घनदाट जंगल, मध्यरात्र उलटून गेली होती. ती रात्र नुसती अंधारी नव्हती, काळाकुट्ट अंधार, डोळ्यात बोट घातले तरी दिसणार नाही, असा तो गडद अंधार, आकाशात चंद्र नव्हता आणि ता-यांचे अस्तित्व ढगाआड होते. स्मशानाकडे जाणाऱ्या त्या वाटेवर भयाण शांतता पसरलेली होती. हवेतील गारठा वाढत होता, वारा नव्हता, तर धारदार शस्त्रासारखा तो वारा बोचत होता. झाडांच्या फांद्या एकमेकांना घासून विचित्र आवाज येत होता. मधूनच घुबडांचा आवाज घूं घूं आवाज आणि लांडग्यांचे रडण्याने काळजाचा ठोका चुकावा अशी ती रात्र. वाळलेल्या पानांवरून चालताना होणारा कड-कड आवाज जसे काही कोणीतरी अदृश्य शक्ती, राजा विक्रमदित्याचा पाठलाग करीत असावी.
|
|
विक्रम आणि वेताळ
|
जस जसा राज़ा विक्रमादित्य स्मशानाजवळ पोहचला तसे ते दृश्य अधिकच भितीदायक झाले. जळणाऱ्या चितांचा लालसर-पिवळा प्रकाश अंधाराला चिरत होता, पण तो प्रकाश दिलासा देण्याऐवजी भिती वाढवत होता. स्मशानात फुटणाऱ्या कवट्यांचा आवाज जीवघेणा होता. कवट्या नुसत्या फुटत नव्हत्या, कवट्या चालत होत्या, उड्या मारुन राजा विक्रमादित्याच्या पाठीमागे वाटेल तशा घरंगळत होत्या. जंगलात काहीतरी जळल्याचा एक उग्र वास पसरला होता. वडाच्या झाडावर टांगलेला वेताळ त्याचे लाल डोळे आग ओकत होते. वेताळाच्या चेहऱ्यावर एक कुत्सित हास्य, कपाळावर वृद्धत्वाच्या आणि अनुभवी रेषा स्पष्ट दिसत होत्या. मांत्रिकाच्या कटामुळे राजा विक्रमादित्या इथपर्यंत पोहचला हे वेताळाला कळले होते. वडाला उलटे लटकलेल्या वेताळाला घेऊन राजा विक्रम अंधाऱ्या वाटेवरून घेऊन निघाला तेव्हा वेताळाच्या थंड स्पर्शाने राजा विक्रमाच्या शरीरात शिरशिरी भरली. वेताळ खांद्यावर स्थिर होता, पण त्याची वाचा शांत राहिली नाही.
"राजा विक्रमा, तू मोठा धीरगंभीर आहेस यात शंका नाही, पण तू इतका थकलेला दिसतोस की, तुला थोडा विरंगुळा मिळावा म्हणून मी तुला आज ‘मिपानगरीच्या ‘ अनेक अनोख्या वादापैकी एका वादाची गोष्ट सांगतो. पण नियम आठव, जर तू मौन सोडलेस आणि माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले नाहीस, तर तुझ्या मस्तकाचे तुकडे होतील. आणि जर तू उत्तर माहीत असूनही दिले नाहीस, तर तुझ्या वंशाचा नाश होईल."
विक्रमाने केवळ मान हालवली, आणि वेताळ गोष्ट सांगू लागला. "प्राचीन मिपानगरी राज्यात राजा नीलसेन आणि प्रशानसेन नावाचे दोन भाऊ मिळून राज्य करत होते. सोबतीला चतुर, विद्वान सल्लागारही होते, दरबारात, सल्लागारांचा मोठा दबदबा होता. हे राज्य समृद्ध आणि शांत होते, पण अलीकडे तेथे एक मोठे सामाजिक आणि धार्मिक वादळ उठले होते, ज्याचे केंद्रस्थान होते - जानवं."
