सर्व मिपाकरांना विनंती, वारंवार सूचना देऊनही 'चालू घडामोडी' आणि इतरही काही धाग्यांत व्यक्तिगत पातळीवर केली जाणारी टीका दिसून येते. पक्षांचे प्रमुख, पक्ष यांच्यावर केल्या जाणा-या टिकाही संयमित असाव्यात अशी अपेक्षा आहे, नव्या कायद्यांमुळे संकेतस्थळावरील सर्वांचा वावर कायद्यातील नियमाबरोबर, सार्वजनिक संस्थळावरील सभ्यतेचे किमान निकष पाळणारा असावे असे मिपा व्यवस्थापनाचे मत आहे, यापुढे असे आढळून येत राहिल्यास कोणतेही स्पष्टीकरण न देता असे प्रतिसाद, धागे सरसकट अप्रकाशित केल्या जातील किंवा खाते निष्कासित करण्यासारखी कठोर कारवाई केली जाईल याची सर्वांनी नोंद घ्यावी व सहकार्य करावे.

- मिपा व्यवस्थापन


स्वगत

Primary tabs

प्रकाश घाटपांडे's picture
प्रकाश घाटपांडे in जनातलं, मनातलं
25 Sep 2007 - 8:27 am

''दांडेकरांच्या राज्यात होळकरांची फौज आल्यावर कस काय व्हायचं?`` असा प्रश्न एकानं थोडं चिंतातूर होउन विचारल्यावर त्याला दुसरा म्हणाला, ''अरे त्यात काय? इथंच सोय झाल्यावर बाहेर धुंडत बसायला नको. साली पन साहेब लोकांची मज्जा !`` 'हित कशाला चांगल्या घरातल्या पोरीबाळी येताहेत. अहो इथं तसल्याच बाया येणारं. एकीकडं हे बी चालू दुसरीकडे नोकरी बी चालू` पोलीस खात्यात महिला पोलीस भरती मोठया प्रमाणात भरती जेव्हा होणार होत्या त्यावेळी उमटणारी ही स्पंदन.
शिव्यांना ओव्या समजणाऱ्या संस्कृतीत स्त्रिया कशा रुजणार? अशी चिंता काही वर्गाला पडली होती. पुलंच्या रावसाहेब या व्यक्तीचित्रणात रांगड प्रेम व्यक्त करताना शिव्यांचा आधार घेतला नाही तर रावसाहेबांना मोकळ मोकळं वाटतंच नाही. त्यांच कुत्र देखील जिम्या भडव्या म्हणल्याशिवाय ढिम्म हलत नाही. बाईमाणूस असताना शिव्या देउ नये हा संकेत मोडल्यानंतर दिलगिरी व्यक्त करताना देखील शिव्यांचाच आधार. 'च्यायला कितीबी केलं तरी आमच्या तोंडाची गांड होतेच. स्वारी बरं का ताई`. नवीन भरती झालेल्या थोडया आधुनिक मुलींना हे सर्व संकोचदायक वाटतं. एकदा एक वयस्क हवालदार फोनवर आपला राग व्यक्त करताना संभाषणात नसलेल्या तिसऱ्या व्यक्तीच्या नावे शिवीगाळ करत होता. जवळ एक आधुनिक स्वरुपाची नवीन महिला पोलीस होती. तिच्या अस्तित्वाचे त्या हवालदाराला भान नव्हते. नंतर या बाबत तक्रार करण्याचा विचार त्या महिला पोलीसाने इतरांशी बोलून दाखवला. ही बाब कायद्यातील लैंगिक छळाच्या व्याखेत बसत होती. कामाच्या ठिकाणी सहकारी महिलेला लज्जा व संकोच निर्माण होईल असे कोणतेही वर्तन. त्याचे गांभीर्य लक्षात येताच त्यांनी बाई तुम्ही माझ्या मुलीसारख्या असे म्हणून दिलगीरी व्यक्त केली. बाईने ठरवलं असतं तर हवालदाराच्या नोकरीवर गदा आणण्याची परिस्थिती ती निर्माण करु शकत होती. पण हवालदार ही एरवी एक चांगला माणूस होता.
मुंबईत भाउचा धक्का आहे. तिथे समुद्रात पोलीसांची गस्त घालणाऱ्या काही होडया आहेत. तिथे जवळ समुद्रात एक टेकडी पण आहे. तिला स्थानिक लोक छिनाल टेकडी म्हणतात. एक होडी त्या टेकडीजवळ गस्त घालत होती. तेथील झोनच्या प्रमुख एक महिला अधिकारी होत्या. त्यांनी या होडीला बिनतारी यंत्रणेवर आत्ताच्या गस्तीचे ठिकाण विचारले. तेथील पुरुष ऑपरेटरची ततपप झाली. बाईसमोर छिनाल शब्द कसा उच्चारायचा. तो अप्रत्यक्ष रित्या ते ठिकाण सांगायचा प्रयत्न करु लागला. त्यामुळे तो खोटं तर बोलत नाही ना अशी शंका त्या बाईंना आली आणि त्या मला एक्झॅट लोकेशन हवं आहे असा आग्रह धरु लागल्या. शेवटी त्यांच्या एका सुजाण सहकाऱ्याने हळूच वस्तुस्थिती सांगून ऑपरेटरची कुचंबणा दूर केली.
