पत्रकथेच्या पहिल्या भागाची लिंक : http://www.misalpav.com/node/21677
पत्रकथेच्या दुसर्या भागाची लिंक : http://www.misalpav.com/node/21691
------------------------------------------------------------------------
२४ फेब्रुवारी १९९२
निर्मयी, निर्मयी....
मी हसलोय तुझं पत्र वाचून... नुसता नाही गडबडा हसलोय...!!
माझ्या ह्या घराच्या भिंतीनांही ते चमत्कारिक वाटलं असेल.. 'हसणे' हा मानवी अविष्कार पार विस्मृतीत गेला असेल त्यांच्याही!!!
माझा सेक्रेटरी धावत आला आत, मानवप्राण्यांपैकी सबंध ठेवलेले हे एकच पात्र माझ्यासोबत आहे.. आमच्यात 'संवाद' असा घडत नाही कधीच, तो माझे सर्व व्यवहार पाहतो- लेखन, प्रकाशन, पुरस्कार इ.इ., बावचळला तो, त्याला वाटलं म्हणे मी आज टेपरेकॉर्डर्वर "हास्य" ऐकतोय की काय....
पुन्हा माझा नॉर्मल झालेला चेहरा पाहून निघून गेला बिचारा- कुणाची पुण्याई म्हणून आजही हा माणूस मला चिकटून आहे, ते देव जाणो.
असो.
तुला वाटेल हा माणूस लहरी आहे, मनात येईल तेव्हाच पत्र पाठवतो- ते खरे आहे!!
ह्यावेळी मात्र काही इतर कारणामुळे उशीर झालाय, (लहरीपणा प्रकारामुळे नव्हे.)
तुला भटकायला आवडतं? माणासांच्या बाजारात नाही, निसर्गात??
तू माझी प्रवासवर्णनं, निसर्गवर्णनं का वाचली नाहीस आजवर? खरे पाहता, त्या पुस्तकांना पण बर्यापैकी नावाजलं गेलंय- की कदाचित तूच "नाती" ह्या विषयाच्या प्रेमात आहेस?
मी माझी मोटरसायकल घेऊन, पाठीला एक होल्डोल अडकवून भटकायला गेलो होतो- निसर्ग जगायला गेलो होतो... बर्याचदा जातो- मनावर पुटं चढली की निसर्गाचाच कुंचा वापरतो.
येताना जालना- औरंगाबाद करत पुढे आलो. क्षणभर वाटलं जालन्यात आल्यावर, पत्ता पाठ आहे, येऊन भेटावं तुला- पण लगेच माझ्यातला मी फणकारला- पुन्हा ओळख, भेटी, नातं नि अपे़क्षा?
दुसर्या क्षणीच अगदी मी पुढचा गिअर टाकला अन अॅक्सिलेटर पिळला...
कधी माझे पत्र येण्यास बंद झालेच ना तर समजून घे, एकतर पत्रव्यवहाराचा उबग आलाय किंवा तुझ्याकडे आकर्षित होऊन नवे व्याप वाढू नयेत म्हणून पूर्णविराम लावलाय- विचित्र ना? कारण तुझ्याकडे आकर्षित व्हायला तू नक्की कोण, साठीतली की पंचविशीतली हे ही कळत नाहीय्ये.. आणि प्रेमात पडायचा तिटकारा आलाय... कुठल्याही क्षणी आता नव्या नात्यात स्वतःला गोवायची माझी तयारी नाही- सार्या पाशांतून स्वतःला सोडवायला मी खूप झटलोय, भाजलोय- तोच मूर्खपणा आता नाही.
हं..
तर तुझं पत्र वाचून हसलो, कारण...
मी गेली ५ वर्षे "एकटा" राहतोय- एकटा.. खरंय सारी नाती उपभोगून झाल्यावर एकटा! आणि तू हे ताडलंस.. माणसाची लेखणी त्यालाच चार लोकांसमोर आणते, नुसतं आणत नाही तर त्याचीच चिरफाड करते कदाचित.. माझ्या ह्या स्थितीला हसलो.
तुझ्याशी पत्रव्यवहार चालू ठेवण्याचं कारण म्हणजे- तुझे विचार!
