रारंग ढांग पोरका झाला..

डॉ.प्रसाद दाढे's picture
डॉ.प्रसाद दाढे in जनातलं, मनातलं
8 Oct 2010 - 10:20 am

ज्येष्ठ चित्रपट निर्माते- दिग्दर्शक व श्रेष्ठ साहित्यिक श्री. प्रभाकर पेंढारकर यांचे पुण्यात
काल दि. ७ ऑक्टोबर रोजी निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते.
चित्रपट महर्षी भालजी पेंढारकरांचे ते सुपुत्र होते त्यामुळे कलेचे बाळकडू त्यांना घरातच
मिळाले होते. 'बाल शिवाजी' , 'शाबास सुनबाई' इ चित्रपटांचे त्यांनी दिग्दर्शन केले होते. 'बालशिवाजीचे'
कथा-पटकथा-संवादही त्यांनी लिहिले होते. चित्रपट सेन्सॉर बोर्डावरही ते काही काळ कार्यरत होते.
तसेच भारतीय फिल्म डिव्हिजनच्या माध्यमातूनही अनेक डॉक्यूमेंटरीज त्यांनी तयार केल्या होत्या.
भारतीय सैन्याच्या अभियांत्रिकी विभागाची एक शाखा म्हणजे 'बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन' जे भारताच्या
सीमावर्ती भागांमध्ये रस्ते बांधण्याचे बिकट काम करते. त्यांच्यावर डॉक्यूमेंटरी बनवतांना पेंढारकरांना
'रारंग ढांग' ह्या कादंबरीची कल्पना सुचली आणि मराठी साहित्यातलं एक मंत्रमुग्ध करणारं लेणं त्यांनी घडवलं.
स्वतः लेखकच चित्रपट दिग्दर्शक व पटकथा लेखक असल्याने रारंग ढांग वाचतांना एखादा सुंदर चित्रपट पाहतो
आहोत असंच वाटत राहातं. स्वतःच्या मनाला, आतल्या आवाजाला न पटणार्‍या गोष्टीसाठी तडजोड न करता
प्रसंगी आपले करीयर पणाला लावणार्‍या अन लष्करी अधिकार्‍यांच्या इगोपुढे न झुकणार्‍या 'ब्लडी सिव्हिलियन'
विश्वनाथची गोष्ट वाचतांना वाचक अंतर्मुख होतो अन स्वतःलाच प्रश्न विचारू लागतो.. उद्या जर
माझ्यावर अशी वेळ आली तर मी असे करू शकेन..?
खरोखरंच प्रत्येक तरूणाने वाचलीच पाहिजे अशी ही अजोड कादंबरी लिहिणारे पेंढारकर व्यक्तिशः
अतिशय मृदू आणि मितभाषी होते. पाच वर्षांपूर्वी बराच शोध घेतल्यावर मला त्यांचा पत्ता सापडला व मी
त्यांच्या घरी जाऊन त्यांना भेटलो. डोक्यावर केस विरळ असले तरी निळे डोळे अन लख्ख गोरा रंग त्यांच्या
देखण्या व्यक्तिमत्वाला शोभा देत होता. तेव्हा त्यांचे दाक्षिणात्य व्याही 'रारंग ढांगचे' इंग्लीश रुपांतर करण्याच्या
प्रयत्नात होते. मला रारंग ढांग कादंबरीने एव्हढे वेड लावले होते की मी तिची पारायणे तर केली होतीच पण
त्याशिवाय भारतीय लष्करात; विशेषतः हिमालयात काम केलेल्या प्रत्येक अधिकार्‍यास मी रारंग ढांग व बॉर्डर
रोड्स बद्दल माहीती विचारत असे. आता मला पेंढारकरांना भेटून काही गोष्टींची, घटनांची पडताळणी करायची होती.
रारंग ढांग नावाचा उत्तुंग पहाड हिमालयात खरोखरंच आहे पण कादंबरीतलीकथावस्तूही बर्‍याच प्रमाणात
सत्यघटनांशी मिळतीजुळती आहे अश्या निष्कर्षास मी आलो होतो. मी कादंबरीतल्यासुभेदार मेजर प्रतापसिंह
ह्या पात्राचा फोटोच मी जेंव्हा पेढारकरांना दाखविला तेव्हा ते खूप चकीत झाले व माझ्यावर खूप खुषही झाले.
अमोल पालेकरने रारंग ढांगवर चित्रपट बनविण्याचा प्रयत्न केला होता पण संरक्षण खात्याने परवानगी
नाकारली होती. (ज्याने कोणी ही कादंबरी वाचली असेल त्याला ह्या मागचे कारण सहज उमजेल)
पेढारकरांनी सुनामी संकटावर 'चक्रीवादळ', काश्मीरच्या धगधगत्या पार्श्वभूमीवरची 'आणि चिनार लाल
झाला' अश्या इतरही चांगल्या कादंबर्‍या लिहिल्या आहेत.
नुकतेच त्यांनी 'एका स्टुडिओचे आत्मवृत्त' लिहिले होते; ते वाचल्यावर त्यांना परत भेटण्याचे एक निमित्त
मला मिळाले असते, पण योग नव्हता. त्यांना 'मायलोडिस्प्लास्टीक सिंड्रोम' नावाची एक दुर्मिळ व दुर्धर
व्याधी जडली होती त्यामुळे तब्येत त्यांना साथ देत नव्हती. तरीसुद्धा त्यांच्या चेहर्‍यावरचे खेळकर स्मित
आणि ऋजू स्वभाव मात्र शेवटपर्यंत सतेज होते.
रारंग ढांगमधलेच भरतवाक्य प्रभाकर पेंढारकरांबद्दलही सार्थ ठरते आहे..'जब आदमी मर जाता हैं
तो क्या रह जाता है..' आज पेंढारकर आपल्यात नसले तरी त्यांच्या अमर कलाकृतींनी ते सदैव स्मरणात
राहतीलच..

