|| सुरजमल जाट आया भाऊके दरबार || भाग - १

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
4 Jun 2015 - 11:53 am

सुरजमल जाट आया भाऊके दरबार ।।

श्री. बिका यांचा पानिपतवरचा लेख वाचला आणि मला त्या पुस्तकाची आठवण झाली. बहिण सोनेपतला तीस वर्षे राहिली असल्यामुळे तिच्याकडे अनेक वेळा जाणे झाले. व त्याच मुक्कामांमधे पानिपत व आजुबाजूची गावेही बघता आली. एक दिवस मेव्हण्याबरोबर असेच सोनेपतमधे बाजारात फिरत असताना मागून हाका ऐकू आल्या,

‘‘गोडबोले साब ! गोडबोले साब !’’
मेव्हण्याने मागे वळून पाहिले तर तो त्यांच्या बालग्रामसाठी जेथून पुस्तके विकत घेत होता त्या दुकानावा मालक आम्हाला बोलावित होता...

‘‘हां कहो गुप्तजी क्या हाल है ?’’ मेव्हणा.

‘‘अरे साब आपको एक चीज दिखानी थी.’’

‘‘हा दिखाओ ! क्या चिज है ?’’

‘‘एक किताब है जी. मेरे खयालसे मराठी मे है. देखिये तो जरा’’

असे म्हणून त्याने एक जीर्ण झालेले पुस्तक गोडबोलेंच्या हातात ठेवले. माझे इतिहासप्रेम त्याला माहीत असल्यामुळे त्याने ते लगेचच माझ्या हातात दिले. पहिल्या पानांच्या फाटून चिंध्या झाल्या होत्या. बघू नंतर म्हणून मी गुप्ताजींना पैसे देण्यासाठी खिशात हात घातला.

‘‘कितने देनेके है इसके ?’’

‘‘अरे साब इसका क्या लेना ? आप मराठा है इसलिये आपके लिये बाजू रखा था ! आप इसे ले जाईये और पढके हमे भे बताईये इसमे क्या लिखा है’’ गुप्ताजी हसत हसत म्हणाले. कधी एकदा घरी जातोय आणि ते चाळतोय असे झाले होते मला. सोनेपतपासून आमचे घर होते पाच/सात किमी. दिल्लीपासून वीस मैल.

तर त्या पुस्तकाची ही हकीकत......

कुलाबा जिल्ह्यातील पालीचे श्री जोशी कामानिमीत्त बरेच वर्षे उत्तरेकडे राहिले होते. बहुदा ते ब्रिटीशांच्या सेवत असावेत. १९३० च्या आसपास त्यांनी हे पुस्तक लिहिले. ग्वाल्हेरच्या एका काळे नावाच्या गृहस्थाने पानिपत येथे जाऊन प्रत्यक्ष पहाणी करुन एक लेखमालिका लिहिली होती त्यावरुन श्री जोशी यांना कल्पना सुचली की आपणही प्रत्यक्ष युद्धभूमीच्या आसपासची गावे पालथी घालून तेथील जनतेचे मनोगत जाणून, त्यांना माहीत असलेल्या कथा/दंतकथा लिहून मराठी माणसापर्यंत पोहोचत्या काराव्यात. हा इतिहास नव्हे, पण एक गोष्ट मात्र खरी की श्री जोशी यांनी जर पायी हिंडून ही माहीती गोळा केली नसती तर काळाच्या ओघात हे सगळे नष्ट झाले असते. पुस्तकाचे नाव कळत नाही ना ते कोणी छापले ते कळते.

