मनसुखसेट्ची चाय ! - २

पहाटवारा's picture
पहाटवारा in जनातलं, मनातलं
18 Jan 2014 - 7:19 am

मनसुखसेट्ची चाय !

...
मनसुखसेठ्च्या अजब युक्तीवादावर प्रत्युत्तर न सापडून देशपांड्यांनी ऊगाचच गल्ल्याशी चाळा सुरु केला अन गावी गेल्यावर काय बोलायचे याची मनोमन तयारी सुरु केली.
*****************************************
"रात्रीच्या जेवणापर्यंत परत यायला जमेल ना?"
दुपारच्या जेवणाचा डबा ऊघडत सौ.देशपांड्यांनी विचारले.
नुसतेच "ह्म्म" एवढेच बोलून देशपांड्यांनी दुकानच्या मागच्या बाजूस खाली जमिनीवरच बैठक मारली.
"नाहि जर ऊशीर होणार असेल तर दुसरा डबा दिला असता तुमच्याबरोबर..तिथे गेल्यावर हाती पाण्याचा ग्लास तरी कुणी देईल कि नाहि कोण जाणे आता.."
"डबा ..आणी कुठे खाणार मी तो? सोपानकाकांच्या घरी ? मंगल, जरा थोडातरी विचार करून बोलत जा.." देशपांडे जरा ताठरूनच बोलले. सोपानकाका गेल्याची साधी खबर कुणी त्यांना वेळेवर दिली नाहि यावरूनच खरेतर सोपानकाकांच्या माघारी गावात आता देशपांड्यांना माया देणारे कुणी नाहि हे जरी त्यांना मनोमन जाणवले होते. तरी बायकोच्या बोलण्यातून ती खपली खरवडली गेली.
बाकिचा डबा अबोल्यातच खाऊन झाल्यावर नरमलेल्या देशपांड्यानी विषय बदलला.
"हे बघ, आता गिरिश येईल मला सोडून स्टँडवर तोवर तू दुकानी थांब. दुपारी तो थांबेल, तुला हवे तर मग तू जा घरी. तसेहि मनसुखभाई आहेच बाजूला काहि लागले तर.."
"काहि नको..." देशपांडेबाई फणकार्‍यातच बोलल्या.
"गिरिशचे अभ्यासाचे वर्ष आहे. नको त्या माणसांच्या संगतीत ऊगा बसून वायफळ घालवायला. मी त्याला पाठवीन घरी अभ्यासाला."
"अगं पण.."
"आणी मला नाहि कुणाची गरज दुकानावर इथे. तुम्हाला इतक्या वेळा सांगीतले कि जरा कमी करा संगत .. अशी माणसे एक दिवस मोठा गंडा घालतील तेव्हा समजेल.." मनसुखवर देशपांडेबाईंचा तसाहि राग होताच. देशपांड्यांच्या मघाच्या बोलण्याने दुखावलेल्याने त्या अजूनच फणफणल्या.
"अगं जरा हळू.."
"तुम्हाला इतक्यांदा सांगीतले .. रोजचा चहा तर चहा .. एक दिवस हे दुकानपण द्याल वन बाय टू करून .."
देशपांडेबाईचा त्रागा गिरिशच्या येण्याने जरासा थांबला.
देशपांडेबाईंच्या मनसुखबद्दलच्या त्राग्याचे खरंतर असे काहि खास म्हणावे असे काहि कारण नव्हते.
त्याच्या 'मंगलबेन' अशा नावाने हाक मारण्याने जरा अस्वस्थ वाटे. जणूकाहि ऊगाचीच जवळीक.
"मंगलबेन, तुमची खोबरा वडी एक्दम्म सारू हां.." देशपांड्यांसाठी खास पाठवलेल्या डव्यातल्या वड्यांबाबत जेव्हा अशी पावती त्यांना मिळे, तेव्हा मनसुखच्या या लोचटपणाचाहि त्यांना जास्तच राग येई.

