सर्व मापबाप मिपाकरांच्या शुभेच्छांमुळे व आशीर्वादामुळे पाहुण्या संपादकाने लिहिलेल्या मिपाच्या साप्ताहिक संपादकीय सदराचा शुभारंभ करण्यास मिपाला अत्यंत आनंद होत आहे. मिपा व्यवस्थापन हा उपक्रम लोकमान्य टिळक यांच्या पवित्र स्मृतीस समर्पित करत आहे. धन्यवाद...
अरे एनारायेनाराय !
जून महिना संपत आला की अमेरिकेत वारे वाहू लागतात राष्ट्रीय सुटीचे - अमेरिकेच्या स्वातंत्र्यदिनाचे. शहराशहरांमधून अमेरिकेचा राष्ट्रध्वज घरांवर , सरकारी कार्यालयांवर , नगरातील सार्वजनिक स्थळांवरील ध्वजाच्या खांबांवर फडकायला सुरवात होते. दुकानादुकानातून , "मॉल्स्"मधून झेंडे आणि इतर राष्ट्रप्रेमाची प्रतिके विकायला निघतात. फटाके विकणारे तात्पुरते गाळे उघडतात. आपल्या देशाचा जन्मदिन साजरा करण्याच्या या वातावरणात प्रत्येक अमेरिकन या ना त्या कारणाने - प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रीतीने - काहीनाही , तर सुटीचा उपभोग घेऊन तरी - सामील होतोच. ज्या भूमीमधे माझी नि माझ्यासारख्या , जन्माने भारतीय असणार्या लक्षावधींची छोटीमोठी कारकीर्द घडते आहे, घडली आहे त्या देशाच्या आयुष्यातील एका महत्त्वाच्या दिवसानिमित्त , एका स्थलांतरिताच्या मनातले हे थोडेसे विचार.
ज्यांची वर्गवारी एनाराय म्हणून केली जाते त्या व्यक्तींच्या समूहाला मखरात बसवण्याचा , किंवा त्याच्यावर कठोर प्रहार करण्याचा या लिखाणाचा उद्देश नव्हे. किंवा त्या समूहाच्या प्रश्नांना कुरवाळत बसण्याकरता , त्यांचे प्रश्न इतरांच्या प्रश्नापेक्षा कसे महत्त्वाचे आहेत हे प्रच्छन्नपणे सुचविण्याकरतादेखील - म्हणजे पर्यायाने स्वतःभवती आरत्या ओवाळण्याकरता - हे लिहीलेले नाही. मला माझ्या आयुष्यातून , माझ्या आजूबाजूला असणार्या परिस्थितीतून जे दिसते, जे प्रश्न पडतात , आणि जी काही मोजकी उत्तरे मिळालेली आहेत त्यांचा हा थोडासा वेडावाकडासा उहापोह.
"मी कोण ?"
लहानपणी अनेक उखाणे आजी ऐकवायची. त्यातल्या एका प्रकारचा उखाणा असायचा " मी कोण" ? " गडगड जातो, गाडा नव्हे. सरसर जातो , साप नव्हे. गळ्यात जानवे, ब्राह्मण नव्हे. मग मी कोण ?" असा त्यातला एक उखाणा. स्वत:च्या ओळखीबद्दल विचार करता , परदेशस्थ स्थलांतरितांची अवस्था , अशी , न सुटलेल्या उखाण्यासारखी झाली तर नवल ते काय ? "डॉलर कमावतो, अमेरिकन नव्हे, इंडीयावर प्रेम करतो, इंडीयन नव्हे, साहित्य संमेलन भरवतो , महाराष्ट्रीय नव्हे , तर मी कोण !" असा तो उखाणा बनतो. अमेरिकेचे नागरिकत्व स्वीकारण्याची माझी वेळ अजून काही आली नाही. परंतु ऐकीव माहितीवर आधारित जे कळले ते असे की, नागरिकत्वाच्या प्रक्रियेमधे अशी एक पायरी येते जिथे तुम्हाला अशा अर्थाच प्रश्न विचारलेला असतो : उद्या समजा , अमेरिकेचे आणि तुमच्या मातृभूमी असणार्या देशाचे युद्ध झाले, तर तुमची सहानुभूती, तुमची एकूण प्रतिक्रिया कुणाच्या पक्षाला फायदेशीर ठरेल अशी असेआहे.भारताच्या संदर्भात प्रश्न खूप काल्पनिक परिस्थितीबद्दलचा आहे. एकूण जगाच्या राजकारणाची परिस्थिती पहाता असे होणे दुरापास्त आहे खरे. एकूण सगळ्या खंडीभर प्रश्नांपैकीचा हा प्रश्न असेलही . पण उत्तर देताना कुणाचा हात कापत नसेल ? आणि अशावेळी आपल्या स्वतःच्या ओळखीबद्दलचा - आयडेंटीटीबद्दलचा - यक्षप्रश्न अनेकाना सतावला नसेल काय ? "बलुतं" या आपल्या आत्मचरित्राच्या एका भागात दया पवार यांनी , अस्पृष्य समजल्या जाणार्या वर्गातून आर्थिक संक्रमण करणार्या त्यांच्यासारख्यांना काही प्रसंगी त्यांच्या आप्तांकडून आणि समाजातल्या तथाकथित उच्चवर्णीयांकडून काही वेळा जी वागणूक मिळाली त्याचे चित्रण केले आहे. अशी वागणूक त्यांना नेहमी मिळाली नसेल , थोड्या लोकांकडूनच कधी मिळाली असेल ; परंतु त्या त्या प्रसंगीच्या डंखातून " आपण नेमके कोण" या प्रश्नाला नेहमी अधोरेखित केले गेले; अशा अर्थाचे पवार यानी लिहीलेले आहे. एनाराय माणसांची नि पवार यांच्यासारख्यांच्या कमालीच्या प्रतिकूल परिस्थितीची मला बिलकुल तुलना करायची नाही. पण "संक्रमणशील व्यक्तींना येणारे अनुभव" या एका सदराखाली त्यात काहीतरी मिळतेजुळते आहे असे मला वाटले खरे.
" दीवार और पूल"
असे जर का असेल तर या प्रकारच्या यक्षप्रश्नांची उत्तरे नक्की काय आहेत ? दीवार चित्रपटातला तो सुप्रसिद्ध संवाद आठवतो. "ये वही पूल है जिसके नीचे हम रहा करते थे. लेकीन ये दीवार जो हम दोनोके बीचमे खडी है , वो इस पूलसे बहोत बडी है भाई !" म्हणजे शेवटी त्रिशंकू बनायचे की दुवा बनायचे याचा निर्णय घ्यायची वेळ ही येतेच. भले राष्ट्रांचे राज्यकर्ते एकमेकांवर हल्ले चढवोत, भले खुद्द अमेरिकेचे नग्न , पाशवी सत्ताकांक्षेचे रूप जगासमोर येवो , पण देशादेशातल्या सुसंस्कृत माणसांना कृत्रिम भिंतींच्या नि सीमारेषांच्या पलिकडे पोचण्याशिवाय पर्याय नाही. मराठी भाषेच्या नि भारतीयत्वाच्या संकल्पना प्रसरणशील नि सामावून घेणार्या बनल्याखेरीज पर्याय नाही. कै. व. पु. काळे हे माझे प्रचंड आवडते लेखक नव्हते. पण त्यांच्या एका कथेतले वाक्य मला लक्षात आहे. : " काही लोकाना इन्फेरियॉरिटी कॉम्प्लेक्स् असतो. काही लोकांना सुपेरियॉरिटी कॉम्प्लेक्स असतो. जे.के. ला 'इक्वालिटी कॉम्प्लेक्स्' होता !" एनाराय मंडळींच्या संदर्भात हे विधान खरे आहे असे मला वाटते. तुमचे मराठी भाषेवरचे प्रेम नि तुमचे अमेरिकन् वास्तव्य या दोन गोष्टी एकमेकांना छेद देत नाहीत. आपल्या सुदैवाने , इराकी अमेरिकनांना नागरिकत्व स्वीकारताना "त्या" प्रश्नाला उत्तर देताना ज्या नैतिक शृंगापत्तीला तोंड द्यावे लागले असेल ती आपत्तीसुद्धा आपल्या नशीबी नाही. "दीवार"ची उपमा पुढे न्यायची तर गमतीने असे म्हणावेसे वाटते : "ज्या भाषेच्या पुलाखाली आपण सर्व वाढलो, तो पूल सातासमुद्रांपेक्षा मोठा आहे. राष्ट्राराष्ट्रातल्या भिंतींपेक्षा उंच आहे , त्याना ओलांडणार आहे. जिच्या छायेखाली वाढलो तिच्याच दुव्याने एकमेकांशी आपण बांधले गेलोत." "एकोहम बहुस्याम्"चा आपल्यापुरता अर्थ हा असा आहे असे मला वाटते.
"बदलती समीकरणे"
भारतातून स्थलांतरित झालेल्यांच्या संक्रमणाचा इतिहास लक्षात घेता , ६०-७० च्या दशकातल्या , प्रचंड प्रतिकूल परिस्थितीला सामना करणार्या पीढीपासून ते ९० च्या दशकातली एच-१ आणि डॉटकॉम पीढी ते नव्या शतकातल्या "आउटसोर्सिंग्"च्या लाटेवर स्वार झालेल्या भारतीय अर्थव्यवस्थेची लेकरे अशा ढोबळ पायर्या दिसतात. ६५ पासून सुरवात झालेल्या "ब्रेन ड्रेन" पासून चालू शतकात झालेल्या , "ब्रेन गेन"च्या घटनेपर्यंतचा इतिहास म्हणजे काळाच्या बदलणार्या पावलांची साक्ष आहे. आज जागतिक अर्थव्यवस्था आर्थिक सावटाखाली उभी असताना दिसते. दर काही वर्षांनी होणार्या भूकंपांमधे ज्याप्रमाणे भूगर्भातील टेक्टॉनिक् प्लेट्स् बदलतात , त्याप्रमाणे , जेव्हा अर्थव्यवस्था कूस बदलते तेव्हा हे संक्रमणशील एनाराय् कुठे असतील, त्यांचे काय होईल हा मोठा रोचक विषय होईल. कुणी सांगावे , आज जे शेकड्याने लोक भारतात कायमचे परत जात आहेत, उद्या परिस्थितीच्या रेट्याने ही संख्या हजारोंची बनली तर ?