जगातल्या सर्व शिव्यांमध्ये एक साम्य आहे ते म्हणजे लैंगिकता. शिवी म्हणजे लैंगिकतेची ओवीच. रोष, नाराजी, राग, अगतिकता व्यक्त करण्यासाठी या ओव्यांचा वापर करण्याची परंपरा खूप जुनी आहे. सहनही होत नाही व सांगताही येत नाही या अवस्थेतून बेडा पार करण्यासाठी या ओव्यांचा आधार घ्यावा लागतो. खात्यांतर्गत शिस्त म्हणजे तोंड दाबून बुक्क्यांचा मार या दु:खावर फुंकर घालण्यासाठी या ओव्या सासुरवाशिणीला जात्यावर दळायला हलक्या करणाऱ्या ओव्यांइतक्याच महत्वाची भूमिका पार पाडतात. या ओव्यांना पांढरपेशा साहित्यात स्थान नाही. पण दलितसाहित्यात या ओव्यांच महत्व अनन्य साधारण आहे. तिथं या ओव्यांना प्रतिशब्द नाही. पर्यायी शब्द वापरले तर आशयहानी होते. 'पोटाला नाही आटा अन म्हनं चोटाला उटण वाटा`. इथं तर अश्लीलताही ओशाळून जाते.
एरवी अतिशय बिनधास्त असणारा पुरुष वर्ग बाईनं काही भलतेसलते आरोप केले तर आपली नोकरी धोक्यात यायची म्हणून बाईशी दबकून वागत असतो. उंदराला खेळवणाऱ्या मांजराप्रमाणे एखादी बाई कधी नरडीचा घेाट घेईल काही सांगता येत नाही. जास्त हुशारी करशील तर एका लेखणीच्या फटक्यात खलास करण्याचे स्त्रीत्वाचे अस्त्र राखून ठेवलेले असते. 'कसे पैशे देत नाही भाडया तेच बघते? आंड पिळून पैशे घेईन म्हणावं!` असं म्हणणाऱ्या चतुर्थ श्रेणी वर्गातील बाई देखील बघायला मिळते. अशा बायांसमोर पुरुषच लाजतात आणि त्या बाईची एक दहशत तयार होते.पण अशा बाया अपवादात्मकचं.
बाईचं बाईपण हे पुरुषाच्या माणूसपणाच्या मर्यादेत उघडं पडलं तर प्रश्न निर्माण होत नाहीत. परंतु या मर्यादंाची व्याप्ती आणि संकोच हे इतकं परस्पर सापेक्ष आहे की त्यात अमूक एक चौकट ही योग्य किंवा अयोग्य ठरवणे अवघड असते. माणसातला पुरुष झोपवून टाकायचा आणि पुरुषातलं माणूस पण जागं करायचं काम फारच थोडया स्त्रियांना जमतं. पण ज्यांना हे जमतं त्यांच्यासाठी आपला जीव धोक्यात घालणारे माणसं ही पुरुषचं. बाईचं बाईपण चघळणारी माणसं ही बाईच्या माणूसपणात कधी कधी विरघळून जाणारी देखील असतात.
सायबांच्या पुढून आणि गाढवाच्या मागून कधी बी जाउ नये कवा लाथ बसनं हे सांगता येत नाही. आता यात सायबाचा अवमान आहे की गाढवाचा सन्मान आहे हे मात्र मला अद्याप समजले नाही. हे प्रश्न दोघांनाही पडत नसावेत. पण या मानसिकतेत वाढलेला एखादा बुजर्ग आपल्या नवीन सहकाऱ्याला 'साहेबांनी रेडा एका शेर देतो असे म्हणल्यावर आपण सव्वाशेर दूध देतो असे म्हणावे` हा सल्ला मात्र आवर्जून देतो.
सरकारी कार्यालयातील सार्वजनिक स्वच्छतागृह ही खरं तर अस्वच्छतागृहच. मुताऱ्यांमध्ये विटकरींचे तुकडे, गुटक्याचे पाउच, तंबाखूचे विडे, सिगारेटची थोटके यामुळे मुताऱ्या तुंबलेल्या असतात. गळक्या नळातून पाणी सतत वहात असणे अथवा अजिबात पाणी नसणे. लाईट कायम जळत असणे अथवा अजिबात लाईट नसणे.संडासचे दरवाजे,कडया व्यवस्थित लागत नसतात. सफाई नियमितपणे होत नाही. सफाई करण्यासाठी आवश्यक ती साधनसामुग्री उपलब्ध नसते. उपलब्ध असली तरी उपयुक्त नसते. काही ठिकाणी प्रशासकांचा वचकचं नसतो. सफाई कामगारांना इतर खाजगी कामांसाठी वापरलं जातं. मग ते काय सफाई करणार? अमेरिकेत स्वच्छतागृहांना म्हणे रेस्टरुम म्हणतात. इथे मात्र ही रेस्टलेस रुम असतात. सार्वजनिक स्वच्छतागृह हे तर खरे समाजमनाचे आरसेच. व्यक्तिगत स्वच्छतेबाबत आग्रही असणारी माणसं ही सार्वजनिक स्वच्छतेबाबत मात्र उदासीन असतात.