आपली नेहमीची धोपटी खांद्यावर टाकून देशपाण्डे गिरिशबरोबर गेले.
"धंदा तसा मंदा हय नी मंगलबेन ?" दुकानातल्या थोड्याफार गिर्‍हाईकांची गर्दी ओसरल्यामुळे मनसुखसेठ नुकताच रिकामा झाला होता.
देशपांडेबाईंचे काहिच ऊत्तर न आल्याने त्याने आपला मोर्चा दुसरीकडे वळवला.
"काय पांडूस्सेट .. तुझे बिज्नेस्स मदे तर काय मंदी नाय का काय नाय .. हो का नाय ?"
रस्त्यापलीकडे असलेल्या कोपर्‍यावर्च्या पांडू चहावाल्याशी त्याच्या गप्पा सुरु झाल्या.
"अरे मनसुखसेट, बाकी सतरा भानगडी हायेत त्याचे काय ..लोकांची ऊधारी, मामाचा हफ्ता अन आता ते नवीनच झेंगाट निघालेय .. काय तं म्हने .. 'रसते ईसतार योजना' !" पांडू कावून बोलला.
"हां , मी बी ऐकले हाय काय तो बी .."
"दोन हफ्त्यामागे जुन्या स्टैंड मागच्या रस्त्यावर ते कोन सरवे वाले लोकं आलते.. मह्या चुलत्याच्या टपरीवर धाड घातली व्हती तवा सांगत व्हते की फुडली बारी आता ह्या देवळाच्या रस्त्याची हाय म्हनून .." पांडूच्या बोलण्यातून चिंता झळकत होती.
"अरे पन पांडूस्सेट , तू कालजी काय करते .. तसा बी तुजी टपरी गलीमदेच तो हये.. ते लोक येईल तवा थोडी अजून आत घुस्वून दे नी .." मनसुखने आपली टीप दिली.
" हां.. काय तरी तर करावंच लागंन.. "