तर, मिपानगरीत परंपरावादी या गटाचे नेतृत्व 'ऋषी तपस्वी' करत होते. हिमालयामध्ये त्यांनी एका पायावर उभे राहून 'द्राक्षासव' घेत राज्याचं रक्षण केलं होतं, म्हणून लोक त्यांना 'तपस्वी' म्हणायचे. हजारो वर्षापासूनचा धर्म केवळ 'तपस्वीमुळे' टिकला अशी वंदता होती. तपस्वी यांचा आग्रह होता की, जानवं ही केवळ पवित्र धाग्याची गोष्ट नाही, तर ती हजारो वर्षांपासून चालत आलेली वर्णव्यवस्थेची आणि शुद्धीकरणाची अनिवार्य खूण आहे. त्यांचे म्हणणे होते की जानव्याचे नियम, ते कोणी घालावे आणि कोणी घालू नये, हे शास्त्रात स्पष्ट दिले आहेत आणि त्यात कोणताही बदल करणे म्हणजे धर्माचा आणि परंपरेचा अपमान आहे, अशा वेळी टिंगल टवाळी टाळली पाहिजे आणि अशा टींगलबाजांना आवरलं पाहिजे अशी त्यांची मागणी होती.
'अबे फोकलीच्या, तुझ्या शेण-गोमूत्राचे आणि अध्यात्माचे 'पो' कुठेही नेऊन टाक, पण इकडे टाकू नको' अशीही एका पक्षकाराची या वादात मागणी होती. पण, दोन पक्षकारांच्या वादात आम्ही तिस-या पक्षकारांचे म्हणने आम्ही ऐकून घेणार नाही, अशी तंबी दोन बेंचच्या खंडपीठाने दिली होती. त्यामुळे तुम्हाला काही सांगायचं असेल तर स्वतंत्र दाद मागा असे न्यायविभागाचे मत होते. त्यामुळे, तटस्थ तिस-या पक्षास गप्प बसावे लागले होते.
आधुनिक विचारवंत, वाटणारे आणि आपल्या मतावर ठाम न राहणारे आणि ज्यांच्यामुळे हा वाद निर्माण झाला ते प्रकाड विद्वान पंडित प्रकाश अंधारदिवे होते. अंधारदिवे यांचा युक्तिवाद होता की, जानवं हे मुळात बंधन होतं, ते एका एका विशिष्ट वर्गापुरते मर्यादित ठेवणे म्हणजे भेदभाव आणि अन्याय आहे. जानवं ज्ञानाचे आणि पवित्रतेचे प्रतीक असेल, तर ते प्रत्येकाला मग स्त्री-पुरुष, कुठल्याही जाती-धर्माचे असो, परिधान करण्याचा समान अधिकार असावा. ज्याला ते शुद्धतेने आणि नियमानुसार धारण करण्याची इच्छा असेल त्याने 'प्लासिबो' इफेक्ट म्हणून जानवं नव्हे तर, काय गंडे, ताडे, तोडे, लिंबू-मिरच्या घालायचे ते घालावे असे त्यांचे म्हणणे होते. 'प्लॅसिबो' इफेक्टपेक्षा बियर इफेक्ट जास्त आहे, असे कोणी तरी दरबारात हळू आवाजात बोललं होतं.
"हा वाद इतका वाढला की, रोज राजदरबारात याच विषयावर चर्चा झडे. परंपरावादी म्हणायचे, की 'धागे आणि दोरे' कोणतेही असले तरी टिंगल करू नये, अशा टीका चर्चा धर्माला भ्रष्ट करत आहेत !' तर आधुनिक विचारवंत म्हणायचे, ' ऋषी तपस्वी, जुने आणि अजागळ असल्यामुले ते लोकांना जुन्या बेड्यांमध्ये बांधून ठेवत आहेत. अंधश्रद्धा पसरवत आहेत, अशा लोकांना तडीपार करून एखादी गावाबाहेर 'सनातन' नावाची पाच पन्नास हेक्टर जागा द्यावी आणि तिकडेच तो प्रचार करावा, असे ते मत होते.