इथं केवळ शरीरातल्या मलमूत्राचं विसर्जन होत नाही तर मनातल्या कचऱ्याचही विसर्जन होतं. कचरा इथं साहित्यसंपदा बनतो. कधी चित्ररुपाने तर कधी शब्दरुपाने. एखादी अघळपघळ वा पुरुषांना अपील होणारी बाई, तिच्या विषयी लैंगिक कल्पनाविष्कार, कुणाची लफडी, साहेबाविषयी शिव्या इ विषयांचा हा खुला मंचच भिंतींवर चितारलेला असतो. लैंगिक भावनांच दमन वा शमन वा उद्दीपन करण्याच हे ठिकाणंच.
अशाप्रकारचे खुले मंच इंटरनेटवर सहज उपलब्ध आहेत. इथे अभिव्यक्तिला मर्यादाच नसतात.सर्जनशील प्रतिभा इथही बघायला मिळते. सामाजिक बंधन, रुढी परंपरा, संस्कार यात जखडलेल्या विचारांना उसंत घेण्यासाठी खुला मंच दुसरीकडे कुठे मिळणार? त्यात तुम्ही घुसमटल्यावर तुम्हाला मोकळा श्वास घ्यायला इथंच येणार. समाजात हे बुरखे काढून तुम्ही जगायला लागलात तर समाज तुम्हाला वाळीत टाकील. दुर्जन, समाजद्रोही, कलंकित ठरवेल. तुमची इच्छा असो वा नसो समाजात तुम्हाला हे बुरखे पांघरावेच लागतात. बुरख्यांच्या पारदर्शकतेच्या घनतेचे प्रमाण फार तर कमी अधिक होईल. पण बुरखे ते बुरखेच. पण या दुनियेत मात्र तुम्हाला अस्तित्व आहे पण चेहरा नाही. कुणी ओळखण्याची भीती नाही, संकोच नाही. नंगेसे तो खुदाभी डरता है ! न जाणो इथ स्वार्थासाठी खुदालाही वेठीस धरणाऱ्या संभवित, प्रतिष्ठित माणसांचा खरा चेहरा पाहण्यासाठी खुदालाही याव लागत असेल. नाहीतरी निर्गुण, निराकार, सर्वव्यापी म्हणून त्याचं अस्तित्व तिथं असेलच की! चेहरा नसला तरी अस्तित्वांचा वर्गकलह येथेही दिसून येतो. इथल्या तंतरलेल्या मैत्रबनात आपल्याला भावनिक, बौद्धिक, लैंगिक तृष्णा ही शमवण्याचे मार्गही उपलब्ध आहेत. शेवटी समाधान ही बाब पुन्हा मानसिकच आहे.
कृष्णानं केल्या तर त्या लीला आणि आम्ही केला तर तो लंपटपणा काय? देव पितात तो सोमरस आणि दानव पितात ती दारु काय? पण मानव तर देव आणि दानव या संकल्पनांच मिश्रण आहे. त्यानं तत्सम काही प्यालं तरी ती दारुच ! आमचं वाङ्मय अश्लील आणि भर्तृहरी आणि कालिदासाचं वाङ्मय मात्र शृंगारिक काय? त्यांनी केली ती कामक्रीडा आणि आम्ही केली तर मात्र ते चाळे. त्यांच्या नजरेत कामविव्हलता आणि आमच्या नजरेत मात्र वखवखलेपणा काय? कुठली प्रकृती अन् कुठली विकृती? खरं तर जी प्रकृती समाजमान्य नाही ती विकृती. पण त्यामागच्या प्रेरणा तर नैसर्गिकच असतात ना! म्हणजेच विकृती ही स्थल,काल,समाज सापेक्ष आहे. बोंबलाच्या वासाने शाकाहारी माणसाची असलेली भूक नाहीशी होणं, मळमळ वाटणे ही देखील प्रकृती आणि त्याच वासाने बोंबील आवडणाऱ्या मांसाहारी व्यक्तीत लाळ गळे पर्यंत भूक निर्माण होणे ही देखील प्रकृतीच. वासं एकचं आहे पण प्रतिसाद भिन्न आहेत. एकासाठी आनंद तर दुसऱ्यासाठी दु:ख. एकाचं अन्न हे दुसऱ्याचं विष असेल तर सहजीवन अशक्य. दोघेही माणसंच आहेत पण संस्कार भिन्न असल्याने रुची देखील भिन्नपणे विकसित होत गेली. चिनी खाद्य हे 'चायनीज् फूड` म्हणून अल्पवधीत लोकप्रिय का झाले? भारतात काय विविध पाककलाकृती संपल्या की काय? एरवी झुरळांच लोणचं, भरल्या वांग्यासारखा भरला साप, बेडकाची तंगडी फ्राय अशा कल्पना असलेलं चायनीज फूड भारतात वेगळचं रुप घेउन आलं आणि रसिक खादाडांच्या पोटाचा कब्जा घेतला. रुचीचा आस्वाद ही सुद्धा एक संपन्न होणारी प्रक्रिया आहे. सुरवातीला गोमूत्रासारखी लागणारी बिअर ही नंतर अमृतासमान वाटायला लागते. कारण तशी ती वाटली नाही तर गाढवाला गुळाची चव काय? हा शिक्का बसायची भीती. त्यामुळे तुमच्या चवीत आपोआप बदल होत असतो. तसं चायनीज फूडला तोंड वेंगाडणारी लोक आपोआप लाळ गाळू लागली आणि चायनीच रेस्टॉरंटची संख्या वाढली. एरवी घरच्या जेवणाची सोय नाही म्हणून अपरिहार्यपणे हॉटेलमध्ये जाणारी माणसं ही रुचीपालट म्हणून हॉटेलमध्ये जाउ लागली. त्याला प्रतिष्ठा मिळाली.
