हरिश्चंद्रगडची सफर..भाग - १

येडाखुळा's picture
येडाखुळा in कलादालन
5 Jun 2010 - 12:44 am

नमस्कार मंडळी,

हरिश्चंद्रगड म्हणजे भटक्यांचा स्वर्ग आहे. गेल्या वर्षी तिकडे जाण्याचा योग आला एकदाचा. खाली दिलेला जो किस्सा आहे, तो माझ्या आणि माझ्या मित्राबरोबर खरोखरीचा घडला आहे. हरिश्चंद्रगडचा तो माझा पहिलाच ट्रेक होता. अगदी अविस्मरणीय. पण त्याची सुरुवातच अशी काही झोकात झाली की विचारूच नका. तेव्हा जाम वाट लागली होती आमची...पण आता मात्र हा किस्सा आठवला की पोट दुखे पर्यंत हसू येतं.
*****************************************************************

रात्रीचे जवळपास २ वाजले होते आणि एक वजनदार माणूस ( जो कधी एके काळी बराच हलका होता) आणि एक हलका माणूस असे दोघे पुणे नाशिक रस्त्यावरच्या नारायणगाव ला उतरले. चाणाक्ष वाचकांनी ओळखलेच असेल की जाडजूड माणूस म्हणजे मी (हे कोणी पण ओळखेल, त्यात काय) पण बाकीचे सगळेच माझ्यापेक्षा बारीक आहेत त्यामुळे त्या माणसाची ओळख करून द्यावी लागेल तर तो दुसरा माणूस म्हणजे आमचे परम मित्र के. बी.

इतक्या रात्री तिकडे जायचे कारण म्हणजे पहाटे ४ ची गाडी पकडून खिरेश्‍वर ला उतरणे आणि तिथून हरिश्‍चंद्र गडावर प्रस्थान ठेवणे. आधीच रस्त्यावरच्या खडड्यानी मणके ढीले झाले होते. तरीही मला त्यात पण झोप लागल्याचा आनंद झाला, पण गोड स्वप्नात असताना कळाले की उतरायचे ठिकाण आले आहे. त्यातून नारायणगावला उतरल्यावर स्वागताला काही मोजकी कुत्री हजर होती आणि बाकी सर्व शांत होते. पुणे नाशिक हम्रस्त्यावरचे गाव हे असे कुठूनही वाटत नवते बुवा. के बी. खाली उतरल्यावर त्यांच्या नव्या आयपोड वर गाणी ऐकण्यात गुंग .झाले...हे नंतर बराच महागात पडेल असा वाटलं नव्हतं...हळू हळू कळेल तुम्हाला...मी जरा बोर झालो. इकडे तिकडे बघून जरा टाइमपास केला...पण मग कुत्री देखील माझ्या कडे बर्‍याच प्रेमाने पाहत आहेत असं कळून मग मी तिकडे न पाहणेच पसंत केले.

"जरा बोर होतंय रे के. बी." मी.
"साल्या बोर काय,... गाणी ऐक ना मस्त" कानात हेडफोन घालून के. बी. त्या वेळी वन्दे मातरम् हे रहमान चा गाणं ऐकत होता (कुठल्या वेळी कुठलं गाणं???) आणि त्यामूळे तो जोरात ओरडलाच. कुत्री परत प्रेमाने पाहू लागली आमच्याकडे त्यामुळे आमची चर्चा बंद .
सकाळी पावणे चार ला पहिली गाडी जाणार होती खिरेश्‍वर ला. अजुन तर ३ पण नव्हते वाजले. काय करायचं बरं.....

मला जवळच काहीतरी ठोका ठोक ऐकू आली. त्या तसल्या रात्री एक ड्राइवर कंडक्टर ची जोडी आणि २ मेकॅनिक कोणती तरी गाडी दुरुस्त करत होते. म्हणालो जरा पाहा्वं काय चाललंय.