पैशाचे गणित कुठल्याही दिशेने बदलो. तागडी कुठल्याही दिशेने फिरो. "मानवी संक्रमण" ही घटना चालूच रहाणार आहे. "जेथे जातो तेथे माझी भावंडे आहेत. जिकडे तिकडे माझ्या खुणा मला दिसताहेत" या केशवसुतांच्या ओळी उद्याही आपल्याला साथ देतील , दिलासा देत रहातील .
- पाहुणा संपादक : मुक्तसुनीत.
प्रतिक्रिया
6 Jul 2008 - 11:57 pm | विसोबा खेचर
पाहुण्या संपादकाच्या पहिल्यावहिल्या अग्रलेखाकरता मुक्तसुनीत यांचे मनापासून आभार. हा उपक्रम असाच सुरू राहावा असे मनापसून वाटते.
पैशाचे गणित कुठल्याही दिशेने बदलो. तागडी कुठल्याही दिशेने फिरो. "मानवी संक्रमण" ही घटना चालूच रहाणार आहे. "जेथे जातो तेथे माझी भावंडे आहेत. जिकडे तिकडे माझ्या खुणा मला दिसताहेत" या केशवसुतांच्या ओळी उद्याही आपल्याला साथ देतील , दिलासा देत रहातील .
उत्तम अग्रलेख..!
पुन्हा एकदा अभिनंदन व मनापासून आभार...
तात्या.
7 Jul 2008 - 12:19 am | प्रमोद देव
खरंच प्रश्न विचार करायला लावणारा आहे. एनाराय..म्हणजे न घरका ना घाटका...अशी परिस्थिती आहे खरी.
ह्या प्रश्नाचे उत्तर देणे खरंच अवघड आहे. हे एक वरवर सोपे वाटणारे पण न सुटणारे कोडे आहे असे वाटते. मुक्तसुनीत आपण ही व्यथा अतिशय समर्पक शब्दात मांडलेय.
मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
7 Jul 2008 - 12:42 am | रामदास
जोपर्यंतज्या भाषेच्या पुलाखाली आपण सर्व वाढलो, तो पूल सातासमुद्रांपेक्षा मोठा आहे. राष्ट्राराष्ट्रातल्या भिंतींपेक्षा उंच आहे , त्याना ओलांडणार आहे. जिच्या छायेखाली वाढलो तिच्याच दुव्याने एकमेकांशी आपण बांधले गेलो." तोपर्यंत आपण एकत्रच आहोत.
भौगोलीक अंतराची काय तमा बाळगायची?
सुरेख सुरवात.
धन्यवाद. मुक्तसुनीत .
धन्यवाद तात्या .
13 Jul 2008 - 10:14 pm | डॉ.प्रसाद दाढे
सुरेख सुरवात
असेच म्हणतो..
मुक्तसुनित या॑चे अभिन॑दन
7 Jul 2008 - 12:54 am | स्वप्निल..
मुक्तसुनीत,
"....तुमचे मराठी भाषेवरचे प्रेम नि तुमचे अमेरिकन् वास्तव्य या दोन गोष्टी एकमेकांना छेद देत नाहीत."
हे आवडले..संपुर्ण लेख आवडला..चांगली सुरुवात..
स्वप्निल..
7 Jul 2008 - 1:00 am | प्राजु
मुक्तसुनित आपले आणि तात्यांचे मनापासून अभिनंदन. एका सुंदर उपक्रमाला सुरूवात.
उत्तम सुरूवात. खूप विचार करायला लावणारा लेख आहे. रामदास यांच्याशी सहमत आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
7 Jul 2008 - 1:14 am | भडकमकर मास्तर
संक्रमणशील माणसाच्या मनातलं कन्फ्यूजन ( मी नक्की कोण?) आणि ( थोडं दुखावले गेल्याची भावनाही ) समर्पक शब्दांत मांडली आहे...
पहिला लेख आवडला...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
7 Jul 2008 - 2:05 am | मदनबाण
लेख आवडला..
मदनबाण......
7 Jul 2008 - 2:32 am | केशवसुमार
मुक्तीशेठ,
एकदम दमदार सुरवात.. आभिनंदन!!
तात्याशेठ,
मिपावर चालू केलेल्या ह्या 'संक्रमणा' बद्दल आपले आभार आणि अभिनंदन..
(रेसिडेंट जर्मन)केशवसुमार
स्वगतः ह्या मुक्तीशेठच्या संपादकिय लेखामुळे वाचकांच्या अपेक्षा वाढल्यात :B ...अता पुढच्या संपादकाची काही खैर नाही.. :W
(नॉन रिलायबल )केशवसुमार
7 Jul 2008 - 2:47 am | धनंजय
मुक्तसुनीत यांनी अंतर्मुख करणार्या लेखाने संपादकीयांचा श्रीगणेशा केला आहे. असे लेखन या सदराचा पायंडा होईल, असे दिसते आहे. मिसळपावची ही अफलातून कल्पना सफल होणार!
स्थलांतर करताना सुरुवातीची कित्येक वर्षे रोजच्या सामान्य जगण्याशी झटण्यात आगंतुक मग्न असतो. संस्कृती वेगळी, वागण्याचे रीतीरिवाज वेगळे, ते सर्व आत्मसात करून घ्यायचे असते. ज्या काही व्यवसायासाठी स्थलांतर केलेले असते, त्याचा भार सांभाळायचा असतो. या सगळ्या बदलांना सामोरे जाताना आपली ओळख कुठेतरी बदलत असते. पण त्याच्याकडे लक्ष द्यायला उसंत नसते.
काही लोक स्थलांतर करण्यापूर्वीच मायदेशाला तुच्छ लेखत असतात. अमेरिकन वकिलातीबाहेर तिष्ठत असलेल्या रांगेत काही थोड्या लोकांकडून तसा स्पष्ट सुर ऐकू येतो. ईश्वरकृपेने पारपत्रावर अमेरिकन कृपेचा छप्पा पडू दे आणि या नावडत्या देशातून निसटू दे... त्यांना कदाचित बदललेली अस्मिता म्हणजे खरे स्वत्व सापडण्यासारखे असेल - पण त्यांच्याबद्दलही हे खरे असेलच असे वाटत नाही. अमेरिकेचे दिवास्वप्न हे कुठल्याही दिवास्वप्नासारखे नेमके वास्तव नसते. वास्तवातली अमेरिका त्या दिवास्वप्नापेक्षा बरीच वाईट आहे, आणि बरीच चांगली आहे - म्हणजे सगळ्याच प्रकारे वेगळी आहे. अपेक्षाभंग करणार्या या देशाबद्दल रागही येऊ शकतो, आणि अनपेक्षित दालने उघडणार्या या देशाबद्दल कौतुकही वाटू लागते - मनाचा मोठा गोंधळ घालणारी परिस्थिती असते.
मायदेशाबद्दल आधीपासून जिव्हाळाच असलेल्या लोकांना तर आपली बदलणारी ओळख चक्रावून टाकणार नाही तर काय?
त्याच वेळी ताटातूट झालेल्या आपल्या देशाबद्दल स्थलांतरित माणूस काल्पनिक प्रतिमा तयार करू लागतो. काही थोड्या वर्षांचा मातृभूमीच्या अनुभवाचे तुटपुंजे भांडवल असते, त्याच्यावर रम्य मनोरे चढवतो. तिथे तो प्रचंड प्रवाही भारत आपल्या गतीने पुढे सरकत असतो. दूर स्वप्नरंजन करणार्या लेकराच्या कल्पनाविश्वाचे त्याला सोयरसुतक नसते. मग भारतभेट झाली की खरा भारत त्या काल्पनिक प्रतिमेला तडा देतो.
अशा प्रकारे दोन आवडणारे, पण कधी न समजणारे देश, अशांत आपली अस्मिता विभागली जाते. कोणास वाटावे की ही घालमेल म्हणजे स्थलांतराची शोकांतिका आहे. पण मुक्तसुनीत अचूकपणे निरीक्षण करतात, की मानवी संक्रमण म्हणजे वेगवेगळ्या संस्कृतींना जोडणारा पूल आहे. स्थलांतरिताची कथा ही शोकांतिका नसून दुर्दम्य आशावादाचा आलेख आहे.
7 Jul 2008 - 7:53 am | बेसनलाडू
अशा प्रकारे दोन आवडणारे, पण कधी न समजणारे देश, अशांत आपली अस्मिता विभागली जाते. कोणास वाटावे की ही घालमेल म्हणजे स्थलांतराची शोकांतिका आहे. पण मुक्तसुनीत अचूकपणे निरीक्षण करतात, की मानवी संक्रमण म्हणजे वेगवेगळ्या संस्कृतींना जोडणारा पूल आहे. स्थलांतरिताची कथा ही शोकांतिका नसून दुर्दम्य आशावादाचा आलेख आहे.
अगदी!
उत्तम लेख.आवडला.दुसर्या बाजूची निरीक्षणे मांडायचा प्रयत्न झाल्यासही उत्तम.
(सहमत)बेसनलाडू
7 Jul 2008 - 2:50 am | विकास
मिपाच्या पाहुणे संपादकीय प्रकल्पाच्या शुभारंभानिमित्त तात्यांचे आणि त्यातील पहील्या अग्रलेखाने चांगला श्रीगणेशा करणार्या मुक्तसुनीत यांचे अभिनंदन!
