निवृत्त

शैलेंद्रसिंह's picture
शैलेंद्रसिंह in जनातलं, मनातलं
22 Dec 2012 - 12:49 pm

[एकसे बढकर एक महारथी पत्रकार जमलेत, पंतप्रधानांची पत्रकार परिषद कव्हर करायला प्रत्येकाचा उत्साह ओसांडुन वाहतोय. अचानक पत्रकार परिषद भरविण्याचं कारण कोणालाच कळेना, त्यामुळे उत्कंठा शिगेला. तेव्हढ्यात पंतप्रधानांचे आगमन. सगळीकडे शांतता. पंतप्रधान माइकपुढे येतात]

पंप्र: मित्रहो... प्रस्तावना करत नाही. मी निवृत्त होणार आहे.
[सगळे अवाक, हे काय भलतंच]
पंप्र: तुमच्या सगळ्यांच्या मनात काय प्रश्न आहे हे मी जाणतो. मी निवृत्त का व्हायचं ठरवलं हेच कळत नाहीये ना?
[पत्रकारांची होकारात्मक शांतता]
पंप्र: माझ वय ८४ वर्ष. गेल्या ६० वर्षापासुन राजकारणात सक्रिय आहे. साध्या कार्यकर्त्यापासुन ते आज पंतप्रधानापर्यंत. आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले. जीवनात प्रत्येक अडचणींवर संघर्षाने मात करत आज ह्या टप्प्यावर पोहोचलोय. माझं राजकारण हे लोकांसाठी कधीच नव्हतं.
[पत्रकारांमधे खळबळ]
पंप्र: माझं राजकारण हे माझ्या स्वत:साठी होतं. लोकांनी माझंच ऐकावं. मी म्हणेल तसंच व्हावं ह्या अनिवार इच्छेपायी मी शक्य त्या मार्गाने सत्ता माझ्या ताब्यात राहिल याच्याच प्रयत्नात राहिलो. ह्या प्रयत्नात अनेक बरे-वाईट निर्णय जनतेच्या भल्यासाठीही झाले असतील, पण त्यांचा हेतु कधीही निर्मळ नव्हता.
[आजवरचा सगळ्यात स्वच्छ प्रतिमेचा पंतप्रधान असं काहीतरी बोलतोय यावर कोणाचाच विश्वास बसेना. ह्या धक्क्यातुन पत्रकार सावरलेच नाहीत]
पंप्र: गेले ६ वर्ष मी सर्वोच्च पदावर आहे. संपुर्ण बहुमतात. पक्षांतर्गत विरोधकही नाहित मला. जसं हवं तसं राज्य करतोय. ह्याच ६ वर्षांसाठी मी त्याआधीची ५४ वर्ष राजकारण केलं. ईश्वरकृपेने अजुनही मी ठणठणीत आहे. आणखी ४ वर्ष सहज राज्य करु शकेल इतकी उत्तम प्रकृती आहे. पण मग मी निवृत्तीचा निर्णय का घेतोय?
[पत्रकारांची उत्कंठा शिगेला]
पंप्र:काल एक विचित्र घटना घडली. काल स्वप्नात बापु आले. तसाच अवतार, तीच काठी, तोच चष्मा, तेच टक्कल, तेच चमकणारे डोळे. बापु खुप गुश्श्यात दिसत होते. बापु पुढे आले आणि काठीने मला बदडायला लागले. काय चालवलं आहेस हे, म्हणुन मला जाब विचारत होते आणि काठीने मारत होते.

