खुप दिवसांपासुन कुठे डोंगरात फिरायला जायचा योग आला नव्हता. रवीवारी संगमनेरवरुन डोंबिवलीला येता येता, अचानक, मामाच्या गावी, राजुरला जाणं झाल. राजुरला पोहचायलाच रात्र झाली होती. शेवटी पहाटे लवकर निघु म्हणत, मुक्कमाचा बेत ठरला. जेवण झाल्यावर सहज, मामेभावाबरोबर बोलता बोलता, दुसर्या दिवशी कुठेतरी भटकायला जायचा प्लॅन ठरला, ऑफीसच कस मॅनेज करता येईल, हे कोड पाच मिनीटात सुटल.
राजुरसारख्या ठीकाणी असल्याने प्रचंड चॉईस होता. पाबरगड, कात्राबाई, अस्वल्या डोंगर, कुमशेत, आजोबा, हरिश्चंद्र, रतनगड व सांदण असे मस्त पर्याय होते (कळसुबाई मला फारसं नाही आवड्त उन्हाळ्यात ;-) ). पण चढता उन्हाळा व वेळ बघता सांदण किंवा रतनगड यात छापा/काटा केला. सांदण अगदीच सोप व बोरींग होईल असं माझं मत पडल. फायदा येवढाच की उन्हाचा त्रास वाचला असता. पण सांदण सहकुटुंब करायचा प्लॅन करत, आम्ही रतनगड नक्की केला.
सक्काळी सक्काळी आठच्या मुहुर्तावर जाग आली. राजुरमधुन निघायला दहा वाजले. कोरड्या रंधा धबधब्याशी डावे वळण घेत आम्ही दर्याच्या वाडीवरुन भंडारदर्याच्या बॅकवॉटरला उजवीकडे ठेवत अम्रुतेश्वराकडे, म्हणजे रतनवाडीला निघालो. वाटेत मुतखेल लागलं. काही वर्षापुर्वी, रतनगडावर वाट चुकल्याने, माझे मामेभाउ, राहुल व मयुर याच रस्त्याने पायपीट करत आले होते. आज, कार असल्याने तो धोका नव्हता. रस्ता नवीनच बनवला होता, नागमोडी वळन घेत चालवायला मजा येत होती.
अकरा वाजता अम्रुतेश्वरापाशी पोचलो. भल्या मोठ्या झाडाखाली गाडी लावली. पांढुरक्या पाषाणात कोरलेल्या त्या अप्रतीम शिल्पसौंदर्याला व त्याच्या अधिपतीला नमण केले. एक छोट कुत्र्याच पिल्लु उगाच शेपुट हलवत जवळ आल, सहज म्हणुन त्याला गोंजारल तर ते मागोमागच चालायला लागलं. रस्ता ओलांडत, उत्तुंग रतनगडाकडे नजर फेकली. माथ्यावर, रतनाबाईच्या मंदीरापाशी फडफडणार्या झेंड्याला, पापणी झुकवत कुर्णिसात केला. प्रवरेचा सुकलेला प्रवाह पायाखाली ठेवत एक-दो एक- दो चालु केलं. ठीकठीकाणी गावकर्यांनी पाण्यासाठी झीरे खोदले होते. एक दोन ट्रक, उघडी पडलेली वाळु भरुन नेत होते. थोडंस पाणी साठलेल्या ठीकाणाजवळ पाय पडला की, बेडकांची पलटण, जोरदार उडी ठोकत वाळुतुन पाण्यात पळायची.
शेवटी रतनगडाकदे वर चढणारी वाट लागली.
प्रवरेचे सुकलेले पात्र
आमचा हीरो अजुनही आमच्या बरोबरच होता, मामीने भरपुर खायला दिलय हे माहीत असल्याने त्याला येवु दीले.
हा सुरवातीचा रस्ता छान जंगलातुन जातो. जंगल हळुहळु दाट होते, वाट बारीक आणि सावली घनदाट होत जाते. वाढलेला ऑक्सीजन फुफ्फुसांना जाणवतो. छातीचा भाता हळुहळु मौसम पकडायला लागतो. रेडीएटरमधुन कुलंट फिराव तसं तापलेल रक्त कानातुन फिरायला लागत.
वा , ट्रेक चालु झाला.
