्यामुळे एका नवा साहित्य प्रकार आवडला . बटाट्याचा चाळी मधले चितन , बरच काही विचार करायला लावून गेली . आणि मराठी वांग्मायाचा गाळीव इतिहास , उपहासत्मक विनोद किती सकस असू शकतो याचे उत्तम उदाहरण आहे . तुम्ही साहित्याची इतकी दालने खुली करून ठेवली आहेत न , कि कोणताही साहित्य प्रकार निवडावा आणि तुम्ही तो किती मनोरंजक पण काही हि गाजावाजा न करता एक विचार देवून ठेवणारा केला आहे . मी दर वर्षी तुमच्या बद्दल लिहित आलीये , पण शब्द आटले तरी तुमच्या बद्दलचे पेम आणि आदर कधीच कमी होणार नाही . अलौकिक प्रतिभा असूनही , पैश्याचा मागे न लागता , केवळ माणसांवर प्रेम करणारा आणि आपल्या साहित्य तून निरोगी मने तयार करणारा हा कलाकार . अर्थात तुमचा संसार तुमच्या पत्नीने इतका समर्थ पणे सांभाळला , म्हणून तुम्ही आम्हाला इतके भेटत गेलात.
तुमची पुस्तके आणि तुमचा आवाज हा माझ्या आयुष्यातला अविभाज्य भाग आहे , इयत्ता चौथी पासून ते आज पर्यंत तुमचे लिखाण माझ्या साठी अजून तितकेच ताजे टवटवीत आहे आणि काही तरी देवून जाणारे आहे .
कारण कदाचित माझ्या वयानुसार त्यातून मला नवीन काही तरी सापडेल असे काही तरी तुम्ही त्यात दडवले आहे . चौथीत असताना मला त्यातले किती कळले असेल ते गुळाचा गणपतीच जाणो . पण माझा "गटण्या " होण्याची सुरवात मात्र झाली हे नक्की बर का . आज काल , समोरच्याला कळणारे आणि भिडणारे असे लेखन बहुधा चांगल्या लेखनात मोडत नाही , सतत काही तरी माहितीपर, तात्विक असे तरी लिहिले जाते किंवा मग ज्याला विनोद म्हणावे कि नाही अश्या प्रकारचे विनोद , कार्यक्रमात आणि लिखाणात दिसतात , म्हणजे अगदीच निराशावादी चित्र नाहीये तसे, तुम्ही कौतिक करावे असे काही चित्रपट आणि नाटके येत आहेत अजून , आमची मराठी अजून तशी जिवंत आहे , पण नवीन पुस्तकांचे म्हणाला तर जर अवघड चित्र आहे . रंगून जावून वाचावे किंवा ज्यामुळे वाचनाचे आवड निर्माण व्हावी असे तुमच्या सारखे लिहायला कधी जमेल का हो आम्हाला ? मान्य आहे कि तुम्ही आणि तुमचे लिखाण हे कालातीत आहे , पण आमचे दुर्दैव कि आम्ही तुम्हाला प्रत्यक्षात भेटू नाही शकलो , पत्र व्यवहार करू नाही शकलो , असे कधीच नाही का होणार कि तुम्ही परत भेटाल ? . कसे झालाय माहितीये , पांडुरंग तोच आणि तिथेच असून पण वारकरी दर वर्षी नियमाने जातात कि त्याला भेटायला , तसे किती हि वेळा वाचले तरी तुमच्या लिखाणाची वारी करायची हे आमचे पण व्रत आहे , कारण हि ओढच जबरदस्त आहे .
माझे ना जरा गटण्या सारखे आहे , किती हि लेखक वाचले न तरी " पु ल आणि ____" smile emoticon
मी ठरवले आहे आता कि आपल्याला मिळालेला हा आनंद , वाटायचा आपण , म्हणूनच , ज्यांना कुणाला पु ल न भेटायचे आहे , त्यांच्या साठी , आमचे दरवाजे नेहमीच खुले आहेत
तुज आहे तुजपाशी असे म्हणताना
तुम्ही आम्हाला काय दिले हे आम्हासच ठावूक
आमच्या पाशी , आजू बाजूला पण हे सगळे होताच
पण कोणत्या नजरेतून पाहायचे ते तुम्ही शिकवलत
गुरु दक्षिणा काय देणार तुम्हाला आम्हाला 'बस इतकाच सांगू कि
तुम्ही माणसांवर , साहित्येवर , कवितेवर , संगीता वर आणि आयुष्यावर भरभरून प्रेम केले
तसच जमल तर करू आम्ही पण , तुमच्या इतके नाही जमणार कदाचित
पण १०० पर्सेंट नाही तरी छोटे मासे होऊ कि आम्ही
- तुमची एक वाचक

