लगता नहीं हैं जी मेरा, उजडे हुए दयार में ,,,,,,,, भाग ४

शेखरमोघे's picture
शेखरमोघे in जनातलं, मनातलं
12 Apr 2019 - 5:43 am

(या आधी भाग १ लिहितांना मालिकेचे शीर्षक टंकतांना नजरचुकीने "दयार" लिहिण्याऐवजी "दरार" लिहिले गेले होते. ती चूक आता सुधारली आहे)

भाग १: http://www.misalpav.com/node/44368
भाग २ : http://www.misalpav.com/node/44372
भाग ३: http://www.misalpav.com/node/44375

दिल्ली शहरांत घुसण्याकरता शहराचे दरवाजे किंवा तट उध्वस्त होऊन शहरांत घुसता येण्याइतके खिंडार पडल्यावर लगेचच पुरेसे सैनिकदेखील त्या खिंडारांतून घुसण्याकरता तयार असायला हवे होते. इंग्रजांनी आपल्या तोफांचे मोर्चे तर तटाच्या दरवाजांवर लावलेच पण जर जमले तर सुरुंग लावून तटाला आणि दरवाज्याला भगदाडे पाडण्याकरता आणि नंतर हल्ले करत आंत घुसण्याकरता सैनिकांच्या टोळ्याही बनवल्या. १३ सप्टेंबरला इंग्रजाना तोफांच्या माऱ्याने काश्मीर दरवाजाजवळ तटाला भगदाड पाडता आले पण तटाच्या आंतल्या हिंदुस्थानी सैनिकांनी तिथे रातोरात दगडामातीचे ढिगारे लावून आंत घुसण्यास अडथळेही तयार केले. १४ सप्टेंबरला काश्मीर दरवाजाबाहेर सुरुंग लावण्याकरता झटणाऱ्या इंग्रजांना बंदुकीच्या गोळ्यांचा वर्षाव सहन करावा लागला. तेथे सुरुंगाची दारू ठासून त्याची वात पेटवण्याच्या प्रयत्नांकरता दोन इंग्रजाना त्यावेळचा इंग्रजांकडचा सर्वोच्च सन्मान व्हिक्टोरिया क्रॉस मिळाला यावरून त्यावेळच्या धुमश्चक्रीची आणि त्या प्रयत्नांकरता लागणाऱ्या साहसाची कल्पना करता येईल, अखेर तेथे सुरुंगाने दरवाज्याच्या शिल्लक राहिलेल्या भागाला भगदाड पाडून हातघाईच्या लढाईनंतर कांही इंग्रज अधिकारी आणि त्यांचे सैनिक शहरांत घुसू शकले पण त्या प्रयत्नांत दोन्ही बाजूंचे बरेच लोक कामी आले. मग काबूल दरवाजा, लाहोर दरवाजा, मोरी दरवाजा अशा विविध दरवाजांजवळ साधारण असाच प्रकार होत, लहान मोठ्या लढायांनंतरच कांही इंग्रज सैन्याच्या टोळ्या वेगवेगळ्या संख्येने शहरांत शिरू शकल्या. हिंदुस्थान सैनिक मागे हटत, जमेल तेथे उंचावरच्या जागी पुन्हा तोफा उभ्या करत, किंवा बंदुकांचा मारा करण्याच्या जागा मिळवत शहराच्या वेगवेगळ्या भागांत लढत इंग्रजांचा प्रतिकार करत राहिले. अनेक भागांत हातघाईच्या लढाईशिवाय इंग्रज अधिकारी आणि त्यांचे सैनिक पुढे सरकू शकत नव्हते. अशा प्रत्येक लहान मोठ्या लढायांनंतर दोन्हीही बाजूंची मनुष्यहानी वाढतच राहिली. त्याशिवाय सगळीकडे होणाऱ्या तोफांच्या माऱ्याने अनेक घरे आणि इमारती पूर्ण किंवा अंशतः कोसळल्याने, रस्त्यांवर पडलेले जखमी आणि मृत सैनिक आणि घोडे यांची विल्हेवाट न लावता आल्याने आणि पाण्याचीसुद्धा ने आण करता न आल्यानें दोन्हीकडच्या सैनिकांच्या आणि इतर दिल्लीकरांच्या हालअपेष्टा वाढतच राहिल्या.

