३ मिनिटांची ये-जा (कलाकृती परिचय : ८)

कुमार१'s picture
कुमार१ in जनातलं, मनातलं
11 Aug 2021 - 9:31 am

विदेशी कथा परिचयमालेतील याआधीचे लेख:

१ कोसळणारा पाउस : १०० वर्षांपूर्वी !
२. एका आईचा सूडाग्नी
३. कुणास सांगू ?
४. ‘भेट’ तिची त्याची
५. नकोसा पांढरा हत्ती

६. ती सुंदर? मीही सुंदर !

७. ‘लॉटरी'.......अरे बाप रे
............................................................
आतापर्यंत या लेखमालेत आपण ७ विदेशी कथांचा परिचय करून घेतला. नियमित वाचकांच्या अभ्यासपूर्ण आणि उत्साहवर्धक प्रतिसादांमुळे संबंधित धाग्यावरील चर्चाही चांगल्या रंगल्या. त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार आणि मालेच्या आठव्या भागात स्वागत !

ही लेखमाला तिच्या नावानुसार विदेशी ‘कथां’ची आहे. पण या भागात तिची व्याप्ती थोडी वाढवत आहे. त्याबद्दल सर्व वाचकांची संमती गृहीत धरतो. इथे कथेऐवजी एका विदेशी नाटकाचा परिचय करून देत आहे. सर्वसाधारण नाटकाच्या लांबीची आपल्याला कल्पना असते. एकांकिकेच्या लहान कालावधीशी पण आपण सरावलेले असतो. पण त्याहूनही अतिलहान नाटक असू शकते? आता तुमच्या कल्पनाशक्तीला काहीसा धक्का बसणार आहे. या नाटकाचा सादरीकरण कालावधी फक्त ३ मिनिटे आहे !! म्हणूनच ते रूढ अर्थाने ‘नाटक’ नसून ‘नाटुकले’ आहे. ‘Come and go’ नावाची ही प्रसिद्ध कलाकृती लिहिली आहे Samuel B. Beckett यांनी. प्रथम या दिग्गजाचा अल्पपरिचय करून देतो.

सॅम्युअल हे जन्माने आयरीश. मोठेपणी यांचे अधिकतर वास्तव्य फ्रान्समध्ये होते. त्यांची साहित्यिक कारकीर्द थक्क करणारी आहे. कथा, कादंबरी, नाटक, कविता आणि अनुवाद या सर्व प्रांतात त्यांनी लेखन केलेले आहे. याखेरीज ते नाट्यदिग्दर्शकही होते. त्यांनी इंग्लिश व फ्रेंच अशा दोन्ही भाषांत लेखन केले. आपल्या लेखनातून त्यांनी मानवी अस्तित्वासंबंधीच्या मूलभूत प्रश्नांना हात घातला. सुखात्मिक व शोकात्मिक हे दोन्ही लेखनप्रकार त्यांनी हाताळले. जशी त्यांची साहित्यिक कारकीर्द बहरत गेली तसे त्यांचे लेखन अधिकाधिक अल्पाक्षरी होत गेले. भाषा सौंदर्याचे विविध प्रकार त्यांच्या लेखनात पहावयास मिळतात. अशा या चतुरस्त्र व्यक्तिमत्त्वाच्या लेखकाला 1969 चे साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळाले. 1989 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. लेखनातील अल्पाक्षरत्व या त्यांच्या गुणाचे एक टोकाचे उदाहरण म्हणजे ‘Come and go’ हे प्रस्तुत नाटुकले.

नाट्यपरिचय
हे नाटुकले 1965 मध्ये इंग्लिश भाषेत लिहिले गेले, मात्र त्याचा पहिला प्रयोग जर्मन भाषेत झाला. कालांतराने तो इंग्लिशमध्येही सादर झाला. त्यातील एकूण शब्दसंख्या 121 ते 127 च्या दरम्यान आहे. संख्येतील हा फरक भाषांतरानुसार पडला आहे. नाट्यप्रयोगात रंगमंचावरील मांडणी एकदम साधी असून ती अशी आहे :
एकूण पात्रे तीन. तिघीही सामान्य, कुठलेही वैशिष्ट्य नसलेल्या व हॅट घातलेल्या स्त्रिया. हॅट जवळपास पूर्ण कपाळ झाकून टाकणारी. त्यांचे कपडे विटके. त्यांची नावे फ्लो, व्हायरु अशी आहेत. तिघी एका बाकड्यावर शेजारी शेजारी बसलेल्या आहेत. त्या बालपणीच्या मैत्रिणी आहेत.