स्त्रियांना स्वतंत्र विचारसरणी असते हे मी जाणतो- पण; तुझ्या विचारांतला स्पष्टपणा भावतो.
काय म्हणालीस मागच्या पत्रात- पळवाट- पुरुषांची पळवाट- अलिखीत- पदर डोक्यावर घेतलेली स्त्री दिसली अक्षरशः.... संस्कार नावाचा रोग- हास्यास्पद मर्यादा- इन्ट्रेस्टींग!!
तुला काय हवय गं मग?
माणसांनी प्राण्यांसारखं वागायला- एक नर- एक मादा! बास?
आणि तू स्वतः मर्यादाशील स्त्रीच वाटते आहेस पत्रांतून... ते काय आहे?
परवा परतताना वेरुळच्या लेण्यांमधे डोकावलो, त्या लेण्यांवरून माझी मेलेली नजर फिरताना कसंनुसं झालं, तिथे काय आवडलं माहिती आहे? गहन शांतता... गुहांमधला गूढ गारवा, गार अंधार...!!
जाणवलं पुन्हा- एकटं असणं चांगलं असतं.. आणि तू म्हणतेस, कदाचित ही उदासीनता काही काळापुरती असावी...? नाही निर्मयी, ती मी मिळवलीये- आत्म्याने स्विकारलीये..!!
-अस्तित्त्व.
------------------------------------------------------------------------
३ मार्च १९९२
नमस्कार! (अजूनही नाव माहितीच नाही आपलं)
एक मुद्दा स्पष्ट करते- मग संवाद सुरू करेन.
हा पत्रव्यवहार म्हणजे मी माझ्या साचलेल्या विचारांना वाट करून देण्याचं एक माध्यम समजत आहे.
क्लिष्ट विचार ताकदीच्या माणसासमोर व्यक्त झाले तर आशय समजाविण्याचा आटापिटा नसतो.
आपल्यासोबत कुठल्याशा नात्यात गोवलं जाण्याची ना माझी पात्रता आहे ना "इच्छा"!!
तुमची भटकंती वाचून छान वाटलं,
आणि विरक्ती वाचून आश्चर्य!
सर्व काही मनममुराद उपभोगल्यानंतर "आता मला उबग आलाय" म्हणणे हास्यास्पद ना?
मला ते सध्याच्या मार्केटमधील भोंदू साधूंसारखंच वाटतं, संसार करून घ्यायचा- तिकडे मुलं उच्च महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत, आणि आपण "विरक्तीचा" आव आणून गावोगाव प्रवचनं करित फिरायचं- ब्रह्मचर्येवर!! शिष्य ब्रह्मचारीच हवेत- ही ही मागणी!!
मी खरोखर स्तिमीत झाले, तुमच्या आत्ताच्या पत्रानंतर की, तुम्ही तुमच्या "अर्पण" पुस्तकातल्या ह्या ओळी- प्रत्यक्षात जगलात..?
"नाती जुनी नसतात होत,
संदर्भ बदलतात..!
'हिरवेपणा' टिकवण्याचा
प्रयत्न संपला, की
नातं टांगून ठेवावं!
सोबत घेऊन फिरण्यात अर्थ कसा उरतो...?
जीर्णता दिसून येते"
तुम्ही खरंच सारी- सारी नाती ठेवून दिलीत टांगून, कदाचित स्वतःच्या घराच्या नाही... निरोपाच्या भिंतीवर? म्हणजे शोभेलाही घरात अडकवून नाही ठेवल्यात, जीर्ण झाली होती ना सारी..!!!
रागावू नका, परखड व्यक्तव्यावर.... पण तुम्ही थेट 'नाती' लिहिता, त्या आधी "माणूस" समजलाय का?
हाच प्रश्न गेली अनेक वर्षे मला सतावत होता- आणि "हाच प्रश्न" आहे आपल्या ह्या पत्रव्यवहाराचं मूळ कारण...
तुमचं लिखाण, नात्यांतील उलाढाल, नाजूक मांडणी हे सारं वाखाणणीय आहे, हे सारं तुमच्याकडे असलेले पुरस्कारच सांगतात... पण हा प्रश्न मात्र टक्क जागा राहतो माझ्या मनात, तुमच्या प्रत्येक पुस्तकाची पारायणं करताना..