१८ सप्टेंबरपर्यंत जरी दिल्ली शहरातून इंग्रजाना होणारा प्रतिकार मंदावू लागला होता तरी अजूनही दिल्ली शहराच्या अनेक भागांत सैनिकांच्या लहान लहान टोळ्या आणि वेगवेगळ्या पलटणींबरोबर आलेले कडवे मुसलमान "गाझी" (धर्माकरता लढून जीव देण्यास तयार असलेले) इंग्रजांबरोबरच लढा देत राहिले असल्याने, इंग्रज सैनिक शहराचे माहितगार बरोबर घेत, कधी संगिनी वापरत तर कधी तोफांच्या माऱ्याने अडथळे उध्वस्त करत, अनेक मोहल्ल्यांत घुसून हिंदुस्थानी सैनिकांना हुसकावत, घरांची झडती घेत "इंग्रजविरोधी" असल्याची शंका वाटणाऱ्या लोकांना कधी ताब्यात घेऊन तर कधी जाग्यावरच संगिनीने भोसकून किंवा गोळी मारून ठार करत सगळ्या तऱ्हेचा विरोध मोडून काढत होते.

बादशहा इंग्रंजांच्या हाती लागल्याखेरीज दिल्ली पूर्ण ताब्यांत मिळवणे शक्य झाले नसते म्हणून कॅप्टन विल्यम हॉडसनला बहादूरशहाला ताब्यात मिळवण्याचे जबाबदारी देण्यात आली. बेगम झीनत महलला हवे होते त्या प्रमाणे बहादूरशहाला "जीवाला भीती नाही" अशी हमी द्यावी का या प्रश्नावर त्याला वरिष्ठांकडून गुळमुळीत उत्तरे मिळाली . "शहाजाद्यांसारखे राजघराण्यातील इतर लोक हाती लागले तर त्यांचे काय करावे" या प्रश्नावर देखील "धरावे" किंवा "मारावे" असे स्पष्ट काहीच कळले नाही. १८ सप्टेंबरपर्यंत बहादूरशहाला आता राजमहालात राहणे धोक्याचे आहे असे वाटू लागले होते. बख्त खानाचे/बरेली पलटणीचे संरक्षण घेत शहराबाहेर निघून जावे की आणखी काही करावे असा पेंच त्याच्यापुढे पडल्यावर "आम्ही इंग्रजांशी बोलून तुमचा जीव वाचवू" असे बेगम झीनत महल आणि तिचे सल्लागार यांचे सांगणे ऐकून बादशहा दिल्ली शहराबाहेर हुमायूनच्या कबरीत जाऊन थांबला. त्याच्याबरोबर बराच लवाजमा आणि काही शहाजादेही होते. ही बातमी कॅप्टन विल्यम हॉडसनला लागल्यावर काही स्वारांबरोबर तो बेगम झीनत महलच्या काही सल्लागारांसह बादशहा होता तेथे पोचला. "बादशहा जर निमूटपणे शरण आला तरच त्याचा जीव वाचेल नाहीतर त्याच्या जीवाची खात्री देता येणार नाही" हा हॉडसनचा ठाम निरोप बेगम झीनत महलच्या सल्लागारांनी बादशहाला दिल्यावर आपल्याबरोबरच्या लोकांशी विचारविनिमय करून बादशहाने स्वतःला हॉडसनच्या हवाली केले. त्याच्याबरोबरच्या आणि इतरही जमलेल्या बऱ्याच मोठ्या जनसमुदायालाही (२००० ते ३००० लोक) जवळ फक्त काही स्वार असतानाही "मुकाट्याने तुमची शस्त्रे आमच्या हवाली करा, नाहीतर बादशहाची धडगत नाहीं " अशी हॉडसनने तंबी दिली आणि बादशहा व तीन शहाजादेही आपल्या ताब्यात घेऊन एकीकडे लोकांची शस्त्रे गोळा करत दुसरीकडे बादशहा आणि शहाजादे यांना त्यांच्या आजूबाजूच्या मोठ्या जनसमुदायापासून वेगळे पाडत शहरांत आणले. हे सगळे आपण इतक्या झटपट, इतक्या थोड्या लोकांना घेऊन आणि निर्विघ्न पार पाडू शकलो याचे नंतर कॅप्टन विल्यम हॉडसनलाच आश्चर्य वाटले असावे!!

बहादुरशहा इंग्रजांनी ताब्यात तर घेतला होता आणि त्यानंतर त्याला एखाद्या सामान्य गुन्हेगारासारखे, मळक्या आणि फाटक्या कपड्यात, त्याच्या काही नोकर-चाकर आणि जवळच्या कुटुंबीयांसकट त्याच्याच प्रचंड राजप्रासादाच्या आवारातल्या कांही खोपटांमध्ये डांबले होते. राजसिंहासनावर मिरवलेला, शेरोशायरी करणारा, उत्तम उर्दू आणि फारसी अक्षरे कलात्मक तऱ्हेने लिहिणारा बादशहा, एका खाटेवर जेमतेम टेकू देणाऱ्या गादीवर विराजमान होत, कागद आणि लेखणी वापरण्याची बंदी असताना आपल्या आयुष्यात पुढें काय वाढून ठेवले असेल (जेवायला तसेच भोगायला) या काळजीत वेळ घालवत होता.

