माझी भांडाभांडी

सस्नेह's picture
सस्नेह in जनातलं, मनातलं
24 Jul 2015 - 5:33 pm

काही दिवसापूर्वी घर शिफ्ट केलं. नवीन घरातलं स्वैपाकघर आधीच्या घरापेक्षा लहान आहे. सामान लावताना एक महत्वपूर्ण साक्षात्कार झाला, की माझ्या घरातील एकूण पसाऱ्याचा सुमारे चार दशांश व्हॉल्यूम विविध आकाराच्या, प्रकारच्या आणि उपयोगाच्या भांड्यांनी व्यापला आहे. बाबौ ! इतक्या वर्षांच्या प्रपंचात मी भांडाभांडी फारशी केली नसली तरी भांडी भरपूर जमवलीत हे प्रखर सत्य त्या घराबाहेर पडलेल्या भांड्यांनी मला जाणवून दिले.
नवीन घरात गेल्यावर सामान लावणे हा एक हॉरिबल प्रकार असतो. हे सामान आपण (आपल्या समजुतीप्रमाणे ) रग्गड मेहनत घेऊन कल्पकतेने जागेवर बसवले तरी त्यानंतर साधारण महिनाभर तरी ते एखाद्या व्रात्य खट्याळ कार्ट्यासारखे आपल्याशी ‘हाईड अँड सीक’ हा खेळ खेळत राहते. मी सामान लावायला मदत करण्यासाठी दोन घट्टमुट्ट बहिणींना आवतन दिले होते. शिवाय बॉक्स खोलून सामान बाहेर काढण्यासाठी एक भक्कम गडी बोलावलेला. त्याला घेऊन तीन बेड, दोन सोफे, टीव्ही कॉम्प्युटर टेबल आणि दोन टीपॉय इतकं सामान लावून झाल्यावर नवरोजींनी हुश्श म्हणून चहासाठी बाह्य दिशेस पलायन केलेले. मग बारीक बारीक सामान लावायला मी व दोघी बहिणींनी पदर खोचला.
गड्याने पहिलेछूट सगळे पर्दानशीन बॉक्सेस धडाधड बेपर्दा करून टाकले आणि त्यांची अंडीपिल्ली बाहेर काढली. त्यामुळे ती सगळ्या घरभर रांगून येता जाता पायात कडमडू लागली.
‘अरे, अरे, एकेक बॉक्स खोलायचे ना !’ मी कळवळले.
‘एकेक कुठं घेऊन बसता, म्याडम, सगळं समोर दिसल्यावर पटापटा लावाय बरं पडतय की !’
मग आम्ही तिघींनी स्वैपाकघराकडे कूच केले आणि तिथे फरशीवर लोळत पडलेल्या गनिमावर म्हंजे भांड्यांच्या ढिगावर तुटून पडलो. गनीम भारी. नवीन घरात छताला लागून लॉफ्ट केलेले नव्हते. त्यामुळे भारी भारी गनिमांना छतावर बसवण्याची काही सोय नव्हती.
आम्ही भांड्यांच्या बोकांडी बसतो तोच गड्याने काचसामानवाला बॉक्स दरादरा ओढत स्वैपाकघरात आणला. त्या प्रवासात दोन नाजुक ग्लास आणि लोणच्याची बरणी धारातीर्थी पडली. लोणचे आधीच संपले होते हे बरं झालं. शकुताई आणि सरूताई उंच काचेच्या कपाटात काचसामान क्रोकरी इ. बसवू लागल्या. मी त्यांना सूचना देता देता किचनओट्याखालच्या ट्रॉलीच्या दहा खोबण्यांमध्ये आठ ताटे, बारा प्लेटी, दोन पराती, दीड डझन लहान-मोठ्या झाकण्या, पाच तवे आणि दोन उठवळ, नव्हे, उथळ पॅन्स या गनिमांना कोंबण्याची खटपट करत होते. इतक्यात पुढच्या आघाडीने तोफा डागल्या..
‘अगं, ग्लासं लावली पण पाण्याचा कावळा बसत नाहीये कपाटात. आणि ही मायक्रोवेव्हची काचेची भांडी क्रोकरी सेटच्या डोक्यावर ठेवू का ?’
‘ओटीजीची भांडी कुठं ठेवायची ?’
‘हा डिनरसेट बाहेर येतोय कपाटाच्या, प्लेटी मोठ्या आहेत ना म्हणून !’
‘कॉफी मग्ज दहाच बसताहेत, उरलेले दोन कुठे ठेवू ?’
‘बाउल-सेट एक बसला. दुसरा काय करायचा ?’
ताटांचा नाद सोडून मी क्रोकरीकडे मोर्चा वळवला. बराच काथ्याकुट केल्यावर निष्पन्न झाले की सगळी क्रोकरी त्या एका लहानशा (?) कपाटात मावत नाही. तेव्हा उरलेल्या क्रोकरीला लहान बॉक्समधे घालून कपाटाच्या वर बसवले.
काचसामानाची अशी विल्हेवाट लावून झाल्यावर आम्ही ट्रॉल्यांकडे मोर्चा वळवला.
आता काम बिकट होते. पहिल्या घरापेक्षा इथला किचनकट्टा लहान असल्यामुळे ट्रॉल्यांपण कमी होत्या. तिखट-मीठ मसाल्याच्या बरण्या, जिरे, मोहरी, हळद आणि तत्सम नाना प्रकाराच्या बरण्या एका ट्रॉलीच्या दोनपैकी एका कप्प्यात ठेवून त्याच पदार्थांच्या साठवणीच्या मोठ्या बरण्या तिथेच खाली ठेवल्या. तेव्हा आणखी सुमारे डझनभर बरण्या बाहेरच राहिल्या असल्याचे ध्यानात आले. त्यांना आणि ट्रॉलीच्या खोबणीत न मावलेल्या दोन पॅन्स आणि तीन तव्यांना तात्पुरते तसेच सोडून आम्ही वाट्या, प्लेटी अन बाउल्सच्या खनपटीस बसलो. पाच नमुन्याच्या लहान-मोठ्या दीड डझन वाट्या , एक डझन पोह्याच्या प्लेटी, तीन नमुन्याचे पाण्याचे ग्लास आणि दोन तांब्ये यांची वरच्या ट्रॉलीत स्थापना केल्यावर खालच्या कप्प्यात दुधाची आणि चहा-कॉफीची वीस-एक लहानमोठी पातेली, वडाप रिक्षात कोंबलेल्या शाळेच्या पोरांप्रमाणे दाटीवाटीने बसली. त्याखालच्या कप्प्यात भाजी-आमटीची दहा-पंधरा लहान पातेली बसली, पण दोन लिटर आणि त्यापेक्षा मोठ्या चार पातेल्यांनी त्यात बसायला साफ नकार दिला. त्यांची रवानगी ‘तात्पुरत्या’वाल्या गटात झाली. आणि त्यांची जागा दोन डिचकी, एक गुंड, एक बरणी आणि तेलाची किटली यांनी आनंदाने घेतली.
मग शेजारच्या ट्रॉलीवर हल्ला चढवला. प्रथम कढया सर्वात खालच्या कप्प्यात लावायचे ठरले. त्यासाठी त्यांची मोजदाद केली तर तब्बल अकरा कढयांची मी धनीण आहे, असे माझ्या लक्षात आले. त्यापैकी एकातएक बसणाऱ्या तीन कॉपर बॉटम वाल्या मला आईने दिल्या होत्या. तीन काळ्या इनॅमलच्या, एका कंत्राटदाराने वास्तुशांतीला दिल्या होत्या. एक नॉनस्टिक मावशीने दिलेली आणि दोन निर्लेप मी विकत घेतल्या होत्या. आणि एक पांढरी हिंडालिअमची भाजीची आणि एक लोखंडी तळणाची या प्राचीन काळापासून माझ्या स्वैपाकघरात नांदत होत्या.