हे असे पांडूचे अन मनसुखचे बोलणे चालू असतानाच दोन वेगळीच गिर्‍हाईके देशपांड्यांच्या दुकानाकडे आली.
सडेच असे दोन्हि बाप्ये जेव्हा देशपांड्यांच्या दुकानाच्या पायर्‍या चढू लागले तेव्हा मनसुखच्या मनात शंकेची पाल चुकचुकली.
"हां .. दुकानाची मालकी ?" आल्या-आल्या एकाने प्रश्न टाकला.
देशपांडेबाईना प्रश्नच कळला नाहि.
"कोण .. दुकानाचा मालक कोण ??" परत प्रश्न आला.
"हां.. आपलं हे .. आमचे हे.. देशपांडे.."
"कुठे गेलेत..?"
"गावी .. काय हवे आहे तुम्हाला.." चाचरत बाईंनी विचारले.
"शॉप-ऐ़क्ट लायसन ..??"
देशपांडेबाईना हाहि प्रश्न कळला नाहि.
"मंगलबेन .. ते काय ते टांगले हये नी .. तेच ते विचारते सायेब.." मनसुखसेट मधेच बोलला.
यावेळी खरंतर त्याचे असे हे मधेच लुड्बुड करणे देशपांडेबाईंना बरेच वाटले.
"सायेब ..काय नवीन आले काय डिपारमेंटला ..?" मनसुखने अजूनच लुडबुड करत विचारले.
"कोनते डिपार्मेंट.. आम्हि सर्वे साईडकडले.." दुसरा थोडा मवाळ वाटला. बहुदा जुनिअर असावा.
"ओह हो.. नमस्कार सायेब ..नमस्कार .. आज ईकडे कुठे.."
"फूड लायसन ..??" मनसुखकडे दुर्लक्ष करत मोठया साहेबाने परत प्रश्न टाकला.
पण एव्हाना देशपांडेबाईना प्रश्न विचारून ऊपयोग नाहि हे जाणवल्याने त्याने मनसुखलाकडे मान वळवली.
"सायेब ..फूड लायसन कशाला ? हाटेल साठी लागते नाय ते ? हे तर पूजा साहित्यचे दुकान ह्ये."
"हे फुटाणे.. हि खडीसाखर ..हे खायचे आहे ना? मग ईथे फूड लायसन लागते.. असा कायदा आहे.."
हि फूड लायसन्ची भानगड चालू असतानाच दुसरा जुनिअर साहेब एक टेप काढून दुकानाच्या पायर्‍यांपासून ते रस्त्याच्या दुसर्या कडेपर्यंत मोजू लागला.
"सर ..सात फूट ओवर.." जु.साहेब.
"मांडून घ्या सर्वे-शीट वर अन एक कोपी ह्यांना द्या..हे घ्या, नावं घ्या लिहून, ह्या लायसन वरून.."
सगळे ईतके फटाफट व्हायला लागले, कि मनसुखसेटलाहि काहि सुचेना.
"सायेब . .सायेब .. काय तो बी इतकी जल्दी सायेब..जरा काय तो चाय्-वाय घ्या..अन मंग काय ते रिपोर्ट् वगैरा लिहा ..मस्त कुर्सीवर बसून.." मनसुखसेटनी थोडिशी ऊसंत मिळावी म्हणून प्रस्ताव टाकला.
त्यावर साहेबाचा विरोध न दिसल्याबरोबर त्याने मोठ्याने पांडूला हाळी दिली.
"ए पांडूस्सेट , दो चाय बनव तो मस्त अद्रकवाली.."
"आनी तुज्या ते २ कुर्सी पन दे पाठवून माज्या दुकानी.."
" या ना .. सायेब .. हे माजी गरिबाची दुकान.." देशपांड्यांच्या दुकानाकडून आप्लया दुकानाच्या सोप्यात नेता नेता मन्सुखने परिस्थीतीचा पूर्णच ताबा घेतला.
" सायेब .. हे आम्च्या पांडूस्सेट्ची चाय एक्दम कडक.. एक्दम तुमच्या कायदा-माफिक.." हसत्-हसत मनसुखने साहेबाला एक चिमटा घेतला अन वातावरण थोडे निवळले.
"काय करणार ...पाळावे लागते आम्हाला सगळे.." खुर्चीवर बसून कडक चहाचा घोट घेत साहेब ऊत्तरले.
"सायेब .. हे सरवे वगैरा काय हाये ते.."
"हा रस्ता आता मोठा होणार .. मग हि सर्व दुकाने मागे घ्यावी लागतील .. एक ७-८ फूट तरी.."
"पन सायेब .. हे मंदीरचे काय करनार ..हे पन सार्या दुकान्ला लागून रस्त्यावरच हाये नाय.. ?"
"ते बघुया ..आधी दुकानांचे काय ते बघु.."
"पन सायेब ..जर मंदीर नाय हलले तर दुकान हलवून काय ऊपेग.. ? रस्ता तर फिर बी मोठा नाय ना होनार .."
"हम्म..." साहेबाला याची जाणीव झाली होती तर ..
"सायेब .. हे असे काय नाय होनार काय .. की मंदीर आधी अन मंग सारी दुकान.. ??" मनसुखने खडा टाकला.
"मंजे सायेब.. हे बगा .. जर दुकानचे हे सरवे अन रेपोर्ट वगैरा आधी जाले .. अन मंग मंदीरचे झालेच नाय .. मंग.. तुमचा रेपोर्ट वगैरा सारा काम ...." मनसुखने अजूनच आपला मुद्दा पुढे रेटला.
"हां पण मग आमची हि आजची चक्कर पण फु़कटच जाईल ना..आणी कायद्यानुसार पण.." जू.साहेबाने आपला ऊगाचच एक मुद्दा काढला..
"सायेब ..ते तुमची चक्कर काय फुकट नाय जाऊ देनार बगा.. हे चायसारखीच हे गांधी-पत्ती बी एक्दम कडक हाये बगा.." असे म्हणत मनसुखसेठने साहेबाची खातीरदारी केली अन कसे बसे त्या दोघांना वाटेला लावले.

त्या दिवशी पहिल्यांदाच देशपांडेबाईंना मनसुखसेठ आपल्या दुकानाचा शेजारी असल्याचा आनंद वाटला.
ते साहेब लोक गेले तरी मनसुखसेठची टकळी चालूच होती.
"अर्रे तू काय कालजी करते मंगलबेन .. हे आपले दुकानला कोन बी हात नाय लावेल.. अरे आपला इन्सुरन्स हये एक नंबर.. हे जे मंदीर हाये नी ..तेच हाये आपला इन्सुरन्स.. कोन बी हात नाय लावेल बग ..जर मंदीर नाय हलवेल तर नुसते आपले दुकान हलवून काय ऊपेग ..अन मंदीरला कोन हलवेल.."
असे अन अजून काहि बाहि..

