टिचला बिलोरी आयना - भाग २.

रामदास's picture
रामदास in जनातलं, मनातलं
3 Nov 2009 - 9:45 pm

भाग १
----------------------
बाप्पा भट मोटारीची वाट बघत आडोशाला उभा होता.सोबतीला कुणी उभं राहील असं शक्यच नव्हतं.उन्हात पत्रा तापून जीवाची काहीली होत होती.
सर्विस मोटार उशीरा आली.
बाप्पा भटाला बघीतल्यावर किन्नर धावत पुढे आला.भटाच्या हातात काही सामान नाही बघीतल्यावर शिटा हटवून जागा केली.
डायवर लगबगीनं पुढे आला.बाप्पा भटासमोर वाकून नमस्कार केला.
"आड्याच्या फाट्यावर थांबव."बाप्पा भट त्याला म्हणाला.
डायवर मुंडी हलवत चाकावर बसला.
धुळीचा लोट उठला.बाप्पा भट डोळे मिटून स्वस्थ बसला होता.
वर्षापूर्वी आड्याच्या भटानी तुळशीच्या लग्नाच्या दिवशी शब्द दिला होता की अर्जुनाची दोन झाडं आहेत त्याच्या जवळ पाणी लागेल.
बाप्पाचा विश्वास बसला नाही.
भटाचं नाव तालुक्यात प्रसिध्द होतं नविन विहीरी शोधण्यासाठी आणि उधारीची नविन कुळं शोधण्यासाठी.
बाप्पाचा वाडा चढणीवर होता. पाणी लागलं असतं तर ढोराच्या माळाकडे पण ढोराचा माळ देवस्थानाचा होता. वरच्या अंगाला काळा कातळ.
"पूर्वेकडे तोंड केल्यावर डाव्या हाताला सकाळी तीन प्रहरानंतर जिथे अर्जुनाची सावली पडेल तिथं पाणी लागेल महाराज " आड्याचा भट जावयाला महाराज म्हणायचा.
"नाही लागलं तर पोरीला माघारी पाठवीन."
लाचारीला पेचात घालून जबरदस्तीचा तोबरा भरण्यात बापा भट हुशार होता.
सावकारी लाचारीच्या जीवावर फोफावते हे त्याला पक्कं माहीती होतं.
आड्याचा भट बोलून चालून इभ्रतीला नागवा झाला होता.
"तुम्ही म्हणाल ते महाराज. पण तुम्ही खोतमिराशी तुमच्या मनासारखं नाही झालं तर नांगर फिरवाल गरीबावर पण मनासारखं झालं तर बिदागी काय द्याल ?"
बाप्पा भटानी दिडशे रुपयाची बिदागी मिरकुटे सावकाराकडे ठेवली.व्याजावर.
पाणी लागलं आणि मृगाची चरणं सुरु होईस्तो जाईतो तळ नाही नजरेस आला तर सावकारानी व्याज मुद्दल भटाला द्यावं असा वायदा केला.
पण तोपर्यंतची गडी मजूरी भटाचीच.
धुळीचा खकाणा आला आणि भट भानावर आला.
कळसूलीचा थांबा गेला.
पुढचा थांबा आडगाव फाट्याचा. उष्मा भारी वाढला होता. बाप्पानी डोक्यावरची टोपी काढून झटकली.
डोक्यावरून हात फिरवला. कोटाच्या खिशातून रुमालाची घडी काढून रुमालाची त्रिकोणी घडी केली.
कानामागून वळसा घालून गाठ मारली. वर टोपी घातली.
खिडकीतून झळांबरोबर तांबड्या धुळीचा लोट आत आला.बाहेर दोन्ही बाजूस निवडुंग सोडला तर हिरवं झाड नजरेस येत नव्हतं.
आडगाव फाट्यावर मोटर थांबली आणि किन्नर धावत आला.
दरवाजा उघडून बाप्पाला म्हणाला
"मुक्कामाला नसाल तर येताना इंदगाव मार्गे या. आज बाजार .तासभर गाडी उभी असेल."
मान हलवत बाप्पा खाली उतरला.
बाप्पाच्या पाठी आड्याचा तलाठी उतरला. तलाठ्याची बैलगाडी उभीच होती.
"सासरे भेटीस आला आहात म्हणा की.मग या की गाडीत बाप्पाजी."
तलाठी बाप्पाच्या ओळखीचा नव्हता.पण बाप्पाला ओळखीची गरज नव्हती.
न बोलता बाप्पा गाडीत बसला.
तलाठ्याच्या शिपायानी दप्तर आत ठेवलं.गाडी पुढं चालायला लागली.
चाकोरीतून धुळीचा हबका चेहेर्‍यावर आला.
बाप्प्पा काही बोलेना म्हटल्यावर तलाठ्यानीच विषय काढला.
"कालच भेटले होते सासरे ."
बाप्प्पानी प्रश्नार्थक नजरेनीच विचारलं .कुठे ?
"कुठे म्हणजे ह्या आपल्या वडवलीला .रात्री मुक्कामाला होते म्हणे..." तलाठी गुळमट हसला.
न बोलता प्रवास चालू झाला.
तलाठी सरळगावचा होता पण कागदावर फेरफार करता करता बर्‍याच गोष्टी कानावर पडत.
आड्याच्या भटाकडे जाणारा रस्ता आला तेव्हा बाप्पा म्हणाला "थांबव रे गाडी."
"सोडतो ना मालक घरापोतर ."
"नको. चालतच जातो."
माळ खाली उतरल्यावर भटाचं वाडी दिसायला लागली.चार वर्षापूर्वी एक इनाम वतन बाप्पानी खरेदी केलं होतं त्यात ही वाडी आली होती.
बाप्पाचा श्वास फुलला.
"रांडेचा घरी असला तर बरं ."भट तोंड चुकवून फिरत असेल याची बाप्पाला शंका होतीच.
तलाठ्याची बातमी खरी असेल तर वडवलीला भट मुक्कामाला कुठे गेला असेल याची खात्री बाप्पाला होती.
वडारांची मजूरी रांडेच्या *कात घातली मादरचोदाने असं पुटपुटत भट पुढे गेला.
बाजूच्या निवडुंगात खसफसल्याचा आवाज आला. हातातली काठी उगारत बाप्पानी नजर टाकली.
निवडुंगाच्या टोकावर एक मोठा सरडा मान उंचावून या या या या म्हणत होता.गळ्याखाली लालभडक पिशवी लोंबत होती. म्हणजे पाऊस जवळ आला.
भटाला आठवण झाली.
या बावीच्या नादात कौलं चाळायची राहीलीच.
एक शिवी भटाला हासडत बाप्पानी मनाशी खूण गाठ बांधली.
उद्या चार गडी कौलं चाळायला लावली तरच मृगाच्या अगोदर काम होईल.
मृग म्हटल्यावर पुन्हा अर्धवट पडलेल्या बावीची आठवण झाली.
उगाच या भटाच्या नादाला लागून मोठ्या बावेचा घाट घातला.
बोकलाच्या तासलेल्या चीर्‍यांचा ढिग आठवून बाप्पाला वडारी आठवले.
झरा नाही लागला तर या वर्षी ओहळाच्या डाबीवरून पाणी भरायला लागेल.
बाप्पाची चाहूल लागल्यावर वाडीतून चार मोकाट कुत्री भुंकत आली.
बाप्पानी वाकून दगड उचलला पण चटका बसल्यावर हातातून गळून पडला.
धोतराचा सोगा वर घेत भट धावत येताना दिसला.
"या महाराज या.गरीब सासुरवाडी..."
बाप्पानी रोखून धरलेला क्रोधाचा स्फोट झाला.
"बावीला पाणी नाही लागलं .पोरीला परत घेऊन जा उद्या ."