गेल्या दहा वर्षात मी , वर्षाला फार तर एखादेच भांडे खरेदी केलेलं मला आठवत असताना ही इतकी भांडी आली कुठून याचा मला प्रचंड अचंबा जाहला ! ही एवढी पातेली, तवे अन कढया कुठून आले याचा मागोवा घेतल्यावर निष्पन्न झाले की इंडक्शन शेगडी झटपट काम देते म्हणून घेतल्यानंतर तिची स्पेशल भांडी म्हणजे सपाट बुडाचा तवा, पॅन, पातेली, कुकर हे सगळे लटांबर तिच्या मागून आले होते. तसेच निर्लेपचा लेप निघाल्यामुळे कर्मच्युत झालेले दोन तवे उगाच भटकत फिरत होते. जुने पोळपाट भंगले म्हणून नवीन घेतले, पण जुने शिसवी अन आज्जीने दिलेले म्हणून टाकवेना. ते चिकटपणे घरात राहिलेले. चाकू-सु-यांची धार ऐन वेळी दगा देते म्हणून त्यांना चार-पाच पर्याय ठेवलेले. अॅल्युमिनिअमची फोडणीची, कढणाची पातेली कामवालीने बरेचदा नीट घासलेली नसतात म्हणून त्यांनाही दोन ते पाच पर्याय.
..सगळ्या कढया एकमेकींच्या गळ्यात गळा घालून खालच्या कप्प्यात सुखेनैव नांदू लागल्याचे पाहून मी हुश्श केले. तेवढ्यात बहिणीने इंडक्शनच्या छोट्या कुकरला त्यांच्यात ढकलायचा प्रयत्न केला. त्यासरशी सगळ्या कढया एकदम जोरजोरात एकमेकींशी आणि त्या कुकरशी भांडू लागल्या. मग मी मध्ये पडून त्या कुकरची रवानगी मोठ्या कुकरशेजारी कट्ट्यावर केल्यावर पुन्हा शांतता प्रस्थापित झाली. मग कढयांच्या वरच्या कप्प्यात दोन्ही कुकरमधे घालायची लहानमोठी भांडी आणि दह्या-तुपाचे साताठ गडवे, ताकाचे दोन गंज, दोनतीन चंबली इ. विराजमान झाले. त्यावर एक लहान कप्पा होता त्यात दोन डझन लहान चमचे, पाचुंदाभर कालथे, पळ्या, डाव, झारे आणि उलथणी, पाच सहा चाकू अन सुरे, पापड भाजायचे दोन चिमटे आणि एक जाळी, एग बीटर आणि वाट्यांवरच्या अर्धा डझन लहान झाकण्या यांनी ठाण मांडले. त्यातच फोडणीचा डबा दाटीवाटीने विसावला.
आम्ही समाधानाने दोन सुपे, तीन रोवळ्या, दोन पोळपाट दोन लाटणी, एक दगडी आणि एक लोखंडी खलबत्ता, फळांच्या दोन टोपल्या आणि त्यावर ठेवायची जाळी यांना कुठे ठेवायचे याचे खलबत करू लागलो. यापैकी दोन सुपे आणि एक पोळपाट-लाटणे सोडून इतर सर्व सिंकखालच्या सिंगल ट्रॉलीमधे मावते असा शोध लागला. लगेच त्यांची तिथे रवानगी झाली. मग पिठाचे दोन डबे आणि साठवणीच्या डाळी, रवा, पोहे, साबुदाणे, शेंगदाणे, मीठ, गूळ, शेवया, कुरडया इ.च्या डब्यांची रवानगी, भिंतीला खेटून, फ्रीज आणि बाल्कनीचे दार यांच्यामध्ये दाटीवाटीने अंग चोरून उभ्या असलेल्या एकमेव रॅकमधे करण्यात आली. त्याच रॅकने आपल्या आठ कप्प्यांमध्ये दोन खाऊचे डबे, दोन बिस्किटांचे डबे, प्लास्टिकचे लहान-मोठे मोजदाद करता न येणारे कंटेनर, साबणाचे बॉक्स, पोळीचे दोन डबे, लोणच्यांच्या दोन काचेच्या, चटणीची एक चिनीमातीची अन चिंचेची एक बरणी, झालच तर सॉसच्या दोन बाटल्या हे सर्व सामान उदारपणे सामावून घेतले. इतकेच नव्हे, तर दोन सुपे, जादाचे पोळपाट-लाटणे, दोनतीन बुट्ट्या आणि गव्हाची अन पिठाची चाळणी यांना आपल्या डोक्यावर नम्रपणे धारण केले.
तरीही अजून, मायक्रोवेव्हची प्लास्टिकची भांडी, केकची भांडी, इडली- स्टँड, अप्प्याचा खळगेवाला तवा, चकली-यंत्र, पुरणाची जाळी, टोस्टर, बीटर, कॅसरोल, एक किटली, एक चार कप्प्याचा टिफिन इ. भांडी उघडीच पडली होती. त्यांना आणि मघाशी एका बाजूला बसवलेल्या लोखंडी तवे इ. मंडळींना अखेर एका रिकाम्या पिंपात समाधी देऊन आम्ही सोफ्यावर जाऊन पसरलो, त्यानंतर सुमारे एक तास डोक्यातला भांड्यांचा आवाज काही थांबला नव्हता.
अखेर पोटातल्या गुरगुरीने भांड्यांच्या आवाजावर मात केली आणि आम्ही तिघी पोटपूजेच्या तयारीला लागलो. आता पोळ्या लाटायचा उत्साह आणि शक्ती कुणालाच उरलेली नसल्याने आमटी भातावर भागवायचे ठरले. त्याप्रमाणे ‘हाईड अँड सीक’ करत कुकरची भांडी, डाळी, तांदूळ इ. जमवाजमव झाली. सगळ्यांना कुकरात घातले आणि सरूताई किंचाळली, ‘अगं बबे, कुकरची शिट्टी कुठं ठेवली आहेस ?’
अरे देवा ! सामान भरताना मी कुकरची शिट्टी हरवू नये म्हणून काळजीपूर्वक एका प्लास्टिकच्या डबीत घालून ठेवलेली मला आठवली. पण ती डबी कुठे ठेवली, हे जाम आठवेना !!
रॅकमधल्या असंख्य प्लास्टिक डब्यांकडे आम्ही तिघींनी हताशपणे पाहिले आणि हात कपाळाकडे नेले ! आता शिट्टी शोधण्याची शक्ती एकीतही राहिली नसल्याने हॉटेलचा रस्ता धरण्याचा ठराव बहुमताने पास झाला. गाडी काढून सगळे हॉटेलात जाऊन सुखेनैव क्षुधाशांती करू लागलो. पण माझ्या घशाखाली घास उतरेना...
अर्जुनाला जसा माशाचा डोळा दिसत होता, तशी ती इवलीशी शिट्टी मला जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी दिसू लागली होती !
उद्या खेळायच्या ‘हाईड अँड सीक’ खेळाने माझ्या पोटात आजच गोळा आणला होता !!!

