राजयोग - २३ (अंतिम भाग)

रातराणी's picture
रातराणी in जनातलं, मनातलं
8 Aug 2020 - 11:26 am

राजयोग - २२

***

इकडे शाहशुजाला त्याचा भाऊ औरंगजेबाच्या सैन्याने सळो की पळो केले होते. इलाहाबादजवळ रणभूमीवर शेवटी त्याचा पराजय झाला. या पराभवाने अपमानित, भयभीत झालेल्या शुजाला आपले कोण आणि परके कोण यातला फरक कळेनासा झाला. वेषांतर करून तोही सर्वसामान्य लोकांप्रमाणे लपतछपत पळू लागला. जिकडे जाईल तिकडे त्याला शत्रूच्या घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकू येऊ लागला. शेवटी पटन्याला पोचल्यावर त्याने नवाबाचा वेष परिधान करून प्रजा आणि आपल्या परिवारासमोर येण्याची घोषणा केली. तो पटन्याला पोचताच काही कालावधीतच औरंगजेबाचा मुलगा शहजादा मुहम्मद सैन्यासहित तिथे येऊन धडकला. पटना सोडून शुजा मुंगेरला पळाला.

मुंगेरमध्ये गेल्यावर त्याच्या सैन्यातले विखुरले गेलेले लोक पुन्हा एकत्र झाले. काही नवे सैनिकही त्याने जमा केले. तेरियागढी आणि शिकलीगलीचे किल्ले साफ केले. नदीकिनारी एका पहाडात बुलंद तट उभा करून बलवान झाला.

औरंगजेबाने आपला कुशल सेनापती मीरजुमला याला शहजादा मुहम्मदाच्या मदतीला पाठवले. शहजादा मुहम्मदने बेधडक मुंगेरच्या किल्ल्याजवळ जाऊन तिथं आपला पडाव टाकला तर मीरजुमला गुप्त मार्गाने मुंगेरला निघाला. शुजा इकडे शहजादा मुहम्मदबरोबर छोट्या मोठ्या चकमकी लढत असताना अचानक बातमी आली की मीरजुमला खूप मोठी सेना घेऊन वसंतपूरपर्यंत आला आहे. या बातमीने शुजा त्रस्त झाला. ताबडतोब आपले सैन्य घेऊन तो मुंगेरच्या राजमहालात पळून गेला. त्याचा संपूर्ण परिवार तिथेच रहात होता. सम्राटाचे सैनिक वेळ न दवडता त्याच्या पाठोपाठ तिथे पोचले. तब्बल सहा दिवस शुजाने प्राण पणाला लावून शत्रू सैन्याला तिथे रोखून ठेवले होते. मात्र अजून टिकाव लागणे शक्य नाही हे लक्षात येताच एका वादळी रात्री आपला परिवार आणि जमेल तेवढे धन घेऊन तो तिथून पळाला. नदी पार करून तोंडा गावी गेला आणि तिथल्या किल्ल्याच्या बंदोबस्ताची तयारी सुरु केली.

त्याचवेळेस मुसळधार पाऊस झाला. नदीचं विशाल पात्र दुथडी भरून वाहू लागलं. अशा परिस्थितीत नदी पार करणे सम्राटाच्या सैन्याला शक्य झाले नाही.

हे युद्ध सुरु होण्यापूर्वीच शहजादा मुहम्मद आणि शुजाच्या मुलीचं लग्न ठरले होते. युद्धाच्या धांदलीत वर आणि वधू दोन्ही पक्षांना या गोष्टीचा पूर्णपणे विसर पडला होता.

पावसामुळे युद्ध स्थगित झालं होतं. मीरजुमलाने आपला तळ राजमहालापासून थोडा दूर हलवला होता. त्याचवेळेस तोंडाच्या शिविरातून एका सैनिकाने गुपचूप येऊन शहजादा मुहम्मदाच्या हाती एक पत्र सोपवले. शहजाद्याने पत्र उघडून वाचायला सुरु केले. शुजाच्या मुलीने लिहले होते,

“शहजादे, हे कसलं नशीब आहे माझं? मनोमन ज्याला आपला पती मानून हृदय समर्पण केलं, एकमेकांच्या हातांत हात घेऊन, अंगठी घालून ज्याने मला आपली सहचारिणी बनवायचं वचन दिलं, तोच निष्ठुर आज हातात तलवार घेऊन माझ्या वडिलांचे प्राण घेण्यास आसुसला आहे! निर्दयी नशिब हे कसले दिवस दाखवत आहे मला? शहजादे, हाच का आपल्या विवाहाचा उत्सव? इतका मोठा सोहळा त्याचसाठी चालू आहे? याच कारणामुळे आज आमचा राजमहाल लाल रंगाने रंगवला असावा! शहजादा दिल्लीहून बेड्या घेऊन इथवर आला आहे, प्रेमाची बेडी म्हणतात ती हीच!?”