भट केवीलवाणा उभा राहीला.
"घरात तर या महाराज.सामोपचाराने घ्या ."
सामोपचारानी घ्या म्हटल्यावर बाप्पाचं पित्त आणखीनच खवळलं.
"त्या वडारांची मजूरी कोण देणार रे हरामड्या ,तुझा बाप."
"देणारच होतो म्हाराज पण हात जरा जड होता."
"हात जड होता तर वडवलीच्या रांडेकडे काय भिक मागायला गेला होतास ?"
"बाप्पा माफ करा आता.गरीबाचं ऐकून घ्या.सासरा म्हणून नाही मुलीचा बाप म्हणून माझं ऐका."
बाप्पाचा हात धरून भट त्याला घराकडे घेऊन गेला.
छोट्या वाडीची दुर्दशा झाली होती.कौलं न चाळल्यानी नळ्यानळ्यात गवत वाढून सुकलं होतं.
आंगणं न चोपल्यामुळे सगळीकडे उखळवाखळ करून कुत्र्यांनी वाट लावली होती.
बभिंतीचे पोपडे पडून विटा डोकावत होत्या.
बाप्पा बावीकडे गेला. सासर्‍यानी हातावर पाणी घातलं .हातापायावर थंडगार पाणी पडल्यावर बाप्पा जरा शांत झाला.
ओसरीवर दहा ठिगळं लावलेलं जाजम आंथरलं होतं.पंचांगाचे ढिग ,पिवळे पडलेले ग्रंथ-पोथ्या आवरत भट सारखा चुटपुटल्यासारखा बोलत होता.
पाणी .पाणी पाठवा म्हटल्यावर वेडी तायजा तांब्या फुलपातर घेऊन आली.
डोईला आठवडाभरात तेलाचा स्पर्श झाला नसावा.पातळाला दंड घातले होते.
पाय पडायला बाप्पाच्या जवळ आली तेव्हा आलेल्या दुर्गंधीनी बाप्पानी नाक मुरडलं.
भट मान हलवत म्हणला "आता अवस जाईपर्यंत हाच अवतार"
बाप्पाला एकाएकी भटाची दया आली.
एक बोळकं घेऊन बाहेर आला.त्यातून काही नोटा आणि चिल्लर पडली.
भटानी हिशोब केला. पंचांगाच्या घड्या उलगडल्या.आणखी काही नोटा मिळाल्या.
"हे अठ्ठ्यात्तर रुपये आणि सहा आणे"कालपोतरचा हिशोब.
बाप्पानी न मोजता पैसे कोटाच्या खिशात टाकले.
"मग वडार्‍याला का नाही दिले पैसे ? बाप्पा काहीतरी बोलायचं म्हणून बोलला.
"कालपर्यंत उसंत नव्हती.बघताय ना घरातली अवस्था."
"आता वडारी पळाल्यावर आम्ही काय करावं.? मृग समोर आला."
बाप्पा बोलत होता पण आपल्या बोलण्याचा पोकळपणा त्याला जाणवत होता.
एकाएकी उभं राहत बाप्पा म्हणाला "येऊ आता ?"
"नाही .आता माझं ऐका.वडवलीला का गेलो होतो ते सांगतो."
"आता त्यात काय सांगायचं .आपली गाठच वडवलीला पडली"
"नाही आता ते कारण नाही .ज्या दिवशी मुलगी तुम्हाला दिली त्या दिवसापासून नाही."
"मग मुक्कामाला का गेलात हो ?"
"समजवणीसाठी ."
"हो समजवणीसाठी झालाच असता तर इलाज करायला."
"असं काय झालं ?"
" तुकीला दिवस गेलेत"
वरच्या भालावरून टपकन पाल खाली पडली.
चुकचुकत सरसर पळत वर गेली.
हा आता आणखी अपशकून.
बाप्पाची सहनशक्ती संपुष्टात आली.
"त्या रांडेला दिवस गेले तर जाणारच. माझा काय संबंध."
"संबंध नाकारून चालेल कसं ?दहा कोस तिठ्यावर पण चर्चा असते तुमच्या येण्याजाण्याची "
"गावाची पत्रावळ . आम्हीच जातो असं काय ?" बाप्पानी उपरणं झटकलं .
"तसं तुम्हाला वाटतं पण तुम्ही आल्यापासून.."
"त्या रांडेची वकीली करता काय आता ?" बाप्पानी आतापर्यंत सदर्‍याचं टोक धरायची संधी आता पर्यंत कुणालाच दिली नव्हती.
"नाही .पोरीच्या संसारावरचा निखारा झटकतोय. काल त्यांची जात पंचायत बसली होती. आज सकाळीच पोचणार होती तुमच्याकडे"
"आतापर्यंत जात गेली होती कुठे ? आम्ही घेतलं तसं दिलं .गेली चार वर्षं खंड माफ केला आहे शेकडो रुपयांचा "बाप्पाचा स्वर टिपेकडे जायला लागला होता.
भट हलक्या कानगोष्टीच्या आवाजात म्हणाला "मुद्द्याचं बोललात महाराज"
"खंड माफ केलात कशासाठी ? भरपाई म्हणून."भटानी स्वत:च उत्तर दिलं." पण तुकीच्या नावावर शेकडो गुंठे जागा निघाली आहे टेकावड्याच्या रानात .जातीबाहेर काढली तर गिळायला सगळे तयार झालेत."
आता बाप्पाचं सावकारी डोकं चालायला लागलं."टेकावड्याच्या पुढं नविन घाटरस्ता काढतायत म्हणे"
"हो ना. कंत्राटदार आहे झुंजारराव.जातीचा म्होरक्या"
"तुकीला सांगा मी घेतो जमीन सांगेल त्या दामानी " पंचक्रोशीतल्या राव मराठ्यांना पेचात घालायची बाप्पा संधी शोधतच होता.
"हा तिढा थोडा अवघड आहे.ती काही मोटळी फोडायला कबूल नाही. जीव द्यायची भाषा करते."
"मग ते बेवारशी पोर सांभाळणार कोण ?"
"तुम्हाला दत्तक देईन म्हणते.काय करावं माझ्या पोरीची कूस काही अजून उजवली नाही "भटाचा स्वर रडवेला झाला.
भटाचे दंड पकडून बाप्पा ओरडला "तुम्ही काय षंढ समजता का मला ?"
सकाळी दुसरीपण बाव कोरडी का ?असं विचारणार्‍या पिंपुटकर म्हातार्‍याचं बोळकं बाप्पाला आठवलं.
"एक काम करा .तुकीकडे चला उद्या .मार्ग काढू."
"काय मार्ग काढायचा ?"
"तिचं बेवारशी पोर मी काही दत्तक घेणार नाही पण हौसच असेल तर नका पाडू पोट.मी करतो व्यवस्था नाशकात रहायची पण पोर जवान होईस्तो गावात यायचं नाही. खर्च मी करीन पण टोकवड्याच्या रानाची कुळमुखत्यारी घ्या माझ्या नावावर"
"एव्हढ्यानी काय होणार ?"
"काय व्हायचय ?पोर जाणतं होईस्तो जमीन आम्ही सांभाळू सारा आम्ही भरू. उत्पन्न गुंतवू .पोर गावात येईल तेव्हा सावकार म्हणून "
"जा .आज रात्रीच पोचा.उद्या सरळगावाच्या कोर्टात या .मी पण येतो रायके घेऊन."बाप्पानी भटासमोर पेच टाकला.
"गेलो असतो पण...."
बाप्पा समजला.भटानी दिलेली पैशाची मुटकळी समोर टाकत म्हणाला .जा .मन लावून काम करा आणि दसर्‍याला या चोरचोळीसाठी"
इंदगावाच्या बाजारापर्यंत सासरा जावयाला सोडायला आला.