दाट झाडीची वाट वर वर चढत गेली, मध्येच एका केसाळ काळ्या सुकलेल्या वस्तुकडे लक्ष गेलं. बहुदा बिबट्याने वा तरसाने मारलेल्या कोणा जनावराची ती कातडी होती (कारण कातडीचा थोडासाच भाग शिल्लक होता, बाकी बिबट्याने मटन बांधायला वापरला असावा). अस्वल किंवा रानडुक्कर असाव, पण अस्वल या भागात आढळतच नाही(आणी ते शिकार होत नाही). आमचा हीरो आनंदाने ती कातडी चघळायला लागला. जर या जंगलात अस्वल असतं तर मी तरी इथे फिरायच धाडस केल नसत.
अजुन थोडं वर गेल्यावर वाटेला फाटा फुटला, सरळ जाणारी वाट हरीश्चंद्राला, उजवीकडची रतनगडावर.
आम्ही तसच थोडं पुढे गेलो, कारण रीकाम्या झालेल्या पाण्याच्या बाटल्या भरायच्या होत्या. पण तिथे आमच्या आधीच काही पाहुणे पाणी पीत होते. भर उन्हाळ्यात या कुंडात भरपुर पाणी होत. रानातली सगळी जनावर पाणी प्यायला इथेच येतात, एकदा भर उन्हाळ्यात इथे रात्री मचान लावायला हवं.
एक लाकडी ओंडका पोखरुन त्यात गायांना पाणी पाजले जात होते. कारण त्यांनी सरळ पाण्यात तोंड टाकु नये. ठाण्याच्या चौहान काकांनी या आदिवासींकडुन काही शिकण्यासारख आहे.
आम्हीही आमच्या बाटल्या भरुन घेतल्या, हात पाय धुतले, डोक ओल केल, हीरोसाठी, लाकडी ओंडक्यात पाणी ओतल, आणी दीवाळीच्या आसपास, रतनगड ते हरीश्चंद्र असा प्लॅन तयार करुन वरची वाट पकडली.
आता वाट अजुनच उभी आणि चिवळ होत जाते. जंगल दाटतं, रातकीड्याचे आवाज वाढत जातात. इतक्यात खालच्या अंगाने झाडीत एक जोरदार खस्फस ऐकायला आली. गाय वगैरे नक्कीच नाही, कारण काहीतरी जोरात पळत गेलं. कदाचीत डुक्कर.. बाजुला पडलेली चांगली मजबुत काठी हातात घेतली. वरती वानर आणि माकड यांच्या टोळ्या भांडत होत्या. पण एखादच वानर दिसत होत. जंगल आपल्याला हजार डोळ्यांनी पाहत, पण आपण काहीच पाहु शकत नाही हे परत एकदा पटल.
शेवटी रतनगडांच दर्शन झाल, दरवाजा दिसला.. आणी त्याच्या खाली ती तुटकी शिडी,
या शिडीच्याच भितीने मी मागच्या वेळी माझ्या मुलाला गडावर आणले नाही. मयुर वर चढायला लागला. इतक्यात आमचा हीरो आला, व आम्हाला पार करुन पुढे निघुन गेला. च्यायला, अजुनही कुठला रस्ता आहे की काय? साला, हा जर वर आला तर परत येवुन तो रस्ता शोधायला हवा.
शिडीचा पत्रा पार तुटलाय. वर चढायला भिती नाही वाटली, पण पत्रा पार करताना, स्वता:ला जपलं. उजव्या बाजुला कोरीव पायर्या आहेत, भिंतीतल्या खोबनीत हात घालुन पत्रा पार केला. आपल्या पुर्वजांनी किती विचार करुन गड बांधलेत. जिथे अडचण वाटली तिथे हात टाकला की खोबन मिळत होती. शिडीपेक्षाही दरवाजाजवळची चढन उभी आहे. वरुन सुर्यनारायन सरळ डोळ्यात प्रकाश पाडत होते.
सावलीतुन उन्हात येताना डोळे दिपले, पण तसाच दरवाजा पार करुन उजवीकडे रतनाबाईच्या दर्शनाला वळलो.