***
दुसर्‍या दिवशी सकाळी देशपांड्यांनी दुकान जरा थोडे लवकरच ऊघडले. आज त्यांना पूजा लवकर आटोपायची होती.
पूजा आटोपून बैठक जमवत असतानाच त्यांनी मनसुखला आपल्या दुकानाचे कुलुप ऊघडताना पाहिले.

"पांडोबा .. दोन स्पेश्शल ..!"
देशपांड्यांच्या हि ऑर्डर ऐकून मनसुखसेठ्नी आणी पांडू चहावाल्याने आश्चर्याने वळून त्यांच्याकडे पाहिले..
"मनसुखसेट .. खोबरा वडी चहाच्या आधी घेणार कि नंतर .. ?" मिश्कील हसत हातातला डबा ऊघडत देशपांड्यांनी विचारले.
"अर्रे देस्स्पांडेसेठ .. खोबरा वडी तो दोनी टायम घेइल मी .. पन ते चाय तू वन बाय टू सांग नी .."
"स्साला धंदा मंदा हय नी .. तो चाय प्यायची मूडच नाय बग..पन आता तुला संगत देयाची तर घेतो बग.."

गावाकडच्या घराच्या वन बाय टू वाटणीपेक्षा हि चहाची वन बाय टू वाटणी देशपांड्यांना जास्त सुखद वाटत होती.

**समाप्त**

-पहाटवारा

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

किसन शिंदे's picture

18 Jan 2014 - 8:50 am | किसन शिंदे

अर्रर्रर्र! इतक्यातच संपवलीत?? मस्त लिहीत होतात की..मला वाटलं देस्सपांड्या आणि मनसुखचा दुकान आता जातेय जणू रस्ता रूंदीकरणात.

बर्‍याच दिवसात एक चांगली कथा वाचायला मिळाली मिपावर.

तुषार काळभोर's picture

18 Jan 2014 - 10:19 am | तुषार काळभोर

उगा लांबण लावण्याच्या नादात पानी-कम होण्यापेक्षा "अजून हवं होतं" असं वाटणं चांगलं...

vrushali n's picture

18 Jan 2014 - 10:21 am | vrushali n

म़जा आली..

जेपी's picture

18 Jan 2014 - 10:33 am | जेपी

कथा आवडली .

कथा आवडली. थोडक्यात संपली असं वाटलं खरं!!

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 Jan 2014 - 11:48 am | डॉ सुहास म्हात्रे

कथा आवडली. लिहीत रहा. दुसरे काही वाचायला आवडेल. पुलेशु.

गजानन५९'s picture

18 Jan 2014 - 12:13 pm | गजानन५९

अप्रतिम शैली, खरच अजून वाचायला आवडले असते.

बर्फाळलांडगा's picture

18 Jan 2014 - 12:26 pm | बर्फाळलांडगा

कथे मंदी साला कायबी दम र्हाय्ले नाय...! कठिन आहे असेच म्हणतो.

आदूबाळ's picture

18 Jan 2014 - 1:13 pm | आदूबाळ

छान लिहिलं आहे. पुलेशु!

पिलीयन रायडर's picture

18 Jan 2014 - 1:14 pm | पिलीयन रायडर

थोडी फुलवायचीत की हो अजुन.. छान लिहीता तुम्ही..

प्यारे१'s picture

18 Jan 2014 - 1:47 pm | प्यारे१

संपली??????
अरेरे! सुरु होता होताच संपली.
पहिल्या भागावरुन दीर्घ कथा असेल असं वाटलेलं.
आवडली हो!

(आमचे दीर्घकथाकार ५० फक्त कुठला ड्यु आयडी झाले कुणास ठाऊक!)

मुक्त विहारि's picture

18 Jan 2014 - 4:30 pm | मुक्त विहारि

आवडली.

बर्फाळलांडगा's picture

18 Jan 2014 - 5:33 pm | बर्फाळलांडगा

जरा लिहलेल्या शब्दांची अलंकारिक डाग्डुजि केली की ह्यात अन जिव्नकथेत एका भागाचेच ते काय अंतर भागावे लागेल.

