विजय तेंडुलकरांच्या समग्र साहित्याचा आढावा घेणाऱ्या ‘अ-जून तेंडुलकर’ या पुस्तकाचा वाचकांना यापूर्वी इथे परिचय करून दिला आहे. त्या पुस्तकात सुमारे पंचवीस नामवंतांनी तेंडुलकरांच्या विपुल साहित्याचा परामर्श घेतला आहे. ‘तें’नी हाताळलेल्या अनेक साहित्यप्रकारांपैकी त्यांचे सदरलेखन हा एक महत्त्वाचा भाग आहे. त्या प्रकारच्या लेखनाचा मी चाहता आहे. अशा लेखनापैकी ‘कोवळी उन्हे’ हे पुस्तक माझे भलतेच आवडते आहे. याच धर्तीवर ‘तें’चे अजून एक पुस्तक म्हणजे ‘रातराणी’. त्या पुस्तकाचा ‘अ-जून तेंडुलकर’ मध्ये कौतुकाने केलेला उल्लेख आढळला. “एका विलक्षण उंचीवर गेलेले सदरलेखन”, असे त्याचे वर्णन अन्यत्र दिलीप माजगावकर यांच्या एका लेखात वाचले होते. आता कुतूहल चाळवले गेले. बुकगंगावर नजर टाकता रातराणी उपलब्ध दिसले. या पुस्तकाच्या निमित्ताने मी आयुष्यातील पहिलीवहिली ऑनलाईन पुस्तक खरेदी केली. यथावकाश पुस्तक घरपोच आले.
ते चाळून पाहिले मात्र आणि प्रथमदर्शनी काहीसा खट्टू झालो. या पुस्तकातले सर्व लेख नाट्य-चित्रपट, सर्कस किंवा सभा अशा सांस्कृतिक कार्यक्रमांवर आधारित आहेत. माझ्या मनात लगेचच त्याची तुलना ‘कोवळी उन्हे’शी झाली, ज्यामध्ये तुमच्या आमच्या रोजच्या जीवनातील प्रसंगांवर तेंडुलकरांनी खेळकरपणे व विलक्षण ताकदीने लिहिले आहे. त्यामुळे त्यातले कित्येक लेख पन्नास वर्षे उलटून गेल्यावर आजही ताजे वाटतात. रातराणी मात्र पूर्णपणे विविध कलाप्रकारांना वाहिलेले आहे. मग त्यातले दोन-तीन लेख वाचले तेव्हा एक गोष्ट लक्षात आली. जरी त्यातल्या कलाकृती या आता अर्धशतकाहून अधिक जुन्या झालेल्या असल्या तरी तेंडुलकरांचे त्यावरील मार्मिक भाष्य आजही वाचनीय आहे. त्यांच्या मर्मभेदी व मिश्कील लेखनाची चव आपण त्यातून व्यवस्थित घेऊ शकतो. या लेखाद्वारे रातराणीतील काही निवडक लेखांचा परिचय करून देतो.
प्रथम या पुस्तकाची पार्श्वभूमी पाहू. हे लेख सर्वप्रथम 1967- 68 दरम्यान ‘माणूस’ साप्ताहिकात सदरलेखन स्वरूपात प्रकाशित झाले होते. पुढे 1972मध्ये त्याचे पुस्तक निघाले. सध्या त्याची चौथी आवृत्ती बाजारात आहे. यातील बहुतेक लेख हे तत्कालीन देशी-विदेशी नाटके, चित्रपट, अन्य सांस्कृतिक कार्यक्रम आणि काही दिग्गज कलाकारांवर आधारित आहेत.
एकूण 29 लेखांपैकी मला भावलेले सहा लेख हे आहेत :
1. सॅम्युएल बेकेट : कम अँड गो
2. एवम इंद्रजित
3. ग्रँड प्रि
4. सारा आकाश
5. सगिना महातो
6. नाटककाराच्या शोधात सहा पात्रे
यापैकी क्र. १ चे ‘कम अँड गो’ वाचल्यावर मी विलक्षण प्रभावित झालो. मग ते ‘नाटक’ जालावर जाऊन वाचले, युट्युबवर पाहिले आणि मग त्यावर स्वतंत्र लेख इथे लिहिला. किंबहुना हा एकच लेख वाचल्यावर मला पुस्तक वसूल झाल्याची भावना झाली !