लेख चांगलाच आणि वैचारीक आहे. त्यात वृत्तीप्रवृत्तीने भारतीय असलेल्या पण कर्मभूमीमुळे प्रत्यक्ष नाळ तुटलेल्या भारतीयाच्या मनातील केवळ व्यथाच नाही तर कधीकधी परिस्थिती समजून घेत आलेले समतोल विचार दिसतात.
भारतीयत्व हे जर एक खणखणीत नाणे असले तर त्याची एक बाजू हे कायद्याने भारतीय असलेली तमाम जनता आहे तर दुसर्या बाजूस तुमच्याआमच्यासारखे "घार हिंडते आकाशी, चित्त तिचे पिल्लापाशी" म्हणणारे पण "पिल्लाऐवजी", "मातृभूमीशी" कुठल्यान् कुठल्या पद्धतीने संबंध ठेवणारी एनआरआय मंड़ळी आहोत...आणि हो नुसताच एनाआरआय म्हणून विचार केला तर ते नाणे नाही तर "रुबिक क्यूब" आहे - ५४ तुकडे एकमेकांशी रंगसंगतीने नीट लावण्याचे कोडे... तीच कथा भारतातील भारतीयांची पण म्हणायला हरकत नाही.
तर आपल्या अग्रलेखामुळे नाण्याची एक बाजू दिसली आता याचीच दुसरी बाजू (अर्थात भारतातील भारतीयांबद्दल) दाखवणारा लेख / अग्रलेख पण वाचायला मिळोत अशी मिपासदस्यांना विनंती...
बाकी जाता जाता कालच एका लग्नसमारंभात गप्पा मारत असताना ऐकलेला एक किस्सा: संघात असे म्हणले जाते की "वन्स स्वयंसेवक इज ऑलवेज स्वयंसेवक"... जर कामाच्या/संसाराच्या व्यापाने एखादी व्यक्ती जर नंतर संघाच्या कार्यक्रमाला हजर रहात नसेल तरी ती आपलीच असते तीला वेगळे का धरायचे? तीला कधी "एक्स स्वयंसेवक" म्हणू नये... आपली मुले कामानिमित्त घर सोडून बाहेर गावी रहायला जातात तेंव्हा ती काय आपली "एक्स मुले" होतात का?
थोडक्यात मुक्तसुनीतराव मला इतकेच म्हणायचे आहे की, तुम्ही-आम्ही जरी "एनआर" लावले तरी अगदी कुणाला आवडो न आवडो "इंडीयन" राहतोच. फक्त त्याचा बदलेल्या परीस्थितीतपण जाणीव ठेवून योग्य अर्थ लावणे आणि तसे आचरण करणे हे ज्या त्या व्यक्तीवर अवलंबून राहते. त्याला काही पर्याय नाही.
धन्यवाद
7 Jul 2008 - 8:39 pm | ऋषिकेश
सर्वप्रथम मुक्तसुनीत व तात्यांचे अभिनंदन व आभार !.
मुक्तसुनीत राव,
"मी कोण"? हा बहुदा जगातील सर्वात कठीण प्रश्न असावा. आणि त्या प्रश्नावर आधारीत हा अप्रतिम लेख लिहून तुम्ही मिपाच्या संपादकियांची पातळी फार उंचावर नेऊन ठेवली आहे. लेख प्रचंड आवडला.
अगदी सहमत.
अवांतरः अग्रलेख वाचून विकास यांच्या "ओळख" या लेखाचीही आठवण झाली
-('मिसळ'लेला) ऋषिकेश
7 Jul 2008 - 5:29 am | चतुरंग
'मिपा'च्या संपादकीय सदराची सुरुवात मुक्तसुनीत ह्यांच्याकडून चांगलीच होणार ह्याची खात्री होती तसेच झाले ह्याचा आनंद आहे!:)
परिचयाचा विषय असूनही त्याच्या वेगळ्या बाजूचे दर्शन मुक्तरावांनी घडवले आहे. स्थलांतरितांची जातकुळी कोणतीही असो, म्हणजे धरणग्रस्त विस्थापित असोत, किंवा नैसर्गिक आपत्तीतून झालेले असोत, किंवा कामामुळे झालेले असो; असे की तसे, इकडे की तिकडे, ह्या मूलभूत मानसिक द्वंदातून सुटका नसते हे सत्य त्यांनी नेटक्या आणि नेमक्या शब्दात अधोरेखित केले आहे.
अमेरिकेत येणे म्हणजे जणू स्वर्गात पोचणे अशी कल्पना उराशी बाळगून, ऐकलेल्या, वाचलेल्या आणि काल्पनिक अशा सर्व प्रकारांनी अमेरिकेतल्या विश्वाचे चित्र डोळ्यांपुढे आणून, तेच खरे मानून, येनकेन प्रकारेण इकडे येण्याची मनीषा बाळगणार्या लोकांची आजही आपल्याकडे कमी नाही! इथे म्हणजे सर्व चांगलेच असा भ्रम इथे आल्यावर हळूहळू वितळत जातो. अनेक बाबतीत टोकाचे चांगले आणि वाईट धक्के देण्याची अमेरिकेची क्षमता काही वर्षात आपल्याला कळून येते. ऐहिक सुखाची परमावधी पूर्ण करुन उतरणीच्या दिशेने चक्राच्या प्रवासाची सुरुवात झालेल्या अमेरिकेचं चित्र आणि त्याच वेळी सर्वप्रकारच्या उत्थानामधून, उलथापालथीमधून बदल होत असलेल्या भारतासारख्या देशाचे चित्र हे एकमेकांशी अनेक बाबतीत विसंगत आहे.
तिकडून इकडे आल्यानंतरची मानसिक जडणघडणीची वर्षे ही व्यक्तीसापेक्ष असतात असे माझे मत. काही लोक हे इथेच जन्मल्याप्रमाणे सराइतासारखे इथलेच बनून जातात, बरेचसे कित्येक वर्षे आंदोलित अवस्थेतून प्रवास करीत, अनेक गोष्टींना मुरड घालीत एकदाचे इथले होतात पण ते मनातून खोलवर अस्वस्थ असतात, आणि काही लोक कधीच इथले होऊ शकत नाहीत, त्यांचे मन हे कायम तिकडेच असते आणि आत्मा हरवलेल्या व्यक्तीसारखे ते फक्त परिस्थितीसमोर मान तुकवून जगत राहतात.
मुक्तरावांनी अचूक शब्दात पकडलेली स्थलांतरितांची वेदना ही चिरस्थायी आहे. ही परिस्थिती केव्हाही, कुठेही, आणि कोणत्याही काळात उद्भवू शकते आणि त्याचवेळी जोडलेले मैत्र, मानवी संबंध, गणगोत ही सर्व आपल्या जीवनरुपी झाडाची मुळे आहेत, त्यामुळे बदलाला चिवटपणे सामोरे जाण्याचे रसायन हे त्यातूनच आपल्याला मिळणार आहे हे त्यातले सत्य जेवढे लवकर लक्षात येईल तेवढी वरवर दिसणार्या गोष्टींनी भुलून जाण्याची शक्यता आणि बदल झाला तरी नशिबाला/परिस्थितीला दोष देण्याची मानसिकता आणि अगतिकता कमीकमी होत जाते आणि आपण विजिगीषु होतो!
चतुरंग
7 Jul 2008 - 10:15 am | मराठी_माणूस
तिकडून इकडे आल्यानंतरची मानसिक जडणघडणीची वर्षे ही व्यक्तीसापेक्ष असतात असे माझे मत. काही लोक हे इथेच जन्मल्याप्रमाणे सराइतासारखे इथलेच बनून जातात, बरेचसे कित्येक वर्षे आंदोलित अवस्थेतून प्रवास करीत, अनेक गोष्टींना मुरड घालीत एकदाचे इथले होतात पण ते मनातून खोलवर अस्वस्थ असतात, आणि काही लोक कधीच इथले होऊ शकत नाहीत, त्यांचे मन हे कायम तिकडेच असते आणि आत्मा हरवलेल्या व्यक्तीसारखे ते फक्त परिस्थितीसमोर मान तुकवून जगत राहतात.
अत्यंत चपखल आणि योग्य शब्दात घेतलेला परमर्श. हे सर्व अनुभवले असल्यामुले जास्त भिडते.
7 Jul 2008 - 6:48 am | चित्रा
मुक्तसुनीत यांचे आणि मिपाचे या पहिल्यावहिल्या अग्रलेखाबद्दल अभिनंदन. अग्रलेखांच्या या मालिकेतील अगदी पहिलाच लेख विचार करायला लावणारा. सर्वांनी दिलेले प्रतिसाद मनातल्या भावना पोचवत आहेतच, पण आपला सुरक्षित कोश सोडून बाहेर पडलेल्या कुणालाही ह्याच सगळ्या उलाघालीतून जावे लागते असे वाटते. मग ते कोकणातून मुंबईला आलेले लोक असोत की दूरगावी शिकायला आलेले विद्यार्थी. त्यात अनेकदा मदत करणारे लोक मिळतात तर कधी कधी अत्यंत कटू अनुभवही येतात. यातून तावून सुलाखून निघत कधी जोमाने तर कधी दु:खी होऊन आपापल्या मगदुराप्रमाणे माणसे मार्ग काढत राहतात. हे असेच सर्वत्र दिसते.
मराठी भाषेच्या नि भारतीयत्वाच्या संकल्पना प्रसरणशील नि सामावून घेणार्या बनल्याखेरीज पर्याय नाही.
हे अगदी योग्य.
7 Jul 2008 - 7:17 am | मेघना भुस्कुटे
अग्रलेखाकडून काही विशिष्ट अपेक्षा असतात. संपूर्ण पत्राची भूमिका नेमकी आणि स्पष्टपणे पुढ्यात ठेवून पत्राला स्वतःचा चेहरा देण्याची मोठी जबाबदारी त्या लेखावर असते. बातम्यांच्या निवडीतून, मांडणीतून आणि प्राधान्यक्रमातून जे अमूर्तपणे व्यक्त होत असतं, तेच मूर्त स्वरूपात, पण कंठाळी होऊ न देता मांडण्याची ही नाजूक कामगिरी.
