पारध झालेला तो पारधी

प्रसन्न केसकर's picture
प्रसन्न केसकर in जनातलं, मनातलं
15 Jul 2009 - 4:10 pm

* हे सर्व अनुभव मी स्वतः सोळा वर्षांपुर्वी घेतलेले आहेत. परंतु ते कुठेच शब्दबद्ध केलेले नव्हते. केवळ आठवणीच्या आधारे लिहिताना काही गोष्टींचा थोडाफार विपर्यास होऊ शकतो यासाठी हे लिखाण कथा या सदराखाली केले आहे.

१९९३ च्या जुनचा तो बहुधा दुसरा आठवडा असेल. एके दिवशी पुणे ग्रामीण पोलिसांच्या प्रेसनोट मधे एका बारामतीला दोन दिवसाआधी झालेल्या चोरीच्या गुन्ह्याची माहीती होती. चोरी हा तसा पुण्यासारख्या शहरात नेहमी घडणारा गुन्हा. रोज एव्हढ्या चोर्‍या शहरात होतात की तेव्हाच आम्ही पत्रकारांनी अलिखित नियम केला होता की किमान दहा पंधरा हजाराचा माल गेलेला नसेल तर चोर्‍यांच्या बातम्या द्यायच्याच नाहीत. पण सहज नजर फिरवली अन त्या गुन्ह्याचे वेगळेपण जाणवले. प्रेसनोटमधे आरोपीचे नाव लिहिले होते पिन्या हरी काळे (मयत). नावावरुनच कळत होते की पिन्या पारधी जमातीचा होता. ही जमात तशी शूर पण १८७१च्या क्रिमीनल ट्राईब्ज अ‍ॅक्ट ने तिच्यावर गुन्हेगारी जमातीचा शिक्का मारला अन संपुर्ण जमात सेटलमेंट नावाच्या तुरुंगांमधे बंदीवान झाली. ब्रिटीशांच्या 'अक्कलहुशारीमुळे' अश्या अनेक "गुन्हेगारी जमाती" तयार झाल्या होत्या. त्यातले लोक सेटलमेंट नावाच्या तुरुंगातच जन्मायचे, तिथेच जगायचे अन तिथेच मरायचे. १९५२ मधे भारत सरकारने या जमातींना क्रिमिनल ट्राईब म्हणणे बंद केले अन विमुक्त असे नवे नाव दिले. पण त्या आर्थिक, सामाजिकदृष्ट्या मागासलेल्याच राहिल्या. त्यातलीच ही एक - समाजाने नाकारलेल्या, पोलिसांच्या अरेरावीला बळी पडणार्‍या लोकांचा गट. अश्या लोकांच्या पुनर्वसनासाठी अनेक योजना आल्या पण सर्व फसल्या. त्यांच्या नशीबी गुन्हेगाराचेच जिणे लिहिले होते या समाजाने अन त्याने निर्माण केलेल्या निर्दय व्यवस्थेने.

प्रश्न पडला की चोर मयत कसा झाला म्हणुन चौकशी केली तर कळले की ७ जुनला चोरी झाल्यावर काही वेळातच त्याला पोलिसांनी पकडले होते अन रात्रभर पोलिस स्टेशन मधे त्याच्याकडे तपास केला होता. दुसर्‍या दिवशी म्हणे त्याला पोलिसांनी त्याच्या घरी नेले अन घरझडती घेतली. झडती संपत आली तेव्हा म्हणे पिन्या पळाला अन पाठलाग सुरु झाला. एका शेतातुन पळता पळता पिन्या म्हणे कश्यालातरी अडखळून पडला अन जागीच मेला. ही माहीती मी घेईपर्यंत त्याचे अंत्यसंस्कारही झाले होते (पारधी मृतांना पुरतात).

पोलिसांनी सांगितलेल्या 'स्टोरीत' बरीच लूपहोल्स वाटत होती. विचार केला बारामतीला जावुन याबाबत सखोल चौकशी केली पाहीजे पण इतर कामे, कंटाळा यात दोन तीन दिवस गेले. दरम्यान हा विषय डीएनटी-रॅग या भटक्या विमुक्तांसाठी काम करणार्‍या संस्थेने अन पारधी महासंघाने मुंबईत लावुन धरला होता. त्यावेळी नागीन काळे नावाची या समाजाची एक तरुणी फौजदार झाल्यामुळे पारधी समाजाबद्दल बरीच उत्सुकताही वाढली होती. नंतर कळले ११जुनला पारधी समाजाचे लोक बारामतीला या विषयावर आंदोलन करणार आहेत अन लगबगीने मी बारामतीत डेरेदाखल झालो. मदतीला होते तेथिल एक मुक्त पत्रकार्-कार्यकर्ते अविनाश गायकवाड अन पारधी समाजातील माझा खबर्‍या चिंध्या (हे त्याचे खरे नाव नाही. खरे नाव जाहीर करण्याने त्याच्या जिवाला धोका उत्पन्न होऊ शकतो म्हणुन दिले नाही.) हा माझा पारधी जमातीशी जवळुन आलेला पहिला संबंध.

त्या दिवशी बारामतीत जवळपास हजारभर पारधी कुटुंबे आली होती. नगर, सातारा, सोलापुर, सांगली सारखे जिल्हे; मराठवाडा अश्या दुरदूरच्या ठिकाणांहुन ते लोक आले होते. पण निदर्शने शांततेत पार पडली. प्रसिद्ध लेखक लक्ष्मणराव गायकवाड यांचे नेतॄत्व होते. त्यावेळी अनेक पारध्यांशी मनमोकळ्या गप्पा झाल्या अन बरीच माहीती मिळाली.