प्रस्तुत लेखात उरलेल्या पाच लेखांचा आढावा घेतो.
• एवम् इंद्रजित
हे मूळ बंगाली नाटक बादल सरकारांचे. त्याच्या हिंदी आवृत्तीच्या प्रयोगावर हा लेख आहे. बुद्धिजीवी मध्यमवर्गीयांच्या आयुष्याची झालेली गोची हा नाटकाचा गाभा. एक मध्यमवर्गीय लेखक व त्याच्या कल्पनेतील इंद्रजित हाही एक मध्यमवर्गीय माणूस ही त्यातली महत्त्वाची पात्रे. या लेखकाला सत्याचा शोध वगैरे घेणारे नाटक लिहायचे आहे. त्या कल्पनेतून एक इंद्रजित निर्माण होतो. इंद्रजितला चाकोरी तोडून जगू पाहणारे मन आहे. तो आयुष्यात खूप भराऱ्या मारू पाहतो पण अपयशी ठरतो. अखेर त्याला जाणवते, की चाकोरीतच मुर्दाडपणे जगत राहणे हीच आपली इतिकर्तव्यता आहे. लेखकाचीही तीच गत होते. लेखक त्याला हवे तसे चाकोरी तोडू पाहणारे नाटक लिहिण्याचा खूप प्रयत्न करतो पण शेवटी तोही परंपरेलाच शरण जातो. अशा तऱ्हेने लेखक व इंद्रजित या दोघांच्या चिरडून जाणाऱ्या आकांक्षांचे हे नाटक आहे. मध्यमवर्गाचे अनुभवविश्व आणि नियतीपुढे पत्करावी लागलेली हार हा त्याचा सारांश म्हणता येईल.
• ग्रँड प्रि
याच नावाच्या एका इंग्रजी चित्रपटाचे हे परीक्षण आहे. युरोपातील मोटार शर्यतींच्या जगाचे थरारक चित्रण त्यात केलेले आहे. केवळ शर्यतीचे विश्वच नाही तर बाकी जगाचे आणि जीवनाचेही चित्रण त्यात जबरदस्त तांत्रिक करामतीनी सादर केले आहे. ४ शर्यतबाजांच्या आयुष्याची कथा त्यात येते. प्राणांची बाजी लावूनच ते शर्यत खेळत असतात. त्यातला कोणी कधी जिंकतो, कोणी त्यातील अपघातात पांगळा होतो, कोणी मरतो तर कोणी पांगळ्या स्थितीतही पुढची शर्यत जिंकतो. याच्या जोडीला त्यांच्या आयुष्यात आलेल्या चंचल स्त्रियाही आहेत.
आयुष्य हा पोरखेळ नसून ती रणभूमी आहे आणि जीवाची बाजी लावून लढणाऱ्यालाच मर्द म्हणतात हा संदेश यातून मिळतो. चित्रपटात शर्यतींच्या मोटारींचा कारखानदार यामुरा हे पात्र आहे. ही भूमिका एका जपानी नटाने साकारली आहे. तो शर्यतीच्या मैदानावर येतो तो जपानी दुभाषा घेऊन. मग पत्रकार त्याच्याभोवती गर्दी करतात. दुभाषाद्वारे त्यांचा यामुराशी संवाद होतो. पुढे चित्रपटाचा नायक यामुराला घरी आमंत्रण देतो तेव्हा दुभाषा हजर नसतो. यामुरा नायकाशी फाडफाड इंग्रजी बोलू लागतो ! त्यावर नायक आश्चर्याने विचारतो,
“तुम्हाला इंग्रजी येते ?”
तत्काळ यामुरा म्हणतो,
“येस, बट नॉट फॉर द प्रेस ! पत्रकारांसाठी माझे इंग्रजी नाही, ते फक्त व्यवहारासाठी आहे !”
या छोट्या प्रसंगात दाखवलेला जपानी माणसाचा पिंड अप्रतिम उतरला आहे. सार्वजनिक ठिकाणी तो आपल्या मातृभाषेचाच अभिमान बाळगतो. ‘अशा छोट्या प्रसंगातूनही परदेशी चित्रपट जी काही ग्यानबाची मेख मारून जातात, ती आपल्याला अख्ख्या चित्रपटातूनही का जमत नाही ?” असा प्रश्न उपस्थित करुन तें हा लेख संपवतात.