'मिसळपाव' सारख्या व्यासपीठाच्या बाबतीत ती अजूनच जोखमीची. कारण वृत्तपत्राचं स्वरूप संपादक ठरवतात. संकेतस्थळाच्या बाबतीत हे काम मोठ्या प्रमाणावर वाचक-लेखकांचंच - आणि त्यामुळे काहीसं विस्कळीत-शिथिल असतं. शिवाय वृत्तपत्राला असलेले स्थलकालाचे संदर्भही इथे विस्तारलेले असतात.
या सगळ्या अस्ताव्यस्त मंथनातून काही मोजकं-देखणं काढून देणं, प्रश्नांना चालना देणं, एकांगी भूमिका न घेताही ठाम मत मांडणं - म्हणजे निव्वळ महाद्वार किलकिलं करणं नक्कीच नव्हे. उलट ही मिरवणुकीची देखणी, अपेक्षा वाढवणारी - आणि मागच्या फळीतल्या लोकांच्या जबाबदार्याही!- सुरुवात आहे.
मुक्त सुनीत यांचं अभिनंदन. पुढच्या पाहुण्या संपादकांना शुभेच्छा.
अवांतरः आधीच्या संपादकानं त्याच्या निवडीनं पुढच्या संपादकाला 'खो' देण्याची कल्पना कशी वाटते? म्हणजे एकमेकांना आग्रह करायला नको आणि स्वेच्छेनं कुणी पुढे येण्याची वाटही पाहायला नको. अर्थात वेळाच्या अडचणी जाणून संपादकांच्या संमतीनं 'खो' पुढेही पाठवता येईल.
7 Jul 2008 - 8:04 am | नंदन
आणि समयोचित अग्रलेख (४ जुलै, साहित्य संमेलन आणि अच्युत गोडबोलेंच्या लेखाच्या पार्श्वभूमीवर). ह्या उपक्रमाची सलामी दमदार झाली आहे.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
7 Jul 2008 - 8:12 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अग्रलेखात स्थलांतरितांचे प्रश्न आणि त्या निमिताने एनराय म्हणुन होणारी विचारांची कोंडी काही प्रश्न विचार करायला लावणारे असेच आहेत.
अग्रलेख आवडला !!!
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
7 Jul 2008 - 8:47 am | यशोधरा
संपादकीय अतिशय उत्तम जमलं अहे, मुक्तसुनीत आणि मिपावर ही कल्पना मांडून ती साकार करणारे तात्या अन् पडद्यामागचे तंत्रज्ञ, सार्यांचेच अभिनंदन. संयत भाषेत परदेशस्थ भारतीयांच्या मनातली उलघाल, मानसिक द्वंद म्हणा, संक्रमण म्हणा - अतिशय परिणामकारक रीत्या मांडले आहे. वेडावाकडासा उहापोह अचूक जमला आहे!!
पुढील संपादकीय कधी?
7 Jul 2008 - 9:09 am | विसोबा खेचर
वेडावाकडासा उहापोह अचूक जमला आहे!!
सहमत आहे. हे वाक्य खूप आवडलं!
पुढील संपादकीय कधी?
पुढच्या सोमवारी -१४ जुलै २००८.
7 Jul 2008 - 9:23 am | अमोल केळकर
मुक्त सुनित ,
साप्ताहिक संपादकीय सदराच्या शुभारंभाचा पहिला लेख आवडला. पहिल्या सादरीकरणाबद्दल तुमचे अभिनंदन
त्याचप्रमाणे मिपा व्यवस्थापनाने हा उपक्रम लोकमान्य टिळक यांच्या पवित्र स्मृतीस समर्पित करुन एका महान नेत्याची आठवण ठेवली त्यावद्दल व्यवस्थापनाचे ही अभिनंदन
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
7 Jul 2008 - 9:54 am | कौस्तुभ
तुमच्या या लेखाने आम्हाला निशब्द केले आहे!!
7 Jul 2008 - 9:57 am | मनिष
सविस्तर प्रतिसाद लिहितो नंतर...
7 Jul 2008 - 9:57 am | प्रकाश घाटपांडे
खरं आहे! मी कोण ? हा प्रश्न स्वयम अध्ययनाचा आहे, आत्मशोधनाचा आहे. व्यथांचा आहे ,कथांचा आहे आत्मस्तुतीचा ही आहे, आत्मक्लेशाचा ही आहे. न जाणो एखाद्या संवेदनशिल माणसाला तो आत्मबलिदानाचा ही ठरेल.
प्रकाश घाटपांडे
7 Jul 2008 - 10:13 am | सहज
मिरवणुकीच्या सुरवातीच्या ह्या मानाच्या अग्रलेखाला मुजरा!!!
एनाराय म्हणले की बहुतेक वेळा ६०-७० च्या दशकानंतरचे परदेशस्थ भारतीय डोळ्यासमोर येतात. बहुतेक वेळा ते अमेरिका, इंग्लंड मधलेच असतात. :-) जगात जवळजवळ १०० देशात कदाचित जास्तच देशात "भारतीय लोक" आहेत.
ब्रिटिश साम्राज्यात मजुर म्हणुन शतकांपुर्वी नेलेले मजुर भारतीय, काही सुशिक्षित डॉक्टर, इंजिनियर तसेच व्यापारी भारतीय अशी अनेक भारतीय मंडळी शेकडो वर्षांपुर्वी स्थलांतरीत झाली. आजही आपण पेपर मधे वाचतो की बाली मधे ९३% जनता हिंदु आहे. पुर्वेला कोरीया मधे, पश्चिमेला वेस्ट इंडीज बेटामधे रामाचे, कृष्णाचे मंदीर आहे. फिजी, मॉरिशस, साउथ अफ्रिका मधे कित्येक पिढ्यान पिढ्या भारतीय वंशाचे अनेक लोक आहेत.
गेल्या शतकात पेहराव, बोलीभाषा, धर्माने, पारपत्राने बदलले असले तरी आजही त्यांची ओळख सांगताना इतिहासाला, मानववंशशास्त्राला किंवा कमी शिक्षीत माणसाला त्यांचे भारतीयत्व नक्कीच आठवते. अगदी जरी आपण भारतीय त्यांच्याबद्दल विचार करत नसलो तरी.
काही जाणत्या लोकांना धन्यवाद की पर्सन ऑफ इंडीयन ओरीजीन ह्या कागदपत्राने त्यांनी ही परदेशस्थ भारतीयांना आपले मुळ टिकवून ठेवायला एक संधी दिली आहे.
वसुधैव कुटूंबकम, हे विश्वची माझे घर वाक्यांना खराखुरा अर्थ द्यायला ह्या जगभरच्या ३० दशलक्षावधी भारतीय बांधवाना मेनलॅंड भारतीयांनी जोडून ठेवले पाहीजे. आंतरजालाच्या युगात हे अशक्य नाही.
7 Jul 2008 - 1:13 pm | वैशाली हसमनीस
परदेशस्थ भारतीयांच्या व्यथा अगदी अचूक ,योग्य शब्दांत मांड्ल्या आहेत.अभिनंदन.पण त्याचबरोबर भारतात राहू इछिणारे अनेक हुषार,होतकरु तरुण दिसतात.पण ते केवळ स्वदेशात राहतात,अमेरीकन चलन मिळवित नाहीत म्हणून त्यांना भारतातच योग्य मान मिळत नाही किंबहुना त्यांच्याकडे बघण्याची व्रुत्ती थोडी अवहेलनेची असते असा अनुभव येतो.त्यांचीही मानसिक स्थिती अधांतरी ,त्रिशंकूसारखी होते.त्यावरही मि.पा.संपादकांनी केव्हातरी प्रकाश टाकावा ही विनंती.
7 Jul 2008 - 4:43 pm | आनंदयात्री
"अग्रलेख" ही संकल्पना अवृत्तपत्रिय माध्यमात आणनारे मिसळपाव डॉट कॉम हे पहिले संस्थळ - ट्रेंड सेटर !
हे ही एक संक्रमणच. माय मराठीची अशी सेवा करायचे भाग्य लाभले म्हणुन मिसळपाव डॉट कॉम चे अन तात्यांचे अभिनंदन.
मुक्तसुनितरावांची पहिला पाहुणा संपादक म्हणुन निवड योग्यच आहे, एका बर्यापैकी चर्चित पण इथे अत्यंत ऍप्लिकेबल अशा विषयावर सुंदर विवेचन केल्याबद्दल धन्यवाद.
लेख सगळ्या अंगाने उत्तम आहे विशेष म्हणजे अग्रलेख आहे, लेखाचा विषय जरी बर्यापैकी भावनिक बाबींशी निगडित असला तरी कुठेही ललित लेखनाचा सुर जाणवला नाही, हे ही अग्रलेखाचे एक यशच आहे.
आपलाच,
आनंदयात्री
सदस्य
मिसळपाव डॉट कॉम
7 Jul 2008 - 10:56 pm | विसोबा खेचर
लेखाचा विषय जरी बर्यापैकी भावनिक बाबींशी निगडित असला तरी कुठेही ललित लेखनाचा सुर जाणवला नाही, हे ही अग्रलेखाचे एक यशच आहे.
अगदी सहमत आहे!
तात्या.
7 Jul 2008 - 4:50 pm | प्रभाकर पेठकर
पाहुण्या संपादकांचे (मुक्तसुनितांचे) हार्दीक अभिनंदन.
फार मोठा, बहु आयामी प्रश्न संपादकांनी हाताळला आहे. माणसं मायदेश सोडून परक्या देशात स्थलांतर का करतात? ते करताना त्यांनी कोणकोणती रास्त स्वप्ने उराशी बाळगलेली असतात? त्यातील किती आणि किती कालावधीत पुर्ण होतात? परदेशातील वास्तव्याने होणारे फायदे किती आणि तोटे किती? प्रत्येक व्यक्तीच्या (स्थलातरीत) आर्थिक, मानसिक, भावनिक, सांस्कृतिक, सामाजिक गरजांची होणारी पुर्ती आणि फरपट दोन्हीचा अनुभव वजनदार असतो.
