मिपा संपादकीय - आपल्याला काय त्याचे?

संपादक's picture
संपादक in विशेष
3 Aug 2008 - 11:06 pm
संपादकीय

मिपा व्यवस्थापन 'मिपा संपादकीय' हे सदर लोकमान्य टिळक यांच्या पवित्र स्मृतीस समर्पित करत आहे. यापूर्वीचे संपादकीय लेखन येथे वाचायला मिळेल! धन्यवाद...

आपल्याला काय त्याचे?

नेहमीप्रमाणे १ ऑगस्टला लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने शाळा-कॉलेजांमधून त्यांच्या फोटोंना हार चढवले गेले असतील, व्याख्याने-निबंधस्पर्धा झाल्या असतील. यात नेहमीप्रमाणे टिळकांचे केसरीमधील "सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?" असे अग्रलेखाचे घणाघाती मथळे, मंडाले येथे भोगलेली कैद, लहानपणी घडलेला फोलपटांचा प्रसंग किंवा तरूण वयात शरीर सुदृढ करण्यासाठी केलेले प्रयत्न यांची उजळणी होईल. ही मुले मोठी होतील तेव्हा त्यांना टिळकांबद्दल नक्की काय आठवेल हे विचार करण्यासारखे आहे. लोकमान्यांनी आपल्याला काय दिले असा प्रश्न आजच्या महाराष्ट्रातील सज्ञान लोकांना विचारला तर " स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच" ह्या वाक्याने दिलेला "स्वराज्य" हा शब्द आणि सार्वजनिक गणेशोत्सव असे बहुतेकांचे उत्तर येईल. पुढे स्वराज्य म्हणजे काय असे विचारले तर "स्वत:चे राज्य" अशा शाब्दिक अर्थापलिकडे बहुतेकांची मजल जाणार नाही. आणि टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या काळात होणारे ध्वनिप्रदूषण; उंच, रंगीबेरंगी गणेशमूर्तींच्या आणि निर्माल्याच्या विसर्जनाने गाळ साचून बिघडलेले तलाव, नद्या आणि समुद्राचे पाणी; बिभत्स अंगविक्षेप करीत केलेली गणपतीची पाठवणी; हे पाहता सार्वजनिक गणेशोत्सव सध्याच्या काळात बंद पाडले तर काही राजकिय पक्ष वगळता बहुतेक सर्व जनता धन्यवादच देईल असे वाटते. पण असे करूनही आपले प्रश्न गणेशोत्सवापुरतेच सुटतील हे या लोकांच्या सहजी लक्षात येणार नाही. हिमनगाचा जसा केवळ वरचाच भाग दिसतो, पाण्याखाली तो किती प्रचंड आहे हे जसे लक्षात येत नाही तसे महाराष्ट्राचे इतकेच काय देशाचेही प्रश्न हे टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या समाप्तीनंतरही राहणार आहेत हे ध्यानी ठेवण्यासारखे आहे.

यंदा गणपतीच्या आधी नेहमीप्रमाणे पाऊस झालेला नाही, असे महाराष्ट्रातील चित्र आहे. तशातच पाणी पुरवठ्याच्या बारगळलेल्या योजना, शहरी भागात चाललेली राहण्याच्या जागा तयार करण्यासाठी चाललेली नद्यानाल्यांची बेसुमार कत्तल, विदर्भातील शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचे जुने प्रश्न, पावसाअभावी वाळून जाणारी पिके, अन्नधान्यांच्या वाढत्या किंमती, दुसरीकडे वाढती गुन्हेगारी, रोगराई अशी बेसुमार संकटे आज महाराष्ट्राच्या आणि देशभरच्या जनतेला भेडसावत असताना आजही एका बाजूला समाजातील मोठा शिक्षित वर्ग राजकारण्यांच्या नावाने बोटे मोडण्यापलिकडे काही करताना दिसत नाही. जे काही राजकिय पक्ष आहेत ते क्षणिक स्वार्थासाठी लोकहितासाठी घेतलेले कठोर निर्णय फिरवण्यात धन्यता मानत आहेत. गेल्याच आठवड्यातील मुंबईत शिवसेनेने पाणी पुरवठा तलाव भरेपर्यंत कपात केली ती रद्द करण्यासाठी दबाव आणण्यात धन्यता मानली हे याचे एक उदाहरण. शिवसेनेला नावे ठेवली म्हणून इतर राजकिय पक्ष जे करतात ते सर्व निस्वार्थीपणे असते आणि क्षणिक फायद्यासाठी नसते, असेही समजण्याची गरज नाही. सर्व एकाच माळेचे मणी आहेत. याचे मुख्य कारण आपण विसरतो, की लोकशाहीत लोकप्रतिनिधी मग ते कोणत्याही पक्षाचे का असेनात, ते जनतेतूनच आले असतात. एका अर्थाने संपूर्ण समाज कसा आहे याचा तो एक सारांशच असतो. लोकप्रतिनिधी स्वार्थी, भ्रष्टाचारी, आणि जनतेची फिकीर नसलेले असतात असे म्हटले तर समाजातील बहुसंख्य घटक हेही दुर्गुणी असावेत असे म्हणणे भाग पडते.

लोकमान्यांच्या मृत्युनंतर लिहीलेल्या अग्रलेखात म. गांधींनी म्हटले आहे की टिळकांचा लोकशाही आणि बहुमताच्या राजकारणावर इतका विश्वास होता, की गांधींना त्या विश्वासाची भीती वाटत असे. "He was a born democrat. He believed in the rule of majority with an intensity that fairly frightened me". (संदर्भ : http://www.mkgandhi.org/Selected%20Letters/gandhi-tilakcorr.htm) एका मोट्या माणसाने दुसर्‍या मोठ्या माणसाच्या विचारांचे केलेले हे मूल्यमापन आहे. टिळकांना त्यांच्या स्वराज्य ह्या संकल्पनेमध्ये जी लोकशाही अभिप्रेत असावी, ती एकमेकांना नियंत्रित करणारे शासन, न्याय, अशा स्तंभांवर आधारित असावी. स्वतंत्र भारतातील लोकशाही ही भविष्यात डोळे मिटून दूध पीत बसलेल्या मांजराप्रमाणे असलेल्या लोकांच्या हातातील बाहुले बनेल हे त्यांच्या लक्षात आले नसावे. गंमत अशी आहे की आजच्या घडीला कोणालाही विचारले की हे लोक नक्की कोण आहेत, तर प्रत्येकजण दुसर्‍याकडे बोट दाखवील, आणि महाराष्ट्रातील आणि देशातीलही सध्याच्या परिस्थितीचे खापर गल्लीतील दादांपासून दिल्लीतील ताईंपर्यंत सर्वांवर फोडून आपण स्वतः नामानिराळे होऊन बसेल.

आज भारतीय लोकशाहीतील सुशिक्षित वर्ग, ज्याने समाजाला दिशा दिली पाहिजे अशी अपेक्षा असते तोच वर्ग, मोठ्या संख्येने, स्वतःच्या व्यक्तीगत आयुष्यात गर्क होऊन आजूबाजूला काय घडते आहे त्याकडे सोयिस्कर दुर्लक्ष करीत बसलेला दिसतो आहे. हाच वर्ग गणेशोत्सवात जेव्हा मोठ्याने गाणी लावली जातात तेव्हा कानावर हात घेऊन बोटे मोडीत राहतो. लोकप्रतिनिधींशी बोलून काही होणार नाही असा समज करून घेऊन, निवडणुकीत मते न देण्याचे समर्थन करतो, किंवा आजूबाजूच्या स्थितीकडे पाहून नाके मुरडताना त्या स्थितीत आपण आपल्या प्रयत्नांनी नक्की काय सुधारणा करू शकतो याचा विचारही न करता स्वतःच्या स्वार्थासाठी आणि स्वार्थासाठीच केवळ, झटत राहतो. "आपण बरे की आपले काम बरे, आपल्याला काय त्याचे, कशाला वेळ घालवा नस्त्या गोष्टींत?" हा जणू आपल्याकडच्या पिढ्यापिढ्यांचा मंत्र झाला आहे. आणि घरातले लहानथोर अशा विचारांची प्रजा आणि पिढ्या तयार करण्यात हात लावण्यात मग्न आहेत. हे असे दृष्य प्रगत देशांत कमी दिसते. प्रगत देशांतील लोक आपल्या हक्कांविषयी जसे जागरूक असतात तसेच लहानपणापासून त्यांना स्वतःच्या सामाजिक जबाबदार्‍यांची जाणीव करून दिली जाते. आपण मात्र त्या डोळे मिटून दूध पिणार्‍या मांजरीप्रमाणे झालो आहोत. आपल्याबद्दलचे लोकांचे मत काय आहे ह्याची जाणीव करून घ्यावी अशी इच्छाही आपल्याला होत नाही आणि पुढे काय संकट वाढून ठेवले आहे त्याची जाणीवही होत नाही. भारतातील कामे अनेकदा सामाजिक तसेच राजकीय इच्छेअभावी अर्धवट पडतात किंवा धुळीला मिळतात. दुसरीकडे अशी ही इच्छा तयार करण्याचे प्रयत्न होताना दिसत नाहीत, आणि नैराश्याने सर्वांना ग्रासले आहे हा सध्याच्या परिस्थितीतला मोठा अडसर होऊन बसला आहे.