पत्र वाचता वाचता शहजादा मुहम्मदाच्या पायाखालची जमीन सरकली. एखाद्या तीव्र भूकंपाने जमीन दुभंगली जावी तसे त्याचे ह्रदय विदीर्ण झाले. त्या अस्वस्थ क्षणी त्याला युद्ध जिंकल्यावर मिळणार असलेलं साम्राज्य, बादशाहाची कृपा सगळंच कवडीमोल वाटू लागलं. तारुण्याच्या अग्नीमध्ये त्याने फायदा नुकसान सगळे विचार भस्म केले. वडिलांनी सुरु केलेलं हे सगळंच कार्य त्याला अतिशय अयोग्य आणि निष्ठुर वाटू लागलं. याआधीही त्याने बरेचदा आपल्या कुटील,कारस्थानी वडिलांच्या अनैतिक वागण्याला विरोध केला होता. कधी कधी त्यांच्या क्रोधाचे कारणही झाला होता. त्याने आपल्या सैन्यातील काही महत्वाच्या व्यक्तींना जवळ बोलावून सम्राटाच्या निर्दयी अत्याचारांविषयी नाराजी दाखवत म्हणाला, “मी आजच तोंडाला माझ्या काकांना भेटायला जात आहे. तुमच्यापैकी ज्यांना माझ्याविषयी काही प्रेम वाटत असेल, तर ते माझ्याबरोबर येऊ शकतात.”

त्याला मनापासून कुर्निसात करीत सगळे म्हणाले, “शहजादे, तुम्ही अगदी योग्य निर्णय घेतला आहे. पहा,अर्धे सैनिक उद्याच तुम्हाला तोंडाला येऊन भेटतील.”

मुहम्मद त्याचदिवशी नदी पार करून शुजाच्या शिविरात पोचला.

तोंडामध्ये या घटनेने एकदम उत्सवाचे वातावरण तयार झाले. युद्धाची गोष्ट सगळे जणू काहीच घडले नाही इतक्या सहजपणे विसरून गेले. आतापर्यंत फक्त पुरुषच व्यस्त होते. मुहम्मद आल्यावर घरातल्या नाजूक स्त्रियांच्या हातांना एका क्षणाचीही फुरसत मिळणे अवघड झाले. शुजाने अतिशय प्रेमाने आणि आनंदाने मुहम्मदाचे स्वागत केले. इतके दिवस रक्तपात पाहिल्यावर आपल्या रक्ताची ओढ कदाचित थोडीशी जास्तच जाणवू लागली असावी. नृत्यगायनाच्या मैफिलीत विवाहसोहळा पार पडला. मैफिल संपते न संपते तोच बातमी आली की सम्राटाची सेना जवळ आली आहे.

मुहम्मद शुजाच्या शिविरामधे जाताच सैनिकांनी मीरजुमलाला कळवले. एकही सैनिक मुहम्मदाच्या मदतीला गेला नाही. त्यांच्या लक्षात आलं, मुहम्मदाने जाणूनबुजून संकटात उडी घेतली आहे, आता तिकडे जाऊन त्याच्या तुकडीला भेटणे म्हणजे वेडेपणाच होईल.

शुजा आणि मुहम्मदाला अजूनही असा विश्वास होता की युद्धभूमीवर सम्राटाचे अनेक सैनिक शहजादा मुहम्मदाला येऊन मिळतील. याच आशेवर मुहम्मद आपली युद्धपताका फडकवत रणभूमीवर आला. सम्राटाच्या सेनेची एक मोठी तुकडी त्याच्या दिशेने झेपावली. मुहम्मदाच्या आनंदाला पारावार राहिला नाही. ती तुकडी जवळ येताच मुहम्मदाच्या सेनेवर गोळे बरसू लागले. तेव्हा कुठे मुहम्मदाला सर्व परिस्थिती लक्षात येऊ लागली, पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. त्याचे सर्व सैनिक पळून गेले. युद्धात शुजाचा मोठा मुलगा मारला गेला.