भारत सोडून जाताना अर्थातच मित्रांनी, आप्तेष्टांनी, व्यवसाय बंधूंनी 'भाग्यवान' हा शिक्का कपाळी मारलेला असतो. आपणही तो मंगलप्रसंगी भाळावर रेखिलेल्या चंदनाच्या टिळ्याप्रमाणे मिरवत असतो. परदेशातील पहिलंदर्शन छाती दडपून टाकणारं असतं. त्या भूमीवर पहिला प्रश्न मनांत येतो, 'मी घेतलेला निर्णय धाडसी खरा, पण खरंच आपली स्वप्नं (बहुतांशी आर्थिक) पुर्ण होतील नं?' तिथल्या वातावरणात आपण रुळतो, संघर्ष सुरू होतो. रजेवर जाताना मनातला जमा-खर्च (काहींजणांना) तितकासा भावणारा नसतो. भारतात आल्यावर तेच सगेसोयरे भेटतात, आपल्या कपड्यांवरून, आपण आणलेल्या भेटवस्तूंवरून आपली परदेशातील परीस्थिती जोखतात. आपणही बोलण्यातून आभासी दुनिया उभारतो. सर्वत्र आनंदआनंद असतो. आई किंवा वडील एकच प्रश्न विचारतात, 'अजून किती दिवस राहणार 'तिथे'?' इथे, 'बघू, अजून काही ठरवलं नाही' असं मोघम उत्तर दिलं जातं. पुढे अनेक वर्षांच्या वास्तव्यात आपणच हा प्रश्न स्वतःला विचारू लागतो. जी स्वप्न उराशी बाळगली होती (आर्थिक) ती केंव्हाच पुर्ण झालेली असतात पण भारतातील वाढती महागाई आणि आपले उंचालेले 'लिव्हींग स्टँडर्ड' ह्यांचा मेळ मनात बसत नाही. परत गेलो आणि हे 'स्टँडर्ड' सांभाळता नाही आले तर आपले हसे होईल ही भिती वाटते. जुने व्यावसायिक सहकारी पुढे गेलेले असतात. जी छाप इतकी वर्षोंनवर्षे सर्वांवर पडली आहे त्यातील पोकळपणा उघडा पडेल अशी भिती वाटत राहते आणि माणूस परतीचा विचार पुढे ढकलत राहतो. त्यात पुन्हा, त्याच्या आधी मायदेशी परतलेले कालांतराने पुन्हा नव्या नोकरीच्या निमित्ताने परदेशात परत येतात, भारतातल्य वाढलेल्या महागाईची, वाढत्या गर्दीची, भ्रष्टाचारांची, डॉक्टरीपेशातील खालावलेल्या नितीमत्तेची अतिरंजीत चित्रे नजरे समोर उभी करताता आणि चांगला जुळवून आणलेला आपला धीर खचतो.
अति विचारांमुळे 'कृती' घडत नाही. परदेशात जाताना भारतातील दोर कापून जावे. तसेच, परदेशातून परतताना तिथले दोर कापून यावे. 'जमलं नाही तर परत येईन' हा विचार चौफेर संघर्ष करू देत नाही. त्यामुळे अपयश पदरी येतं किंवा मर्यादीत यश प्राप्त होतं. परतीचे दोर कापून टाकले तरच माणूस जीवाच्या आकांताने लढतो. तेंव्हाच पौर्णिमेसारखे यश नजरेस पडते.
माझा अनुभव युरोप-अमेरिकेतला नाही. आखाती देशातील आहे. त्यामुळे मुळ उद्देश आर्थिक आणि आर्थिकच होता. पण तरीही, संपूर्ण वेगळी संस्कृती, वेगळी भाषा, वेगळे हवामान, वेगळी राजकिय व्यवस्था अशा वणव्यात सापडल्यावर बसणारे चटके आणि एकटेपण ह्यावर एखादी कादंबरी लिहीता येईल. सणवार, लग्न-मुंज, मिरवणूका हे सर्व तर नाहीच नाही पण साली कधी 'रामनाम सत्य है।' वाली शाश्वताचे दर्शन देणारी प्रेतयात्राही नजरेस पडली नाही. मी भारत सोडून आखातात गेलो तेंव्हा भारतात अशा प्रेतयात्रा दिसायच्या. हल्ली इथेही दिसत नाहीत.
पण झगडत राहीलो, इतरांसारखाच, मुंडी तुटलेल्या मुरारबाजीच्या आवेशात.
१९६० च्या दशकात अमेरीकेत गेलेल्या मराठी स्थलांतरांच्या संघर्षाविषयी समर्पक माहिती 'फॉर हिअर, ऑर टू गो' (मेहता पब्लीशिंग हाऊस) ह्या अपर्णा वेलणकरांच्या पुस्तकात वाचावयास मिळते. तसेच, 'गोठलेल्या वाटा' (श्रीविद्या प्रकाशन) हे शोभा चित्रे ह्यांचे पुस्तकही वाचनिय आहे.
विषय बराच गहन आहे.
असो.
7 Jul 2008 - 6:17 pm | वरदा
अग्रलेख. तात्या आणि मुक्तसुनीत दोघांचही अभिनंदन!
डॉलर कमावतो, अमेरिकन नव्हे, इंडीयावर प्रेम करतो, इंडीयन नव्हे, साहित्य संमेलन भरवतो , महाराष्ट्रीय नव्हे , तर मी कोण !"
हे १००% खरं...
तिकडून इकडे आल्यानंतरची मानसिक जडणघडणीची वर्षे ही व्यक्तीसापेक्ष असतात असे माझे मत. काही लोक हे इथेच जन्मल्याप्रमाणे सराइतासारखे इथलेच बनून जातात, बरेचसे कित्येक वर्षे आंदोलित अवस्थेतून प्रवास करीत, अनेक गोष्टींना मुरड घालीत एकदाचे इथले होतात पण ते मनातून खोलवर अस्वस्थ असतात, आणि काही लोक कधीच इथले होऊ शकत नाहीत, त्यांचे मन हे कायम तिकडेच असते आणि आत्मा हरवलेल्या व्यक्तीसारखे ते फक्त परिस्थितीसमोर मान तुकवून जगत राहतात.
खूप छान चतुरंग्..अगदी असेच अनुभव आलेत मलाही . तुम्ही म्हणता ते १००% खरं
(पुढच्या अग्रलेखाच्या प्रतिक्षेत)
वरदा
"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt
7 Jul 2008 - 6:26 pm | विसुनाना
मिपावर सुरू केलेल्या या अभिनव उपक्रमाबद्दल तात्यांचे आणि संबंधितांचे अभिनंदन.
मुक्तसुनीत यांच्यावर टाकलेली पाहुण्या संपादकाची जबाबदारी त्यांनी यशस्वीरित्या पेलली असे म्हणावेसे वाटते.( ही क्लीशे वाक्ये म्हणावी लागतात - असे म्हणणेही क्लीशे झालेले आहे.)
पण खरोखरीच एतद्देशीय लोकांच्या नजरेतून अमेरिका अथवा तत्सम 'प्रगत' देशात गेलेल्या लोकांबद्दल नेहमीच एक प्रश्नचिन्ह दिसते. ते भौगोलिक कुतुहल असेल, सुबत्तेबद्दलचे आकर्षण असेल किंवा त्यांची मानसिकता जाणून घेण्याची इच्छा असेल - या प्रश्नांमधल्या मानसिकतेच्या प्रश्नाचे निराकरण करणारा हा लेख आहे.
यानिमित्ताने (आणि याबरोबरीने) टांझानिया,अझरबैजान, वेस्ट इंडीज इ. येथेही जी भारतीय, महाराष्ट्रीय प्रजा स्थायिक झालेली आहे त्यांची मानसिकता काय असते? यावरही भाष्य झाले असते तर बरे झाले असते.
"देशादेशातल्या सुसंस्कृत माणसांना कृत्रिम भिंतींच्या नि सीमारेषांच्या पलिकडे पोचण्याशिवाय पर्याय नाही. "हा महत्त्वाचा विचार मुक्तसुनीत यांनी प्रभावीपणे मांडला आहे. परंतु असे करताना मुळात "वसुधैव कुटुंबकम" असे सांगणारी भारतीय संस्कृती परप्रांतात घडणार्या अनिवासी भारतीयांच्या भावी पिढ्यांपर्यंत पोचत आहे काय? मुक्तसुनीत यांचा हा स्पृहणीय विचार अनिवासी भारतीयांच्या परसंस्कृतीत वाढणार्या पुढील पिढ्याही अंगिकारतील काय? याही प्रश्नाचा उहापोह व्हायला होता असे वाटले.
अमेरिकेचे ठळक उदाहरण घ्यायचे झाल्यास तेथील बहुतांश जनता बाहेरून आलेल्या लोकांच्या पिढ्यांनी बनली आहे. आज या पिढ्या आपल्या पूर्वमातृराष्ट्राशी किती आत्मियता बाळगून आहेत? मागे रीडर्स डायजेस्टमध्ये आलेली एका चिनी - अमेरिकन मुलीची कहाणी वाचनात आली होती. तिचे अमेरिकेत स्थायिक आईवडील तिला ती अठरा-वीस वर्षांची झाल्यानंतर तिच्या मनाविरुद्ध कळत्या वयात पहिल्यांदा चीनला घेऊन आले. तिला चीन कुठे आहे? इथेपासून तयारी करावी लागली होती. तशीच अवस्था आता तेथील भारतीयांच्या मुलांची होत आहे काय? (आय डोंट वॉना कम टू इंडिया!) या पुढच्या पिढ्यांची सांस्कृतिक नाळ भारतीय सहिष्णु विचारांपासून तुटेल आणि तीही अमेरिकेच्या आत्मग्लानीरत समाजाचा एक हिस्सा बनतील काय अशी भीती पहिल्या पिढीतील पालकांना वाटते काय?