असे असले तरी अंधारात चाचपडत असलेल्या अनेक जणांना प्रकाश दिसावा असेही काही आजूबाजूला घडते आहेच ही सुखद जाणीव आहे. बरेचदा असे लक्षात येते की कुठचीही मोठी दिसणारी कामे एकेकट्या व्यक्तीनेच सुरू केलेली असतात. बाबा आमट्यांनी विदर्भात सुरू केलेले महारोग्यांच्या संबंधीचे काम असेच नदीच्या उगमाकडील धारेप्रमाणे सुरू झाले असावे. पण आज ते त्यांच्या पुढच्या पिढीच्या सहभागाने वाढत पुढे चालले आहे हे गेल्याच आठवड्यात प्रकाश आणि मंदाकिनी या दाम्पत्याला मिळालेल्या मॅगसेसे पारितोषिकाने पुन्हा एकदा नजरेस आणून दिलेलेच आहे.

"यस्तु सर्वाणि भूतानि आत्मन्येवानुपश्यति | सर्वभूतेषु चात्मानं ततो न विजुगुप्सते|| ह्या इशावास्योपनिषदातील अध्यायाप्रमाणे सर्व शक्तींचे मूळ एकच समजून जो वागतो, तो कशालाही आणि कोणालाही कंटाळत नाही. असे न कंटाळता, व्यक्तीगत आवडीनिवडीप्रमाणे आपल्या कुटुंबाच्या परिघापलिकडील काहीतरी काम दिवसाकाठी, महिन्याकाठी किंवा अगदी वर्षाकाठी एकदा तरी करावे हा निश्चय जरी प्रत्येकाने येत्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने केला तरी खूप काही साध्य होऊ शकेल. लोकमान्यांचे स्वराज्य थोडे तरी जवळ येईल.

पाहुणी संपादक : चित्रा.

प्रतिक्रिया

देवदत्त's picture

3 Aug 2008 - 11:34 pm | देवदत्त

छान लेख.
’ही मुले मोठी होतील तेव्हा त्यांना टिळकांबद्दल नक्की काय आठवेल हे विचार करण्यासारखे आहे.’
खरे आहे, लहानपणी भाषणे केली पण मलाही आज फक्त ४-५ गोष्टीच आठवतात ही माझ्याकरीता खेदाची बाब आहे. त्या म्हणजे ’स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे’ ही गर्जना, ’मी शेंगा खाल्ल्या नाही, मी टरफले उचलणार नाही’ हे वाक्य, त्यांनी सुरू केलेला गणेशोत्सव, केसरी हे वर्तमान पत्र व ’सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?’ हे अग्रलेखाचे वाक्य, मंडाले तुरूंग व तेथे लिहिलेले गीतारहस्य एवढेच आठवते. पण त्याचीही पूर्ण माहितीही आठवत नाहीय. :(

असे असले तरी अंधारात चाचपडत असलेल्या अनेक जणांना प्रकाश दिसावा असेही काही आजूबाजूला घडते आहेच ही सुखद जाणीव आहे. बरेचदा असे लक्षात येते की कुठचीही मोठी दिसणारी कामे एकेकट्या व्यक्तीनेच सुरू केलेली असतात.
सहमत. असाच प्रकार आताही व्हायला पाहिजे. पण ’अपुन को क्या?’ ह्या मनस्थितीत सर्वांकडे दुर्लक्ष दिले जाते.

’असे न कंटाळता, व्यक्तीगत आवडीनिवडीप्रमाणे आपल्या कुटुंबाच्या परिघापलिकडील काहीतरी काम दिवसाकाठी, महिन्याकाठी किंवा अगदी वर्षाकाठी एकदा तरी करावे हा निश्चय जरी प्रत्येकाने येत्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने केला तरी खूप काही साध्य होऊ शकेल.’
नक्की प्रयत्न करेन :)

llपुण्याचे पेशवेll's picture

3 Aug 2008 - 11:41 pm | llपुण्याचे पेशवेll

एकदम बरोबर बोललात जनता दुर्गुणी आहे म्हणून नेते कारण जनताच नेते निवडून देत असते.
पुण्याचे पेशवे

सर्किट's picture

4 Aug 2008 - 6:49 am | सर्किट (not verified)

आज पहिल्यांदा मिसळपावावरील अग्रलेख भावला.

विषय महत्वाचा.
मांडणी सुंदर.
थोड्या थोडक्या शन्दात महत्वाचा विचार.
मुख्य म्हणजे, अग्रलेखांना साजेशी शब्दरचना.
कुठेही भडकपणा नाही, उगाच इतिहासाची पुनर्रचना नाही, की काही नाही.

सुंदर अग्रलेख.

- सर्किट

मेघना भुस्कुटे's picture

4 Aug 2008 - 6:57 am | मेघना भुस्कुटे

अगदी असेच म्हणते. ते अग्रलेखाच्या भाषेचे अगदी पटले.

बेसनलाडू's picture

4 Aug 2008 - 11:44 am | बेसनलाडू

म्हणतो.
(नेमका)बेसनलाडू

वैशाली हसमनीस's picture

4 Aug 2008 - 7:00 am | वैशाली हसमनीस

चित्राताई,आपण एका चांगल्या विषयाला हात घातलात.नांवही आवडले.पण 'मला काय त्याचे'असा विचार न करता जो हिरीरेने आपले विचार समाजात मांडू पहातो त्याच्यावर लोकांकडून मार खाण्याची वेळ येते असा अनुभव मला आला आहे.त्याचे काय?

चित्रा's picture

4 Aug 2008 - 11:51 pm | चित्रा

सर्किटरावांनी याचे उत्तर दिले आहे. कोणाला काय वाटते याचा विचार न करता आपले म्हणणे ठामपणे मांडणे यात काही चूक नाही, ते दरवेळी दुसर्‍यांना मान्य होईलच असे नाही. पण आपल्याला मान्य होत असल्यास ते जरूर मांडले पाहिजे.

यशोधरा's picture

4 Aug 2008 - 7:44 am | यशोधरा

अतिशय भावला अग्रलेख.

रामदास's picture

4 Aug 2008 - 8:01 am | रामदास

जसे लोक तसे त्यांचे प्रतिनिधी .
खरे आहे आपण आपली जबाबदारी टाळून चालणार नाही.
शुद्धीकरणाची प्रक्रीया अशाच अग्रलेखातून सुरु होते. निर्विकार सुशिक्षीतांनी पुढाकार घेतला तर सामाजीक चळवळ परत सुरु होईल.काल बाजीरावांची टोलेबाजी वाचल्यानंतर हाच विचार डोक्यात घोळत होता.त्याला अग्रलेखानी पुढे चालना मिळाली.
भडकमकर मास्तरांच्या अग्रलेखातून एक सामाजीक विचार मांडला गेल्यानंतर बर्‍याचजणांनी डोले किलकीले करून स्वताकडे पाह्यला सुरुवात केली असेल तर हा अग्रलेख एक बूस्टर डोज ठरावा.
भाषा, मांडणी चांगली आहेच. थोडा छोटा लेख वाटला एव्हढेच.
तूर्तास सर्व आकस दूर ठेवून अग्रलेखाकडे पाहू या.
चित्राताईंचे अभिनंदन.