राजा निलसेन आणि प्रशानसेन या वादामुळे गोंधळात पडले. गोंधळ, वाद, कोर्टकचे-या, व्यनी-मनी या राज्यात तसा नवे नव्हते. प्रशासन आतून परंपरावादीच आहेत, अशी शंका काहींना होती, आतल्या गोटात कायम तशी कुजबूज होती. परंपरा, धर्म उत्सवाच्या बेड्या यांनाही तशा मोडायच्या नव्हत्या, पण दरबारी सल्लागार, चतुर विद्वानाच्या दडपणामुळे निर्णय घेता येत नव्हते. अधून-मधून अशा धर्म बुडव्या लोकांना आठ पंधरा दिवस जेलात टाकले जायचे. अर्थात, समानता आणि न्याय ही तत्त्वेही प्रशासनास 'कधी-कधी' महत्त्वाची वाटत असली तरी, परंपरा, वगैरेचे ते अभिमानीच होते, असे आता मागे वळून पाहता म्हणता येते. मागे वळून पाहता येते म्हणाल्यावर, राज्या विक्रमादित्य मागे वळून पाहणार तोच वेताळ म्हणाला ''अरे, विक्रमा ही बोलायची गोष्ट असते, असे लगेच मागे वळून पाहिल्यावर काही दिसत नसते. सगळं डिलिट झालेलं असतं; अगदी खात्यासहित आणि लेखनासहित'' दोघांच्याही चेहऱ्यावर हलकं हसू उमटलं होतं.
एके दिवशी ऋषी तपस्वी यांनी जाहीर केले की, मला राज्यातून काढून टाकावे. सारखा धर्माचा अपमान मला सहन होत नाही. आपलं राज्य परंपरावादी, सनातनी, आहे तसं देवाळु राहिलं पाहिजे. वाटल्यास थंडीच्या दिवसात माझ्या हाडाची काडं शेकोटीला देईन, पण अधर्मी लोक सहन करणार नाही. प्रशासन आणि राजाला धमकी दिली की, 'जर हे असेच चालत राहिले तर, सर्व परंपरावादी मिपानगरी सोडून जातील आणि राज्यावर मोठं संकट येईल. धार्मिक प्रकोप होईल. सूर्य उगवणार नाही. समुद्राला भरती येऊन पृथ्वी जलमय होऊन जाईल. अशा, अधार्मिक लोकांमुळे लोक मिपानगरीत येत नाहीत. परंपरावाद्याचं एक दडपण प्रशासनावर आलं. राजा निलसेन आणि प्रशानसेन सारखे मिपानगरीत येरझारे, मारत असायचे. दरबारातले चतुर सल्लागार अशावेळी नेमकं, 'सध्या ट्राफिकमधे आहे, नंतर बघतो' 'खासगी कामात व्यग्र आहे' अशी कलटी मारायचे आणि 'राजा जो निर्णय घेईल ते मान्य' असे म्हणून सुटका करून घ्यायचे. राजास दोन्ही गट शांत करायचे होते, पण प्रजा कशा प्रकारे शांत करावी हे त्यांना कळत नव्हते.
वेताळाने गोष्ट इथेच थांबवली. त्याने राजा विक्रमाकडे तिरकस नजरेने पाहिले आणि विचारले, "राजा विक्रमा, मला सांग. राजा निलसेन आणि प्रशानसेन यांनी न्याय,समता आणि पारंपरिक विचारांचा मध्य साधण्यासाठी काय निर्णय घ्यायला हवा ? परंपरावाद्यांची बाजू घेऊन जानव्याचा धागा अप्रकाशित करावा ? की चर्चा पुढे चालू ठेवावी ? कोणता निर्णय मिपानगरीला शांती देईल आणि धर्म आणि आधुनिकतावादी एकत्र नांदतील ?
राजा विक्रमाचे मौन तुटले, तो शांतपणे म्हणाला, "वेताळा, राजा नीलसेन आणि प्रशानसेनचा प्रश्न केवळ जानव्याचा नव्हता, धर्मावर होणारी टीका छुप्या मार्गाने थांबवायची की आधुनिक जगाबरोबर जायचं याचा निर्णय होत नव्हता. राजा नीलसेन आणि प्रशानसेन धर्मवादी असले तरी, राज्यात गोंधळ नको या मताचेही ते होते. मिपानगरीत शांती तेव्हाच नांदेल, जेव्हा वादांचे धागे अप्रकाशित होतील आणि मिपा धर्माची तत्त्वे धोरणानुसार जपली जातील, त्याचबरोबर आधुनिक विचारांचेही लोक 'सामाजिक विषमतेच्या' भिंती तोडताना कोणाला दुखावणार नाहीत, आधुनिक जगात मिपानगरीच्या संविधानाचे पालन व्हावे हाच खरा धर्म आहे."