साहित्यिकबातमी

प्रतिक्रिया

श्रावण मोडक's picture

8 Oct 2010 - 10:25 am | श्रावण मोडक

याददाश्त! चुभूद्याघ्या.

ज्ञानेश...'s picture

8 Oct 2010 - 12:48 pm | ज्ञानेश...

यादगारी..!(=स्मारक)

श्रावण मोडक's picture

8 Oct 2010 - 12:59 pm | श्रावण मोडक

अच्छा. मला शंका होती की बहुदा चुकतोय मी.

सहज's picture

8 Oct 2010 - 10:37 am | सहज

'रारंग ढांग' वाचलेच पाहीजे अशी ओळख.

श्री. प्रभाकर पेंढारकर यांना श्रद्धांजली!

परिकथेतील राजकुमार's picture

8 Oct 2010 - 11:23 am | परिकथेतील राजकुमार

हेच म्हणतो.

रारंग ढांग वाचलीच पाहिजे आता.

श्री. प्रभाकर पेंढारकर यांना श्रद्धांजली!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

8 Oct 2010 - 12:24 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

विकेण्डच्या खरेदी यादीत टाकली आहे.
प्रभाकर पेंढारकरांना श्रद्धांजली.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

8 Oct 2010 - 12:24 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

विकेण्डच्या खरेदी यादीत टाकली आहे.
प्रभाकर पेंढारकरांना श्रद्धांजली.

प्रभो's picture

8 Oct 2010 - 7:11 pm | प्रभो

प्रभाकर पेंढारकरांना श्रद्धांजली.

बिपिन कार्यकर्ते's picture

8 Oct 2010 - 10:40 am | बिपिन कार्यकर्ते

श्रध्दांजली!!!

