मिपा संपादकीय - अरे एनारायेनाराय !
विशेष
सर्व मापबाप मिपाकरांच्या शुभेच्छांमुळे व आशीर्वादामुळे पाहुण्या संपादकाने लिहिलेल्या मिपाच्या साप्ताहिक संपादकीय सदराचा शुभारंभ करण्यास मिपाला अत्यंत आनंद होत आहे. मिपा व्यवस्थापन हा उपक्रम लोकमान्य टिळक यांच्या पवित्र स्मृतीस समर्पित करत आहे. धन्यवाद...
अरे एनारायेनाराय !
जून महिना संपत आला की अमेरिकेत वारे वाहू लागतात राष्ट्रीय सुटीचे - अमेरिकेच्या स्वातंत्र्यदिनाचे. शहराशहरांमधून अमेरिकेचा राष्ट्रध्वज घरांवर , सरकारी कार्यालयांवर , नगरातील सार्वजनिक स्थळांवरील ध्वजाच्या खांबांवर फडकायला सुरवात होते. दुकानादुकानातून , "मॉल्स्"मधून झेंडे आणि इतर राष्ट्रप्रेमाची प्रतिके विकायला निघतात. फटाके विकणारे तात्पुरते गाळे उघडतात. आपल्या देशाचा जन्मदिन साजरा करण्याच्या या वातावरणात प्रत्येक अमेरिकन या ना त्या कारणाने - प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रीतीने - काहीनाही , तर सुटीचा उपभोग घेऊन तरी - सामील होतोच. ज्या भूमीमधे माझी नि माझ्यासारख्या , जन्माने भारतीय असणार्या लक्षावधींची छोटीमोठी कारकीर्द घडते आहे, घडली आहे त्या देशाच्या आयुष्यातील एका महत्त्वाच्या दिवसानिमित्त , एका स्थलांतरिताच्या मनातले हे थोडेसे विचार.
ज्यांची वर्गवारी एनाराय म्हणून केली जाते त्या व्यक्तींच्या समूहाला मखरात बसवण्याचा , किंवा त्याच्यावर कठोर प्रहार करण्याचा या लिखाणाचा उद्देश नव्हे. किंवा त्या समूहाच्या प्रश्नांना कुरवाळत बसण्याकरता , त्यांचे प्रश्न इतरांच्या प्रश्नापेक्षा कसे महत्त्वाचे आहेत हे प्रच्छन्नपणे सुचविण्याकरतादेखील - म्हणजे पर्यायाने स्वतःभवती आरत्या ओवाळण्याकरता - हे लिहीलेले नाही. मला माझ्या आयुष्यातून , माझ्या आजूबाजूला असणार्या परिस्थितीतून जे दिसते, जे प्रश्न पडतात , आणि जी काही मोजकी उत्तरे मिळालेली आहेत त्यांचा हा थोडासा वेडावाकडासा उहापोह.
"मी कोण ?"
लहानपणी अनेक उखाणे आजी ऐकवायची. त्यातल्या एका प्रकारचा उखाणा असायचा " मी कोण" ? " गडगड जातो, गाडा नव्हे. सरसर जातो , साप नव्हे. गळ्यात जानवे, ब्राह्मण नव्हे. मग मी कोण ?" असा त्यातला एक उखाणा. स्वत:च्या ओळखीबद्दल विचार करता , परदेशस्थ स्थलांतरितांची अवस्था , अशी , न सुटलेल्या उखाण्यासारखी झाली तर नवल ते काय ? "डॉलर कमावतो, अमेरिकन नव्हे, इंडीयावर प्रेम करतो, इंडीयन नव्हे, साहित्य संमेलन भरवतो , महाराष्ट्रीय नव्हे , तर मी कोण !" असा तो उखाणा बनतो. अमेरिकेचे नागरिकत्व स्वीकारण्याची माझी वेळ अजून काही आली नाही. परंतु ऐकीव माहितीवर आधारित जे कळले ते असे की, नागरिकत्वाच्या प्रक्रियेमधे अशी एक पायरी येते जिथे तुम्हाला अशा अर्थाच प्रश्न विचारलेला असतो : उद्या समजा , अमेरिकेचे आणि तुमच्या मातृभूमी असणार्या देशाचे युद्ध झाले, तर तुमची सहानुभूती, तुमची एकूण प्रतिक्रिया कुणाच्या पक्षाला फायदेशीर ठरेल अशी असेआहे.भारताच्या संदर्भात प्रश्न खूप काल्पनिक परिस्थितीबद्दलचा आहे. एकूण जगाच्या राजकारणाची परिस्थिती पहाता असे होणे दुरापास्त आहे खरे. एकूण सगळ्या खंडीभर प्रश्नांपैकीचा हा प्रश्न असेलही . पण उत्तर देताना कुणाचा हात कापत नसेल ? आणि अशावेळी आपल्या स्वतःच्या ओळखीबद्दलचा - आयडेंटीटीबद्दलचा - यक्षप्रश्न अनेकाना सतावला नसेल काय ? "बलुतं" या आपल्या आत्मचरित्राच्या एका भागात दया पवार यांनी , अस्पृष्य समजल्या जाणार्या वर्गातून आर्थिक संक्रमण करणार्या त्यांच्यासारख्यांना काही प्रसंगी त्यांच्या आप्तांकडून आणि समाजातल्या तथाकथित उच्चवर्णीयांकडून काही वेळा जी वागणूक मिळाली त्याचे चित्रण केले आहे. अशी वागणूक त्यांना नेहमी मिळाली नसेल , थोड्या लोकांकडूनच कधी मिळाली असेल ; परंतु त्या त्या प्रसंगीच्या डंखातून " आपण नेमके कोण" या प्रश्नाला नेहमी अधोरेखित केले गेले; अशा अर्थाचे पवार यानी लिहीलेले आहे. एनाराय माणसांची नि पवार यांच्यासारख्यांच्या कमालीच्या प्रतिकूल परिस्थितीची मला बिलकुल तुलना करायची नाही. पण "संक्रमणशील व्यक्तींना येणारे अनुभव" या एका सदराखाली त्यात काहीतरी मिळतेजुळते आहे असे मला वाटले खरे.
