|| सुरजमल जाट आया भाऊके दरबार || भाग - ३
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
|| सुरजमल जाट आया भाऊके दरबार || भाग - १
|| सुरजमल जाट आया भाऊके दरबार || भाग - २
|| सुरजमल जाट आया भाऊके दरबार || भाग - ३
जोशींनी अगोदर कुंजपूऱ्याचे थोडे वर्णन केले आहे. हे गाव आहे कर्नाल तहसीलमध्ये. पूर्वी गावाजवळून यमुना नदी वहात असे. पाखरांचे कुंज म्हणून कुंजपूरा. गावाल पानिपतच्या काळात मोठी तटबंदी होती. बाहेरच्या तटास तीन दरवाजे आहेत. जोशींनी त्यांचे नावे दिली आहेत कर्नाळी, महंमदी व न्यावली.
कुंजपूऱ्यातील लोकांनी जोशींना माहिती दिली,
‘‘मराठे न्यावलीतून आत आले’’ या तटबंदीच्या आता कुंजपूऱ्याचा नबाब रहात असे. त्याच्या महालाभोवतीही एक छोटी तटबंदी होती. तटबंदीच्या प्रत्येक दरवाजासमोर एक मातीची जाडजूड भिंत बांधलेली होती. जोशी तेथे गेले तेव्हा या भिंतीचे अवशेष दिसत होते. आत्ता आहेत की माहीत नाही. माझे हे ठिकाण बघायचे राहीले खरे, पण ते बघायलाच पाहिजे होते कारण मराठ्यांनी कुंजपुऱ्याची लढाई जिंकली होती. असो या भिंती कशासाठी असाव्यात हे सहज समजू शकते...अर्थातच तोफेच्या गोळ्यांपासून संरक्षणासाठी. श्री जोशींनी गावाबाहेर एका आमराईत बऱ्याच कबरी पाहिल्या ज्या नबाबाच्या घराण्यातील पुरुषांच्या होत्या असे म्हणतात. श्री जोशी लिहितात, कुंजपुऱ्याची संत्री व बोरे प्रसिद्ध आहेत. आता असतील असे वाटत नाही. हरियानात जी प्रगती झाली आहे ती जमिनी विकून. त्यामुळे आता मोकळ्या जमिनीच शिल्लक असतील असे वाटत नाही.
जेव्हा भाऊंनी नबाबास शरण येण्यास खलिता पाठविला तेव्हा तेथील जोगींच्या भाषेत, नबाबाने उत्तर दिले,
‘‘क्या भाऊ घूर दिखावत है क्या ताके किरसाण ।।
घडीमे आता सो पलमे आजा, मेरी जात पठाण ।।
अर्थ : मला कसली भिती दाखवतोस भाऊ ? मला शेतकरी समजलास की काय ! उद्या येणार असशील तर आजच ये, मी जातीचा पठाण आहे.
हा निरोप मिळताच भाऊंनी पहाटेच कुंजपूरा घेरला. नबाब आतल्या तटबंदीत लपून बसला होता. तोफांनी भिंतींना भगदाड पाडल्यावर भाऊंनी घोडा आत उडवला. त्यांच्या मागोमाग आत शिरलेल्या मराठ्यांनी मग अब्दाल्लीच्या सैन्याची कत्तल केली. जोगींनी रचलेले उत्तर श्री जोशींनी लिहिले आहे,
‘‘सागरसे दर्या न सोके मटका।।
बकरी होके शेरका सहारे झटका।।
बडा मर्द था कुतुबजंग घडी एक न टीक्या ।।
अर्थ : मटक्याने कितीही पाणी काढले तरी समुद्राचे पाणी आटत नाही किंवा बकरीने कितीही शौर्य गाजविले तरी ती वाघाला ठार मारु शकत नाही. तू मर्द असशील पण माझ्यासमोर एक क्षणभरही टिकला नाहीस.
तेथील गावकऱ्यांनी अजून एक माहिती पुरविली ती म्हणजे आत एक झील प्राण नावाचे तळे होते. मराठ्यांनी केलेल्या कत्तलीने त्याचे पाणी लाल झाले होते.