"सगळ्यांना वाटते सगळे पारधी एक. पण तसे नाही. आमच्यात आठ जाती आहेत - राज पारधी, फांसेपारधी,लंगोटी पारधी, चिता पारधी, पाल पारधी गाव पारधी अश्या. आमच्या जातीला खूप मोठा इतिहार आहे. आमचे पुर्वज राणा प्रतापाच्या सैन्यात होते. राणा प्रताप जिंकल्याशिवाय गावात परतणार नाही अशी त्यांनी शपथ घेतली अन जंगलात रहायला गेले. युद्ध संपले पण त्यांनी प्रतिज्ञा मोडली नाही. आमचा समाज जंगलातच राहीला, शिकार करत. पण नंतर गोरा साहेब आला. त्याला भीती की आम्ही बंड करु म्हणुन त्याने आम्हाला चोर ठरवलं. आपले गावातले लोक पण त्यांना भुलले आणि आम्हाला गावकुसाबाहेर काढले. शिकारीवर पण बंदी आली. आम्हाला ना कधी शिकायला मिळाले ना पैसा कसा कमवायचा ते कळले. मग जगायला आम्ही तरी काय करणार? काही लोक लागले दारु गाळणे, चोर्‍या असे धंदे करायला. नेहरु, विनोबा भावे, जयप्रकाश असे थोडे पुढारी आमचा विचार करायचे. त्यांनी लोकांना सांगीतले तुमच्याकडे एव्हढी जमीन आहे थोडी या लोकांना द्या. त्यांना जगु दे. घरे बांधु दे. पण चांगली जमीन कोण सोडणार? लोकांनी सरकारला दिली खडकाळ पडीक जमीन. ती आमच्यातल्या काहीना मिळाली पण एकतर ती जमीन नापिक अन त्यात आम्हाला शेती कशी करायची माहीती नाही. ती राहीली तशीच पडुन, गावात चरायला लोक ती वापरतात अन शहरात तर बिल्डरांनी तिथे इमारती बांधल्यात. आम्ही होतो तिथेच राहीलोय," चिंध्या मला सांगत होता. भूदान, सर्वोदय या चळवळी का अन कश्या फसल्या याचा जणु तो लेखाजोखाच होता.

इथे जरी मी हे सगळे मराठीत लिहिले असले तरी त्याची भाषाही वेगळीच होती. नंतर पुण्यात परतल्यावर चौकशी केली तेव्हा कळले की पारधी लोक हिन्दी, गुजराथी, मारवाडी, मराठी अश्या अनेक भाषांची सरमिसळ करुन तयार झालेली वेगळीच भाषा बोलतात. फक्त भाषाच नाही तर त्यांची संपुर्ण संस्कृतीच वेगळी आहे. पारधी पुरुषांचा पारंपारिक पोषाख मुंडासे अन लंगोट असा असतो तर बायका घागरा चोळी, गुजराथी पद्धतीची साडी नेसतात. तरुण मुली परकर पोलके घालतात अन मुले हाफचड्ड्या. हल्ली पारधी तरुण पॅन्ट्-शर्ट घालतात तर बायका नायलॉनच्या साड्या नेसतात. या समाजाचे देव पण वेगळे. ते देव म्हणजे वेगवेगळ्या अप्सरा, यक्ष, नैसर्गिक शक्तीची प्रतिके असतात. काही देव माणसांचे मित्र तर काही शत्रु असतात. त्यांना ते धानी, जारण अश्या नावांनी संबोधतात अन त्यांना जनावरांचे, पक्षांचे बळी देतात. त्यांची नावेपण वेगळी - चॉकलेट्या, फौजदार्‍या, बिबळी अशी. पारधी कोणताही आवडलेला शब्द मुलांचे नाव म्हणुन वापरतात. साधारणतः पारध्यांची राहणी अस्वच्छ म्हणण्यासारखी. आंघोळ नियमीत नसल्याने अनेकांच्या अंगाला वास येतो अन दात न घासल्याने ते किडलेले असतात. पारधी बायका तश्या रुपवान - काळ्यासावळ्याच पण देखण्या, बांधेसुध अन त्यांचे डोळेपण पाणीदार टप्पोरे असतात. पण बहुधा त्या पण अस्वच्छ रहातात, अनेकदा फण्या कंगवे विकणार्‍या या बायकांचे स्वतःचे केस मात्र विस्कटलेले असतात अन कपडे मळलेले. हे सर्व त्या बहुधा शीलरक्षणार्थ करत असाव्यात. तश्या त्या दिसायला देखण्या असल्याने अनेकदा टोळभैरव त्यांच्याकडे आकर्षित होतात. विरोध करण्याची शक्ती नाही अन समाजातुन कुठल्याच प्रकारचा पाठिंबाही नाही अशा परिस्थितीमुळे बहुधा त्यांची राहणी अशी असावी.

तोवर तिथे फलटणहुन आलेली चलाखी आम्हाला सामील झाली होती. चलाखी चिंध्याची मेहुणी. ती म्हणाली, "मुळात आम्ही बंडखोर असल्याने कायदे मोडणे, गुन्हे करणे अनेकदा आमच्या समाजात प्रतिष्ठेचे मानले जाते. मुलगा चोरी करतो तेव्हाच तो वयात आला असे समजतात अनेक जण. जर गुन्हा केला नाही तर त्याच्याशी सोयरीक होत नाही. शिवाय आमच्यात लग्न करायला मुलगी तिच्या आईबापाला लिलावात पैसे देवुन विकत घ्यावी लागते. त्याला द्याज म्हणतात. वर लग्न झाले अन त्या बाईला दिलेल्या द्याजापेक्षा जास्त पैसे देणारा कोण भेटला तर ते पैसे घेऊन तिला सोडुन द्यावे लागते. त्यामुळे नाईलाजाने मुले गुन्हे करतात. ते गुन्हे पारध्याने केले ते कळावे म्हणुन पुर्वी विशिष्ठ खुणा करत - जसे दरोडा टाकताना त्या घरात जेवण करणे, तिथे नैसर्गिक विधी करणे. अनेकदा बलात्कार पण करायचे. पण आता ते सगळे कमी होते आहे. आमच्या लोकांना पण यातुन बाहेर यायचे आहे."

पण मग ते गुन्हेगारी प्रवृत्तीला प्रतिबंध का करत नाहीत? तसे विचारले तर चलाखी एकदम संतापली. "तुम्ही मग आम्हाला जगु द्याल? बर्‍याचदा आमचे लोक गुन्हे करतात पण त्यांना गुन्हे करायला लावतात ते पारधी नसतात. ते तर गावातले मोठे लोक असतात. ही एकोणिस वर्षाची लवणी बघा. आमच्या पलिकडच्याच गावात असते. पाच वर्षांपुर्वी तिच्यावर त्या गावातल्या पाटलाची नजर पडली अन त्यानं तिला नासवली. मग त्यानं त्याच्या माळावर पालं टाकु दिली आमच्या लोकांना. चांगले पन्नास साठ लोक आहेत. सगळ्या बायका दारु गाळतात अन पुरुष चोर्‍या करतात. चोरीचा माल पाटलाला देतात. पाटील तो माल विकतो अन त्यांना धान्य वगैरे देतो. शिवाय पोलिसांनी पकडले तर कोर्टाचा खर्च पण करतो. अन ती बघा रखमा. ती सांगली साईडची आहे. तिच्या मुलानं मालकाला चोरी करायला नाही म्हणलं तर तिच्यावर चोरीचा आळ घातला अन गावातुन नागव्याने धिंड काढली. नंतर फौजदाराला सांगुन अटक पण करायला लावली. आणि अडवणार कोण? अजुन पण आमच्यात लोक एव्हढे नाही सुधारले. होतीय सुधारणा पण हळुहळु. तुमच्यात पैसे, शिक्षण सगळे असुन सुधारणा व्हायला किती वेळ लागला?"