डोळ्याने कुर्णिसात केलेल्या भगव्याचे मान वर करुन दर्शन घेतले. मान खाली घालत पाठीमागची दरी डोळ्यात भरुन घेतली. पुढे एक मुक्कामाची गुहा आहे. तीला लोखंडी ग्रील लावलय, एकदम सेफ.. गुहेपासुन थोड पुढे गेल की प्रवरेचा उगम.. बारीक धार वाहत होती. प्रवरेची अनेक रुपं मी पाहीलीत व अनुभवलीत. देवगडच्या संगमातली लीन प्रवरा, लोणी- श्रीरामपुरची राजकारणी प्रवरा, संगमनेरची भेळेच्या संगतीत अनुभवलेली प्रवरा, राजुरच्या पाठीमागे दिगंबरची स्वच्छ प्रवरा, रंध्यांतुन उसळत खाली झेपावणारी प्रवरा आणी आत्ता याक्षणी,... माझ्या मागे, भंडारदर्याने अडवलेली विस्तिर्ण पसरलेली प्रवरा तर पुढे बारीक धारेतुन स्त्रवणारी प्रवरा. माझा जन्म राजुरचा, पहीले पाणी प्यायलो तेच प्रवरेचे, आपोआप हात जोडले गेले. शेजारच्या पिंडीवर अभिषेक करुन मागे फिरलो.
आणी तितक्यात आमच्या हीरोचा आवाज ऐकायला आला.... च्यामारी.. म्हणजे हे रस्ता न सापडल्याने परत शिडीपाशी आलं होतं. आमच्या आठवणीने ओरडत होतं. मनोमन प्रार्थना केली की बेटा, पळ इथुन, जास्त वेळ थांबलास, व संध्याकाळी ओरडत बसलास तर फुकट एखाद्या तरसाची किंवा बिबळ्याची शिकार व्हायचास. त्याला आमच्याबरोबर येवु दील याबद्दल अपराधी वाटलं. लवकर हाकलुन द्यायला हव होतं.
तिथुन मागे फिरलो ते थेट गडाच्या अगदी डाव्या अंगाला.. समोर कात्राबाईचा अजस्त्र कडा.. त्या पलीकडे कुमशेतचे पठार, आणी त्यापुढे लपलेला आजोबा पर्वत.. या आजोबावर आम्ही दोन वर्षापुर्वी खुप आंबे खाल्ले होते. रायवल, पाडाचे.. अवीट गोडीचे..
वरती एक सुंदर पक्षी उडत होता.. उडत कसला, बेटा मस्त तरंगत होता. पुर्वेकडुन येणारी हवा कात्राबाईच्या कड्यावर आपटत वर उसळायची, आणी क्षणात हा मस्त शे दिडशे फुट वर जायचा. कड्यापासुन दुर गेला की परत खाली यायचा..
त्या बुरजावर एक कडी होती पुर्वी, तिचा बोल्ट अजुनही आहे तिथे. त्या कडीतुन दोर सोडुन खालच्या कोकणातले सामान वर ओढुन घेतले जायचे.. बैलाने दोर फिरवुन... तो बोल्ट पाहीला पण खाली वाकुन दरी पहायची हिम्मत नाही झाली.
तिथुन परत फिरताना राणीचा हुडा दिसला.. फारस काही माहीत नाही या वास्तुबद्दल मला, शोधायला हवं..
आता भुक लागली होती, एक उंबराचे झाड बघुन बैठक मारली. एकदम हीरोची आठवण आली, वर येताना त्याला अर्धी चपाती टाकली होती. घास घशात अडकला.. तो खाली उतरुन गेला असेल अशी आशा करत जेवन केले.. गप्पा झोडता झोडता जंगलाचा आणी इन्व्हेस्टमेंटचा विषय पॅरलल चालला होता. म्युच्युअल फंड, एस. आय पी यावरुन गाडी कळसुबाई- हरिश्चंद्र व्याघ्र प्रकल्पावर आली. या रानात बहुदा दोन पट्टेरी वाघ आहेत. जर त्यांच अस्तीत्व सिद्ध झाल तर कोयनेनंतर हा महाराष्ट्रातला दुसरा व्याघ्र प्रकल्प होइल.
"आत्ता जर वाघ इथे आला तर काय होइल?"
"काही नाही, आपल्या तिघांना पाहुन त्याची पंधरवाड्याची जेवणाची एस आय पी पक्की. फॉर्म घेवुनच येइल तो "
पण खरच, बिबट्याचे काही वाटत नाही, पट्टेरी वाघाशी पंगा नाही घेता येणार.
जेवण झाल्यावर गडाच्या उजव्या अंगाकडे, नेढ्याच्या दिशेने निघालो. वाटेत दील्ली दरवाजा लागला.