" दीवार और पूल"
असे जर का असेल तर या प्रकारच्या यक्षप्रश्नांची उत्तरे नक्की काय आहेत ? दीवार चित्रपटातला तो सुप्रसिद्ध संवाद आठवतो. "ये वही पूल है जिसके नीचे हम रहा करते थे. लेकीन ये दीवार जो हम दोनोके बीचमे खडी है , वो इस पूलसे बहोत बडी है भाई !" म्हणजे शेवटी त्रिशंकू बनायचे की दुवा बनायचे याचा निर्णय घ्यायची वेळ ही येतेच. भले राष्ट्रांचे राज्यकर्ते एकमेकांवर हल्ले चढवोत, भले खुद्द अमेरिकेचे नग्न , पाशवी सत्ताकांक्षेचे रूप जगासमोर येवो , पण देशादेशातल्या सुसंस्कृत माणसांना कृत्रिम भिंतींच्या नि सीमारेषांच्या पलिकडे पोचण्याशिवाय पर्याय नाही. मराठी भाषेच्या नि भारतीयत्वाच्या संकल्पना प्रसरणशील नि सामावून घेणार्या बनल्याखेरीज पर्याय नाही. कै. व. पु. काळे हे माझे प्रचंड आवडते लेखक नव्हते. पण त्यांच्या एका कथेतले वाक्य मला लक्षात आहे. : " काही लोकाना इन्फेरियॉरिटी कॉम्प्लेक्स् असतो. काही लोकांना सुपेरियॉरिटी कॉम्प्लेक्स असतो. जे.के. ला 'इक्वालिटी कॉम्प्लेक्स्' होता !" एनाराय मंडळींच्या संदर्भात हे विधान खरे आहे असे मला वाटते. तुमचे मराठी भाषेवरचे प्रेम नि तुमचे अमेरिकन् वास्तव्य या दोन गोष्टी एकमेकांना छेद देत नाहीत. आपल्या सुदैवाने , इराकी अमेरिकनांना नागरिकत्व स्वीकारताना "त्या" प्रश्नाला उत्तर देताना ज्या नैतिक शृंगापत्तीला तोंड द्यावे लागले असेल ती आपत्तीसुद्धा आपल्या नशीबी नाही. "दीवार"ची उपमा पुढे न्यायची तर गमतीने असे म्हणावेसे वाटते : "ज्या भाषेच्या पुलाखाली आपण सर्व वाढलो, तो पूल सातासमुद्रांपेक्षा मोठा आहे. राष्ट्राराष्ट्रातल्या भिंतींपेक्षा उंच आहे , त्याना ओलांडणार आहे. जिच्या छायेखाली वाढलो तिच्याच दुव्याने एकमेकांशी आपण बांधले गेलोत." "एकोहम बहुस्याम्"चा आपल्यापुरता अर्थ हा असा आहे असे मला वाटते.
"बदलती समीकरणे"
भारतातून स्थलांतरित झालेल्यांच्या संक्रमणाचा इतिहास लक्षात घेता , ६०-७० च्या दशकातल्या , प्रचंड प्रतिकूल परिस्थितीला सामना करणार्या पीढीपासून ते ९० च्या दशकातली एच-१ आणि डॉटकॉम पीढी ते नव्या शतकातल्या "आउटसोर्सिंग्"च्या लाटेवर स्वार झालेल्या भारतीय अर्थव्यवस्थेची लेकरे अशा ढोबळ पायर्या दिसतात. ६५ पासून सुरवात झालेल्या "ब्रेन ड्रेन" पासून चालू शतकात झालेल्या , "ब्रेन गेन"च्या घटनेपर्यंतचा इतिहास म्हणजे काळाच्या बदलणार्या पावलांची साक्ष आहे. आज जागतिक अर्थव्यवस्था आर्थिक सावटाखाली उभी असताना दिसते. दर काही वर्षांनी होणार्या भूकंपांमधे ज्याप्रमाणे भूगर्भातील टेक्टॉनिक् प्लेट्स् बदलतात , त्याप्रमाणे , जेव्हा अर्थव्यवस्था कूस बदलते तेव्हा हे संक्रमणशील एनाराय् कुठे असतील, त्यांचे काय होईल हा मोठा रोचक विषय होईल. कुणी सांगावे , आज जे शेकड्याने लोक भारतात कायमचे परत जात आहेत, उद्या परिस्थितीच्या रेट्याने ही संख्या हजारोंची बनली तर ?
पैशाचे गणित कुठल्याही दिशेने बदलो. तागडी कुठल्याही दिशेने फिरो. "मानवी संक्रमण" ही घटना चालूच रहाणार आहे. "जेथे जातो तेथे माझी भावंडे आहेत. जिकडे तिकडे माझ्या खुणा मला दिसताहेत" या केशवसुतांच्या ओळी उद्याही आपल्याला साथ देतील , दिलासा देत रहातील .
- पाहुणा संपादक : मुक्तसुनीत.
वाचन
16719
प्रतिक्रिया
0