कुंजपूऱ्याची लढाई जनकोजी शिंद्यांमुळे कशी जिंकता आली हे आपल्याला माहितच असेल.
कुंजपुऱ्यास मराठ्यांनी दर तासाला ठोके देण्याची पद्धत पाडली होती त्याला तेथे घड्याळ म्हणतात. मराठे परत आले पण म्हणे ती पद्धत चालूच राहिली असे श्री जोशी सांगतात. श्री जोशींनी अजून एक हकिकत सांगितली आहे. ती म्हणावी तर दंतकथा पण त्याचा शेवट मात्र खरा आहे..... ती कथा खालीलप्रमाणे...
कुतुबजंगाने त्या भागातील हिंदू स्त्रियांवर अतोनात अत्याचार केले होते. भाऊंकडे याबद्दल असंख्य तक्रारी आधीच आल्या होत्या. एका सरदाराने कुतुबजंगाला उकळत्या तेलात टाकण्याची शिफारस केली होती. ते ऐकताच त्याने तेथील पिरास नवस केला की जर तो पकडला गेला नाही तर तो पिरासमोर वर्षातून गाईच्या चरबीचे दिवे लावेल. नबाब पकडला गेला नाही. मराठ्यांचा पराभव झाल्यावर ही पद्धत अनेक वर्षे चालू होती, नबाबाच्या सर्व वंशजांनी ही परंपरा चालू ठेवली. त्यासाठी आदल्यादिवशी दवंडी पिटण्यात येई. सर्व हिंदू त्यादिवशी कुंजपुरा सोडून बाहेर जात असत. श्री जोशींच्या भेटीआधी पाचएक वर्षांआधी हिंदूंनी नबाबाच्या वंशजांकडे ही पद्धत बंद करण्याची मागणी केली. ती अर्थातच धुडकविण्यात आल्यावर हिंदूंनी शस्त्रे हातात घेऊ अशी धमकी दिली. ब्रिटीश रेसिंडेंटने नबाबास पुढे काय हो़ऊ शकते याची कल्पना दिल्यावर त्या वर्षापासून मेणबत्या लावाव्यात असे ठरले. ती पद्धत अजून चालू आहे का ते माहीत नाही.
कुंजपुऱ्यानंतर श्री जोशींनी कुरुक्षेत्र इत्यादी पालथे घातले पण त्यात भाऊंच्या कथा नाही ना काव्य. मीही कुरुक्षेत्र इ. पालथे घातले.....त्या इतकी तद्दन भिकार ट्रीप मी माझ्या आयुष्यात तोपर्यंत केली नव्हती असेच म्हणावे लागेल्.
श्री. जोशींनी लिहिले प्रवास वर्णन हा इतिहास नाही.
हा भाग छोट झाला आहे कारण श्री. जोशींची पुढच्या भेटी या सामान्य वर्णनाच्या आहेत व त्याबद्दल लिहिण्यासारखे विशेष काही नाही. कदाचित दुर्दैवाने त्यांना भाऊंचे दोहे म्हणणारे अजून भाट भेटले नसतील्....आपले नशीब म्हणायचे दुसरे काय......
समाप्त...
जयंत कुलकर्णी.
प्रतिक्रिया
चांगली लेखमाला.
छान...
चांगला लेख होता
मनःपूर्वक धन्यवाद
लेखमालिका आवडली. धन्यवाद सर.
खूप छान आणि वेगळ्या धाटणीची
खूप छान!
सर्वांना धन्यवाद..........
सर्व भाग मस्त...
मस्त
खूप छान लेखमाला. लवकर संपली.
नेहमीप्रमाणेच रंगतदार मालिका.
+१
अप्रतिम ठेवा आम्हाला
मौखिक परंपरा
वाह! वाह! वाह!
अहो कार्यकर्तेसाहेब, तुमचा
हो ना हो! आता परत जाईन बहुतेक
धन्यवाद!
सुन्दर महिति
कसदार मालिका.
छान आहे लेखमालिका .