त्याच रात्री दुर्दैवी शुजा आणि त्याचा जावई सहकुटूंब वेगवान नौकेत सवार झाले आणि ढाक्याला पोचले. ढाक्याला जाऊन शुजाचा पाठलाग करणे मीरजुमलाला आवश्यक वाटले नाही. जिंकलेल्या प्रदेशावर सत्ता स्थापन करण्याच्या तयारीला तो लागला.

कठीण परिस्थितीत जेव्हा आप्तस्वकीय, मित्र एक एक करून संबंध सोडून निघून जातात, तेव्हा मुहम्मदाने स्वतःचे धन-प्राण-मान व्यर्थ मानून शुजाला साथ दिली होती. स्वतःच्या वडिलांनी चालवलेल्या अन्याय सत्राविरुद्ध शुजाला मदत केली होती. मुहम्मद त्याला आता प्राणाहुनही प्रिय झाला होता. त्याचवेळेस ढाका शहरात औरंगजेबाचा एक गुप्तहेर दूत पकडला गेला. त्याचं पत्र शुजाला मिळालं. औरंगजेबाने मुहम्मदाला लिहले होते, “माझ्या सर्वांत प्रिय असणाऱ्या मुहम्मद, आपले कर्तव्य डावलून तू पितृद्रोही झाला आहेस. तुझ्या निष्कलंक यशोकिर्तीवर तू केवढा मोठा कलंक लावला आहेस. एका सुंदर तरुणीच्या मोहक हास्याला भुलून तू आपला धर्म विसरलास. भविष्यात ज्याच्या खांद्यावर संपूर्ण मुघल साम्राज्याची जबादारी येणार आहे तो तर एका तरुणीचा दास होऊन बसला आहे! असो, मुहम्मदाने जर अल्लाहची प्रार्थना करून आपला पश्चाताप व्यक्त केला असेल तर मी त्याला माफ करतो. परंतु ज्या कामासाठी मी तुला तिथे पाठवलं आहे, ते काम पूर्ण केलं तरच तो माझ्या कृपेस पात्र होईल.”

हे पत्र वाचून शुजाला धक्का बसला. मुहम्मद पुन्हा पुन्हा सांगत राहिला कि त्याने कधीच त्याच्या पित्याकडे झाल्या प्रकाराबद्दल पश्चाताप व्यक्त केला नाही. हे सर्व आपल्या वडिलांचं कारस्थान आहे. परंतु शुजाचा संशय काही दूर झाला नाही. शुजाने तीन दिवस विचार केला. चौथ्या दिवशी मुहम्मदाला म्हणाला, “बेटा, विश्वासाचं जे बंधन आपल्या दोघांमध्ये होतं ते आता सैल झाले आहे. मी तुला प्रार्थना करतो, आपल्या पत्नीला घेऊन तू इथून निघून जावेस. त्याशिवाय आता माझे मन स्थिर होणार नाही. मी राजकोष तुझ्यासाठी खुला केला आहे. सासऱ्याकडून भेट म्हणून तुला जितकं योग्य वाटेल तितकं धन तू घेऊन जाऊ शकतोस.”

मुहम्मदाने आपल्या पत्नीबरोबर सर्वांचा मोठ्या कष्टाने निरोप घेतला.

शुजा स्वतःशी म्हणाला, “आता मी युद्ध नाही करू शकत. चट्टग्रामच्या बंदरातून निघणाऱ्या जहाजातून मक्केला जाईन.”

पुन्हा एकदा वेषांतर करून शाहशुजाने ढाका सोडले.

***

पावसाळ्यातली एक दुपार होती. ज्या किल्ल्यात गोविंदमाणिक्य रहात होते, त्याच किल्ल्याच्या दिशेने एका फकीराबरोबर तीन मुलं आणि एक वयोवृद्ध मदतनीस चालत येत होते. मुलं अतिशय थकलेली वाटत होती. सोसाट्याचा वारा सुटला होता आणि पाऊस काही थांबत नव्हता. सगळ्यात लहान मुलाचे वय जेमतेम चौदा वर्ष असेल, थंडीने कुडकुडत तो आपल्या वडिलांना म्हणाला, “आता अजून चालवत नाही अब्बा.” असं म्हणून तो मुसमुसत रडू लागला.

काही न बोलता फकिराने त्याला आपल्या जवळ ओढून छातीशी कवटाळलं.

त्यातला मोठा मुलगा छोट्यावर चिडून म्हणाला, “असं रस्त्यात रडत बसून काय होणार? रडू नको,शांत हो. अब्बाना त्रास नको देउ.”

