महिला आघाडीची जुगलबंदी

क्रान्ति's picture
क्रान्ति in जनातलं, मनातलं
26 Jul 2009 - 10:38 pm

चमकून जाऊ नका मिपाकर मंडळी. राजकारण हा माझा प्रांत नाही आणि ज्यांच्यावर मी हा लेख लिहितेय, त्यांचाही नाही. त्याचं काय आहे, की मिपावर संगीत महोत्सव सुरू आहे, तेव्हा विचार केला, आपणही या वहात्या संगीत सरितेत हात धुवून घ्यावेत. तर हा धागा आहे हिंदी चित्रपट संगीतातील दोन किंवा अधिक गायिकांनी गायिलेल्या गाण्यांबद्दल. १९५० ते १९७०-७५ हे हिंदी चित्रपट संगीताचं सुवर्णयुग मानलं जातं. त्या काळात चित्रपट संगीतात अनेक प्रयोग झाले, ते सर्वांगांनी बहरलं. त्यातला एक प्रयोग होता द्वंद्वगीतांचा, जी दोन गायिकांनी गायिली आहेत. परवा कधीतरी सकाळी सकाळी ना मैं धन चाहूं हे अप्रतिम भजन ऐकलं आणि मग या दिशेनं मनाचा प्रवास सुरू झाला. सचिनदांच्या संगीतातलं काला बाजार या चित्रपटातलं हे सुरेल भजन ऐकताना आणि पहातानाही साक्षात देव दिसेल! लीला चिटणीस आणि बेबी नंदा यांचा तरल अभिनय, गीताबाई आणि सुधा मल्होत्रा यांचे भावपूर्ण गायन आणि ऐकणारे उदंड रसिक! असंच यमन रागातलं हे भजन राजेश रोशन यांनी संगीत दिलेलं. आशाबाईंचा आलाप अगदी गाभा-यातून यावा तस्सा! हे फक्त श्रवणीय असल्याने तू-नळीचा दुवा दिला नाहीय! [अर्धं भजन होईपर्यंत छोटा छोटा स्कर्ट घातलेल्या लक्ष्मीबाईंना पहावं लागतं त्यात!] हे आहे जुलीमधलं 'सांचा नाम तेरा | तू श्याम मेरा'.
सचिनदांच्याच संगीतात एक अत्यंत भन्नाट जुगलबंदी आहे, मधुबालाचा खट्याळपणा आणि मीनू मुमताजचा अवखळपणा यांचं सुरेल रूप आशाबाई आणि गीताजींच्या आवाजात. रसिकांनी ओळ्खलं असेलच म्हणा, तरीही दुवा देतेही पहा मैत्रिणींची छेडछाड! जानूं जानूं री काय ठेका, काय ठसका! पहिल्या 'जानू' मध्येच घायाळ! असंच अल्लड शशिकला आणि शांत नूतन यांच्यावर चित्रित झालेलं हे सुमधुर गीत! बचपन के दिन भी क्या दिन थे सचिनदांचा हा अंदाज पण अगदी सही! चलती का नाम गाडी या चित्रपटातलं खूप कमी ऐकायला मिळणारं हेलनवर चित्रित एक जुगलबंदी गीत आहे 'हम तुम्हारे हैं जरा घरसे निकलकर देखो' या गाण्यातला तबला! [माझ्या अंदाजाप्रमाणे तो रूपक ताल असावा, तज्ञांनी मार्गदर्शन करावे.] हेच ते सुधा मल्होत्रा आणि आशाबाईंचे गाणे.
ही झाली पिताश्रींची कमाल. छोटे मियां तरी कुठे मागे राहिलेत? आठवते ही पडोसन? मैं चली मस्त पिकनिक सुरू आहे सायकलवर! पंचमदांचा अंदाज काही औरच! क्या बात है! आशाबाई, लताबाई आणि भन्नाट पिकनिक! याला म्हणतात गाणं!
आपले एलपी, लक्ष्मी-प्यारे यांनी तर सुरुवातच अशा जुगलबंदीनं केलीय! हा नूरानी चेहरा आठवला? हेलनबाई, लताबाई, कमल बारोट आणि सुरेखसं गाणं. भेंड्यांमधलं हमखास गाणं.
त्यांचाच हा एक अंदाज पहा. कव्वालीच ना ही? ऐ काश किसी दीवाने को [आशाबाई आणि लताबाईंची. आशा पारेखबरोबरची सहनायिका कोण, ते आठवत नाही! कुणी सांगेल का?]
आणि हा पंजाबी लहजा? नी मैं यार मनाना णी लताबाई आणि मिनू पुरुषोत्तम यांचं हे ठसकेबाज गाणं मनात ठसतं. हा एक नाजूकसा अंदाज एलपी, आशाबाई आणि लताबाई यांचा. रेखा आणि अनुराधा पटेल, मन क्युं बहका . हे सगळे याच महान व्यक्तिमत्वांचे विविध अंदाज. किती ऐकावं आणि किती नाही ?
क्रमशः