रारंग ढांग ही एक मनावर गारूड करून बसलेली अप्रतिम कलाकृती आहे. चार उत्तम अनुभूतीचे क्षण दिल्याबद्दल पेंढारकर नेहमीच लक्षात राहतील.

इन्द्र्राज पवार's picture

8 Oct 2010 - 11:21 am | इन्द्र्राज पवार

+ सहमत.

शिवाय मराठी चित्रपट निर्मितीच्या टप्प्यातील दोन महत्वाची ठिकाणे म्हणजे भालजींचा 'जयप्रभा' तर शांतारामबापुंचा 'शालिनी.....(नंतरचा शांतकिरण)' हे कोल्हापुरातील दोन स्टुडिओज्.....मोठ्या माळरानावर वसवलेले एका इतिहासाचे हे दोन महत्वाचे साक्षीदार आज खर्‍या अर्थाने इतिहासजमा झाले आहेत. स्टुडिओजच्या ठिकाणी मल्टिकॉम्प्लेक्स अपार्टमेंट्स.....किरण शांताराम यांनी तर वडिलांची जागाच विकून टाकली..... तर त्या त्या जागांशी भावनीक संबंध ठेवणारे प्रभाकर पेंढारकर आज काळाच्या पडद्याआड......

'चित्रमय' रूप उलगडून दाखविणारे प्रभाकरपंतांचे पुस्तक 'एका स्टुडिओचे आत्मवृत्त' संग्रही ठेवण्यासारखेच आहे....'रारंग ढांग' सारखेच.

ईश्वर मृतात्म्यास चिरशांती देवो.

इन्द्रा

पैसा's picture

8 Oct 2010 - 6:20 pm | पैसा

'एका स्टुडिओचे आत्मवृत्त' अजून वाचलं नाही. आणायला हवं. रारंग ढांग बद्दल काय बोलावं?
श्रद्धांजलि.

बबलु's picture

8 Oct 2010 - 10:56 am | बबलु

श्री. प्रभाकर पेंढारकरांनी रारंग ढांग लिहून अनंत उपकार केलेत आपल्यावर.
master piece म्हणतात तो असाच.

विनम्र श्रध्दांजली !!

यशोधरा's picture

8 Oct 2010 - 11:17 am | यशोधरा

माझीही श्रद्धांजली.

डॉ.प्रसाद दाढे's picture

8 Oct 2010 - 11:24 am | डॉ.प्रसाद दाढे

प्रभाकर पेंढारकरांची माझ्या जवळची अमूल्य आठवण

निखिल देशपांडे's picture

8 Oct 2010 - 11:26 am | निखिल देशपांडे

माझीही श्रद्धांजली.
दाढे साहेब.. मस्त आठवण आहे ही.

यशोधरा's picture

8 Oct 2010 - 11:40 am | यशोधरा

अरे वा! लकी आहात डॉ.

मस्त कलंदर's picture

8 Oct 2010 - 1:57 pm | मस्त कलंदर

खरेच अमूल्य ठेवा आहे हा. रारंगढांग बद्दल काय बोलावे? खरेच तो मास्टरपीस आहे.

माझीही पेंढारकरांना श्रद्धांजली!!!

चिंतामणराव's picture

8 Oct 2010 - 2:55 pm | चिंतामणराव

+ सहमत

चिंतामणी's picture

8 Oct 2010 - 12:06 pm | चिंतामणी

रारंग ढांग वाचलीच पाहिजे आता.

श्री. प्रभाकर पेंढारकर यांना श्रद्धांजली!

दिपक's picture

8 Oct 2010 - 12:58 pm | दिपक

’रारंग ढांग’ तीन वेळा वाचली आहे. अजुन कितीही वेळा वाचु शकतो..
पेंढारकरांच्या काही आठवणी इथे वाचा.
पेंढारकरांना भावपूर्ण श्रद्धांजली.