मला ही असली फार हौस आहे बरंका. म्हणजे कोणी कष्टकरी दिसला की मी जरा त्याच्याशी प्रेमाचे चार शब्द बोलतो. नाव गाव विचारतो. काम कसं आहे, पोरा बाळांचं कसं आहे, आज कालचे दिवस कसे वाईट आहेत वगैरे सगळं ...आणि त्याच्या बरोबर त्याच्या मालकाला चार शिव्या पण घालतो. तेव्ह्ढंच जरा त्यांना बर वाटतं. तसला ते भकास वातावरण, ओइल, पेट्रोल चा वास, काळी निळी तोंडे, काळे निळे हात, सगळ पाहत बसलो.

के. बी. ला असल्या कारभारात रस नाही त्यामुळे त्याचा आयपॉड जोरात चालूच होता. त्यांच्या मधला एक बस खाली जाऊन झोपला होता. म्हणजे झोपला नव्हता हो, काहीतरी दुरुस्ती करत होता, दूसरा त्याला काही हत्यारे वगैरे लागली तर पुरवत होता. ड्राइवर साहेब मस्त बीडी मारत बसले होते आणि त्यांना लांबूनच बहुमोल सूचना देत होते तर कंडक्टर साहेब ड्राइवर साहेबांच्या सूचनेला अनुमोदन देण्याचे काम निष्ठेने करीत होते. म्हणजे ते काही बोलले की लांबलचक पिचकारी टाकून ते मान हलवत असत. जितकी लांब पिचकारी, तितके त्यांना म्हणणे जास्त पटत आहे असं मला तरी वाटत होतं.

मी तर त्यांच्या मधलाच एक होऊन ते सगळं समजून घेत होतो. मनात असेच काहीतरी विचार येत होते. "आपण नुसते कंप्यूटर वर बसून असतो, हे लोक काय कष्ट करतात, आपल्याला तर असलं काही होणार नाही बुवा...तो के. बी. बघा कसा गाणी ऐकतोय नुसता" असा विचार करून मी त्याला ओरडलो" अरे ए माणसा जरा गाडी बघ आहे का कुठे ते...खिरेश्‍वर ला जाणारी..." नवतीच तिथे दूसरी कुठली गाडी त्याला तो तरी काय करणार?

"काय हरिश्‍चंद्रागडावर का?" ड्रायवर.
"हो...पहिल्यांदाच चाललो आहोत"
"ही गाडी....."
"थांबा हो जरा त्यांना काय हवं आहे ते पाहतो" बिचारा तो जो खाली झोपून काम करत होता, त्याचे हाल मला काही पाहावत नवते...त्याला हत्यारं देणारा पण आता डुलक्या देत होता...ड्रायवर चे बोलणे मी मध्येच तोडले. साला नुसता बिड्या मारत होता आणि लोकांना कामाला लावत होता. मला त्याचा दोन कारणां मुळे राग आला होता. एकतर मी पुण्याहून निघताना बिड्या घेतल्या नव्हत्या आणि हा तसल्या थंडीमध्ये माझ्या समोर झुरके घेत होता. आणि जे काम करत होते त्यांना नुसतंच बसल्या जागेवरून ऑर्डर्स देत होता...मला त्याच्या जागी माझा मॅनेजर दिसू लागला...बाकी सगळं विसरून मी त्याला मदत करू लागलो.....त्यानी पण काही क्षण माझ्या कडे कौतुक आणि आशचर्यचकित मुद्रेने पहिले आणि पुढच्याचक्षणी ते झुरके मारू लागले. कंडक्टर तर मस्त घोरत होता...

माझे हात खराब झाले होते...झोप मिळत नव्हती...दुसर्या दिवशी कस लागणार होता हरिश्‍चंद्रागडावर जाताना...पण मी हार मानली नाही..फक्त मनात कधी कधी बस चा विचार येत होता...नाहीच मिळाली बस आम्हाला तिकडे जाणारी तर मग काय करायचं...के. बी. बहुतेक गाणी ऐकत ऐकत झोपी गेला होता....मी काम करतच होतो...मला तर त्यात फारच कुशल झाल्या सारखे वाटू लागले ...... मग तर असंही वाटू लागल की कीबोर्ड बडवत बसण्या पेक्षा हे काम मी फार छान करेन...मोठं गॅरेज टाकेन...मस्त बिज़्नेस होईल...वा वा वा...