असो. एकूण अग्रलेख आवडला.
7 Jul 2008 - 6:37 pm | अरुण मनोहर
मुक्तसुनीत ह्यांचे आभिनंदन. संपादकीयाची सुरवात तर दणक्यात झाली. बाहेर रहाणारे एन आर आय बांधव भाषेच्या नाळेने बांधल्या गेले आहेत हे निरीक्षण अचूक आहे. मिपा साऱखी संकेतस्थळे ह्या बंधनाचा सकारात्मक उपयोग करून घेत आहेत ही खूप भाग्याची गोष्ट आहे.
7 Jul 2008 - 6:42 pm | मुक्तसुनीत
सर्व मिपावासीयांचे आभार. तुमचे शब्द लिहायला उभारी देत रहातात. तात्या अभ्यंकरांचे आभार मानणे त्याना उपचारासारखे वाटेल. पण तसे न करणे चुकीचे होईल. त्यांचे मनःपूर्वक आभार.
अनेक लोकांनी विचारांना चालना देणारे प्रतिसाद दिले आहेत. काही महत्त्वाचे प्रश्न उभे केले आहेत. वेळेअभावी आताच मला (जमतील तशी का होईना पण ) उत्तरे देणे शक्य होणार नाही. पण तुम्ही दाखवलेल्या विश्वासाची आणि प्रेमाची पोच द्यावी म्हणून लिहीत आहे.
मिसळपाव आपल्या सर्वांकरता असा आरसा बनते आहे, ज्यात आपल्याला आपल्या आयुष्याच्या छोट्या मोठ्या गोष्टींची, बर्या वाईट अनुभवांची प्रतिबिंबे पहायला मिळतात. पुढच्या वाटचालीत मिसळपावने होकायंत्रसुद्धा बनावे अशी सदिच्छा व्यक्त करतो.
7 Jul 2008 - 9:38 pm | देवदत्त
लेख छान आहे...
7 Jul 2008 - 9:55 pm | यशोधरा
पेठकरकाका, छान लिहिलत प्रतिसादात...
7 Jul 2008 - 10:13 pm | रामदास
ऐ मेरे प्यारे वतन, ऐ मेरे बिछड़े चमन, तुझ पे दिल क़ुरबान
तू ही मेरी आरज़ू, तू ही मेरी आबरू, तू ही मेरी जान
तेरे दामन से जो आए उन हवाओं को सलाम, चूम लूँ मैं उस ज़ुबाँ को जिसपे आए तेरा नाम
आपला देश सोडून आलेला रेहमान आणि मिनीची स्टोरी आज परत आठवली.
काबुलीवालाची आठवण इथे अप्रस्तुत ठरू नये.
7 Jul 2008 - 11:10 pm | विसोबा खेचर
ऐ मेरे प्यारे वतन, ऐ मेरे बिछड़े चमन, तुझ पे दिल क़ुरबान
तू ही मेरी आरज़ू, तू ही मेरी आबरू, तू ही मेरी जान
तेरे दामन से जो आए उन हवाओं को सलाम, चूम लूँ मैं उस ज़ुबाँ को जिसपे आए तेरा नाम
रामदासराव,
तसे हे गाणे अनेकदा ऐकले आहे परंतु मुक्तरावांच्या अग्रलेखाच्या आणि त्याला आलेल्या अभ्यासपूर्ण प्रतिसादांच्या पार्श्वभूमीवर, मी स्वत: अनिवासी भारतीय नसलो तरीदेखील वरील गाण्याचे शब्द वाचून जीव अगदी हळवा अन् थोडास्सा झाला!
असो..
आपला,
(तिरंगाप्रेमी) तात्या.
7 Jul 2008 - 11:34 pm | चतुरंग
वतन पासून दूर आल्याशिवाय ती जाणीव काय असते हे खरोखरच समजत नाही!
दूधवाल्या भैय्यापासून आणि कोपर्यावरच्या इस्त्रीवाल्यापासून ते नेहेमीच्या पानाच्या ठेल्यावरल्या पानवाल्यापर्यंत आपले ऋणानुबंध किती नकळत जोडले गेलेत हे ते भवती नसतानाच कळतं.
गौरी-गणपती, दसरा, दिवाळी असे सणवार येतात, ते आम्ही आपापल्या परीने साजरेही करतो पण 'ती' मजा नाही हा भाव काही केल्या पुसता येत नाही!
लग्न-मुंजीसारखे नात्यागोत्यात रमण्याचे प्रसंगही बर्याचवेळा चुकल्याची चुटपुट कायमसाठी लागून राहते.
असे असताना 'तुम्हाला काय कमी, तुम्ही तिकडे डॉलर्समधे लोळताय' किंवा 'एवढे वाटत होते तर जायला कोणी सांगितले होते?' अशांसारखी वाक्ये ऐकली की मन करपून जाते!
चतुरंग
7 Jul 2008 - 11:56 pm | सर्वसाक्षी
मा. पाहुणे संपादक, तात्या आणि मिपाचे हार्दिक अभिंनंदन!
सुंदर उपक्रम, सुंदर प्रतिसाद, सुरेख अग्रलेख असा त्रिवेणीसंगम साधला आहे.
मुक्तसुनित यांचे अभिनंद आणि एका चांगल्या लेखाबद्दल आभार.
8 Jul 2008 - 12:02 am | मुक्तसुनीत
पर्याय आणि स्वीकृती :
एक आणखी विचार माझ्या मनात येतो तो म्हणजे स्थलांतरित केलेल्या ( आणि न केलेल्या) लोकांनी , "स्थलांतरा"बद्दल स्वीकारलेल्या पर्यायांबद्दल. चतुरंग यानी लोकांच्या वेगवेगळ्या मनःस्थितींचे वर्णन केले आहे. मला तात्यांच्या कुठल्याशा पोस्टमधील एक विधान आठवते की, काही वर्षांमागे त्यांच्याकडे देश सोडण्याचा पर्याय अगदी सहज म्हणावा असा उपलब्ध होता. आपल्या कौटुंबिक परिस्थितीला लक्षात घेऊन त्यानी हा पर्याय नाकारला. आज या निर्णयाबद्दल त्याना पश्चात्तापच काय , पण साधी रुखरुख वाटण्याचे काडीइतकेही कारण नाही.
माझ्यामते आपण स्वीकारलेल्या पर्यायाला डोळसपणे स्वीकारण्याचे हे एक उदाहरण आहे. "यू कांट हॅव द केक अँड ईट इट्" हे जर नीट उमजले असेल तर दोन डगरींवर पाय ठेवण्यातले वैय्यर्थ समजेल. पेठकर यानी परतीचे दोर कापण्याचा उल्लेख केला आहे त्याचा एक अर्थ हा असासुद्धा आहे.
अमेरिकन एनाराय आणि इतर :
सहज आणि विसुनाना यानी आणखी एक मुद्दा मांडलाय : युरोप/अमेरिका सोडून इतर ठिकाणी असलेले आपले लोक. मी स्वतः अमेरिकेत स्थायिक झालेला आहे, पण आजूबाजूला बघताना मला एक गमतीची गोष्ट जाणवते : ज्या प्रमाणे अमेरिकेतल्या एस्टॅब्लिशमेंटला पृथ्वी सूर्याभवती फिरत नसून , अमेरिकेभवती फिरते आहे असे भास होतात , त्याची काही प्रमाणात लागण अमेरिकास्थित एनारायनाही कधीकधी होते. स्थलांतरणाची प्रक्रिया गेल्या १-२ दशकांची नाही. हां , जागतिकीकरणामुळे या प्रक्रियेला वेग जरूर आला असेल. पण कितीतरी दशके - प्रसंगी शतके - आधी लोक आफ्रिका खंडात, आशियातल्या इतर भागात गेलेले आहेत. त्यांचे पिढ्यानुपिढ्यांचे लागेबांधे भारताशी आहेत. अमेरिकास्थित लोकांना आपल्यापलिकडे याची जाणीव असते की नाही असा प्रश्न कधीकधी पडतो. या लेखानिमित्त तेथील लोकानी आपापल्या अनुभवांबद्दल लिहावे असे वाटते.
8 Jul 2008 - 3:44 pm | मनिष
खरे आहे. ह्याच अर्थाने अमएरिकनांविषयी म्हटले जाते की त्यांना वाटते की "world starts & ends with America"
8 Jul 2008 - 3:07 am | पिवळा डांबिस
पाहुण्या संपादकाच्या पहिल्यावहिल्या अग्रलेखाकरता मुक्तसुनीत यांचे मनापासून अभिनंदन!! सर्वच मराठी माणसांच्या मनाच्या कोषात, मग तो निवासी असो वा अनिवासी, वास करत असणार्या या विषयाची अभिनिवेषरहित चर्चा घडवून आणण्याचे कार्य या अग्रलेखाने केले आहे. बाकीच्या भारतीय माणसांचे ठाऊक नाही पण मराठी माणूस हा कुठेही राहिला तरी मनाने मराठीच असतो हेच आमच्या पहाण्यात आले आहे. मग तो बंगळूरात असो की दिल्लीत! आणि अमेरिकेत असो की इंग्लंडात!! आपल्या परंपरांचा, सणवारांचा, चालिरितींचा अभिमान बाळगत आपण जगत असतो....
लग्न-मुंजीसारखे नात्यागोत्यात रमण्याचे प्रसंगही बर्याचवेळा चुकल्याची चुटपुट कायमसाठी लागून राहते.
