अवघाचि संसार-हिंदळे

राजेंद्र मेहेंदळे's picture
राजेंद्र मेहेंदळे in जनातलं, मनातलं
11 Oct 2021 - 6:52 pm

अहो ऐकलंत का?
नुकतीच घरच्या देवाची पूजाअर्चा करून , ग्राम दैवत असलेल्या कालभैरवाच्या देवळात जाण्यासाठी तयार होत असलेल्या हरभटांना पत्नी भागीरथी बाइंची हाक कानी आली.नुकते कुठे झुंजू मुंजु झाले होते. सगळीकडे शांतता होती. नाही म्हणायला गोठयातल्या गायींच्या गळ्यातील बारीक घुंगरांचा, विहिरीवरील पाणी शेंदायचा, कोंबडा आरवल्याचा, रस्त्यावरून जाणाऱ्या एखाद्या बैल गाडीच्या चाकांचा ,असे काही परिचित आवाज येत होते. पण हिंदळ्यासारख्या गावंढ्या गावात असून असून वर्दळ ती कितीशी असणार? कोकणातल्या कोणत्याही गावासारखे एक साधे सुधे गाव. समुद्र किनारा थोडका लांबच , त्या पेक्षा खाडी जवळ. तेल मीठ मिरची गावात मिळे पण जास्तीचे धान्य, मसाले किंवा कापड चोपड वगैरे घ्यायचे झाले तर एक तर तरीने खाडी पार करून मिठबावला जावे लागे आणि पुढे बैल गाडी करून रस्ता मार्गे देवगड किंवा दुसरा मार्ग म्हणजे राजापूर गाठावे लागे. गावातील कोणत्याच जुन्या माणसाने आपल्या आयुष्यात देवरुख किंवा रत्नागिरी पर्यन्त तरी मजल मारली होती की नाही कोण जाणे. तशी कधी गरजच पडली नव्हती. हा !! एक दोन शहाणे सुरते तिथपर्यंत गेले होते, पण मग तिथल्या वातावरणाला भुलून म्हणा किंवा काही असेल, ते काही पुन्हा हिंदळ्यात परतले नाहीत. अजून काही तैल बुद्धीचे लोक तर म्हणे तिथून पुढे आग बोटीने अलिबाग,मुंबई पर्यंत सुद्धा जाऊन तिथे स्थायिक झाले होते. पण गावाच्या दृष्टीने ते मेल्यातच जमा होते. कारण जिथे त्यांचे चुलते पुतणेच त्यांच्या संपर्कात नाहीत तिथे बाकीच्यांना काय थांग पत्ता लागणार हो?

तर मूळ गोष्टीकडे वळुया. हरभट हातातले काम सोडून पत्नी काय म्हणतेय ते बघायला स्वयंपाक घरात डोकावले.भागीरथी बाई नेहमीप्रमाणे सोवळे नेसून स्वयंपाक करण्यात मग्न होत्या . हरभट उंबऱ्यापर्यंत आले आहेत म्हटल्यावर त्या हातातले काम बाजूला ठेवून गुडघ्यावर हात ठेवून उठल्या. हल्लीच ही गुडघे दुखी त्यांच्या मागे लागली होती. अन्यथा वर्षानुवर्षे भागीरथी बाई पहाटे पासून ते अंधार पडेपर्यंत घरभर, अंगणात,परसात,गोठ्यात, बागेत सतत कामात असायच्या. तशा मदतीला त्यांच्या २ मुली सुद्धा होत्याच म्हणा , शिवाय गावातल्या एक दोन कुणबिणी दिवसभर कामाला यायच्या. पण ३ वर्षा पूर्वी त्यांच्या मोठ्या मुलीचे , सरस्वतीचे किंजवड्याच्या नाना किंजवडेकरांच्या थोरल्या मुलाशी लग्न झाले होते आणि गेल्या वर्षी धाकट्या कावेरीला हरकूळच्या गोगट्यांकडे दिली होती. तेव्हापासून त्यांना आपले दोन हातच कोणीतरी काढून नेल्यासारखे वाटत. कदाचित त्यामुळे किंवा वयाचा परिणाम असेल, त्यांची हालचाल जरा मंदावली होती आणि त्यातच गुढघे दुखी सुरु झाली होती.