सहज's picture

4 Aug 2008 - 8:22 am | सहज

अग्रलेख कसा असावा याचे उत्तम उदाहरण! भाषा, विचार दोन्ही अत्यंत संयमित व प्रत्येकाला विचार करायला लावणारे.

लोक आपल्या हक्कांविषयी जसे जागरूक असतात तसेच लहानपणापासून त्यांना स्वतःच्या सामाजिक जबाबदार्‍यांची जाणीव करून दिली पाहीजे.

जेव्हा लोक तसेच समाजातील सर्व संस्था, प्रणाली योग्य प्रकारे काम करत असतील तेव्हा,आपण बरे की आपले काम बरे हा विचार तितका वाईट नाही. पण भारताच्या दृष्टीने प्रत्येकाने विचार केला पाहीजे कि मी काही तरी नेहमीपेक्षा थोडे का होईना जास्त योगदान देऊ शकतो का?

प्रियाली's picture

4 Aug 2008 - 2:37 pm | प्रियाली

अग्रलेख कसा असावा याचे उत्तम उदाहरण! भाषा, विचार दोन्ही अत्यंत संयमित व प्रत्येकाला विचार करायला लावणारे.

नेटक्या शब्दांत, सहज ओघवत्या भाषेत मांडलेले संपादकीय फार आवडले.

नंदन's picture

4 Aug 2008 - 3:41 pm | नंदन

असेच म्हणतो, अग्रलेख आवडला.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

एकलव्य's picture

5 Aug 2008 - 8:30 am | एकलव्य

चित्राताई - लेख सुंदर उतरला आहे. विचार अगदी मनाच्या गाभार्‍यातून आल्यासारखे वाटतात. आपल्या हातून नक्कीच चांगले कार्य याआधीही घडले असणार आणि पुढेही घडेल याबद्दल माझ्या मनात बिल्कुल शंका नाही.

अस्वस्थ करणारा लेख लिहिल्याबद्दल मनापासून आभार.

(अंगठाबहाद्दर) एकलव्य

नेमके विचार, संयत, अभिनिवेश रहित भाषा आणि आटोपशीर मांडणी ह्यामुळे लेखन खुलून दिसले! (अजून दोनेक परिच्छेद जास्त नक्कीच भावले असते असे वाटते हे ही खरे).

लोकप्रतिनिधींना नावे ठेवून काही साध्य होणार नाही. ते आपल्यातूनच आलेले असतात. आपण व्यक्तिगत आयुष्यात कसेही वागायचे, भ्रष्टाचार करायचा आणि त्यांच्या नावाने खडे फोडायचे असे करुन कसे चालेल. तसे असल्याने मग 'तळे राखील तो पाणी चाखील' आणि त्यापुढे जाऊन 'जिसकी लाठी उसकी भैंस' अशी शिरजोरी अनुभवाला आली तर ऊर बडवण्यात अर्थ नाही!

आपल्या दिनदर्शिकेत न दिसणारे कितीतरी सामाजिक प्रश्न हे आज ना उद्या आपल्या उंबरठ्यापाशी आणि परवा घरात येणार आहेत ह्याचे भान ठेवणे गरजेचे आहे. आपण आपल्या दैनंदिन कामातून वेळात वेळ काढून थोडे का होईना समाजोपयोगी काम काय करु शकतो ह्याचा विचार होणे अत्यावश्यक आहे. 'मी एकट्याने करुन काय होणार'? ह्या पळवाटेचे दोर कापायलाच हवेत!

चतुरंग

गणा मास्तर's picture

4 Aug 2008 - 9:26 am | गणा मास्तर

उत्तम अग्रलेख.
आपण आपल्या दैनंदिन कामातून वेळात वेळ काढून थोडे का होईना समाजोपयोगी काम काय करु शकतो ह्याचा विचार होणे अत्यावश्यक आहे. 'मी एकट्याने करुन काय होणार'? ह्या पळवाटेचे दोर कापायलाच हवेत!
चतुरंगशी सहमत.
अवांतरः- पाहुणा संपादकांच्या खरडवहीचा दुवा अग्रलेखाबरोबर देता आल्यास संपादकांशी संपर्क साधने सोपे होइल

फटू's picture

4 Aug 2008 - 10:11 am | फटू

अतिशय संयत भाषेमुळे खुप छान झाला आहे लेख...
पुन्हा,
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Aug 2008 - 10:16 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ख-या अर्थाने वाचकांच्या विचाराला बांधणी करायला लावणारा वैचारिक लेख, त्या बद्दल प्रथम अभिनंदन !!!

महाराष्ट्रातील आणि देशातीलही सध्याच्या परिस्थितीचे खापर गल्लीतील दादांपासून दिल्लीतील ताईंपर्यंत सर्वांवर फोडून आपण स्वतः नामानिराळे होऊन बसेल.

खरंय, आपल्याला काय त्याचं आणि आपल्याकडून काहीच होऊ शकत नाही. अशा पडलेल्या मानसिकतेतून असे विचार येतात. त्याबरोबर आपण आपल्यावर कोणतीच जवाबदारी घ्यायची नाही अशी वृत्ती येते ती स्वत: सुरक्षीत आणि मजेत जगणारा एका वर्गाकडून आणि दुसरा वर्ग जो ज्याला कशाचाच विचार करायचा नाही.

प्रगत देशांतील लोक आपल्या हक्कांविषयी जसे जागरूक असतात तसेच लहानपणापासून त्यांना स्वतःच्या सामाजिक जबाबदार्‍यांची जाणीव करून दिली जाते.

हम्म, सामाजिक जवाबदारीचे धडे आणि महत्त्व शाळेपासून ते महाविद्यालयीन जीवनापर्यंत कधीच कळलेले नसते, ते जेव्हा कळते तेव्हा त्या वयात काही करता येत नाही, एखादा अपवाद सोडून द्या ! पण सामाजिक जवाबदारीचे भान आम्हाला नाहीच. कधीतरी चळवळीच्या माध्यमातून असे प्रयत्न केले जातात मात्र त्याकडेही आम्ही तटस्थेनेच पाहणे पसंत करतो, हा तटस्थेचा स्वभाव सोडला पाहिजे तरच सामाजिक जवाबदारीची जाणीव होईल.

आपल्या कुटुंबाच्या परिघापलिकडील काहीतरी काम दिवसाकाठी, महिन्याकाठी किंवा अगदी वर्षाकाठी एकदा तरी करावे हा निश्चय जरी प्रत्येकाने येत्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने केला तरी खूप काही साध्य होऊ शकेल. लोकमान्यांचे स्वराज्य थोडे तरी जवळ येईल.

गणेशोत्सव हा तर स्वतंत्र चर्चा विषय होऊ शकेल, मात्र कामाची सुरुवात झाली पाहिजे, कुटूंबाचा विचार सोडून कधीतरी सामाजिक कार्यासाठी आपल्या आयुष्यातला काही वेळ दिला पाहिजे याबद्दल पूर्णपणे सहमत. कदाचित सुशिक्षीतांकडून अजून समाजाच्या खूप अपेक्षा असतील, आणि मलाही वाटतं काही करण्याची संधी,वेळ, आणि थोडा पैसाही ज्यांना सामाजिक जवाबदारीचे भान आहे, असे नक्कीच करु शकतील आणि आपली सामाजिक जवाबदारी पेलू शकतात, तरच खरी सुराज्याची कल्पना अस्तित्वात येईल.

सामाजिक विचाराला गती देणा-या लेखाबद्दल पुन्हा एकदा संपादकाचे अभिनंदन !!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मुक्तसुनीत's picture

4 Aug 2008 - 11:04 am | मुक्तसुनीत

लेखाच्या दर्जाबद्दल , त्यात मांडलेल्या विचाराबद्दल १००% सहमती .....