चलाखी पुढे म्हणाली, "अन आमच्यात सुधारणा होण्याला सगळ्यांचाच विरोध आहे. कुठलाही पारधी बघा, कपड्यापासुन सगळ्या गोष्टींच्या पावत्या कायम जवळ बाळगतो. तो समोरचा फिरंग्या आहे ना, दोन सालाआड त्यानं एक रेडिओ विकत घेतला, बॅटरीवरचा. तो रस्त्यानं रेडिओ ऐकत चालला होता तर पोलिसानं बघितलं. पारध्याकडची प्रत्येक गोष्ट चोरीचीच असणार या हिशेबानं नेलं त्याला गेटावर अन मार-मार मारलं. त्याच्या रेडीओची पावती जवळ नव्हती. शेवटी एका दुकानात चोरी झाली होती त्या केस मधे टाकला आत. दुसर्‍या पण दहा बारा केस टाकल्या. पोलिसांची कामगिरी झाली, त्यांना बक्षीस मिळाली पण फिरंग्या सहा महिने आत होता, काहीच न करता."

पारध्यांच्या चलाख चोर्‍यांचे बरेच किस्से ऐकले होते... पारधी पळता पळता पायाने पाठलाग करणार्‍यांना दगड मारतात असले. विचारले तर चिंध्या म्हणाला, "साहेब ते सगळे जुन्या जमान्यातले. आता आमचे लोक ट्रॅक्सनं लांबवर जाऊन चोर्‍या करतात. ट्रॅक्सपण त्यांच्या मालकांच्याच असतात. एव्हढे पण मागं नाय राहीलो आम्ही."

-----

ताजा कलम :- हा सर्व प्रसंग सोळा वर्षापुर्वीचा. त्यानंतर पुलाखालुन बरेच पाणी वाहुन गेलेय. चिंध्याला दोन मुले अन एक मुलगी होती. या प्रसंगानंतर महिन्यातच चिंध्याची मुलगी मेली अन चिंध्या तिच्या मतिमंद मुलीला त्याच्याकडे घेऊन आला. ती मुलगी वयात आली अन एके दिवशी तिला तिच्याच एका नातेवाईकाने पळवुन नेली अन तिच्यावर बलात्कार केला. चिंध्याने जातपंचायतीत तक्रार केली. पंचायतीने त्या माणसाला एक हजार रुपयांचा दंड केला. नाराज चिंध्याने कायद्यामार्फत न्याय मिळवण्यासाठी फिर्याद केली ती केस बरेच महिने तशीच पेंडिंग राहीली. संतापलेल्या चिंध्याच्या मुलांनी शेवटी त्या माणसाच्या गावी जाऊन त्याच्यावर हल्ला केला. त्यानंतर काही महिन्यांनी त्या माणसाच्या नातेवाईकांनी चिंध्याच्या मुलांवर हल्ला केला त्यात चिंध्याचा मोठा मुलगा मेला तर धाकट्याच्या मेंदुला गंभीर दुखापत झाल्याने तो कायमचा पांगळा झाला. त्या केसमधेही कुणालाच अटक झाली नाही. आता चिंध्याचे वय सत्तर वर्षे आहे पण अजुन तो एका ठिकाणी वॉचमनची नोकरी करतो. त्याच्या घरात तोच एकटा कमावतो अन कुणीही गुन्हे करत नाही. पण चिंध्याने खबरी म्हणुन काम करणे मात्र सोडुन दिले आहे. पैशाची नड असेल तर ज्यांच्याकरता पुर्वी खबरी म्हणुन काम केले त्यातल्या कुणालातरी भेटायला जातो. तो काही न बोलताच सगळे समजतो आणि शंभर्-दोनशे रुपये चिंध्याच्या हातात ठेवतो.

कथासंस्कृतीमुक्तकसमाजनोकरीजीवनमानराहणीप्रकटनविचारलेख

प्रतिक्रिया

श्रावण मोडक's picture

15 Jul 2009 - 4:50 pm | श्रावण मोडक

क्या बात है! हा लेख क्रमशः आहे असे समजतोय. पुढची वाट पाहतोय. परत एकदा भेटावं लागेल.

प्रसन्न केसकर's picture

15 Jul 2009 - 5:56 pm | प्रसन्न केसकर

का सुळावर चढवताय राव. एकदा क्रमशः लिहिले आता सध्या हिट अँड रन लिहु द्या की. कामे सांभाळुन क्रमशः लिहायला खूप जड जाते.

प्रसन्न केसकर's picture

15 Jul 2009 - 6:03 pm | प्रसन्न केसकर

का सुळावर चढवताय राव. एकदा क्रमशः लिहिले आता सध्या हिट अँड रन लिहु द्या की. कामे सांभाळुन क्रमशः लिहायला खूप जड जाते.

श्रावण मोडक's picture

15 Jul 2009 - 6:31 pm | श्रावण मोडक

मी स्वार्थी वाचक आहे. :) लिहा हो. हिट अँड रन तर मिळेलच वाचायला.

यशोधरा's picture

15 Jul 2009 - 5:04 pm | यशोधरा

कठीण आहे...

लिखाळ's picture

15 Jul 2009 - 5:11 pm | लिखाळ

उत्तम!
तुम्ही भरपूर लिहा.

>>... अन संपुर्ण जमात सेटलमेंट नावाच्या तुरुंगांमधे बंदीवान झाली. <<
याचा अर्थ कळाला नाही.. सेटलमेंट काय प्रकार आहे?

-- लिखाळ.

ज्ञानेश...'s picture

15 Jul 2009 - 5:15 pm | ज्ञानेश...

.. पांढरपेशा समाजाला कधीच कळत नाही, हे खरे.

लेख आवडला. =D> (सुन्न करून गेला.)
आपल्या दृष्टीआडची सृष्टी किती वेगळी असते, याचा प्रत्यय आला.

"Great Power Comes With Great Responssibilities"

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

15 Jul 2009 - 5:24 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

पुनेरी, त्रास होतो हे वाचून! पण तुम्ही लिहा, आम्हालाही कळू देत आमच्याच देशात लोकं किती कष्टाने जगत आहेत ते आणि आम्ही सुखात लोळत आहोत ते.

