समिधा

क्रान्ति's picture
क्रान्ति in जे न देखे रवी...
7 Sep 2009 - 7:23 pm

उभ्या जन्मात मी बहुधा
तुझ्या यज्ञातली समिधा ||

कधी मी सावली झाले
तुला ग्रीष्मात जपणारी
तुझ्या बहरात मी झाले
कळी गंधात रमणारी
बहरले धुंद मी कितीदा
तुझ्या यज्ञातली समिधा ||

कधी अभिसारिका झाले,
प्रिया झाले, सखी झाले
रमा नारायणाची,
शंकराची पार्वती झाले
कधी कृष्णा तुझी राधा
तुझ्या यज्ञातली समिधा ||

तुला पाहून माझ्या अंतरी
प्राजक्त दरवळतो
कुठेही जा, तुझ्यासाठीच
माझा जीव घुटमळतो
प्रिया, तू सूर्य मी वसुधा
तुझ्या यज्ञातली समिधा ||

शांतरसकविता

प्रतिक्रिया

धनंजय's picture

7 Sep 2009 - 11:53 pm | धनंजय

चित्रपट गीत म्हणूनही मस्त.

ही कविता वाचताना शेजारच्याच "समृद्ध करणारे असे काही" सदरातले "येणार नाथ आता" हे गाणे ऐकतो आहे.

अशाच एखाद्या चित्रपटातल्या शांत-उदात्त नायिकेच्या दिनक्रमाचे चित्रण होताना वरिल कविता स्वरबद्ध होऊन गायली जात आहे, असे चित्र डोळ्यांपुढे आले.

बिपिन कार्यकर्ते's picture

8 Sep 2009 - 12:04 am | बिपिन कार्यकर्ते

असेच काहीसे वाटले.

कुठेही जा, तुझ्यासाठीच
माझा जीव घुटमळतो

निरपेक्ष प्रेमाची परमावधी.

अवांतर: ही कविता वाचताना 'दुःखाच्या वाटेवर गाव तुझे लागले' वगैरे आठवले.

बिपिन कार्यकर्ते

ऋषिकेश's picture

8 Sep 2009 - 10:17 am | ऋषिकेश

समिधा हा शब्दच मला फार आवडतो.त्यागापेक्षा वेगळे असे आत्मसर्पण त्या शब्दात भरले आहे. आणि त्या शब्दाचा चपखल वापर करून कविता अधिकच खुलली आहे असे वाटते

ऋषिकेश
------------------
सकाळचे १० वाजून १४ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक सुमधूर गीत "माझी न राहिले मी...."

यशोधरा's picture

8 Sep 2009 - 3:47 pm | यशोधरा

>>समिधा हा शब्दच मला फार आवडतो. त्यागापेक्षा वेगळे असे आत्मसर्पण त्या शब्दात भरले आहे.

असेच म्हणते. सुरेख कविता.

विमुक्त's picture

8 Sep 2009 - 12:07 pm | विमुक्त

आवडली...

सायली पानसे's picture

8 Sep 2009 - 1:54 pm | सायली पानसे

खुप सुरेख कविता.... एकेक ओळ सुंदर आहे क्रांती ताई.

अनिल हटेला's picture

8 Sep 2009 - 3:37 pm | अनिल हटेला

नेहेमीप्रमाणे सुरेख कविता!!!
आवडली.... :-)

बैलोबा चायनीजकर !!!
I drink only days ,which starts from 'T'...
Tuesday
Thursday
Today ;-)

प्राजु's picture

8 Sep 2009 - 8:04 pm | प्राजु

सुरेख!! निखळ समर्पणाची भावना आहे.
खूप आवडली.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

अन्वय's picture

8 Sep 2009 - 8:24 pm | अन्वय

क्रांती, छानच झालीय कविता
तुमची "करून झाले' ही गझलही खूप भावली

चतुरंग's picture

8 Sep 2009 - 8:49 pm | चतुरंग

समर्पणाचा भाव व्यक्त करणारी अतिशय सुंदर कविता! वा वा जियो!! :)

(यज्ञेश्वर)चतुरंग