खाली कोकणाचा भाग पसरला होता. आजोबाच्या पायथ्याचा म्हणजे डेहण्याकडचा प्रदेश दिसत होता. रतनगड व कात्राबाईचे पाणी पश्च्छीमेकडे घेवुन जाणारा मोठा ओढा पार सुकला होता. हा कुठल्या नदीला मिळत असेल? काळु? शोधायला हवं. ..
दील्ली दरवाजातुन उतरुन गडाबाहेर आलो. अतिशय कठीण पायर्या कुठेतरी खाली उतरत होत्या, बहुदा साम्रद्च्या बाजुला.. किंवा करोली घाटाकडे.. वारा भनानत होता.. कधीकाळी इथे या किल्याचा किल्लेदार उभा राहीला असेल, दुर कोकणातुन येणार्या एखाद्या काफील्याकडे त्याने डोळे रोखुन पाहील असेल.. त्याच्या आदेशाची वाट पाहत एखादी रखवालदार सैनीकी तुकडी सज्ज असेल. अंगावर काटा आला.
दरवाजातुन वर आलो, नेढ्याकडे निघालो, वाटेत एक भुयार दिसले. राहुलने सांगीतले, की या भुयाराच्या आत तिन- चार प्रशस्त खोल्या आहेत. जवळ टॉर्च नव्हता, म्हणुन हिम्म्त केली नाही,
माथ्यावर सुर्यही प्रेमाने तळपत होता. नेढ्याकडे जाणारी वाट दाट- नीसरड्या गवतातुन जाते, दरीच्या अगदी कडेने.. पाय घसरला तर सरळ शहापुर पोलीसांच्या शिव्या खायला लागतील.. मरनोत्तर.. पंचनाम्यासाठी माणसं नाही मिळत हो..
समोर अलंग कुलंग मदनची अभेद्य रांग पसरली होती. उजव्या हाताचे टेकाड चढुन नेढ्यात गेलो.
भणानता गार वारा होता.. वर्षातील काही दीवस सुर्य अगदी या नेढ्याच्या मागे मावळतो.. फोटो काढला तर छान डायमंड रींग मीळते. तिथे जरा पाठ टेकवली.. पण झोप नाही लागली. सुईतुन दोर्याने पलीकडे जावे तसं पलीकडे आलो. खुट्ट्याच्या दीशेने चालायला लागलो.
या बाजुला गडाचा कल्याण दरवाजा आहे. समोर रतनगडाची खुण असलेल खुट्टा शिखर दिसत होत. खाली साम्रदचे पठार व कोकणात तुटलेला सांदन दरीचा भाग अस्पष्ट दीसत होता. मागच्या वेळी सांदणमधुन खुट्टा बघताना त्याची भव्यता जाणवली नव्हती.. आज तो भव्य व दुर्गम वाटत होता.
" हनीमुनसाठी मस्त स्पॉट आहे" मागुन आवाज आला, राहुल होता..याच लग्न महीण्यावर आलय, तो तरी बिचारा अजुन काय विचार करणार? मग खुट्टा सुळका हा हनीमुन डेस्टीनेशन, व अनुशांगीक फायदे, यावर आमची चर्चा झाली. यावरुन मागच्या ट्रेकमधे राहुलनेच सांगीतलेली एक गोष्ट आठवली, या खुट्ट्याच्या आसपासच एक कडा आहे. त्यावरुन उतरायला एकच वाट आहे. या भागातला एक आदिवासी तरुण, शेतीचे काम झाले की आपले रेडे त्या जंगलात सोडतो, व ती वाट लाकडं टाकुन बंद करतो. दोन तीन महीने ते जनावरं मस्त चरत राहतात. फक्त पंधरा दिवसातुन एकदा जंगलात जावुन त्या जनावरांवर हात फिरवावा लागतो, नाहीतर ती जंगली होतात. वरच गवत संपल की मग पोसलेली जनावर घेवुन हा परत जातो. एकांड्या रेड्याच्या वाटेला बिबट्याही जात नाही.
खुट्याचे दर्शन घेवुन मागे फिरलो, कल्याण दरवाजातुन खाली उतरलो. हा दरवाजा भव्य आहे. दोन अडीच फुटी भव्य पायर्या सरळ खाली उतरतात. पायर्यांना मधे एक भेग आहे, तिथे संभाळुन पार व्हावे लागते. पाठीमागच्या गडाचा विस्तार अंगावर येतो. रतनगडाला अलवीदा करत आम्ही उतरायला लागलो.