तुम्ही विचारलंत मला काय हवंय, प्राण्यांसारखेच जगायला का, नर- मादा वगैरे.
तुम्ही निसर्ग जगता ना? मग त्याला अंडर एस्टीमेट का करताय?
तुम्हांला काय वाटतं व्यभिचाराचं रण माजेल? इथे प्राण्यांमधेही मादा आपला नर स्वतः निवडते. तिला ती समज तुम्ही- मी नाही, ह्या निसर्गानेच दिलेली आहे.
पण इथे, जन्मलेल्या प्रत्येकाने मोठं कसं व्हायचं हे त्याचे माता-पिताच ठरविणार...आपण सारे महारोगी आहोत- 'संस्कार' रोगाने पिडीत!!
प्रत्येकाला "त्याची/तिची" अशी स्वतःची विचारसरणी आपण लाभूच देत नाहीत, संस्काराचं गाठोडं ठेवतो डोक्यावर आणि रस्ताही देतो आखून. बरं दिलेलं गाठोडं सदोष की निर्दोष हे ठरविणारं तसं पाहता कुणीच नाही- गाठोडं खाली नाही ठेवायचं एवढीच अट- ह्या पिढीने पुढच्याच्या आणि त्या पिढीने पुढ्याच्याच्या डोक्यावर देत चला, देत चला....
हसू येतय?
का?
हे विचार करणारी- मी एकटीच म्हणून? बरोबर आहे, माझ्यासारखा विचार करण्यार्याचा गट हवा किंवा तो पटणार्यांचा तरी. आज समाज- स्टेटस ह्या नावाखाली- हा मुलभूत विचार कानी पडला तरी डोक्यात शिरणार नाही, कारण डोक्यावर ते ओझं आहे!!!
मी मर्यादाशील आहे असं म्हणालात- हो आहे. हे सारे असे विचार असूनही मी आहे आणि मी ते तशी असल्यामुळेच खूप भोगलंय आणि आज ह्या अवस्थेत तुमच्यापुढे उभी आहे.
असो.
पुढील महिनाभर माझ्याकडून पत्रव्यवहारत खंड पडेल... आपण ह्या पत्राचे उत्तर देऊन ठेवावे.
आपली नम्र,
निर्मयी
(बरं झालं येऊन भेटला नाहीत! नाहीतर पुढची पत्र झालीच नसती.)
--------------------------------------------------------------------------------
१२ मार्च १९९२
निर्मयी,
तुझ्या पत्राने सुन्न झालो. गेल्या ५ वर्षंत निसर्गाने सोडून कुणीही असा सून्नपणा पदरी टाकला नसेल माझ्या.
मर्यादा जपतांना स्त्रियांची घूसमट खरेच इतकी होते का? आणि तू दिलेला नवा विचार- ह्या मर्यादा कुणा समाजशील माणसाने बनविलेल्या- रचलेल्या- लादलेल्या!!!
मागेही एकदा डॉकटरांकडे येणे- जाणे ह्यामुळे पत्रोत्तराला उशीर होतोय असे म्हणाली होतीस, आता महिनाभर नाही आहेस, सगळे ठीक ना?
(आधी कधी हे विचारले नाही, कारण उगाच तुझ्यात अडकायचं नव्हतं, आता विचारतो आहे, कारण "एकमेकांत अडकायचं नाही" हा दोघांमधील ठराव आहे)
उत्तराच्या अपेक्षेत,
-अस्तित्व.
----------------------------------------------------------------------------
क्रमश :
प्रतिक्रिया
1 Jun 2012 - 4:44 pm | अनिवासि
मागचाच प्रतिसाद!!!
मस्त! मनाला भीडणारे! पुढील भागाची आतुर्तेने वाट बघत आहे!
(माझाच प्रतिसाद पहिला ! very surprised!)
1 Jun 2012 - 5:01 pm | अमृत
थोडफार तर्क करायचा प्रयत्न केला पण नकोच...
अमृत
1 Jun 2012 - 5:28 pm | आनन्दा
कुठेतरी दुसरीकडे वाचल्यासाऱखे वाटते आहे