विनोदअनुभवविरंगुळा

प्रतिक्रिया

इरसाल's picture

24 Jul 2015 - 5:38 pm | इरसाल

मज्जाच मज्जा.

शिफ्ट केल्यावरही ८ खोके वर्षभर उघडले नव्हते. तरी बरं पॅकिंग करताना पर्मनंट मार्कर ने कश्यात काय हे लिहीले होते साग्रसंगित.

एस's picture

24 Jul 2015 - 5:39 pm | एस

वाचूनच दम लागला!

(मुपी मोड ऑन)

मानसानं गरजा कमीत कमी ठेवायच्या ना!

(मुपी मोड ऑफ)

:-P

हा अनुभव बरेचदा घेऊन झाला आहे, तरीही दर वेळी नवीन शिक्षण होतं, म्हणून वाचनखूण केली आहे. (काही भांड्यांची -इथे दिलेली- नावे माहीत नाहीत, डिचकी, गुंड म्हणजे काय?)

काळा पहाड's picture

25 Jul 2015 - 1:53 am | काळा पहाड

डिचकी म्हणजे छोटं तपेलं. गुंड माहिती नाही. हे कर्नाटकातून आलेले शब्द असावेत का?

श्रीरंग_जोशी's picture

25 Jul 2015 - 7:48 am | श्रीरंग_जोशी

गुंड म्हणजे मध्यम आकाराची घागर. विदर्भात या भांड्यासाठी गुंड शब्द प्रचलित आहे. बहुधा मोठ्या आकाराच्या घागरीला (प्रत्यक्षात घागरीसारख्या दिसणार्‍या भांड्याला) हंडा म्हणतात.

अवांतरः लहान आकाराच्या घागरीला चरवी असेही म्हणतात.

गेल्या काही वर्षांत बरीच घरं बदलली असल्याने लेख एकदम काळजाला भिडला.

डिचकी, गुंड आणि कंपनी यांचा फोटो टाकते उद्या !

पिशी अबोली's picture

25 Jul 2015 - 1:43 pm | पिशी अबोली

हे शब्द ऐकून एकदम कोल्हापूर, बेळगाव राहिले उभे डोळ्यांसमोर.. :)

डावीकडे दोन डिचकी आणि उजवीकडे दोन गुंड किंवा गुंडी

अ

स्टीलची डिचकी डिचकी वाटत नाही.
डिचकी बोले तो पितळेची किंवा तांब्याचीच हवी.
डोक्यात घातली तर माणूस निजधामास पोचेल अशा वजनाची आणि जाडीची.

बाकी फोटोग्राफरची पोज पाहता अत्रुप्त बुवा तर आले नव्ह्ते ना तिकडे अशी शंका आली ;)

प्रसाद गोडबोले's picture

27 Jul 2015 - 6:35 pm | प्रसाद गोडबोले

फोटोग्राफरची पोज पाहता अत्रुप्त बुवा तर आले नव्ह्ते ना तिकडे अशी शंका आली

मेलो मेलो मेलो

=)) =)) =))

सदस्यनाम's picture

27 Jul 2015 - 6:47 pm | सदस्यनाम

छिद्रान्वेशी प्यारे.

सस्नेह's picture

27 Jul 2015 - 7:12 pm | सस्नेह

गुंड हा लाफिंग मिरर आहे हे धेनात घ्यावे !

स्पंदना's picture

28 Jul 2015 - 5:16 am | स्पंदना

हा हा हा हा!! हा हा हा हा!! हा हा हा हा!! हा हा हा हा!!

तो फोटो पाहून कधीची हसते आहे, भारीच!

पद्मावति's picture

24 Jul 2015 - 6:14 pm | पद्मावति

सेम प्रकार माझ्याकडेही. दरवेळी मूविंग झालं की पुन्हा तीच भांडी, तोच पसारा...बापरे....

प्रसाद गोडबोले's picture

24 Jul 2015 - 6:21 pm | प्रसाद गोडबोले

ह्यॅ ह्यॅ ह्यॅ !