'रारंग ढांग' वाचायचे कधीपासून ठरवले होते, पण योग येत नव्हता. गेल्या आठवड्यात दि. २ आणि ३ ऑक्टोबरला मी पुण्यात होतो. ३ तारखेला काही पुस्तके घेण्यासाठी अ.ब. चौकात गेलो. रविवार असल्याने 'रसिक साहित्य' आणि इतरही काही दुकाने बंद होती. म्हणून मिपाकर पराला फोन केला. त्याने काही दुकानांचे पत्ते दिले. काही पुस्तके घेतली- त्यात रारंगढांग होते. सर्वप्रथम तेच वाचायला घेतले.

आज (दि. ८) रोजी- आत्ता काही मिनिटापुर्वीच पुस्तकाचे शेवटचे पान वाचून संपले. लेफ्टनंट विश्वनाथला मनोमन एक कडक सॅल्युट ठोकून आणि कादंबरीचा खुमार मनात घोळत असतांनाचा मिपावर लॉगिन झालो, आणि पहिलाच धागा दिसला- "रारंग ढांग पोरका झाला..."

फार वाईट वाटते आहे.

गणेशा's picture

8 Oct 2010 - 1:27 pm | गणेशा

कालच बातमी ऐकुन वाईट वाटले.

रारंग ढांग कादंबरी बद्दल लिहावे तितके ठोडेच आहे.

प्रभाकर पेंढारकरांना भावपूर्ण श्रद्धांजली.

रारंग आणि चिनार दोन्ही आवडीची पुस्तकं..

पेंढारकरांना विनम्र श्रद्धांजली !

सन्जोप राव's picture

8 Oct 2010 - 3:14 pm | सन्जोप राव

किती वेळा वाचली असेल ते सांगता येणार नाही. विश्वनाथ मेहेंदळेइतकाच मिनू खंबाटाही ध्यानात राहिला आहे.
पेंढारकरांना आदरांजली.

sneharani's picture

8 Oct 2010 - 3:17 pm | sneharani

वाचायला हव पुस्तकं!
श्री. प्रभाकर पेंढारकर यांना श्रद्धांजली!

शुचि's picture

8 Oct 2010 - 7:25 pm | शुचि

+१

मिहिर's picture

8 Oct 2010 - 4:43 pm | मिहिर

प्रभाकर पेंढारकरांना श्रद्धांजली.
रारंग ढांग या उन्हाळ्याच्या सुट्टीत वाचले. वाचून अक्षरशः वेडा झालो. अगदी मस्त कादंबरी आहे.

लतिका धुमाळे's picture

8 Oct 2010 - 5:15 pm | लतिका धुमाळे

वाचायला घेतले , संपल्यावरच ठेवले. खूप दिवस झाले परत वाचले पाहिजे.

प्रदीप's picture

8 Oct 2010 - 7:28 pm | प्रदीप

रारंग ढांग तर अप्रतिम होतेच, पण सुमारे चार-पाच वर्षांपूर्वी एका दिवाळी अंकात पेंढारकरांनी एक सुंदर लेख लिहीला होता त्याची आठवणही माझ्या मनात कायम राहील.

मुंबईच्या ताज ग्रूपने, ताज हॉटेलच्या कामकाज(ऑपरेशन्स)सुधारणेच्या निमीत्ताने, ऑपरेशन्स मॅनेजमेंटच्या एका विख्यात जपानी तज्ञास (नाव विसरलो) पाचारण केले होते. पाच-सहा दिवस तो तज्ञ तिथे राहून, तेथील पाहणी करून, मग त्या व्यवथापनातील संबंधित मॅनेजरांचे वर्कशॉप घेणार, असा काहीस तो प्रोग्रॅम होता. त्याच्या ह्या सर्व कार्यक्रमाचे चित्रीकरण करण्याचे कंत्राट ताज ग्रूपतर्फे पेंढारकरांना देण्यात आले होते. पेंढारकरांचा लेख ह्या जपानी तज्ञाच्या तेथील वास्तव्याविषयी होता, ज्यात त्यांनी अगदी साध्या भाषेत त्या तज्ञाचा तेथील सहज वावर, त्याची निरीक्षणे, त्याची अनुमाने , सुचवणूका व त्यांची प्रात्यक्षिके ह्यांचे सुंदर दर्शन वाचकांना घडवले होते. पेंढारकर वास्तविक फिल्म्स डिव्हीजनमधील एक डॉक्युमेंटरी निर्माते होते; ह्या सगळ्या विषयाचा त्यांचा तसा काही संबंध नसावा, पण तरीही त्यांनी त्या जपानी तज्ञाकडून तिथे जे काही सांगितले जात होते त्यातील मर्म आत्मसात केलेले दिसत होते, त्याचे कौतुक वाटले.