• सारा आकाश
हा आहे एका विशीतल्या तरुणाविषयीचा चित्रपट. क्रांतिकारकांचा आदर्श ठेवणारा हा तरुण देशभक्तीने झपाटलाय. तो सतत बेचैन असतो. त्याच्या घरच्यांना वाटते की हा वाया जाणार. म्हणून ते त्याची संमती न घेताच त्याचे लग्न ठरवून टाकतात. आता त्याची घुसमट होते. अत्यंत नाईलाजाने तो लग्नाला उभा राहतो. ते थाटात पार पडते. पुढे मात्र तो आपला राग बाहेर काढतो. लग्न होऊनही तो ब्रह्मचारी राहायचे ठरवतो. मुळात त्याला स्त्री-पुरुष संबंध ही कल्पनाच घाणेरडी व पशुतुल्य भासते. तो संसारातून पळून जाऊ पाहतो पण जमत नाही. मग कुढत जगत राहतो. लैंगिक जीवनाबद्दलचे घोर अज्ञान वा अर्धवट ज्ञान या मुद्याभोवती हा चित्रपट केंद्रित झालाय. या महत्त्वाच्या विषयाचे रीतसर शिक्षण द्यायला समाज का तयार नाही, हा प्रश्न त्यातून उपस्थित होतो ( आज 55 वर्षानंतर तरी काय स्थिती आहे ?) प्रौढत्व येउनही अजाण राहिलेल्या मनोव्यथाना हा चित्रपट कलात्मक रूप देतो. कथेत फारसे नाट्य नसले तरीही दिग्दर्शक बासू चटर्जी यांनी त्याचे सोने केले आहे. दृश्यभाषेवरची त्यांची हुकूमत लाजवाब आहे. चित्रपटाचा परिचय करून दिल्यानंतर तेंडुलकर आपल्याला चांगल्या कलाकृतीची व्याख्या सांगतात.
‘जी कलाकृती पाहताना आपल्याला घरी घेऊन जावीशी वाटते ती छान कलाकृती !”
• सगिना महातो
१९४२ चे वातावरण असलेला हा बंगाली चित्रपट. दिग्दर्शक तपन सिन्हा आणि प्रमुख भूमिकेत दिलीपकुमार. जोडीला सायराबानू. चित्रपट घडतो आसामात. अनाथ असलेला सगिना रेल्वेमजूर आहे. त्याला दारूचे व्यसन. अन्यायाविरुद्ध उसळणारा व गोऱ्या साहेबाला अजिबात न भिणारा हा इसम. या मजुरांची संघटना करायचे कम्युनिस्ट पक्ष ठरवतो. त्यासाठी सगिनाला हाताशी धरले जाते. नेते त्याला हरभर्याच्या झाडावर चढवतात. अखेर तो कामगार नेता होतो. तशातच एका मजूर बाईवर तिथला मॅनेजर बलात्कार करतो. मजूर खवळतात व संपावर जातात. वाटाघाटींसाठी गोरा साहेब येतो. चर्चेदरम्यान एक मजूर कल्याण अधिकारी नेमण्याची अट मान्य होते. अर्थातच ही माळ सगिनाच्या गळ्यात पडते. तो ही जबाबदारी स्वीकारण्यास नाखूष असतो कारण मुळात तो अंगठाबहाद्दर. हे असलं काही लचांड नको असे तो सांगून पाहतो. पण कोणी त्याचे ऐकत नाही. शेवटी त्याला अधिकारी बनवले जाते. त्याचे काम सांभाळण्यासाठी पक्षाची एक निष्ठावंत सेक्रेटरी बाई दिमतीला असते. तो अधिकारी झाला तरी पूर्वीप्रमाणे मजुरांच्यातच वावरतो. त्यांना मेजवानी देतो. हे पाहून पुढारी त्याचा बुद्धिभेद करतात व त्याने मजुरांपासून अंतर ठेवून रुबाबात राहिले पाहिजे असे सांगतात.
