अरूंधतीने काही दिवसांपूर्वी इथे दिलेली 'चटकदार भेळ' पाहिली आणि भेळेवर मी लिहिलेला लेख इथे आणायचा मोह झाला.
-----------------------------------------------------
'भेळ’ नक्की कधी आवडायला लागली ते आठवत नाही पण इतकं मात्र आठवतंय की लहान म्हणजे कधीतरी खूपच लहानपणापासून भेळ हा सगळ्यात आवडता पदार्थ झालाय !
काही आवडी-निवडी रक्तातच असतात असं म्हणतात. एखाद्या दिवशी रात्री जेवणाऐवजी ’भेळ’ चालेल असं आई म्हणते तेव्हा माझ्यात भेळेची आवड कुठून आलीय त्याची मला खात्री पटत राहते !
नावाप्रमाणेच ’भेळ’ करायलाही सुटसुटीत, पण पहिला घास तोंडात घेतला की तोंड असं खवळतं की बस्स ! वाटतं जणू खूप वेगवेगळ्या प्रकारचे मसाले वगैरे वापरून हा पदार्थ केलाय. भेळेतला सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे ’चिंचेची चटणी’. मस्तपैकी चिंच आणि खजूर घालून केलेली ही काळपट तपकिरी रंगाची चटणी जमली की अर्ध काम फत्ते. मग आंबट-तिखट जोडगोळीतला तिखटपणा पूर्ण करायला येतो मिरचीचा ठेचा ! चांगल्या हिरव्यागार मिरच्या, लसूण, जिरे आणि थोडा लिंबाचा रस एकत्र करून ते मिश्रण ठेचून / वाटून घ्यायचं. हिरवाईचे रंग, वास आणि चव अजून खुलवायला पुदिन्याची चटणीही करून घ्यायची।
ह्या चटण्या शेजारी शेजारी ठेवल्या की इतक्या सुरेख दिसतात की भांड्यातले पांढरेशुभ्र कुरमुरे असे अगदी आसूसून त्यांची वाट बघायला लागतात. कुरमुऱ्यांच्या जोडीने मग फरसाण, गाठी, टोमॅटो, पापडी, उकडलेला बटाटा, खारे शेंगदाणे असे सगळे एक एक करत भांड्यात जमतात. आणि हो…नुसतं बघताच तोंडाला पाणी सुटावं अशा आंबटगोड चवीची हिरवीकंच कच्ची कैरी आणि बारीक चिरताना डोळ्यांत पाणी आणणारा कच्चा कांदा !
मला तर भेळ तयार होत असताना मधेच हातावर थोडा नुसता कच्चा कांदा आणि कोथिंबीर खायला आवडतं. तोंडापासून पोटापर्यंत सगळीकडे मस्त दवंडी पिटली जाते – थोडं थांबा … भेळ येतेय !!
ह्या सगळ्या गोष्टी एकत्र करताना, त्यात अधूनमधून पाहिजे त्या प्रमाणात चिंचेची चटणी आणि मिरचीचा ठेचा टाकताना, भांड्यात मोठा चमचा / डाव वाजवत भेळवाले जो आवाज करतात तो ऐकत रहावा असं वाटतं. जणू काही पोटोबाची पूजा करण्यासाठी घंटा वाजवली जातेय ! मग भेळवाले थोडी भेळ प्लेटमधे घेऊन त्यावर छान पिवळया रंगाची बारीक शेव आणि अगदी बारीक चिरलेली हिरवीगार कोथिंबीर असा साज चढवतात ! ती प्लेट हातात आल्यावर मग आपले हात आणि तोंड सुरू होतात. एक घास, अजून एक , अजून एकच घास असं करत बघता बघता त्या चटकदार भेळेची पहिली प्लेट रिकामीही होते।
पुण्यात सारसबाग, संभाजीपार्क, गणेश भेळ अशा ठिकाणी कागदात बांधलेली भेळ पुट्ठ्यांच्या चमच्यानी खाण्यात काय आनंद असतो महाराजा ! पुण्यातले हे माझे वर्षानुवर्षांचे अड्डे आहेत. आता काही ठिकाणी चमचे मिळायला लागले आहेत पण पुठ्ठ्याच्या चमच्याची मजा वेगळी असते. त्यातही थोडी भेळ खाल्यावर तो पुठ्ठ्याचा चमचा एका बाजूने इतका ओला होतो की पार मोडकळीला येतो. मग चमचा फिरवून दुसऱ्या बाजूने खायला सुरू करायचं ! कच्चा भिडू असेल तर चमचा बदलून मागतो पण अट्टल भेळ खाणारा असेल तर एकाच चमच्यात काम भागवतो. पेट्रोमॅक्सच्या दिव्याच्या प्रकाशात भेळ खातखातच मी लहानाचा मोठा झालो. अजूनही ज्या दिवशी सकाळी पुण्यात पोचतो त्या दिवशी संध्याकाळी ’संतोष भेळ’ खाल्याशिवाय घरी आलोय असं वाटतंच नाही !