* * *
बाप्पा पाय धुवून माजघरात आला. पोटात भूकेनी थैमान मांडलं होतं
देवाजवळ समई तेवत होती.
अगरबत्तीचा सुगंध पण येत होता पण चुलीजवळ बायको दिसेना.
त्यानी खाकरून आल्याची खूण केली.
"पान वाढा आता" बाप्पाला प्रेमानी बोलायची सवयच नव्हती.
'सैपाक नाही केला आज" दाराआडून काकणं वाजली.
"का आई मेली का "बाप्पा बायकोला भटाच्या मोबदल्यात आणलेली बटीक समजायचा.
"दुपारचा नैवेद्य न दाखवता गेलात .देव उपाशी आहेत. रात्री चूल तरी कशी पेटवू'
बाप्पानी कपाळाला हात लावला. सकाळीच बाहेर पडल्यावर चकव्यात पडल्यासारखं झालं होतं.
"मग झोपा आता उपाशी. सकाळी भाताचं तपेलं लवकर चढवा."
फुलपात्रात पाणी ओतत बाप्पानी हुकूम सोडला.
"उजाडती संकष्टी आहे.तुमची निर्जळी असते."
बाप्पानी हातातलं फुलपात्र माजघरातून सैपाकघरात फेकलं."तुमच्या सारखी भिकारडी घरात आणली तेव्हाच अक्कल सुचायला पायजे होती."
थोड्या वेळानी दाराआड काकणं वाजली. "दूधाला हरकत नसावी."
"या माडीवर दूध घेऊन. "बाप्पाला दुपारी मारलेल्या फुशारकीची आठवण झाली.