पण लैंगिक भूकेबद्दल काय? लैंगिकतची भूक ही अपरिहार्य आहे काय? अवाजवी आहे काय? ती शमली नाही तरी जगता येते ना? असे कितीतरी प्रश्न उपस्थित होत असले तरी ती नैसर्गिक आहे एवढे तरी आता मान्य करावे लागते. पण तिच्यातला रुची पालट हा मात्र नैतिकतेशी जोडला आहे. त्याला प्रतिष्ठा नाही. त्याला प्रतिष्ठा देण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना अनितीमान समजले जाते. हस्तमैथुन हा लैंगिक अविष्कार आत्ताशी कुठं समाजमान्यतेच्या प्रतिक्षायादीत आहे. एकेकाळी याची चर्चा करणं हे शिष्टसंमत मानले जात नसे. लैंगिक शिक्षणामुळे त्याचा अंतर्भाव अपरिहार्य बनला आहे. काही ठिकाणी त्याला अजूनही स्वीकारलेले नाही. मग त्याविषयीच्या अज्ञान व भीतीमुळे भेांदू वैद्यांचे चांगलेच फावते. लैंगिकता ही मानसिकता असल्याने समलिंगी संबंधांना काही देशात कायदेशीर मान्यता द्यावी लागली आहे. एकेकाळची विकृृती ही आता प्रकृती बनत चालली आहे. कुणी म्हणेल आताची पिढी वाहवत चालली आहे. पण दुटांगी धोतर नेसून महाविद्यालयात जाणाऱ्या तरुणाला वा पाचवारी साडी नेसून सायकलवर जाणाऱ्या तरुणीला बघून त्या त्या काळी आजची पिढी वाहवत चालली आहे असे म्हणणारे बुजुर्ग होतेच. पॅंट शर्ट घालून इराण्याच्या हॉटेल मधे जाउन चहा पिणारा तरुण किती वाया गेला? प्रत्येक पिढीत हेच घडत आले आहे. काळाची गती आपल्याला सहन होत नाही. काळाच्या प्रवाहात स्वत:ला सामावून घेता येत नाही. काळ तर कुणासाठी थांबत नाही. याल तर तुमच्यासह न याल तर तुमच्या शिवाय. त्याचा उगमही समजत नाही आणि अंतही. मग कुणी भूतकाळात रममाण होतं तर कुणी भविष्यकाळातल्या स्वप्नरंजनात. येणारा प्रत्येक क्षण वर्तमान म्हणता म्हणता भूतकाळात जमा होत असतो. निसटणारे तारुण्य मुठीत पकडण्याची धडपड चालूच रहाते. शरीराने नाही तरी मनाने तरुण होण्याचा मार्ग हवाहवासा वाटतो. 'बालपणं उतू गेले, तारुण्यही नासले, वृद्धपणी देवा आता दिसे पैलतीर` असे म्हणणारी माणसंही दिसतात. 'संध्याछाया भिवविती हृदया` कुणाला तरी खुणावणारा काळ कुणाला तरी भिती दाखवत असतो. कुणाला तरी खायला बनलेला काळ कुणाच्या तरी भुईला भार बनत असतो. काळाने आपल्याला ओढून न्यावं म्हणून तिष्ठत बसणाऱ्यांच्या वाटेला न जाता भलत्यालाच नेउन तो अनेकांना अचंबित करतो. काळाच्या उदरात काय दडलयं याची उत्सुकता ही प्रत्येकाला असतेच. त्याचा शोध आपापल्या परीनं प्रत्येक जण करत असतो. 'कालं विघ्नेन योजयेत ।` आणि 'आशां कालवती कुर्यात ।` या द्विसूत्रीवर तर फलज्योतिष टिकून आहे. शास्त्र असो अथवा नसो. मनुष्य हा काही विवेकवाद, मानवतावाद, बुद्धीप्रामाण्यवाद यांचे प्रोग्रामिंग फीड केलेला जैवरासायनिक यंत्रमानव नव्हे. त्याला केवळ बुद्धी नाही तर भावनाही आहेत. काळ हा त्याचं दु:ख हलकं करतो. आशेच्या वारुवर स्वार झाले की काळ किती गेला हे समजतच नाही. कोण चूक कोण बरोबर हे ठरवणं अवघड गेलं की आपण काळावर सोपवून मोकळे होतो. काळाच्या अनंताकडील प्रवासातले आपण सगळे क्षणभंगुर सहप्रवासीच नाही का?