नुकतेच आम्हीही घर शिफ्ट केले , तेव्हापासुन मला वाटत होतं की मोठ्ठ्या मुलींची भातुकली फक्त आमच्याच घरी चालते =))

घरोघरी मातीच्याच चुली आहेत हे पाहुन हायसे वाटले =))

प्रियाजी's picture

24 Jul 2015 - 6:35 pm | प्रियाजी

तुमचा लेख वाचून आत्तापर्यंत्च्या सहा वेगवेगळ्या शहरातील बदल्या आणि बदललेल्या तेरा ते चौदा घरातील भांडाभांडीचे प्रसंग डोळ्यापुढे सरकून गेले. बाकी लेख अगदी अगदी पटला फक्त आमचे सामान बरेच कमी होते अन करणारी जवळ जवळ मी एकटी. बाकी सर्व सेम.

रेवती's picture

24 Jul 2015 - 6:38 pm | रेवती

आईगं! नको त्या आठवणी! माझ्याकडे भांडी पातेली बेतानेच घेतलेली आहेत. म्हणजे ३ कढया, दोन आमटीची पातेली, दोन रसभाजी किंवा पातळभाजीसाठीची, दोन चहाची भांडी, लोणी कढवायचे एक, दोन लहानमोठे ताकाचे गंज, पोळीचा चपटा डबा, जुन्या क्यासेरोलमधील क्यासेरोल तुटल्यावर राहिलेली आतील स्टीलची भांडी, तीन तवे. आईला हे पाहवले नाही व मला तिच्याकडील ३ पितळेची पातेली घेण्याच्या मोहात पाडले व आता ती पातेली माझ्यापर्यंत येतील. ;) बाकी डाव, चमचे आहेच्चेत! पण आता मी एकही वस्तू घेणार नाहीये. जे हवे ते आईकडून उचलून आणणार. काचसामानाबद्दल न बोलणेच बरे! दरवेळी काचकंपन्या चांगल्या नक्षीचे काहीतरी बाजारात आणतात. पायरेक्स व कोरलवाल्यांना दणके दिले पाहिजेत. भारतात असताना कुठल्याश्या काचसामानाच्या कंपनीचा डिनरसेट घेणे मला जमले नव्हते. आता वाटते बरे झाले काही घेतले नाही. भारतातील घरात सासूबाईंनी सगळा संसार दिलाय. त्यामुळे एकही काडी घेण्याची गरज नाही. आता गप्प बसते. तू तुझे सामान लाव व शिट्टी शोध!

डॉ सुहास म्हात्रे's picture

24 Jul 2015 - 6:38 pm | डॉ सुहास म्हात्रे

ही... ही... ही...

"गेले काही वर्षात किती गोतावळा जमा केला आहे हे घर बदलतानाच कळतं" असा नियम आहे ! ;) आतापर्यंत अनेकदा घरबदल केले आहेत. पण, आता "कोणी सम्राटाने जरी त्याचा राजमहाल दिला तरी सद्याचे घर बदलायचे नाही" असे ठरवले आहे ! (एखाद्या सम्राटाने खरंच राजमहाल बक्षिस दिला तर कदाचित या मतात बदल होईलही, कुणी सांगावे ?! :) )

आगा बाबो! ईवडी भांडी घिऊन घर बदलायच म्हन्जे दंगाच म्हनायचा,

सुबोध खरे's picture

24 Jul 2015 - 7:05 pm | सुबोध खरे

लष्करात भरती झाल्यावर माझ्याकडे लग्न होईपर्यंत २ सुटकेसेस आणी एक स्कूटर इतके सामान होते. लग्न झाले आणी पुढची ५ वर्षे पुण्यात होतो. तेथून विशाखापटणमला बदली झाली तेंव्हा २६ ( सव्वीस फक्त) ट्रंका होत्या.त्यासुद्धा एका निवृत्त कर्नल साहेबांनी( माझे रुग्ण होते) फक्त ३५००/- रुपयात दिल्या होत्या. शिवाय फ्रीज, टी व्ही, धुलाई यंत्र यांचे खोके अलग. लग्न झाले कि माणसाचा गृहस्थ होतो तो असा. चैनीची गोष्ट गरजेची केंव्हा होते? शेजार्याने विकत घेतली कि.
लष्करात असताना दहा वेळा घर बदलले आणी सर्व १० च्या दहा वेळा घर मी एकट्याने बदललेले आहे. मुले लहान होती तेंव्हा शहर बदलण्य अगोदर मी बायको मुलांना मुंबईत पाठवून देत असे आणी नवीन जागी घर लागले. (जोवर तीन वेळेस केर काढून फारशा पुसून होत नाहीत तोवर घर स्वच्च्ह होत नाही) कि ते सर्व येत असत. पण प्रत्येक ट्रंकेवर एक कागद चिकटवलेला असे कि आत काय आहे. त्यामुळे गोंधळ फारसा होत नसे. एवढी घरे बदलली पण क्रोकरी कधीच तुटली नाही( मोलकरणीनि किती तोडली त्याची गणती नाही) कारण कर्नल साहेबांनी दिलेल्या लाकडाच्या ट्रंका आणी आतमध्ये रद्दी कागदाचे बोळे व्यवस्थित प्याक केलेले असत. त्यांचा एक गुरु मंत्र- एकाच कॉलनीत घर बदलले तरीही प्याकिंग पूर्ण करायचे. कारण इथेच जायचे आहे म्हणून नीट केले नाही तर हमखास काही तरी तुटून हातात येते आणी त्या गोष्टीशी असलेली भावनिक गुंतवणूक तुम्हाला चुटपूट लावून जाते. हा गुरुमंत्र मी अक्षरशः पाळत आल्यामुळे तोड फोड आजत गायत झालेली नाही.

वाचुन दमले आहे!माझ्या प्रचंड पसरलेल्या घरातले सामान आता कुठेही मावणे केवळ अशक्य आहे.हा साक्षात्कार झाल्यामुळे मी परत घर बदलण्याच्या फंदात पडणार नाहीये.माझ्याकडे भांडाभांडीत भांडी उरावर बसतील एकमेकांच्या!!

यशोधरा's picture

24 Jul 2015 - 7:42 pm | यशोधरा

मस्त लिहिलेय! आवडले!

