मिपा संपादकीय - आपल्याला काय त्याचे?
विशेष
मिपा व्यवस्थापन 'मिपा संपादकीय' हे सदर लोकमान्य टिळक यांच्या पवित्र स्मृतीस समर्पित करत आहे. यापूर्वीचे संपादकीय लेखन येथे वाचायला मिळेल! धन्यवाद...
आपल्याला काय त्याचे?
नेहमीप्रमाणे १ ऑगस्टला लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने शाळा-कॉलेजांमधून त्यांच्या फोटोंना हार चढवले गेले असतील, व्याख्याने-निबंधस्पर्धा झाल्या असतील. यात नेहमीप्रमाणे टिळकांचे केसरीमधील "सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?" असे अग्रलेखाचे घणाघाती मथळे, मंडाले येथे भोगलेली कैद, लहानपणी घडलेला फोलपटांचा प्रसंग किंवा तरूण वयात शरीर सुदृढ करण्यासाठी केलेले प्रयत्न यांची उजळणी होईल. ही मुले मोठी होतील तेव्हा त्यांना टिळकांबद्दल नक्की काय आठवेल हे विचार करण्यासारखे आहे. लोकमान्यांनी आपल्याला काय दिले असा प्रश्न आजच्या महाराष्ट्रातील सज्ञान लोकांना विचारला तर " स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच" ह्या वाक्याने दिलेला "स्वराज्य" हा शब्द आणि सार्वजनिक गणेशोत्सव असे बहुतेकांचे उत्तर येईल. पुढे स्वराज्य म्हणजे काय असे विचारले तर "स्वत:चे राज्य" अशा शाब्दिक अर्थापलिकडे बहुतेकांची मजल जाणार नाही. आणि टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या काळात होणारे ध्वनिप्रदूषण; उंच, रंगीबेरंगी गणेशमूर्तींच्या आणि निर्माल्याच्या विसर्जनाने गाळ साचून बिघडलेले तलाव, नद्या आणि समुद्राचे पाणी; बिभत्स अंगविक्षेप करीत केलेली गणपतीची पाठवणी; हे पाहता सार्वजनिक गणेशोत्सव सध्याच्या काळात बंद पाडले तर काही राजकिय पक्ष वगळता बहुतेक सर्व जनता धन्यवादच देईल असे वाटते. पण असे करूनही आपले प्रश्न गणेशोत्सवापुरतेच सुटतील हे या लोकांच्या सहजी लक्षात येणार नाही. हिमनगाचा जसा केवळ वरचाच भाग दिसतो, पाण्याखाली तो किती प्रचंड आहे हे जसे लक्षात येत नाही तसे महाराष्ट्राचे इतकेच काय देशाचेही प्रश्न हे टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या समाप्तीनंतरही राहणार आहेत हे ध्यानी ठेवण्यासारखे आहे.
यंदा गणपतीच्या आधी नेहमीप्रमाणे पाऊस झालेला नाही, असे महाराष्ट्रातील चित्र आहे. तशातच पाणी पुरवठ्याच्या बारगळलेल्या योजना, शहरी भागात चाललेली राहण्याच्या जागा तयार करण्यासाठी चाललेली नद्यानाल्यांची बेसुमार कत्तल, विदर्भातील शेतकर्यांच्या आत्महत्यांचे जुने प्रश्न, पावसाअभावी वाळून जाणारी पिके, अन्नधान्यांच्या वाढत्या किंमती, दुसरीकडे वाढती गुन्हेगारी, रोगराई अशी बेसुमार संकटे आज महाराष्ट्राच्या आणि देशभरच्या जनतेला भेडसावत असताना आजही एका बाजूला समाजातील मोठा शिक्षित वर्ग राजकारण्यांच्या नावाने बोटे मोडण्यापलिकडे काही करताना दिसत नाही. जे काही राजकिय पक्ष आहेत ते क्षणिक स्वार्थासाठी लोकहितासाठी घेतलेले कठोर निर्णय फिरवण्यात धन्यता मानत आहेत. गेल्याच आठवड्यातील मुंबईत शिवसेनेने पाणी पुरवठा तलाव भरेपर्यंत कपात केली ती रद्द करण्यासाठी दबाव आणण्यात धन्यता मानली हे याचे एक उदाहरण. शिवसेनेला नावे ठेवली म्हणून इतर राजकिय पक्ष जे करतात ते सर्व निस्वार्थीपणे असते आणि क्षणिक फायद्यासाठी नसते, असेही समजण्याची गरज नाही. सर्व एकाच माळेचे मणी आहेत. याचे मुख्य कारण आपण विसरतो, की लोकशाहीत लोकप्रतिनिधी मग ते कोणत्याही पक्षाचे का असेनात, ते जनतेतूनच आले असतात. एका अर्थाने संपूर्ण समाज कसा आहे याचा तो एक सारांशच असतो. लोकप्रतिनिधी स्वार्थी, भ्रष्टाचारी, आणि जनतेची फिकीर नसलेले असतात असे म्हटले तर समाजातील बहुसंख्य घटक हेही दुर्गुणी असावेत असे म्हणणे भाग पडते.
