फिल्ड मार्शल जनरल रोमेल - The Desert Fox.

Primary tabs

kvponkshe's picture
kvponkshe in जनातलं, मनातलं
14 Oct 2021 - 7:09 pm

आज हिटलरचा शूर आणि तितकाच दुर्दैवी सेनानी डेझर्ट फॉक्स फिल्ड मार्शल जनरल रोमेल याचा मृत्युदिन . त्या निमित्ताने हा छोटासा लेख पुनर्प्रसारित करतोय. या लेखातील माहितीची गंगोत्री बव्हंशी संगणक आंतरजाल आहे आणि माहिती अचूक ठेवण्याचा प्रयत्न केलाय . सूचनांचे स्वागतच होईल .
प्रारंभीचे जीवन :-
एर्विनचा जन्म १५- नोव्हेंबर १८९१ रोजी स्टुटगार्ट जवळिल हाइडेनहाइम येथे झाला . प्रोफेसर एर्विन रोमेल ( सिनिअर ) आणि त्यांची पत्नी हेलीन व्हॉन लूज यांचे हे दुसरे अपत्य . एर्विन याचे प्राथमिक शिक्षण स्थनिक शाळेत झाले . लहानपणापासूनच त्याच्यात अभियान्त्रिकी कौशल्ये दिसून येत होती . वयाच्या १४व्या वर्षीच त्याने एक मित्राच्या मदतीने पूर्ण आकाराचे छोटे अंतर सहज पार करू शकणारे एक ग्लायडर बनवले होते. हा मुलगा पुढे अभियंता होणार अशीच सर्वांची अटकळ होती . मात्र त्याच्या वडिलांच्या इच्छे खातर तो १९१० मध्ये १२४वी Württemberg रेजिमेंट मध्ये ऑफिसर कॅडेट म्हणून रुजू झाला. डान्झिगच्या ऑफिसर कॅडेट शाळेतच त्याचे पदवी शिक्षण पूर्ण झाले . इथेच त्याला त्याचे भावी पत्नी लुसिया मोलिन भेटली आणि २७- नोव्हेंबर - १९१६ मध्ये तो दोघे विवाहबद्ध झाले . यावेळी एर्विन बहुदा लेफ्टनंट असावा .
पहिले महायुद्ध :-
पहिल्या युद्धात एर्विनने ६ व्या Württemberg पायदळ तुकडी बरोबर पश्चिम आघाडीवर लढाईत भाग घेतला . आपल्यातल्या शौर्य आणि निर्णयक्षमता आदि गुणामुळे त्याने लवकरच नाव कामवले . एका प्रसंगी त्याने केवळ तीन रायफल धारी सैनिक सैनिक व दोन अधिकारी यांच्या सहायाने १५०० शत्रू सैनिक आणि ४३ अधिकारी कैद केले. १९१४ साली त्याला दुसऱ्या वर्गाचा आयर्न क्रॉस आणि १९१५ साली पहिल्या वर्गाचा आयर्न क्रॉसने गौरवण्यात आले . तो रात्रीच्या काळोखात छोट्या सैनिक तुकड्यांसह शत्रूला बगल देऊन अचानक त्याची पिछाडी गाठून शत्रुस अचंब्यात टाकीत असे . २६ ऑक्टोबर १९१७ मध्ये कॉपोरेटटो च्या लढाईत (Battle of Caporetto) तर त्याने ७००० इटालीयन सैनिकांनी संरक्षित असलेल्या माताजूर च्या डोंगरावरील लष्करी तळावर केवळ १०० सैनिकांनिशी कब्जा केला . या पराक्रमा बद्दल त्याला १९१८ मध्ये Pour le Mérite हा सर्वोच्च सन्मान मिळाला .( हा सन्मान विक्टोरिया क्रॉस च्या समान पात्रतेचा होता ) . पहिले युद्ध संपेपर्यंत तो कॅप्टन पदापर्यंत पोचला होता.
मधील काल :-
आपल्या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर त्याला सरळसोट लष्करी पदोन्नतीचा मार्ग अगदी सोपा होता . पण आश्चर्य कारक रीत्या लष्करी मुख्यालयात बसून नुसते आदेश देण्यापेक्षा त्याने मुख्य युद्धशेत्रातील आघाडीचा सेनानी बनणे पसंत केले. दोन युद्धामधील काळात त्याने राईश वेअर मध्ये वेगवेगळ्या जबाबदार्या सांभाळल्या . १९२९ मध्ये ड्रेसडन येथील पायदळ शाळेत तो प्रशिक्षक म्हणून रुजू झाला . त्याने पाय्दालाशी संबंधित अनेक उपयुक्त पुस्तके / लेख लिहिले . त्यापेकी Infanterie greift an (Infantry Attacks ) आणि "Gefechts-Aufgaben für Zug und Kompanie : Ein Handbuch für den Offizierunterricht" (Combat tasks for platoon and company: A manual for the officer instruction in infantry training) ही काही उल्लेखनीय पुस्तके आहेत . १९३३ मध्ये Jäger Goslar alpenkorps या बटालियन चे नेतृत्व त्याच्या कडे आले . ३० सप्टेबर १९३४ रोजी एका परेड मध्ये हिटलरशी त्याची पहिली भेट झाली. रोमेल चा पुस्तके आणि लेखांमुळे हिटलर खूपच प्रभावित झाला . हिटलरने त्याच्यावर जर्मन युद्ध मंडळ आणि हिटलर युथ या नाझी युवक संघटनेचा दुवा म्हणून काम करण्याची जबाबदारी टाकली . १९३८ मध्ये कर्नल पदावर पोहोचलेल्या रोमेलवर आता हिटलरच्या FührerBegleitbataillon या अंगारक्षक तुकडीचे नेतृत्व सोपवण्यात आले . याच काळात त्याची नाझी प्रचार प्रमुख गोबेल्स याच्याशी ओळख झाली . (गोब्लेस ने पुढे रोमेलच्या आफ्रिकेतील पराक्रमाचा उपयोग त्याच्या प्रचार तंत्रात केला ).
दुसरे महायुद्ध :-
१ सप्टेंबर १९३९ रोजी जर्मनी ने पोलंडवर आक्रमण केले आणि दुसऱ्या महायुद्धाची सुरुवात झाली . पोलंड चा पाडाव होई पर्यंत तो हिटलरच्या सुरक्षेची जवाबदारी सांभाळत होता . ऑक्टोबर १९३९ ते एप्रिल १९४० या काहीश्या युद्धाच्या थंडावलेल्या काळात आतापर्यंत प्रत्यक्ष युद्धापासून दूर राहिल्यामुळे कंटाळलेल्या रोमेलने हिटलर कडे लष्करी कामगिरी सोपवण्याची विनंती केली . कोणती कामगिरी देऊ असे हिटलरने असे त्याला विचारले . त्यावर रोमेलने पँझर तुकडीचे नेतृत्व देण्याची मागणी केली . इतर अधिकाऱ्यांची नाराजी पत्करून हिटलर ने त्याला ७ वि पँझर तुकडीचे नेतृत्व दिलेच शिवाय मेजर-जनरल हे पदही !!!! रोमेल हा आतापर्यंत त्याच्या पहिल्या युद्धातील पायदळाच्या कुशल , जलद आणि अपरोक्ष हालचाली करण्यासाठी सर्वत्र परिचित होता . त्याच्या कडे अवजड यांत्रिक लष्करी तुकड्यांचे नेतृत्व देण्यास इतर अधिकारी तयार नव्हते . पुढे रोमेलला मिळालेले यश बघता हिटलर कसाही असलातरी तो गुण ग्राहक होता हे निश्चित . उपजत अभियांत्रिकी कौशल्ये असलेल्या रोमेलला यांत्रिक लष्करी तुकड्यांचे महत्व लक्षात यायला वेळ लागला नाही . त्याने फ्रांस वरील संभाव्य आक्रमणाची तयारी सुरु केली . १० मे १९४० रोजी जर्मनीने बेल्जियम वर आक्रमण केले . त्याच्या पँझर तुकड्यांच्या हालचाली इतक्या जलद असत की पँझर तुकड्यांपँझर तुकड्यांना "Ghost Division" या नावानी संबोधले जाऊ लागले . २१ मे १९४० रोजी आरास च्या लढाईत त्याने प्रतिहल्ला करणाऱ्या ब्रिटीश फौजांना खडे चारले . २७ मे रोजी लिली शहराजवळ लढाईत असताना त्याला हिटलर ने Knight's Cross of the Iron Cross ने गौरवले. २८ मे रोजी फ्रेंच तोफ खान्याच्या अग्निवार्षावात आपल्या सेना गुसवून लिली शहरावर नाझी ध्वज फडकवला . फ्रांस मधील त्याच्या कर्तृत्वावर त्याला आफ्रिकेतील Deutsches Afrikakorps या नवीन तुकडीचे नेतृत्व सोपवले गेले. कारण तिकडे इतलिअन सैन्याची ससेहेलपट चालली होती . १९४१ मध्ये आफ्रिकेत लिबियात उतरल्यानंतर त्याने लगेच अल अघैला मधील ब्रिटीश सैन्यावर हल्ला केला आणि त्यांना माघार घायला लावली . आक्रमण सुरु ठेऊन तो Cyrenaica , गझला असे