राजा विक्रमदित्याचं उत्तर ऐकून वेताळ हसून म्हणाला, "राजा विक्रमा, तू खरंच हुशार आहेस आणि अगदी न्यायपूर्ण उत्तर दिले. पण म्हणून तू नियम तोडला आहेस !" आणि 'धम्म' असा आवाज झाला. राजाच्या खांद्यावरून वेताळ निसटला आणि वेगाने आपल्या आवडत्या वडाच्या झाडाकडे विराट हास्य करीत निघून गेला.
प्रतिक्रिया
18 Dec 2025 - 8:45 am | युयुत्सु
हा हा हा हा हा हा हा
आजचा दिवस छान जाणार करण सुरुवात मस्त झाली!
18 Dec 2025 - 10:25 am | Bhakti
बाई.. सकाळी सकाळी खो खो हसत सुटले :)
मग तपासले जानवं खरच गायबल की ओ!!
खरंय परंपरावादी Vs सत्यशोधन हा सामना सर्वच सोशल मिडियाभर पसरलाय.दोन्हीकडची मंडळी खुपच संवेदनशील झाली आहेत.
सर दर महिन्याला मिपानगरीची अशी कथा सादर करा.
मी नसते सोडत मिपा बघा ;) :)
18 Dec 2025 - 10:37 am | गवि
एक मिपाकर म्हणून खेद वाटला.
जावा तिकडे पाकिस्तानात.
18 Dec 2025 - 12:18 pm | अभ्या..
परवाच त्या स्मशानात जाऊन मिपा संविधान कोरलेला भग्न दगड पाहून आलो.
आसपास विखुरलेल्या चारपाच वीरगळ सदृश दगडातून आवाज येत होता.
"कसला सनातन आणि मिपाधर्म घेऊन बसलात. धर्मनिरपेक्षतेच्या प्रेमाने आम्ही केलेलं बलिदान कुणाला आठवणार नाही. आमच्यासाठी हे बलिदान असलं तरी अंधभक्तानी झुंडशाहीने केलेल्या हत्या आहेत"
.
आम्ही हळूच म्हणले "भेटू लवकरच"
18 Dec 2025 - 2:15 pm | टर्मीनेटर
झकास लेख आहे सर...
एकदम 'चांदोबा' मधली विक्रम-वेताळ कथा वाचत असल्याचा फील आला!
इथे फक्त एक बदल सुचवावासा वाटतो की...
दरबारात दबदबा असलेल्या 'चतुर, विद्वान सल्लागारांपैकी' कोणाकडेच 'डॅमेज झाल्यावर ते कंट्रोल करण्यापेक्षा ते डॅमेज होऊच नये ह्यासाठी काय करावे' हा विचार करण्याची क्षमता नव्हती असे आज दुर्दैवाने म्हणावे लागत आहे 😀
अर्थात अजूनही परिस्थिती तेवढीही हाताबाहेर गेली आहे असे वाटत नाही, पण त्यासाठी कोणाकडूनही' आपला राजकीय / वैचारिक अजेंडा राबवण्यासाठी होणारा मिपाचा वापर थांबवल्यास पुढचा काळ ह्या प्रतिष्ठित संकेतस्थळासाठी वैभवशालीअसेल ह्यात मलातरी काही शंका नाही...
'भावनांमे बह गया हैं' टाईप प्रतिसाद वाटल्यास क्षमस्व 😂
18 Dec 2025 - 4:39 pm | युयुत्सु
बाय द वे : आपला लेख असा मोठ्या टाईपात येण्यासाठी कुणाकडे अर्ज करायचा?
18 Dec 2025 - 4:47 pm | कंजूस
धडा मिळाला, धडा घेतला, धडा लिहिला.