छोटा मुलगा उठून उरलेलं रडू थांबवायचा प्रयत्न करीत शांत झाला.

मधल्या मुलाने फकिराला विचारले, “आपण कुठे जातोय अब्बा?”

फकीर म्हणाला, “इथे जे किल्ल्याचं शिखर दिसतंय ना, तिथे चाललो आहोत.”

“तिथे कोण आहे अब्बा?”

“मी ऐकलं आहे, कुठलातरी एक राजा तिथे संन्यासी बनून राहिला आहे.”

“राजा का बरं संन्यासी झाला?”

फकीर म्हणाला, “नाही माहीत बाळ. कदाचित त्याच्या सख्ख्या भावाने सैनिकांना पाठवून त्याचा या देशातून त्या देशात एखाद्या गल्लीतल्या कुत्र्यासारखा पाठलाग केला असेल. त्याला राज्य आणि सुखसोयींमधून बेदखल केलं असेल. आता कदाचित संन्यासाचे भगवे कपडे घालून सगळ्या जगापासून दूर तो इथं एखाद्या दरिद्री, अंधाऱ्या गुहेत लपला असेल. स्वतःच्याच भावाच्या तिरस्कारातून सुटका होणे मोठे कठीण आहे.”

असं म्हणत फकिराने आपला हात छातीशी घट्ट दाबत उठलेली कळ कशीबशी सावरली. मोठ्या मुलाने विचारले, “कुठल्या देशाचा राजा होता हा संन्यासी?”

फकीर म्हणाला,” ते माहीत नाही बाळा.”

“त्याने आपल्याला आश्रय नाही दिला तर?”

“तर आपण इथेच झाडाखाली झोपू. आपल्यासाठी आता अजून कुठे जागा शिल्लक असणार?”

संध्याकाळ व्हायच्या आधीच किल्ल्यात फकीर आणि संन्यासीची भेट झाली. दोघेही एकमेकांना पाहून आश्चर्यचकित झाले. गोविंदमाणिक्यांनी लक्षपूर्वक पाहिलं - फकीर काही फकीर वाटत नाही. मनातल्या छोट्या छोट्या स्वार्थी इच्छांवर विजय मिळवून, एखादा महान संकल्प मनात धारण केल्यावर येणाऱ्या मृदू, निर्मळ आत्मतेजाची झळाळी त्याच्या चेहऱ्यावर नाही. सतत घाबरलेला, जागरूक फकीर. त्याच्या हृदयातली तहानलेली वासना जणूकाही त्याच्या भकास, जळजळीत डोळ्यांमधून आग ओकत होती. घट्ट दाबून धरलेले ओठ आणि दातखीळ बसल्याप्रमाणे एकावर एक करकचून बंद केलेल्या दातांमधून अपयशी झालेला त्याचा द्वेष, त्याचाच विखार अंधःकाराने भरलेल्या हृदयाच्या गुहेत जाऊन पुन्हा त्यालाच डसत होता. बरोबर तीन मुलं, त्यांचं अत्यंत नाजूक, थकलेलं शरीर आणि एक प्रकारचा अभिमानी संकोच पाहून वाटावं, जन्मल्यापासून त्यांनी कदाचित जमिनीवर पायही ठेवले नसावेत. चालून चालून पायांना धूळ लागते ती त्यांनी आयुष्यात पहिल्यांदाच पाहिली असावी. जगात केवढं दारिद्र्य आहे, धूळ आहे, घाण आहे या सर्व गोष्टींचं ज्ञान त्यांना पहिल्यांदाच होत असावं. पावलोपावली मखमालीचे गालिचे आणि हे धुळीने भरलेले रस्ते यांची तुलना करून त्यांचं मनही जगाविषयी तिरस्काराने भरू लागलं आहे. जणूकाही सगळ्या पृथ्वीने यांच्यावरच अन्याय करण्यासाठी आपला मऊ मुलायम गालिचा गुंडाळी करून ठेवून दिला असावा. त्यांना वाटतं, सगळ्या जगाने त्यांच्यावर अन्याय केला आहे. गरीब लोक भिक्षा मागण्यासाठी आपल्या घाणेरड्या कपड्यांमधून त्यांच्याजवळ येण्याचा प्रयत्न करतात, हासुद्धा त्यांचा आपल्याविरुद्ध चाललेला बनावच आहे. एखादं किळसवाणं, घाणीने बरबटलेलं कुत्रं जास्त जवळ येऊ नये म्हणून कुणी जसं लांबूनच भाकरीचा तुकडा टाकतं, जणूकाही त्याच प्रकारे त्या भुकेल्या भिकार्यांना पाहून ही मुलं तोंड फिरवून सहजच एखादी मूठ सोन्याच्या मुद्रा टाकतील. या जगाचं हे अतिसामान्य रूप आणि असं निर्धन असणं हा त्यांच्या नजरेत मोठा अपमान आहे. त्यांना या जगात सुख आणि मानसन्मान मिळत नाही, हा फक्त आणि फक्त त्या जगाचाच दोष आहे.