समोर कडक उन पडले होते, पण त्यापलीकडे रतनाबाईची देवराई होती. दाट सावलीची..
आमची परतीची वाट तिथुनच जात होती. त्याहीपलीकडे सपाटीवर गाई परतुन चालल्या होत्या.. बहुदा सकाळी पाणवठ्यावर भेटलेल्या.. देवराईच्या सावलीत लवकर पोचता यावे म्हणुन झरझर पाय उचलत निघालो. वाट फारच नीसरडी होती. तरी नेटाने पाय रोवत नीघालो.
एकदाचे देवराईत पोचलो अन हायसे वाटले.. एकदम ओ-जनरल्च्या ए सी मधे बसल्यासारखे.. देवराई चांगलीच दाट होती, थोडा वेळ बसायची इच्छा होती पण ती इतकी गच्च होती की बसायलाही जागा नव्हती.
देवराई संपत असतानाच अचानक प्रखर प्रकाश जाणवला, १०-१५ मीटर व्यासाचे वर्तुळ मोकळे होते. आजुबाजुला सगळी झाडं व मधेच मोकळेपणा.. एक महावृक्षाचा कबंध ,अर्धवट जळलेला, मधे उभा होता. पायथ्याशी राख, बाजुलाच त्याचे एक खोड अर्धवट जळालेले दिसले. कोळश्यासाठी जाळला? कि गतवर्षीच्या वणव्यात जळाला? पण राख ताजी वाटत होती. शिवाय आसपासच्या झाडांवरही काही खुना दिसत नव्हत्या. घट्ट दाट बासुंदीत मीठाचा खडा पडावा तस झालं. काळजातुन हळहळलो. शे दीडशे वर्ष जुण्या त्या महावृक्षाला मनोमन नमस्कार केला.
देवराई संपली तसे एका छान बांधीव मार्गावर आम्ही आलो. उजवीकडचा रस्ता आम्ही सकाळी गेलो होतो त्या पाणवठ्याकडे जातो, आम्ही डावा रस्ता पकडुन पठाराची वाट धरली. वाटेत थांबुन परत पोटात पाणी भरुन घेतलं. बाजुलाच ओळीने काही खड्डे दिसले. पावसाळ्यात रानडुक्कर गांडुळ खाण्यासाठी अशी जमीन उकरतात. राहुल बरोबर असला की माहीती अगदी पटकन मीळते.
पठार ओलांडल आणी एक संकट समोर उभ राहील. पठारावरचे गवत राब करण्यासाठी व वणव्याने पेटवलेले होते. ते जळुन गेलेले काळे गवत सगळीकडे पसरले होते. त्यामुळे पायवाटा बुजल्या होत्या. पठारावरुन खाली उतरायची वाट काही सापडेना. एका ठीकाणी पाण्याच्या वाटेने उतरलोही, पण ती वाट एका मोठ्या कड्यावरुन सरळ खाली तुटत होती. या सगळ्यात अर्धा तास गेला. शिल्लक पाण्याचा हिशोब केला, अजुन दीड बाटली होती. परत मागे फिरलो. उजवीकडे वळत पाववुलवाट शोधली. मग मात्र अगदी अनायासे खाली उतरलो. उतरल्यावर करवंदांचा व चिकाळ्या कैर्यांचा समाचार घेतला. प्रवरेच्या बांधावर हात पाय धुतले. सहा वाजले होते, बरोबर सात तास.. परत एकदा रतनगडाकडे पाहीलं, गाडीला चावी मारली.. संदीप खरेला बोलत केलं. मस्त मूड जमला...
धरणाच्या कडेने भंडारदरा क्रोस करत असतानाच मयुर ओरडला.. अरे, धबधबा चालु झाला.. भंडारदर्याचा प्रसिध्द, राज कपुरच्या आवडीचा "अंब्रेला फॉल" चालु झाला होता. फेसाळत पाणी मस्त छत्रीच्या आकारात उसळात होत, फक्त ती छत्री साधारन २०० फुट व्यासाची होती. एस एल आर कॅमेरा नाही म्हणुन स्वता:ला शिव्या घातल्या..
एका छान ट्रेकची तितकीच छान सांगता झाली.
प्रतिक्रिया
26 Apr 2011 - 9:43 pm | स्पा
वर्णन झकासच...