* * * *
बाप्पा वाट बघत होता तो निरोप दुसर्‍या नाही तरी तिसर्‍या दिवशी आला. पोंक्षे वकीलाचा माणूस कागदं घेऊन आला.
काही वेळानी टोकवड्याच्या तलाठ्याला घेऊन भट आला.दुपारच्या जेवणापर्यंत चर्चा चालाल्या होत्या.
बाप्पाच्या म्हणण्याप्रमाणे वकील तुकीच्या येणार्‍या पोराचे अज्ञान पालकत्व घ्यायला तयार झाले.कुळमुखत्यारीचे कागद बाप्पाच्या नावानी तयार झाले.
नाशकाच्या आश्रमात तुकीची तात्पुरती सोय वकील करणार होते. कराराप्रमाणे मूल एकवीस वर्षाचे होईपर्यंत बाप्पाची कुळमुखत्यारी अबाध होती.
तोपर्यंत दावा सांगायला येऊ नये म्हणून पैशाची तरतूद वकीलामार्फत करण्याचं ठरवून बैठक संपली. वकील आणि तलाठी हिरव्या गड्ड्या खिशात सारत निघून गेले.
भट वडवलीला जाणार होता.. सकाळी मामलेदाराच्या कचेरीत भेटायचं ठरवून भट मार्गाला लागला.बाप्पानी न बोलता एक हिरवी चळत भटाला दिली.
"हे काम फत्ते केलत तर बावीचा बोल तुमच्यावर राहणार नाही " बाप्पा जाताना म्हणाला.
********
डोक्यावर छत्री घेऊन बाप्पा उन्हात उभा होता. मामलेदाराचा शिपाई दहा वेळा येरझारा घालून गेला.साडे अकरा वाजता मंडळी येताना दिसली.तुकी डोक्यावरून पदर ओढून मान खाली घालून उभी होती.एक वाजता सही शिक्का झाला.वकीलानी हातात लखोटे दिले. वकील गेल्यावर तुकी एकदम बाप्पाच्या पायावर कोसळली. बाप्पानी तिला उचलून धरलं.हातात पैशाची थैली दिली.
कचेरीत एकाएकी शुकशुकाट झाला.भटानी चतुराई करून तुकीला बाहेरची वाट दाखवली. बाप्पा दमल्यासारखा खुर्चीत बसला. थोड्या वेळानी भानावर आला तेव्हा लक्षात आलं की सदर्‍याची बाही जांभळ्या -काळ्या शाईनी बरबटली होती.
भट आत आला. "काय झालं ?" बाप्पानी विचारलं .
"पेशल मोटारीनी पाठवली."
"चला आता येऊ आम्ही भटानी विचारलं."भटानी विचारलं.
बाप्पाचं लक्ष नव्हतं त्याला टोकवड्याची जमीन दिसत होती.
*****************************
बाप्प्पा सरळगावच्या बाजारातून बाहेर येता येता मिरकुटे सावकाराच्या पेढीवर गेला.
सावकार लवंडले होते.बाप्पानी हाक दिल्यावर त्यांच्या डोळ्यावरची झोप गेली.
पाणी ?
नको.
"आज कचेरीत आल्याची खबर लागली होती पण विचार केला की वेळ झाली की यालच."मिरकुटे म्हणाले.
काय कामानिमीत्त का काय ? बाप्पानी विचारलं .
होय तर.
मूळाची आणि व्याजाची सोडचिठ्ठी देऊन व्यवहार संपवायचा होता.
असू द्या . तुमच्याकडे पैसे आमच्या घरी काय आणि तुमच्या घरी काय ? बाप्पा म्हणाला.
"व्यवहार तर गेल्या आठवड्यातच वळता झाला .तुमचे सासरे आले होते पत्र घेऊन .आता बावीला पाणी लागल्यावर तुमच्या इच्छेप्रमाणे रक्कम दिली त्यांना.सोबत वडारांची फौज पण होती.
काही हिशेब बाकी होता म्हणे. "
"सावकार काही भूलचूक तर नाही ना ?"
"छे हो. हे बघा तुमचे पत्र."
बाप्पा रागानी थरथरायला लागला होता.
भटानी फसवायचं सोडलं नव्हतं.म्हणजे परवा दिलेली रक्कम इथलीच उचल होती तर.
कपाळावरची शिर रागानी उडायला लागली.
"हरामडा अजून आड्याला पोहचला नसेल असा विचार करूनयेतो असं म्हणत बाप्पा धावतच निघाला.
पेशल गाडी करून आड्याच्या गाडी चाकोरीत पोहचला तेव्हा भट दुरून येताना दिसला.
कोपरीच्या गळ्याभोवती हात घालून त्यानी भटाला चाकोरीच्या धुळीत लोळवलं.
कुत्री जोरात भुंकायला लागली. भटानी गरम धूळीत लोळण घेत बाप्पाचे पाय पकडले.
"माफ करा महाराज.."बाप्पानी एका लाथेत भटाला धुळीत ढकललं .
"मादरचोद, खोटी कागदं लिहीतो."
अंगावरची धूळ झटकत भट केवीलवाणा उभा राहीला.
"महाराज.सामोपचाराने घ्या ."
सामोपचारानी घ्या म्हटल्यावर बाप्पाचं पित्त आणखीनच खवळलं.
लाल मातीच्या चाकोरीत त्यानी भटाला आडवा पाडला.
"नाही लागलं पाणी तर घेऊन जाईन पोरीला म्हणाला होतास ना ?
याच तोंडानी बोलालास ना ?" असं म्हणत बाप्पानी मूठभर गरम धुळीचा फुफाटा त्याच्या तोंडात कोंबला.
भट मान कापल्यासारखा गडबडा लोळत होता.
त्याच्या छातीवरबसून बाप्पानी गुरासारखा तुडवला."बाप्पा माफ करा आता.गरीबाचं ऐकून घ्या.सासरा म्हणून नाही मुलीचा बाप म्हणून माझं ऐका."
भटाचं मातीनी भरलेलं तोंड भेसूर दिसत होतं .
वाडीतली सगळी कुत्री भुंकत होती.भेसूर रडत भट घराकडे गेला.
डायवरला खूण करत बाप्पा घराकडे निघाला.