चतुरंगजी, तुम्ही लग्न-मुंजीचं म्हणताय, पण खरं दु:ख्ख केंव्हा होतं माहितीये? आपले आई-वडिल जेंव्हा निधन पावतात तेंव्हा ताबडतोब जाण्याची तयारी असूनही आपण पोहोचेपर्यंत तिथे अंत्यविधी पूर्ण झाला असेल, आपल्याला अंत्यदर्शन घडणार नाही ही जाणीव उरात घेऊन माणूस जेंव्हा तो २४-३० तासांचा प्रवास करतो तेंव्हा!!! अर्थात यात फक्त इंग्लंड-अमेरिकेचाच संदर्भ नाही. माझ्या एका मित्राला त्याची आई गेल्यावर दिग्बोई (सैन्यात असल्याने) ते सावंतवाडी हा प्रवास करायला लागला होता!!
काही जाणत्या लोकांना धन्यवाद की पर्सन ऑफ इंडीयन ओरीजीन ह्या कागदपत्राने त्यांनी ही परदेशस्थ भारतीयांना आपले मुळ टिकवून ठेवायला एक संधी दिली आहे.
सहजराव, खरं आहे! इतक्या वर्षांनंतर का होईना तो कायदा करण्यासाठी जोर लावल्याबद्दल भारतीय राजकारण्यांची (मग कसे का असेनात ते!) अनिवासी जनता अत्यंत आभारी आहे.
देशादेशातल्या सुसंस्कृत माणसांना कृत्रिम भिंतींच्या नि सीमारेषांच्या पलिकडे पोचण्याशिवाय पर्याय नाही. "हा महत्त्वाचा विचार मुक्तसुनीत यांनी प्रभावीपणे मांडला आहे.
सहमत! आणि श्री. मुक्तसुनीत यांनी या विषयाचा इतका उत्तम परामर्ष आपल्या अग्रलेखात घेतलेला आहे की त्यावर टिप्पणी करण्यासारखे वा त्याच्यात भर घालण्यासारखे आम्हाला तरी काही सुचत नाही.
सुरवात तर सुरेख झाली आहे! श्री. मुक्तसुनीत यांनी अपेक्षा अतिशय उंचावून ठेवल्या आहेत. तेंव्हा यापुढे लिहिणार्या भविष्यातील सर्व पाहुण्या संपादकांना आमच्या शुभेच्छा!!
-पिवळा डांबिस
8 Jul 2008 - 3:58 am | कोलबेर
मुक्तसुनीत ह्यांच्या अग्रलेखाने उंचावलेल्या अपेक्षा अगदी पुरेपूर पूर्ण केल्या. त्यावर आलेल्या प्रतिक्रियाही बोलक्या आणि वैचारीक आहेत.
सॅम्युअल हंटींगटन् ह्यांच्या 'क्लॅश ऑफ सिव्हीलायजेशन' ह्या उत्कृष्ट पुस्तकाची आठवण करुन देणारा लेख वाटला. हंटींगटन सायबाच्या म्हणण्या प्रमाणे माणसाची खरी ओळख ही देश/धर्म/विचारसरणी ही नसून त्याची 'संस्कृती' (ज्या संस्कृतीत तो वाढला ती) आहे. कळत नकळत देशापेक्षा जास्त जपली जाते ती संस्कृती. देशा बद्दलच बोलायचे झाले, तर जर इच्छा असेल , मनाची तयारी असेल आणि त्याला कर्तृत्वाची जोड असेल तर कुणीही एका सही शिक्क्या मध्ये आपला देश बदलू शकतो. पण आपण ज्या संस्कृतीत वाढलो त्याच्याशी असलेली नाळ कधीच तोडता येणार नाही.
डांबीसरावांचा सुलेश आणि पाकिस्तानी अब्दुल खान. ह्यांचे जे मेतकुट जमले ते ह्याच सामायीक धाग्यामुळे. हाच सुलेश एखाद्या चिनी माणसा बरोबर राहिला असता तर त्याच्याशी कदचित इतकी घनिष्ठ मैत्री होऊ शकली नसती, कारण कोपर्या वरच्या दुकनातुन जिलब्या आणि समोसे आणून त्यावर ताव मारत लता मंगेशकरची गाणी लावुन सुलेश त्याच्याशी कधीच गप्पा मारू शकला नसता.
8 Jul 2008 - 8:44 am | पिवळा डांबिस
कारण कोपर्या वरच्या दुकनातुन जिलब्या आणि समोसे आणून त्यावर ताव मारत लता मंगेशकरची गाणी लावुन सुलेश त्याच्याशी कधीच गप्पा मारू शकला नसता.
खरं आहे!
फक्त गाणी "झीनत अमान"ची! ती कोणी गायलीयत याची अब्दुलखान फिकीर करीत नसे!!
:)
8 Jul 2008 - 4:39 am | बबलु
पाहुणा संपादक, अतिशय छान लेख.
आणि पेठ्कर साहेबांचा reply उत्तम.
8 Jul 2008 - 5:03 am | संदीप चित्रे
मुक्तसुनीत ...
सर्व प्रथम हार्दिक अभिनंदन ! विचार प्रवृत्त करणारा लेख विचारपूर्वक लिहिल्याबद्दल !! :)
एन.आर.आय लोकांची घालमेल एक वेगळाच प्रकार असतो. तीन आठवड्यात देश डोळ्यांनी पिऊन घ्यायचा, बँक बॅलन्सला भगदाड पाडून घ्यायचं आणि शरीरानं दमून पण मनानं ताजं होऊन परतायचं ...ते पुढच्या भारतवारीची वाट पहात !! आपले आई-वडील इथे आले की चार - सहा महिन्यांचा सहवास आधाशासारखा साठवायचा आणि त्यांना इथला विंटर न झेपणार्या जागी राहतो म्हणून कुढायचं. मुलांच्या संस्कारांत अचानक घडणारे चांगले बदल पाहून सुखवायचं आणि मग जाणवतं आपण कितीही प्रयत्न केला तरी आजी - आजोबा ह्यांची जादू वेगळीच !!!
आता कुणी म्हणेल मग एवढं वाटतं तर जावं भारतात परत, कुणी अडवलंय ?
(पण प्रत्येक सोप्या प्रश्नाचं उत्तरही सोपं असतंच असं नाही ना !!!)
स्वत:पुरतं बोलायचं तर आमच्या मुलाचा जन्म इथे झाला म्हणून त्याचा अमेरिकन पासपोर्ट पहिल्यांदा हातात घेताना माझी आणि बायकोची एकमेकांबरोबर जी अस्वस्थ नजरानजर झाली ती शब्दांत मांडणं योग्य नव्हे. माझी खात्री आहे अनेक जोडप्यांमधे तसाच मूक संवाद झाला असेल.
चला इथेच थांबावं पण पुन्हा एकदा तुमचं हार्दिक अभिनंदन !
--------------------------
www.atakmatak.blogspot.com
--------------------------
8 Jul 2008 - 11:11 am | झकासराव
अग्रलेख :)
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao
8 Jul 2008 - 1:46 pm | व्यंकट
आणि चांगला अग्रलेख... सविस्तर प्रतिसाद देईनच.
व्यंकट
8 Jul 2008 - 5:12 pm | मनिष
मुक्तसुनीत यांचा लेख अपेक्षेप्रमाणेच उत्कृष्ट झाला आहे. त्यांनी मांडलेले मुद्दे निश्चितच विचार करण्यासारखे आहेत. मधे "स्व...देश" हे भूषण केळकर ह्यांनी संपादने केलेले पुस्तक वाचले. त्यातील बर्याच परतणार्या एन आर आय चा सूर असा होता -- आम्ही एवढी समृद्धी, पैसा सोडून इथे परत भारतात आलो, आणि इथे साधं XYZ मिळत नाही, होत नाही म्हणजे काय?? आता हे XYZ - गॅस पासून शाळेच्या ऍडमिषन पर्यंत काहिही असेल. त्यात बरेच जणांनी कित्येक पाने खर्च केलीत ती हे सिद्धे करण्यात कि इथल्यापेक्षा तिथे आम्हाला किती चांगला स्कोप होता....वैताग येतो ते वाचून किंवा ऐकून. अरे मग कशाला परत आलात?? जी काही कारणं असतील पण परतण्याचा निर्णय तुमचाच होता ना? मग का उठसुठ शिव्या घालताय जिथे तुम्ही शिकलात, वाढलात त्या भारताला? निर्णय तुमचाच होता ना?
तसेच तिथे रहाणार्यांबाबत - कोलबेर म्हणाले त्याप्रमाणे आपण जगतो ते आपल्या संस्कृतीबरोबर...देश/धर्म/विचारसरणी ह्यांच्यापेक्षाही जवळची ती संस्कृती. त्याचबरोबर परक्या देशाची संस्कृती उंबरठ्याबाहेर असतेच. जसा भोवतालच्या वातावरणाचा आपल्यावर परिणाम होतो, तसाच आपणही यथाशक्ती आपल्या भोवतालच्या वातावरणावर परिनाम करतो. ह्या दोन्हीमधून तयार होते ती स्थळांतरीतांची, संक्रमणाची संस्कृती....त्यात दोन संस्कृतींची सरमिसळ होणारच....पण वेगवेगळ्या प्रमाणात, ते प्रमाण ज्या त्या व्यक्तिवर/कुटुंबावर अवलंबून असेल..तिथल्या सोयी, सुविधा आणि समृद्धी हवी पण भयाण एकाकीपण, (आपल्या दृष्टीने) टोकाचे व्यक्तिस्वातंत्र्य, भांडवलशाहीचा अतिरेक - त्यातून अपरिहार्यपणे येणार कंस्युमरीझम - त्यापेक्षाही वाईट म्हणजे, माणसालाच वस्तू समजणारी तिथली जीवनशैली हयांचा काही लोकांना उबग येतो...शिवाय आपली मुळे, संस्कार इथले असतील तरी मुलांवर बाहेर, शाळेत संस्कार होतात ते तिथल्या परक्या संस्कृतीचे...त्याचा प्रभाव किती राहील हे पुर्णपणे आपल्या हातात नसते. मग १४-१५ वर्षाच्या मुलाला/मुलीला हातात कॉन्ट्रासेप्टीव्ह देऊन "have fun" म्हणण्याची मानसिक तयारी आहे का हे पण तपासावे! खरं तर ८-१० वर्षे तिथे वाढलेल्या लहान मुलांनाही परत इथे आणने हे महा-कठीण काम असते. त्यात खरच घरका-न-घाटका अशी अवस्था होऊ शकते... पण तिथे रहायचे हा निर्णय तुमचाच होता ना?
