मनसुखसेट्ची चाय !

पहाटवारा's picture
पहाटवारा in जनातलं, मनातलं
17 Jan 2014 - 7:25 am

"ए देस्सपांडेसेठ, चाय प्यायलीस काय तू ?"
दुकानातल्या अगणीत तसबीरींच्यापैकी एखाद्या तसबीरिसमोर ऊभ्या-ऊभ्या चालू असलेल्या आपल्या पूजेत व्यतय न आणता, देशपांड्यांनी मनसुखसेट्च्या हाकेकडे रोज-प्रमाणेच दुर्लक्ष केले.
"पांडूसेठला आज अद्रक सस्ता भेटलेला दिसतोय यार्डात!"
मनसुखसेठची टिप्पणी चालूच होती.
जुन्या कसब्यात दुर्गादेवीच्या देवळापासल्या गर्दीतल्या दुकानांच्या रांगेत मनसुखसेट अन देस्सपांडेसेटची दुकाने एकमेकाला खेटून होती.
देस्सपांडेसेट - असा कुठल्याहि 'श' चा 'स्स', असा 'स' वर जोर देऊन ऊच्चार करणे हि मनसुखसेठ्ची खास स्टाईल ! मग देशपांड्यांच्या गिरिशला 'गिरिस्स'भाई म्हणून हाक मारी तर समोरच हार्-फुले विकणार्‍या शांताबाईचा - 'स्सांताबेन' सेठानी म्हणून सत्कार करी. तशाहि मनसुखसेठच्या अजूनहि बर्‍याच काहि स्टाईल होत्या. जसे की, कुठल्याहि स्वतंत्रपणे धंदा करणार्‍या माणसाचा कींवा बाईचा मनसुखसेठला मनापासून आदर वाटे अन मग आपसुकच त्या माणसाचा, मनसुखसेठच्या मते,'सेठ' होई अन बाईची 'सेठानी' !

"हे आज-काल धंदा एकदम मंदा हये नी .. तो चाय प्यायची काय मूडच येत नाय बग देस्सपांडेसेठ..."
गल्ल्याच्या चावीशी खेळत, एक नजर देशपांड्यांच्या तसबीरीकडे तर एक नजर कोपर्यावरच्या पांडू चहावाल्याकडे टाकत, मनसुखसेठ्ची टकळी चालूच होती.
देशपांड्यांची ऊद्बत्ती जशी शेवटच्या तसबीरिपुढे फिरू लागली, तसा मनसुखसेठनी शेवटचा डायलॉग टाकला.
"तू घेनार काय, चाय.. देस्स्पांडेसेठ?...मी सांगतो तुज्यासाठी पायजेल तर.."
पूजा ऊरकुन दुकानातली आपली बैठक जमवता जमवता देशपांड्यांनी मानेनेच नुसता रुकार भरला.
"ए पांडूस्सेट, एक मस्त, अद्रकवाली चाय पाठव रे देस्स्पांडेसेठच्या दुकानी .."
"एकच ..?" ऊत्तर माहिती असले तरी पांडूने खोचकपणे तिकडुन विचारले.
"हां हां एक्कच .. देस्स्पांडेसेट्साटी.. माजी तर चाय प्यायची आज मूड नाय बग .."
देशपांड्यांनी हातानेच 'का बुवा?' असे विचारले.
"हे असा चाय बी काय एकट्याने पियाची गोस्ट नाय ..अन अस्सा मूडमदे तर .."
"बरं मंग एक स्पेश्श्ल धाडतो.. अद्रक घालून .." पांडूने परत पीन मारली.
"आता बग ..पांडूस्सेट.. माजा तर काय मूड नाय .. पन आता हे देस्स्पांडेसेठ घेनार तर कंपनी नको काय देयाला.. चल अस्सा कर .. एक वन बाय टू दे पाठवून .."
नेहमीसारखी ओर्डर ऐकुन पांडूने गालातल्या गालात बारिक हसत किटली स्टोव्ह्वर चढवली.
रोज फिरुन, हा किस्सा थोड्याफार फरकाने असाच घडे. कधी धंदा मंदा म्हणून, कधी रात्री जास्त जेवण झाले म्हणून, तर कधी ऊन्हाळा वाढला म्हणून, मनसुखसेठ्च्या मूडला कुठलेहि कारण पूरे पडे. बायकोनी कितीहि वेळा बजावले तरी देशपांड्यांनाहि मनसुखची भीड काहि मोडवत नसे.