गोविंदमाणिक्यांना त्यांना पाहून इतकंच वाटलं नसावं. फकीराची लक्षणं बघून त्यांनी लगेचच ओळखलं होतं की आपल्या सगळ्या इच्छाआकांक्षा त्याग करून जगाच्या कल्याणासाठी बाहेर पडलेला हा फकीर नव्हे. फक्त आपल्या इच्छा पूर्ण न झाल्याने असंतुष्ट होऊन तो जगाकडे पाठ फिरवून आला आहे. फकीराला वाटतंय की त्याची जी इच्छा आहे, ते सगळं काही त्याला मिळायलाचं हवं. पण या जगाला त्याचं जे काही देणं असेल, ते त्यानं दिलं काय किंवा न दिलं तरीही विशेष फरक पडायला नको. अशा तकलादू विचारांवर या जगात तग धरून राहता येत नाही, त्यामुळेच निराश होऊन तो जगापासून दूर चालला आहे.

फकीराला मात्र गोविंदमाणिक्यांना पाहिल्यावर त्यांच्यात एक राजाही दिसला आणि एक संन्यासीही. त्याच्या मनात त्याने त्यांची काही वेगळीच प्रतिमा तयार केली होती. त्याला वाटलं होतं, कुणीतरी एखादा मोठी पगडी घालून बसलेला धष्टपुष्ट, गोलमटोल शरीराचा राजा असेल किंवा एखादा अगदीच दीनवाणा, सर्वांगाला राख-भस्म फासून बसलेला मळकट कळकट्ट संन्यासी असेल. पण या दोन्हीमधलं एकही रूप त्याला पहायला मिळालं नाही. गोविंदमाणिक्यांना पाहून त्याला वाटलं, सगळं काही त्याग करूनही जणूकाही सर्व त्यांचंच आहे. त्यांना कशाचीही इच्छा नाही, म्हणूनच सगळं काही मिळालं आहे. ज्या प्रकारे त्यांनी आत्मसमर्पण केलं आहे त्याचप्रकारे सगळं जग आपल्या मर्जीने त्यांच्या हातात आलं आहे. कुठलाही दिखावा नाही म्हणून ते राजाही आहेत आणि संपूर्ण जगाला त्यांनी आपलंसं केलं आहे म्हणून संन्यासीही आहेत. खरंतर त्यांना आता राजा व्हायचीही गरज नाही आणि संन्यासी व्हायचीही.

आपल्या अतिथींची राजाने मनापासून सेवा केली. अतिथींनी मात्र त्यांच्या सेवेचा अत्यंत उपेक्षेने स्वीकार केला. जणूकाही हा सर्व त्यांचा जन्मसिद्ध अधिकारच होता. त्यांच्या आरामासाठी काय काय आवश्यक आहे हेही त्यांनी राजाला सांगितले. राजाने मोठ्या मुलाला प्रेमाने विचारले, “इतक्या कठीण मार्गावरून आल्याने थकवा आला असेल ना?”

मुलगा त्यांच्या प्रश्नाचं काही उत्तर न देता फकिराला चिकटून बसला. राजा त्याच्याकडे पाहून हसत म्हणाला, “तुम्हा लोकांच्या या नाजूक शरीराला चालणं मानवणार नाही. तुम्ही इथेच या किल्ल्यात रहा. मी तुमची योग्य काळजी घेईन.”

राजाच्या या बोलण्यावर काय उत्तर द्यावं आणि इथल्या सर्वांशी कसं वागावं हे लक्षात न आल्याने मुलं अजूनच फकिराच्या जवळ सरकली. त्यांना वाटलं असावं, कोण कुठला हा माणूस आपले मळके हात पुढे करून आपल्याला पकडायलाच येतोय.