मस्त कलंदर's picture

8 Oct 2010 - 8:12 pm | मस्त कलंदर

तेच ना, गेम्बा कैझन वाले??? मला कुणीतरी त्यांच्या त्या प्रोग्रॅमबद्दल असलेल्या लेखाची पीडीएफ पाठवली होती. शोधायला हवी मेलबॉक्स मध्ये. छोट्या छोट्या प्रसंगांतून त्यांनी छान शिकवण दिली होती.

अडगळ's picture

8 Oct 2010 - 7:35 pm | अडगळ

नायकाला त्याच्या वडिलांनी पाठवलेले एक पत्र आहे. अप्रतिम आहे . बाप्-लेकातलं अंतर , अवघडलेपण , बापाची जीवनमूल्यं आणि हे सगळं पोटात घेणारी , त्या बापाला पोराविषयी वाटणारी माया , हे सगळं त्या मात्र एक्-दीड पानाच्या पत्रात आहे.

पेंढारकरांच्या समर्थ लेखणीला मुजरा.

सुनील's picture

8 Oct 2010 - 7:42 pm | सुनील

पेंढारकरांना विनम्र श्रद्धांजली.

कुणीतरी रारंग ढांगचे विस्तृत परीक्षण लिहावे.

मस्तानी's picture

8 Oct 2010 - 7:45 pm | मस्तानी

दाढे साहेब ... परवा बातमी वाचली, मनात बराच काही आलं ... धड काही लिहिताही येत नव्हत, पण वाईट मात्र नक्कीच वाटल. व्यक्तीशः पेंढारकर यांच्या 'रारंग ढांग' वगळता इतर निर्मिती बद्दल फारसं माहित नव्हत. आता ती पुस्तके वाचण्याचा प्रयत्न जरूर करेन.

श्री. प्रभाकर पेंढारकर यांना श्रद्धांजली!

भडकमकर मास्तर's picture

10 Oct 2010 - 3:35 am | भडकमकर मास्तर

रारंग ढांग दर चार पाच वर्षांनी पुन्हा पुन्हा वाचले.. दर वेळी वेगळाच अनुभव देत गेले... आता परत वाचायला हवे...
आठवणींचा छान लेख...
यावर सिनेमा खूप छान झाला असता... ( पण लष्कर परवानगी कशाला देईल अशा विषयाला? असो..)

अवांतर : या निमित्ताने दिवाळी अन्कातले त्यांचे काही लेख आठवले...पेंढारकरांचाच एका " डॉक्युमेन्टरीला हिन्दी कॉमेन्ट्री लिहिणारे एक त्या खात्यातले ज्येष्ठ लेखक / अधिकारी होते,( नाव विसरलो) त्यांच्यावरचा लेख गेल्या दिवाळी अन्कात वाचला होता..अन्दमानच्या डॉक्यूमेन्ट्रीची कॉमेन्ट्री, शिवाजी महाराजांच्या डॉक्युमेन्ट्रीची सुरुवातीची कॉमेन्ट्री त्यांना कशी सुचत गेली ती फार छान आठवण आहे...