लोकमान्यांच्या मृत्युनंतर लिहीलेल्या अग्रलेखात म. गांधींनी म्हटले आहे की टिळकांचा लोकशाही आणि बहुमताच्या राजकारणावर इतका विश्वास होता, की गांधींना त्या विश्वासाची भीती वाटत असे. "He was a born democrat. He believed in the rule of majority with an intensity that fairly frightened me". (संदर्भ : http://www.mkgandhi.org/Selected%20Letters/gandhi-tilakcorr.htm) एका मोट्या माणसाने दुसर्या मोठ्या माणसाच्या विचारांचे केलेले हे मूल्यमापन आहे. टिळकांना त्यांच्या स्वराज्य ह्या संकल्पनेमध्ये जी लोकशाही अभिप्रेत असावी, ती एकमेकांना नियंत्रित करणारे शासन, न्याय, अशा स्तंभांवर आधारित असावी. स्वतंत्र भारतातील लोकशाही ही भविष्यात डोळे मिटून दूध पीत बसलेल्या मांजराप्रमाणे असलेल्या लोकांच्या हातातील बाहुले बनेल हे त्यांच्या लक्षात आले नसावे. गंमत अशी आहे की आजच्या घडीला कोणालाही विचारले की हे लोक नक्की कोण आहेत, तर प्रत्येकजण दुसर्याकडे बोट दाखवील, आणि महाराष्ट्रातील आणि देशातीलही सध्याच्या परिस्थितीचे खापर गल्लीतील दादांपासून दिल्लीतील ताईंपर्यंत सर्वांवर फोडून आपण स्वतः नामानिराळे होऊन बसेल.
आज भारतीय लोकशाहीतील सुशिक्षित वर्ग, ज्याने समाजाला दिशा दिली पाहिजे अशी अपेक्षा असते तोच वर्ग, मोठ्या संख्येने, स्वतःच्या व्यक्तीगत आयुष्यात गर्क होऊन आजूबाजूला काय घडते आहे त्याकडे सोयिस्कर दुर्लक्ष करीत बसलेला दिसतो आहे. हाच वर्ग गणेशोत्सवात जेव्हा मोठ्याने गाणी लावली जातात तेव्हा कानावर हात घेऊन बोटे मोडीत राहतो. लोकप्रतिनिधींशी बोलून काही होणार नाही असा समज करून घेऊन, निवडणुकीत मते न देण्याचे समर्थन करतो, किंवा आजूबाजूच्या स्थितीकडे पाहून नाके मुरडताना त्या स्थितीत आपण आपल्या प्रयत्नांनी नक्की काय सुधारणा करू शकतो याचा विचारही न करता स्वतःच्या स्वार्थासाठी आणि स्वार्थासाठीच केवळ, झटत राहतो. "आपण बरे की आपले काम बरे, आपल्याला काय त्याचे, कशाला वेळ घालवा नस्त्या गोष्टींत?" हा जणू आपल्याकडच्या पिढ्यापिढ्यांचा मंत्र झाला आहे. आणि घरातले लहानथोर अशा विचारांची प्रजा आणि पिढ्या तयार करण्यात हात लावण्यात मग्न आहेत. हे असे दृष्य प्रगत देशांत कमी दिसते. प्रगत देशांतील लोक आपल्या हक्कांविषयी जसे जागरूक असतात तसेच लहानपणापासून त्यांना स्वतःच्या सामाजिक जबाबदार्यांची जाणीव करून दिली जाते. आपण मात्र त्या डोळे मिटून दूध पिणार्या मांजरीप्रमाणे झालो आहोत. आपल्याबद्दलचे लोकांचे मत काय आहे ह्याची जाणीव करून घ्यावी अशी इच्छाही आपल्याला होत नाही आणि पुढे काय संकट वाढून ठेवले आहे त्याची जाणीवही होत नाही. भारतातील कामे अनेकदा सामाजिक तसेच राजकीय इच्छेअभावी अर्धवट पडतात किंवा धुळीला मिळतात. दुसरीकडे अशी ही इच्छा तयार करण्याचे प्रयत्न होताना दिसत नाहीत, आणि नैराश्याने सर्वांना ग्रासले आहे हा सध्याच्या परिस्थितीतला मोठा अडसर होऊन बसला आहे.