कविता१९७८'s picture

24 Jul 2015 - 7:46 pm | कविता१९७८

मस्त लेखन

सविता००१'s picture

24 Jul 2015 - 7:56 pm | सविता००१

स्नेहाताई,
झक्कास
आता मला मदत करायला ये.लैच अनुभव आहे तुला. मी दमलेय घर लावता लावता.;)

बादवे, कुकरची शिट्टी कुकरमध्येच का ठेवली नाही?; -)

कुकरचे शिट्टी ठेवायचे टोक फार नाजुक असते. शिट्टी घातलेल्या स्थितीत ते जास्ती उलटपलट केल्यास शिट्टीचा तोल बिघडून ती वाजायची थांबते व वाफ सोडू लागते. म्हणून हलवाहलवी करताना ती काढून ठेवावी लागते !+)

म्हणजे कुकरच्या झाकणाला शिट्टी लावलेल्या अवस्थेत नव्हे, शिट्टी कागद वा कापडात गुंडाळून कुकरमधे टाकायची. वाटल्यास अजून काही वस्तू पण आत भरायच्या म्हणजे जास्त हिंदकळणार नाही. आणि मग वरून कुकरचे झाकण लावून टाकायचे.

मागच्या खेपी तसेच केले असता ती हेवनवासी झाली. तस्मात आता काळजी घेतली.

राही's picture

24 Jul 2015 - 8:17 pm | राही

छानच. घर बदलणे हा एक अनुभवच असतो. काय ठेवायचे काय टाकायचे हे ठरवताना डोक्याचा भुगा होतो. बाकी सगळे जाऊ दे पण कुंड्यांतली झाडे शेजारपाजार्‍यांना वाटून टाकताना अगदी वाईट वाटते.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

24 Jul 2015 - 8:17 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

तुमचं भांड्याचं दुकान कुठे आहे आो नक्की? ;-)

सस्नेह's picture

24 Jul 2015 - 8:21 pm | सस्नेह

या कोल्हापूरला !!

काळा पहाड's picture

25 Jul 2015 - 1:54 am | काळा पहाड

कोल्लापूरला

नाखु's picture

27 Jul 2015 - 9:17 am | नाखु

विना हेल्मेट जावे असे आग्रही मागणी!!

मूळ अवांतर घरोघरी भांड्यांची (आणि भांडणांचीही) गर्दी ही सार्थ ठरवणारी भांडेफोड आवडली!!

भांडी हरवण्यात हात खंदा असलेला शोधकरी नाखुस.

डॉ सुहास म्हात्रे's picture

25 Jul 2015 - 11:56 am | डॉ सुहास म्हात्रे

"आो" कसा टायपला ! :)

टवाळ कार्टा's picture

25 Jul 2015 - 12:52 pm | टवाळ कार्टा

काय नजर आहे =))

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

25 Jul 2015 - 5:47 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

आो

फोनवरुन टंकनचुक जाहली.

डॉ सुहास म्हात्रे's picture

25 Jul 2015 - 8:39 pm | डॉ सुहास म्हात्रे

प्रयत्न करूनही ती चूक लॅपटॉपवर जमली नाही म्हणून कुतुहलाने विचारले होते :) बहुतेक एखाद्या अ‍ॅपमधला बग असावा.

अवांतर : अजूनही कॉपी पेस्ट न करता जालावर "₹" कसा टायपायचा हे पण माहित नाही :(

श्रीरंग_जोशी's picture

25 Jul 2015 - 9:02 pm | श्रीरंग_जोशी

जालावर बरेच शोधूनही ₹ चिन्ह टंकण्यासाठी सोपे असे काही मिळाले नाही. ऑपरेटिंग सिस्टिमच्या सेटिंग्जमध्ये जाऊन किबोर्ड टाइप 'इंग्लिश इंडिया' निवडल्याशिवाय टंकता येणे शक्य होणार नाही असे दिसते.

inrsymbol.in हा दुवा माहितीपूर्ण आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Jul 2015 - 7:02 pm | डॉ सुहास म्हात्रे

हा दुवा महिती होता. त्यावरून एम एस ऑफिस अ‍ॅप्लिकेशन्समध्ये ₹ काढता येतो.

पण तो मिपावर इतर कोणत्याही सॉफ्तवेअरची (कॉपी-पेस्ट) मदत न घेता कसा टायपायचा ?

सदस्यनाम's picture

27 Jul 2015 - 7:05 pm | सदस्यनाम

नमस्कार म्हात्रे साो,
लै सिम्पल आहे हो. 'आो' असा टायपला बघा. ;)

विनोदी लेखनच काय पण विनोदी प्रतिसाद देणेही अवघड असते.मस्त लिहिलंय.
( मुपि मोड मधला मुपि कोण?)

मुक्तपीठ नावाचे एक दळण. अमेरिकेची वारी मुलगा-मुलगी-सून-जावई-पुतणे-नातवंडांदी धाग्यांच्या कृपेने घडली की इथे येऊन एक लेख लिहायचा असतो असा हल्ली शिरस्ता झालाय. आणि तिथल्या प्रतिक्रिया हा मुपीचा यूएसपी आहे. ज्या संपादित करण्याचे कष्ट तिथले संपादक कधीच घेत नाहीत. 'ब्रह्मे', 'बबन', 'पोपा मॅडम' इत्यादी रत्ने तिथलीच.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

24 Jul 2015 - 8:22 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

बाकी मिपाकरांना एका पंगतीमधे सहस्रभोजन घालु शकाल.

("ताट"कळलेला कॅजॅस्पॅ)

घर शिफ्ट केल्याबद्दल अभिनन्दन!
कोल्लापुरकर झाले म्हणाचे...

कैलासवासी सोन्याबापु's picture

24 Jul 2015 - 8:33 pm | कैलासवासी सोन्याबापु

माझी ही बदलीची नोकरी, त्यात ७ महीने आधी लग्न झालेले आहे, बाकी सगळे सोडा ताई फ़क्त

इतकं सामान लावून झाल्यावर नवरोजींनी हुश्श म्हणून चहासाठी बाह्य दिशेस पलायन केलेले.

ह्या धड्यासाठी तुमच्या मिष्टरांस बालके बापुसाहेबाचा शिरसाष्टांग प्राणिपात दंडवत तेवढे कळवा अशी विनंती!!