पण एकही फोटू दिसत नाहीये :(
26 Apr 2011 - 9:44 pm | शैलेन्द्र
फोटो गंडलेत, कोणी मदत करेल का?
26 Apr 2011 - 10:31 pm | धमाल मुलगा
च्यायला, हा रतनगड लै हुलकावण्या देऊन र्हायलाय बॉ आमाला.
त्यात आणि हे पब्लिक रसभरीत वर्णनं टाकतंय. :(
एय्य ग्यांग,
काय म्हणता? जुलै आगष्टात 'चलो रतनगड' मोहिम काडावी का? :)
26 Apr 2011 - 10:37 pm | शैलेन्द्र
राजु गाईड पाहीजे का?
26 Apr 2011 - 10:42 pm | शैलेन्द्र
.
26 Apr 2011 - 10:39 pm | शैलेन्द्र
राजु गाईड पाहीजे का?
27 Apr 2011 - 4:18 pm | धमाल मुलगा
मी काय वहिदा रेहमान वाटलो का तुला? :P
जोक्स अपार्ट, ठरलं की कळ्वूच की द्येवा. :)
सोबत त्या वाटाड्या हिरोलाही आणणार ना?
27 Apr 2011 - 12:09 am | अन्या दातार
>>एय्य ग्यांग,
काय म्हणता? जुलै आगष्टात 'चलो रतनगड' मोहिम काडावी का?
अगदी अगदी. ग्यांगमंदी मीबी शामिल.
27 Apr 2011 - 12:22 am | शैलेन्द्र
ऑक्टो- नोव्हेंबरात जा.. रान्फुल पहायला मिळतील
27 Apr 2011 - 9:57 am | टवाळ कार्टा
मी पण येणार...
26 Apr 2011 - 10:44 pm | गणेशा
अप्रतिम लिहिले आहे .... फोटो दिसत नाहित..
खुप तरळ्..मस्त हळुवार लिहिले आहे.. ट्रेक आणि सोबर येव्हडे छान वर्णन मन प्रसन्न झाले
असेच फिरत रहा.. कधी तरी त्या पावलांच्या ठस्यावर आमचे ही पावले पडतील...
अवांतर :
खुप छान काही महिन्यांपुर्विचा रतनगडचा माझा प्रवास असाच आठवुन गेला ...
मात्र अजुन ते फोटो न टाकल्या मुळे माझाच राग आला..
या फोटोंचे अआणि माझे काही तरी बिनसलेल आहे या मिपावर हे नक्की.
26 Apr 2011 - 10:55 pm | शैलेन्द्र
फोटो टाकलेत पण दिसत नाहीत, कसे ते कळत नाही.. पावलांचे म्हणाल तर बरोबरीनेच उमटवु कधीतरी....
27 Apr 2011 - 8:23 pm | गणेशा
नक्कीच .. आवडेल की .. सांगा तसे तुम्ही मग ..
26 Apr 2011 - 10:45 pm | गणेशा
अप्रतिम लिहिले आहे .... फोटो दिसत नाहित..
खुप तरळ्..मस्त हळुवार लिहिले आहे.. ट्रेक आणि सोबर येव्हडे छान वर्णन मन प्रसन्न झाले
असेच फिरत रहा.. कधी तरी त्या पावलांच्या ठस्यावर आमचे ही पावले पडतील...
अवांतर :
खुप छान काही महिन्यांपुर्विचा रतनगडचा माझा प्रवास असाच आठवुन गेला ...
मात्र अजुन ते फोटो न टाकल्या मुळे माझाच राग आला..
या फोटोंचे अआणि माझे काही तरी बिनसलेल आहे या मिपावर हे नक्की.
26 Apr 2011 - 11:22 pm | मस्त कलंदर
26 Apr 2011 - 11:30 pm | शैलेन्द्र
कसं जमवलं? वर्णनाबरोबर फोटो आले तर मजा येइल..
27 Apr 2011 - 12:26 am | मस्त कलंदर
फोटोवर राईट क्लिक करून कॉपी इमेज लोकेशन हा पर्याय निवडा आणि ती लिंक वरच्या रिच टेक्स्ट फॉरमॅटिंग बारमधील १० व्या आयकॉन (सूर्याचे चित्र) वर क्लिक केल्यानंतर येणार्या टेक्स्ट बॉक्स मध्ये टाका.
पहिल्या फोटोची लिंक:
http://a4.sphotos.ak.fbcdn.net/hphotos-ak-snc6/216115_10150162366656546_...