असे असले तरी अंधारात चाचपडत असलेल्या अनेक जणांना प्रकाश दिसावा असेही काही आजूबाजूला घडते आहेच ही सुखद जाणीव आहे. बरेचदा असे लक्षात येते की कुठचीही मोठी दिसणारी कामे एकेकट्या व्यक्तीनेच सुरू केलेली असतात. बाबा आमट्यांनी विदर्भात सुरू केलेले महारोग्यांच्या संबंधीचे काम असेच नदीच्या उगमाकडील धारेप्रमाणे सुरू झाले असावे. पण आज ते त्यांच्या पुढच्या पिढीच्या सहभागाने वाढत पुढे चालले आहे हे गेल्याच आठवड्यात प्रकाश आणि मंदाकिनी या दाम्पत्याला मिळालेल्या मॅगसेसे पारितोषिकाने पुन्हा एकदा नजरेस आणून दिलेलेच आहे.
"यस्तु सर्वाणि भूतानि आत्मन्येवानुपश्यति | सर्वभूतेषु चात्मानं ततो न विजुगुप्सते|| ह्या इशावास्योपनिषदातील अध्यायाप्रमाणे सर्व शक्तींचे मूळ एकच समजून जो वागतो, तो कशालाही आणि कोणालाही कंटाळत नाही. असे न कंटाळता, व्यक्तीगत आवडीनिवडीप्रमाणे आपल्या कुटुंबाच्या परिघापलिकडील काहीतरी काम दिवसाकाठी, महिन्याकाठी किंवा अगदी वर्षाकाठी एकदा तरी करावे हा निश्चय जरी प्रत्येकाने येत्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने केला तरी खूप काही साध्य होऊ शकेल. लोकमान्यांचे स्वराज्य थोडे तरी जवळ येईल.
पाहुणी संपादक : चित्रा.
वाचन
12325
प्रतिक्रिया
43
छान
सुंदर अग्रलेख..
सुंदर लेख
संपूर्ण सहमत
अगदी हेच
सुंदर !
लोकांचा मार
अतिशय
जसे लोक तसे त्यांचे देव.
उत्तम अग्रलेख
सहमत आहे
+१
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
अगदी हेच!
सुंदर अग्रलेखाबद्दल चित्राताईंचे अभिनंदन!
उत्तम अग्रलेख
छान अग्रलेख !!!
विचार करायला लावणारा अग्रलेख
समष्टीकरता ...
निरुत्तर - हे पुरेसे आहे का?
सहमत
संपादकीय
चित्राताई,
नेस्ट रिटर्निंग इन्डिअन्स
आपुन
(अ)निवासी
विकास तुझ्या मताशी सहमत आहे.
सहमत.
आरामात राहून
धन्यवाद..
अग्रलेख!
टिळक आणि 'मला काय त्याचे'?
सुंदर प्रतिक्रिया
प्रतिक्रिया
सोयरसुतक
वा!!
अतिशय
सुंदर!
अरेरे!
विश्वजित,
आभार
अतिशय सुंदर लेख..
सर्वत्र लागू विचार
अग्रलेख