तर भागीरथीबाई हरभटांजवळ जाऊन म्हणाल्या "बरं का? कावेरीला मूळ धाडले पाहिजे. श्रावण आला , मंगळागौर आहे,पहिल्या वर्षाचे सणवार आहेत, शिवाय एक-दोन महिन्यात सरस्वतीला पहिल्या बाळंतपणासाठी माहेरी आणायला पाहिजे" आणि असे काय काय . हरभट विचारात पडले. मुलीला बोलावणे पाठवणे काही कठीण नव्हते. मोठीचे बाळंतपणही केलेच पाहिजे. पण मुलीच्या सासरी जायचे म्हणजे काय हात हलवत जाणार?बैलगाडी पाहिजे, काहीतरी आहेर नेला पाहिजे. मुलीला पाठवणी करताना साडी चोळी काही दागिना द्यायला हवा. म्हणजे पैशाची जुळवा जुळव करायला हवी. दोन्ही मुलींच्या लग्नात घेतलेली कर्जे अजून फिटत आहेत. एकुलता एक मुलगा रामचंद्र शिकत आहे. थोडकी शेतीवाडी आहे,गायी आहेत, पण त्या सांभाळल्या पाहिजेत.सगळे आत्ताच संपवले तर म्हातार पणाची सोया काय? एक ना अनेक.
तेव्हढ्यात बाहेरून त्र्यंबक शास्त्री जोशींची हाक ऐकू आली "हरभट ओ हरभट , काय येताय लघुरुद्राला कि जाऊ मी पुढे?" आणि हरभट भानावर आले. "बघतो काहीतरी " असे स्वतःशीच पुटपुटत ते लगबगीने बाहेर पडले.

श्रावणाचे दिवस होते, हलका पाऊस पडून गेला होता, पण रस्ता स्वच्छ होता. रस्त्याने जात असताना हरभट घरी झालेल्या संवादाबद्दलच विचार करीत चालले होते.बघता बघत काळभैरवाचे देऊळ आले. हिंदळ्याचे ग्राम दैवत म्हणजे कालभैरव. गावात तशी इतरही मंदिरे होती पण मुख्य महत्व कालभैरवाला. श्रावणी सोमवार असल्याने देवळात लघुरुद्राचे आयोजन केले होते. त्यामुळे गावातली आणि काही आसपासचीही मंडळी देवळात जमली होती. मुख्य पूजा झाली आणि सर्वजण एक सुरात म्हणू लागले "हरी ओम , ईडादेवहुर्मणूर्यज्ञनीर". त्या मंत्रघोषात हरभट आपल्या मनातील चिंता काहीवेळ विसरले. धीर गंभीर स्वर गाभाऱ्यात घुमत घुमत दगडी छतावरील झरोक्यांमधून बाहेर पाझरू लागले. देवळाच्या गुरवाने पाण्याचे हंडे भरून ठेवले होतेच.अभिषेक पात्रातील पाणी संपत आले की कोणीतरी लगबगीने उठून त्यात पुन्हा पाणी ओतत असे, जेणेकरून शिवलिंगावरचा अभिषेक थांबू नये.इकडे पावसाची सर पुन्हा आली होती आणि बाहेरचे वातावरण पावसाच्या धारांनी आतल्या सारखेच धीर गंभीर झाले होते.
अकरा ब्राम्हणांनी अकरा वेळा म्हणून लघुरुद्र संपला. आरती, प्रसाद वगैरे होऊन सर्वजण घरी निघाले तोवर दुपार होऊन गेली होती. रस्त्याने चालत असताना त्र्यंबक शास्त्री हरभटांना विचारू लागले "काय हरभट? आज जरा चिंतेत दिसताय? काय विशेष?" आणि हरभटांच्या मनातील विचारांना वाचा फुटली.