ok
(चित्रसौजन्य : academia.edu)

आता व्हाय म्हणते, “आपण तिघी या आधी कधी भेटलो होतो ?” त्यावर रू म्हणते, “आपण ते बोलायला नको”.
मग व्हाय उठून निघून जाते. आता ज्या दोघी उरल्यात त्यांचा संवाद असा :

फ्लो : व्हायबद्दल तुझं मत काय ?
रु : तिच्यात फारसा बदल वाटत नाही.

फ्लो रुच्या कानात पुटपुटते. त्यावर रू धक्का बसून उद्गारते, “ओह”. फ्लो ओठांवर बोट ठेवते.
रू : तिला कळत नाही का ?
फ्लो : देवदयेने नाही.

आता व्हाय परत येते. मग फ्लो निघून जाते.

इथून पुढे बाकावर ज्या दोघी राहतात, त्यांच्यात वरील संवादाची (गेलेलीबद्दल) तशीच पुनरावृत्ती होते. ती झाली, की निघून गेलेली स्त्री परत येते. पुढे तिसऱ्या फेरीत रू निघून जाते. पुन्हा एकदा उरलेल्या दोघींत तेच संवाद. पण तीन फेऱ्यांत एक महत्त्वाचा फरक. वरील संवादांमध्ये जेव्हा प्रत्येक स्त्री धक्का बसून ‘ओह’ हा उद्गार काढते, त्या तीन ‘ओह’मध्ये उच्चार व तीव्रता या दृष्टीने मुद्दाम फरक ठेवलेला आहे.

आता तिघी शेजारी बसतात. व्हाय म्हणते, “जुन्या दिवसांबद्दल आपण नको का बोलायला?... नंतरचे ते सगळं? पूर्वीसारखे हातात हात घेऊन बसूया का मग ?”
आता तिघी एकमेकांचे हात हाती धरतात. तीन मांड्यांवर हातांच्या तीन जोड्या विसावतात.
आता फ्लो दोघींचे हात चाचपून म्हणते, “अंगठ्या जाणवताहेत मला”. (प्रत्यक्षात कोणाच्याच हातात त्या दिसत नाहीत).
इथे नाटक संपते आणि पडदा पडतो.
…….
विवेचन
असे हे सव्वाशे शब्दांचे आणि तीन मिनिटात संपणारे नाटुकले. क्षणभर असे वाटेल, की यात नाटककार प्रेक्षकांची गंमत करतोय काय? याचे उत्तर देण्याआधी एक लक्षात घेऊ. एकेकाळी पाश्‍चात्त्य रंगभूमीवर या नाट्याचे रीतसर तिकीट लावून प्रयोग झालेत आणि ते यशस्वी ठरलेत. म्हणजे हे ‘नाटक’ काही प्रेक्षकांना तरी प्रभावित करत असणार.

मग वरवर निरर्थक वाटणाऱ्या त्यातल्या संवादांमागे काय दडलंय? ते शोधायचे काम लेखकाने वाचक, प्रेक्षक आणि समीक्षकांवर सोडून दिले आहे !
बघूया या नाट्याच्या अंतरंगात डोकावून. पाहू तरी काय हाती लागतंय ते.
प्रथम त्या तिघींचे दृश्यरूप बारकाईने पाहू. गणितात जसे आपण ‘क्ष’, ‘य’, असे म्हणतो तशीच त्यांची नावे – वरवर पाहता अर्थहीन. त्यांच्या हॅट्समुळे चेहरे धड दिसूच नयेत अशी रचना. कपडे जाणीवपूर्वक विटके. थोडक्यात, ही बिनचेहऱ्याची माणसं आहेत. त्यांचे बोलणेही अस्पष्ट, कोरडे आणि भावहीन आहे.
आता त्यांच्या संवादांकडे वळू.

