भाग १ येथे आहे : http://www.misalpav.com/node/12595
आम्ही एकमेकांकडे पाहत राहिलो हे झालं हो, पण पुढे काय? मला के. बी. च्या अकाली उफाळून आलेल्या संगीत प्रेमाचा राग आला होता, तर त्याला माझ्या समाजसेवेची चीड आली होती. दोघेही एकमेकांकडे खाऊ का गिळू अशा नजरेने पहात होतो.या पलीकडे काहीच करणे शक्य नव्ह्ते कारण तिथे आल्यापासून खायला, गिळायला आणि प्यायला काहीच मिळाले नव्हते. आयला, हरिश्चन्द्रगड चा पहिलाच ट्रेक आणि सुरूवात अशी जोरदार...छान...
के. बी. आता त्याचा आयपॉड बन्द करू लागला.
"चालू राहू दे, दूसरं काहिही करू शकत नाही आता आपण" मी . पण इतका वेळ संगीत ऎकल्यावर के. बी. ला जे ज्ञान प्राप्त झालं होतं, आणी त्यानंतर तो जे एकाच जागी खिळून राहिला होता, त्यावरून त्याने आयपॉड बंद केला आणि ह्या नव्या आपत्तिला तोंड कसं द्यायचं याचा विचार करू लागला. मला स्वता:चा, ड्रायवरचा, थंडीचा, फुकटच्या समाजसेवेचा, आयपॉड चा, आणि स्वताकडे तसा आयपॉड नाही या सर्व गोष्टींचा एकदम राग आला होता. त्यामुळे कोणताही विचार करण्याच्या मनस्थिती मध्ये मी नव्हतो.
पण आता वाजले होते साडेपाच आणि समोर एका हातगाडी वर चहा विकणे चालू झाले होते. पाय ओढीत आम्ही दोघं तिकडे गेलो. तसल्या त्या थंडी मधे चहा पिऊन जरा बरं वाटलं. समोर खिरेश्वर ला जाणारी एक जीप पण उभी आहे अशी माहिती मिळाली. जे बाबा ती जीप घेऊन तिकडे जाणार होते ते पण सापडले आणि ती जीप अजून अर्धा तास काही तिथून हलणार नाही हे पण समजलं. तो अर्धा तास आमच्या दोघांची तोंडे सोडून इतर तोंडे पहाणे, बावळटाप्रमाणे उगाचच समोरच्या रस्त्याकडे पहात बसणे असा छान गेला म्हणायचा.
शेवटी एकदाचे आम्ही त्या गाडीत बसलो आणि एकदम मजा येउ लागली. जुन्नर बाजूचे डोंगर मी प्रथमच पाहत होतो. सकाळची प्रसन्न हवा होती. आजूबाजूचे डोंगर, शेतं धुक्यात हरवली होती आणि आमचा हरिश्चन्द्रगडाचा ट्रेक अखेर मार्गी लागला होता.शेवटी आम्ही खुबी फ़ाट्याला पोचलो.
ओ हो हो हो....उजव्या हाताला धरणाचं पाणी, त्याच्या भिंती वरुन जाणारी वाट आणी नुकताच उगवणारा सूर्य...
रात्रीचे कष्ट विसरून आम्ही चालायला सुरुवात केली. पण या भिंती वरून चालत रहाणं अगदी जिवावर येतं...ह्म्म... नाही म्हणायला समोर तो हरिश्चन्द्रगड आपल्याला खुणावत असतो...मधे जी ती खाच दिसतीये ना...तीच ती तोलार खिंड.
मी आणि के. बी. नी ठरवून टाकलं की आता पहिला मुक्काम तोच.
आणि मग आम्ही तो चढ चढू लागलो. माझं जरा हेवी ड्युटी इंजीन आहे. प्रथम मी अगदी जीव नसल्यासारखाच चढायला लागतो, पण नंतर एकदा जोर पकड्ला...की मग थांबणे नाही. एका लयीत चढताना फ़ार मजा येते. आणी चढताना मधे बसणं पण मी टाळतो. फ़ारच दमलो तर मधेच अरे मला त्या दगडा मागे काहीतरी दिसलं, मघाशी तिकडून एक साप गेला, तू पाहिलासच नाही का असं काहीतरी मित्रांना विचारून गंडवतो...हा हा हा.. तास भर चढल्यावर आम्हाला एके ठिकाणी पाणी दिसलं..आ हा हा... काय चव होती त्या पाण्याला. तिथून आता आम्हाला डाव्या बाजूला नेढं पण दिसत होतं. राजगडच्या नेढ्यापेक्षा हे जरा छोटं आहे असं वाटलं. पावसाळा नुकताच संपला असल्यामुळे हिरवंगार गवत दिसत होतं, डोंगर कपारींवर जागोजागी हिरवाई दिसत होती. सकाळच्या त्या प्रसन्न वेळी तिथं अगदी मस्त वाटत होतं. आता आम्ही पुढच्या चढणीला लागलो.