प्रणिपात. 'प्राणिपात'चा अर्थ भलताच होतो. :-)

आदूबाळ's picture

27 Jul 2015 - 11:50 am | आदूबाळ

लोल! हेच लिहायला आलो होतो. डिव्हिजन ऑफ लेबर अँड स्पेशलायझेशनचा धडा भाऊंनी नीटच गिरवलेला दिस्तोय.

अत्रुप्त आत्मा's picture

24 Jul 2015 - 8:46 pm | अत्रुप्त आत्मा

ह्या ह्या ह्या!
तिन घरं बदलल्यानंतर चवथ्या स्थिर घरात स्थावर झालेला ..
अतृप्त घरघरे

प्रचेतस's picture

24 Jul 2015 - 11:07 pm | प्रचेतस

झकास खुसखुशीत लेखन.

रातराणी's picture

24 Jul 2015 - 11:45 pm | रातराणी

हा हा कसलं भारी लिहिलय. सेम हेच असत आमच्याकडे मूव झाल्यावर. : )

भांडी पुराण आणि घर बदलाची कहाणी आवडली.

भांडी हा सर्वच बायकांचा वीक पॉईंट असतो असे लक्षात आले आहे.
त्यात क्रोकरी हा तर अती जिव्हाळ्याचा विषय.

नूतन सावंत's picture

25 Jul 2015 - 9:04 am | नूतन सावंत

अकरा घरे बदलून बाराव्या घरात येताना मुव्हर्स अँड शेकर्स यांच्याशी गाठ पडली.तरी दोन काचेच्या वस्तू वगळता सारे काचसामान आदल्याच दिवशी हलवले होते.पण मेल्यांनी त्याही फोडल्या.काही सामान तर या घरातून त्या घरात फक्त माळ्यावर बसण्यासाठी असतेआता हे घर पण चौथा मजला आणि लिफ्ट नसल्याने काही वर्षांनी तरी बदलावे लागेलच तेव्हा सामान कमी करण्याचे यशस्वी प्रयत्न करायचे ठरवले आहे.
झाडे मी कोणाला देत नसे. इथेही घेऊन आले.एकूण पन्नास कुंड्या.घेऊन आल्यावर समजले की इथे झाडे ठेवायला बंदी आहे.पण आधीच्या लोकांनी ठेवलेली झाडे काढल्याशिवाय मी माझे काढणार नाही असा पवित्रा घेतल्यामुळे झाडे अजून आहेत.
नव्या घरी आपण सामान लावले तरी लपाछापीचा खेळ होतोच, त्यामुळे मदतीला कोणीही न घेताच सामान लावणे पसंत आहे.

सस्नेह's picture

25 Jul 2015 - 9:10 am | सस्नेह

.

काही सामान तर या घरातून त्या घरात फक्त माळ्यावर बसण्यासाठी असते

..प्रचंड सहमत !

आमच्या वडिलांचे घर पुनर्विकास होताना (सात वर्षापूर्वी)वडिलांच्या सांगण्यावरून माळ्यावरच्या क्रोकरीतील चार नवे कोरे सेट वेगवेगळ्या प्रसंगात "भेट' म्हणून देऊन टाकलेले आहेत. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे माळ्यावर चढून धूळ साफ करणे त्यांना शक्य नाही.वडिलांचे वय तेंव्हा ७१ होते आणि आईचे ६६. घर बदलताना सामानाची हलवा हलव मीच केली होती. तेंव्हा वडिलांनी काकुळतीला येउन सांगितले हे सेट गपचूप देऊन टाक. आमच्या आईला अजूनही ते सेट भेट दिले गेले आहेत हे समजलेले नाही. त्या दोघांना माळ्यावर चढणे शक्य नाही. दृष्टी आड सृष्टी.

नूतन सावंत's picture

25 Jul 2015 - 9:07 am | नूतन सावंत

घर बदलण्याच्या यायातीच्या आठवणीत लेख छान असून आवडला आहे हे सांगायचे राहूनच गेले.

नगरीनिरंजन's picture

25 Jul 2015 - 9:15 am | नगरीनिरंजन

मस्त! वाचतानाच घामाघूम झालो. तरी बरं "निर्लेपचा लेप गेल्याने कर्मच्युत झालेले तवे" वगैरे हास्यफवारे उडत होते!

मितान's picture

25 Jul 2015 - 9:44 am | मितान

भारी लिहिलंयस !
मला एकुणातच सांसारिक पसार्‍याचा कंटाळा असल्याने मी भांडी वाटून टाकण्यात लै हुशार आहे ;)
आई आणि सासू च्या अतीपसाराप्रेमाची प्रतिक्रीया म्हणून असा स्वभाव बनला असावा !

पण तू एवढ्या भांड्यांचं करते काय ? =))

सस्नेह's picture

25 Jul 2015 - 1:24 pm | सस्नेह

माझीही दोनतीनदा भांडीदान करून झाली आहेत.
..आता पुन्हा दानाची वेळ आली आहे !

दिपक.कुवेत's picture

29 Jul 2015 - 12:38 pm | दिपक.कुवेत

कधी येउ बोल???

खटपट्या's picture

25 Jul 2015 - 9:52 am | खटपट्या

छान !!

सामान लाउन झाल्यावर निटनेटक्या घराचा एक फोटो डकवा.

अद्द्या's picture

25 Jul 2015 - 12:34 pm | अद्द्या

आयला . एवढी भांडी ?
वाचूनच दमलो .
इथे फक्त रूम बदलताना दमछाक होते . मोजून ३-४ ब्यागा असून पण .

Sanjay Uwach's picture

25 Jul 2015 - 1:22 pm | Sanjay Uwach

घरची आवरा आवर.
घर लावण्याच्या नादात एका बाईंनी गडबडीत आपल्या हरणी नावाच्या चिमुकलीला बरणी ठेवण्याच्या ठिकाणी ठेवले व बरणी कमरेवर घेवून बाहेर आल्या .शेजारिणीने विचारले "आग हे तुझ्या काखेत काय आहे" ? त्यावर ती म्हणाली " हि माझी हरणी आहे" त्यावर शेजारीण
म्हणाली " अग हि हरणी नसून तुझ्या कमरेवर बरणी आहे " मग मात्र त्यांची चांगलीच धावाधाव झाली. हे एकनाथी भारुड कोल्हापुरात गोंधळी मंडली खूप रंगवून सांगतात. घर लावण्याचे काम जरी कंटाळवाणे असले तरी जसे घर आवरू तसे ते आकार घेऊ लागते व छान दिसू लागते .शेवटि शेवटी श्रमाने सोफ्यावरच झोप लागते .

