तबल्याचा क्लास झाला होता आणि गुरुजींबरोबर गप्पा मारत बसलो होतो. सहसा अशा वेळी काहीतरी किस्से ऐकायला मिळत. तर विषय निघाला पिंजरा चित्रपटाचा. तर प्रभात स्टुडिओ मध्ये "ग साजणी -आली ठुमकत नार लचकत " या गाण्याचे रेकॉर्डिंग चालू होते. गाणे वरच्या पट्टीत होते त्यामुळे हाय पीच आवाज असणारा गायक पाहिजे होता. प्रभात मध्ये साफसफाई करणाऱ्यांचे मुख्य विष्णू वाघमारे म्हणून होते. कधी कधी ते झील देण्याचे म्हणजे कोरस चेही काम करत. जसे की जी जी रे जी जी वगैरे गाणे. तर त्यांना सहज तिकडे बोलावले गेले आणि गाणे गायला सांगितले. वाघमारेंनी असा काय आवाज लावला की ज्याचे नाव ते. सगळे थक्क झाले आणि मग गाणे त्यांच्याच आवाजात रेकॉर्ड झाले. गाणे झाल्यावर स्वतः लता दीदींनी पर्समधून १० हजार रुपये काढून त्यांना देऊन गौरव केला.
=======================================
गुरुजी आणि त्यांचे गुरु, उस्ताद अल्लारखांना भेटायला गेले होते. अल्लारखा त्यावेळी प्रसिद्धीच्या शिखरावर होते. गप्पा मारता मारता अल्लारखा दाऊदखा ना म्हणाले " कुछ बजाके सुनाओ ना" त्यावर गुरु खा साहेबानी तबला मागवला, सुरात लावला आणि वाजवण्याच्या ओघात फक्त त्रिपल्लीचे ("तीटकत गदिगन ") इतके प्रकार वाजवले की अल्लारखानी कान पकडले आणि म्हणाले की "क्या ज्ञान है आपका, मै तो खाली पेट के लिये तबला बजाता हुं"
=======================================
गुरुजी मला एक मुखडा शिकवत होते . शिकवता शिकवत ते म्हणाले की सूर नंतर येतो, ताल प्रथम. लहान बाळाला आई थोपटले तो तालच असतो. हा मुखडा म्हणजे अंगाई सारखा आहे असे स्वतः झाकीर हुसेन एका कार्यक्रमात म्हणालेत. त्यांनी असे म्हटल्यावर मला त्या मुखड्यात खरेच अंगाईचा भास व्हायला लागला.
==================================
हिंदी चित्रपट सृष्टीतले लाला गंगावणे एक मशहूर ढोलकी, ढोलक वादक. त्या काळातही ते इंपाला गाडीतून स्टुडिओमध्ये यायचे. लतादीदींसारखी गायिकाही वेळ पडल्यास गंगावणे रेकॉर्डिंगला पाहिजेत म्हणून थांबायची. तर एका रेकॉर्डिंगला गुरुजी ढोलकी वादक म्हणून गेले होते. रेकॉर्डिंगच्या आधीची तालीम वगैरे चालू होती. गुरुजी एक तुकडा वाजवत असताना गंगावणे स्टुडिओत आले. जाता जाता त्यांनी तो तुकडा ऐकला आणि कोण वाजवतोय म्हणून विचारले. गुरुजी समोर जाऊन उभे राहिले. त्यांना एकवार वरपासून खालपर्यंत न्याहाळून गंगावणे म्हणाले "नक्की तूच वाजवलास का?एकदा वाजवून दाखव परत." गुरुजींनी परत तो तुकडा वाजवला. त्यावर गंगावणेनी त्यांना विचारले "कोणाकडे शिकला?" गुरुजींनी नाव सांगितले तर गंगावणे इतके खुश झाले की अरे ते तर माझेही गुरु आहेत, म्हणजे आपण गुरुबंधू झालो. पुढे त्यांनी म्युझिक डायरेक्टरला सांगितले की माझ्यापेक्षा हे रेकॉर्डिंग यालाच वाजवू द्या, माझा हात एव्हढा चालणार नाही. आणि ती संधी गुरुजींना मिळाली.