ऋषिकेश's picture

16 Jul 2009 - 12:45 am | ऋषिकेश

पुनेरी, त्रास होतो हे वाचून! पण तुम्ही लिहा, आम्हालाही कळू देत आमच्याच देशात लोकं किती कष्टाने जगत आहेत ते आणि आम्ही सुखात लोळत आहोत ते

अगदी मनापासून सहमत
ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे

प्रसन्न केसकर's picture

15 Jul 2009 - 5:53 pm | प्रसन्न केसकर

खरेतर मी या विषयातला तज्ञ नाही पण काही तज्ञ लोकांनी दिलेल्या महितीनुसार सेटलमेंट हे इंग्रजांच्या काळात जे लोक समाजविघातक ठरु शकतील अश्या लोकांसाठी केलेल्या स्वतंत्र वसाहती होत्या.

१८७१ मधे जो क्रिमीनल ट्राईब्ज अ‍ॅक्ट इंग्रजांनी आणला त्यामध्ये त्यांनी नोटीफिकेशन काढुन अनेक (माझ्या माहितीनुसार २५२) जमातीना क्रिमिनल ट्राईब्ज म्हणले. त्यात पारधी, बेरड अशा जमाती होत्या. थोडक्यात या जमातींमधे जे लोक जन्म घेतात ते सर्व गुन्हेगार होतात व त्यांच्यापासुन समाजाला धोका उद्भवत असल्याने त्यांना मोकळे सोडता कामा नये.

मग अश्या लोकांसाठी सेटलमेंट तयार झाली. म्हणजे या जन्मतः गुन्हेगारांना समाजापासुन तोडले, वेगळे केले की प्रश्न मिटला. या क्रिमिनल ट्राईब्जच्या लाखो लोकांसाठी वेगळ्या वस्त्या तयार केल्या अन त्यात त्यांना ठेवले, अगदी ज्यांनी कधीच गुन्हे केलेले नाहीत किंवा जे गुन्हे करण्याची शक्यता नाही अशी नवजात बालके, म्हातार्‍या-कोतार्‍यांना सुद्धा. भोवती तारा, भिंतींची कुंपणे घालुन अन कडेकोट पहार्‍यात, जेलसारखे. त्यासाठी सेटलमेंट ऑफिसर नेमले - जेलरसारखेच. आतले लोक बाहेर पडुच शकणार नाहीत अशी व्यवस्था केली. मग या जमातीच्या पिढ्या सेटलमेंट मधेच जन्माला आल्या, जगल्या अन मेल्या. त्यांनी कधी बाहेरचे जग पाहिलेच नाही.

ही परिस्थिती स्वातंत्र्यानंतरही तब्बल चार वर्षे तशीच राहीली. १९५२ मधे भारत सरकारने हा कायदा रिपील (रद्द केला) अन एखाद्या जमातीला गुन्हेगारी जमात म्हणुन संबोधण्यावर बंदी आणली. मुक्त केलेल्या अश्या जमातींना नेहरुंच्या काळात 'विमुक्त जमाती/ डी नोटीफाईड ट्राईब्ज' असे नाव मिळाले. सेटलमेंटच्या बाहेर मुक्त संचार करण्याचे स्वातंत्र्य त्यांना मिळाले.

या जमातींना क्रिमिनल ट्राईब म्हणणे बंद केले अन विमुक्त असे नवे नाव दिले

15 Jul 2009 - 6:01 pm | श्रावण मोडक

बहुतांश आशय बरोबर आहे.
एक गडबड पहा - या जमातींना "डीनोटिफाईड ट्राईब" असे नामकरण देण्यात आले, हे खरे. त्यातून काय व्यक्त होतं, तर या जमाती कुठे तरी नोटीफाईड होत्या. कुठं होत्या, तर ब्रिटिश काळात. काय नोटिफाईड, तर जन्मजात गुन्हेगारी जमाती. म्हणजे ज्या क्षणी डीनोटिफाईड शब्द येतो, तो येतानाच तो आधीचा कलंक घेऊन येतो. माझ्यासमोर उभा असलेला माणूस डीनोटिफाईड ट्राईबचा आहे हे मला कळताच, लक्षात येते की, याच्या वाडवडिलांवर असा शिक्का होता. याला म्हणतात व्यवस्था...

शाहरुख's picture

16 Jul 2009 - 3:15 am | शाहरुख

जेंव्हा त्या जमातींवरचा "गुन्हेगार" हा शिक्का पुसला गेला तेंव्हा त्यांचा वेगळा उल्लेख होणे गरजेचे होते. "डीनोटिफाईड" म्हणजे वाडवडिल "नोटिफाईड" नव्हेत तर वाडवडिल देखील "डीनोटिफाईड"..

जेंव्हा मी असे काही वाचतो किंवा बघतो तेंव्हामात्र मला आजही जातींवरून दिल्या जाणार्‍या सोयी-सुविधा (जसे विविध प्रकारचे आरक्षण) ही गरज वाटते. दुर्दैवाने .....

पुनेरी साहेब, आपल्या लेखांतून मला उत्तम माहिती मिळतीय !!

लिखाळ's picture

16 Jul 2009 - 3:21 pm | लिखाळ

सेटलमेंट प्रकाराची माहिती दिल्याबद्दल आभारी आहे.
सगळा प्रकार विलक्षणच आहे. इंग्रजांच्या फोडा आणी राज्य करा नीतिला अनुसरूनच आहे. स्वातंत्र्यानंतर दिलेल्या विमुक्त या नावाला अशी गंभीर पार्श्वभूमी आहे तर. पन्नास वर्षाममध्ये साधारण तीन पिढ्या झाल्या असे समजले तरी परिस्थितीमध्ये फारसा सुधार नाही हे पाहून वाईट वाटले.

खालचे प्रतिसाद आणि त्यावरील चर्चा फार चांगली. आपण असे विषय समोर आणता आहात ते चांगलेच आहे.
-- लिखाळ.

प्रकाश घाटपांडे's picture

15 Jul 2009 - 6:01 pm | प्रकाश घाटपांडे

माधवराव सानप या पोलिस अधिका-याने विमुक्त जाती जमातींसाठी काही काम चौकटी बाहेर जाउन केल होत. पण मग त्यांना कुठल्यातरी चौकशीत लटवकवल होते.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

अनंत छंदी's picture

15 Jul 2009 - 6:01 pm | अनंत छंदी

दाहक वास्तववर प्रकाश टाकणारे लेखन. पुनेरी लिहिते रहा.