असं ऐकलंय की गेल्या काही वर्षांत ’कल्याण भेळ’ नावाची एक खवैय्यांच्या आवडीची जागा पुण्यात सुरू झालीय. अजून तरी तिथे जाणं जमलं नाहीये ! निदान पुढच्या ट्रिपमधे तरी ’कल्याणमस्तु’ व्हावं!
पुण्यात असताना अनंत चतुर्दशीला तर हमखास म्हणजे हमखास भेळ खाणं व्हायचं. मी माझ्याच एका लेखात मागे एकदा लिहिल्याप्रमाणे अनंत चतुर्दशीला आमच्या काकाच्या वाड्यातल्या गणपतीचं विसर्जन झाल्यावर – “थोड्या वेळाने कोरड्या भेळीचा कार्यक्रम ठरलेला असायचा. गुलालाचे लालभडक हात धुतल्यासारखं करायचं आणि भेळ हवी तेव्हढी झणझणीत करून घ्यायची. रात्री थोडा वेळ परत लकडी पुलावर गणपतीची मिरवणूक पहायला जायचं. आतापर्यंत तिकडे गर्दीचं रूपांतर जत्रेत झालेलं असायचं. “चर्र…’ आवाज करत भजी-बटाटेवडे आपल्या गाडीकडे बोलावू पहायचे।”
लहानपणी एकतर रेस्टॉरंटसमधे जाणं हा प्रकार फारसा नसायचा. पण जर अलका टॉकिजसमोरच्या ’दरबार’मधे गेलो तर तिथली ’दरबार स्पे. भेळ’ कधी म्हणजे कधीच चुकवली नाही. आमचे अप्पा बँक ऑफ इंडियामधे होते. सुदैवाने काही वर्षं ते अलका टॉकिजशेजारच्या ब्रँचमधे होते. त्यामुळे कधी जर संध्याकाळी त्यांना बँकेत भेटायला गेलो तर ’दरबार’मधे भेळ नक्की मिळायची. नंतर गरवारे कॉलेजमधे जायला लागल्यावर तर ’दरबार’मधे जाण्यासाठी वाट वाकडीही करावी लागायची नाही।
कॉलेजमधे असताना एकदा ’सेव्हन लव्ह्ज’च्या चौकाजवळच्या रेस्टॉरंटमधे आम्ही काही मित्र मैत्रिणी गेलो होतो. तिथे पहिल्यांदा (आणि शेवटचं !) मी ओल्या भेळेत डाळिंबाचे दाणे टाकलेले पाहिले ! त्या रेस्टॉरंटच्या मालकाला जाऊन सांगावंसं वाटलं, “बाबा रे ! काही पदार्थ असे सजवावे लागत नाहीत. त्यांची मूळ चव वाssईट्ट असते.”(तुम्ही पुणेकर नसाल तर ’वाssईट्ट’चा अर्थ पुणेकराला विचारा !)
तुम्ही कधी सकाळी भेळ खाल्लीयेत? हो बरोबर… मी सकाळीच म्हणतोय !! मी खाल्लीय ! एका रात्री मित्राकडे ’अभ्यास’ या नावाखाली चालणाऱ्या टवाळक्या करून दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास घरी परत येत होतो. ’कमला नेहरू पार्क’च्या बाहेर एक भेळवाला संध्याकाळची तयारी सुरू करायला घेत होता. अजून त्याचं पिशवीतून कांदे वगैरे काढणं चालू होतं तर मी गाडी थांबवून भेळ खायला हजर ! हैराण झाला ना तो बिचारा ! पण त्याने अगदी आनंदाने माझ्यापुरती एक प्लेट भेळ तयार करून दिली ! (अर्थात सकाळी नऊ वाजता भेळ मागणाऱ्या गिऱ्हाईकापेक्षाही विक्षिप्त नमुने त्याने पुण्यात पाहिले असल्याची दाट शक्यता आहेच म्हणा !!)