मला नेहमी प्रश्न पडतो : हा जो एक बथ्थडपणा म्हणा, बधिरपणा म्हणा (अग्रलेखिका याचेच एक वर्णन "डोळे पिऊन दूध पिणार्‍या मांजराप्रमाणे" असे करते. ) , जो समाजपुरुषामधे आपल्याला दिसतो -त्याच्या बुलंद किल्ल्याला भोके पडायची कशी ? इतके प्रश्न आहेत , इतक्या क्षेत्रांत कामे होत असतात. यापैकी कशाकशाचाही स्पर्श होऊ न देता कोट्यावधींची आयुष्ये व्यतीत होत असतात. सुन्न वाटावे असे हे नैष्कर्म्य !

मागे एकदा असेच एका मित्राशी या विषयावर वाद झाला . त्याने जे उत्तर दिले ते एकदम निरुत्तर करणारे होते ! " का ? मी वेगळे काही का करावे ? टॅक्स भरतो ना मी ! एक पैसाही भारत सरकारचा चुकवत नाही मी !" मित्र सच्चेपणे बोलत होता ; आणि त्याच्या बोलण्याला हजार उत्तरे सुचत असली , तरी त्याच्या स्वतःपलिकडे कसलीही जबाबदारी नसण्याच्या प्रवृत्तीचा जो बथ्थडपणा होता त्याने मला चपराक मारल्यासारखे निरुत्तर केले खरे...

निरुत्तर करणारे प्रत्युत्तर नाही पण मला तरी हेच सांगावेसे वाटेल की,

जे काय चालू आहे व परिस्थीती आहे ती भावी पिढीला तशीच किंवा त्याहून चिघळलेली द्यायची का? व भावी पिढीने विचारले की तुम्ही काय केले तर काय उत्तर द्यायचे? टॅक्स नियमीत भरला - इतकेच?

सर्वगुणसंप्पन राष्ट्रनिर्माण, पुरोगामी समाज बनवण्यात आपल्या पिढीचे [पर्यायाने स्वताचे] काय योगदान? आहे ती / नको ती वाटणारी परिस्थीती बदलण्यासाठी नुस्ता टॅक्स भरणे पुरेसा आहे का अजुन काही केले पाहीजे? शेवटी रिझल्ट काय?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

4 Aug 2008 - 4:01 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

सर्वगुणसंप्पन राष्ट्रनिर्माण, पुरोगामी समाज बनवण्यात आपल्या पिढीचे [पर्यायाने स्वताचे] काय योगदान? आहे ती / नको ती वाटणारी परिस्थीती बदलण्यासाठी नुस्ता टॅक्स भरणे पुरेसा आहे का अजुन काही केले पाहीजे? शेवटी रिझल्ट काय?
सहमत.

तात्यांनी असे उत्तम अग्रलेख लिहिण्यास जागा दिली आहे आणि भडकमकर मास्तर, चित्राताई वगैरे वेळात वेळ काढून आपल्याला जबाबदारीची जाणीव करून देत आहेत. आता यातून पुढे काय असा मला प्रश्न पडला आहे.

धर्माधारित हिंसा, 'मला काय त्याचं?' या आणि असल्या विचारसरणीला विरोध करणारे आपण खूप आहोत इथे! पण पुढे काय ...

भडकमकर मास्तर's picture

4 Aug 2008 - 2:21 pm | भडकमकर मास्तर

संपादकीय खूप छान आहे...
विचार करायला लावणारे...
आपण काहीतरी केले पाहिजे, जिथे करणे शक्य होते तिथे खरंच मनापासून केले का असा प्रश्न स्वत:ला विचारायला लावणारा लेख...
का ? मी वेगळे काही का करावे ? टॅक्स भरतो ना मी
आम्हाला कॊलेजात शिकवणारे एक नामवंत, खूप श्रीमंत ,प्रचंड प्रॆक्टीस असलेले वगैरे एचओडी ज्यांच्याबद्दल असं सांगितलं जायचं की ते अत्यंत गरीबीतून शिकलेले , कॊलेजात अंगावर एकच शर्ट आणि पायजमा वगैरे.... एका दानशूर व्यक्तीने त्यांना एम्डीएस पीजी करायला मदत केली होती
हे स्वत: आम्हाला इंटर्नशिपमध्ये असे म्हणाले होते की " मी वेळच्यावेळी टॆक्स भरतो, मग समाजसेवा करणं सरकारचं काम आहे...मी का करावं?"
या माणसाने असं बोलावं हे मला फ़ार फ़ील झालं... त्यांना एकदम म्हणावंसं वाटलं, " तुम्हाला तुमच्या गॉडफ़ादरनं शिकायला मदत केली नसती तर आज हे बोलायला इथं उभं राहता आलं असतं का? तो माणूस काय टॅक्स भरत नसेल का ? " ( मला माझा विषय धडपणे सोडवायचा असल्याने हे अर्थात मी मनातल्या मनात बोललो.... पण त्या वाक्याने माझे भरपूर शिक्षण झाले.)

ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

विसोबा खेचर's picture

4 Aug 2008 - 12:22 pm | विसोबा खेचर

चित्राताई,

सर्वप्रथम, अग्रलेखाबद्दल मनापासून धन्यवाद. अग्रलेख मुद्देसूद व अतिशय उत्तम पद्धतीने मांडला आहे हे निर्विवाद. त्यातली कळकळही प्रकर्षाने जाणवली.

परंतु,

"आपण बरे की आपले काम बरे, आपल्याला काय त्याचे, कशाला वेळ घालवा नस्त्या गोष्टींत?" हा जणू आपल्याकडच्या पिढ्यापिढ्यांचा मंत्र झाला आहे. आणि घरातले लहानथोर अशा विचारांची प्रजा आणि पिढ्या तयार करण्यात हात लावण्यात मग्न आहेत. हे असे दृष्य प्रगत देशांत कमी दिसते. प्रगत देशांतील लोक आपल्या हक्कांविषयी जसे जागरूक असतात तसेच लहानपणापासून त्यांना स्वतःच्या सामाजिक जबाबदार्‍यांची जाणीव करून दिली जाते. आपण मात्र त्या डोळे मिटून दूध पिणार्‍या मांजरीप्रमाणे झालो आहोत.

हे तिकडे आरामात परदेशात बसून लिहिणं कितपत योग्य आहे? प्रगत देशाचं कौतुक करून आम्हा निवासी भारतीयांच्या मानसिकतेला नावं ठेवणं कितपत योग्य आहे हे सांगा बरं!

आणि एवढीच जर कळकळ असेल तर नुसतं परदेशात डॉलर कमवत, अत्यंत चैनीचं, निवासी भारतीयांच्या तुलनेत अत्यंत आरामदयी, सुखासीन आयुष्य न उपभोगता, आपल्या ज्ञानाचा उपयोग आपण थोड्या खस्ता खाऊन, गैरसोय पत्करून, चार पैसे कमी मिळवून आपण भारतातच का करत नाही? इथे उन्नत्ती व्हावी, लोकशिक्षण व्हावं असं मनापासून वाटतं ना? मग आपणही इथे येऊन प्रकाश आमट्यांसारखं ग्राऊंड लेव्हलला उतरून का काम करत नाही? तिथे आरामात बसून मारे प्रगत देशाचं कौतुक करत राहणं कितपत योग्य आहे?

कृपया वैयक्तिक घेऊ नका....

तात्या.

बेसनलाडू's picture

4 Aug 2008 - 12:53 pm | बेसनलाडू

संपादनः भूषण केळकर हे नेस्ट रिटर्न्ड इन्डिअन. सध्या अविनाश धर्माधिकार्‍यांच्या चाणक्य मंडळात काम करतात.
या पुस्तकात अगदी बाबा आमटे नाही; पण परदेशात राहून,शिक्षण घेऊन भारतात येऊन भारतात राहून भारतासाठी काम करणार्‍या वल्लींची मुलाखत/अनुभव वजा माहिती आहे. नक्की वाचावी.
(भारतीय)बेसनलाडू

अंमळ वेडझवा's picture

4 Aug 2008 - 6:54 pm | अंमळ वेडझवा (not verified)

आपुन तात्याशी सहमत हौ!

विकास's picture

4 Aug 2008 - 8:40 pm | विकास

सर्वप्रथम अग्रलेख आवडला आणि त्यातील मुद्यांशी सहमत.

