एकोणतीस नव्वे एकसष्ठ दोन.
मध्यंतरी एक "झोल" म्हणतात तसा झाला. माझं आणि झोपेचं वाजलं. ती काही माझं ऐकेना. माझ्या डोळ्यांत उतरेना. रात्रभर झोप नाही. क्वचित कधीतरी लागलीच तर तास दोन तास. रात्री बारा , बारा,एक, एक वाजेपर्यंत मी तळमळायची.(प्रेमात पडलेली नसतानाही) नंतर जरा झोप येतेय असं वाटायचं तर बाथरुमला लागायची. तिकडं जाऊन आल्यावर पुन्हा झोपेची आराधना. सफल होगी तेरी आराधना, काहेको रोए।असं म्हणून मी माझं समाधान करुन घ्यायची. पण छेः! झोप माझ्याशी फटकूनच वागायची. पहाटे साडेतीन नंतर डोळे जरा जड व्हायचे तर साडेपाच वाजता नेहमीच्या वेळेला मी टक्क जागी.