गंभीर होऊन फकीर म्हणाला, “ठीक आहे, आम्ही काही दिवस तुझ्या या किल्ल्यात राहू शकतो.”

जणूकाही राजावर उपकार केले असावेत. मनातल्या मनात म्हणाला, “तुला माहिती असतं मी कोण आहे, तर या उपकाराने तुला कल्पनातीत आनंद झाला असता.”

राजाला काहीही केलं तरी त्या तीन मुलांचं मन जिंकता आलं नाही आणि फकीर जणूकाही त्या गावचाच नाही असा अलिप्त रहात होता.

फकीराने विचारले, “तू आधी कुठलासा राजा होतास म्हणे? कुठलं राज्य?”

गोविंदमाणिक्य म्हणाले, “त्रिपुरा.”

उत्तर ऐकल्यावर मुलांना ते अगदीच तुच्छ वाटले. याआधी त्यांनी त्रिपुराचं नावही ऐकलं नव्हतं. पण फकीर थोडासा अस्वस्थ होऊन म्हणाला, “कसं काय गमावलंस तू राज्य?”

काही वेळ गोविंदमाणिक्य शांत बसले. शेवटी म्हणाले, “बंगालचा नवाब शाहशुजाने मला राज्यातून निर्वासित केलं आहे.”

नक्षत्ररायचे नावही काढले नाही.

हे ऐकताच आश्चर्याने तिन्ही मुलं फकिराच्या चेहऱ्याकडे पाहू लागली. फकिराच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. गडबडून जाऊन तो म्हणाला, “मला वाटतं हे सगळं तुझ्या भावाचंच कारस्थान असणार. तुझ्या भावाने तुला राज्यातून हुसकावून लावून संन्यासी बनवलं असणार.”

राजाला फार आश्चर्य वाटले. म्हणाले, “तुम्हाला कशी काय कळली ही बातमी?”

नंतर वाटलं, ‘यात आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे? राज्यात आल्यावर कुणाकडूनही कळली असेल.’

फकीर घाईघाईत म्हणाला, “मला काही माहीत नाही, फक्त माझा अंदाज आहे हा.”

रात्र झाल्यावर सगळे झोपायला गेले. त्या रात्री फकीराला झोप लागली नाही. जागेपणी वाईट स्वप्नं दिसू लागली, छोट्या छोट्या आवाजांनी दचकू लागला.

दुसर्या दिवशी फकीर गोविंदमाणिक्यांना म्हणाला, “काही विशेष काम निघाल्यामुळे आम्हाला इथे अजून जास्त वेळ राहता येणार नाही. आम्ही आजच इथून प्रयाण करीत आहोत.”

गोविंदमाणिक्य म्हणाले, “मुलं प्रवासाने थकली आहेत. त्यांना अजून थोडे दिवस आराम करू दिलात तर बरे होईल.”

मुलं जराशी नाराज झाली, सगळ्यात मोठा मुलगा फकीराकडे बघत म्हणाला, “आता आम्ही काही लहान नाही आहोत - गरज पडल्यावर वाटेल तेवढे कष्ट आम्ही सहन करू शकतो.”

गोविंदमाणिक्यांनी त्यांच्याबद्दल दाखवलेली आपुलकी त्यांना आवडली नाही. गोविंदमाणिक्य पुढे काही बोलले नाहीत.

फकीर जेव्हा जायची तयारी करीत होता, त्याचवेळेस किल्ल्यात अजून एका पाहुण्यांचे आगमन झाले. त्याला बघून फकीर आणि राजा दोघांनाही आश्चर्य वाटले. फकीराला काय करावे हे सुचले नाही. राजाने आपल्या अतिथीला नमस्कार केला. तो पाहुणा दुसरा तिसरा कुणी नाही , रघुपती होता. रघुपती राजाला नमस्कार करून म्हणाला, “महाराजांचा विजय असो.”

रघुपतीच्या अचानक येण्याने काळजीत पडलेला राजा म्हणाला, “नक्षत्ररायकडून आला आहात ठाकूर? काही विशेष निरोप आहे का?”

रघुपती म्हणाला, “नक्षत्रराय ठीक आहे, त्यांची चिंता करू नका.”

आपले दोन्ही हात आकाशाकडे उंचावत म्हणाला, “मला जयसिंहाने तुमच्याकडे पाठवले आहे. तो तर आता या जगात नाही, मी त्याची इच्छा पूर्ण करेन. त्याशिवाय आता माझ्या मनाला शांती मिळणार नाही. तुमच्याजवळ राहून, तुमची सावली बनून मी तुमच्या प्रत्येक कार्यात सहभागी होईन.”