आता तात्यांनी मांडलेल्या मुद्यांबद्दल मला व्यक्तिगत एक अनिवासी भारतीय म्हणून काय वाटते ते (हे व्यक्तिगत मत आहे, वैयक्तिक नाही आणि बचाव/डिफेन्स तर अजिबात नाही!)

आणि एवढीच जर कळकळ असेल तर नुसतं परदेशात डॉलर कमवत, अत्यंत चैनीचं, निवासी भारतीयांच्या तुलनेत अत्यंत आरामदयी, सुखासीन आयुष्य न उपभोगता, आपल्या ज्ञानाचा उपयोग आपण थोड्या खस्ता खाऊन, गैरसोय पत्करून, चार पैसे कमी मिळवून आपण भारतातच का करत नाही? इथे उन्नत्ती व्हावी, लोकशिक्षण व्हावं असं मनापासून वाटतं ना? मग आपणही इथे येऊन प्रकाश आमट्यांसारखं ग्राऊंड लेव्हलला उतरून का काम करत नाही? तिथे आरामात बसून मारे प्रगत देशाचं कौतुक करत राहणं कितपत योग्य आहे?

मलाही पुर्वी असेच वाटायचे... सर्व प्रथम सुख आणि आराम हे स्थलकालसापेक्ष असतात. इथे जितकी कामे स्वतःला करावी लागतात, "फॅमिली सपोर्ट" चा अभाव वगैरे पाहीले तर कदाचीत हे सुखासीन आयुष्य वाटणार नाही. आणि हो गाड्या आणि रस्ते काही महीन्यांपर्यंत मस्त होते. $४ / गॅलन जेंव्हा भाव झाला आणि दिवसाकाठी जेंव्हा सरासरी २५ एक मैल गाडी चालवावी लागते तेंव्हा त्यातील मजा पण कमी झाली... अर्थात हे काही साधे मुद्दे झाले...

आता परदेशस्थ भारतीयांसंदर्भात - मला राजीव गांधींचे (कधी नव्हे ते रुचलेले) एक वाक्य आठवते. त्यांना कुणीतरी ते पंतप्रधान असताना विचारले होते की भारतीय परदेशात जाउन रहाताता हा ब्रेन ड्रेन नाही का? तर त्याचे म्हणणे होते की ही आपली परदेशात असलेली ठेव/गुंतवणूक आहे. योग्य वेळेस कामी येईल. आणि हा विचार बरोबर ठरला!

विचार करा आज आय टी मुळे त्यातील पैशाचा आणि तंत्रज्ञानाचा फायदा इतक्या सुलभरीत्या आपल्याला झाला असता का? तीच गोष्ट अनेकदा इतर अनेक गोष्टींबद्दल असते - विशेष करून जेंव्हा "स्वतःला स्वतःच जगाचे पोलीस, ज्युरी आणि जज" समजणार्‍या अमरीकेत आपण असतो तेंव्हा. अशा अनेक गोष्टी आहेत ज्यात भारतीयांचे येथे संबंध तयार झाल्याने त्याचे अप्रत्यक्ष/प्रत्यक्ष फायदे भारताला पण होत असतात.

असे बरेच जण असतात की जे भारतात काम करू इच्छितात, अगदी कुठल्याच पैशाची अपेक्षा न करता मदतही करतात, पण बर्‍याचदा जो प्रतिसाद मिळतो, तो "पी हळ्द हो गोरी" अशी अपेक्षा ठेवणे तर कधी कधी हा कोण आम्हाला बाहेरून येऊन शहाणपण शिकवतोय ही वृत्ती. कधी कधी तात्पुरता उत्साह असतो आणि इथल्या लोकांनी कितीही पाठपुरावा केला तरी , "हो साहेब करतोय, नक्की करूया" असे म्हणायचे. थोडक्यात पोपट मरत नाही. त्यात राजकारणी , समाजसेवी संस्था, शैक्षणिक संस्था इत्यादी सर्व असतात. असो. हा मुद्दा लिहीण्याचा १००% नैतिक अधिकार मला आहे इतके याबाबत लिहीतो. :-) तरी देखील बर्‍याचदा भारतीय भारताला विसरत नाहीत आणि कुठेतरी काहीतरी करावे अशी भूक बाळगतात. त्यात जसे शक्य आहे तसे मदत करणे होते.

तिथे आरामात बसून मारे प्रगत देशाचं कौतुक करत राहणं कितपत योग्य आहे?

माझ्या नजरेतून एक गोष्ट सांगतो: कौतूक हे प्रगत देशाच्या प्रगतीचे नसते तर येथे पाहीलेल्या इथल्या सर्वसामान्य जनतेचे असते. ज्यांच्यामुळे हा देश प्रगत झाला आहे. आमच्या सारख्यांना इथल्या प्रगतीपेक्षा ती प्रगती आणि सिस्टीम तयार करणार्‍या येथील जनतेचे कौतुक वाटते.

काही वर्षांपुर्वी आमच्या बाजूच्या "र्‍होड आयलंड" या राज्यातील एका नाईटक्लब मधे आग चालू होण्याचे निमित्त झाले आणि चेंगराचेंगरीत १०० माणसे दगावली... त्या आगीला निमित्त असणार्‍यांना शिक्षा तर झालीच पण तात्काळ आमचे - शेजारच्या राज्यातील बिल्डींग कोड्स पण बदलले. का तर परत माणसे मरू नयेत म्हणून... काल नयनादेवी मंदीरात आपल्याकडे १४५ माणसे मेली - असा प्रकार कितव्यांदा झाला सांगा बरे? मांढरदेवीची यात्रा आठवते का? आणि आजतागायत आपण त्याच त्याच चुकांनी होणारी मनुष्यहानी कितीदा टाळायचा प्रयत्न केला? दोनएकशे वर्षांपूर्वी घरे नको इतकी जवळ जवळ असल्याने एकदा आगीत बरेचसे लंडन भस्मसात झाले. पण त्यातून बाहेर काय आले? तर अधुनिक नगररचना शास्त्र - टाऊन प्लॅनिंग...

रोज मरे त्याला कोण रडे म्हणणे म्हणजे 'स्पिरीट" होते का? चुका दुरूस्त करणे म्हणजे खरे "स्पिरीट" असते असे वाटत नाही का? आपण जेथे रहातो तेथील गोष्टींशी अशी कळत नकळत तुलना होते आणि फ्रस्ट्रेशन येते.

कृपया वरील प्रश्न वादाचा म्हणून घेऊ नका आणि तो फक्त निवासीच नाही तर अनिवासी भारतियांच्यापण मनोवृत्तीचा भाग आहे. आपल्या जनुकाचाच भाग असल्यासारखा प्रकार आहे. इतके असूनही तन-मन-धन देऊन यथाशक्ती बरेचसे अनिवासी भारतीय बरेच काही करत असतात, हा मात्र वैयक्तिक, व्यक्तिगत आणि इतर अनेकांना पाहून आलेला अनुभव आहे.

आमटे, बंग आणि इतर अनेक यांचे काम श्रेष्ठ नक्कीच आहे. पण असे (अमेरीकेतील)अनेक (भारतीय), इथे बसूनही जवळून माहीत आहेत की जे देशासाठी बरेच काही दूरदृष्टी ठेवून करत असतात. पण ते लिहीण्यासाठी हा प्रतिसाद आणि वेळ नाही. इतकेच तुर्तास म्हणतो.