आता त्र्यंबक शास्त्री आणि हरभट म्हणजे जवळपास एकाच वयाचे, एकमेकांच्या घरची सगळी परिस्थिती माहिती असलेले. हरभट मोकळेपणी सांगू लागले. "त्र्यंबक शास्त्री, तुम्हाला तर माहितीच आहे की दोन मुलींच्या लग्नात काढलेली कर्जे मी अजून फेडतोय. मुलगा अजून हाताशी आलेला नाही.त्यात पहिलीचे बाळंतपण आणि दुसरीचे सणवार तोंडावर आले आहेत. आता हे सगळे पार पडायचे म्हणजे पैशाची व्यवस्था करायला हवी. तोच विचार करतो आहे सकाळपासून"

आता पैशाने म्हटले तर सगळेच फाटके.उघड्या शेजारी नागडा गेला अशी परिस्थिती. कोण कोणाला मदत करणार? तरीहि त्र्यंबक शास्त्री म्हणाले "हरभट ,माझ्या मनात एक कल्पना आली.असे बघा, तुमची ती सड्यावरची जमीन तशीही मोकळीच पडून आहे. ना ती कोणी कसत ,ना तिथे काही उगवत. माझ्या ओळखीचा एक व्यापारी आहे . तो काहीतरी औषधी वनस्पतींचा व्यापार करतो. तिकडे जी हिरडा ,बेहडा, बेल, अडुळसा अशी पूर्वापार झाडे आहेत ती त्याच्या उपयोगी पडतील असे वाटते. तुम्ही म्हणत असाल तर त्याच्याशी बोलून बघतो." हरभट विचारात पडले. पण दुसरा काही उपायही दिसत नव्हता. घराशी आल्यावर ते क्षणभर थांबले आणि त्र्यंबक शास्त्रीना म्हणाले "बोला तुम्ही त्या व्यापाऱ्यांशी. बघू किती किंमत देताहेत."

त्र्यंबक शास्त्रीना निरोप देऊन हरभट घरी येऊन झोपाळ्यावर टेकले. दुपारच्या गारव्यात त्यांना अंमळ डुलकी लागली. हळूहळू तुरियावस्थेत जाताना हरभट मनानेच सड्यावर पोचले. लहानग्या रामला खांद्यावर घेऊन खाडीच्या काठाकाठाने ते सड्यावर जाऊ लागले. वडिलांसाठी बेलफळे, आईसाठी हिरडा बेहडा,बायकोसाठी आवळे असा काय काय रानमेवा मिळतोय याकडे त्यांचे लक्ष होते. तर रामला बोरे, करवंदे,जांभळे असे काही मिळण्याची आशा होती. रस्ता चढाचा होता, शिवाय गचपणातून मुंगसे,साप,सरडे कदाचित घोरपड असे काही निघण्याचीही शक्यता होतीच. लहानग्या रामाने अचानक विचारले "बाबा , आपण या दिवाळीला घोडा विकत घ्यायचा का?" अनपेक्षित पणे आलेल्या प्रश्नाने हरभट दचकले. त्यांनी रामाला विचारले "का रे बाबा? तू कोणाकडे पाहिलास घोडा ?" राम म्हणाला "ते ताईकडचे गोगट्यांचे नातेवाईक नाही का देवगडहून आले होते घोड्यावरून?" हरभट निरुत्तर झाले.
ते रामला म्हणाले "अरे ते श्रीमंत आहेत, घोडा पाळणे आपल्या सारख्या गरीबांचे काम थोडेच आहे?
तू मोठा होऊन खूप शिक, मेहनत कर,श्रीमंत हो आणि मग घे घोडा" आणि मग रामचे ते स्वप्नच बनले.

तसा तो मुलगा एकपाठी होताच, वेदपाठशाळेतील सगळे शिक्षण त्याने बघता बघता पुरे केले. आता पुढचे शिक्षण घ्यायचे तर त्याला एखाद्या मोठ्या तालुक्याच्या गावी पाठवणे भाग होते. पण बारा वर्षाच्या मुलाला एकट्याला कुठेतरी लांब पाठवायला भागीरथी बाई तयार होईनात. आणि रामचा पुढे शिकायचं हट्ट थांबेना. शेवटी काहीतरी मध्यम मार्ग काढावा म्हणून हरभटांनी रामला जांभूळपाड्याला वेदपाठशाळेत घातले. कारण पनवेल जवळचे हे गाव नुसतेच मोठे नव्हते तर चिंतुभट बोडस गुरुजींची उत्तम वेदपाठशाळा तिथे होती. शिवाय ते भागीरथी बाईंचे लांबचे मामा होते ते राम वर उत्तम लक्ष ठेवू शकले असते. तेव्हा सर्वानुमते हे मान्य होऊन रामची रवानगी जांभूळपाड्याला झाली.(क्रमश:)

मांडणीप्रकटनविचार

प्रतिक्रिया

भागो's picture

11 Oct 2021 - 7:20 pm | भागो

फारच छान लिहिले आहे. जुन्या आठवणी जाग्या झाल्या . आता पुढचे भाग लवकर लवकर टाका .