ही झाली पुण्यातल्या भेळेची तऱ्हा. मुंबईत भेळेचा नखरा थोडा वेगळा असतो. पहिला फरक म्हणजे तिथे भेळवाला ’भैय्या’ असतो ! तिथे म्हणजे लसणाची ओली चटणी असते. कुरमुरे, शेव, ही ओली चटणी अशा ४/५ मोजक्या गोष्टी एकत्र केल्यावर ही भेळ तयार होते. तिथे भेळ प्लेटमधे एकटी येत नाही तर बरोबर २/३ चपट्या पुऱ्यांनाही आणते ! त्या पुऱ्यांचा चमचा म्हणून वापर करायचा आणि मग पुऱ्याही खायच्या ! आजच्या भाषेत सांगायचं तर एकदम ’इको फ्रेंडली’ !
पुण्यात जसं बागेत गवतावर बसून भेळ खाल्ली तर भेळेची चव आपोआप वाढते ना तसंच मुंबईत भेळ खाताना आपल्या समोर नजरेत मावणार नाही असा अथांग समुद्र हवा ! दिवसभर आकाशात खेळल्यावर दमून केशरी-लाल झालेला सूर्य विश्रांतीसाठी क्षितिजापार टेकतोय, संध्याकाळचा असा मंद मंद वारा वाहतोय, तो वारा मोगऱ्याचा धुंदावणारा गंध आणतोय आणि आपल्या हातात हात गुंफवून…..(हॅ !… जाऊ दे ना यार ! आपण आपली भेळ खावी !!)
भेळ म्हटलं की मी स्वत:ला resist करूच शकत नाही ! अगदी टिपिकल साऊथ इंडियन रेस्टॉरंटमधे, ते ही अमेरिकेतल्या, मी भेळ खायचं धाडस केलंय ! (मी फक्त असे उद्योग करतो पण ’मग भेळ कशी होती?’ वगैरे खवचट प्रश्नांची उत्तरं देत नाही !) एक मात्र आहे हं… आयुष्यातली सगळ्यात जास्त तिखट भेळ मी अमेरिकेत खाल्लीय.
न्यू जर्सीला पहिल्यांदाच येऊन जेमतेम आठवडा झाला होता. तेव्हा इथे ’कोहिनूर’ नावाचं एक देसी रेस्टॉरंट होतं. भेळ मागवताना वेटरनं विचारलं “How spicy do you want it?” मी विचार केला, “च्यायला ! आपण आत्ता तर भारतातून आलोय ! असून असून भेळ किती spicy असेल !” भेळ खायला सुरूवात केली आणि अग्गग्गग्गग ! तरी मारे हट्टाने भेळ संपवली आणि मग माझं दिवसभर ’रनिंग बिटवीन दि विकेटस’ चालू होतं !
मध्यंतरी एकदा बायको काही दिवस भारतात गेल्याने forced bachelor होतो. घरापासून थोड्या अंतरावर ’पंजाबी रसोई’ नावाचा एका अगदी छोट्या रेस्टॉरंटमधे एकदा जेवायला गेलो होतो. दारूड्याला जसं दारू दिसली राहवत नाही तसं मला मेन्यू कार्डवर ’Bhel’ हा शब्द दिसला की राहवत नाही ! ’ज्यादा से ज्यादा क्या होएगा … इधर फिर कभी भेल नहीं खानेका ये समझेगा’ असा विचार मी (मराठमोळ्या) हिंदीत केला. भेळेचा पहिला घास घेतला आणि एकदम मटकाच लागला ना! अमेरिकेतल्या रेस्टॉरंटसमधे खाल्लेली (त्यातल्यात्यात) चांगली भेळ (निदान त्या दिवशी तरी) होती ! त्या दिवशी माझ्या दैनिक राशीभविष्यात बहुतेक ’अचानक धनलाभ’ लिहिलं होतं !!
’भेळ’ म्हटलं की खाताना तोंड आणि लिहिताना हात आवरणं जरा अवघडच जातं. भेळेच्या बाबतीत मी इतका अट्टल आहे की शाळेत एकदा ’कार्यानुभव’ ह्या विषयाच्या परीक्षेत “कुठल्याही एका पदार्थासाठी आवश्यक ते साहित्य, कृती लिहा” अशा प्रश्नात भेळेची माहिती लिहून पास झालो होतो !