तात्या,
अमेरिकेत किंवा इतर ठिकाणी राहून डालर कमावले जातात, ऐषाआरामात सगळे असते ह्या किती भ्रामक कल्पना आहेत हे इकडे आल्याशिवाय कळत नाही. 'जगी सर्व सूखी असा कोण आहे, विचारे मना तूच शोधून पाहे' ही समर्थ उक्ती सार्थ आहे! जगात सगळीकडे त्या त्या ठिकाणचे प्रश्न आहेतच त्यावर उत्तरे शोधणे हा उपाय असतो.
भारतीय माणसाने काही सांगितले की तो निवासी/अनिवासी हा प्रश्न का यावा? आम्ही श्रीलंका किंवा बांगलादेशात कशा सुधारणा व्हाव्यात ह्याबद्दल सांगत नाहीये भारताबद्दल सहाजिकच सांगणार कारण शेवटी मातृभूमी आहे. आपण आपल्या मुलाला रागावतो, नीट सवयी लावायला जातो अनोळखी मुलाला नाही!
जे चूक आहे, पुन्हा पुन्हा होऊनही सुधारत नाही ते सुधारण्यासाठी काय करावे ह्याची चर्चा फक्त देशात राहूनच होऊ शकते हा संकुचित विचार झाला असे वाटत नाही का?
हे आपले/ हे बाहेरचे ही दरी धोक्याची आहे, जे आत्ता बाहेरचे वाटताहेत तेही खरे आपलेच होते/आहेत्/असतील असे न होता सारखे हेटाळून त्यांना तोडणे हे बरोबर नाही. आणि जे आत आहेत ते आत राहूनच शेत खात असले तरी ते आत आहेत म्हणून भले हे ही बरोबर नाही.
हे मत सडेतोड वाटेल पण मनापासून वाटले ते लिहिले.

चतुरंग

नारायणी's picture

4 Aug 2008 - 9:32 pm | नारायणी

विकास आणि चतुरंग अगदि बरोबर बोलताय. अनिवासी भारतीय हा विषय फार मोठा आहे आणि चर्चेचा मुळ मुद्दाहि वेगळा असल्याने ,"सहमत" एवढचं सांगुन थांबते. :).

चित्रा's picture

4 Aug 2008 - 11:41 pm | चित्रा

तात्या,
प्रथम तुम्ही जे काही कळकळीने म्हणत आहात, ते कितीही कडवट वाटले तरी त्यातही तुमच्या दृष्टीने तथ्य आहे हे मी विसरत नाही. आम्हालाही बोच असते, ती अशा वेळी तीव्र होते.
पण इथे माझ्या वैयक्तिक आयुष्यावरून चर्चा नको, म्हणून काही तपशील मी देऊ शकणार नाही. बाकी अमेरिकेत आल्यानंतर दोन देशांच्या स्थितीबद्दल मनात तुलना होणे साहजिक आहे.

मी कोठेही राहत असले आणि वंशाने किंवा नागरिकत्वाने भारतीय असले तर साहजिकच भारतातही अशीच उत्तम व्यवस्था यावी असे वाटणे काही वाईट नाही, तुम्हीही त्याला तसे म्हणणार नाही. प्रश्न एवढाच आहे की मी भारतात येऊन हे का करीत नाही.

भारतात वयाची पंचवीस वर्षे मी राहत होतेच. मला आठवत नाही, मी हे आधी कधी लिहीले आहे किंवा नाही, पण द्विरूक्ती असली तरी, सांगते - त्यातली कळत्या वयातली काही वर्षे आमच्या कामाच्या बाईच्या मुलांना मी घरी विनामूल्य शिकवले. नंतर मला जेव्हा शिक्षणामुळे इतरत्र राहायला गेल्याने हे जमले नाही तेव्हा माझ्या तेव्हा ऐंशीच्या घरातील आजोबांनी ते काम उचलले. आज त्यातील मोठा मुलगा व्यावसायिक शिक्षण घेऊन व्यवस्थित कमावत आहे. फावल्या वेळी तबला वगैरे वाजवून स्वतःच्या हौशीही पूर्ण करतो आहे. त्याच्या आईवडिलांच्या रूटिनमधून तो सुटला याला कारण त्याचा आमच्या घराशी (माझ्याशीच केवळ नव्हे) असलेला थोडाफार संबंध आणि अर्थातच त्याची स्वतःची इच्छा. हे माझे किंवा माझ्या कुटुंबाचे शहाणपण म्हणून सांगत नाही, तुम्ही विचारलेत म्हणून, मी ग्राउंडलेव्हलला अगदी थोडे, नगण्य समजा, काम केले आहे म्हणून सांगते.

हे एक प्रकारचे "इंटरवेन्शन" ठरते. अनेकांना तेवढेच जरूरी असते, ते पुढचे सर्व आपले आपण करू शकतात, तेवढी त्यांच्यात हिंमत आणि समज असते. पण केवळ मला कष्ट नकोत, उगाच कटकटी नकोत म्हणून सोयिस्कर दुर्लक्ष केले जाते.

बाकी राहिला अमेरिकेत राहून उंटावरून शेळ्या हाकण्यागत भाग. सध्याचे म्हणाल तर माझ्यापुरते मी सांगते - मी गेल्या वर्षी नागरीकरण आणि सुविधा यावरून काय करता येईल याचा अभ्यास सुरू केला आहे. आता तुम्ही म्हणाल की अभ्यास का, डायरेक्ट उठून कामच का नाही? प्रश्न बरोबर आहे, पण नक्की काय करायचे ते कळणे यालाही महत्त्व माझ्या मते आहे. त्यादृष्टीने माझे प्रयत्न सुरू आहेत एवढेच सध्या सांगते.

अशाच कामातून झालेला नगण्य उपयोग सांगते - एक गरीब, मिरजेच्या भागातील कुटुंब पुण्यातील एका बांधकामाच्या साईटवरील बोअरवेलचे पाणी केवळ जवळ आहे म्हणून पीत होते. तेथेच शहराचा स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा नळ फार लांब नाही. पण बोअरवेलचे पाणी वरकरणी स्वच्छ दिसते आणि जवळच आहे म्हणून कुटुंबातील तान्ह्या मुलांपासून सर्वजण पीत असलेले पाहिले. नमुना घेऊन पाणी तपासले असता त्यात (अर्थातच) जंतू आणि इतरही अयोग्य घटक आढळले. त्या कुटुंबातील स्त्रीला ते कळवल्यानंतर तिने तिचा पाणी कुठून घेते त्याचा निर्णय बदलला, तो तिच्याकडून नमुन्यादाखल पाणी घेताना जी काही थोडी ओळख झाली आणि पुराव्यादाखल रिपोर्ट (तिला वाचता येत होता का नाही कोण जाणे) दाखवता आला त्यामुळे. अन्यथा तिने माझे ऐकले असतेच असे नाही आणि मी तिच्याशी बोलण्याचा संबंधही आला नसता.

वरील लेखात प्रगत देशांचे कौतुक करायचे म्हणून हे सांगितलेले नव्हते. पण प्रगत देशात जशी जबाबदारीची जाणीव ही लहानपणी करून दिली जाते तशी ती भारतात दिसत नाही, हे अमेरिकेत आल्यानंतरच कळले. त्याआधी राजकारण्यांना आणि शेजार्‍यांना त्यांच्या मागासलेपणावरून शिव्या देणे एवढेच काय ते आजूबाजूला चाललेले पाहिले होते. आपण जेव्हा पिढ्यानपिढ्यांवर तुम्ही जे करता आहात त्यामुळे काही बदलणार नाही, असे बोलून त्यांचा हिरमोड करतो, तेव्हा हे असेच अजूनही अनेक वर्षे चालू राहण्यास हातभार लावीत असतो. माझ्या ओळखीतील अतिशय चांगली, अतिशय सज्जन, प्रेमळ अशी कुटुंबे हे करताना मी पाहिली आहेत. अगदी माझ्याही कुटुंबातील व्यक्ती त्यातून वगळता येणार नाहीत.

आमटे जसे कार्य करतात, तसेच मी करू शकेन किंवा माझा पिंड तसा असेल असे नाही. मी माझ्या पिंडाप्रमाणे (आवडींप्रमाणे) काम करणे ही अपेक्षा आहे. पण तेही मी करत नसले, आणि माझे सुहृद माझा पाय ओढू लागले तर ते चुकीचे ठरते आहे हे सांगण्याचा हा प्रयत्न होता.

विसोबा खेचर's picture

5 Aug 2008 - 12:38 am | विसोबा खेचर

चित्राताई,

सविस्तर खुलाश्याबद्दल मनापासून धन्यवाद.

विकासराव व चतुरंग यांनाही मनोमन धन्यवाद. माझे पूर्ण समाधान अद्याप झालेले नाही, परंतु या विषयावर चर्चा पुन्हा केव्हातरी.