काही दिवसात त्याला या कोंडलेल्या आयुष्याचा कंटाळा येतो. तो पुन्हा मजुरी करायची असे म्हणतो. पण पुढारी त्याला परावृत्त करतात आणि डोके लढवून पक्षकार्याच्या अभ्यासासाठी कलकत्त्याला पाठवतात. तिथे त्याला रुक्ष गोष्टींमध्ये अडकवून त्याच्यातला रांगडा आत्मविश्वास खच्ची करतात. नंतर तो इथेही घुसमटतो. तिरीमिरीत आसामला पुन्हा परततो. तिथल्या टेकड्यांमध्ये तो पोचतोय तोच तिथले मजूर त्याच्याकडे संशयाने पाहू लागतात. त्याचा तिरस्कार करतात. सगिना चक्रावतो. हे असे कसे झाले हे त्याला जरा उशिराच समजते. मजुरांपासून त्याला तोडण्याची पुढाऱ्यांची ही कुटिल नीती असते. यापुढे चित्रपटाला खास फिल्मी कलाटणी देऊन त्याची सुखांतिका केली आहे.
हा चित्रपट निव्वळ कम्युनिस्टविरोधी नाही. तो तमाम स्वार्थी निष्ठुर राजकीय यंत्रणांच्याविरुद्ध आहे. लालबावटा संस्कृतीचे विदारक चित्रण करणाऱ्या या चित्रपटाचा परिचय करून दिल्यावर तेंडुलकर आपल्यापुढे एक प्रश्न ठेवतात :
‘आजच्या मराठी चित्रपटात खऱ्या अर्थाने ‘आज’चा विषय कधीतरी येईल का ?’
या प्रश्नाने अंतर्मुख झालो खरा. क्षणभर डोळे मिटल्यानंतर माझ्या नजरेसमोर तेव्हाच्या दशकांतील मराठी चित्रपटातला ठोकळेबाज, ‘बाईंना वाड्यावर बोलावून घ्या’, म्हणणारा गावचा पाटील तरळून गेला.
• नाटककाराच्या शोधात सहा पात्रे
या लेखाची सुरुवातच “पडदा वर जातच नाही कारण तो मुळात पडलेलाच नसतो” या गूढ वाक्यांनी होते. त्यातून आपल्याला हे काहीतरी जीवनविषयक भाष्य आहे याची झलक मिळते. अशा एका वेगळ्याच नाटकावर आधारित हा लेख आहे. प्रेक्षक रंगमंदिरात येऊन बसतात तेव्हा त्यांना उघड्या मंचावर काही अडगळ पडलेली दिसते. नाटक सुरू होते तेव्हा मंचावर दोन व्यक्ती दिसतात. त्यातला एक रंधा मारणारा सुतार असतो तर दुसरा त्याचा व्यवस्थापक. आता एकदम प्रेक्षकांच्यातूनच आठ-दहा स्त्री-पुरुष उठतात आणि बडबडत पुढे होऊन मंचावर जाऊन पोहोचतात. आता प्रेक्षकांना कळते की या लोकांची नाटकाची तालीम होणार आहे. पण अद्याप नाटकाचे दिग्दर्शक व नायिका तेथे पोहोचलेले नसतात. जरा उशीरानेच या दोन व्यक्तीही प्रेक्षकांमधूनच उठून मंचावर जातात. नंतर एक भलतेच घडते. एक वयस्क बाई, तरुण-तरुणीची जोडी आणि दोन पोरे अशी ‘पात्रे’ काळोखातून रंगमंचाशी पोचतात. ही सहा जण माणसं नसून ‘जिवंत पिशाच्चे’ असतात.
ही पात्रे मंचावरील दिग्दर्शकाशी बोलू लागतात, हुज्जत घालतात. तेव्हा मंचावर खरी नाटकमंडळी स्तब्ध बसून राहतात. दिग्दर्शक या पात्रांना प्रथम उडवून लावतो पण नंतर त्यांचे ऐकून घ्यायला तयार होतो. त्या पात्रांचे म्हणणे असते की आमच्या भयंकर व्यथांना घेऊन कोणीतरी एक नाटक तयार करावे. दिग्दर्शक ते नाईलाजाने ऐकतो. मग खरी नाटकमंडळी पुन्हा प्रेक्षकात येतात. दिग्दर्शक कधी तटस्थ प्रेक्षक होतो तर कधी दिग्दर्शन करतो तर कधी शंका विचारत असतो. त्याला हवे असते एक मसालेदार नाटक तर पात्रांना हवा असतो त्यांच्या भयंकर व्यथांना व त्यांच्या अस्तित्वाला खराखुरा अर्थ देणारे नाटक. रंगमंचावर दिग्दर्शक विरुद्ध ती सहा पात्रे यांच्या रस्सीखेचात एक नाट्य आकार घेते. मग दिग्दर्शक पुन्हा नाटकमंडळींना ते सादर करण्यासाठी मंचावर बोलावतो. पुन्हा काही वेळाने ती सर्व मंडळी प्रेक्षकात जातात....
