आठवणीतला श्रावण
श्रावण सुरु झाला कि एक नवीन चैतन्य सृष्टीत निर्माण होते. आषाढ एकादशी साठी आपल्या विठुरायाच्या दर्शनाला गेलेला शेतकरी परतलेला असतो. शेतात पेरणी झालेली असते. सृजनासाठी धर्तीच्या कुशीत बियाणे शांत झोपी गेलेले असते. आषाढ मेघ आपल्या सरींच्या द्वारे जमिनीवर भेटीसाठी उतरतात. धरती तशीच ग्रीष्माच्या तापाने तापलेलेली असते. ती या मिलनाची मोठ्या आतुरतेने वाट पाहत असते. धर्तीच्या व वर्षा धारेच्या या मिलनातून, धरतीच्या पोटात पडून असलेले बियाणं अंकुरते, जमिनीच्या एक एक आवरणाला विभागत हलकेच बाहेर डोकावू लागते. त्या कोवळ्या अंकुराला रवी किरणाने स्वतः;ला न्हाऊ घालायचे असते.