------------------------------------
माझा ब्लॉगः
www.atakmatak.blogspot.com
------------------------------------
प्रतिक्रिया
8 Apr 2010 - 8:17 am | चित्रा
लेख मस्तच. फक्त पेट्रोमॅक्सच्या दिव्याच्या प्रकाशात भेळ खातखातच मी लहानाचा मोठा झालो. हे वाचल्यानंतर तुमच्या आईलाही हे वाचून काय वाटेल या कल्पनेनेच झीट आली!
8 Apr 2010 - 8:33 am | पाषाणभेद
हॅ हॅ हॅ....थोर लोकं रस्त्यावरच्या दिव्याच्या प्रकाशातच अभ्यास करून मोठे होतात म्हटलं.

बाकी लेख तर भेळेपेक्षाही चटपटीत झालाय. आम्ही भारतात राहतो. तुमच्या कडे तुम्ही संध्याकाळी हा असला लेख टाकतात अन तो आम्हाला सकाळी सकाळी ऑफिसात जायच्या वेळेला दिसतो. आम्ही त्याचा आस्वाद केवळ मनानेच घेवू शकतो. 'आमच्या' सकाळी लेख टाकल्याबद्दल जाहिर निषेध.
(असलाच निषेध आम्ही आता यापुढे गणपाच्याही पाकृ ला (अन तिकडच्या 'संध्याकाळी' येणार्या) टाकत पाकृ ला टाकत जावू.)
डायबेटीस विरुद्ध लढा
महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्यांच्या कटी||
महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद
शके १५६३
11 Apr 2010 - 5:12 am | संदीप चित्रे
हे पेट्रोमॅक्सच्या दिव्याचं लक्षातच आलं नाही, चित्रा :)
8 Apr 2010 - 8:30 am | स्पंदना
खरा खवय्या!
बाकी पदार्थाच नाव वाचुन, तोन्डाला पाणी सुटुन नको तिथ जिभ भाजुन घेण्यात आम्हिहि पुढे आहोत.
जित्याची खोड!
शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.
8 Apr 2010 - 9:21 am | निखिलचं शाईपेन
का सकाळी सकाळी ..
आज भेळ खाविच लागणारे ...
-निखिल....
8 Apr 2010 - 9:44 am | अमोल केळकर
भेळेवरचा लेख मस्त , चटकदार !!
सर्व ठिकाणच्या भेळ खाल्या मात्र सांगली, कोल्हापूरला मिळणार्या भेळेची ( चिरमुर्याची ) सर पुण्या , मुंबई कडच्या भेळेत नक्कीच नाही.
अमोल केळकर
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
8 Apr 2010 - 12:16 pm | स्वाती दिनेश
भेळेसारखाच चटपटीत झाला आहे लेख...
आता मात्र लवकरच भेळ करावीच लागणार,
स्वाती
8 Apr 2010 - 1:31 pm | भाग्यश्री कुलकर्णी
मलाही भेळ प्रचंड आवडते.माझा भाऊ अन नवरा म्हणतो की,भेळेचा नैवैद्य दाखवल्याशिवाय हिच्या पिंडाला कावळा शिवणार नाही.
मी कसलीही अन कुठलिही भेळ ती चांगली असेल ह्या एकाच आशेवर पचवलेल्या आहेत.
कुठेही गेले की समोरच्या भेळेच्या गाडीकडे बघुन नवरा म्हणतो खाऊन घे नंतर कुणीतरी म्हणेल कि इथली भेळ चांगली असते मग उगाच हळहळशील.अन मी खातेही.
लहानपणी बाकीचे आयस्क्रिम खाताना मी मात्र भेळच खायची.
मला कॉलेजच्या शेवटच्या वर्षात असताना दोन महिने अन्नही पचत नव्हते.डॉ.काविळीची शक्यता वर्तवत होते.दोन तीन महिन्यानी एकदा मी बाहेर गेले तेंव्हा मी भेळ खाल्ली शौकिनची.
अन दोन दिवसातच माझी प्रकृती सुधारली.
तेंव्हापासुन मला काहिही झाले कि भाऊ म्हणतो की जाऊन भेळ खाउन ये शौकिनची.
8 Apr 2010 - 2:13 pm | अरुंधती
अटकमटक चवळीचटक.... चटकदार लेख :-)
पुष्करिणीची भेळ, शनिवारवाड्यासमोर बसून खाल्लेली भेळ, सारसबागेबाहेर स्टॉलवर डुगडुगत्या खुर्चीत बसून फन्ना उडवलेली भेळ, कल्पना भेळ........
................
...........
.........