नीलकांत's picture

15 Jul 2009 - 6:25 pm | नीलकांत

बुलढाणा जिल्ह्यात खामगाव येथे राष्ट्रसंत भैय्युमहाराजांच्या आश्रमाच्या वतीने खास पारध्यांच्या मुलांसाठी आश्रमशाळा काढण्यात आली आहे. सध्या सुमारे ३०० मुले तेथे शिक्षण घेत आहेत.

ह्याशाळेला सर्वात पहिला विरोध झाला तो पारध्यांकडून ! शाळा उभी झाल्यावर शाळेचे काच वगैरे फोडून ही मंडळी फरार ! मात्र कार्यकर्त्यांनी आशा सोडली नाही. आज एक उत्तम शाळा तेथे आहे.

मध्यंतरी तेथील शिक्षकांशी बोलण्याचा योग आला. त्यांनी सांगीतले की या लोकांची परिस्थीती एवढी वाईट आहे की दिवाळी सारख्या सणाला सुध्दा काही पालक आपल्या मुलांना घेऊन गेले नाही तर त्यांनी चौकशी केल्यावर समजले की, किमान शाळेत आहेत तर मुलांना दोन वेळ जेवायला तरी मिळतं, घरी आणलं तर ती सुध्दा सोय नाही. अशी अपरिस्थीती आहे.

गेल्या वर्षी पारधीसमाजातील पहिला व्यक्ती IAS झाला आहे. ते बुलढाणा जिल्ह्यातीलच आहेत. त्यांचं नाव श्री सज्जनसिंह चौहाण .

- नीलकांत

धमाल मुलगा's picture

15 Jul 2009 - 7:08 pm | धमाल मुलगा

काय बोलु?
आणि का बोलु? एकाच नाण्याच्या (गावाच्या/शहराच्या) ह्या दोन बाजू! एका बाजुला आम्ही राहतो ती स्वच्छ उजळ प्रकाशात आहे आणि दुसरी...... ह्म्म...

----------------------------------------------------------------------------------------
एक गदारोळ प्रसवे ती स्वाक्षरी | गदारोळाचे कारण ते एक स्वाक्षरी ||
रे मना ऐसा खेळ ना करी | ज्या योगे वितंड मुळ धरी ||
ऐश्या कारणे रे धमु ना करावी स्वाक्षरी || सच्चिदानंद ! सच्चिदानंद !!

घाशीराम कोतवाल १.२'s picture

16 Jul 2009 - 10:13 am | घाशीराम कोतवाल १.२

धम्याशी सहमत पुनेरी शेट लिहित रहा
आपल्या देशात लोक कसे जगतात ते आता आम्हास कळाले
**************************************************************
नकार देण ही कला असेल पण
होकार देऊन काम न करण हिच खरी कला !!! ;)

आनंदयात्री's picture

15 Jul 2009 - 8:40 pm | आनंदयात्री

अजुन एक जिवंत अनुभव. पुनेरी रावांच्या दर्जेदार लेखनाने मिपावर बहार आला आहे.

अवलिया's picture

15 Jul 2009 - 11:22 pm | अवलिया

असेच म्हणतो
दर्जेदार लेखन.

--अवलिया
=============================
रामायण महाभारत घडायला स्त्रीची गरज आहे असे नाही, आजकाल सही ते काम करते. ;)

निखिल देशपांडे's picture

16 Jul 2009 - 12:08 am | निखिल देशपांडे

पुनेरी भाउ येवु देत अजुन...
दर्जेदार लेखन.
असेच म्हणतो

==निखिल

धनंजय's picture

15 Jul 2009 - 9:05 pm | धनंजय

लिखाण. असेच म्हणतो.

(विमुक्त जातीतील एका तरुणाने आत्मकथनात्मक कादंबरी लिहिली होती. तिचा बराच बोलबाला ~१० वर्षांपूर्वी झाला होता. पण काहीच तपशील आठवत नाहीत.)

श्रावण मोडक's picture

15 Jul 2009 - 9:09 pm | श्रावण मोडक

उचल्या... लक्ष्मण गायकवाड. कादंबरी नाही. आत्मकथनच असावे ते.
लक्ष्मण मानेंचं उपरा...

धनंजय's picture

15 Jul 2009 - 10:05 pm | धनंजय

दोन्ही पुस्तके.

श्रावण मोडक's picture

15 Jul 2009 - 10:10 pm | श्रावण मोडक

लेखातील लक्ष्मणराव गायकवाड ते हेच 'उचल्या'चे लेखक. दोन्ही पुस्तकं जरूर वाचा.

स्वाती२'s picture

15 Jul 2009 - 10:35 pm | स्वाती२

लिहीत राहा पुनेरी. तुमच्या लेखातून एका वेगळ्याच जगाची ओळख होते.डोळे उघडतात.

बिपिन कार्यकर्ते's picture

15 Jul 2009 - 11:19 pm | बिपिन कार्यकर्ते

असं समाजाने आपल्यातल्याच एका घटकाला बाजूला टाकून असलं जिणं वागायला लावायचं हे किती भयानक आहे!!! कसलं जगणं हे...

पुनेरि, तुमच्या शैलीमुळे अजून भिडतं हे सगळं.

बिपिन कार्यकर्ते

विशाल कुलकर्णी's picture

16 Jul 2009 - 9:47 am | विशाल कुलकर्णी

सहमत!
हे असं काही वाचलं , अनुभवलं की जानीव होते ती आपण किती कोशात जगतो त्याची. हे वास्तव सुन्न करुन सोडतं. पुणेरी खुप वास्तव लिहीलं आहेत तुम्ही. असे अनुभव अजुन असतील तर प्लीज, ते शेअर कराच .

सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...

प्राजु's picture

15 Jul 2009 - 11:49 pm | प्राजु

लेखन प्रभावी आहे नक्कीच.
या समजाबद्दल बरेच समज गैरसमज असतात आणि आहेत. ही लोकं म्हणे मांजर, कुत्री असले प्राणी खातात.. हा त्यातलाच एक.
पण तुमच्यामुळे या समजाबद्दल बरेच काही समजते आहे.
भरभरून लिहा इतकेच म्हणेन.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

inoba mhane's picture

15 Jul 2009 - 11:58 pm | inoba mhane

Punyat bharpur thikani paradhi mahila ajoon hi phiratana distat. Ekhadya dukanat gholakyane jawoon gondhal karayacha,ani tewadhat haat saaf karayachya kahi ghatana mi swata pahilya ahet.
Majhya eka mitrachya ghari paradhyancha daroda padala hota. Tyachi aai,vadil ani bhau tighana marun takala. Ha tewadha punyat hostel madhe asalyamule wachla.