कुठलाही निर्णय असला तर तो एक "पॅकेज डील" म्हणून येतो...थोडेफार इकडे-तिकडे होऊ शकते, पण मुळात हे पॅकेज डीलच. मग आपल्याच निर्णयाचे एकदा प्राईस-चॉईस इक्वेशन मांडून बघावे....काय मिळवण्यासाठी काय गमवाए लागते ते तर बघावे...मग आपली त्याची मान्सिक तयारी झाली कि मग निर्णय अंमलात आणतांना फार घालमेल होत नाही. मुळात इकडे-तिकडे बोट दाखवण्याऐजी तिकडे जाण्याचा किंवा परतण्याचा -- कुठलाही असला तरी तो निर्णय आपलाच होता हे स्वीकारावे...नाहीतर दोन्ही बाजुंनी हवे तितके मुद्दे मिळतात वाद घालायला.
8 Jul 2008 - 11:32 pm | llपुण्याचे पेशवेll
मुक्तसुनीत यांचा अग्रलेख तर उत्तमच पण इथे आलेल्या अनेक प्रतिक्रियांचे संपादन केले तर अजून एक उत्तम अग्रलेख तयार होईल असे वाटते. चतुरंग, पेठकरकाका, पिडांकाका आणि इतर अनेकानी उत्तमोत्तम प्रतिक्रिया दिल्या आहेत. सर्वच वाचनीय. संदिपने मांडलेला अमेरिकन पासपोर्टचा मुद्दा म्हणजे भारतीय आई-वडीलांच्या अमेरीकन मुलाना देशात काय काय समस्या येऊ शकतात याची नांदीच आहे.
शिवाय आपली मुळे, संस्कार इथले असतील तरी मुलांवर बाहेर, शाळेत संस्कार होतात ते तिथल्या परक्या संस्कृतीचे...त्याचा प्रभाव किती राहील हे पुर्णपणे आपल्या हातात नसते. मग १४-१५ वर्षाच्या मुलाला/मुलीला हातात कॉन्ट्रासेप्टीव्ह देऊन "have fun" म्हणण्याची मानसिक तयारी आहे का हे पण तपासावे! खरं तर ८-१० वर्षे तिथे वाढलेल्या लहान मुलांनाही परत इथे आणने हे महा-कठीण काम असते. त्यात खरच घरका-न-घाटका अशी अवस्था होऊ शकते... पण तिथे रहायचे हा निर्णय तुमचाच होता ना?
हेही अगदी पटले.
उत्तम लेखाबद्दल सुनीतरावांचे आभार.
पुण्याचे पेशवे
8 Jul 2008 - 10:27 pm | सखी
कोणतीही एकच बाजु न घेता तटस्थपणे केलेले विश्लेषण आवडले.
सर्वसाक्षींनी म्हटल्याप्रमाणे - सुंदर उपक्रम, सुंदर प्रतिसाद, सुरेख अग्रलेख.
मुक्तसुनीत, तात्या आणि मिपाचे हार्दिक अभिंनंदन!
9 Jul 2008 - 2:38 am | शितल
एन्.आय्.रायच्या मनाची घालमेल व्यवस्थित टिपली आहे.
आणि मानवी स॑क्रमण ही होतच राहणार.
पेठकर काका॑ची प्रतिक्रीया ही अतिशय बोलकी आणि जिव॑त.
पाहुणा स॑पादक एक छान लेख वाचायला मिळाला.
धन्यवाद.
9 Jul 2008 - 3:07 am | प्रियाली
असा चांगला उपक्रम सुरू केल्याबद्दल मिपा आणि मिपापरिवाराचे अभिनंदन!
9 Jul 2008 - 3:26 am | श्रीकृष्ण सामंत
अग्रलेख आवडला.
एक गोष्ट मात्र खटकली ती अशी.
अग्रलेखात म्हटले आहे
"अमेरिकेचे नागरिकत्व स्वीकारण्याची माझी वेळ अजून काही आली नाही. परंतु ऐकीव माहितीवर आधारित जे कळले ते असे की, नागरिकत्वाच्या प्रक्रियेमधे अशी एक पायरी येते जिथे तुम्हाला अशा अर्थाच प्रश्न विचारलेला असतो : उद्या समजा , अमेरिकेचे आणि तुमच्या मातृभूमी असणार्या देशाचे युद्ध झाले, तर तुमची सहानुभूती, तुमची एकूण प्रतिक्रिया कुणाच्या पक्षाला फायदेशीर ठरेल अशी असेआहे."
हे कांही खरं नाही.अर्थात वरील माहिती ऐकीव असल्याच्या माहितीवरून असल्याने गैरसमज होवू नये म्हणून हा खुलासा.
१ ते १०० प्रश्न असतात त्यातील कुठलेही १० प्रश्न मुलाखतीत विचारले जातात.त्या १०० प्रश्नात वर उल्लेखलेल्या प्रश्नासारखा प्रश्न किंवा तसा संदर्भ येईल असा प्रश्न नाही.
INS Citizenship Test Questions
http://usgovinfo.about.com/blinstst.htm
वरिल साईटवर क्लिक करून सर्व प्रश्न कुणालाही वाचता येतात,-वाचकापैकी कुणीही हवं तर पहावी- त्याची योग्य उत्तरे पण अभ्यासासाठी दिली जातात.
ह्या १०० प्रश्नाच्या बाहेर कुठलाही प्रश्न विचारण्याची परवानगी नाही.
मी स्वतः अमेरिकन सिटीझन असल्याने आणि ह्या नाकरिकत्वाच्या प्रक्रियेमधून गेलो असल्यामुळे असं लिहित आहे.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
9 Jul 2008 - 11:23 pm | वरदा
चांगली माहीती आहे ...
"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt
10 Jul 2008 - 12:25 am | धनंजय
नागरिकत्वाच्या शपथेचे पाठ्य :
त्यातले काही महत्त्वाचे भाग येणेप्रमाणे:
I hereby declare, on oath,
* that I absolutely and entirely renounce and abjure all allegiance and fidelity to any foreign prince, potentate, state, or sovereignty of whom or which I have heretofore been a subject or citizen;
...
that I will support and defend the Constitution and laws of the United States of America against all enemies, foreign and domestic;
...
that I will bear arms on behalf of the United States when required by law;
"यापूर्वी जिथला प्रजाजन किंवा नागरिक होतो त्या ... राज्याच्या किंवा सार्वभौमत्वाच्या निष्ठेचा आणि विश्वासार्हतेचा पूर्णपणे त्याग करतो आणि नकारतो"
"सर्व अंतर्गत आणि बाह्य शत्रूंविरुद्ध अमेरिकेच्या घटनेचे समर्थन आणि संरक्षण करीन"
"कायद्याने जरुरीचे असल्यास अमेरिकेच्या बाजूने शस्त्र बाळगेन"
ही सर्व शपथवचने एकत्र वाचता, असे लक्षात येते, की जर कधी मायदेशाचे अमेरिकेशी युद्ध झाले, किंवा अमेरिकेच्या राज्यघटनेला मायदेशाकडून धोका येऊ शकला, तर मायदेशाशी शपथ घेणार्याची निष्ठा नसेलच, शपथ घेणारा अमेरिकेचे (घटनेचे) संरक्षण करेल, किंवा कायद्याने जरुरीचे असल्यास अमेरिकेच्या बाजूने शस्त्रे बाळगेल, त्यांचा वापर मायदेशाच्या विरुद्ध असो नसो, कारण त्या मायदेशाशी निष्ठा शपथपूर्वक त्यागलेली असते.
मला वाटते बहुतेक शपथ घेणारे "जर कधी" शब्दांवर विचारात जोर देत असावेत, आणि "असे कधीच होणार नाही" असे स्वतःला मनापासून पटवत असावेत. कारण आपल्या हयातीत मायदेशाने अमेरिकेच्या घटनेला धोका पोचवला नाही, तर मायदेशावरची आंतरिक निष्ठा खरोखर त्यागून मायदेशाविरुद्ध कारवाई करण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही.
श्रीकृष्ण सामंत यांच्या मनात, किंवा ही शपथ घेतलेल्या अन्य लोकांच्या मनात काय विचार आलेत ते जाणून घ्यायला आवडेल.
11 Jul 2008 - 11:38 am | श्रीकृष्ण सामंत
धनंजयजी,
आपण म्हणता अगदी तसेच विचार शपथ घेताना माझ्या मनात आले.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
10 Jul 2008 - 1:05 am | खादाड_बोका
जननी जन्मभुमीश्च स्वर्गादपि गरियसी :(
10 Jul 2008 - 9:04 pm | अविनाश ओगले
लेख अतिशय आवडला. नव्या संकल्पनेची दमदार सुरवात. व्वा!
11 Jul 2008 - 10:56 am | शिप्रा
खुप खुप छान लिहिले आहे..संपाद्कांनि आणि इतर लोकांनि पण ...
>>मग १४-१५ वर्षाच्या मुलाला/मुलीला हातात कॉन्ट्रासेप्टीव्ह देऊन "have fun" म्हणण्याची मानसिक तयारी आहे का हे पण तपासावे!
अगदि खरे आहे...मि तिथे असताना तेथिल मुलांसाथि हे बघितले आहे...आणि तेव्हाच मला आपल्या संस्क्रुतिबद्द्ल अभिमान वाट्ला...
जिथे कमी तिथे आम्ही ..:)
30 Jul 2008 - 9:24 pm | सुवर्णमयी
मुक्तसुनीत,तुमचा लेख अतिशय आवडला. अमेरिकेतच असल्याने कदाचित जास्त चांगल्याप्रकारे रिलेट करता आले.
सोनाली