नृत्यसंगीतआस्वाद

प्रतिक्रिया

मस्त कलंदर's picture

26 Jul 2009 - 11:32 pm | मस्त कलंदर

हे राग-बिग आपल्याला काही कळत नाही... पण गाणी जाम आवडतात....
हे घ्या यादीत आणखी थोडी भर... तशी बरीच गाणी आहेत.. पण लेख वाचतानाच आठवली ती गाणी...

लारा लप्पा लारा लप्पा लायी लख दा.. , (म्हणजे नक्की काय हो??)
लता नि उषा यांची जुगलबंदी... हो... तुमको पिया दिल दिया कितने नाझसे...(हा पिया चक्क चक्क अजित आहे)
याच दोघींचंच आणखी एक अफलातून गाणं अपलम चपलम पोरी काय मस्त नाचतात हो.. ऐकलं बर्‍याचदा... कधीतरी शाळेत असताना रंगोलीमध्ये प्रथम पाहिलं नि त्यानंतर आजच.. पण चित्रफीत पाहिली नाही म्हणून गाण्याची जादू काही कमी होत नाही...
पुन्हा मुस्लिमी ढंगातल्या शिनिमातलं... मेरे मेह्बूब में क्या कमी...,
जीव ओवाळून टाकावा अशी लता नि शमशाद बेगम यांची कव्वाली.... तेरी मेहफिलमें किस्मत आज़माकर हम भी देखेंगे... या गाण्यात मला मधुबालापेक्षा निगार सुलतानच जास्त आवडली... पण त्यानंतर "जहनसीब... काँटोंको मुरझानेका खौफ नहीं होता!!!" हे वाक्य निगार नि दिलीपकुमारला अक्षरशः खाऊन टाकतं...
लता नि आशाचं आणखी एक अतिशय आवडतं गाणं.. "ऐ चाँद जहाँ वो जायें".. हे बहुतेक शारदा मधलं...
शमशाद्जींच्या आवाजाचा पोतच निराळा... त्यांची "कज़रा मोहब्बतवाला" नि "रेशमी सलवार कुर्ता जालीका" ही गाणी भेंड्या खेळताना कोणत्याही पक्षानं चालू केलं तेरी दोन्ही पक्ष तितक्याच उत्साहानं गातात..

नि गोरे गोरे ओ बाँके छोरे.. विसरून कसं चालेल... यातला एक आवाज लतादी हे माहीत होतं.. इथं दुवा टाकण्यासाठी थोडं गुगलवलं.. तर दुसरा आवाज अमीरबाई कर्नाटकींचा आहे असं कळलं.. नि गाणं माहीत होतं पण चित्रफीत आज प्रथमच पाहिली... :)

मंडळी येऊद्यात आणखी गाण्यांच्या आठवणी नि दुवे!!!!

(सध्या यूट्युबवरून गाणी उतरवण्यात व्यस्त)
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

क्रान्ति's picture

27 Jul 2009 - 12:43 am | क्रान्ति

दोनदा टंकलेला लेख हरवला म्हणून तीन भागांत टंकला! त्यात तुमच्या प्रतिसादातली बरीच गाणी दुव्यांसह दिली होती, पण तो जड होतोय की काय, या विचारानं दुवेही कमी केले. तशीही बरीच गाणी बघणीय नसतात, ऐकणीयच असतात ना! तुमचा प्रतिसाद मनापासून आवडला.

क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा
रूह की शायरी