करीत टोब्रुक या बंदरापाशी पोचला . मात्र त्याच्या विद्युत चढाईचा ताण त्याच्या रसद , इंधन पुरवठ्यावर होत होता . ब्रिटीशांनी त्याला पुन्हा अल आगीला पर्यंत मागे रेटले . जानेवारी मध्ये रसद आणि इंधन मिळाल्यावर त्याने पुन्हा ब्रीतीशाना मागे इजीप्त पर्यंत रेटले . याच वेळी त्यास फिल्ड मार्शल हा किताब देण्यात आला. त्यास The desert Fox या टोपण नावाने ओळखले जाऊ लागले . त्याने टोब्रुक बंदर जिंकले . आणि अल आलेमीन येथे तो येउन थांबला . अपुऱ्या रसद , दारुगोळा आणि इंधन पुरवठ्या अभावी त्याला अल आलेमीन च्या दुसर्या लढाईत सपाटून मार खावा लागला . त्याने ट्युनेशिया पर्यंत माघार घेतली . ९ मार्च १९४३ रोजी आजारी पडल्याने तो परत जर्मनीला आला . (पराभवाच्या दोषापासून दूर ठेवण्यासाठी हिटलरनेच त्याला परत बोलावले असा एक दावा केला जातो . कारण रोमेल हे आता एक जर्मन विजयाचे प्रतिक बनले होते . तो नाझी जर्मनीत अतिशय लोकप्रिय झाला होता. )
जर्मनीत परत आल्यावर त्याच्यावर दोस्तांकडून होणाऱ्या संभाव्य आक्रमणापासून बचावाची जबाबदारी टाकण्यात आली . बचाव तंत्राबाबत त्याचे रुद्न्स्तेड शी मतभेद झाले. संभाव्य आक्रमण नॉर्मंडी वर होईल असे रोमेल ला वाटत होते पण नंतर बहुदा इतर नाझी अधिकार्यांप्रमाणे मुख्य हल्ला Calais वर होणार यावर तो सहमत झाला . ६ जून ला खराब हवामान होते . तेव्हा हल्ल्याची शक्यता नाही असे वाटून तो त्याच्या पत्नीचा जन्मदिवस साजरा करण्यासाठी जर्मनीत गेला. मात्र ६ जून लाच नॉर्मंडीवर दोस्त सेना उतरल्या .( यावरून हिटलरची त्यावर कितपत नाराजी झाली हे माहित नाही . )
एव्हाना युद्धाचा निर्णय काय लागणार हे स्पष्ट झाले होते . खुद्द रोमेल ने त्याला तहविषयी अनेकदा सुचवले होते .हिटलर चा वध करून दोस्तांशी त्यातल्या त्यात शक्य तेव्हड्या सन्मानजनक अटींवर तह करावा अश्या विचारसरणीचा एक गट तयार झाला होता . त्यातील अनेक जन त्याच्या संपर्कात येत होते . मात्र हिटलर ला मारू नये , तर त्याला कैद करून त्यावर न्यायलयीन कारवाई करावी असे रोमेल चे मत होते.
१७ जुलै १९४४ ला मुक्ख्यालायातून उघड्या मोटारीतून परतताना त्याच्या कार वर ब्रिटीश स्पीट फायर 412 Squadron च्या विमानांनी हल्ला केला . त्यात तो जबर जखमी झाला . त्यास रुग्णालयात दाखल केले गेले . २० जुलै ला हिटलरच्या वधाचा अयशस्वी प्रयत्न झाला . हिटलर यातून दैवयोगाने अगदि सही सलामत बचावला … काही किरकोळ जखमा सोडून …. बरा झाल्यावर कटाची पाळेमुळे खणून काढण्यात आली . Stülpnagel च्या चौकशीत रोमेलचे नाव प्रथम पुढे आले . Caesar von Hofacker यानेही गास्टेपो च्या चौकशीत रोमेलच्या सहभागाविषयी होकार दिला . रोमेल ला त्याच्या घरीच गास्तेपो च्या नजर कैदेत ठेवण्यात आले. हिटलर लाही रोमेलच्या सहभागाविषयी खात्री पटताच त्याच्या शिक्षे विषयी विचार सुरु झाला . ज . गुदेरियन आणि रुद्स्तेद यानी त्यास कांगारू कोर्ट मध्ये आणून कारवाई करावी असे सुचवले . ( हे कोर्ट म्हणजे कायम आरोपीस मृत्यू दंड देण्याच्या पक्षात असे. कारवाई म्हणजे नुसता देखावा असे ) . मात्र रोमेल हा इतरांसारखा एक सर्व सामान्य सेनानी नव्हता . तो लोकप्रिय होता . तोच देशद्रोही म्हणून पुढे आला तर बंड होईल अशी भीती हिटलर ला वाटत होती . शेवटी फिल्ड मार्शल जनरल कायटेल याने हिटलरची समस्या सोडवली .