"ए देस्स्पांडेसेठ, तू भटजी नाय रे ?? " देशपांड्यांच्या वन बाय टू मधला चहा भुरकावतानाहि मनसुखची टकळी चालूच होती.
"मंग तू ह्या देवळात पूजा का नाय सांगत ? अरे एकदम बेस्ट साईड बिजिनेस !"
देशपांडे आपली गरमागरम चहाचीच पूजा बांधण्यात मग्न होते.
"अरे तुज्या ह्या पूजा साहित्य चे बिजिनेस मदे किती बीस्-तीस टका प्रोफिट मिलते नय .. पन हे पूजा सांगायच्या बिजिनेस्स मदे एक्दम सौ टका.. बग !!"
एव्हाना चहा संपवून देशपांड्यांनी आता दुकानातल्या दर्शनी भागातली मांडामांड सुरु केली होती.
"अरे तू दुकानमदे जी पूजा करतेस नय तेच मंदीरमदे जाऊन करशील तर असे धा दुकान अजून घेशील !"
शेवटी देशपांडे काहि दाद देत नाहि असे बघून मन्सुखने आपला मोर्चा तेवढ्यात समोर आलेल्या देशपांड्यांच्या मुलावर , गिरिशकडे वळवला.
"काय गिरिस्सभाय .. आज एकदम फ्रेस्स ?"
"काहि नाहि .. क्लासला चाललोय"
"आज पन त्या मुनोत बिल्डर च्या पोरगी बरोबर क्लास काय तुजा ?? नाय .लए फ्रेस्स हाय म्हनून विचारला.." मिश्कील हसत मनसुखसेट्नी आपला सोन्याचा दात चमकवला.
"काय काका .. तुम्हि पण ना .."
कसेतरी विषय टाळत पण मनातल्या मनात गुद्गुल्या होत असलेल्या गिरिशेने दुकानाच्या पायर्‍या चढल्या.
"अं , बाबा .. मी आज स्कूटर नेउ क्लासला ?"
"हां, पण बारा वाजेपर्यंत परत या. आणी आज दुपारी दुकानावर बसा. हुंदडायला जाऊ नका. मला गावी जायचे आहे. रात्री परत येईन" देशपांडे स्कूटरची चावी देत गिरिशला म्हणाले.
स्कूटरला किक मारून गिरिश गेला.
"मस्त जंटल्मन हाय हां हा छोकरा.. सेठ बनेल एक दिन.." गिरिशच्या स्कूटरकडे वळून बघत मनसुख देशपांड्यांना म्हणाला.
सकाळपासून सुरु असलेली त्याची टकळी एकदम बंद झाली. सकाळी सातलाच झाडलेल्या दुकानासमोरच्या सोप्यात चक्कर मारत ऊगाचच बहेर लटकवलेल्या साड्या सारख्या करू लागला.
मनसुखच्या मनीचा हा सल देशपांड्यांना चांगलाच माहित होता. मूल होत नसलेल्या बायकोला न सोडता रहाण्याचा मनसुखचा निर्णय त्याच्या बिरादरीला जरी पटला नव्हता, तरी देशपांड्यांच्या मनात त्याची किंमत होती.
मनसुखची गाडी परत जागेवर आणण्यासाठी देशपांड्यांनी विषय बदलला.
"मनसुखसेठ .. तो बर्‍हाणपूरचा माल आला काय तुमचा ?"
"स्साला येऊन पन काय ऊपेग नाय देस्स्पांडेसेठ.. ते पूर्वीची कारिगरी काय र्‍हायली नाय आता.." मनसुखचा मूड डाऊनच होता.
"देवीला वाहायच्या साड्यांत अन मॅचींग ब्लाऊजपीस मधे कसली लागतेय कारागीरी बोडख्याची.. " देशपांड्यांनी काडी टाकली.
"अरे .. काय बोलतो तू देस्स्पांडेसेठ .. अरे.. एक जमाना होता .. काय सुरेख कारिगरी असायची ह्या देवीच्या साड्यांमदे ..काय धागा ..अने काय कलर कोम्बीनेसन .. स्साला आपुन काय मंदीरमदे सारका सारका जात नाय .. पन हि अस्सी साडि असेल देव्रीच्या आंगावर.. तर आपुन दिवस्भर ऊबा र्‍हाऊन बगायला बी तयार हये बग.. " असे म्हणत मनसुखसेठ्नी त्याच्या ठेवणीमधली एक साडी आतल्या खणातून काढली.
"स्साला नाय्तर आत्ताचा माल बग .. हे ब्लाऊजपीस तर असे हए नी कि आज लाल साडीवर मॅचींग चालेल नी फुडच्या दो हफ्त्यांमंदी पींक साडीवर !"
यावर देशपांडे काहि बोलणार इतक्यात कुणी गिर्‍हाईक मनसुखसेठच्या दुकानात आले.
"लाल ब्लाऊजपीस मिळेल या साडीवर ??"
" वा वा वा बेन .. का नाय ..का नाय .. हे बगा नी .. हा नवाच माल हये .. खास बर्‍हाणपूर वाला.. एक्दम सोलिड .." हातातले तेच ब्लाउजपीस आता एकदम सोलिड झाले होते ..
"कलर तर अस्सा की आपल्या केसचा कलर जाएल पन हेचा .. कद्दी नाय .. हेच सांगत होतो मी अत्ता हे आम्च्या देस्स्पांडेसेठना .."
तोंडभरून हसत नी आपला सोनेरि दात परत चमकावत मनसुखसेठ नी मखलाशी केली.