घाटावरचे भट's picture

16 Jul 2009 - 12:44 am | घाटावरचे भट

उत्तम लेख.

पाषाणभेद's picture

16 Jul 2009 - 4:48 am | पाषाणभेद

अगदी बारकाईचे वर्णन. एका वेगळ्याच दुनीयेची ओळख करून दिली.

एकूणच पारधी समाजाला पोलीस गृहीत धरतात हे फार वाईट आहे. आजकाल पांढरपेशा समाजातील काही जण पण असले धंदे करतात.

आणखी लेख येवू द्या.

अवांतर : आता गैरसमज नाही ना काही ?

मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते.
- मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्‍हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)

मदनबाण's picture

16 Jul 2009 - 5:34 am | मदनबाण

उत्तम लेख.

मदनबाण.....

Try And Fail, But Don't Fail To Try
Stephen Kaggwa

मुक्तसुनीत's picture

16 Jul 2009 - 6:26 am | मुक्तसुनीत

माहितीपूर्ण लिखाण. निव्वळ घटनांवाटे प्रश्नांच्या दाहकतेची जाणीव करून देणारे.

सुनील's picture

16 Jul 2009 - 6:40 am | सुनील

पुनेरी यांचा अजून एक उत्तम माहितीपूर्ण लेख.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

सहज's picture

16 Jul 2009 - 7:36 am | सहज

लेख उत्तम आहे यात वाद नाही पण अर्थात फक्त पारधी कसे भरडले जातात व बळी पडतात इतकेच कळते. त्या समाजातील प्रचलीत कडक चालीरीती, समज पाहता ते काही वाटतात तितके पिडीत नाही आहेत. पारध्यांनी केलेले अत्याचार व वाईट धंदे पाहून/वाचून ही तर एकच बाजु होतीयं असे वाटते.

शासनव्यवस्था भ्रष्ट हे काय फक्त पारध्यांच्याच बाबत होत नाही सर्वत्र होते. म्हणून इतके क्रुर दरोडे घालत कोणी हिंडत नाही किंवा अजिबात कायद्याला जुमानायचे नाही असे कुठलीच जात करत नाही. त्या समाजाच्या चालीरीतीच अजुन बदलल्या नाहीत. कृपया गेल्या काही दशकातील पारधी टोळ्या-गुन्हेगारीची टक्केवारी याबाबत माहीती द्याना. कायद्याने त्यांना हळुहळू का होईना न्याय दिला आहे त्यांना. पुनेरी माझी तुम्हाला विनंती आहे की पारध्यांच्या पुनर्वसन, उद्धारासाठी शासकीय तसेच सेवाभावी संस्थांतर्फे जे काम होत आहे त्याबद्दल देखील (इतक्याच पोटतिडकीने / तटस्थपणे लिहा ) तुमचा अभ्यास आहे म्हणुन ही विनंती.

शासनव्यवस्था भ्रष्ट हे काय फक्त पारध्यांच्याच बाबत होत नाही सर्वत्र होते. म्हणून इतके क्रुर दरोडे घालत कोणी हिंडत नाही किंवा अजिबात कायद्याला जुमानायचे नाही असे कुठलीच जात करत नाही. त्या समाजाच्या चालीरीतीच अजुन बदलल्या नाहीत.

"कायदे मोडणे, गुन्हे करणे अनेकदा आमच्या समाजात प्रतिष्ठेचे मानले जाते. मुलगा चोरी करतो तेव्हाच तो वयात आला असे समजतात अनेक जण. जर गुन्हा केला नाही तर त्याच्याशी सोयरीक होत नाही."

हि मानसीकता बदलायला थोडा वेळ द्यावा लागेल. इतर समाजात गुन्हे करणे प्रतिष्ठेचे मानले जात नाही.

सहज's picture

16 Jul 2009 - 10:44 am | सहज

>हि मानसीकता बदलायला थोडा वेळ द्यावा लागेल.

हा वेळ देणे म्हणजे नक्की काय याबाबतच चर्चा अपेक्षीत आहे. अन्यथा हे एक ललितलेखन म्हणून सोडून द्यावे काय?

निदान पुढच्या पिढीला तरी असे लेख वाचण्यात काही तरी चुकीचे आहे व यावर ठोस उपाय योजना झाली पाहीजे असे वाटले पाहीजे.

घाटपांडे काका, मोडककाका, पुनेरी साहेब, बहुदा तुम्हीही पंकज पत्रकार्-पोलीस संबधीत लोक आहात तर तुम्ही तसेच अश्या बातम्या नियमीत वाचत आलेला वाचक यांनीही काहीतरी जास्त भाष्य करावे ह्या विषयावर.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 Jul 2009 - 11:04 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लेख चांगलाच विचार करायला लावणारा.

सहजराव, शासनाकडून भटक्याजातीजमातीचे अनेक प्रश्न अजून सुटलेले नाहीत. या पारध्यांच्याच वेगवेगळ्या जातीमधील ब-याच पोटजाती अजून अनुसुचित जमातीमधे नाही. असे असले तरी पारधी लोक केवळ मागासलेले राहिले आहेत असे मला वाटत नाही. म्हणजे सामाजिक जाणीव त्यांना आहे, पण त्यांचे आर्थिक आणि शैक्षणिक मागासलेपण जे आहे, ते मात्र अजूनही त्यांचे गेलेले नाही. माझ्या तालूक्याच्या गावापासून काही अंतरावर अजूनही पारधी लोकांची वस्ती आहे. त्यातील काही शेतीही करतात. दहाएक वर्षापूर्वी रात्रीच्या प्रवास करतांना त्यांची भिती वाटायची. रस्ते अडवून पैसे लुटणे, मारणे असा त्यांचा उद्योग असायचा. आता मात्र अपराध कमी झाले असले तरी चोरी-चपाटीपासून ते दूर गेले आहेत. असे म्हणने जरा धाडसाचे होईल. सामाजिक संघट्नांची जवाबदारी आहे की, शासनाकडून मिळालेल्या सवलती त्यांना समजून सांगता आल्या पाहिजेत. त्यांच्यापर्यंत थेट पोहचवता आल्या पाहिजेत. त्यांच्या मुला-मुलींना शिक्षण देण्यासाठी वाडी-वस्तीवर जाऊन त्यांना सामाजिक विकासाच्या प्रवाहात जोडून घेतले पाहिजे असेही वाटते. तरच आपण म्हणता तसे काही बदल नजीकच्या काळात शक्य आहे..!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

inoba mhane's picture

16 Jul 2009 - 10:32 am | inoba mhane

@Sahaj
sahamat ahe.