म्हमईची भेळ मला इतकी न्हाई आवडली.... पुण्याची भेळ ती पुण्याचीच :)
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
8 Apr 2010 - 2:20 pm | प्रमोद्_पुणे
खरच चटकदार आहे लेख.. कल्याण भेळ पण छान असते. आणि सारसबागेत (विश्व हाटेलच्या बाजूने) एंट्री मारल्यावर लगेचच डाव्या हाताला एक भेळवाला आहे. तो पण १ नंबर भेळ बनवतो.
म्हमईची भेळ मला इतकी न्हाई आवडली.... पुण्याची भेळ ती पुण्याचीच १००% सहमत!!
8 Apr 2010 - 2:19 pm | अस्मी
मस्तच :)
नक्की टेस्ट करा.....तुमच्यासारख्या (जगभरातली भेळ चाखलेल्या) 'भेळप्रेमी'ने तर ’कल्याण भेळ’ टेस्ट करायलाच पाहिजे :)
बाकी लेख अतिशय सुंदर...तोंडाला पाणी सुटलं अगदी... :)
- अस्मिता
*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
कुणीही कसं दिसावं यापेक्षा कसं असावं याला महत्त्व आहे. ते शक्य नसेल तर जास्तीत जास्त कसं नसावं याल तरी नक्कीच महत्त्व आहे.
8 Apr 2010 - 2:24 pm | टारझन
आगायाया ... चित्रे साहेब ... आहो .. भेळ ... भेळ म्हणजे आमचा जीव की प्राण .. आमचा यमन आहे भेळ म्हणजे ..
बाकी सुक्की भेळ भारी .. ओल्या भेळेपेक्षा :)
= टारझन
प्रो.प्रा. चुटुकमुटुक चाट सेंटर
8 Apr 2010 - 5:11 pm | कवितानागेश
अत्ता इथे मिपा वर येउन अगदी फसले मी!
आत भेळ करावीच लागणार.
..दुसरा इलाजच नाही!
============
माउ
8 Apr 2010 - 5:12 pm | मीनल
नुसतं शिर्षक वचूनही तोंडाला पाणी सूटलं.
मीनल.
http://myurmee.blogspot.com/
8 Apr 2010 - 7:18 pm | रामची आई
अहाहा!! तोंडाला पाणी सुटलं :)
8 Apr 2010 - 7:46 pm | रेवती
आईग्ग! संदीप तू फार वाईट आहेस!;)
लेख चविष्ट तर आहेच (म्हणजे आधीच माहीत होतं) पण मनाचे इतके हाल झाले.........त्या दु:खातून वर येण्यासाठी भेळ खाते आता!;)
मला मुंबई, पुणे, कोल्हापूर आणि कुठल्याही गावची/शहरातली भेळ चालते......भेळ असल्याशी कारण!
दुसरोंके साथ बातां- खर्या भेळप्रेमींनो, कृपया वेगवेगळ्या ठिकाणच्या भेळेमध्ये भेदाभेद करून त्या ठिकाणच्या भेळप्रेमींना दुखवू नका!
;)
रेवती
8 Apr 2010 - 9:05 pm | यशोधरा
रेवती, हिंम्मत असेल तर बंगलुरातली गाजर मिश्रीत बेल (पक्षी: भेळेचा उच्चार असाच होतो इथे) खाऊन दाखव, तो जाने! :)
संदीप, दुष्ट माणसा! तुला बंगलोरी भेळ खायला लागो, हा शाप :P
9 Apr 2010 - 12:12 am | रेवती
भेळेत, सॉरी.....बेलेत गाझर ;) ?
भेळेला इतक्या दुष्टपणे वागवलं जातं याची कल्पना नव्हती मला!
रेवती
9 Apr 2010 - 10:16 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
हा हा हा ... यशो, तुझ्या दु:खात सहभागी आहे!
संदीप, लेख मस्तच ... चटपटीत!
अदिती
9 Apr 2010 - 1:22 pm | भाग्यश्री कुलकर्णी
अगं इथे इंदोरात एक दोन ठिकाणी मी मुळा घातलेली भेळही खाल्ली आहे.
8 Apr 2010 - 9:12 pm | गणपा
वाचता वाचता कळफलक ओला झाला यार
=P~ =P~ =P~ =P~ =P~ =P~ =P~
8 Apr 2010 - 9:20 pm | चतुरंग
कुफेहेपा?? :?
चतुरंग
10 Apr 2010 - 1:57 am | शुचि
कुफेहेपा =))
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
I have always known that at last I would take this road, but yesterday I did not know that it would be today. - Narihara
10 Apr 2010 - 2:07 am | टारझन
लोकावेसा ?