राजाला आधी रघुपतीच्या अशा वागण्याचा अर्थ कळला नाही. त्याला वेडबिड तर लागलं नाही ना अशी त्यांच्या मनात शंका आली. काही न बोलता ते शांत उभे राहिले.

रघुपती म्हणाला, “सगळं काही पाहून,समजून उमजून आता मला कळतंय की सुख कशातच नाही. ईर्ष्या करण्यात सुख नाही, सत्ता मिळवण्यात सुख नाही, ज्या मार्गावर तुम्ही चालत आहात, त्याच मार्गावर खरं सुख आहे. मी तुमचा वैरी झालो, तुमची ईर्ष्या केली, तुमचा बळी चढवावा असं मला वाटायचं.. आज मी तुमच्याकडे माझ्या सर्वस्वाचा त्याग करायला आलो आहे.”

गोविंदमाणिक्य म्हणाले, “ठाकूर, तुमचे माझ्यावर अनंत उपकार आहेत. माझा खरा शत्रू सावलीसारखा माझ्या बरोबर होता, तुम्हीच मला त्याच्या हातातून अलगद सोडवले आहे.”

रघुपती महाराजांच्या या बोलण्याकडे दुर्लक्ष करीत पुढे म्हणाला, “महाराज, इतके दिवस रक्तपात करून ज्या अघोरीची सेवा केली, शेवटी तिनेच माझ्या हृदयातील रक्तही पिऊन टाकलं. त्याच रक्तवर्णी, अज्ञानरुपी तृष्णेपासून मी दूर निघून आलो आहे. ती तृष्णा, ती पिपासा आता महाराजांच्या राज्यातील देवीच्या मंदिरात नाही, आता ती राजसभेत घुसून सिंहासनावर आरूढ झाली आहे.”

राजा म्हणाला, “जर ती मंदिरातील देवातून निघून गेली आहे तर हळूहळू मनुष्याच्या मनातूनही निघून जाईल.”

मागून एक ओळखीचा आवाज म्हणाला, “नाही महाराज - मनुष्याचं हृदय हेच प्रकृतीचं मंदिर आहे. तलवारींना धारही तिथेच चढवली जाते आणि तिथेच हजारो नरबळी दिले जातात. देवाच्या मंदिरात तर यातलं फक्त एक छोटंसं नाट्य घडतं.”

राजाने आश्चर्याने मागे वळून पाहिलं तर मंद स्मित करीत, प्रसन्न मूर्तीचा बिल्वन उभा होता. महाराजांना भरून आलं. त्याला नमस्कार करून म्हणाले, “आज माझ्या आनंदाला सीमा नाही.”

बिल्वन म्हणाला, “महाराज, तुम्ही स्वतःवर विजय मिळवला आहे, म्हणूनच सर्वांवर विजय मिळवला आहे. त्यामुळेच आज तुमच्या दारी शत्रू-मित्र सगळे गोळा झाले आहेत.”

फकीर पुढे होऊन म्हणाला, “मीसुद्धा तुमचा शत्रूच आहे महाराज. शेवटी मीही तुमच्या तावडीत सापडलोच.”

रघुपतीकडे बोट दाखवीत फकीर म्हणाला, “हा ब्राम्हण मला चांगलंच ओळखतो. मीच शुजा आहे, बंगालचा नवाब. मीच तुमचा काहीही अपराध नसताना तुम्हाला निर्वासित केलं आहे आणि त्या पापाची शिक्षाही भोगत आहे - माझ्या भावाची ईर्ष्या आज गल्लोगल्ली माझा पाठलाग करीत आहे. माझ्याच राज्यात मला उभं रहायलाही जागा नाही. वेषांतर करून आता मी अजून किती दिवस स्वतःपासून पळत राहणार? आज तुमच्यासमोर आत्मसमर्पण करून माझी या त्रासातून सुटका झाली.”

त्यानंतर राजा आणि नवाब दोघांनी एकमेकांना मिठी मारली. राजा फक्त “अहोभाग्य माझे..” एवढेच बोलू शकला.

रघुपती म्हणाला, “तुमच्याशी वैर करण्यातही फायदा आहे महाराज. तुमच्याशी वैर धरलं म्हणूनच तुम्ही माझा मोठ्या मनाने स्वीकार केलात, नाहीतर मी तुम्हाला कधी ओळखू शकलो नसतो.”