१३ - ऑक्टोबर -१९४४ रोजी रोमेल ला हिटलरच्या कार्यालयातून फोन आला की उद्या जनरल बर्गडॉर्फ त्याच्या नवीन नेमणूकीबद्दल चर्चा करायला येत आहे. रोमेल चा मुलगा मँनफ्रेड हा हि सैन्यात विमानभेदी तोफखान्यात होता . तो सकाळी सुट्टी घेऊन घरी ७ वाजता आला तेव्हा रोमेल नाष्टा करत होता . त्याच्या कुटुंबियांना रोमेल वरील हिटलरच्या वधाच्या कटातील सहभागाविषयी लटकत असलेली संशयाची सुई माहित होती . दुपारी १२ वाजता जनरल बर्गडॉर्फ आणि जनरल मिसेल एका गडद हिरव्या कार मधून आले . त्यावेळी घरात रोमेल , त्याची पत्नी फ्राउ रोमेल , मुलगा मँनफ्रेड आणि रोमेल चा सहायक कॅप्टन अल्डिंगर हे होते. पहिले औपचरिक सलाम झाल्यावर जनरल बर्गडॉर्फ ने रोमेल बरोबर एकटे बोलण्या साठी सांगितले . एकांतात बर्गडॉर्फने रोमेलला त्यावर असलेया आरोपांविषयी आणि मृत्यु दंडा बद्दल सांगितले . त्यास दोन पर्याय देण्यात आले होते . एक तर खटल्यास सामोरे जाणे , किंवा लगेच आत्मघात करून घेणे (बर्गडॉर्फ ने त्याच्या बरोबर साईनाईड आणले होते ) . पहिल्या पर्यायात त्याच्या कुटुंबावरही नंतर सूड उगवला जाईल हे ही बर्गडॉर्फ ने स्पष्ट केले . मात्र आत्मघातास राजी झाल्यास त्याच्या कुटुंबियांना सर्व मान सन्मान व फिल्डमार्शलचे निवृत्तीवेतनही दिले जाईल. हतबल असलेल्या रोमेलने दुसरा पर्याय निवडला . खोलीतून बाहेर आल्यावर तो जिन्याने त्याच्या खोलीत गेला आणि त्याने ववस्तुस्थिती फ्राउ ला त्याच्या पत्नीला , मुलाला सांगितली . रोमेल ने त्याची फिल्ड मार्शल ची BATON घेतली . फ्राऊ आणि मँनफ्रेड ने त्याचा आवडता कोट घालायला मदत केली . अचानक त्याचे पाकीट रोमेल च्या हातास लागले . त्यात १५० मार्क्स होते . त्याने विचारले "Shall I take the money with me?"
अल्दिन्गेर उत्तरला "'That doesn't matter now, Herr Field Marshal," रोमेलने पुन्हा पाकीट खिश्यात ठेवले आणि तो बाहेर घरातून बाहेर पडला …
जनरल बर्गडॉर्फ, जनरल मिसेल, रोमेल यांना घेऊन कार गावाबाहेरच्या निर्जन ठिकाणी थांबली . चालक Doose आणि मिसेल , बर्गडॉर्फ आणि रोमेल ला कार मध्ये सोडून दूर गेले. थोड्यावेळाने बर्गडॉर्फ त्यांना येउन मिळाला आणि ते परत आले. गाडीत त्या महान सेनानीचे कलेवर पडले होते . १० मिनिटांनि त्यांनी फ्राउ रोमेल ला फोन करून रोमेल च्या मृत्यूची बातमी दिली .
जर्मन रेडीओ वरून त्याच्या मृत्यूची अधिकृत घोषणा केली गेली :- Rommel had succumbed to his injuries from the earlier strafing of his staff car.
सरकारी इतमामाने १८ ऑक्टोबरला रोमेलचा अंत्यविधी करण्यात आला . नाझीपक्षाचे सर्व उच्चाधिकारी, लष्करी अधिकारी व जनरल रुनस्टेड खास हिटलरचा प्रतिनिधी म्हणून उपस्थित होता.
शत्रुकडून हि सन्मान मिळावा अश्या फार थोड्या सेनानिपैकी एक म्हणून रोमेल ओळखला जातो .
"We have a very daring and skillful opponent against us, and, may I say across the havoc of war, a great general."
-Winston Churchill
कौस्तुभ पोंक्षे