हे वाचता वाचता आपण मात्र भंजाळून जातो खरे !
थोडक्यात हे नाटक म्हणजे सत्य -भासाचा सुन्न करून टाकणारा नाट्यानुभव आहे. हे मूळ नाटक लुगी पिरांदेलो या इटालियन लेखकाचे असून माधव वाटवे यांनी त्याचा अनुवाद व दिग्दर्शन केले होते. रंगमंदिरात प्रेक्षकांनाही नाटकात सामावून घेणारा असा हा प्रत्यक्ष अनुभवण्याचा वेगळा प्रयोग आहे.
अशा अनेक कलाकृतींच्या संदर्भातील लेखांनी हे छोटेखानी पुस्तक सजले आहे. अन्य काही लेखांमधून बाबा आमटे, आचार्य रजनीश, विजया मेहता इत्यादी मान्यवरांची व्यक्तिचित्रे रेखाटली आहेत. रुचिपालट म्हणून एका लेखात सर्कशीचे सुंदर वर्णन आहे. सर्वच लेख आजच्या वाचकांना भावतील असे नाही. या रातराणीद्वारे १९६०-६५ च्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाचा सुरेख धांडोळा ‘तें’नी घेतला आहे. त्यातून सध्याच्या ज्येष्ठ पिढीचे मनोज्ञ स्मरणरंजन होऊ शकते.
या पुस्तकाचा अजून एक गुणविशेष सांगितल्याशिवाय हा परिचय अपूर्णच राहील. तेंडुलकरांनी त्यांचे हे पुस्तक त्यांचे मराठीचे शिक्षक विष्णू विनायक बोकील यांना अर्पण केलेले आहे. तेंडुलकरांची शैक्षणिक पार्श्वभूमी लक्षात घेतली तर या घटनेचे महत्त्व अधोरेखित होईल. रूढार्थाने फक्त दहावी पास एवढेच औपचारिक शिक्षण असलेला हा गृहस्थ पुढील आयुष्यात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचा नाटककार आणि साहित्यिक झाला. ज्या मराठी लेखनाच्या बळावर त्यांना हे यश मिळाले, त्या मायबोलीच्या शालेय शिक्षकाला हे पुस्तक अर्पण करणे ही तें ची अतिशय थोर कृती म्हणावी लागेल.
…………………………………………………………..
रातराणी
राजहंस प्रकाशन
चौथी आवृत्ती, २०१३.
प्रतिक्रिया
28 Sep 2021 - 7:54 pm | Nitin Palkar
तेंडुलकर उर्फ तें च्या लेखनाचा आवाका खूप मोठा होता. या लेखाच्या सुरुवातीलाच तुम्ही अ-जून तेंडुलकरचा उल्लेख केला आहे त्या पुस्तकावर तुम्हीच लिहिलेला लेख लगेच आठवला. तें चे 'कोवळी उन्हे' हे सदर (किंवा त्यातील तुरळक लेख) अतिशय कोवळ्या वयात मटा मध्ये वाचले होते. आजच्या पिढीला तेंडुलकर केवळ 'सखाराम बाईंडर','घाशीराम कोतवाल' किंवा 'शांतता कोर्ट चालू आहे' इतकेच आठवतात.
'देशातील वाढता हिंसाचार' या विषयाच्या अभ्यासासाठी त्यांना १९७३-७४ मध्ये नेहरू शिष्यवृत्ती मिळाली होती. तसेच १९७९ ते ८१ दरम्यान त्यांनी "टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस" या संस्थेत अभ्यागत प्राध्यापक म्हणूनही काम केले. नवनाट्याविषयी आस्था बाळगणार्या संस्था आणि त्यातील कार्यकर्त्यांबद्दल त्यांना जिव्हाळा होता.