18 Dec 2025 - 5:06 pm | टर्मीनेटर
येस्स... 👍
With no regrets...
18 Dec 2025 - 9:03 pm | प्रकाश घाटपांडे
पुराव्या प्रित्यर्थ जुन्या जाणत्या दरबारी ने अंधारदिव्यांच्या लेखनाचे उत्खनत केले. तिथे त्यांना स्वगत या लेखनात सज्जड पुरावा मिळाला. तिथे हा सूर्य हा जयद्रथ म्हणून हा प्लासिबो इफेक्ट नसून बियर इफेक्ट च आहे हे वादातीत पणे सिद्ध केले. प्रा. चिरुटे यांनी अंधारदिव्याच्या मिणमिणत्या प्रकाशात लेख वाचता येत नसल्याने सोबतीला चिरुटाचा प्रकाश ही घेतला व गतकाळात असलेल्या स्वगताचे अक्षर न अक्षर वाचून काढले. वाचताना फारच श्रम पडल्याने सोबत "श्रमपरिहार"ही चालू होता. एका उत्कट क्षणी त्यांना गोमूत्र व बिअर यांचा घट्ट स्ंबंध आढळला. तोपर्यंत वेताळ हा विक्रमादित्याच्या खांद्यावरुन उडून परत झाडाला लटकता झाला
19 Dec 2025 - 8:40 am | अमरेंद्र बाहुबली
खिक्क! धागा उडाला हे लक्षात आले नव्हते. लेख आवडला.
19 Dec 2025 - 11:16 am | प्रकाश घाटपांडे
आतापर्यंत च्या माझ्या उपक्रम,मायबोली,मिसळपाव,ऐसी अक्षरे, इत्यादी लेखनमंचावर 2007 पासून मी लिहितो आहे. पण धागा अप्रकाशित व्ह्यायची ही पहिलीच वेळ आहे. जानव्याची पॉवर एवढी असेल असे मला खरोखर पुसटसे सुद्धा वाटले नव्हते.
मी हा मानापमानाचा मुद्दा न मानता विषय इथे सोडून देत आहे. पण धागा अप्रकाशित करावा एवढे सामर्थ्य त्या लेखात नव्हते हे माझे मत आहे.
19 Dec 2025 - 1:09 pm | मूकवाचक
हा विषय एका धाग्यापुरता मर्यादित न ठेवता व्यापक अर्थाने बघायला हवे. हिंदूंच्या श्रद्धा, रूढी, परंपरा आणि प्रतिके (त्या कितीही निरूपद्रवी असल्या तरी!) हा विनोदनिर्मीतीचा हक्काचा विषय आहे, त्यावर प्रतिक्रिया उमटत नाहीत हे गृहीतक आता तितकेसे खरे राहिलेले नाही.
ठराविक लोकांच्या धार्मिक भावनांची गळवे ठसठसतात असा काही जण नेहेमी उपहास करताना दिसतात. यापैकी बहुसंख्य लोकांची जातीय भावनांची गळवे ठसठसतात ही वस्तुस्थिती लपून राहात नाही. अशाच टोकाच्या भावना ठराविक तत्वज्ञान, महापुरूष यांच्या बाबतीत असतात. त्या अर्थाने 'गळवे मुक्त' व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. कितीही लपवले तरी आपल्याला अप्रिय असलेल्या विचारसरणीचे लोक सत्तेवर मांड ठोकून बसलेले आहेत हे सहन न झाल्याने कित्येक विचारवंतांची गळवे ठसठसतात हे लपून राहिलेले नाही. तेव्हा लेखकाच्या दृष्टीने हलक्या फुलक्या असलेल्या लेखावर विरोधी प्रतिक्रिया येणे फारसे अनपेक्षित नाही. असो.
19 Dec 2025 - 1:28 pm | शाम भागवत
काही तटस्थ लोकांना मोदींयुगात ढकलण्याचा प्रयत्न चांगला जमला आहे.
:)
19 Dec 2025 - 1:34 pm | अनन्त अवधुत
जोर्दार लेख झालाय. एकदम विक्रम वेताळची आठवण झाली. फोटू पण चांदोबा मधला वाटतो.