तिघींचा भूतकाळ हा नकोसा व अप्रिय असावा असे दिसते. बरं, प्रेक्षकांना दिसणारा त्यांचा वर्तमानकाळ तरी कसा आहे? रंगमंचावर त्या फक्त ये-जा करतात आणि त्याची रटाळ पुनरावृत्ती होते. म्हणजे वर्तमान सुद्धा अगदी बेचव, तीच तीच क्रिया घडवणारे आणि रुक्ष दिसते. त्या तिघींच्या तोंडून आळीपाळीने आलेला ‘ओह’ उदगार काय दर्शवतो ? त्या उद्गाराच्याच्या वेळी जी तिथे अनुपस्थित आहे, तिच्या भविष्यासंबंधी काहीतरी स्फोटक किंवा दुःखद बोलले गेले असावे. हा प्रकार प्रत्येकीच्या बाबतीत घडतो. म्हणजे तिघींच्याही आयुष्याबाबत, ‘आता पुढे काही खरं नाही बाई’, अशी निराशावादी अवस्था व्यक्त केलेली दिसते. ती कुजबुजीच्या स्वरुपात आपल्यापुढे सादर होते. आता या संवादांकडे बारकाईने पाहता आता आपल्याला त्यांच्या नावांचा काहीसा उलगडा होतो. रु आणि फ्लो ही नावे, rue flow या इंग्लिश शब्दांमधून जे काही व्यक्त होतं त्याच्याशी निगडीत असावीत. तसेच तीन स्त्रिया एकत्र असणे आणि संवादातील १-२ ओळींचे, अनुक्रमे शेक्सपिअरच्या ‘मॅकबेथ’ मधील तीन चेटकिणी आणि ‘हॅम्लेट’मधील एका प्रसंगाशी साधर्म्य दाखवते.

अखेरीस, असे सर्व निराशाजनक असले तरीही तिघींना एकमेकींचे हात धरून आधार घ्यावासा वाटतोय. भविष्यात जे काही दुःखद आहे त्याला सर्वांनी मिळून सामोरे जाऊ, असे त्या कृतीतून सुचवलेले दिसते. इथे फ्लोच्या तोंडी, त्यांच्या हातातील अंगठ्या जाणवण्याचा जो उल्लेख येतो, त्याचा संदर्भ कदाचित त्यांच्या पूर्वायुष्यातील प्रेमभंग किंवा घटस्फोट यांच्याशी असावा. त्यानंतर आता त्यांची जी युती झाली आहे ती त्या पूर्वायुष्यातील दुःखावर मात करण्यास सक्षम आहे, असेही सूचित असावे. काही अभ्यासकांना तर या तिघींची घट्ट युती हे हिंदू संस्कृतीतील त्रिमूर्तीचे प्रतीक आहे असे वाटते.

नाटकाची प्रकाशयोजना वैशिष्ट्यपूर्ण आहे. तिघी बसलेल्या असताना फक्त त्यांच्यावरच पडेल इतका प्रकाश असतो आणि आजूबाजूला सर्व अंधार. प्रत्येकीची जेव्हा रंगमंचावरून ये-जा होते त्यातून प्रकाशातून अंधःकारात आणि पुन्हा प्रकाशात, असा आयुष्यविषयक दृष्टीकोन सूचित होतो. तिघींचे थोडावेळ एकत्र बसणे आणि मधूनच त्यातल्या एकीचे निघून जाणे यातून माणसांमधील अल्पकालीन जवळीक आणि विरहभावना जाणवतात. तसेच रंगमंचावरील त्यांची कळसूत्री बाहुल्यांप्रमाणे झालेली ये-जा आणि कृतीमधील तोचतोपणा यातून मानवी आयुष्यातील चिरंतन वेदना आणि मृत्यूची अटळता सूचित होते.
जितकी आपण कल्पनाशक्ती ताणू, तसे या नाट्याचे सामान्य ऐहिकतेपासून पार अनादि अनंतापर्यंतचे अनेक अर्थ काढता येतील !
आता जरा रंगमंच बाजूला ठेवून आपल्या अवतीभवती नजर टाकू. सामान्य माणसे जेव्हा एकमेकांना अवचित भेटतात तेव्हाचे ठराविक साचेबद्ध संवाद कसे असतात ?
ही एक झलक :
“काय मग, कसं काय चाललंय ?”
“ठीके, चाललंय आपलं कसंतरी !”
“तरीपण काय विशेष ?”
“कसलं विशेष अन कसलं काय. आला दिवस, गेला दिवस”
“हं, खरंय म्हणा !”.