वाङ्मयलेख

प्रतिक्रिया

उगा काहितरीच's picture

8 Nov 2015 - 3:30 pm | उगा काहितरीच

आवडला लेख ! पुल म्हणजे पुलच !

लाल टोपी's picture

8 Nov 2015 - 3:55 pm | लाल टोपी

'आम्हांला भरभरुन आनंद देणा-या या माणसाशिवाय असलेल्या जगांत रहावे लागेल अशी कल्पनाही मी केली नव्हती' वुडहाऊस बद्द्ल अशा आशयाचे काही लिहिले होते, पु.ल. आज तुमच्या बद्दल देखील असेच वाटते. आज पुलंच्या वाढदिवशी खूपच सुंदर लेख आवडला.

पुल प्रेमीईसाठी त्याच्या साठाव्या वाढदिवसानिमित्त तयार केलेली ही डॉक्युमेंटरी
https://www.youtube.com/watch?v=GCaZNkJGPAY

घन निल's picture

10 Nov 2015 - 12:48 pm | घन निल

छान डॉक्युमेंटरी !!

मित्रहो's picture

8 Nov 2015 - 4:05 pm | मित्रहो

पुलंच्या आठवणी परत जाग्या केल्याबद्दल धन्यवाद

अत्रुप्त आत्मा's picture

8 Nov 2015 - 5:04 pm | अत्रुप्त आत्मा

+++१११

शा वि कु's picture

8 Nov 2015 - 7:34 pm | शा वि कु

सुंदर लेख .

खेडूत's picture

8 Nov 2015 - 8:30 pm | खेडूत

९६ व्या जयंती निमित्य भाईकाकांना अभिवादन...!

माझीही शॅम्पेन's picture

8 Nov 2015 - 8:37 pm | माझीही शॅम्पेन

छान लेख

पु ल हे दोन शब्दच पुरे .. अद्भुत , अप्रतिम आणि अवर्णीय आनंद !!!

पुलंच बटाट्याची चाळ आणी मराठी वाङमयाचा (गाळीव) इतिहास हे दोन पुस्तक आवडतात.
बाकी आवडत नसली तरी पुल यासाठी आवडतात

भंकस बाबा's picture

8 Nov 2015 - 10:06 pm | भंकस बाबा

पंढरीचा वारकरी जसा दरवर्षी अनामिक ओढीने वारीला जातो तसे मी पुल चे लेखन वाचतो.

मुक्त विहारि's picture

8 Nov 2015 - 11:19 pm | मुक्त विहारि

मस्त...

रायनची आई's picture

9 Nov 2015 - 10:25 am | रायनची आई

आपण आपल्या मुलानापण पुलंची पुस्तके वाचायला देउन त्यांची गोडी लावली पाहिजे.. नाहितर इंग्लीश मिडियीम मधे जाणारी ही पिढी आनंदाच्या मोठया खजिन्यापासून वंचित राहतील..

मोगा's picture

9 Nov 2015 - 10:31 am | मोगा

छान

स्वाती दिनेश's picture

9 Nov 2015 - 1:51 pm | स्वाती दिनेश

लेख छान !
स्वाती

बबन ताम्बे's picture

10 Nov 2015 - 11:58 am | बबन ताम्बे

पुलंनी महाराष्ट्राला खळखळून हसवलं !

त्यांच्याप्रती आदर म्हणून मी त्यांचे पेन्सिल शेडींग चित्र काढली आहे.

http://www.misalpav.com/node/32486