दुसर्या फोटोची लिंकः
http://a6.sphotos.ak.fbcdn.net/hphotos-ak-snc6/215607_10150162374981546_...
27 Apr 2011 - 12:29 am | शैलेन्द्र
ट्राय मारतो..
27 Apr 2011 - 10:52 am | शैलेन्द्र
नाय जमल.. :-(
27 Apr 2011 - 10:48 pm | शैलेन्द्र
जमलं, जमलं
27 Apr 2011 - 12:43 pm | प्रास
अहो गाववाले,
आमचा हा प्रदेश बघणं राहूनच गेलंय बघा, आणि आता अकोले गावात पाय ठेऊनही युगं लोटली आहेत. कधीतरी जमवलं पाहिजे बुवा.....
फोटो टाकल्याचे समजत आहे पण एकही दिसेना भाऊ, कायतरी आयड्याची कल्पना लढवा की वो.....!
ट्रेकिंगचा (फक्त मनात) विचार करणारा ;-)
27 Apr 2011 - 6:37 pm | परिकथेतील राजकुमार
फेसबुकवरच्या फोटूची लिंक दिली तर फटू कसे दिसणार ? ;)
गरजवंतानी :-
http://www.facebook.com/media/set/fbx/?set=a.10150162303711546.294299.70...
ह्या दुव्याला भेट द्यावी.
28 Apr 2011 - 9:37 am | श्री गावसेना प्रमुख
टुकार फोटो आहेत नोकिया ३११० आहे वाटत
28 Apr 2011 - 10:58 pm | शैलेन्द्र
एकदम मान्य
28 Apr 2011 - 9:58 am | प्रचेतस
रतनगडाची बातच न्यारी.
कोकणातून येणार्या घाटवाटांवर-(करोली, चौंढ्या मेंढ्या, पाथरा) पर्यायाने प्राचीन काळच्या व्यापारी मार्गावर लक्ष्य ठेवण्यासाठी हा घाट सातवाहन काळात बांधण्यात आला. माथ्यावरच्या गुहा, खोदीव पायर्या व दरवाजे, खडकात खोलवर खोदलेली व भूमीगत पाण्याची टाकी ही सर्व बांधणी गडाची सातवाहन काळातील बांधणी दर्शवते. सप्टेंबरात तर रतनगड तर अक्षरशः स्वर्गच होउन जातो. अर्थात भर उन्हाळ्यातही गडाच्या मार्गावर घनदाट झाडी असल्याने अगदी माथ्यावर पोचेतो उन लागतच नाही.
तो दिल्ली दरवाजा नव्हे, तर कोकण दरवाजा. तिथून उतरायची वाट पूर्ण मोडलेली आहे.
ह्या दरवाजाला त्र्यंबक दरवाजा म्हणतात.
आणि गडाचे शिडीच्या मार्गाने असलेले दोन दरवाजे म्हणजे हनुमान दरवाजा आणि गणेश दरवाजा.
28 Apr 2011 - 11:03 pm | शैलेन्द्र
धन्यवाद.. चुक दुरुस्त करुन घेतो..
29 Apr 2011 - 2:16 am | प्राजु
सुरेख वर्णन!! फोटो इतके उठावदार नाही आलेले.
पण भाऊ, तू वर्णन इतकं सुंदर केलं आहेस ना.
त्यातल्या त्या हिरो बद्दल तुझ्या मनात आलेले विचार तुझ्या मनाची कोमलता दर्शवतात हे नक्की.
लिहित रहा.
29 Apr 2011 - 1:18 pm | शैलेन्द्र
येत्या सप्टेंबर- ऑक्टोबरात येस येल आर घेवुन जातो गडावर.. रानफुलं टीपायला..
बाकी कोमल वगैरेबद्दल थॅन्क्यु..
29 Apr 2011 - 2:02 pm | ५० फक्त
फोटो चेपुवर पण मस्तच वाटले होते इथे पण छानच वाटताहेत वर्णनाबरोबर.
30 Apr 2011 - 7:52 am | शैलेन्द्र
वर्णन करताना मदत इतकच या फोटोच प्रयोजन होतं, त्यांच्या दर्जा बद्दल मी स्वताच समधानी नाही.
13 Oct 2013 - 10:23 pm | वेल्लाभट
फोटो दिसले नाहीत राव, पण वर्णन मस्त! पुन्हा आठवला.