पाऊसवेडी's picture

16 Jul 2009 - 1:33 pm | पाऊसवेडी

लेख आवडला. माझं आईची गावी सातार्याला असे फासेपारधी लहानपणी पहिल्यांदा पहिले आणि तेव्हापासून या जमातीबाद्द्दल भीतीयुक्त आकर्षण वाटत आले आहे
सुंदर लेख

-*-**-*-*-***-*-*-*****------
जपत किनारा शीड सोडणे - नामंजूर!
अन वार्‍याची वाट पहाणे - नामंजूर!
मी ठरवावी दिशा वाहत्या पाण्याची
येईल त्या लाटेवर डुलणे - नामंजूर!

हे संभाषण मी सहजरावांच्याच सुचनेनुसार येथे देत आहे.

सहजरावांनी लिहिले:
सक्तीने पुनर्वसन, दारुधंदे बंद करुन उपजीवीकेचे इतर प्रकल्प, लहान मुलांचे सक्तीचे शिक्षण, तरुणांचे संघटन, दीर्घकाल प्रबोधन, विविध योजना यांचा पाठपुरावा केल्याशिवाय त्यांचे गुन्हेगारी विश्व इतक्यात सुटेल असे वाटत नाही. पोलीस व पारधी समाजातील दोन्ही बाजुने पारध्यांना योग्य न्याय देण्याकरता जिल्हे/प्रांतवार संघटना करुन प्रयत्न. हे मत अर्थात गेले कित्येक वर्ष वर्तमानपत्रातुन व यासमस्येसंबधीत लोकांच्या मतांतुन आले आहे. मोडककाका, प्रकाशकाका, पुनेरीसाहेब जास्त प्रकाश पाडू शकतील.

तोवर हा लेख ललीतलेखनाचा एक प्रकार. पुनेरीसाहेब कृपया वैयक्तिक घेउ नये.

त्यावर मी त्यांना लिहिले:

> आपले म्हणणे अगदी पटते. या दृष्टीने अनेक जण प्रयत्न करीतही आहेत आणि त्यांचे दॄष्य परिणामही आहेत. माझ्या लेखावरच्या प्रतिक्रियेमध्ये कुठेतरी सानप, खोपडे यासारख्या अधिकार्‍यांनी केलेल्या कामांचा उल्लेख आहे. सेवाभावी संस्थांच्या कामांचाही उल्लेख आहे. आणि ही सर्व कामे परिणामकारक ठरली आहेत, ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही.
>
> परंतु यातल्या बहुतेक ठिकाणी अश्या लोकांची उन्नती करण्याकरता कोणी व्यक्ती/ संस्था जे प्रयत्न करतात ते त्यातल्या काही घटकांना मुख्य समाजापासुन वेगळे काढुन. माझ्या मते याबाबत समाजाचे व्यापक प्रबोधन करण्याची गरज आहे. सानप, खोपडे यासारखे वरिष्ठ अधिकारी जेव्हा असे प्रयत्न करीत असतात तेव्हाच त्यांच्याच हाताखाली काम करणारे कनिष्ठ संपुर्ण जमातीला गुन्हेगार समजत रहातात. या आणि केवळ याच कारणाने त्यांचे प्रयत्न अल्पजीवी ठरले. यमगरवाडी मित्र मंडळासारख्या संस्था अश्या मुलांना दिवाळी काय असते ते दाखवण्यास शहरात नेतात पण तिथे या मुलांच्या पाहुणचाराला किती लोक पुढे येतात? काही मुले आश्रमशाळेत शिकतात पण तीच मुले सुट्टीत घरी जातात तेव्हा तिथे त्यांना समाजाकडुन त्यांच्याच वयाच्या, शाळेत शिकणार्‍या ईतर मुलांसारखी वागणुक मिळते काय? याचे उत्तर जोवर नाही असे येते तोवर या समाजघटकांची मुख्य समाजाशी नाळ जुळण्याची शक्यता रहात तर नाहीच उलट अश्या लोकांकडुन समाजाविरोधात अधिक उग्र प्रतिक्रिया येवु शकते असे मला वाटते.
>
त्यावर त्यांनी उत्तर दिले:
हेच व अजुन तुम्ही कृपया मुख्य धाग्यात लिहा ना.

माझी इच्छा आहे की हा लेख फक्त उसासे भरण्यापुरत अन रहाता एक उत्तम वैचारिक चर्चा बनावी, भले उत्तर आपणा शोधु शकणार नाही पण जनसामान्यात ह्यावर काहीतरी भरीव कार्य व्ह्यायची उर्मी जागावी. न जाणो एक कोणीतरी यावेळी तुम्ही खाली म्हणाला आहात तसे दिवाळी किंवा तत्सम वेळी ह्या मुलांच्या स्वागताला पुढे येईल.

काय म्हणता. कृपया अजुन भरीव प्रतिसाद द्याच.

अन हे त्यापलिकडचे काही मुद्दे:

हे लिहिताना काही पारधी जमातीतले गुन्हेगार, त्यांनी गुन्हे करताना दाखवलेला क्रूरपणा हे नाकारणे किंवा त्याचे उदात्तीकरण करणे हा माझा हेतु नव्हे.

वर कुठेतरी प्रतिक्रियेत मी काही पारधी जमातीच्या लोकांनी टाकलेल्या दरोड्याचा उल्लेख वाचला. ती ही वस्तुस्थिती आहे, किंबहुना मी त्यापेक्षा भयानक गुन्हे घडलेले पाहिले आहेत. त्यातल्या अनेक गुन्ह्यांमधे गुन्हेगार पारधी नव्हते तर उच्चवर्णिय, सधन होते.

गुन्हेगारी प्रवृत्ती, विकृती या रक्तातुन येत नाहीत असे माझे ठाम मत आहे. त्या इतर अनेक ठिकाणी जन्मतात. काही लोकांमध्ये त्या आहेत म्हणुन ते लोक ज्या समाजघटकाचे सदस्य आहेत तो संपुर्ण समाजघटकच मुख्य समाजातुन वगळावा ही विचारसरणी मला चुकीची वाटते. हे म्हणजे आपले ठेवायचे झाकुन अन लोकांचे पहायचे वाकुन असे झाले असे मला वाटते.

Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr

16 Jul 2009 - 3:05 pm | धमाल मुलगा

माझ्या गावातल्या एका कुटुंबाबद्दलचं एक निरिक्षण...अर्थात केस टू केस बेसीसवर हे बदलुही शकत असेल पण तरीही....