पुर्वप्रसिद्धी- 'पुरुषस्पंदन' दिवाळी -२००५

समाजलेखअनुभव

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

25 Sep 2007 - 8:45 am | विसोबा खेचर

>>माणसातला पुरुष झोपवून टाकायचा आणि पुरुषातलं माणूस पण जागं करायचं काम फारच थोडया स्त्रियांना जमतं. पण ज्यांना हे जमतं त्यांच्यासाठी आपला जीव धोक्यात घालणारे माणसं ही पुरुषचं. बाईचं बाईपण चघळणारी माणसं ही बाईच्या माणूसपणात कधी कधी विरघळून जाणारी देखील असतात.

>>बोंबलाच्या वासाने शाकाहारी माणसाची असलेली भूक नाहीशी होणं, मळमळ वाटणे ही देखील प्रकृती आणि त्याच वासाने बोंबील आवडणाऱ्या मांसाहारी व्यक्तीत लाळ गळे पर्यंत भूक निर्माण होणे ही देखील प्रकृतीच. वासं एकचं आहे पण प्रतिसाद भिन्न आहेत. एकासाठी आनंद तर दुसऱ्यासाठी दु:ख. एकाचं अन्न हे दुसऱ्याचं विष असेल तर सहजीवन अशक्य.

>>काळाची गती आपल्याला सहन होत नाही. काळाच्या प्रवाहात स्वत:ला सामावून घेता येत नाही. काळ तर कुणासाठी थांबत नाही. याल तर तुमच्यासह न याल तर तुमच्या शिवाय. त्याचा उगमही समजत नाही आणि अंतही. मग कुणी भूतकाळात रममाण होतं तर कुणी भविष्यकाळातल्या स्वप्नरंजनात. येणारा प्रत्येक क्षण वर्तमान म्हणता म्हणता भूतकाळात जमा होत असतो.

घाटपांडेसाहेब,

अतिशय प्रांजळ स्वगत! मनापासून आवडले. काही संकेतस्थळं वयात यायला फार वेळ लावतात बुवा! पण मिसळपावने वयात आल्यावरच जन्म घेतला याची साक्ष देणारा लेख! :)

घाटपांडे साहेब, आपल्याकडून अश्याच उत्तमोत्तम लेखांची अपेक्षा आहे..

आपला,
(स्खलनशील प्राणिमात्र!) तात्या.

सहज's picture

25 Sep 2007 - 9:07 am | सहज

चांगला लिहलाय किंचीत जरा पसरल्या सारखा वाटतो पण ओव्हरऑल नक्कीच चांगला (फक्कड) आहे.

दोन शब्द लैंगिकता :-
स्त्री-पुरुष समानतेच्या वार्‍यात, ही लैंगिकता पण समाजमान्यतेत लवकरच समान विभागली जाईल. आजवर "लैंगिकता व त्यावर मोकळे भाष्य" (व त्या द्वारे इतर लोकांवर वर्चस्व / वरचढ) ही "पुरूषी मक्तेदारी" एकदा ढासळली की बघा "लज्जा पांघरूण" कसे सगळेजण पांघरू लागतील. काय जाणो भविष्यात बराच कालपर्यंत अगदी ओपनली "स्त्री मक्तेदारी" होइल. पुरुष्यस्य अष्टगुणे स्त्रियांसी इश्वरी देणे.

प्रकाश घाटपांडे's picture

25 Sep 2007 - 9:26 am | प्रकाश घाटपांडे

>

म्हणुनच आपली सामाजिक भाकिते आम्हाला आवडतात.

>
मंग आयडिया करायची घाईमंदी आवरुन घ्यायचा आन जरा निवांत झालं कि पसरुन वाचायचा. म्हंजे सर्कीट इष्टाईल.

प्रकाश घाटपांडे

सहज's picture

25 Sep 2007 - 10:17 am | सहज

घाटपांडे साहेब तुम्ही खरे तर "स्वगत" असे सदर करा बघा. दर आठवड्याला / महीन्याला तुम्हाला जे वाटते असे एक सदर.
तुमचे विचार , लेखन आम्हाला आवडते.

सर्किट's picture

25 Sep 2007 - 11:34 am | सर्किट (not verified)

म्हणजेच, अत्यंत सहमत आहे. आम्हा ओपन सोर्स वाल्या लोकांना एखादी सूचना आवडली, एखादा पॅच आवडला, की तिला आपले पॉझिटिव्ह मत देताना आम्ही +१ लिहीत असतो. प्रकाशकाकांनी आपले स्वगत असेच लिहित रहावे, ह्यासाठी हे +१.

- सर्किट

आजानुकर्ण's picture

25 Sep 2007 - 9:12 pm | आजानुकर्ण

++ ही आवडेल :)

विसोबा खेचर's picture

25 Sep 2007 - 11:48 am | विसोबा खेचर

+ १ :)

कोलबेर's picture

26 Sep 2007 - 5:49 am | कोलबेर

सह्जराव मस्त कल्पना :-)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

25 Sep 2007 - 8:59 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुक्ष्म निरिक्षणामुळे स्वगत झक्कास झालंय !
खूला मंच तर खासच !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सर्किट's picture

25 Sep 2007 - 9:00 am | सर्किट (not verified)

प्रकाशकाका..

अद्याप पूर्ण लेख वाचायचा आहे. पण

माणसातला पुरुष झोपवून टाकायचा आणि पुरुषातलं माणूस पण जागं करायचं काम फारच थोडया स्त्रियांना जमतं. पण ज्यांना हे जमतं त्यांच्यासाठी आपला जीव धोक्यात घालणारे माणसं ही पुरुषचं. बाईचं बाईपण चघळणारी माणसं ही बाईच्या माणूसपणात कधी कधी विरघळून जाणारी देखील असतात.

हे वाक्य वाचून मी हरखलो. पूर्ण वाचून सविस्तर प्रतिसाद लिहीनच. पण, आपण आमच्या ओळखीचे आहात, ह्याबद्दल आम्हाला अभिमान वाटतो, हे सांगण्यासाठी हा प्रिमॅच्युअर प्रतिसाद.

- (प्रकाश घाटपांडेंचा मानलेला पुतण्या) सर्किट

सर्किट's picture

25 Sep 2007 - 11:16 am | सर्किट (not verified)

प्रकाशकाका,

आता कुटुंबाची झोप सुरू झाल्यावर निश्चिंतपणे आपला पूर्ण लेख वाचला (नव्हे दोन-तीनदा वाचला.) आपली किती तारीफ करावी तितकी कमीच आहे.