श्री जोशी यंनी प्रथम दिल्ली ते कुरुक्षेत्र या प्रदेशाचे भौगोलिक महत्व व त्या भुमीत झालेल्या अनेक युद्धांचा आढावा घेतला आही. त्यात अर्थातच पानिपतच्या तीन युद्धाबद्दल माहिती आली आहे. याच भूमीतून एक हमरस्ता जातो तो थेट पेशावरला. त्याला येथील जनता ‘‘सडक-आझम’’ म्हणायचे. म्हणजे आजचा ग्रँडट्रंक रोड. याला काही लोक थंडीसडकही म्हणत होते हे मला या पुस्तकावरुनच कळले. या रस्त्याच्या कडेला प्रत्येक मैलावर एक उंच मिनार, प्रत्येक दोन मैलांवर एक विहीर व प्रत्येक सहा मैलांवर सराई बांधलेली होती. यातील अनेक मिनार श्री जोशी यांनी स्वत:च्या डोळ्यांनी पाहिले होते. त्यांनी या रस्त्याला समांतर चालणाऱ्या रेल्वेचाही उल्लेख केला आहे.

सोनेपत शहरात मराठ्यांनी शंभूदयाल तलावाभोवती अनेक घाट बांधले असे जोशी लिहितात तसेच पानिपत येथे असलेले प्रसिद्ध राममंदीरही मराठ्यांनी बांधले अशी माहिती पुरवतात. या मंदिरास स्थानिक लोक मऱ्हाठोंका मंदीर असेच म्हणतात. जोशी म्हणतात, ‘‘या मंदीराची आता बरीच पडझड झाली आहे. तेथे एक ब्राह्मण व्यवस्था पाहतो. त्याच्याकडे मराठ्यांनी दिलेल्या कित्येक सनदा आहेत. त्यांचे नाव होते पंडीत अनुपराम. देवलांची सर्कस येथे आली असताना त्यांनी या देवळाच्या दुरुस्तीसाठी काही रक्कम या पंडीताला दिली होती पण दुरुस्ती काही झाली नसावी. पानिपतमधील देवी तलावही मराठ्यांनीच बांधला असे म्हणतात. मराठे त्यांच्या घोड्यांना पाणी पाजण्यास येथे आणीत असत.’’

जोशी म्हणतात, ‘‘ अलिकडे पानिपत संबंधाचे पुष्कळसे वाड्.मय प्रसिद्ध झाले आहे व होत आहे. परंतू पानिपतच्या आसपासच्या गावांचे पूर्ण निरीक्षण करुन, तिकडील लोक महाराष्ट्रीयांना किती पूज्य मानतात, त्या प्रांतात मराठ्यांच्या आठवणी हल्ली काय आहेत, मराठ्यांची स्मृतीचिन्हे कोठे आहेत, पानिपतच्या या युद्धाशी संबंध असलेले असे कोणते वाक्प्रचार तिकडील लोकात अजून अस्तित्वात आहेत...इ.. गोष्टींचे खुलासेवार वर्णन महाराष्ट्रात अद्दयाप कोणीही प्रसिद्ध केलेले नाही. या गोष्टीची सत्यासत्यता, युक्तायुक्तता, किंवा योग्यायोग्यता, ठरविण्याचे काम इतिहास भक्तांकडे सोपवून मी आपल्या मुख्य विषयांकडे वळतो....’’
इतक्या स्पष्ट शब्दात हे पुस्तक लिहिण्याचे प्रयोजन लिहिल्यावर मनात कसलिही शंका मनात उरत नाही. मी एक पाहिले आहे पूर्वीच्या लेखकांमधे ‘लिहिण्याचे प्रयोजन काय ?’’ हे लिहिण्याची पद्धतच असावी. हल्ली ती फारशी दिसत नाही.