*****************
अंगावरचं उपरणं फेकत बाप्पा घरात शिरला.
बायको डोक्याखाली पातळ घेऊन निजली होती.
उठ रांडे बाप्पानी लाठ घालत म्हटलं .
सटपटून बायजा उठली.
हाताला धरून बाप्पानी दरदरा ओढत तिला बैठकीत आणलं .
"चल हो घराच्या बाहेर. "
लंगडी बायजा अडखळली आणि उंबर्‍यात पडली.
ओठातून रक्त यायला लागलं. बाप्पाच्या आवाजानी कौलं चाळणारे गडी उतरून खाली आले .
बाप्पाचा एकूण अवतार बघून अंगणात पळाले.
बाप्पानी जिन्यावरून ओढत बायजेला अंगणात आणलं."रांडे. तू दळभद्री .तुझा बाप दळभद्री."
"अहो माझं ऐका हो "बिचारी रडत भेकत म्हणाली.
"बाबांची शिक्षा मला का हो ? मी काय हो केलं."
बावीच्या बाजूला बोकलाचे दगड होते. बाप्पानी एका लाथेत तिला उडवलं.तोल जाऊन ती दगडावर पडली.
दुपारच्या उन्हात तापलेले दगड. अस्ताव्यस्त बायजा मटकन खाली बसली.
गडी काम सोडून गावाकडे पळाले.वाड्यात आणखी कुणीच नव्हतं.
"आता मी काय करू हो"
"घरात पाउल टाकशील तर कापून टाकीन."
बाप्पा गच्चीत उभा राहीला.
खुरडत खुरडत बायजा घराकडे आली की शिव्यांची लाखोली वहायचा.
मग ती परत मागे सरायची.
तासभर असंच चाललं होतं.एकदा धीर करून ती जिन्यापाशी आली.
दाराआद लपलेल्या बाप्पानी परत तिला अंगणात फेकली.
वाडा रडण्याभेकण्याच्या आवाजानी बह्रून गेला.
साडेचार वाजले.धुळीची वादळं यायला सुरुवात झाली.
"बघा हो आज पाऊस यील .बाव भरेल हो आज."
"रांडे मी मुतलो तरी भरेल बाव म्हणून तुला काय घरात घेऊ?
"जा बापाकडे घेऊन ये भरपाई."
बाप्पानी तिची पातळं अंगावर फेकली.
वारा जोरात वहायला लागला. धुळीनी बायजेचे डोळे भरून गेले.
'मला नका हो दूर करू."
आता बाप्पानी चाळायला काढलेले नळे फेकायला सुरुवात केली.
बिचारी खुरडत चार पावलं आली की बाप्पा नळा फेकायचा. तिनी चुकवला तर फुटून बाजूला पडायचा.
एकदम काळोख पडल्यासारखं झालं हवेत गारवा आला,अर्जुनाची दोन्ही झाडं झुलायला लागली.
रडून थकलेली बायजा झाडाखाली बसली.
बाप्पाच्या अंगातला सैतान आज गप्प बसू देत नव्हता.
अंधारलं आणि बाप्पाला चेव चढला ."मर रांडे आज पावसात ."
"एकदा तरी मला आत घ्या हो.जन्म नरकात गेला बापाकडे.माफी मागते मी .पायावर डोकं ठेवू द्या हो."
बाप्पानी पुन्हा एकदा नळा फेकून मारला. यावेळी नेमका कपाळावर.रक्ताची धार लागली.
बायजेचा चेहेरा भरून गेला. घसा सुकून आवाज बंद पडला.मधूनच विज कडाडायला लागली की बायजेचा चेहेरा बाप्पाला दिसायचा.
मग आणखी एक नळा फेकायचा. नळ्यांच्या खचात बायजा बसून होती.
पावसाचे मोठमोठे थेंब थेंब पडायला सुरुवात झाली.
बाप्पा गच्चीत उभा होता.पुन्हा विज कडाडली.
"काय करू हो मी ?" बायजेचा आवाज आला.
"मर त्या बावेत .जीव दे. झरे तरी फुटतील"
बाप्पा ओरडला.
त्या गडगडाटात तिला ऐकू गेलं आणि म्हणाली "मरू कशी हो ?"
"तुमचा जीव आहे माझ्या पोटात."
बाप्पाच्या मनातला सैतान त्या क्षणी मेला .पायर्‍यांवरून धावत बाप्पा बायजेकडे गेला.पुन्हा विज कडाडली.
सगळा आसमंत पांढरा फटफटीत पडला. बावीच्या काठाजवळ उभी असलेली बाईजा आकाशाकडे आकांत करत असलेली बाप्पाला दिसली.आगीचा लोळ अर्जुनाच्या शेंड्यावरून गडगडत बाईजाकडे गेला.बाप्पाचे डोळे तेजानी दिपले. डोळे मिटले तरी समोर लाखो फुलबाज्या तेजाळताना दिसत होत्या.अर्जुनाची झाडं कडकडून खाली कोसळल्याचा आवाज आला. बाप्पाचे कान गडगडाटानी बंद पडले होते. बाप्पा धावत पुढे गेला. बावीच्या काठावर बाईजाबाईचा देह पडला होता. गळ्याभोवतीची काळी पोत वितळून गच्च बसली होती.बाकी देहाचा कोळसा झाला होता.
पोलीस पाटील येऊन पंचनामा होईस्तो पहाट झाली होती.
स्मशानात गाव गोळा झालं पण कपाळमोक्ष होईपर्यंत फक्त आड्याचा भट आणि बाप्पा दोघंच.
बाप्पा गप्प होता. बायकोसोबत वंशाचा दिवा पण तेवण्यापूर्वी विझला होता.
राख सावडून दुसर्‍या दिवशी बाप्पा नाशकाकडे गेला.
चार दिवसानी सकाळी गड्यानी हाक बोंब केली तेव्हा बाप्पा जागा झाला.
भट आणि गडी बावीच्या जवळ उभे होते. भट आकाशाकडे तोंड करून उलट्या हातानी बोंब मारत होता. बाप्पानी खाली जाऊन बघीतले .
बाव पाण्यानी पूर्ण भरली होती.एका सवाष्णीची पूर्णाहूती घेउन विजेच्या लोळानी झरे मोकळे केले होते.
*******************************************