तुषार काळभोर's picture

25 Jul 2015 - 1:40 pm | तुषार काळभोर

आम्ही या बाबतीत एकदम नशीबवान म्हणायचो.
१९८० मध्ये वडील गावावरून मुंढव्याला (भाड्याच्या 'खोलीत') शिफ्ट झाले. खोली अशासाठी, की तेव्हा तेव्हढीच पुरेशी होती. ते येताना सायकलवर संसार (+ बायको-माझी आई) घेऊन आले होते- कपड्यांच्या २ पिशव्या व १ स्टोव्ह. येताना हडपसरमध्ये २ पातेली, २ ताटे, २-३ चमचे विकत घेतले.
१९९१ मध्ये हडपसरमध्ये २ खोल्यांचे स्वतःचे घर विकत घेतले, तेव्हा ट्रक भरून सामान शिफ्ट करावे लागले होते.
तेव्हापासून आतापर्यंत दोनाच्या सहा खोल्या झाल्या पण घर बदलण्याची वेळ आली नाही. जर बदलावे लागले तर, २-३ ट्रक लागतील, एव्हढा संसार जमा झालाय त्यांचा :)

भावाच्या व माझ्या लग्नात आलेली "सर्व" भांडी अजून तशीच दिवाणमध्ये पडून आहेत.

लेख व प्रतिसाद वाचल्यावर जर शिफ्ट करायची वेळ आलीच तर कसे होईल या विचारानेच अंगावर काटा येतोय.

पिशी अबोली's picture

25 Jul 2015 - 1:44 pm | पिशी अबोली

मी माझा संसार तुझ्या औदार्यावर उभारावा म्हणते.. ;)
खुसखुशीत लेख.. :)

कधीही ये आणि भांडी घेऊन जा !
...आणि बैस भांडत ! हा: हा :

मस्त लेख.मी दोन वेळा हा अनुभव घेतलाय.का एवढी भांडि गोळा केली अस वाटल होत.त्या मानाने माझी आई शहाणी तिने फार मोजक्या भांड्यात संसार केला.बाबांची बदलीची नोकरी असल्याने कदाचित तिने हात आवरता ठेवला असावा.
दरवेळेस बदली झाली कि भांड्याची खोकी भरण्यात उत्साहाने आईला मदत करायचे.क्रोकरी कागदात गुंडाळुन खोक्यात भरायचे काम करावे लागायचे.
मस्त आठवणींना उजाळा मिळाला.

स्मिता.'s picture

25 Jul 2015 - 5:56 pm | स्मिता.

लग्न झाल्यापासून 'भटक्या जमातीतले' असल्याने मी फारश्या भांड्यांची धणीन नाही (बरीच भांडी सोडलेल्या ठिकाणीच सोडून यावी लागतात) पण ह्या 'हाईड अँड सीक'चा अनुभव मात्र चिक्कार आहे!

तुमच्या लेखाचे झालेले फायदे.....

१. बायकोला तुमचा लेख वाचायला दिला. ती पण तुमच्या सारखीच ह्या भांडा-भांडीत व्यस्त असते हे तिला आत्ता उमगले.

२. आमच्या लग्नात हिच्या मामीने प्रेझेंट दिलेली क्रोकरी अद्याप आम्ही वापरलेली नाही,(लग्नाला २२-२३ वर्षे होतील, ह्या डिसेंबरला), हा साक्षात्कार परत एकदा झाला.(तसा तो दर वेळी घर बलतांना होतीच, पण बायको हळूच त्यांना लपवते)

३. सोनारानेच कान टोचावे, असे म्हणतात ते खोटे नाही.बायको आता स्वयंपाकघरात घुसली आहे.(आमचा उद्याचा रविवार ती सत्कारणी लावणार, असे दिसत आहे.आम्हाला उद्या दिलेली चिकन बिर्याणी, ती उद्याच वसूल करणार.)

४. इथे बरेच समदू:खी भेटल्याचे समाधान मिळाले.

जुइ's picture

25 Jul 2015 - 6:45 pm | जुइ

छान लिहिले आहेस. घर बदलण्याचा अनुभव बर्‍याचदा घेतलेला असल्यामुळे सगळी दृष्य डोळ्यांसमोर उभी राहीली.

कवितानागेश's picture

25 Jul 2015 - 8:19 pm | कवितानागेश

खुस्खुशित !
देव करो अन शिट्टी लवकर सापडो. :)

एस's picture

26 Jul 2015 - 10:12 am | एस

हाहाहा! आमेन! :-)

एक एकटा एकटाच's picture

26 Jul 2015 - 9:36 am | एक एकटा एकटाच

मस्त लिहिलीय

मजा आली वाचुन

एकदम खुसखुशीत लेखन..कशी कळत नाही पण भांडी जमा होत रहातात..रोज लागणारी,वर्षातून एकदा लागणारी..कधीच न लागणारी..ख़राब झालेली पण जीव अडकलेली..पुढे कधीतरी वापरु/जास्त पाहुणे आले तर आसुदे म्हणून ठेवलेली..गिफ्ट मिळालेली.....एक ना दोन नाना तर्हेची भांडी....

स्वप्नांची राणी's picture

27 Jul 2015 - 8:55 am | स्वप्नांची राणी

माझा तर ठाम विश्वास आहे की भांडयांनाही पिल्लं होतात...आणि ती वाढत जातात !

बाकी, मितानासारखाच्, भांड्यांपेक्षा जास्त निर्लेपपणा अंगात असल्यामुळे फारसं काही लावून घेत नाही...

शिट्टी मिळाली का ग??

श्रीरंग_जोशी's picture

27 Jul 2015 - 9:01 am | श्रीरंग_जोशी

तुमच्या या प्रतिसादामुळे लहानपणी वाचलेली खालील कथा आठवली :-) .

तुमची भांडी मेली की हो.

मुक्त विहारि's picture

27 Jul 2015 - 12:51 pm | मुक्त विहारि

मनापासून धन्यवाद....