अशा सामान्य माणसांच्या प्रतिनिधी म्हणून त्या तिघी रंगमंचावर उभ्या केल्या आहेत. आता तीन पुरुष न घेता तीन स्त्रियाच का घेतल्या, हाही काथ्याकुटाचा विषय होऊ शकतो. एकंदरीत पाहता जवळीक, संवाद आणि आधाराची आत्यंतिक गरज हे ठळकपणे व्यक्त करण्यासाठी स्त्रियांची योजना केलेली असावी. बरं, हे सगळे अवघ्या तीन मिनिटात उरकायचा नाटककाराचा हेतू काय असावा ? त्याकाळी रूढ नाटके दणदणीत तीन अंकी, अगदी ४-५ तास चालणारी असत. असे लांबण लावणे काही लेखकांना अनावश्यक वाटले असावे. माणसांच्या आयुष्यात जे काही चाललंय, ते जर “काही बरं नाही अन काही खरं नाही” याच स्वरूपाचे असेल, तर मग ते कटू अगदी थोडक्यात आटोपून टाकलेले बरे, असा विचार लेखकाने केलेला दिसतो. प्रायोगिक रंगभूमीवरील हा एक आगळावेगळा आविष्कार म्हणता येईल.

त्या काळी युरोपीय रंगभूमीवर नाटके जास्तीत जास्त आटोपशीर व अधिकाधिक आशयघन करण्याची चढाओढ लागली होती. हे नाटुकले हा त्या चुरशीचा परिपाक असावा.
नाटक ही मुळात सादरीकरणाची कला आहे. या नाटुकल्यात रंगमंचावर जे प्रत्यक्ष संवाद घडतात ते त्रोटक आहेत. परंतु नाटककाराने संहितेत लिहीलेल्या रंगसूचना आणि अन्य टिपणे सविस्तर आहेत. वरील विवेचनातून मी माझ्या परीने नाटकाचा गर्भितार्थ लिहिला आहे. तरीपण हे नाटुकले निव्वळ वाचण्याऐवजी प्रत्यक्ष पाहिल्यावरच प्रेक्षकाला त्याचा भावार्थ समजेल आणि त्याचा अनुभव घेता येईल. इच्छुकांनी संबंधित चित्रफीत जरूर पहावी असे सुचवतो. त्यासाठीचा दुवा तळटीपेत देत आहे.

एक अग्रिम सूचना : हा प्रयोग रुढ परंपरेपेक्षा आगळावेगळा असल्यामुळे नाट्यशास्त्राच्या दृष्टीने दखलपात्र ठरतो. आपल्याला तो आवडावा किंवा नाही, हा व्यक्तिगत प्रश्न आहे. सर्वांच्याच मताबद्दल आदर आहे.
………………………………………………………………………………………………………
१. मूळ नाटुकले इथे वाचता येईल

आणि

२. इथे पाहता येईल

नाट्यआस्वाद

प्रतिक्रिया

ज्ञानोबाचे पैजार's picture

11 Aug 2021 - 3:04 pm | ज्ञानोबाचे पैजार

हा भागही आवडला,
छान परिचय
पैजारबुवा,

७ मिनिटात नाटूकले छान परिचय आहे. तिघींची सतत जागा बदल आणि दोघीं दोघीं मधील रहस्य कथन आणि शेवटी तिघींना एकमेकींची रहस्ये समजणे.. म्हणजे रिंग(सर्कलमध्ये)-रिंगण पूर्ण होणे असेल.कोण कशाप्रकारे जागा बदलत आहे तेही महत्वाचे वाटतेय इथे! मस्त!

कुमार१'s picture

11 Aug 2021 - 1:48 pm | कुमार१

ज्ञा पै,
उद्घाटन प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

भक्ती,
बरोबर. या नाट्यातील स्त्रियांच्या विशिष्ट हालचाली काही प्रमाणात नृत्यकलेमध्ये मोडतात.

या नाट्यातील स्त्रियांच्या विशिष्ट हालचाली काही प्रमाणात नृत्यकलेमध्ये मोडतात.
हो,पण लिखाण आधी झालं त्यात लेखकाने विचारपूर्वक हे योजिले आहे.