8 Apr 2010 - 9:23 pm | प्राजु
दुष्ट माणसा!! किती त्रास देशील?? ;)
लेख अफाट झाला आहे.. भेळे इतकाच जबरदस्त!
आम्ही आपली राजाभाऊ स्पेश्शलवाली माणसं..
:)
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/
8 Apr 2010 - 10:26 pm | सुधीर१३७
मस्तच लेख चटपटीत ............ यार, तोंडाला पाणी सुटले......
***अरे ही कल्याण भेळ कुठे आहे ते कोणी सांगेल का ???????? :W :? :W
9 Apr 2010 - 10:37 am | प्रमोद्_पुणे
२-३ ठीकाणी आहे.. बिबवेवाडी वरून कोंढव्याकडे जाताना डाव्या हाताला आहे (म्हणजे ESI office च्या सिग्नलला लगेच डावीकडे वळायचे कोंढव्याच्या दिशेने)..एक आहे ती ७ लव्हज पाशी..अजून एक आहे ती भांडारकर वर. .
9 Apr 2010 - 6:20 pm | सुधीर१३७
धन्यवाद रे मित्रा ...... प्रमोद ..
कल्याणमस्तु !!!
8 Apr 2010 - 10:40 pm | बेसनलाडू
पाहून आणि नंतर लेख वाचून भूक, जीभ इतके चाळवले गेले की गाडी काढून चाट प्याराडाइज गाठले आणि भेळ हाणली. मुंबई-पुण्याकडच्या किंवा भारतातल्या भेळेची सर नसली तरी दुधाची तहान ताकावर भागवली जाणे तेव्हढेच गरजेचे झाले होते.
(खवय्या)बेसनलाडू
8 Apr 2010 - 11:13 pm | चिन्मना
संदीप शेठ,
काय चटकदार लेख झालाय हो ! आम्हीसुद्धा लहानपणापासून भेळप्रेमीच. आमच्या घरात २ गट आहेत. एक भेळप्रेमी आणि दुसरा पाणीपुरीप्रेमी. मी आणि बायको विरुद्ध गटात आहोत हे सांगणे नलगे ;)
कल्याण भेळ कुठे आहे हो पुण्यात? आता लवकरच पुण्याला परत जायचे म्हणतोय.
लॉ कॉलेज रोड आणि कॅनाल रोडच्या कॉर्नरला सुद्धा एक प्रसिद्ध भेळवाला आहे ना? नाव आता विसरलो. भरपूर गर्दी असते तिथे.
_______________________________
जुनी वाईन, जुनी मैत्री, आणि जुन्या आठवणींचे मूल्य करता येत नाही
8 Apr 2010 - 11:46 pm | पिंगू
मुळी भेळ असतेच चटकदार आणि संदीपचा लेख तोही सारखाच जिभेला चटका लावणारा!!!!!!
9 Apr 2010 - 5:14 am | राजेश घासकडवी
लेख चटकदार व चमचमीत झालाय यात वादच नाही.
पण खरं सांगू का, पुणे कोल्हापूर वगैरे ठिकाणी भेळेच्या नावाखाली जे काही मिळतं ते मी खातो, नाही असं नाही. पण भेळ खावी तर मुंबईचीच. इतर भेळांमध्ये जाड गाठ्या, मोठे टोमॅटोचे तुकडे, अर्धा इंच जाड कांदा, शेंगदाणे, दाताने फुटणार नाही अशा कडक लाल गाठ्या, खूप लाल तिखट, जाडीभरडी शेव असला 'दणकट देशा, दगडांच्या देशा' स्टाईलचा भरताड असतो. मिसळीच्या तर्रीत जीव धरू शकेल असा मसाला कुरमुऱ्यात घातलेला असतो. आता ते मूळ रसायनच असं आहे की तरी ती खाववते पण तितपतच.
मुंबईची भेळ फारच नाजूक असते. पातळ नायलॉन शेव, पातळ कुरमुरे जे चटणी घातल्यावर लगेच चुर्र करून मऊ व्हायला लागतात. आणि तिखट मिरचीची चटणी, आंबडगोड चटणी, कैऱ्या आणि चुरलेल्या भेळेच्या पुऱ्या (पाणीपुरीच्या नाही). एकंदरीतच तुलना करायची झाली तर मुंबईची भेळ म्हणजे खानदानी सिल्क तर पुण्याची म्हणजे दणदणीत गोणपाट...रंग, चव तीच पण पोतात जमीन अस्मानाचा फरक.