घूर घुरररर....हं....बस चालू झाली. वा वा छान...तो मेकॅनिक बस खालून एकदाचा अवतीर्ण झाला.
"साला...इनाच्या कारणी त्रास देतात भ**"...
"जाऊ द्या हो..आपण केलं की नाही काम" मी. मला माझेच फार कौतुक वाटत होते. पण त्याने एक थंड नजर माझ्याकडे टाकली. मी मनात विचार केला...जाऊ दे...बिचारा इतका वेळ बस खाली होता....नीट दिसलं नसेल त्याला...त्याने त्याच्या पार्ट्नर ला शिव्या देऊन उठवलं झोपेतून आणि ते त्यांच्या सर्विस गाडीत जाऊन बसले...ड्राइवर कंडक्टर ची जोडी घाईने बस मध्ये बसली आणी बस चालू करून घूर घूर करत राहीले....मी विचार केला टेस्टिंग चाललं असेल काहीतरी...

आता साडेचार झाले होते....मी के. बी. ला उठवलं...

"बैला, बघ ना जरा गाडी शोध की....मी बघ, किती मदत केली त्याना ....गाडी चालू झाली बघ त्यांची" मी अजुन पण विजयाच्या उन्मादात होतो.

"आपली कुठे आहे पण" मोजकंच पण बरोबर........

इतक्यात मी दुरुस्त केलेली गाडी तिच्या प्रवासाला जाऊ लागली..मला अगदी समाधान वाटलं ....ड्राइवर चा अंधुक दर्शन झालं मला....पण पण त्याची नजर जरा गोंधळल्या सारखी का दिसली काही कळलं नाही....

तेवढ्यात मागे आवाज झाला. मेकॅनिक चं काही हत्यार राहिलं होत. ते घ्यायला आला होता तो...दुसरा गाडी चालू ठेवून त्याची वाट पाहत होता...
" दादा, गाडी कधी येणार हो खिरेश्‍वर ला जाणारी?"

त्याच्या डोळ्यात मला काही वेगळेच भाव दिसले. त्यात करुणेचा सागर आहे का काय असं पण काहीतरी आठवून गेलं मला...
एक वार माझ्याकडे पाहून तो म्हणाला ," मग तुम्ही दुरुस्त केली ती कोनची म्हणायची?"
" शिकले सवरलेलं तर दिसत्यात..." अस काहीतरी म्हणत तो वॅन मध्ये बसून निघून गेला.

हे सगळा ऐकून के. बी. साहेब जागच्या जागीच थांबले होते.
"आपण बस ची पाटी पाहिली का रे?" मी विचारलं आणि आम्ही एकमेकांकडे पाहातच राहिलो...

ट्रेक ची सुरवात तर जोरदार झाली होती...

प्रवासछायाचित्रण

प्रतिक्रिया

जे.पी.मॉर्गन's picture

5 Jun 2010 - 12:51 am | जे.पी.मॉर्गन

लईच ढिसाळ काम बगा तुमचं... सुरुवात अशी केलीसा तर फुडं तर काय काय क्येलं असंल...वाचतुय.. येवद्या अजून !

jaypal's picture

5 Jun 2010 - 1:43 am | jaypal


***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

पांथस्थ's picture

5 Jun 2010 - 8:17 am | पांथस्थ

जितकी लांब पिचकारी, तितके त्यांना म्हणणे जास्त पटत आहे असं मला तरी वाटत होतं.

हे एकदम पु.ल. श्टाईल मधे आले आहे.

"आपण बस ची पाटी पाहिली का रे?" मी विचारलं आणि आम्ही एकमेकांकडे पाहातच राहिलो...

च्यामारी बसवर पाटि असुन हा गोंधळ. गडावर तर पाटि पण नसते. कुठल्या गडावर पोहोचलात शेवटि. :?

बाकी लेख मस्तच.

- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
माझी छायाचित्रे - फ्लिकर

प्रभो's picture

5 Jun 2010 - 8:49 am | प्रभो

पुढे???