गॉडजिला's picture

11 Aug 2021 - 3:33 pm | गॉडजिला

...

मित्रहो's picture

11 Aug 2021 - 6:05 pm | मित्रहो

छान परिचय

पाषाणभेद's picture

12 Aug 2021 - 6:49 am | पाषाणभेद

असले प्रयोगशील नाटके आपल्या प्रेक्षकांना रुचतील?
आपली नाटके ओढून ताणून केलेले विनोद अन जून्या नाटकांची पुण्याईवरच तरली.

पाषाणभेद's picture

12 Aug 2021 - 7:48 am | पाषाणभेद

सर, आपली मालिका कथांपुरती मर्यादित राहू देत.
नाटकाचा आवाका अन रचनाशैली कथेपेक्षा भिन्न असते.

कुमार१'s picture

12 Aug 2021 - 8:31 am | कुमार१

अभिप्राय व उत्साहवर्धक प्रतिसादांबद्दल वरील सर्वांचे आभार !

* या नाटकाला 'ओह' असा एकशब्दी प्रतिसाद देणे मार्मिक असून खूप आवडले आहे !!

**

सर, आपली मालिका कथांपुरती मर्यादित राहू देत.

>>
होय ! केवळ चवबदल म्हणून फक्त एक नाटक (तेही आगळे वेगळे वाटले म्हणून) घेतले आहे.
लेखात म्हटल्याप्रमाणे ही प्रायोगिक रंगभूमी आहे. त्यामुळे 'इकडे' काय किंवा 'तिकडे' काय ,मोजक्याच लोकांना असे प्रयोग आवडतात.

आता यानंतर पुढे फक्त एक कथा असेल आणि त्यानंतर समारोप.
लेखमालेला एकूण दहा भागांचे बंधन मी पहिल्यापासूनच माझ्यावर घालून घेतलेले आहे.
धन्यवाद...

तर मग पुढील लेखमालिका अमराठी कवितेवर करा कुमार सर. _/\_

गॉडजिला's picture

14 Aug 2021 - 1:39 am | गॉडजिला

१३ भाग हवेत... दुरदर्शनवर पुर्वी मालीका १३ भागांच्या असत.

कुमार१'s picture

14 Aug 2021 - 7:47 am | कुमार१

शुभेच्छा व सूचनांबद्दल आभार !

जोपर्यंत वाचकांना एखादी गोष्ट हवीशी वाटत आहे तेव्हाच थांबण्यात मजा आहे.
त्यादृष्टीने मी १० हा आकडा आदर्श मानतो.
मराठी कवितांसाठी इथे अनेक दर्दी कविराज आहेत. त्यांनी असा उपक्रम हाती घ्यावा अशी माझी सूचना !

गॉडजिला's picture

14 Aug 2021 - 10:26 am | गॉडजिला

तुम्हीच ठरवा जे तुम्हाला योग्य वाटत असेल ते...

फक्त जर आधीच लिमिटेड एडिशन काढायचे ठरवले असेल तर लेख टाकतानाच धाग्याच्या टायटलमधे भाग १/१० असे लिहावे अथवा लेखमाला पूर्ण झाल्यावर त्याचे संपादकांकडून ईबुक बनवून घ्यावे जेणेकरुन भावी वाचकांना सोयीचे होईल

कुमार१'s picture

14 Aug 2021 - 10:31 am | कुमार१

लेखमालेच्या अनुक्रमणिकेसाठी संपादकांना पूर्वीच विनंती केलेली आहे.
परंतु सध्या ही सुविधा तांत्रिक कारणास्तव बंद आहे असे समजले.

कुमार१'s picture

14 Aug 2021 - 7:49 am | कुमार१

वर
मराठी >>> अमराठी असे वाचावे.

कुमार१'s picture

12 Nov 2021 - 9:57 am | कुमार१

सॅम्यूएल बेकेट यांच्याच ‘एण्ड गेम’ या अन्य एका नाटकाचा परिचय करून देणारा एक लेख इथे आहे:
https://www.aksharnama.com/client/kala_sanskruti_detail/5268

ह्या लेखाचा सारांश एका वाक्यात असा:

मानवी जीवन हा न संपणारा, दिशाहीन अभिनय आहे.