एक पत्रकथा: भाग दुसरा

वेणू's picture
वेणू in जनातलं, मनातलं
18 May 2012 - 10:36 am

पत्रकथेच्या पहिल्या भागाची लिंक :
http://www.misalpav.com/node/21677

----------------------------------------------------------

१३ ऑक्टोबर १९९१

अरे बापरे...
चिडलात? मला वाटतं माझ्या सहज लिहीण्यात तुमची सलती नस दुखावली गेलीये. क्षमा असावी.

तुमच्याशी बोलताना तुमच्या गुढतेचा ताळतंत्र समजायचाय मला अजून.

तुमच्या प्रत्यक्ष आयुष्यात नेमकं काय चालतं ह्यात मलाही स्वारस्य नाही, पण गेली अनेक वर्षे मी ज्या व्यक्तीला पुस्तकांतून ओळखते, ती व्यक्ती कधीही लोकांसमोर येत नाही, पुरस्कार समारंभांना नाही, त्या व्यक्तीचा पत्ता लोकांना माहिती नाही, त्याचं नावही तो सांगत नाही- आश्यर्य वाटणारच.
मला तुमच्यापर्यंत पोहोचण्याची जी एक वाट सापडली आहे, ती तुमच्या हजार चाहत्यांनाही गवसली असेलच ना!
मग एकतर तुम्ही सार्‍यांनाच पत्रोत्तर देत नसाल किंवा असे तुटक उत्तर दिल्यावर वाचकच घाबरून पुढचा पत्रव्यवहार करत नसावा.

अस्तित्व (ह्याच नावाने उल्लेखायची वेळ आलीये),
सायली जगतापे मीच!
'निर्मयी' हे मला आवडणारं नाव, म्हणून ते "तुमच्याशी" बोलताना वापरलंय!
तुमच्या लेखणीने मला आपलंस केलय, इतकं की पहिल्या पत्राच्या सुरुवातीला 'प्रिय' म्हणताना चरकले नाही.

प्रत्येक कलाकाराला उद्विग्नतेचा शाप असतोच, ही माझी धारणा खरी ठरवू नका- इतकंच म्हणेन.

जमलंच तर उत्तर द्या. वाट पाहतेय. तुम्हाला निदान मी स्त्री बोलतेय हा विश्वास तरी आहे, माझा पत्ता तुमच्याकडे आहे- कधीही येऊन तुम्ही चौकशी करूच शकता, पण मला उत्तरं नेमकं कोण देतंय, मलाही माहिती नाही- तरीही पत्र पाठवतच आहे.

-आपलीच विनम्र
निर्मयी

(गेल्या आठवड्यात बरेचदा डॉक्टरांकडे जाणे येणे करण्याच्या गडबडीत पत्रोत्तराला उशीर झाला आहे)

-------------------------------------------------------------------------------
२८ डिसेंबर १९९१

निर्मयी,
पत्र भेटून बरेच दिवस झालेत, बहुधा महिन्याच्या वर! पण टेबलावर पडून असलेला तो एन्वलोप उघडावाच वाटत नव्हता... आज उघडला आणि आजच उत्तर देतो आहे.

मला मित्र नाहीत.
मला कुटुंब नाही,
मला माणसांत भटकायला आवडत नाही.

दोन व्यक्ती जवळ आल्या की "नातं" बनतं आणि आयुष्याचे नवे व्याप, ताप, संताप, वैताग सुरू होतात...
त्यातले सुंदर क्षण वेचून ठेऊन वेगळे काढावेत म्हटलं तरी ते कुजलेल्या अपेक्षांमधून वेगळे असे काढता येतच नाहीत, त्यांनाही कुजका वास लागलेला असतो.

मला नातीच नको आहेत.

तू उत्तर नाही दिलंस तरी चालेल.
माझी तर्‍हा ही अशीच आहे.

-अस्तित्व.
--------------------------------------------------------------------------------

६ जानेवारी १९९२

नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!

"नाती- ह्यांची नावं ठरवली की अपेक्षांचा जन्म होतो" तुम्हीच लिहीलेलं आणखी एक वाक्य!

देवाने निर्मिलेल्या दोन व्यक्ती, "फक्त व्यक्ती" म्हणूनच का जगत नाहीत? हा मला पडलेला कायमचा प्रश्न...

प्राण्यांमधे पण असतील का मामा, काका, भाचा, पुतणी, आईच्या जावेची चुलत बहिण, मावशीची ननंद, नातू, आजोबा वगैरे?

आपणही प्राणीमात्रच! मात्र बुद्धीजिवी- म्हणून ह्या गोष्टींन्ना जन्म द्यायचा, निव्वळ द्यायचा नाही ह्यांनाच घट्ट अतिघट्ट बिलगायचं... मग "संस्कार" नावाचा आणखी एक रोग!

असे-असे वागले- तू सर्वोत्तम
थोडे कमी पडलात- तू बरा
थोडे आणखी कमी- गेलेली केस!!!

असे सर्वसाधारण ठोकताळे.

तरी गम्मत काय- पुरूषांना प्रत्येक गोष्टीत एक अलिखीत पळवाट, स्त्रिया त्या वाटेवर पदर डोक्यावर घेऊन जरी दिसल्या तर तिची गावभर बभ्रा!! -ह्या आपणच स्त्री-पुरूष जातीला दिलेल्या "मर्यादा" म्हणे- मर्यादा - मला हा एक हास्यास्पद प्रकार वाटतो,
का? कळेलच (जर पत्रव्यवहार राहिलाच अबाधित तर)

तर सांगायचं असं,
की तुमचंच उदाहरण घेऊ या,
तुम्ही जगभरातली नाती अनुभवून- उपभोगून, "मग" त्यांना कंटाळला असावात, आता इतके की तुम्हांला वीट आलाय- माणसं म्हटली की शिसारी आलीये...!! कदाचित- कदाचित ही उदासीनता तुमच्यात काही काळापुरती असावी- "मनुष्य समाजशील प्राणी आहे" हे होतं वाटतं ना शाळेत शिकताना... हे ही मानवानेच ठरवलय बरं!!

तुमचीच विनम्र,
निर्मयी
------------------------------------------------------------------------------

क्रमशः

कथा

प्रतिक्रिया

पैसा's picture

18 May 2012 - 11:01 am | पैसा

कथा मस्त रंगतेय. पुढे काय म्हणून वाचायची उत्सुकता आहेच!

मोदक's picture

18 May 2012 - 12:33 pm | मोदक

वाचनखूण साठवली आहे..

नात्याला नाव न देता, आहे ती आणि आहे तशी जवळीक अनुभवणे आनंददायी वाटले आहे.

अनिवासि's picture

18 May 2012 - 5:03 pm | अनिवासि

काय वेळ शोधुन काधली आहेत ह्या धाग्याला?
गेले बरेच दिवस माझ्या मित्रान्ब्ररोबर ह्यावरच चर्च्या चालु आहे. ह्या वयात एकटा का रहातोस? जुळव न काहितरी!
बर्याच जणाना मैत्रिणीन्शी नुसती मैत्री असु शकते हेच पटत नाही.
तुम्ही दोनही बाजु छान माडल्या आहेत.
पुढील भागाची वाट पहात आहे.

स्पंदना's picture

18 May 2012 - 5:24 pm | स्पंदना

अहं!

छानच .

सानिकास्वप्निल's picture

18 May 2012 - 9:35 pm | सानिकास्वप्निल

हा ही भाग आवडला :)
वाचत आहे :)