विस्मृत किंवा अनवट साहित्याचा परिचय करून देण्याची तुमची हातोटी उत्तमच आहे. हा ही लेख आवडला हे वेगळे सांगणे न लगे.
29 Sep 2021 - 6:32 am | कुमार१
उद्घाटन प्रतिसाद आणि पूरक माहितीबद्दल आभार !
मोजक्या शब्दात मार्मिक प्रतिसाद कसा लिहावा हे तुमच्याकडून शिकण्यासारखे आहे.
तुम्ही दिलेल्या तेंडुलकरांच्या माहितीत अजून थोडीशी भर म्हणजे, ते दूरदर्शन वरील प्रतिष्ठित निर्माता होते.
त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. त्यातील सरस्वती सन्मान हा एक उल्लेखनीय.
28 Sep 2021 - 8:40 pm | सर टोबी
पण सदर चालवण्याचा विषय आहे म्हणून मंगेश तेंडुलकरांची हटकून आठवण झाली. ते पूर्वी मनोहर पक्षिकामध्ये कनाती खालून या नावाचे सदर लिहित असत. त्याच्या साठीचं शिर्षक चित्रं देखिल त्यांनीच तयार केले होते. नाटकाचा पडदा वर करून, खाली वाकून डोकावणारे स्वतः तेंडुलकर असे ते चित्र होते.
28 Sep 2021 - 9:20 pm | Nitin Palkar
मंगेश तेंडुलकरांचं साप्ताहिक जत्रामध्ये नाट्य परीक्षणाचं एक सदर येत असे तेही अतिशय खुमासदार असे....
28 Sep 2021 - 9:47 pm | गॉडजिला
छान कथानक आहे...
पोपटाला बरेचदा पिंजरा तोडता येत नाही हे वास्तव स्वीकारावे लागते व त्यातच झुलने, कोणी पेरु, मिरची टाकली तर पिंजऱ्यातच खाणे त्याचे प्रारब्ध बनून जाते
29 Sep 2021 - 6:33 am | कुमार१
सर,
रोचक पूरक माहितीबद्दल आभार !
गॉजि,
पोपटाची उपमा आवडली. छान.
आभार .
30 Sep 2021 - 7:20 am | सुधीर कांदळकर
जाग्या झाल्या. सारा आकाश आणि नाटककाराच्या शोधात सहा पात्रे या माझ्या राहून गेलेल्या गोष्टी. लेख वाचतांना पार हरवून, हलून गेलो. धन्यवाद.
30 Sep 2021 - 8:50 am | कुमार१
धन्यवाद
इतक्या जुन्या पुस्तकांविषयी लिहिताना मनात जरा धाकधूक असते .आता हे विषय वाचकांना कितपत आवडतील असे वाटत असते.
परंतु असा प्रतिसाद आला की लिहिल्याचे समाधान मिळते
30 Sep 2021 - 8:13 am | ज्ञानोबाचे पैजार
यातला सगिना हा सिनेमा दुरदर्शन वर पाहिला होता. अर्थात त्यातल्या दिलिप कुमारच्या ओव्हर अॅक्टींग मुळे आणि तोंडातल्या तोंडात मारलेल्या ड्व्यायलॉक मुळे अजिबात आवडला नव्हता. कोणत्याही दॄष्टीने तो कामगार वाटला नाही. सायरा बानुच्या अभिनया बद्दल तर न बोललेलेच बरे. के एन सिंग त्यातल्या त्यात भाव खाउन गेला होता. कारखान्याच्या मालकाची भुमिका त्याने मोठ्या रुबाबात केली होती.
खरं म्हणजे मी हा सिनेमा किशोर कुमारच्या "साला मै तो साब बन गया" या गाण्या करता पाहिला होता. त्यावेळी हे गाणे सारखे रेडिओ वर लागायचे आणि मला ते फार आवडले होते. पण पडद्यावर दिलिप कुमारनी इतक्या चांगल्या गाण्याचा यथेच्च कचरा केला आहे.
बादल सरकारांची बरीच नाटके अमोल पालेकर ने हिंदी आणि मराठीत केली होती. त्याच्या प्रयोगांच्या जाहिराती पेपरात बघायचो पण कधी तिकीट काढुन जावेसे वाटले नाही.