आणि पुठ्ठ्याने भेळ खाणं म्हणजे तर अगदीच अपमान त्या भेळेचा. ती भेळेच्या पुरीनेच खायची. मग शेवटी ती किंचित ओली झालेली पुरी खाऊन टाकायची. तरच भेळसाधना पुरी होते.
9 Apr 2010 - 8:00 am | बेसनलाडू
मग शेवटी ती किंचित ओली झालेली पुरी खाऊन टाकायची. तरच भेळसाधना पुरी होते.
अगदी अगदी!! हे वाक्य तर नुसतं वाचूनच जीभ चाळवली, कोरडी पडली. भेळीचा सोस लागला पुन्हा :(
(मुंबईकर)बेसनलाडू
9 Apr 2010 - 12:27 pm | दिपक
संदिपच्या लेखाने आधीच भेळेची भुक चाळवली होती आणि राजेशरावांनी त्यावर कहर केला. लवकरात लवकर भेळ खाण्याशिवाय पर्याय नाही
+११११११११११११११
9 Apr 2010 - 7:19 pm | रेवती
राजेशसाहेब,
आपण केलेले मुंबईच्या भेळेचे वर्णन फारच मस्त!
आजकाल पुण्यात मिळणारी भेळ ही २०-२२ वर्षांपूर्वी मिळणार्या भेळेपेक्षा वेगळी आहे. मी लहान असताना सारसबागेच्या कडेला उभ्या असलेल्या गाड्यांवरची भेळ चवदार असायची. त्यावेळी सारसबागेत आईवडील लहान मुलांना खेळायला/दर्शनाला घेऊन जात मग फुगा, भेळ असा कार्यक्रम होत असे.
आपण छानपैकी स्वेटर घालून (आजकाल गणपतीलाही घालतात ;)) किंवा नाजूक नक्षीची शाल पांघरून फिरायला जावे आणि 'किती ही थंडी' अशी लाडिक तक्रार केल्यावर एखाद्या खेडेगावातील माणसाने त्यामागची भावना समजून न घेता 'काय राव्!......घ्याकि जाडजूड कांबळं.....काय थंडीबिंडी वाजत नाय' असं म्हणावं असं वाटलं तुमची प्रतिक्रिया वाचून म्हणजे पुण्याच्या भेळेला गोणपाटाची उपमा देताय म्हणून म्हटलं!
रेवती
9 Apr 2010 - 8:19 pm | मेघना भुस्कुटे
"पण भेळ खावी तर मुंबईचीच."
अगदी अगदी. बंगळुरात तर भेळेच्या नावाखाली जे काही देतात, ते खाल्यावर जीव द्यावासा वाटतो. रगडा-पॅटीसमधे वापरायचे उकळते वाटाणे, मटण-मसाल्याचा वास येणारा एक उग्र रस्सा, गतप्राण झालेली काकडी आणि चक्क जाडी शेव. शिवाय त्यात गोड पाणी मिसळताना कसला संकोच वाटतो देव जाणे. बरं, मिरची तरी नीट घालावी? बरं, भेळ कस्टमाइज करून घ्यावी, तर आपल्याकडेच असं बघतात - "काय माहीत कुठून कुठून येतात माणसं... मी सोन्यासारखे वाटाणे घालतोय, तर नको झालेत माजोरडीला...".
तरी आपण निर्लज्ज आणि मग्रूर लुक्स देऊन आपलं म्हणणं रेटत राहिलं, तर खाणेबल भेळ मिळते. हे सगळं करताना, कमाल संथ आविर्भाव. मुंबैच्या भेळवाल्याच्या चलाख, चटपटीत हालचालींमधे, त्याच्या पातेल्याच्या खणखणाटामधे आणि वरतून कंजूषपणा न करता पसरलेल्या झीरो नंबरच्या शेवेमधे भेळेच्या यशाचा मोठा वाटा असतो. नाहीतर हे! भेळ बनवून आपल्यावर नि त्या भेळेवर उपकार. इथल्या भेळवाल्यांना एक दिवस मुंबैच्या भय्याच्या हाताखाली कामावर ठेवावंच. रात्रीला अतिश्रमानी आणि गिर्हाइकाच्या अपमानास्पद कटाक्षांनी त्यांना नाही हाकललं, तर नाव बदलून देईन...
असो!
मुंबैची भेळ...... :(
9 Apr 2010 - 1:42 pm | जयवी
चित्र्यांच्या संदीपचा दुष्टपणा....!!