मनसुखच्या ह्या सोन्याच्या दाताचीहि एक दंतकथाच होती.
कुणी म्हणे.. की लग्नाच्या हुंड्यात सोने कमी पडल्यावर ह्याने बायकोच्या बापाचा सोन्याचा दात काढवून घेतला. अन पुढे कधीतरी आपल्याच तोंडी बसवला. कुणी त्या दातावरुन त्याला टोचले, तर तो म्हणे, की हि तर बिना पोरा-बाळांच्या मनसुखसेठ्च्या मर्तीकाची तजवीज आहे.
मर्तीक .. हा त्याचा एक वीक पोईंट होता. बाकी कुठेहि न जाणारा मनसुख, कुठल्याहि मर्तीकाला जायला एकदम तयार असायचा. "स्साला स्सेवटचा प्रवासला जाताना किती एकटा असेल नाय रे तो ..त्याला तिरडिपरेंत तो बी साथ देयाला हवी.. " असे म्हणून आपल्या ओळखीच्याहि नसलेल्या लोकांच्या मर्तीकाला जाउन हजर व्ह्यायचा.

"काय देस्स्पांडेसेठ .. आज गावी दौरा काय..? ..काय विस्सेस्स ?"
देशपांड्यांच्या गिरिशशी झालेल्या बोलण्यातला धागा पकडून मनसुखने विचारले.
"काहि नाहि ..मागच्या महिन्यात आमचे चुलत-चुलते गेले. तर आता वाटणीची बोलणी आहेत"
"अर्रे .. तु बोलला नाय मला .. मी आलो असतो ना मर्तीकाला तुज्याबरोबर.."
"मनसुखभाई, इथे मीच गेलो नाहि तो तुम्हाला काय नेणार"
"अरेरे .. अरे अस्सा नाय करायचा रे .. तो मानूस काय एकटा असेल नाय रे .." मान हलवत मनसुखसेट बोलला.
"बरं .. ते जाउ द्या .. आज दुपारी मी नाहिये.. गिरिषला सांगीतलेय दुकानावर बसायला. अन आमची हि पण येईल थोडा वेळ. तेवढे लक्ष असू देत."
"अरे .. तू बिनधास जा .. मी हये नी..तसा बी धंदा काय जोर नाय अजून नवरात्री तक्..तू जाउन ये ..अन मी काय तुज्या धंद्यामदी खोटी नाय करनार "
"हां हां.. पण लबाडी पण नको हां.. "
"लब्बाडी .. अन .. मी ????" मनसुखसेट्नी असा आव आणला की बस्स..
"लबाडी नाय तर काय .. मागे मी असाच गावी गेलो होतो तर तू दहा चे नारळ वीस-वीस ला विकले."
"अर्रे पन पैसा सगला तर तुलाच दिला ना मी.. "
"हां .. पण मुळात दहाचे नारळ वीसला विकलेच का ?"
"अर्रे .. हे बिजनेस्स हये देस्स्पांडेसेठ .. ते मारुती एस्टीम मदून आलेले गिर्‍हाईकला काय दहा रुपयेवाला सस्ता माल देईल काय मी.. काय वाटेल त्याला ..की मनसुखसेट्ने त्याची खातीर नाय केली..? वीस रुपयेचा घेउन तेला मी ज्यादा भक्ती-भाव वाला नारियल दिला.. आता तू सांग .. यात लबाडि ती काय ..?"
मनसुखसेठ्च्या अजब युक्तीवादावर प्रत्युत्तर न सापडून देशपांड्यांनी ऊगाचच गल्ल्याशी चाळा सुरु केला अन मनाशी गावी गेल्यावर काय बोलायचे याची मनोमन तयारी सुरु केली.