(पण बाप्पाची कहाणी इथे संपली नाही.)

वाङ्मयकथालेख

प्रतिक्रिया

अक्षय पुर्णपात्रे's picture

3 Nov 2009 - 9:58 pm | अक्षय पुर्णपात्रे

बाप्पाच्या मनाच्या विहिरीला पाणी लागलेच नाही.

मदनबाण's picture

3 Nov 2009 - 10:07 pm | मदनबाण

अप्रतिम.....
(पण बाप्पाची कहाणी इथे संपली नाही.)
वाट पाहणे आले परत...

मदनबाण.....

अत्तर सुगंधी व्हायला फ़ुले सुगंधी असावी लागतात.

रामपुरी's picture

3 Nov 2009 - 10:09 pm | रामपुरी

ताकदीची कथा...

टारझन's picture

3 Nov 2009 - 10:22 pm | टारझन

शेवट होता होता श्वासोच्छवासाची गती दुप्पट झाली होती.
रामदास सर !! आपल्या लेखणाला आमचा सलाम !!

-- टारझन

दशानन's picture

4 Nov 2009 - 8:48 am | दशानन

शेवट होता होता श्वासोच्छवासाची गती दुप्पट झाली होती.
रामदास सर !! आपल्या लेखणाला आमचा सलाम !!

टार्या, लेका.
आज पहिल्यांदा तू जवळ जवळ माझ्या मनात जे विचार आले होते तेच प्रतिसादामध्ये लिहले आहेस.

१००% सहमत.

सलाम रामदास सेठ... सलाम !
जबरदस्त लेखन.

*****

मराठी माणसावर मराठी माणसाकडूनच महाजालावर जोपर्यंत अन्याय होत आहे तो पर्यंत मी चचणार नाही

विजुभाऊ's picture

4 Nov 2009 - 9:54 am | विजुभाऊ

शेवट होता होता श्वासोच्छवासाची गती दुप्पट झाली होती.
रामदास सर !! आपल्या लेखणाला आमचा सलाम !!

टार्या, लेका.
आज पहिल्यांदा तू जवळ जवळ माझ्या मनात जे विचार आले होते तेच प्रतिसादामध्ये लिहले आहेस.

राजे लेका आज पहिल्यांदा तू जवळ जवळ माझ्या मनात जे विचार आले होते तेच प्रतिसादामध्ये लिहले आहेस

मस्त गुलाबी थंडीत आठवणींची दुलई पांघरून घ्या .

sujay's picture

3 Nov 2009 - 10:40 pm | sujay

क्लास्स !!!

पण बाप्पाची कहाणी इथे संपली नाही

पुढील भागाची आतुरतेने वाट बघतोय.
सुजय

प्रभो's picture

3 Nov 2009 - 11:00 pm | प्रभो

रामदास काका...१ नंबर.....
मस्त लिहिलय...जबहरा......

--प्रभो
----------------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

3 Nov 2009 - 11:00 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

रामदास काका, अप्रतिम! शब्दच नाहीत .... बाप्पाची कहाणी संपूर्ण ऐकायची आहे, लवकरात लवकर.

अदिती

अश्विनीका's picture

3 Nov 2009 - 11:01 pm | अश्विनीका

जबरदस्त कथा. आपल्या लेखणीत वाचकाला कथेत गुंतून ठेवण्याचे सामर्थ्य आहे. कथेचा (या भागाचा) शेवट जवळ आला तसे कथा संपूच नये असे वाटत होते.
- अश्विनी

नाटक्या's picture

3 Nov 2009 - 11:12 pm | नाटक्या

क्या बात है!!

अगदी गदिमांची कथा वाचतो आहे असे वाटून गेले. सुंदर लिहीलेत. शेवटचे वाक्य तर लाजवाब... दोन क्षण तसाच सुन्न बसून होतो. खुपच सुंदर.

- नाटक्या

स्वाती२'s picture

3 Nov 2009 - 11:13 pm | स्वाती२

अप्रतिम!

टुकुल's picture

3 Nov 2009 - 11:43 pm | टुकुल

क आणी ड आणी क.
जबरदस्त...

--टुकुल

चतुरंग's picture

3 Nov 2009 - 11:52 pm | चतुरंग

तुम्ही शब्दांचे कुबेर आहात!
काय वातावरण निर्मिती? काय व्यक्तिरेखेचे बाज? काय प्रसंग उलगडायची हातोटी? छ्या....सहन होत नाही हो तुमचं लिखाण, पण वाचल्याशिवाय रहावतही नाही हवेहवेसे वाटणारे डंख जणू!!

(शब्दांना पारखा)चतुरंग

विंजिनेर's picture

4 Nov 2009 - 7:08 am | विंजिनेर

+१
असेच म्हणतो!

पिवळा डांबिस's picture

5 Nov 2009 - 4:29 am | पिवळा डांबिस

छ्या....सहन होत नाही हो तुमचं लिखाण, पण वाचल्याशिवाय रहावतही नाही हवेहवेसे वाटणारे डंख जणू!!
खरं आहे रंगाचं!!!

डंख-अ‍ॅडिक्ट,
पिडां

घाटावरचे भट's picture

4 Nov 2009 - 12:15 am | घाटावरचे भट

काय प्रतिक्रिया द्यावी असा प्रश्न पडला आहे. :-?

- (एवढ्या सुंदर वस्त्राला आपल्या प्रतिक्रियेचं ठिगळ लावावं का अशा विचारातला) भटोबा

रेवती's picture

4 Nov 2009 - 12:47 am | रेवती

एक दाहक कथा नजरेसमोर उभी राहिली.
शेवट तर अंगावर काटा आणणारा.

रेवती

पक्या's picture

4 Nov 2009 - 1:05 am | पक्या

शब्द अपुरे आहेत प्रतिसाद द्यायला. अप्रतिम कथा.
शेवट फारच परिणामकारक झालाय. प्रसंग डोळ्यासमोर उभा रहात होता. बायजाबद्द्ल खूप करूणा वाटली.
धन्यवाद...इतकी सुंदर कथा आपल्या पोतडीतून बाहेर काढून वाचकांसमोर ठेवल्याबद्द्ल.

आनंदयात्री's picture

4 Nov 2009 - 1:11 am | आनंदयात्री

कथा वाचुन काय क्लेष झाले कसे सांगु ..
सध्या कथेचा प्रभाव एवढा आहे की कथालेखकाचे कौतुक करायला शब्द नाहीत !

आणी खरं आहे मालक .. बाप्पाची कहाणी संपली नाहीच .. किंबहुना ती अश्या अनेक चिरंतन चालणर्‍या कहाण्यांपैकी एक असावी ..

