देवाचिये द्वारी...

धन्या's picture
धन्या in जनातलं, मनातलं
27 May 2011 - 11:46 pm

देवाचिये द्वारी उभा क्षणभरी । तेणे मुक्ति चारी साधियेल्या ॥
हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा । पुण्याची गणना कोण करी ॥
असोनि संसारी जिव्हे वेगु करी । वेदशास्त्र उभारी बाह्या सदा ॥
ज्ञानदेव म्हणे व्यासाचिया खुणा । द्वारकेचा राणा पांडवा घरी ॥

ज्ञानीयांचा राजा ज्ञानदेवाने लिहिलेल्या हरिपाठाच्या सत्तावीस अभंगांपैकी हा पहिला अभंग.

हरिपाठ म्हणजे (हरि या) देवाचे नामस्मरण.

देवाच्या भक्तीचे अनेक प्रकार आहेत. नवविधा भक्ती वगैरे... पण देवभक्तीचा सर्वात सहजसुलभ मार्ग म्हणजे देवाचे नामस्मरण...

देवाचिये द्वारी उभा क्षणभरी । तेणे मुक्ति चारी साधियेल्या ॥

देवाच्या दाराशी तू फक्त क्षणभर उभा राहा.

... काल लालबागच्या राजाच्या दर्शनाला गेलो होतो. अरे केव्हढी मोठी रांग होती म्हणून सांगू. चक्क बारा तास लागले श्रींच्या दर्शनाला. तो हा अमका नटसुद्धा आला होता दर्शनाला...

कशाला जायचे बरे लालबागच्या राजाच्या दर्शनाला? कारण तो जागृत आहे. कारण तो नवसाला पावतो. कारण त्याच्या दर्शनाला अमका नट, तमका गायक सुद्धा येतो...
कोण म्हणतं की लालबागचा राजा जागृत आहे, कोण म्हणतं की तो नवसाला पावतो?

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात,

देव एका जागी जागृत । दुसरे जागी काय तें भूत ॥

लालबागचा राजा जागृत आहे, नवसाला पावतो. आणि मुंबईतील ईतर गल्लीबोळातील गणपती काय जागृत नाहीत? ते काय नवसाला पावत नाहीत?

आणि मुळात अमका देव जागृत आहे, तमका देव नवसाला पावतो हेच चुकीचं नाही का?

संतश्रेष्ठ तुकाराम म्हणतात,

नवसे कन्यापुत्र होती । तरी का करणें लागे पती ॥

मुंबईच्या कोकण नगर भांडूप (प) च्या नवतरूण मंडळाने बसवलेला हा गणपतीच आणि लालबागचा राजा हाही गणपतीच. मग लोक बारा बारा तास रांगेत उभं राहून लालबागच्या राजाच्या दर्शनाचा अट्टाहास का धरतात? दोन सरळ साधी कारणं, एक म्हणजे "आमच्याच साबणाने कपडे स्वच्छ निघतात" या चालीवरचं "लालबागचा राजा नवसाला पावतो" असं तंत्रशुद्ध मार्केटींग. आणि "मी लालबागच्या राजाला जाऊन आलो" असं सांगताना सुखावणारा आपला स्वत:चाच अहंकार...

खरंच यातून देव भेटतो?

... आरं काय सांगू किती गर्दी. ही म्होटी लायिन अगदी पार त्या गॉपालपुरापरत गेलेली. दिड दिवस रांग्येत उबा व्हतो तवा कुटं दर्शेन झाला...

पाच - पंधरा दिवस वारीत चालत जायचं. पुन्हा पंढरपूरला रांगेत एक दिड दिवस उभं राहायचं. कशासाठी? देवाला भेटण्यासाठी...
काही हजार लोकसंख्या असलेल्या त्या पंढरपूरात अचानक पाच सहा लाख लोक जमा झाल्यावर त्या शहराची, त्या शहरातील जनसामान्यांची काय अवस्था होत असेल? तिथल्या सोयीसुविधांवर किती ताण पडत असेल?