एक कुटुंब, तसा गोतावळा चांगलाच मोठा, हे पारधी! नक्की कोणते ते ठाऊक नाही. पैसा बक्कळ...आधीच्या पिढीनं सुपार्‍या घेऊन पैसा कमवून, दिसलेल्या जागा बळकावून प्रॉपर्टी केलेली, आता जुन्या वाहनविक्रीचा एक जोडधंदा..जिथं काही कायदेशीर तर काही पळवलेल्या गाड्या विक्रीला असतात.

सगळं व्यवस्थित असुनही वागणूकीत मात्र काडीचा फरक नाही...झुंडीनं फिरणं, दादागिरी करणं, हाणामार्‍या वगैरे नित्याचं...बरं, राजकीय वरदहस्त आहेच!
मुलंबाळं कॉलेज बिलेज करुन शिकलेली सवरलेली(!) पण वृत्तीत मात्र काहीच फरक नाही...

असं का होत असावं? समाजानं ह्यांना अ‍ॅक्सेप्ट करुनही, पदरी चार पैसे गाठीशी असुनही हे प्रकार का व्हावेत ह्याचं उत्तर मला आजतागायत सापडलं नाही.

----------------------------------------------------------------------------------------
एक गदारोळ प्रसवे ती स्वाक्षरी | गदारोळाचे कारण ते एक स्वाक्षरी ||
रे मना ऐसा खेळ ना करी | ज्या योगे वितंड मुळ धरी ||
ऐश्या कारणे रे धमु ना करावी स्वाक्षरी || सच्चिदानंद ! सच्चिदानंद !!

प्रसन्न केसकर's picture

16 Jul 2009 - 4:12 pm | प्रसन्न केसकर

समाजानं ह्यांना अ‍ॅक्सेप्ट करुनही, पदरी चार पैसे गाठीशी असुनही हे प्रकार का व्हावेत ह्याचं उत्तर मला आजतागायत सापडलं नाही.
तुम्ही म्हणता तसे होते हे मला मान्य. पण असे समाजाच्या अन्य घटकात होत नाही का? अन यांना अ‍ॅक्सेप्ट करुन आपण त्या समाजघटकावर उपकार करतो आहोत का? तुम्ही मांडलेलेच मुद्दे इतर जातीजमातींच्या काही लोकांबाबत लागु पडणार नाहीत का? मग इथे त्यांची जात हा मुद्दा कसा होतो?

पुन्हा स्पष्ट करु इच्छितो, ना मला गुन्हेगारीचे उदात्तीकरण करायचेय ना कुणाचा अमुक जातीत जन्माला आला एव्ह्ढ्याच कारणाकरता कैवार घ्यायचाय. माझ्या मते असे करणे सायकोफंसी होईल. पण काही व्यक्तींच्या वर्तनावरुन एखाद्या संपुर्ण जमातीबाबत कोणतेही मत बनवणे हे सामाजिक न्यायाच्या तत्वाविरुद्ध, भारताच्या राज्यघटने विरुद्ध आहे तरी आपण अनेकदा असे करतो.

तुम्ही तुमच्या गावातल्या पारध्यांचे उदाहरण दिले पण प्रामाणिकपणे जगण्याचा प्रयत्न करणारे अनेक पारधी मला माहिती आहे. चिंध्या हे एक उदाहरण मी माझ्या लेखात दिलेच पण दुसरे आपल्या सर्वाना नेहमी दिसणारे उदाहरण म्हणजे सिग्नलवर गजरे, लिंबु-मिरची-बिब्बे, पुस्तके, खेळणी इत्यादी सामान वि़कणारे लोक. त्यातले बहुतेक पारधी आहेत अन त्यापैकी किमान ८० टक्के लोकांनी आयुष्यात कधीच गुन्हा केलेला नसतो. जातीच्या ब्रँडींगमुळे अश्या लोकांवर मोठा अन्याय होतो असे मला वाटते.

अवांतरः अभिनिवेष येवु द्यायचा नाही असे घोकत असुनपण माझ्यात तो यायला लागलेला दिसतोय! असो !!
___
Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr

धमाल मुलगा's picture

16 Jul 2009 - 5:07 pm | धमाल मुलगा

जातीवरुन लेबलं लाऊन त्या दृष्टीनं पाहण्याचा चष्माही मुळीच नाही. केवळ एक निरिक्षण मांडलं. सगळे असेच असतात असं नक्कीच नाही! सहमत आहे मी आपल्याशी!

मला असा प्रश्न पडला कारण, जसं आपण म्हणता की इतर जातीजमातींबाबत हे लागू होत नाही का, तर होतंच..पण संपूर्ण कुटुंबच्या कुटुंब (जे साधारण २०-३० जणांचं असावं) असं वागतं ते कश्यामुळं? त्यांच्यामध्ये असलेल्या चालीरिती, प्रथा ह्यांच्यामुळे असावं की राजकीय आशिर्वाद हा सर्वसामान्य पाहण्यात आलेला मुळ मुद्दा असावा ह्याचा विचार करतो आहे.

>>अन यांना अ‍ॅक्सेप्ट करुन आपण त्या समाजघटकावर उपकार करतो आहोत का?
मुळीच नाही! तो त्यांचा हक्क आहेच...मान्यच आहे तो. त्या घरातलाच एकजण कॉलेजात मित्र झाला..आणि त्यानं जीवापाड मैत्री जपली. कुठेही कुठलाही अभिनिवेश न आणता ही मैत्री राहिली. असो, विषयांतर झालं माझ्याकडून.

>>अभिनिवेष येवु द्यायचा नाही असे घोकत असुनपण माझ्यात तो यायला लागलेला दिसतोय!
मुळीच नाही! चिंता नसावी. जेव्हा एखाद्या विषयात आपल्याला समोरच्यांपेक्षा अत्यंत हुकमी अशी भरपूर माहिती असते तेव्हा बर्‍याचदा त्या विषयात असा स्टान्स त्या माहितीमुळे येतोच की जो इतरांना अभिनिवेश वाटू शकतो..पण ते असतं ते अनुभव आणि ज्ञान :)

पुन्हा एकदा, जसं तुम्ही चिंध्याला पाहिलंत, तसंच मी बुड्याला पाहिलं. पण तुम्हाला पोलीस ऑफिसर भेटली, मला मात्र आख्खं कुटुंब मळलेल्या वाटेनं जाणारं भेटलं...म्हणुन केवळ हा फरक :)