श्री जोशींनी पानिपतच्या युद्धभूमीला प्रदिक्षणा घातली ती खालील गावातून. सम्हालका-शिवाह-रसाळ-उग्राखेडी-राजाखेडी-बबैला-नगला-जांबा-सनौली-धनसौली-छाजपूर-निमरी-उंझा-डटोला-पसीना....पानिपत. यापैकी अनेक गावातून मीही जाऊन आलो होतो पण श्री जोशींनी जे ध्यय समोर ठेवले होते ते समोर नसल्यामुळे नुसतेच फिरणे झाले. या पानिपतच्या भोवतालच्या गावाखेरीज मराठ्यांनी घरोंदा, कर्नाल, कुंजपूरा कुरुक्षेत्र येथेही लढाया केल्या असल्यामुळे त्यांनी तेथेही भेटी दिल्या. मीही या सर्व शहरातून फिरुन आलो. श्री जोशी गावागावातोन गावातील प्रतिष्टीत नागरिकांकडे रहायचे व त्यांच्या मदतीने पुढील मुक्कामाची व्यवस्था करुन घ्यायचे. ते म्हणतात, ‘‘ या सृष्टीत सज्ज्न पुष्कळ आहेत व दुर्जन फार थोडे आहे असा माझा अनुभव आहे.’’

सम्हालका येथे ए. व्ही. हायस्कूलचे हेडमास्तरांकडे त्यांचा मुक्काम असताना त्यांना कळले की या प्रांतात जोगी नावाची एक जमात आहे. त्यातही मुसलमान जोगी व हिंदू जोगी असे दोन उपजाती आहेत. या जमातीचा व्यवसाय म्हणजे गाणी गाऊन लोकरंजन करणे. ‘‘भाउकी गीत सुनावगे ?’’ असे विचारल्यास आनंदाने होकार देऊन ते ती गाणी गाऊन दाखवतात. सम्हालका येथे श्री. जोशींनी ऐकलेली भाऊंची (सदाशीवरावभाऊ) गाणी.

भाऊंची स्त्री भाऊंना उद्देशून म्हणते ;

अजिक्या सन्मुख योगिनी आयी ।। रहा चंद्रमा पिछा दबाई।।
चील, गीध, काक रहे सिरमंडलाई ।। अजिक्या खाली दोघड नारी आयी ।।
तुम लढने मत जावो साई ।। तुम बेठो मेहेलोमे आकर ।। बिना ललाटिया आया वेदाचारी ।।
अजिक्या तुमको समझावे तेरी नारी ।। लढने मत जावो मान हमारी ।।
मै कहती सीस नमायके ।।
राज्य सब करणीसे पाते है ।। क्या स्वप्नमे राजा रंक हो जाते है ।।
मुझे किसपे छोडे जाते है ।। मै तो लढूंगी बांध हत्यार ।।
गिलचोंकी फओज बडी भारी ।। वो तो अहमदशा खास दुराणी।।
क्या तुम ल्यावता ब्याहाके राणी।।
अब चल्या तू मुझे छोडके ।।

अर्थ : भाउंची पत्नी त्यांना लढाईस न जाण्यासाठी विनवीत आहे. पुण्याहून निघताना जे अपशकून झाले त्याची ती आठवण करुन देते. समोर योगिनी नक्षत्र, पाठीमागे चंद्र, गिधाडेव कावळे डोक्यावर घिरट्या घालत आहेत, रिकाम्या घाघरी घेऊन स्त्री समोर येणे, कपाळावर गंध नसलेला ब्राह्मण समोर येणे. त्यामुळे तुम्ही दक्षिणेतच रहा.
शिवाय राजसत्ता प्राप्त होणे हे मागील जन्मातील कर्मावर अवलंबून असते. राजाचा रंक होण्यास क्षणभर सुद्धा उशीर लागत नाही. राज्य वाढविण्याचा हा लोभ आता पुरे. मी इकडे एकटी कसे आयुष्य काढू ? मी सुद्धा हत्यारबंद होऊन आपल्याबरोबर पानिपतला येते.
गिलच्यांची फौज अवाढव्य आहे व तो अहमदशाह खास दुराणी आहे. मला सोडून दुराण्यांच्या मुलखातील एखादी सवत आणायचा तर तुमची इच्छा नाही ना ?