जानव्यावरचा लेख वाचला होता, पण धाग्याचे कश्मिर कधी झाले ते कळले नाही.
19 Dec 2025 - 3:26 pm | स्वधर्म
जबरी लेख. असा लेख लिहायला लेखकच पाहिजे. म्हणून म्हणतो तेथे पाहिजे जातीचे. आपल्या 'तसल्या' जातींचा संबंध नाही बरं का इथे!
लेख उडाला पण नवे प्रतिसाद वाचता आले नाहीत व मोठ्याच मनोरंजनास मुकलो असे वाटते.
20 Dec 2025 - 10:09 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सर्व वाचक मिपाकर, लेखक, प्रतिसादकर्ते यांनी लेखनाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल तहेदिलसे शुक्रिया.
लेखन प्रोत्साहन उत्साहवर्धक असल्यामुळे लिहायला बळ येतं. विक्रम वेताळाचे चित्र AI च्या सौजन्याने होतं.
डिस्क्लेमर : विक्रम आणि वेताळाची ही कथा पूर्ण काल्पनिक होती. सदरील कथेत येणारे पात्र, नावे, कथा, राज्यनावे आणि तत्सम गोष्टी
काल्पनिकच होत्या, कोणास ते आपलंच कथन आहे, असे वाटत असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. खुलासा संपला. :)
-दिलीप बिरुटे
20 Dec 2025 - 1:01 pm | टर्मीनेटर
😀.
यश असो की अपयश, त्याचे श्रेय/जवाबदारी ही अशाप्रसंगी सामुहिकच असते, आणि झालीच असेल काही चुकी तर ती मान्य करण्यात कमीपणा न मानता उलट अशा खुस्खुशीत लेखाच्या माध्यमातुन ती स्विकारुन पुढे जाणे हे चांगलेच आहे की! त्यामुळे खुलाशाची आवश्यकता नव्हती... कंकाकांच्या हे बरोबर लक्षात आलेले दिसले म्हणुनच त्यांच्या प्रतिसादावर 'With no regrets...' असा उप-प्रतिसादही दिला!
(योगायोगांवर पुर्ण विश्वास असलेला)
- टर्मीनेटर
23 Dec 2025 - 11:45 am | नावातकायआहे
'नवीन डेटा पॅक दे रे' (सलील कुलकर्णी यांची कविता)
नवीन डेटा पॅक दे रे, आभाळावर "थुंकीन" म्हणतो. नवीन डेटा पॅक दे रे, आभाळावर थुंकीन म्हणतो.
रोज वेगळं नाव लावून, लपून लपून भुंकीन म्हणतो. नवीन डेटा पॅक दे रे...
याच्यासाठी काही म्हणजे काही सुद्धा लागत नाही, कोणी इथे तुमच्याकडे डिग्री वगैरे मागत नाही.
कष्ट नको, ज्ञान नको, विषयाचीही जाण नको, आपण नक्की कोण कुठले याचे सुद्धा भान नको.
खूप सारी जळजळ हवी, विचारांची मळमळ हवी. दिशाहीन द्वेष हवा, विनाकारण द्वेष हवा.
चाले बोटे धारधार, शब्दांमधून डंख मार. घेरून एखाद्याला, वेडा करून टाकीन म्हणतो. नवीन डेटा पॅक दे रे...
खाटेवरती पडल्या पडल्या जगभर चिखल उडव, ज्याला वाटेल जसे वाटेल धरून खुशाल बडव. आपल्यासारखे आहेत खूप, खोटी नावे फसवे रूप.
जेव्हा कोणी दुबळे दिसेल, अडचणीत कोणी असेल, धावून धावून जाऊ सारे, चावून चावून खाऊ सारे.
जोपर्यंत तुटत नाही धीर त्याचा सुटत नाही, सगळे मिळून टोचत राहू, त्याच्या डोळ्यात बोचत राहू.
धाय मोकलून रडेल तो, चक्कर येऊन पडेल, तेवढ्यात कोणी दुसरे दिसेल, ज्याच्या सोबत कोणी नसेल.