एव्हाना थकवा पळाला होता त्यामूळे अजून तासाभरातच आम्ही तोलार खिंडीत पोचलो. इथे डावीकडे पंधरा-वीस फुटी एक कातळ आहे, तो गडावर घेऊन जातो, आणि सरळ जो एक रस्ता जातो, तो जातो पाचनई गावाला. हरिश्चंद्रगडावर जायचे हे दोन प्रमुख रस्ते आहेत. तिसरा एक आहे तो सादडे घाटातून, आणि चौथा आहे तो अगदी आव्हानात्मक.. थेट कोकणकड्याच्या बाजूनं, त्याला म्हणतात, नळीची वाट. पाचनई कडून येणारा रस्ता अतीशय सुंदर आहे, गोनीदांनी तर त्या वाटेचं वर्णन "कुमारी वाट" असंच केलंय. पूर्वी तिथे शिलाजित सापडायचं असाही उल्लेख आहे. नळीची वाट म्हण्जे मात्र येरा गबाळाचं काम नाही. सलग सहा-सात तास त्या अजस्त्र कड्याच्या बाजूनं चालत..नाही..चढत राहायचं..मग कुठे आपण वर पोचणार. पावसाळ्यात तर अती अवघड. बघू, जायचं आहे एकदा त्या बाजूनी.
तर आम्ही तोलार खिंडीमधे थोडा वेळ थांबलो. तिथे एक व्याघ्रशिल्प आहे, छान सावली आहे. आजूबाजूचं न्याहाळत बसलो. नंतर मात्र लवकरच निघालो कारण अजून वर चढून दोन तास चाललं की मग हरिश्चन्द्रेश्वराचं मंदिर येणार होतं, रात्री तिथेच थांबायचं होतं. तो कातळ चढणं काही फार अवघड नाही. अवघड आहे ती त्यापुढ्ची वाटचाल. कुठेतरी मी एक नकाशा पाहिला आहे, कातळ चढून वर गेलं, की तिथून मंदिर आहे तीन किलोमीटर्स. आणि ते पण सपाट नाही बरं का..काही छोटे मोठे डोंगर चढत उतरत जायचं आहे..अग आई आई आई ... पण कातळावर गेल्यावर असं काही मस्त द्रुश्य दिसतं ना.
आपण जिथून चालायला सुरूवात केलेली असते, तिथपासून सगळं काही. वर पोचायचं, मस्त भन्नाट वारा खायचा, आणि इकडे तिकडे पाहत बसायचं. आम्ही मात्र लवकरच निघालो तिथून. डोंगरावर भरपूर प्रकारची फुलं फुलली होती.
ही वाट चालणं म्हणजे जीवावर येण्याचं प्रकरण आहे. कितीही चाललो तरी वाट संपणारे का नाही हे कळतच नाही. या वाटेत मी के. बी. ला निदान पन्नास वेळा तरी विचारलं असेल - अरे कधी येणार बाबा ते मंदिर? के. बी. अगदी आपल्या गल्लीमधून चालावं तसा चालला होता आणि मी लळत लोंबत त्याच्यामागून पाय घासत. पण वाट छान असूनही मला त्याची मजा घेता येत नव्ह्ती, जरा दमलोच होतो मी. शेवटी वाटेत एक ओढा वाहत होता आणि मस्त सावली पण होती. तिथे पंधरा वीस मिनीटं बसल्याशिवाय मी हलणार नाही असं मी जाहीर केलं आणि भरपूर पाणी पिऊन सावलीत लोळत पडलो.
क्रमश:...
प्रतिक्रिया
8 Jun 2010 - 10:59 am | श्रावण मोडक
आवरा. एकाच दिवशी पाच-पाच धागे कलादालनात?
फटू मस्तच.
8 Jun 2010 - 11:03 am | शिल्पा ब
सग्ळे फोटो छान आहेत...आवडले...
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
8 Jun 2010 - 11:16 am | समंजस
व्वा!! सुंदर!!!
तो वरून तिसरा आणि खालून चवथा फोटो अप्रतिम :)
[आज मिपावर कलादालन महोत्सव सुरू आहे तर @) ]
8 Jun 2010 - 6:29 pm | प्रभो
मस्त!!!
9 Jun 2010 - 1:43 pm | स्वतन्त्र
पुढच्या वेळी जाल तेव्हा नळीच्या वाटेने जा !एकदा तरी अनुभव घेण्या सारखीच आहे ती वाट !
पाचनई वाट तर खिरेश्वरपेक्षा चांगली आहे !