इतिहासआस्वाद

प्रतिक्रिया

कपिलमुनी's picture

14 Oct 2021 - 9:23 pm | कपिलमुनी

नाविन्याचा अभाव असलेला त्रोटक लेख

Rajesh188's picture

15 Oct 2021 - 9:24 pm | Rajesh188

जर्मनी किंवा त्याच वृत्तीच्या जगातील देशांनी फक्त स्वतःची रक्त पिपासू वृत्ती क्षमवण्यासाठी रक्त पात घडवून आणला विनाकारण अनेक देशांवर हल्ले केले.
मग ह्यांचे सैनिक हे देशासाठी लढले, त्यांच्या जन्म भुमिसाठे लढले असे बिलकुल म्हणतात येणार नाही.
राक्षस होते हे सर्व हे तळमळत मेले हे चांगलेच झाले.

रोमेल चा शेवट काय झाला हे माहिती नव्हतं... या लेखामुळे कळलं धन्यवाद.

पराग१२२६३'s picture

17 Oct 2021 - 5:00 pm | पराग१२२६३

छान माहिती.

रामदास२९'s picture

28 Oct 2021 - 4:38 pm | रामदास२९

छान माहिती आणि सन्कलन ... अशा रोचक विषयान्सारखी ..दुसर महायुध्द किन्वा जागतिक ईतिहासाची एखादी series चालु करता येईल ..

चौथा कोनाडा's picture

28 Oct 2021 - 5:30 pm | चौथा कोनाडा

चांगला लेख. रोमेल मोठा विषय असल्यामुळे लेखन जरा त्रोटकच वाटले.
लेख मोठा करून आणखी रोचक करता आला असता.