============================
थिरकवा साहेब उतार वयात होते. एका मैफलीला गेले होते. स्टेजवर त्यावेळचे एक मशहूर वादक तबला वाजवत होते ज्यांचे "धीर धीर" बोल अतिशय लोकप्रिय होते आणि त्यासाठी ते नावाजले जायचे. हा बोल द्रुतगती मध्ये वाजवला जातो त्यामुळे साथीची सारंगी उच्च लयीत होती. वादन झाल्यावर त्यांनी स्टेजवरूनच थिरकवा ना विचारले की आप बजाओगे ? खरेतर बुजुर्ग माणसाला,तेही श्रोता म्हणून कार्यक्रमाला आलेले असताना असे विचारणे प्रशस्त नसते .तरीही थिरकवा साहेबानी ते शांतपणे स्वीकारले आणि ते स्टेजवर गेले. ते तबला लावत असताना लेहरा वाजवणाऱ्या सारंगी वाल्याने अदबीने विचारले "क्या चलन रखु?" म्हणजे किती जलद वाजवू? कारण थिरकवांचे वय जास्त असल्याने हात किती चालतो माहीत नव्हते. त्यावर थिरकवानी बाणेदारपणे "जो है वही रखो" असे म्हणून पुढची काही मिनिटे तबला असा काही घुमवला की "टायगर अभी जिंदा है" याची सर्वांना जाणीव व्हावी.
=======================
गावात एक तमाशा आला होता आणि त्यांचा ढोलकीवाला काहीतरी कारणाने रजेवर गेला. तमाशा म्हटले की ढोलकीशिवाय चालणारच नाही त्यामुळे मंडळी ढोलकीवाल्याच्या शोधात फिरत होती. फिरता फिरता कुठूनतरी त्यांना गुरुजींचे नाव कळले आणि ते गळ घालायला आले की तात्पुरते का होईना थोडे दिवस आमच्याकडे वाजवायला या. पैसे चांगले मिळणार होते, गरजही होती पण एकदा पैशांची सवय लागली की शिकणे थांबेल ही भीती होती. तरी यांनी थोडे दिवस आपल्या गुरूंची परवानगी घेऊन तमाशात ढोलकि वाजवली. लोक खुश झाले. पैसेही मिळू लागले , पण बाकी वातावरण पचनी पडेना.रोजची तालीम थांबली. तमाशावाले काही सोडेनात.मग रात्री फडावर ढोलकी वाजवायची अन सकाळी आवरुन झाले की दूर कुठेतरी झाडाखाली बसून तबल्याची प्रॅक्टिस करत बसायची असे चक्र सुरु झाले. अखेर फारच कंटाळा आला म्हणून वडील आजारी आहेत वगैरे सांगून सुटायचा प्रयत्न केला. पण त्यावर "अरे का जातोस , वडिलांसाठी पैसे पाहिजेत का? तर अजून घे " वगैरे आमिषे येऊ लागली. पैसे घेतले म्हणजे एक सापळा तयार होणार, ते फेडायला लागणार हे गुरुजींनी ओळखले. मग शेवटचा उपाय म्हणून आपल्या गुरूंकडे जाऊन अडचण सांगितली. त्यांनी सांगितले की "बस कर, उद्यापासून जाऊ नको. मी बघतो काय ते."
दुसऱ्याच दिवशी फडावरचे लोक विचारायला आले की "काय झाले? का आला नाही? पैसे वाढवून पाहिजेत का? अजून काही अडचण आहे का?" त्यावर गुरुजींनी एकच उत्तर दिले . "माझ्या गुरुजींनी सांगितले तरच येतो. उद्या तुम्ही पैसे द्याल पण नंतर त्यांनी शिकवत नाही म्हटले तर मी कुठे जाऊ?"