भेळेचं इतकं चटपटीत, चविष्ट, आंबट-गोड वर्णन करुन त्याने मिपावरच्या सगळ्यांच्या तोंडचं पाणी पळवलंय. कधीतरी खाल्लेल्या भेळेची आठवण करुन वेळ मारुन नेताहेत सगळे. भारतातल्या मिपाकरांना फारसा त्रास झाला नाही कारण ही भेळकथा वाचून ते लगेच जाऊन भेळ खाऊन आले. पण परदेशात राहणार्या मिपाकरांना मात्र भयंकर मनस्ताप होतोय. भारतात जायची वाट त्यांनी किती कारणांसाठी पहायची....??
त्यामुळे आम्ही चित्र्यांच्या संदीपचा जाहीर निषेध करतो आहोत ;)
9 Apr 2010 - 7:47 pm | राघव
संदीपशेठ, (कुठे गेला रे हा ***)
सप्रेम नमस्कार, (जाहीर निषेध)
खूप छान आठवणी जागवल्यात. (जग दुष्ट असतं म्हणतात ते काय खोटं नाय..)
तुम्हास खास धन्यवाद. (ये जरा असा.. तुला चोपतो चांगला..)
:)
छान लेख. मी मूळचा नागपूरचा. त्यामुळे माझ्या दृष्टीनं नागपूरच्या भेळला दुसरा पर्याय नाही असे माझे वैयक्तीक पण ठाम मत आहे. :) (राघवा तू खातंय आता मार..)
तशी कल्याण भेळही चांगली पण माझ्यासाठी जरा तिखट करा असं सांगावं लागतं.
(नागपूरी भेळवाला) राघव ;)
10 Apr 2010 - 1:53 am | शुचि
नका रे असा छळवाद मांडू. काय तो फोटो, काय ते वर्णन ..... पुण्याची भेळ आठवली. मुंबईची पाणीपुरी, शेवपुरी आठवली. रगडा पॅटीस आणि दहीपुरी सुद्धा आठवली.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
I have always known that at last I would take this road, but yesterday I did not know that it would be today. - Narihara
10 Apr 2010 - 4:38 pm | भोचक
चटपटीत लेख. मुंबईत परळमध्ये मामाच्या घराच्या आसपास खाल्लेली भेळ माझ्यामते अप्रतिम होती. नाशिकलाही शौकीनची भेळ मस्त असते. बाकी पाणीपुरीही मस्त लागते हो.
(भोचक)
हा आहे आमचा स्वभाव
10 Apr 2010 - 4:59 pm | चिरोटा
लेख मस्तच जमलाय ,चवदार भेळेसारखाच.
एकदम. भेळही कागदी डिशवरच पाहिजे.काचेच्या डिशवर भेळ देतात पण मजा नाही येत खायला.
सहमत. एकदा मला एकाने बाँबे भेळ्च्या नावाखाली भेळेवर गाजर किसून घालून दिले होते.तरीही त्यातल्या त्यात बर्यापैकी भेळ खायची असेल तर कुमारा पार्क्(पश्चिम)(शेषाद्रिपूरमच्या पुढे) येथे कॉलेजच्या जवळ मिळते.
(चविष्ट भेळेच्या शोधात) भेंडी
P = NP
11 Apr 2010 - 5:15 am | संदीप चित्रे
ह्या लेख लिहिण्याइतकाच आनंद ह्या लेखावरच्या प्रतिक्रिया वाचताना येतोय !
मनापासून प्रतिसाद दिल्याबद्दल धन्स.
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com
13 Apr 2010 - 7:26 am | सखी
खरचं चटपटीत लेख झालाय रे. मला तर वाचल्यावाचल्या लगेच विमानात बसुन पुण्याला जावसं वाटलं, पण आता कितीतरी महीने वाट पहाणं आलं. :(
13 Apr 2010 - 7:42 am | II विकास II
मुंबईत चाअयनीझ भेळ हा नवीन प्रकार आला आहे. कोणी खाउन बघितला आहे का? नावातच भंयकर घोळ आहे, असो.
---
प्रतिसादात आणि स्वाक्षरीत मराठी संकेतस्थळांची जाहीरात करुन मिळेल. विद्रोही संकेतस्थळांना खास सुट. योग्य बोली सह संपर्क करावा.
13 Apr 2010 - 8:51 am | सन्जोप राव
समस्त खवय्ये चिरायू होवोत!
सन्जोप राव
वो जिनको प्यार है चांदीसे इश्क सोनेसे
वही कहेंगे कभी हमने खुदखुशी कर ली