बिल्वन हसून म्हणाला, “म्हणजे गळ्यात पडलेला फाशीचा दोर सोडवता सोडवता मान जास्तच त्यात अडकत जाते तसं!”

रघुपती म्हणाला, “आता मला कसलंही दुःख नाही. मला शांती मिळाली आहे.”

बिल्वन म्हणाला, “शांती, सुख सगळं आपल्या आतच तर आहे. आपल्याला फक्त ते समजत नाही. जणूकाही देवाने एखाद्या मातीच्या मडक्यात अमृत भरून ठेवलंय, अमृत आहे असं सांगितलं तर कुणाचाही विश्वास बसत नाही, पण तेच एखाद्या तडाख्याने मडकं फुटलं की अमृताची चव कळते. मग आपण पश्चाताप करतो अरे अरे इतकी मौल्यवान वस्तूही अशा ठिकाणी सापडते!”

त्याचवेळी गगनाला भेदून टाकणाऱ्या किंकाळ्या किल्ल्यात घुमल्या. बघता बघता किल्ल्यात लहानमोठी अनेक मुलं जमा झाली. राजा बिल्वनला म्हणाला, “बघा ठाकूर, हे माझे ध्रुव!”

बिल्वन म्हणाला, “ज्याचा प्रसाद म्हणून तुम्हाला इतके सारे ध्रुव भेटलेत, तोसुद्धा तुम्हाला विसरला नाहीये. त्याला घेऊन येतो.” असं म्हणून बिल्वन बाहेर गेला.

थोड्याच वेळात त्याने ध्रुवला कडेवर उचलून आणलं आणि राजाकडे सोपवलं. राजाने त्याला छातीशी कवटाळून धरलं आणि म्हणाला, “ध्रुव!”

ध्रुव काही बोलला नाही. गंभीरपणे राजाच्या खांद्यावर डोके ठेवून शांत पडून राहिला. कितीतरी दिवसांनी भेटल्यामुळे त्याच्या मनात संकोच आणि अभिमान एकाचवेळी दाटून आले असावेत. राजाला घट्ट मिठी मारून त्याने आपला चेहरा लपवला.

राजा म्हणाला, “सगळं काही झालं, पण नक्षत्रने मात्र मला दादा म्हणून हाक मारली नाही!”

शुजा काहीशा कडवटपणे म्हणाला, “महाराज, इतर सगळे अगदी सहज भावाप्रमाणे प्रेम करतात, एक सख्खा भाऊ सोडून!”

शुजाच्या हृदयातील घाव अजूनही भरला नव्हता.

***
समाप्त

कथाभाषांतर

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

8 Aug 2020 - 12:34 pm | प्रचेतस

क्या बात है...
शेवट अतिशय उचित. अनुवाद अत्यंत ओघवता.

खूप छान झाली ही मालिका. आतापर्यंत रविंद्रनाथांचे साहित्य काहीच वाचले नव्हते. आता मात्र वाचायलाच हवे.

टर्मीनेटर's picture

8 Aug 2020 - 4:08 pm | टर्मीनेटर

खूप छान झाली मालिका.
धन्यवाद.

श्वेता२४'s picture

8 Aug 2020 - 7:59 pm | श्वेता२४

शेवट आवडला!

एस's picture

11 Aug 2020 - 4:20 pm | एस

अनुवाद केलाय असे कुठेही जाणवत नाहीये, की त्रिपुरा आणि बंगालसारख्या अमराठी प्रदेशात घडणारी कथा आहे असेही वाटत नाहीये, यातच तुमच्या लेखणीची ताकद दिसून येते. लिहीत रहा. काहीही झाले तरी लिहिणे थांबवू नका. अनुवादही आणि स्वतंत्र लेखनही करत रहा.

ठाकुरांची शैली काहीशी आपल्या गोनिदांसारखी. आजच्या व्यावहारिक युगात त्यातला भावविव्हलता, सैलसर नातेजिव्हाळी, सोशिक इदं न मम भाव, निसर्गाशी सात्मता हे सगळं उमजणं आणि पचनी पडणं अवघड आहे. पण हे सगळं जाणून घ्यायचं तर आपणही आपला 'मी'पणा थोडा बाजूला ठेवून मग ते वाचावं लागतं, तेव्हा कुठे थोडंथोडं मनाला हे लिखाण भावू लागतं. उपसंहारही वाचला. तितकाच आवडला.

पुनरेकवार, लिहीत रहा.