वैचारिक लेखन कशाला म्हणावे, हे ह्या लेखावरून जोखावे. अर्थात हे लेखन आम्हाला वैचारिक वाटते, काहींनी अश्लील अश्लील म्हणून आपल्या संकेतस्थळाच्या तथाकथीत स्त्री सदस्यांपुढे असे लेखन "कसे प्रकाशित करायचे बाई?" असे म्हणून प्रशासकीय फटकार्‍यात रद्द केले असते, असे आमचा अनुभव सांगतो. साध्या "बलात्कार" ह्या शब्दाविषयीच्या "जुने सूर अन जुने तराणे" गायकांच्या ताना आपण ऐकल्या असतीलच. ह्या युगातल्या "ग्रो अप गाईज" म्हणणार्‍या स्त्रिया त्यांना बहुतेक संकेतस्थळ सदस्यांव्यतिरीक्त भेटत नसाव्यात. असो.

पुन्हा एकदा, आपला लेख आवडला. जरा परिच्छेदांत नीट विभागला असतात, तर इतर कॅज्युअल वाचकांनादेखील समजला असता, एवढीच सूचना द्यावीशी वाटते. सीरीयस वाचकांसाठी परफेक्ट.

- (आपला मानलेला पुतण्या) सर्किट

नंदन's picture

25 Sep 2007 - 1:06 pm | नंदन

लेख आवडला. खासकरुन हे निरीक्षण --

"शिवी म्हणजे लैंगिकतेची ओवीच. रोष, नाराजी, राग, अगतिकता व्यक्त करण्यासाठी या ओव्यांचा वापर करण्याची परंपरा खूप जुनी आहे. सहनही होत नाही व सांगताही येत नाही या अवस्थेतून बेडा पार करण्यासाठी या ओव्यांचा आधार घ्यावा लागतो."

नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)

राजे's picture

25 Sep 2007 - 1:32 pm | राजे (not verified)

क्या बात है ! मस्तच.
वाचनिय तर आहेच पण जपून ठेवण्यासारखे लेखन.
बाकी अनूभव हा मानवी जिवनातील महत्वाचा ठेवा ह्या माझ्या मताला पुन्हा एकदा बळकटी मिळाली.

राजे
(*हेच राज जैन आहेत)

प्रमोद देव's picture

25 Sep 2007 - 5:31 pm | प्रमोद देव

कोण चूक कोण बरोबर हे ठरवणं अवघड गेलं की आपण काळावर सोपवून मोकळे होतो. काळाच्या अनंताकडील प्रवासातले आपण सगळे क्षणभंगुर सहप्रवासीच नाही का?
आपण नेमके मर्म सांगितलेत.

प्रियाली's picture

25 Sep 2007 - 6:16 pm | प्रियाली

लेख अतिशय आवडला. अशी स्वगते वाचायला आवडतील.

>>अशाप्रकारचे खुले मंच इंटरनेटवर सहज उपलब्ध आहेत. इथे अभिव्यक्तिला मर्यादाच नसतात.सर्जनशील प्रतिभा इथही बघायला मिळते. सामाजिक बंधन, रुढी परंपरा, संस्कार यात जखडलेल्या विचारांना उसंत घेण्यासाठी खुला मंच दुसरीकडे कुठे मिळणार? त्यात तुम्ही घुसमटल्यावर तुम्हाला मोकळा श्वास घ्यायला इथंच येणार. समाजात हे बुरखे काढून तुम्ही जगायला लागलात तर समाज तुम्हाला वाळीत टाकील. दुर्जन, समाजद्रोही, कलंकित ठरवेल. तुमची इच्छा असो वा नसो समाजात तुम्हाला हे बुरखे पांघरावेच लागतात.

हा एक भाग झाला. इंटरनेटचा दुसरा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इतरांना आपल्यापासून किती दूर ठेवायचे हे आपल्या हातात असते. एखाद्यावर (दिसण्यावर/ वागण्यावर/ विचारांवर) फिदा होऊन जवळीक साधण्याचा प्रयत्न करणे, तशी जवळीक साधता आली नाही तर त्या बाईला (किंवा पुरुषाला) बदनाम करून आपली लैंगिक अतृप्तता/ असंतोष पूर्ण करण्याचा (विकृत) मार्ग चोखाळणारे महाभाग प्रत्यक्ष जीवनात पाहिलेले आहेत. अशांचा त्रास इंटरनेटावरही दिसतो परंतु बुरखे पांघरून अशांना नेटावर एका मर्यादेनंतर सहज दूर ठेवता येते.

सन्जोप राव's picture

25 Sep 2007 - 7:03 pm | सन्जोप राव

सध्या एवढेच लिहितो...
सन्जोप राव

चित्रा's picture

25 Sep 2007 - 8:57 pm | चित्रा

स्वगत मनापासून आवडले.

"कोण चूक कोण बरोबर हे ठरवणं अवघड गेलं की आपण काळावर सोपवून मोकळे होतो."