आणि आता इंग्रजाना प्रश्न हा पडला होता की या "गुन्हेगारावर" खात्रीशीर शाबीत होऊन, जास्तीत जास्त शिक्षा देता येईल अशा कुठल्या गुन्ह्याचा आरोप नक्की करता येईल!

असा पेच पडण्याचे कारण इथे जो "फिर्यादी" होता तो म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी हा एका अर्थाने या बादशहाचा चाकर होता - कारण या कंपनीचे हिंदुस्थानांतले सगळे बस्तानच याच बादशहाच्या पूर्वजांनी दिलेल्या परवानगीवर आधारित होते. १८३३ सालापर्यंत कंपनीच्या नाण्यांवर देखील "फिदवी शहा आलम" - (Shah Alam's Devoted Dependent) असे लिहिलेले असे, की जे कंपनीने, बादशहाच्या कमजोरीचा फायदा घेऊन कुठल्याही कायदेशीर पद्धतीचा वापर न करताच काढून टाकले होते. त्या काळांत दिल्लीत आलेल्या ब्रिटिश "टाइम्स" च्या विल्यम हॉवर्ड रसेल या वार्ताहराच्या मते "proper" इंग्लिश न्यायालयात, इंग्लिश कायद्याप्रमाणे बहादूरशहावर कुठलेच गंभीर आरोप सिद्ध होऊ शकले नसते कारण दिल्लीतल्या "कांडाचे" कारण होते कंपनीला स्वतःचेच शिपाई आवरता न येणे ! बहादूरशहाने कांही त्यांना कंपनीविरुद्ध भडकवले नव्हते किंवा दिल्लीत येण्याचे आमंत्रणही दिले नव्हते आणि जो कांही प्रकार दिल्लीत घडला तो घडू न देणे किंवा आटोक्यात ठेवणे हे त्याच्या आवाक्याबाहेरचे होते.

(क्रमशः)

मांडणीविचार

प्रतिक्रिया

कुमार१'s picture

12 Apr 2019 - 9:57 am | कुमार१

पु भा प्र

शेखरमोघे's picture

12 Apr 2019 - 7:05 pm | शेखरमोघे

आभार.

अनिंद्य's picture

12 Apr 2019 - 1:27 pm | अनिंद्य

......"proper" इंग्लिश न्यायालयात, इंग्लिश कायद्याप्रमाणे बहादूरशहावर कुठलेच गंभीर आरोप सिद्ध होऊ शकले नसते कारण दिल्लीतल्या "कांडाचे" कारण होते कंपनीला स्वतःचेच शिपाई आवरता न येणे ! .....

बरोब्बर !

पुढील भागाची उत्सुकता आहे.

शेखरमोघे's picture

12 Apr 2019 - 7:05 pm | शेखरमोघे

आभारी आहे.

चित्रगुप्त's picture

13 Apr 2019 - 4:22 am | चित्रगुप्त

येडाच होता बहादुरशहा. सरळ चांदणी चौकात आमरण उपोषणाला बसायचे होते, "बिना खड्ग बिना ढाल" देशाला 'आजादी' देऊन टोपीकर इंग्लंडास रवाना झाले असते, आणि आजतागायत नाण्यांवर, नोटांवर बहादुरशहाचे चित्र छापले गेले असते, प्रत्येक गावात त्याच्या नावाचे हमरस्ते, शाळा, चौक आणि काय काय झाले असते.
... हां, पण जर मुर्ग मुसल्लम, सीक कबाब, शाही बिरयानी, मालपुए, पनीर कोफ्ते वगैरेंशिवाय रहाणे अशक्य होते, तर सरळ दिल्लीतल्या पाच-सहाशे कव्वालीवाले, शायर, मोहरमची सोंगे वठवणारे, मुजरेवाल्या, नौटंकीवाले, सोंगाडे, बहुरूपिया आणि विविध प्रकारचे 'फनकार' गोळा करून त्यांच्या सह्यांचे पत्रक जारी करायचे होते. हां हां म्हणता टोपीकर दाती तृण धरून शरण आले असते.

रमेश आठवले's picture

13 Apr 2019 - 9:35 pm | रमेश आठवले

बहादूरशाहनी हिंदुस्तान मध्ये दोन गज जमीन सुद्धा कबरीसाठी मिळु शकली नाही असा विलाप या लेखाच्या शीर्षकात असलेल्या गझल मध्ये केला होता. पण आज त्याच्या नावाची एक मोठी सडक दिल्लीत आस्तित्वात आहे.

पद्मावति's picture

14 Apr 2019 - 3:13 pm | पद्मावति

सुंदर. पु.भा.प्र.