आता त्याचा ताबा घेऊ, त्याच्यावरती राज्य देऊ. मग घेऊन नवीन नाव, नवा फोटो नवा डाव.
त्याच शिव्या तेच शाप, त्याच शिड्या तेच साप. वय मान आदर श्रद्धा सगळं खोल गाडीन म्हणतो, जरा कोणी उडले उंच त्याला खाली पाडीन म्हणतो.
थोडा डेटा खूप मजा, छंद किती स्वस्त आहे, एका वाक्यात खचते कोणी फिलिंग किती मस्त आहे. नवा डेटा पॅक दे, आभाळावर थुंकीन म्हणतो. नवा डेटा पॅक दे रे...
30 Dec 2025 - 5:26 pm | धर्मराजमुटके
नवीन डेटा पॅक दे रे
मुळात पहिले वाक्यच चुकीचे वाटत आहे "दे रे" कशाला ? विकतच का घेत नाही ? स्वतःच्या पैशाने डेटा पॅक मारला तरच थुंकण्यात मजा आहे.
31 Dec 2025 - 1:31 am | नावातकायआहे
सलील कुलकर्णी यांना विचारा... :-)
https://www.facebook.com/musicdirectorsaleelkulkarni/
स्वगत थुंकायला डेटा पॅक लागतो?
23 Dec 2025 - 11:57 am | युयुत्सु
सन्मानाने जगण्यासाठी माणसाला धर्माची गरज आहे का?
याचे उत्तर नाही असे आहे, पण धर्मवेड्या लोकांना स्वीकारता येत नाही. वेळच्यावेळी प्रामाणिक पणे कर भरणे, सिग्नल आणि रांगांचा आदर करणे, गाडी चालवतांना मोबाईलवर न बोलणे इतके साधे नियम पाळले की देशाचे असंख्य प्रश्न वेगाने सुटतील. मग जानव्या सारख्या धर्मचिन्हांची गरज उरणार नाही...
23 Dec 2025 - 12:12 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सर्व प्रतिसाद लिहिणा-या मिपा वाचकांचे पुन्हा एकदा मन:पूर्वक आभार...!
-दिलीप बिरुटे
29 Dec 2025 - 2:57 pm | कांदा लिंबू
सदर लेखात परंपरा या शब्दाचा उल्लेख नऊ वेळा झाला आहे आणि प्रत्येक वेळी तो नकारात्मक, हेटाळणीपूर्ण अर्थाने झाला आहे.
शाळेत शिकलेल्या आणि दररोज म्हटलेल्या राष्ट्रीय प्रतिज्ञेत परंपरा या शब्दाचा उल्लेख दोन वेळा झाला आहे आणि दोन्ही वेळा तो सकारात्मक, आदरपूर्ण अर्थाने झाला आहे.
मिपाकरांनी हा लेख योग्य मानावा की ती प्रतिज्ञा योग्य मानावी?
---
भारताची राष्ट्रीय प्रतिज्ञा
भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशावर माझे प्रेम आहे.
माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे. त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.
मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.
माझा देश आणि माझे देशबांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे. त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी ह्यांतच माझे सौख्य सामावले आहे.
जय हिंद
30 Dec 2025 - 12:29 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रतिसादाबद्दल आभार.
-दिलीप बिरुटे
30 Dec 2025 - 5:22 pm | कांदा लिंबू
मिपाकरांनी हा लेख योग्य मानावा की ती प्रतिज्ञा योग्य मानावी?
31 Dec 2025 - 4:16 pm | कांदा लिंबू
बाकी, वस्तुनिष्ठ प्रश्न विचारले की, बगल द्यायची सदर धागालेखकाची ही काही पहिलीच वेळ नाही.
31 Dec 2025 - 7:57 am | कंजूस
नव्या वर्षात नवीन रूपात विक्रम येणार काय?
31 Dec 2025 - 10:25 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कंजूस काका, नव-लेखकास घटना, पात्र, आणि विषय मिळाला की, वेताळ विक्रमाच्या पाठीवर शंभर टक्के बसणार आणि एक कथा येणार.
आपलं प्रोत्साहन असू दे.
-दिलीप बिरुटे