भाऊसाहेब रागावून आपल्या पत्नीस उत्तर देतात :

हटराणी क्यों बक बक करती है ।। तू किस राजासे डरती है।।
मराठेराज्य ब्राह्मणोंकी भरती है ।।लढते है रणके अंदर जाकर ।।
ना नीच अंश खाते है ।। ना परस्त्रीको हात लगाते है ।।
त्रिकाली संध्यास्नान वर्त जाते है ।। रणमे लढते संमुख जाकर ।।
हम ना गिलचोंसे डरनेके।। ना पीछे कदम धरनेके ।।
चाहे होजाय डोल मरणके ।।

अर्थ :
हे स्त्रिये, तू ही निष्कारण काय बडबड चालविली आहेस ? तुला कोणत्या राजाचे एवढे भय वाटते आहे ? त्या दुराणीचा पराजय अटळ आहे. मराठ्यांचे राज्य असल्यामुळे ब्राह्मणांच्या हाती सत्ता आहे. आता मात्र रणात जाऊन युद्ध करणे हे आमचे कर्तव्य आहे.
आम्ही सात्विक आहार घेतो. कोणत्याही परस्त्रीकडे वाईट नजरेने पहात नाही. त्रीकाली संध्या करतो व वेळ पडल्यास समशेर चालवितो. आम्ही गिलच्यांना भीत नाही व एक पाऊलसुद्धा मागे हटणार नाही. पराक्रमाने बलाढ्य शत्रूसही जेरीस आणू हे पक्के लक्षात ठेव. आम्ही मरणास भीत नाही.

या गाण्यांवर हरियानवी भाषेचा लहेजा चढला आहे हे स्पष्ट दिसते. ज्यांनी हरियानवी गाणी ऐकली आहेत त्यांना त्याचे कारण स्पष्ट कळेल. ही गाणी ज्या लयीत व सुरात म्हटली जातात त्यासाठी व ठेक्यावर बसविण्यासाठी ती याच पद्धतीने रचली जातात. या कवीने मराठी सेनापतीला व त्याच्या पत्नीस हरियानवी संस्कृतीमधे तोलले आहे. तेही नैसर्गिकच म्हणायास हवे. कारण पानिपतच्या काळात मराठे युद्ध हरले असले तरी त्यांच्या पराक्रमाने त्या प्रांतातील लोकांनी तोंडात बोटे घातली असणार. आत्ताही हरियानामधे मराठ्यांविषयी तसा थोडाफार आदर दिसून येतोच हा पानिपतमुळेच आलेला आहे हे निश्चित. मी जेव्हा या भागात हिंडत होतो तेव्हा बाळासाहेब ठाकऱ्यांबद्दल प्रचंड आदर आढळला. कित्येक लोक मुंबईला खास त्यांना भेटण्यासाठी जात असत. कदाचित शिवसेना हिंदुत्ववादी आहे म्हणूनही असेल आणि याला कारण असेल फाळणी. यांनी प्रत्यक्ष पाहिलेले परत आलेले हिंदू... असो....

भाउंच्या आईने त्यांना काळजिने युद्धास जाऊ नको असे सांगितले तेव्हा भाऊने काय उत्तर दिले ते बघूया या दोह्यात...

भाउ बोल्या भावसे सुन माता मानी ।।
काबुलसे लादूं मुगलाणी भरवादूं पाणी ।।

याच गावात वयोवृद्ध गावकऱ्यांशी गप्पा मारताना श्री. जोशी यांनी खालील कथा/दंतकथांची नोंद करुन ठेवली आहे.
१ सुरजमल जाटाने दिलेला सल्ला भाउने ऐकला नाही. त्याने मदत देऊ केली असतानाही भाऊने त्यांस दरबारातून हाकलून दिले ज्याची शिक्षा भाउंना नंतर मिळाली.

२ मल्हारराव होळकरांना तोफेतून वायबार काढले. खरे गोळे डागलेच नाहीत.