[पंतप्रधान वेडे वैगेरे झालेत याची पत्रकारांना आता खात्री झाली]
पत्रकार: मग म्हणुन तुम्ही पंतप्रधानपद सोडताय का?
पंप्र: बापुंनी मारलं म्हणुन नाही. बापु मला मारत होते. मी चुपचाप मार खात होतो. पण एक क्षण असा आला जेव्हा मस्तकात एक सणक येऊन गेली. मी बापुंची काठी घेऊन त्यांच्या मस्तकावर बेभान होऊन प्रहार करु लागलो. बापु रक्ताच्या थारोळ्यात पडले. मी भानावर आलो. हे राम मी हे काय करुन बसलो? मी बापुंना ठार मारलं? बापुंपासुन प्रेरित होऊन बालपणापासुनच देशसेवेचे व्रत उचललेला मी, त्यांच्या प्रत्येक आदेशाचं पालन करणारा मी, वयाच्या विशीतच बापुंचा सहवास लाभल्यानेच आयुष्यात एक ध्येय घेऊन चालु शकणारा मी, मी बापुंना मारलं? मुळात बापुंवर मला मारायची वेळच का आली? मी घामाघुम होऊन उठलो. उठलो तेव्हापासुन झोपु शकलो नाही. आयुष्यात मी मार्गापासुन कधी ढळलो मला कळलंच नाही. राजकारणाच्या धुंदीमधे मी माझं आयुष्य वाया घालवलं याची मला जाणीव झाली. त्यासाठी स्वप्नात का असेना, मला बापुंना ठार मारावं लागलं होतं. स्वप्नात का असेना बापुंना हाती शस्त्र धरावं लागलं, हिंसा करावी लागली. हे मी सहन करु शकलो असतो, पण माझ्यात जागृत झालेला ६० वर्षांपुर्वीचा गांधीवादी हे कदापि सहन करु शकत नाही. मी प्रायश्चित्त घ्यायचं ठरवलंय. मी पद सोडायचं ठरवलंय. मी फ़क्त निर्णय कळवायला ही प्रत्रकार परिषद भरवली होती. ह्यावर एकही प्रश्न मला नकोय. मी राष्ट्रपतींकडे राजीनामा दिलाय.
[पंतप्रधान निघुन जातात. पत्रकारांमधे खळबळ. उत्तराधिकारी कोण हे कळणं तर गरजेचं असतंच. ही पत्रकार परिषद अभुतपुर्व असते. पत्रकार पंतप्रधांनामगे धावतात. पंतप्रधान गांधींच्य समाधीकडे जायला निघालेले असतात. त्यांच्या राजीनाम्याची बातमी वाऱ्यासारखी पसरलेली असते. पंतप्रधान फ़क्त निवृत्तीवर समाधान मानणार की आणखी काही गौप्यस्फ़ोट करणार याबाबत चर्चा सुरु होतात. राजकीय वर्तुळात खळबळ आणि अस्वस्थता]

काही वेळातच ब्रेकींग न्युज झळकते. पंतप्रधानांचा बॉम्बस्फ़ोटात मृत्यु... गांधींच्या समाधीचेही बरेचसे नुकसान.

राजकारणप्रकटन

प्रतिक्रिया

चिर्कुट's picture

22 Dec 2012 - 1:10 pm | चिर्कुट

कायतरी माझ्या डोक्याच्या बाहेरचं असं यात लपलेलं आहे का? :(

लेख नक्की कोणत्या वर्गाला समोर ठेउण लिहीला आहे

हे सुध्दा काही कळत नाहीए, मला वाटलं होतं कि माझ्यासारख्यांची मायनोरिटी आहे. ;)

श्री गावसेना प्रमुख's picture

22 Dec 2012 - 1:59 pm | श्री गावसेना प्रमुख

पंतप्रधान फ़क्त निवृत्तीवर समाधान मानणार की आणखी काही गौप्यस्फ़ोट करणार

पंतप्रधानांचा बॉम्बस्फ़ोटात मृत्यु.

धास्ती घेतलेल्या सत्ताधारी कुठल्याही थराला जाउ शकतात,बाकी बुलेट प्रुफ गाडी कुठे गेली होती ,जाउ भाड्याने दिली असेल.

जाम वास्तविक, तिच्यायला खरंच असं घडलं तर पकडणार तुम्हाला शैलेंद्रसिंहजी कट रचला म्हणुन.

कवितानागेश's picture

23 Dec 2012 - 12:33 am | कवितानागेश

अश्या प्रकारचा बॉम्बस्फोट म्हटले की मला हुतूतू आठवतो.

किसन शिंदे's picture

23 Dec 2012 - 8:32 am | किसन शिंदे

अश्या प्रकारचा बॉम्बस्फोट म्हटले की मला हुतूतू आठवतो

आणि हुतूतू म्हटलं कि मला ते गाणं आणि तब्बू आठवते.

छई छप्पा छई, छप्पाक छई..

विटेकर's picture

24 Dec 2012 - 10:14 am | विटेकर

?????????..........................!