-
आनंदयात्री

नंदन's picture

4 Nov 2009 - 6:41 am | नंदन

सहमत आहे, अतिशय प्रभावी कथा.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

निखिल देशपांडे's picture

4 Nov 2009 - 11:17 am | निखिल देशपांडे

असेच म्हणतो...
जबरदस्त कथा

निखिल
================================
रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!

सुवर्णमयी's picture

4 Nov 2009 - 1:27 am | सुवर्णमयी

एक दर्जेदार कथा वाचल्याचा आनंद मिळाला.
सोनाली

एकुजाधव's picture

16 Aug 2012 - 2:43 pm | एकुजाधव

+१

संदीप चित्रे's picture

4 Nov 2009 - 2:16 am | संदीप चित्रे

रामदास..
पुन्हा तेच वाक्य वापरतोय पण तुमची नक्की रेंज काय काय लिहायची आहे?
शेवटाकडे तर कथेने अशक्य वेग घेतला आणि खिळवून ठेवलं.
>> (पण बाप्पाची कहाणी इथे संपली नाही.)
म्हणजे पुन्हा लटकंती आलीच की आमची !

हर्षद आनंदी's picture

4 Nov 2009 - 6:36 am | हर्षद आनंदी

निव्वळ अशक्य..अजुन कथेची झिंग ऊतरत नाही... कथेची मांडणी \ वेग कल्पनातीत @) @) @) @) @) @)

बाप्पाची कहाणी संपली नाही! संपणार नाही!!
बाप्पा त्याच्या मस्तीत जगतो आणि मरतो, त्याच्या कहाणीचा अंत म्हणजे त्याचा शेवटच बाकी काही असु शकत नाही..

आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..

सन्जोप राव's picture

4 Nov 2009 - 6:55 am | सन्जोप राव

इथून पुढे फक्त अशीच प्रतिक्रिया द्यावी म्हणतो....
सन्जोप राव
जगण्यात मजा आहे, तोवरच मरण्यात मजा आहे.

सहज's picture

4 Nov 2009 - 8:37 am | सहज

रामदास यांच्या लेखनाचे आता कौतुक ते काय करावे.

असो इतर कथांच्या मानाने फारच टिपीकल, जुनाट वाटली म्हणुन बहुतेक तितकी भावली नाही. बाप्पाची कहाणी नाही आली तरी चालेल :-)

नेक्स्ट?? :-)

क्रान्ति's picture

4 Nov 2009 - 8:49 am | क्रान्ति

श्री. ना. पेंडसे यांच्या लिखाणाची आठवण झाली! शैलीबद्दल बोलायला शब्दच नाहीत!

क्रान्ति
अग्निसखा

सहज's picture

4 Nov 2009 - 8:55 am | सहज

गारंबीचा बापु मधील तो भट / खोत (दत्ता भट) डोळ्यासमोर उभा राहीला होता.

महेश हतोळकर's picture

5 Nov 2009 - 10:05 am | महेश हतोळकर

अप्रतीम कथा रामदास सर. <=O--O==

ऋषिकेश's picture

4 Nov 2009 - 10:15 am | ऋषिकेश

वातावरणनिर्मिती.. कथा.. सारेच अप्रतिम!!!
खूप आवडली कथा

पुढचा भाग आहे का? असल्यास येऊ द्या लवकर वाट पहतोय

ऋषिकेश
------------------

समंजस's picture

4 Nov 2009 - 10:42 am | समंजस

अप्रतिम!! निशब्द झालोय!

चेतन's picture

4 Nov 2009 - 10:50 am | चेतन

कथानकाचा वेग सुसाट झालायं

अप्रतिम पुढचा भाग लवकर येउ द्या

चेतन

अवलिया's picture

4 Nov 2009 - 11:38 am | अवलिया

छान कथा.

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

विसुनाना's picture

4 Nov 2009 - 11:41 am | विसुनाना

बाप्पा भटाच्या मनाला मूल न होण्याचा न्यूनगंडातून बसलेली निरगाठ छान उकलून दाखवली आहे.
दुसर्‍या बावीलाही न लागणार्‍या पाण्याची सांकेतिकता समर्पक.
कथा ताकदवान आहे हे वेगळे सां. न. ल.

अवांतर :
रावसाहेबी भाषेत ('लेडी सिटारिस्ट') सांगायचं तर -
त्या हिरविनच्या बापाला मारू बिरू नका हो. पाआआआप!
- तसं बायजाबद्दल वाटलं.

sneharani's picture

4 Nov 2009 - 12:07 pm | sneharani

जबरदस्त कथा, शेवट खुपच परिणामकारक...
पुढचे भाग लिहा पटकन....

अतुलजी's picture

4 Nov 2009 - 12:19 pm | अतुलजी

अप्रतीम कथा !!

श्रावण मोडक's picture

4 Nov 2009 - 12:54 pm | श्रावण मोडक

जबरदस्त! दमदार!!

jaypal's picture

4 Nov 2009 - 1:18 pm | jaypal

"बाव पाण्यानी पूर्ण भरली होती.एका सवाष्णीची पूर्णाहूती घेउन विजेच्या लोळानी झरे मोकळे केले होते."रामदासजी खरच संगतो ट्चकन पाणी आलं.

आश्या काही व्यक्तीरेखा लाहनपणी गावी (मिरज) पाहीलेल्या होत्या त्यांची आठवण झाली.
बराच काळ HANGOVER राहील.
वरील सर्व प्रतीसादांशी सहमत सहज रावांचा सोडुन
==========================================
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/
जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

परिकथेतील राजकुमार's picture

4 Nov 2009 - 1:15 pm | परिकथेतील राजकुमार

जबरदस्त लेखन हो रामदास काका. अक्षरशः गुंतुन पडायला होत कथेत.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

गणपा's picture

4 Nov 2009 - 1:17 pm | गणपा

क्लास रामदास काका.
तुमचे लेखन ही एक पर्वणीच असते आमच्या सारख्या वाचकांसाठी.
असेच लिहिते रहा.
(पण बाप्पाची कहाणी इथे संपली नाही.) सोळा आणे खरं....

सुमीत भातखंडे's picture

4 Nov 2009 - 2:31 pm | सुमीत भातखंडे

शब्द नाहीत.
दोन्ही भाग अप्रतिम.