"सहा पात्रांच्या शोधात" मधे उल्लेख केला आहे तसा प्रयोग एकदा "पुरषोत्तम" मधे कोणी तरी केला होता. माझे लक्ष समोर स्टेज कडे होते आणि एकदम माझ्या शेजारचाच मुलगा जोरात किंचाळत किंचाळत स्टेज वर गेला. एवढा टरकलो होतो मी तेव्हा. जेव्हा समजले की हा त्या नाटकाचा भाग होता तेव्हा प्रेक्षक जाम चिडले होते , बहुतेक बरेच जण माझ्या सारखे जोरात दचकले होते, मग सगळ्यांनी जाम दंगा करुन नाटक पाडुन टाकले. त्या किंचाळणार्या मुलाला तर एकही संवाद धड म्हणून दिला नव्हता कोणी.
बाकिच्या गोष्टी सुध्दा आवडल्या, पुस्तक मिळवुन जरुर वाचण्यात येईल.
पैजारबुवा,
30 Sep 2021 - 9:56 am | कुमार१
अभ्यासपूर्ण प्रतिसाद आवडला.
‘सगीना’ तुम्ही प्रत्यक्ष पाहिलेला असल्याने त्याची अन्य बाजूही समजली.
‘साला मै तो साहब बन गया’ हे माझेही आवडते गाणे आहे. ते या चित्रपटातील आहे हे तुमच्यामुळे समजले !
बादल सरकार म्हणजे बंगालचे तेंडुलकर ( किंवा या विधानाचा व्यत्यास ) अशा चर्चा पूर्वी विद्वानांमध्ये ऐकल्या होत्या. प्रायोगिक किंवा बंडखोर रंगभूमी युरोपमध्ये फार पूर्वीच आकारास आली. त्यात प्रेक्षक व रंगमंच यांच्यातील सीमारेषा पुसून टाकण्याचा प्रयत्न केला जातो. आपल्याकडे असे काही तुरळक प्रकार नाट्यस्पर्धांमधून होतात हे खरे.
मुंबईतील पृथ्वी किंवा एनसीपीए ला अशा प्रकारची नाटके होतात असे ऐकून आहे. अजून तरी पाहण्याचा योग आलेला नाही.
..
पुस्तक वाचण्याबद्दल तुम्ही दाखवलेली उत्सुकता पाहून आनंद वाटला
धन्यवाद
30 Sep 2021 - 10:43 am | चौकस२१२
एकदम माझ्या शेजारचाच मुलगा जोरात किंचाळत किंचाळत स्टेज वर गेला.
हे वाचूनच दचकायला झालं !
अमर फोटो स्टुडिओ मध्ये सुद्धा शेवटी नाटकातील पात्रे प्रेक्षकात येतात ते हि काही फारसे भावले नवहते....
मला तरी रंगमंच आणि प्रेक्षक यांच्यातील एक अदृश्य पडदा असतो तो असा उगाचच काढलेला आवडत नाही .. नाटक पाहणे म्हणजे जणू काही एक चौकटीत आपण उपरे पनाने डोकावून बघत आहोत आणि ती चौकट भंगली कि चुकीचे वाटते
किंवा मध्येच पात्र प्रेक्षकांशी बोलत आहे हे पण काही नाटकात असते... हा या ला अपवाद म्हणजे काही वग वैगरे
1 Oct 2021 - 12:48 pm | लई भारी
अजून बरच काही वाचायचं आहे याची जाणीव झाली. आपली नेहमीची हातोटी आणि काहीतरी वेगळे सांगण्याचा प्रयत्न स्तुत्य आहेच!
1 Oct 2021 - 1:47 pm | कुमार१
१. चौकस
अदृश्य पडदा असतो तो असा उगाचच काढलेला आवडत नाही .. >>>+1
२. ल भा
बऱ्याच दिवसांनी भेटल्याने आनंद झाला.
3 Oct 2021 - 8:58 pm | कॉमी
सगिना महातो तर रोचकच आहे, पण सारा आकाश मात्र आवर्जून पाहावा वाटला.
3 Oct 2021 - 9:32 pm | कुमार१
कॉमी धन्यवाद
त्या लेखात तेंडुलकरांनी सारा आकाश आणि भुवन शोम यांची तुलना केली आहे. तेव्हा भुवन शोमला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला होता. परंतु सारा आकाशला नव्हता.
असे का झाले असावे याबद्दलही त्यांनी विश्लेषण केले आहे.