यावर माझेही एक (अर्धवट) स्वगतः कोण चूक कोण बरोबर काळच ठरवेल म्हणताना स्वत:चे बरे वाईट विचार त्या त्या वेळेपुरते आणि स्वतःपुरते करू शकणे आणि नंतर त्याचे जे परिणाम होतील त्यांना सामोरे जाणे हे महत्त्वाचे. बदलत्या परिस्थितींत कोण बरोबर कोण चूक असा गोंधळ होणे साहजिकच आहे. पण फारच गोंधळ उडायला लागला तर समजावे आपल्याला धरलेली वाट / केलेला विचार झेपत नाही आहे. काही लोकांना स्वतःची वाट ( लगेच ) लख्ख दिसते आणि ते कोणाची पर्वा न करता ते ती अनुसरतात तर काहींना (खरी) ती वाट मिळायला वेळ लागतो, तर अजून काही स्वत:च केलेल्या गुंत्यात अडकतात आणि आहेत तेथेच गुरफटून फिरतात. यातले आपण कोण ते आपण ठरवायचे.

आजानुकर्ण's picture

25 Sep 2007 - 9:14 pm | आजानुकर्ण

अतिशय सुरेख लेख. वाचायला खूप वेळ लागला. प्रत्येक शब्द न शब्द ज्या लेखाचा वाचावा वाटतो असे लेख वाचायला वेळच लागतो. :) शिवाय हा लेख लगेच पुन्हा एकदा वाचला.

घाटपांडे साहेब आम्ही तुमच्या गावचे आहोत हे सांगायला खूप अभिमान वाटतो. ;)

- आजानुकर्ण मंचरकर

तरी असेच येऊ द्या. मी दुसरीकडे चिकटवून स्वतः परिच्छेद पाडून घेईन.

> पर्यायी शब्द वापरले तर आशयहानी होते.
> 'पोटाला नाही आटा अन म्हनं चोटाला उटण वाटा`.

एकदम पटले.

शिवराळ भाषा असून रावसाहेब (आणि तुमच्या उदाहरणातले हवालदार) मुद्द्याचे ही बोलतात, हे महत्त्वाचे. कारण केवळ भावनिक आशय असलेले तेवढेच शब्द बोलले, तर समोरच्याला उत्तर देण्याइतपत अर्थ समजेलच असे सांगता येत नाही. "साहेब पेटलाय्" हे उत्तम कळले, पण काय नेमके चुकले आणि काय नेमके बदलायचे ते कळले नाही तर आली पंचाईत.

तुमचा हा पूर्वप्रसिद्ध लेख आहे. पण खरे म्हणजे दोन किंवा तीन लेखांना पुरेल इतका मालमसाला याच्यात भरला आहे.

आजानुकर्ण's picture

25 Sep 2007 - 9:18 pm | आजानुकर्ण

शेवटचा परिच्छेद फारच प्रभावी.

प्राजु's picture

25 Sep 2007 - 9:32 pm | प्राजु

प्रकाशकाका,
छान आहे लेख. विशेष करून..

एकेकाळची विकृृती ही आता प्रकृती बनत चालली आहे. कुणी म्हणेल आताची पिढी वाहवत चालली आहे. पण दुटांगी धोतर नेसून महाविद्यालयात जाणाऱ्या तरुणाला वा पाचवारी साडी नेसून सायकलवर जाणाऱ्या तरुणीला बघून त्या त्या काळी आजची पिढी वाहवत चालली आहे असे म्हणणारे बुजुर्ग होतेच. पॅंट शर्ट घालून इराण्याच्या हॉटेल मधे जाउन चहा पिणारा तरुण किती वाया गेला? प्रत्येक पिढीत हेच घडत आले आहे. काळाची गती आपल्याला सहन होत नाही. काळाच्या प्रवाहात स्वत:ला सामावून घेता येत नाही. काळ तर कुणासाठी थांबत नाही. याल तर तुमच्यासह न याल तर तुमच्या शिवाय. त्याचा उगमही समजत नाही आणि अंतही.

आवडले. खूप विचार करायला लावणारा लेख आहे. असेच येऊ दे आणखिही..

- प्राजु.

कोलबेर's picture

26 Sep 2007 - 5:48 am | कोलबेर

इथल्या प्रतिक्रिय वाचल्यावर हा लेख जरा निवांत वेळ काढूनच वाचला.. जबरदस्त स्वगत आहे.

राघव१'s picture

23 Aug 2008 - 8:41 am | राघव१

काय लिहिलेत काका! अगदी मस्त.

राघव

अभिज्ञ's picture

16 Aug 2008 - 3:03 am | अभिज्ञ

प्रकाश घाटपांडे जी,
मिसळपाव वरील अत्युत्तम अशा लेखांपैकी हा एक लेख वाचनात आला.
फारच प्रांजळ असा लिहिला आहे.
शेवटचा परिच्छेद अतिशय प्रभावी झालाय.
विशेषतः
एकेकाळची विकृृती ही आता प्रकृती बनत चालली आहे. कुणी म्हणेल आताची पिढी वाहवत चालली आहे. पण दुटांगी धोतर नेसून महाविद्यालयात जाणाऱ्या तरुणाला वा पाचवारी साडी नेसून सायकलवर जाणाऱ्या तरुणीला बघून त्या त्या काळी आजची पिढी वाहवत चालली आहे असे म्हणणारे बुजुर्ग होतेच. पॅंट शर्ट घालून इराण्याच्या हॉटेल मधे जाउन चहा पिणारा तरुण किती वाया गेला? प्रत्येक पिढीत हेच घडत आले आहे. काळाची गती आपल्याला सहन होत नाही. काळाच्या प्रवाहात स्वत:ला सामावून घेता येत नाही. काळ तर कुणासाठी थांबत नाही. याल तर तुमच्यासह न याल तर तुमच्या शिवाय. त्याचा उगमही समजत नाही आणि अंतही.