३ मुसलमानी सैन्य खरे तर घाबरले होते. पानिपतवरुन एक मुसलमान सरदार भाऊंनी युद्ध जिंकले तर त्यांची मर्जी असावी म्हणून त्यांची भेट घेतली होती.
भुलेखॉं तुवर मिल्या पानिपतवाला ।।
घोडा दुशाला मिले इनाम मोतीकी माला।।

४ मराठे जेव्हा पराभूत होऊन दख्खनच्या दिशेने पळत सुटले तेव्हा दहाबार घोडी सम्हालखाया लोकांनी पकडली होती. ही घोडी इतकी उत्तम होती की ती राजघराण्यातील व्यक्तींची असावीत असे गावकऱ्यांना वाटले. त्यांनी एका घरात ती बंद करुन ठेवली. पैसे घेऊन ती मराठ्यांच्या ताब्यात द्यावीत असेही ठरले. दुसऱ्या दिवशी जेव्हा काही मराठे सरदार आपली घोडी परत मागू लागले तेव्हा त्यांच्याकडे पैशाची मागणी केली गेली. व्यवहार दुसऱ्या दिवशी करायचा ठरला. दुसऱ्या ब्वशी गावकरी तेथे गेले तर घोडीही नाहीत व मराठेही नाहीत. ते घोडी घेऊन भिंतीवरुन उड्या टाकून पसार झाले होते. या घटनेमुळे त्या गावातील लोक ‘‘मराठे बडे शैतान होते है असे अजूनही म्हणतात’’

५ भाऊ मरेठा बडा बाँका लढनेवाला था लेकिन किसीकी मानता नही था. पानिपतच्या रस्त्यावर शिवाह नावाचे एक गाव आहे. तेथेही श्री. जोशींनी गप्पा मारत गावकऱ्यांकडून माहिती गोळा केली. सुरजमल जाटाला दरबारातून हाकलून देऊन त्याने फारच मोठी चूक केली.....असे सगळ्यांचे म्हणणे पडले. हे अर्थात नैसर्गिकच म्हणावे लागेल. तसे का झाले याबद्दल परत केव्हातरी मी लिहीन. पण श्री जोशींना या प्रसंगाचे वर्णन करणारा एक दोहा ऐकण्यास मिळाला.....

सुरजमल जाट आया भाऊके दरबार ।।
हाथ बांध मुजराकरे जो किया आदाब ।।
नजर दिखा दिया रुपिया एक लाख सत्तर हजार ।।
जनकोजीने दियी सैन कोई सामोविचार ।।
थोडक्यात जनकोजी भाऊच्या कानास लागला व सुरजमल जाटाला हाकलून देण्यात आले.

६ भाऊंच्या सैन्यात फंदफितूरी फार माजली होती. याबद्दलही परत लिहावे लागेल.

उग्राखेडी व निमरी गावाजवळ भाऊंनी टंकसाळ पाडली होती त्यामुळे तेथे त्या काळी बरीच नाणी सापडत असत. त्यांना तेथे अश्रफिया असे म्हणत. थोडक्यात या भागात मराठ्यांनी बरेच धन पुरुन ठेवले आहे असा पक्का समज आहे. मी जेव्हा या भागात हिंडलो तेव्हा मला असे कोणी म्हटले नाही पण एका गावात मात्र (जेथे सध्या उत्खनन चालले आहे ) नाव विसरलो, तेथे मात्र एका माणसाने पूर्वी येथे बरेच धन सापडयचे असे म्हटलेले आठवते. श्री. जोशींनी या बाबतीत रसाळू येथील गावकऱ्यांनी सांगितलेली गंमतशीर गोष्ट सांगितली ती अशी...........