पण लक्षात कोण घेतो? खरंच एक दिड दिवस रांगेत उभं राहून विठोबा भेटत असेल?

ही झाली दोन मोठ्या देवस्थानांची प्रातिनिधीक उदाहरणे.
महाराष्ट्राच्या गल्लीबोळात असे रांगा लागणारे कितीतरी देव असतील.

कबीर म्हणतात,

जत्रा में बिठाया।
तिरथ बनाया पानी।।
दुनिया भई दिवानी।
हुई पैसे की धुलदानी।।

अगदी अशीच काहीशी अवस्था आपल्या देवांची आणि देवस्थानांची आहे.

हे सगळे देवाविषयीचे, देवस्थानांविषयींचे भ्रम तोडायला हवेत. खरा देव कशात आहे हे समजून घ्यायला हवं...

ज्ञानदेव म्हणतात,

देवाचिये द्वारी उभा क्षणभरी । तेणे मुक्ति चारी साधियेल्या ॥

अगदी काही क्षण देवाच्या दाराशी उभा राहा. बास फक्त एव्हढंच. फुलांचा हार वाहू नको. नारळ फोडू नको. देवाला नमस्कार करू नको. देवाच्या मूर्तीवर डोकं ठेवू नको. काही नको. फक्त देवाच्या दाराशी क्षणभर शांत उभा राहा. फक्त एव्हढ्यानेच तुझी जीवनातील चारी अवस्थांपासून (बालपण, तारुण्य, गृहस्थाश्रम आणि वानप्रस्थाश्रम) सुटका होईल.
पण मग असा क्षणभर शांत उभा राहू देणारा देव आणायचा कोठून? आमचे देव तर बारा बारा, चोवीस चोवीस तासांच्या रांगावाले. जनसागरात बुडून गेलेले.

आहे. असाही देव आहे.

जिकडे तिकडे शोधीत का रे, फिरशी वेड्यापरी
वसे तो देव तुझ्या अंतरी...

तुझ्या ह्रदयामध्येच असलेल्या देवाला नजरेसमोर आण. जी काही पुजा करायची ती त्या देवाची कर. कारण त्या देवाला ना तुला फुलं वाहायची गरज आहे, ना त्याच्या पायावर डोकं ठेवायची गरज आहे...

हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा । पुण्याची गणना कोण करी ॥

जर खरंच पुण्य कमवायचं असेल, देवाची भेट व्हावी असं वाटत असेल तर देवाचं नामस्मरण कर. देवाची भेट होण्यासाठी एक नामस्मरण पुरेसं आहे, बाकी कुठल्याच कर्मकांडात गुंतायची गरज नाही. रांगेत उभं राहणं नको, देवाला फुलं वाहणं नको किंवा अगदी देवाला नमस्कार करण नको... जे पुण्य तुझ्या गाठी लागेल त्याचं मोजमाप कुणालाच करता येणार नाही.

बरं, देवाचं नामस्मरण करायचं म्हणजे फक्त तेव्हढंच करायचं का? संसाराचं, प्रपंचाचं काय?

या प्रश्नाचं उत्तर ज्ञानदेव पुढच्या ओळीमध्ये देतात.

असोनि संसारी जिव्हे वेगु करी । वेदशास्त्र उभारी बाह्या सदा ॥

देवाचं नामस्मरण करण्यासाठी तुला संसार सोडण्याची गरज नाही. तुझी दैनंदिन कामे चालू देत. फक्त ती कामे करत असताना मुखाने हरीनाम घेत जा, न थकता. अर्थात ही कामे करताना तुला नीतीमुल्यांची चाड ठेवायला हवी.

ज्ञानदेव म्हणे व्यासाचिया खुणा । द्वारकेचा राणा पांडवा घरी ॥

ज्ञानदेव म्हणतात की नामस्मरणाने देव भेटतो हे मी काही माझ्या पदरचे सांगत नाही. व्यासांच्या महाभारताचा याला पुरावा आहे. द्वारकेचा राजा असलेला कृष्ण हा पांडवांना कसा भेटला? पांडवांनी अशी कृष्णाची काय भक्ती केली? काही नाही. पांडवांनी कॄष्णाचे सर्व परिस्थीतीत फक्त नामस्मरण केले...