धमाल मुलगा's picture

4 Nov 2009 - 3:02 pm | धमाल मुलगा

!

_/\_

भोचक's picture

4 Nov 2009 - 7:17 pm | भोचक

चित्त खिळवून ठेवणारे लेखन. बाकी तुमच्या शैलीबद्दल काय सांगायचे. निव्वळ अप्रतिम.

(भोचक)
हा आहे आमचा स्वभाव

प्रदीप's picture

4 Nov 2009 - 8:17 pm | प्रदीप

आपल्या लेखनाची रेंज अवाक करणारी आहे. मानवी स्वभावाचे कंगोरे, त्यांच्या आपापसातील व्यवहारांच्या खाचाखोचांसह आपण आपल्या लेखनातून उभे करता. आणि हे सगळे अनेकविध स्थळकाळांच्या संदर्भात घडतांना तुम्ही दर्शवलेले आहेत-- जनरल हॉस्पिटल, वेड्यांचे हॉस्पिटल, जेल, वकिलांची ऑफिसे, 'धंदे चालवणारी हॉटेले'.. अशा नाना स्थळांच्या पाश्वभूमिवर आपले लेखन घडते. आणि आता गावच्या खोताचे विश्व आमच्या समोर साकारलेत! मोजकेच पण अगदी नेमके शब्द, बरीचशी संवादातूनच घडत जाणारी कथा, कसलाच फापटपसारा नाही. तुटक, स्टॅकॅटो वाक्ये तर खास पानवलकरांची आठवण करून देतात.

पी. सी., जे. सी. पासून सुरू झालेले आतापर्यंतचे बरेच प्रयत्न 'कथा' नव्हते, ही मी तरी वाचलेली आपली ही पहिलीच 'कथा 'आहे. काहीतरी बरेचसे चमकदार दाखवून, पाणी उन्हात झळाळत धुळीत पडून नाहीसे व्हावे, तसे हिचे झालेले नाही. तिला निश्चीत शेवट आहे, आणि तो केवळ विस्मीत करणारा आहे. बाप्पाचे एक बीज दूर कोठेतरी अनौरस वाढणार आहे, त्याचा त्याने नुकताच पैशाच्या जोरावर बंदोबस्त केलाय. आणि त्याचे औरस बीज त्याच्या हक्काच्या बायकोबरोबरच त्याच्या समोर निसर्गाने नष्ट केलेले आहे. त्या घटनेत, म्हटले तर त्याचा हात आहेच. आणि अशातच बावीला पाणी आले आहे! बाप्पाला ते पाणी आता कायमचे डागण्या देणार! माणसाची लंपट हाव व तिला अनुसरून त्याची धडपड, तरीही गणिते जमत नाहीत म्हणून त्याने केलेली आदळआपट, आणि शेवटी निसर्गाने अनेक परिमाणांनी त्याच्यावर केलेली मात!

एक अप्रतिम कथा लिहील्याबद्दल अभिनंदन.

प्राजु's picture

4 Nov 2009 - 9:25 pm | प्राजु

तुमच्या लेखनाला प्रचंड वेग आहे..
श्वास रोखून वाचत होते मी शेवटपर्यंत.
तुमच्या लेखन शैलीपुढे मी नतमस्तक आहे. :)
- प्राजक्ता
http://www.praaju.com/

अंतु बर्वा's picture

5 Nov 2009 - 4:19 am | अंतु बर्वा

सुंदर कथा...

इतक्या छान कथेची मेजवानी दिल्याबद्दल धन्यवाद.

llपुण्याचे पेशवेll's picture

5 Nov 2009 - 9:11 am | llपुण्याचे पेशवेll

छान कथा. पटापट पुढचे भाग टाका बरे.
खोती, सावकारी,मिराशी अशा जुन्या पिढीतल्या लोकांकडून ऐकलेल्या गोष्टी आठवल्या.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984

Nile's picture

7 Nov 2009 - 1:22 am | Nile

आयचा घो! काय लिहिलंय! सही. मुद्दाम मोकळा वेळ मिळेपर्यंत वाचायच नाही असं ठरवुन आज वाचली. बेस्ट! शेवट ज ह ब ह र्‍या!

सविता's picture

16 Oct 2010 - 4:53 pm | सविता

एक नंबर........ श्री.ना. पेंडसेंचे लेखन आठवले......

शहराजाद's picture

17 Oct 2010 - 10:24 pm | शहराजाद

जबरदस्त कथा.

गवि's picture

5 Sep 2011 - 12:10 pm | गवि

काय बोलू. शब्दच संपले.

मिपावरील स्मरणीय लिखाणाविषयीच्या धाग्यातून इथे पोचलो आणि अक्षरशः झपाटला गेलो.

अजून तुम्ही लिहिलेलं काय काय वाचायचं राहिलंय ते आता शोधून शोधून काढणार.

नि३सोलपुरकर's picture

16 Aug 2012 - 6:00 pm | नि३सोलपुरकर

काका,
निव्वळ अप्रतिम.

पिलीयन रायडर's picture

11 Oct 2013 - 2:36 pm | पिलीयन रायडर

अप्रतिम..

पुढची कहाणी कुठे आहे?

काका, बोलल्याप्रमाणं पुढचा भाग येतोय ना???

स्वाती दिनेश's picture

3 Jul 2015 - 4:00 pm | स्वाती दिनेश

ही कथा नजरेतून कशी काय सुटली? बाप्पाच्या कथेचं पुढे काय झालं? ते वाचायला उत्सुक..
स्वाती

प्रास's picture

27 Sep 2015 - 5:01 pm | प्रास

हा आणखी एक लेखन-नमुना....

ज ह ब र्‍या

धन्यवाद! इतक्या उत्तम लेखकाचा परिचय करुन दिल्याबद्दल. हे सध्या नाहीत का मिपावर. काय ताकद आहे लेखणीत.
अंगावर काटा आला पार...

Iampratikshinde's picture

7 Oct 2020 - 9:56 pm | Iampratikshinde

पुढचा भाग ?