चित्राताई, अग्रलेखाबद्दल पुनश्च एकदा धन्यवाद. पुन्हा जरूर भासेल तेव्हा निश्चित हाक मारीन...

तात्या.

स्वाती दिनेश's picture

4 Aug 2008 - 12:25 pm | स्वाती दिनेश

चित्रा,
अग्रलेख आवडला,विचार करायला प्रवृत्त करणारा लेख!
स्वाती

टिळक मला अजूनही आठवतात ते 'सामाजिक असंतोषाचे जनक' म्हणून, आणि "मला काय त्याचे"? ही अगदीच विरुध्द वृत्ती...आणि ती वृत्ती सोयीस्कर असल्यामुळेच कदाचित सगळीकडे दिसून येते...तशा आपल्याला बर्‍याच गोष्टी बदलाव्या अशा वाटतात, पण आपण त्या बदलासाठी काही करू का हा प्रश्न स्वतःलाच विचारावा...फार कशाला, जर दुसरा कोणी असे काही करत आसेल, तर फुकट हिरोगीरी करतोय किंवा अशाच शब्दात त्याची संभावना होते.

'मला काय त्याचे' ही वृत्ती सोडून जर एखादा अशा लष्कराच्या भाकर्‍या भाजत असेल तर किती लोक त्याला साथ देतात. माझेच उदाहरण सांगतो -- नो-एन्ट्री मधून येतांना एका टेंपोवाल्याला खडसावले, तर तो माझ्यावरच उलटा डाफरायला लागला -- "तू पोलीस आहेस का? जा मुकाट्याने, शाणपणा करू नको?" -- आणि बाकीचे मख्ख!!! चार लोकांनी आवाज केला असता तर तो टेंपोवाला बरोबर मागे गेला असता, पण....आता पोलीस ह्या सतत वाढणार्‍या ट्रॅफिकला कुठे, कुठे पुरे पडणार? आणि जर एखाद्याने आवाज उठवला तर त्याला बाकिचे मुर्खात काढतात... मी स्वतःच कित्येक वेळा 'व्हिसल ब्लोअर' होऊन वैतगलोय! त्यामुळेच कधी-कधी 'मला काय त्याचे?' चा राग आला तरी त्यामागची हतबल अगतिकता समजते, पटते.

फार कशाला, ते रेल्वेच्या सीटचे उदाहरण आठवतेय? इथेच 'फक्त योग्य ऍथोरिटी कडून ऐकून घेईन/शिक्षा भोगीन' असे म्हटलेच होते की? म्हणजे फक्त शिक्षेचा धाक असला की आम्ही नीट वागणार का? स्वयंशिस्त नाहीच का? वर कायदा मोडून दुसर्‍यावर अरेरावी - का तर म्हणे त्याला कायद्याची अंमबजावणीचा अधिकार नाही म्हणून! वा रे वा!

टिळकांचे यश आणि मोठेपण ह्यात -- की हा असंतोष वैयक्तिक न रहाता त्यांनी त्याचे रुपांतर सामाजिक असंतोषात केले, आणि त्यालाच चळवळीचे रूप प्राप्त झाले आणि क्रांती होऊ शकली.

जाता, जाता काही प्रेरणादायक उदाहरणेही आहेत. जशी जेसिका लाल मर्डर केस; ही मिडिया आणि पब्लिक प्रेशर मुळेच तडीस गेली. एक माझ्या पहाण्यात्ले छोटे पण प्रभावी उदाहरण -- पुण्यात टिळक रोड ला (नावात टिळक असल्यामुळे असेल कदाचित! ;)) एका लहान मुलीचा एका जड वाहनाने मृत्यू झाला -- त्या रस्त्यावर जड वाहनांना बंदी आहे; त्यानंतर थोडी खळबळ होऊन सगळी शांतता....पण तिथल्या लोकांचे वैशिष्ट्य असे की त्यानंतर कित्येक वर्ष (आताचे माहित नाही) ते लोक कुठ्लेही जड वाहन आल्यास १५-२० जण स्वतः रस्त्यावर येऊन त्यला बस्/ट्रकला अडवून परत जायला लावत. १५-२० जणांच्या जमावासमोर ड्रायव्हरला मुकाट्याने माघार घ्यायला लागायची. हे कित्येक वेळा मी स्वतः पाहिले आहे. अर्थात ह्या कृतीची, 'पुणेरी, सदाशिव पेठी लोकांना काम नसतात, फुकटचे उद्योग करतात...' अशी निंदा होतच होती. (अशा एकाला मी - 'तुझ्या मुलीचे डोके अशाच एखाद्या बसखाली चिरडायला हवे, मग कदाचित तुला त्यांच्या फुकटच्या उद्योगांचे महत्त्व कळेल' असे ऐकवले होते.) त्यापुठेही जाऊन, एका वाहतूक संघटनेने 'ही लोक कायदा हातात घेतात' अशी तक्रार नोंदवली होती म्हणे (म्हणजे ते कायदा तोडतात त्याचे काहिच नाही, पण त्यांना अडवायचे नाही! कदाचित त्यांचाही 'योग्य ऍथोरिटीकडून....' वगैरे विचारसरणी असावी) असो!

चित्रा, एका संयत आणि सुरेख लेखाबद्द्ल धन्यवाद आणि अभिनंदन! मला वाटते, निदान स्वतःहून 'मला काय त्याचे' ही वृत्ती सोडून काही वेगळे करता येत नसेल तर निदान जो करतो त्याला जशी जमेल तशी साथ तरी द्यावी. अरे, ३-४ जण जर एकदम भांडायला आले तर रिक्षावालासुध्दा ऐकतो, बाकिच्यांचे काय घेऊन बसलात? ;)

प्रकाश घाटपांडे's picture

4 Aug 2008 - 2:42 pm | प्रकाश घाटपांडे


मी स्वतःच कित्येक वेळा 'व्हिसल ब्लोअर' होऊन वैतगलोय! त्यामुळेच कधी-कधी 'मला काय त्याचे?' चा राग आला तरी त्यामागची हतबल अगतिकता समजते, पटते.


प्रबोधन व शासन ही गोष्ट लिडींग व लॅगिंग पद्धतीने कार्यरत केली तर काही तरी भरीव होण्याची शक्यता आहे. मला काय त्याचे? ही हतबलतेतुन आलेली कृती आहे. मध्यमवर्गीयांच्या निष्क्रियतेवर वैचारिक हल्ले हे होतात ते ही हतबलतेतुन. दुर्जनांच्या हल्ल्यांपेक्षा सज्जनांचे मौन अधिक घातक असते किंवा अन्याय सहन करणाराही तितकाच गुन्हेगार असतो वगैरे विधाने ही हस्तिदंती मनोर्‍यातुन समाज हाकणार्‍या मानसिकतेतुन येतात.डोंबिवली फास्ट हा चित्रपट त्याच मानसिकतेतुन होणार्‍या घुसमटीतुन निर्माण झालेला अविष्कार आहे. यशस्वी झाला तर मोडेन पण वाकणार नाही आणी अयशस्वी झाला कि महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे वाचती ही उदाहरणे पोस्टमार्टेम च्या सोयिसाठी घेतली जातात. प्रबोधनाचा फुगा फुगवणारे अनेक असतील तरी त्याला टाचणी लावणारा एकच आहे त्याचे उपद्रवमुल्य जोपर्यंत दुर होत नाही तोपर्यंत फुगा फुगवण्याचे कष्ट व्यर्थ आहेत.आपण आपले काम करत रहावे ही केवळ मनाची समजुत घातल्यासारखे आहे.
अज्ञानातुन निर्माण झालेल्या अंधश्रद्धा या ज्ञान देउन दुर होतील ही पण ज्या अगतिकतेतुन निर्माण झाल्यात त्याचे काय? त्याची पाळेमुळे समाजव्यवस्थेत आहेत.
थोडक्यात अंधश्रद्ध माणसाची जशी किव करुन चालणार नाही त्याला क्रोधापेक्षा करुणेची गरज आहे. मला काय त्याचे ? पण असेच आहे.
प्रकाश घाटपांडे

वैशाली हसमनीस's picture

4 Aug 2008 - 1:02 pm | वैशाली हसमनीस

विसोबा खेचरराव,
आपले वरील म्हणणे तंतोतंत पटले.मलाही तेच म्हणावयाचे आहे.भारतात राहून काम करणे,खरोखरच अवघड आहे.सर्किटराव म्हणतात तसे सर्वांनाच नेता बनणेही शक्य नसते.जे थोडे काही करण्याची तयारी असते त्यावरही अनेक दडपणे येऊ शकतात.अमेरिकेत बसून टीका करणे सोपे आहे.तुमच्या मताशी मी सहमत!