मनुष्य हा काही विवेकवाद, मानवतावाद, बुद्धीप्रामाण्यवाद यांचे प्रोग्रामिंग फीड केलेला जैवरासायनिक यंत्रमानव नव्हे. त्याला केवळ बुद्धी नाही तर भावनाही आहेत. काळ हा त्याचं दु:ख हलकं करतो. आशेच्या वारुवर स्वार झाले की काळ किती गेला हे समजतच नाही. कोण चूक कोण बरोबर हे ठरवणं अवघड गेलं की आपण काळावर सोपवून मोकळे होतो. काळाच्या अनंताकडील प्रवासातले आपण सगळे क्षणभंगुर सहप्रवासीच नाही का?

हे तर फारच आवडले.
अभिनंदन

अभिज्ञ.

मदनबाण's picture

16 Aug 2008 - 4:33 am | मदनबाण

लेख फार आवडला..

मदनबाण.....

"First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda

विनायक प्रभू's picture

23 Aug 2008 - 8:23 pm | विनायक प्रभू

डायरेक्ट. करे़क्ट.
वि.प्र.

सखाराम_गटणे™'s picture

1 Mar 2009 - 2:49 pm | सखाराम_गटणे™

मस्तच, धन्यवाद काका. ह्या लेखाचा दुवा दिल्याबद्दल.
काळानुरुप सगळ्या व्यख्या बदलत राहतात.

----
तुम्हाला तुमचे मित्र गमवायचे असतील तर मराठी संकेतस्थळ चालु करा.

सखाराम_गटणे™'s picture

1 Mar 2009 - 2:49 pm | सखाराम_गटणे™

मस्तच, धन्यवाद काका. ह्या लेखाचा दुवा दिल्याबद्दल.
काळानुरुप सगळ्या व्यख्या बदलत राहतात.

----
तुम्हाला तुमचे मित्र गमवायचे असतील तर मराठी संकेतस्थळ चालु करा.

मन१'s picture

8 Sep 2012 - 6:45 pm | मन१

वाचनीय मुक्तचिंतन....

स्पंदना's picture

11 Sep 2012 - 5:41 am | स्पंदना

किती सरळ सरळ लिहिलय. अतिशय पटल.

अर्धवटराव's picture

12 Sep 2012 - 1:06 am | अर्धवटराव

पोलीस खात्यासम रांगड्या यंत्रणेतील ट्रांझीशन्स व कर्मठता, भावना रेचनाचे मानसशास्त्र, भाषेतले वेगवेगळे प्रवाह, स्त्रीत्वाच्या अचाट शक्तीचे तेव्हढेच विराट पण भावुक प्रदर्शन, अभिव्यक्तीच्या नवनवीन हुंकारांचे समाजाने केलेले स्वागत, निसर्गाच्या "बदल" या एकमेव नियमाचे स्पष्टीकरण आणि त्याची अपराजीत शक्ती, नैतिकतेची अपरिहार्य स्थलकालसापेक्षता, मानव्याची राजीखुषीने वा रेट्याने काळाप्रती शरणागती... उफ्फ्फ्फ... एव्हढं सगळं एकाच लेखात ???... भाईकाकांचा पानवाला आठवला.
आपल्या प्रतिभेला सलाम.

अर्धवटराव

दादा कोंडके's picture

12 Sep 2012 - 4:27 pm | दादा कोंडके

काही नोकर्‍यांमध्ये स्त्रियांची कुचंबणा होते आणि त्यामुळे पुरुषांची सुद्धा गोची होते.
ह्यावरूनच आठवलं. कॉलेजात असताना एक लमाणतांड्यावर मुकादम म्हणून काम करत असलेल्या माणसाच्या घरात काही कामा निमित्त गेलो होतो. एरवी सुशिक्षीत (सुसंस्कृत?) दिसणारा माणूस स्वतःच्या बायका पोरांसमोरच मला 'अवचित उठलं आणि XXत घुसलं' असं करू नकोस असं म्हणाला होता. त्या धक्क्यातून दोन दिवस बाहेर आलो नव्हतो. :)

राजेश घासकडवी's picture

13 Sep 2012 - 6:24 am | राजेश घासकडवी

हा लेख वर काढणाऱ्या मनोबाला धन्यवाद. मिपाच्या खजिन्यातलं एक माणिकच बाहेर काढलं आहे.

लेखाला नावाप्रमाणेच एक स्वतःशी बोलण्याचा टोन आहे. पोलिस खात्यातले किस्से अस्सल रांगड्या भाषेमुळे रंगलेले आहेत.

घाटपांडेसाहेब, अजून लेखन करा की.

तर्राट जोकर's picture

30 Mar 2016 - 4:54 am | तर्राट जोकर

चला, हा लेख वर काढण्याचा प्रमाद उरी घेतोच एकदा.

घाटपांडेसर, तुमचं लेखण खूप आवडलं, भिडलं! __/\__

साबरमतीचं महात्म्य छान 'गांधीगिरी' करुन सांगितलं तर लवकर उमगतं. मनमोकळेपणाची, व्यक्तीस्वातंत्र्याची गरज किती सहजपणे सांगितली घाटपांडे सर. एकमद मस्त.

आनन्दा's picture

3 Apr 2016 - 2:33 pm | आनन्दा

+१

अभिजीत अवलिया's picture

3 Apr 2016 - 12:36 pm | अभिजीत अवलिया

त.जो. साहेब,
धन्यवाद हे माणिक वर काढल्याबद्दल.

लिखाण आवडले.