"गुरुबीन कौन बतावे वाट?" मग फडवाले नाक घासत आले आणि बऱ्याच चर्चेअंती "केवळ तुमची अडचण आहे म्हणून त्याला अजून काही दिवस फडावर पाठवतो , तोवर तुम्ही दुसरा माणूस शोधा" असा तोडगा निघाला.
================================
याशिवाय खासगीत सांगण्यासारखे काही किस्से आहेत पण ते कोणाकोणाच्या सवयी, रंग ढंग , व्यसने याबद्दल वगैरे असल्याने इत्यलम
प्रतिक्रिया
16 Jul 2025 - 5:19 pm | अनन्त्_यात्री
आवडले.
17 Jul 2025 - 7:06 am | प्रचेतस
एकेक किस्से / आठवणी सुरेख आहेत.
अजूनही येऊ द्यात.
17 Jul 2025 - 8:56 am | सौंदाळा
सुंदर कोलाज
सर्वच किस्से आवडले - पण थिरकवा यांचा सगळ्यात जास्त.
तबल्याच्या ४ परिक्षा दिल्या आणि पाचव्या परिक्षेचा अभ्यासक्रम पूर्ण केला पण दहावीमुळे तबला सोडला तो सोडलाच. आता त्याचे वैषम्य वाटते.
तुमचे तबलावादन चालू आहे का? त्याबद्दलचे पण किस्से, आठवणी लिहा ही विनंती.
17 Jul 2025 - 9:56 am | श्वेता व्यास
छान आहेत कवडसे, आणखी आठवणी वाचायला आवडेल.
17 Jul 2025 - 2:35 pm | राजेंद्र मेहेंदळे
@सौंदाळा- गुरुजी २०२४ च्या जानेवारीत गेले. तेव्हापासुन तबला कपाटात आहे, कधी कधी धूळ झटकली जाते मात्र.
17 Jul 2025 - 4:36 pm | कर्नलतपस्वी
आवडले.
17 Jul 2025 - 4:37 pm | कर्नलतपस्वी
आवडले.
19 Jul 2025 - 4:27 pm | सुधीर कांदळकर
एकापेक्षा एक सरस किस्से. वाघमारे, गंगावणे आणि गुरुजी छानच. थिरकवासाहेबांचे नव्वदीतले वादन मी ऐकलेले आहे. उस्ताद गामेखां समारोहात. धड उभे पण राहता येत नव्हते पण हट्टाने वाजवले आण तेही जबरदस्त.
छान लेख धन्यवाद.
21 Jul 2025 - 12:07 pm | राजेंद्र मेहेंदळे
यावरुन एक आठवले-थिरकवा मोठ्या अभिमानाने "मै बालगंधर्वजीका तबलिया हुं" असे सांगायचे. त्यानी खरेच अनेक वर्षे बालगंधर्वाना साथ केली होती.
19 Jul 2025 - 4:29 pm | सुधीर कांदळकर
तबलावादन बंद केलेत? .... अरेरे!
19 Jul 2025 - 8:51 pm | अभ्या..
सुंदर लेखन आणि हेवा करण्याजोगा आठवणींचा पेटारा.
मेहेंदळे सर तुम्ही अजून लिहा.
खूप आवडतेय लिखाण.
21 Jul 2025 - 12:07 pm | राजेंद्र मेहेंदळे
धन्यवाद!!
21 Jul 2025 - 3:41 pm | स्वधर्म
मस्त किस्से आहेत. अस्सल कलावंत असेच असतात.
गुरुजींचे नांव लेखात आले नाही, ते समजून घ्यायची उत्सुकता लागली.
23 Jul 2025 - 2:11 pm | राजेंद्र मेहेंदळे