विसुनाना's picture

4 Aug 2008 - 2:04 pm | विसुनाना

इतक्या सौम्य शब्दात इतके मूलगामी विचार मांडल्याबद्दल संपादिकेचे अभिनंदन करावे की ठार बहिर्‍या झालेल्या मनावर अशा लेखांचा काहीच परिणाम होणार नाही ही जाणीव असल्याने याहून जळजळीत शब्दांची अपेक्षा करावी?

हा विषय गेले काही दिवस मनात ठाण मांडून बसला होता. त्याला वाचा फोडण्याचे कार्य झाले हेही नसे थोडके.
पण परतण्याच्या बिंदूच्याही पुढे भारत पोचला आहे अशी दुष्ट शंका भेडसावते.

भारतातील लोकसंख्येच्या अतिरेकामुळे म्हणा किंवा मूलभूत / अंगभूत कातडीबचाऊपणामुळे म्हणा आपल्याला कशाचेही काहीच सोयरसुतक वाटेनासे झाले आहे. गेंड्याची कातडी / संवेदनाहीनता वगैरे.
"आपण काय करणार?","ज्याचे जळते त्यालाच कळते", " आले देवाजीच्या मना...", "जीवनाचा काय भरवसा?" असे उद्गार ऐकू येतात त्यावेळी "हे टाळता आले असते" ही जाणीवच आता लोकांना होत नाही की काय असे वाटते.
भारतीय शामळू जनमानसाचा सुप्रसिद्ध उद्गार,"चालायचंच!"आता घराघराचा घास घेत आहे. याचे वैषम्य वाटण्याऐवजी "आमचे स्पिरीट किती ग्रेट!" असे म्हणून स्वतःची पाठ थोपटण्याचा निर्लज्जपणा आपण करत आहोत. हा निर्ढावलेपणा भारतातल्या जनतेच्या जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टीकोनातच उथळपणा आला आहे हेच सिद्ध करतो.

केशवसुमार's picture

4 Aug 2008 - 2:53 pm | केशवसुमार

चित्राताई,
संयत,मुद्देसुद,अग्रलेख आवडला,
विचार करायला प्रवृत्त करणारा लेख! अभिनंदन..
शिवाजी जन्माला यावा पण शेजार्‍याच्या घरी.. मला कसला ही त्रास होता कामा नये.. ही सामाजिक मानसिकता बदलणे खूप गरजे चे आहे..
(व्यथित)केशवसुमार

II राजे II's picture

4 Aug 2008 - 3:50 pm | II राजे II (not verified)

अतिशय भावला अग्रलेख.

राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!

ऋषिकेश's picture

4 Aug 2008 - 9:23 pm | ऋषिकेश

अग्रलेख अतिशय आवडला.. विचार प्रवर्तक लेख.. खुप मस्त चित्राताई. विचारांशी पूर्ण सहमत.

आपण फक्त भारतापासून केवळ अंतराने दूर आहात... इथल्या प्रश्नांची जाण असण्यात कुठेही कमतरता नाहि याची पुरेपुर जाणीव झाली.

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

विश्वजीत's picture

4 Aug 2008 - 9:40 pm | विश्वजीत

एका चांगल्या लेखाची चर्चा 'निवासी विरूद्ध अनिवासी भारतीय मानसिकता' इकडेच गेली तर. असो.

चतुरंग's picture

4 Aug 2008 - 9:43 pm | चतुरंग

तसं नाहीये, पण दुखर्‍या नसेला धक्का लावला गेला तर कळ येतेच! असो ती चर्चा इथेच बंद करण्यात शहाणपण आहे.

चतुरंग

चित्रा's picture

4 Aug 2008 - 11:59 pm | चित्रा

तात्यांनी इथे लिहीण्याची संधी दिल्याबद्दल त्यांचे आणि कौतुकाच्या शब्दांबद्दल, आणि प्रतिक्रियांबद्दल मिपाकरांचे अनेक आभार!

स्वप्निल..'s picture

5 Aug 2008 - 12:03 am | स्वप्निल..

चित्रा ताई,

अतिशय सुंदर लेख..खुप आवडला!

"आपण बरे की आपले काम बरे, आपल्याला काय त्याचे, कशाला वेळ घालवा नस्त्या गोष्टींत?" हा जणू आपल्याकडच्या पिढ्यापिढ्यांचा मंत्र झाला आहे. आणि घरातले लहानथोर अशा विचारांची प्रजा आणि पिढ्या तयार करण्यात हात लावण्यात मग्न आहेत.

हे एकदम मान्य. यामुळेच आपल्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते असे वाटते.

स्वप्निल

धनंजय's picture

5 Aug 2008 - 12:36 am | धनंजय

मला हे विचार आवडले.

केवळ दूरदेशात बसून मायभूमीबद्दल गाळलेली आसवे नव्हेत. हाच विचार आपापल्या ठिकाणीसुद्धा करावाच ना. अमेरिकेत, दुसर्‍या कुठल्या देशातही, कितीतरी वैषम्ये आहेत, आणि तिथेही "आपल्याला त्याचे काय" म्हणणारे लोक आहे. हा लेख त्यांनाही तितकाच लागू आहे.

आहो मुंबईला गेला, मुंबईकर झाला, तरी चाकरमानी कोकणातल्या गावाबद्दल आतडे तोडून बोलेलच ना! मग तो मुंबईत ऐश-आराम करत असो नसो - तिथेही झटेल, आणि गावाबद्दलही बोलेल.

मिसळपावावर ३/४ लोक भारतातली आहेत, आपुलकीने इथे भारताबद्दल कथा केल्या जातील. मिपा पूर्व-अमेरिका-किनारा कट्ट्यावर तसे भाष्य अमेरिकेबद्दल केले जाईल. हे योग्यच नव्हे का? मागे सर्किट यांनी अमेरिकेतील वंशद्वेष आणि त्याचे निराकरण याबाबत चर्चा सुरू केली होती. त्यावेळी अनेकांना तो विषय मिसळपावावर अप्रस्तुत वाटला होता.

या संपादकीयाचा दृष्टिकोन व्यापक आहे, जगात कुठेही लागू आहे. बहुतेक मिसळप्रेमींच्या रोज-आयुष्याशी गुंतत-गुंतत मराठी दाखले दिलेले आहेत. मराठी-टिळकांचे, आणि मराठी-आमटे दांपत्याचे दाखले दिले आहेत, ते पटण्यासारखेच आहेत. इंग्रजीत आपल्या गल्लीतील प्रियजनांसाठी लेख लिहायचा असेल, तर लेखिकेने अमेरिकेतील इतिहासपुरुषांचे आणि स्त्रियांचे दाखले दिले असते, असे मला वाटते. गल्लीत चाललेल्या अपप्रकारांकडे लक्ष वेधले असते, असे मला वाटते. (पण मिसळपावावर तसे केल्यास असंदर्भ वाटले असते.)

स्तंभलेखिका असा दुरून सल्ला केवळ भारतातील मित्रमैत्रिणींना देत नाही आहेत. अमेरिकेतील (अन्य देशांतील) मित्र-मैत्रिणींनीही, अमेरिकेतही (किंवा जिथे कुठे असू तिथे), आचरणात आणण्यासारखा विचार आहे हा.

कोलबेर's picture

5 Aug 2008 - 12:47 am | कोलबेर

अग्रलेख आवडला. धनंजयने म्हंटल्या प्रमाणे लेखातील विचार वैश्विक आहेत. अनिवासी भारतीय वि. निवासी भारतीय हा (चोथा झालेला) वाद इथे अप्रस्तुत वाटला.