गॉडजिला's picture

11 Oct 2021 - 8:16 pm | गॉडजिला

पुढील भाग जरा मोठा येऊदे.

अथांग आकाश's picture

11 Oct 2021 - 9:49 pm | अथांग आकाश

सुरेख सुरुवात!
1

सोत्रि's picture

12 Oct 2021 - 5:47 am | सोत्रि

सुरूवात मस्तच झाली आहे.

पुभाप्र…

- (संसारी) सोकाजी

नचिकेत जवखेडकर's picture

12 Oct 2021 - 9:40 am | नचिकेत जवखेडकर

खूप छान. पुभाप्र

सौंदाळा's picture

12 Oct 2021 - 9:58 am | सौंदाळा

हे राहुनच गेले होते.
खूपच सुंदर आणि जिवंत वर्णन. पुभाप्र

राजेंद्र मेहेंदळे's picture

12 Oct 2021 - 12:39 pm | राजेंद्र मेहेंदळे

सर्व वाचकांचे धन्यवाद--पुढील भाग टंकायला वेळ लागतोय, पहीला भाग लिहुन तयार होता, म्हणुन प्रकाशित केला. तरी प्रयत्न करतो दुसरा भाग लवकर टाकायचा.

टर्मीनेटर's picture

12 Oct 2021 - 1:10 pm | टर्मीनेटर

चांगली सुरवात 👍
पुढील लेखनास शुभेच्छा!

प्रचेतस's picture

12 Oct 2021 - 1:36 pm | प्रचेतस

सुरेख सुरुवात. कोकणातील वातावरण उत्तम रेखाटलंय.
पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.

यश राज's picture

12 Oct 2021 - 2:28 pm | यश राज

पु.भा.प्र.

शेर भाई's picture

12 Oct 2021 - 2:53 pm | शेर भाई

पण हिंदळेच का?? तुमचे गाव आहे का ??

तुषार काळभोर's picture

12 Oct 2021 - 3:27 pm | तुषार काळभोर

अरे वा!
पुढील भागाच्या प्रतिक्षेत..

पाषाणभेद's picture

12 Oct 2021 - 10:12 pm | पाषाणभेद

वाचतोय. पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

सॅगी's picture

13 Oct 2021 - 2:43 pm | सॅगी

हयसर सगळे वाट बघतसत नवीन भागाची..वायंच लवकर येऊ द्या...

=)

सुरिया's picture

13 Oct 2021 - 4:14 pm | सुरिया

सुरेखच लिहिता हो तुम्ही मेहंदळे.
आवडले बरका.

जेपी's picture

13 Oct 2021 - 6:24 pm | जेपी

मस्तच...
पूभा प्र

सुचिता१'s picture

13 Oct 2021 - 11:38 pm | सुचिता१

छान लिहिले आहे, पुभाप्र!!!
पुढचा भाग लवकर येऊ द्या.

अभिजीत अवलिया's picture

14 Oct 2021 - 6:11 am | अभिजीत अवलिया

छान लिहिले आहे.

चौथा कोनाडा's picture

19 Oct 2021 - 5:47 pm | चौथा कोनाडा

भारी लिहिलंय !
सुंदर सुरुवात. कोकणातील वातावरण खुप छान चितारलंय.

💖

@मिपा साहित्य संपादक,
ही लेखमाला मिपा दिवाळी अंक-२०२१ मध्ये ( प्रचि, स्थानचित्रं, रेखाचित्रांसहीत) प्रकाशित करण्याजोगी आहे.

माझ्या सुचवणीचा गंभीरपणे विचार करावा ही नम्र विनंती !

कथामालेची सुरुवात अत्यंत उत्कंठावर्धक झालेली आहे. या पहिल्या भागातील घटना, वातावरण वगैरेंचा काळ साधारणपणे कोणता मानावा ?

राजेंद्र मेहेंदळे's picture

16 Nov 2021 - 11:49 am | राजेंद्र मेहेंदळे

साधारण १८५० पासुन कथा चालु झालीये. ती २०१५ पर्यंत जाईल.