किती सोपं आहे. पण आम्ही देवाला कर्मकांडात गुंतवून सारंच अवघड केलं आहे. कर्मकांडाने भरलेल्या भक्तीचा आज उदो उदो होतो आहे. अमक्या देवाला तमक्या रंगाची फुले आवडतात. सोमवार शंकराचा, मंगळवार गणपतीचा काय आणि काय...

देवळांमधल्या दगडाच्या मुर्तींसमोरच्या दानपेटया पैशाने तुडूंब भरून वाहत आहेत पण देवळाच्या बाहेर असणारा "माय पोटाला दोन पैसे द्या" म्हणणारा देव मात्र उपाशीच आहे. आयुष्यभर फकीराचं आयुष्य जगलेल्या साईबाबांच्या संगमरवरी मुर्तीला आज सोन्याचा मुकुट बसवला जात आहे. सबका मालिक एक अशी शिकवण देणार्‍या बाबांच्या दाराशी दर्शनासाठी पैसे देणार्‍यांची एक रांग आणि ईतरांची एक रांग असा उघडउघड भेदभाव केला जात आहे.

शिर्डीच्या साईबाबांचे अवतार महाराष्ट्रातच काय पण महाराष्ट्राच्या बाहेरही जन्म घेत आहेत, एखाद्या राजाला लाजवेल असं सुखासिन आयुष्य जगत आहेत, तश्या प्रकारची सेवा आपल्या भक्तांकडून करून घेत आहेत...

पण, दीनदुबळ्यांची सेवा करणार्‍या, आपलं सारं आयुष्य लोकांच्या अंधश्रद्धा, त्यांचं अस्वच्छ राहणीमान दूर करण्यासाठी वेचलेल्या आणि हे करताना "गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला" असं किर्तनांतून हरिनाम गाणार्‍या फाटक्या संत गाडगेबाबांचा अवतार मात्र महाराष्ट्राच्या बाहेरच काय पण महाराष्ट्रातही जन्म घ्यायला तयार नाही.

... हीच महाराष्ट्राची शोकांतिका आहे.

संस्कृतीप्रकटनविचार

प्रतिक्रिया

इंटरनेटस्नेही's picture

28 May 2011 - 2:53 am | इंटरनेटस्नेही

सुंदर!

गोगोल's picture

28 May 2011 - 5:59 am | गोगोल

..

टुकुल's picture

28 May 2011 - 6:16 am | टुकुल

लेख खुप आवडला आणी पटला ही...

मला ही कळत नाही की देवांसाठी आपण एवढा दान धर्म करायचा. सोनं, चांदीचे मुकुट चढवायचे, म्हणजे देवाला ते हव आहे म्हणुन करतो कि आपल्या फक्त मनाची समजुत करुन घेण्यासाठी करतो.. आणी केला तर केला, पण त्यात पण स्पर्धा.

नवस करुन त्यानंतर तो फेडणे म्हणजे तर निव्वळ व्यवहार आहे, ते द्या आणी हे घ्या.

--टुकुल

५० फक्त's picture

28 May 2011 - 6:40 am | ५० फक्त

छान लिहिलंय, असेच काहीसे विचार बोलुन दाखवल्याने बाबांचा मार खाल्लाय मि. आणि अजुन चार ओळी आठवल्या.

'' सये, पाय दगडी न दगडीच माथा , अशा देवळातुन जाउन ये तु '
('' सये, पाय दगडी न दगडीच माथा , अशा देवळातुन जाउ नये तु '))
न देई कधी घेतल्याविण त्याला, नमस्कार नेमस्त देउन ये तु'
(न देई कधी घेतल्याविण त्याला, नमस्कार नेमस्त देउ नये तु')

बाकी लिखाण मस्तच.

रणजित चितळे's picture

29 May 2011 - 9:56 pm | रणजित चितळे

कळते पण वळत नाही. माणूस व्हावत जातो.

लेख उत्तमच, आवडला.