क्रमश:
जयंत कुलकर्णी

|| सुरजमल जाट आया भाऊके दरबार || भाग - २

हे ठिकाणलेख

प्रतिक्रिया

बिपिन कार्यकर्ते's picture

4 Jun 2015 - 12:11 pm | बिपिन कार्यकर्ते

अप्रतिम! साहेब, ही अतिशय अमूल्य आणि रोचक माहिती आहे. दंडवत!

तो रस्ता म्हणजे आजचा ग्रॅंड ट्रंक रोड. मी त्याच रस्त्याच्या किनारी राहात होतो गेला महिनाभर. प्रत्येक मैलावर असलेले ते उंच मिनार आजही काही ठिकाणी अस्तित्वात आहेत. रोज बघत असे. या रस्त्याच्याबाबतीत एक पोस्ट फ़ेबुवर टाकली आहे. इथेही टाकतो मिपावर.

पुढच्या भागाची वाट पाहातो आहे. पानिपतला परत जाणे होईल असे दिसते आहे आत्ता तरी. मुक्काम बराच पडला तर मी पण हे सगळं फिरून येईन. रोड-मराठ्यांनाही भेटायचा बेत आहे.

तुषार काळभोर's picture

4 Jun 2015 - 12:47 pm | तुषार काळभोर

" क्रमशः" वाचून अत्यंत आनंद झाला आहे.

एस's picture

4 Jun 2015 - 12:49 pm | एस

वाह!

पुभालटा.

विनोद१८'s picture

4 Jun 2015 - 12:51 pm | विनोद१८

छान लिहिलेय जयंतराव, बरे वाटले वाचुन. बर्‍याच दिवसांनी तुमच्याकडुन एक लेखमाला तीसुद्धा पानिपतावर वाचायला मिळणार आहे याचा आनंद आहे.

धन्यवाद.

पानिपत विषयी बऱ्याच कथा दंतकथा प्रसिद्ध आहेत. पानिपतच्या लोकांना मराठ्यांविषयी आणि पामिपतच्या लढाइविषयी काय वाटते हे वाचून छान वाटले.

धन्यवाद

सौंदाळा's picture

4 Jun 2015 - 1:35 pm | सौंदाळा

मस्तच
पुभाप्र

पैसा's picture

4 Jun 2015 - 2:15 pm | पैसा

अगदी सुंदर सुरुवात झाली आहे! पुढचा भाग कधी?

जयंतकाका, ते पुस्तक स्कॅन करून देता येईल का? (अमूल्य रत्न फुकटात मागत आहे याची कल्पना आहे, पण धाडस करतो आहे...)

अन्या दातार's picture

4 Jun 2015 - 3:24 pm | अन्या दातार

जर पुस्तक प्रताधिकारमुक्त असेल तर मिसळपाववर इ-बुक स्वरुपातही ठेवता येईल.

चुकलामाकला's picture

4 Jun 2015 - 5:22 pm | चुकलामाकला

+११

सानिकास्वप्निल's picture

4 Jun 2015 - 2:57 pm | सानिकास्वप्निल

मस्तं झालाय पहिला भाग.
वाचत आहे
पुभाप्र

पानिपत म्हणजे महाराष्ट्राचा अभिमान आणि दुखती नस दोन्हीही. देशावर परकीय आक्रमण झाल्यावर हातावर हात ठेवून बसण्यापेक्षा शत्रूला दारावरच थोपवण्याचा प्रयत्न केला हा अभिमान तर लाख बांगडी फुटली याचं दु:ख. साधारण माझी माहिती इतकीच. त्यामुळे याविषयी वाचायला फार आवडेल.

मुक्त विहारि's picture

4 Jun 2015 - 7:59 pm | मुक्त विहारि

निदान एकदा तरी "पानिपत" वाचाच.

प्रसाद१९७१'s picture

4 Jun 2015 - 3:31 pm | प्रसाद१९७१

मस्त माहीती जयंतसाहेब.

विश्वास राव दिसायला फार हँडसम होते म्हणे. त्यांच्या दिसण्याबद्दल पण गाणी/पोवाडे आहेत.