क्रमशः

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

आतिवास's picture

17 Jan 2014 - 8:48 am | आतिवास

उत्तम सुरुवात.
'क्रमशः' वाचून आनंद झाला :-)

किसन शिंदे's picture

17 Jan 2014 - 10:36 am | किसन शिंदे

आवडली. पुभाप्र

जेपी's picture

17 Jan 2014 - 10:39 am | जेपी

*clapping* *BRAVO* :BRAVO: :bravo:

अनुप ढेरे's picture

17 Jan 2014 - 12:37 pm | अनुप ढेरे

आवडलं. पुढचा भाग येउद्या लवकर.

खूपच मस्त लिहिलंय! मनसुखस्सेठ आवडला एकदम. पुढचा भाग लवकर लिहा.

अवांतरः श चा स्स करणार्‍या लोकांच्या तोंडून कधी कधी अवचित शिट्टी वाजते!

बाबा पाटील's picture

17 Jan 2014 - 12:55 pm | बाबा पाटील

सुरुवात तर चांगलीच झालीय....

मुक्त विहारि's picture

17 Jan 2014 - 1:14 pm | मुक्त विहारि

मस्त सुरुवात...

पुभाप्र लयेद्या

तुषार काळभोर's picture

17 Jan 2014 - 1:18 pm | तुषार काळभोर

भाषा तर एकदम परफेक्ट आहे... एकदम गोड!!

राजेश घासकडवी's picture

17 Jan 2014 - 1:31 pm | राजेश घासकडवी

छान. कथालेखन, व्यक्तिचित्रण हे संस्थळांवर जरा कमी प्रमाणातच दिसतं. त्यामुळे इतकी चांगली सुरूवात असलेली कथा पाहून आनंद झाला. पुढचे भाग लवकर येऊ देत.

मेघवेडा's picture

17 Jan 2014 - 2:01 pm | मेघवेडा

भट्टी जमतेय. पुभाप्र.

विटेकर's picture

17 Jan 2014 - 2:05 pm | विटेकर

आवडले .
पु ले शु

यसवायजी's picture

17 Jan 2014 - 2:05 pm | यसवायजी

एक्दम बेष्ट.

अत्यंत आवडले. दमदार लेखन आहे. रोजच्या पाहण्यातले पण पार्श्वभूमीवर, गल्ल्या मागे घडणार्या घडामोडींशी अजिबात परिचय नसलेले हे दुकानांचे जग.

पु.भा.प्र.

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 Jan 2014 - 3:05 pm | डॉ सुहास म्हात्रे

छान सुरुवात. पुभाप्र.

प्यारे१'s picture

17 Jan 2014 - 6:04 pm | प्यारे१

छान शैली ! पु भा प्र.

बर्फाळलांडगा's picture

17 Jan 2014 - 9:33 pm | बर्फाळलांडगा

असे म्हणणार होतो पण थोरा मोट्यान्नि छान म्हटले मंजे साला आपलेच कायबी चुकलं असेल समजुन ते शब्द माघार. अन तूर्तास "हम्म इतकच ?" एव्ह्डेच बोलतो.

समीरसूर's picture

17 Jan 2014 - 11:20 pm | समीरसूर

छान उत्सुकता ताणली गेली आहे. येऊ द्या.

अर्धवटराव's picture

18 Jan 2014 - 2:42 am | अर्धवटराव

बर्‍याच दिवसांनी अशी इंट्रेस्टींग चीज आलि मिपावर.
येऊ दे नि फुडला भाग जल्दीजल्दी.

पहाटवारा's picture

18 Jan 2014 - 7:22 am | पहाटवारा

आपल्या प्रतीसादाबद्दल अन प्रोत्साहनाबद्दल धन्यवाद !
पुढचा (शेवटचा) भाग टाकला आहे :
मनसुखसेट्ची चाय ! - २

-पहाटवारा

निनाद's picture

20 Jan 2014 - 7:10 am | निनाद

लेखन छान जमले आहे. ओघवती शैली आहे.
कथा आवडली शेवट छान आहे.
संकटात हलकेच बदललेली भावना मस्त उलगडली आहे.
अजून वाचायला आवडेल!

अनन्न्या's picture

20 Jan 2014 - 7:23 pm | अनन्न्या

सुंदर!

अनिरुद्ध प's picture

20 Jan 2014 - 7:37 pm | अनिरुद्ध प

सुरुवात पु भा प्र

पैसा's picture

23 Jan 2014 - 3:39 pm | पैसा

मस्त सुरुवात! आता पुढचा भाग वाचेन!