सस्नेह's picture

27 Jul 2015 - 5:13 pm | सस्नेह

आठ दिवसांनी मिळाली.
शिट्टी घातलेली डबी जादाच्या काचसामानाच्या बॉक्सात एका काचेच्या बरणीच्या पोटात मिळाली !
..आणखी दोन दिवस वाट पाहून मी नवी आणणार होते !

तुडतुडी's picture

27 Jul 2015 - 5:28 pm | तुडतुडी

असली भांडाभांडी होय . मला वाटलं तसली भांडाभांडी ....

मस्त!! अजूनपर्यंत कोकणातच रवळ्या वापरतात असं वाटायचं. वरचा रवळीचा उल्लेख वाचून गैरसमज दूर झाला.

मी तर लहानपणापासूनच घरात रोवळी पाहतिये. गंमत म्हणजे हितल्या एका दुकानातही मेड इन इंडिया असे लिहिलेली रोवळी पाहिली, अगदी जुन्या पद्धतीची!

होकाका's picture

27 Jul 2015 - 11:16 pm | होकाका

जबरदस्त लिहिलंय. भांडाभांडी हे शीर्षकसुद्धा अप्रतिम.

स्पंदना's picture

28 Jul 2015 - 5:31 am | स्पंदना

या सगळ्या रवंदाळीत सर सलामत ठेवुन जान बचावुन परत्ल्याबद्दल अभिनंदन.

बाकि मी शिट्ट्या किल्ल्या आणी स्मॉल बट व्हॅलुएबल किचन साहित्य कायम एका पर्शित टाकते. (पर्स) हे स्मॉल बट व्हॅल्युएबल जर सापडल नाही तर एक आख्ख मोठं सेट टाकाव लागत बर्‍याचदा.
बाकि नवरा असा ऐन लढाईत पसार झाल्याचे वाचुन तुझे शिक्शाण अजून बरेच कच्चे असल्याचा साक्शातकार झाला.

चिगो's picture

28 Jul 2015 - 9:51 am | चिगो

'कोणी आलं म्हणजे कुठून आणायची भांडी' म्हणून आईनी जपून ठेवलेली अनेक भांडी आठवली.. आमच्या बदल्यांमधे मी हमखास एक ना एक 'खास' भांडं कींवा पोळपाट-सम प्रकार पॅक न करता विसरुन येतो, आणि पुढील बदलीच्या ठिकाणी अर्थातच ती विसरलेली वस्तूच 'सगळ्यात महत्त्वाची' असल्याने बायकोच्या शिव्या खातो.. ;-)

अवांतर: माझ्याकडच्या ट्रंकामध्ये मी 'मानव-तस्करी' करु शकतो, एवढ्या धबाड्या आहेत त्या.. :-)

झकासराव's picture

28 Jul 2015 - 4:46 pm | झकासराव

भारी लिहिल आहे. :)

दिपक.कुवेत's picture

29 Jul 2015 - 12:43 pm | दिपक.कुवेत

प्रसंग डोळ्यासमोर उभा राहिला. सुदैवाने ईथे अजुन घर बदलायची वेळ आलेली नाहिये. भांडाभांडी हा एक कप्पा झाला...बाकि (अनावश्यक) वस्तू सुद्धा आपण किती गोळा करुन ठेवल्या आहेत हे घर बदलतानाच कळतं. असो. लेख खुप आवडला.

ज्ञानोबाचे पैजार's picture

29 Jul 2015 - 3:09 pm | ज्ञानोबाचे पैजार

काल हापिसातून घरी पोचल्या नंतर हिच्या बरोबर तुळशीबागेत गेलो होतो.

हिला काय बघू आणि काय नाही असं झालं होतं (आणि मला पण).

तिने एकाही दुकान सोडले नाही (आणि मी एकही प्रेक्षणीय स्थळ) शेवटी शेवटी तर सारखे उभे राहून पाय दुखायला लागले, आणि पिशव्या उचलुन हात (आणि स्थल दर्शन करताना मान पण).

प्रत्येक दुकानदार (नीच पणे) मला काका आणि हिला ताई म्हणत होता, शेवटी वैतागुन एकाला सांगितले आम्ही दोघे नवराबायको आहोत म्हणुन. तर त्या आगाऊ माणसाने हिला "खरच का?" असे विचारुन एका प्व्याईट सर करुन घेतला.

एक डोसा उलटायचा झारा, चार बाजूला वेगवेगळी भोके असलेली किसणी, नळाला लावायची गाळणी, चहाची ३ प्रकारची गाळणी, चिकट हुक, ४ मेंन्दिचे कोन, चहाचे कप ठेवण्यासाठी छोटा स्टाण्ड, बासुंदी करताना दुध लागुनये म्हणून पातेल्यात टाकायची बशी, मोरी घासायचे ३ प्रकारचे ब्रश, बाटल्या साफ करायचा ब्रश, प्लास्टिकचे दोन छोटे आणि एक मोठा डबा, तीन चार चाकु (घरात १० प्रकारचे आधिच आहेत) , डांबराच्या गोळ्या, उदबत्ती कम धुपदाणि कम कासवछाप लावायचा स्टांड, सफरचंद कापायचे यंत्र, हार्पिक सारख्याच पण स्वस्त गोळ्या, मुंग्यांची पावडर, झुरळांचा खडू, कसर लागू नये म्हणुन (ब्यागेताल्या) कपड्यात ठेवायची पावडर, असंख्य प्रकारच्या टिकल्या, ४-५ नेलाप्वालीशे, ३-४ कानातली, ३-४ गळ्यातली आणि केर भरायच्या दोन सुपल्या एवढे सामान फक्त २.५ तासात घेउन मग त्या सामानासकट शनिपार चौका अलिकडे गाडी उभी करुन दोन नारळ (फोडून आणि तिकडेच त्यातले पाणी पिउन), देसाईबंधुंच्या बाहेरुन डोश्याचे पिठ, सालेड ची पाने, मेथी, आणि कोथीम्बिरीच्या ३ गड्या, गजरे आणि २० रु ची ६ लिंबे घेतल्यावर मी जेव्हा घरी पोचलो तेव्हा रस्ताभर माझ्या डोळ्यासमोर हाच लेख नाचत होता.

पैजारबुवा