मंदार कात्रे's picture

18 Jan 2014 - 5:34 pm | मंदार कात्रे

आवडली

कैलासवासी सोन्याबापु's picture

18 Jan 2014 - 6:17 pm | कैलासवासी सोन्याबापु

तिर्थाच्या ठीकाणी लहान लहान दुकानदार असतात त्या गल्ल्या ती माणसे अक्षरश: उभी राहीली डोळ्यासमोर !! पुण्यातले तांबडी जोगेश्वरी मंदीर आठवले आप्पा बळवंता जवळचे!!!

अगदी हेच लिहायला आले होते.
कथा आवडली.

स्वाती दिनेश's picture

18 Jan 2014 - 7:30 pm | स्वाती दिनेश

गोष्ट आवडली,
स्वाती

प्रभाकर पेठकर's picture

18 Jan 2014 - 7:45 pm | प्रभाकर पेठकर

कथानक मनाची पकड घ्यायला सुरुवात करते न करते एव्हढ्यात 'समाप्त' चा फलक झळकला.

एखादा हरहुन्नरी तडफदार तरूण लहान वयातच तडकाफडकी हृदयविकाराने जावा तसे वाटले.

अर्धवटराव's picture

19 Jan 2014 - 3:36 am | अर्धवटराव

कथा आवडली रे वार्‍या. हृषीकेश मुखर्जीच्या पिच्चर सारखी. काहि खडखडात ढणढणाट नाहि...साध्या माणसांचं सहज सुंदर कथानक.

खटपट्या's picture

19 Jan 2014 - 7:24 am | खटपट्या

आवडली

उत्तम.. नीटस.. साईझही बरोबर आवश्यक तेवढा..

आणखी कथा वाचायला आवडतील.

संजय क्षीरसागर's picture

19 Jan 2014 - 11:39 pm | संजय क्षीरसागर

पण विषय आणि मांडणी भावली.

पहाटवारा's picture

20 Jan 2014 - 4:09 am | पहाटवारा

सर्व वाचक अन प्रतीसादकांना धन्यवाद.
थोडी अजून मोठी लिहिता येणे शक्य होते .. पण काय करणार .. आळशीपणा आड आला :)
एनीवे, जोक्स अपार्ट .. कथा अजून फुलवता आली असतीहि आणी कदाचीत पूर्ण्-पणे व्यक्तीचित्रणात्मक करता येणेहि शक्य होते.. परंतु प्रथमत: हा विषय जेव्हा सुचला .. तेव्हा ह्या पार्श्व्वभूमीवर लोकांच्या जगण्याचा एक स्नॅपशॉट,अशा धर्तीचे लिहावे, हेच मनात होते.
कदाचीत एक प्रयोग म्हणून , हिच कथा पूढे लिहून पहायला हवी. बघुया ..
सर्वांचे पुन्हा एकदा आभार.
-पहाटवारा.

मुक्त विहारि's picture

20 Jan 2014 - 7:53 pm | मुक्त विहारि

फार छान लिहीता.

अज्जून लिहा.

अनन्न्या's picture

20 Jan 2014 - 7:31 pm | अनन्न्या

पुढील लेखनास शुभेच्छा!

दिपक.कुवेत's picture

21 Jan 2014 - 4:15 pm | दिपक.कुवेत

मनसुखशेट आणि देशपांडे डोळ्यासमोर उभा राहिले. पण ते समाप्त काढुन जरा पुढिल भाग लिहावे हि विनंती

आवडली. साधी, सरळ आणि आटोपशीर !!

बॅटमॅन's picture

22 Jan 2014 - 5:43 pm | बॅटमॅन

असेच म्हणतो.

लंचबॉक्स नामक पिच्चरसारखे वाटले अंमळ.

बाप्पा's picture

22 Jan 2014 - 5:15 pm | बाप्पा

ए स्साला तु एकदम झक्कास लिहीते हा पहाटवारा.. अशाच चालु ठेव हा लिहायचा...

पैसा's picture

23 Jan 2014 - 6:18 pm | पैसा

साध्यासुध्या माणसांची साधीसुधी कथा! मस्त आहे!

प्रचेतस's picture

23 Jan 2014 - 8:37 pm | प्रचेतस

अगदी हेच म्हणतो.
कथा आवडली.

इन्दुसुता's picture

24 Jan 2014 - 9:58 am | इन्दुसुता

कथा आवडली.
आणखीही वाचायला आवडतील.