स्वच्छंदी_मनोज's picture

4 Jun 2015 - 7:42 pm | स्वच्छंदी_मनोज

मस्तच जयंतराव.. तुमच्या कडून अजून एका लेखमालेची पर्वणी..

क्रमशः बघून हायसे वाटले.. पुढचा भाग लवकर टाका

मधुरा देशपांडे's picture

4 Jun 2015 - 7:48 pm | मधुरा देशपांडे

क्या बात है! उत्तम लेखमालिका वाचायला मिळणार.

पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Jun 2015 - 8:04 pm | डॉ सुहास म्हात्रे

जेवढी रोचक तेवढीच महत्वाची माहिती !

खटपट्या's picture

4 Jun 2015 - 8:49 pm | खटपट्या

खूपच छान सुरवात सर...
नेहमीप्रमाणे उत्तम लेख माला होणार...

विवेकपटाईत's picture

4 Jun 2015 - 9:01 pm | विवेकपटाईत

अप्रतिम आणि माहितीपूर्वक रोचक लेख. पुढच्या लेखाच्या प्रतीक्षेत

अनुप ढेरे's picture

4 Jun 2015 - 9:20 pm | अनुप ढेरे

जबरी!

शिवोऽहम्'s picture

4 Jun 2015 - 10:01 pm | शिवोऽहम्

शेजवलकरांच्या पानीपत पुस्तकात त्यांनी जोग्यांच्या पोवाड्यांचा संदर्भ दिलेला आठवतो. सुरजमल जाटाला भाऊंनी हाकलले होते ही माहिती माझ्यासाठी नवीन आहे. सुरजमल व गाजिउद्दीन या दोघांनी संगनमत करून भाऊंनी यमुनेपार येऊ नये यासाठी प्रयत्न चालविले होते. ते अयशस्वी ठरल्यानंतर भाऊंनी त्याच्यामागे थकलेल्या रकमेचा तगादा लावला असावा का? त्यामुळे किंवा अन्य कारणामुळे (नक्की आठवत नाही, पुन्हा वाचले पाहिजे..) सुरजमल नाराज होऊन निघुन गेला, असे वाचल्याचे स्मरते.

अर्थात हे सर्व वाचलेले, परप्रकाशितच. तुम्ही स्वतः त्या क्षेत्री जाऊन आलात, पाहिलेत, ऐकलेत त्यामुळे तुम्हाला साष्टांग दंडवत.

श्रीरंग_जोशी's picture

5 Jun 2015 - 10:09 am | श्रीरंग_जोशी

पानिपतच्या मोहिमेबाबत या संदर्भांद्वारे प्रथमच वाचायला मिळाले. या लेखमालिकेसाठी मनःपूर्वक धन्यवाद.

ज्ञानोबाचे पैजार's picture

5 Jun 2015 - 10:16 am | ज्ञानोबाचे पैजार

माहितीपूर्ण लेखमाला.

पानिपतच्या युध्दाच्या अशा बर्‍याच कहाण्या असाव्या.

पण प्रत्यक्ष युध्दभूमीवर नक्की काय झाले, मराठे नक्की का हरले? ते गुलदस्त्यातच आहे / राहील.

पैजारबुवा,

भुमन्यु's picture

5 Jun 2015 - 11:01 am | भुमन्यु

तुमचे लेख म्हणजे पर्वणिच असते त्यात लेखमाला म्हणजे अति उत्तम.

चिगो's picture

11 Jun 2015 - 3:42 pm | चिगो

ही लेखमाला म्हणजे पर्वणीच..

मोहनराव's picture

11 Jun 2015 - 4:36 pm | मोहनराव

चांगली लेखमाला

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

14 Jun 2015 - 2:34 am | निनाद मुक्काम प...

मस्त काका
ह्या कथालेखनाचे पुढे पुस्तक काढा