फॅमिली (२)

अरुण वडुलेकर's picture
अरुण वडुलेकर in जनातलं, मनातलं
30 May 2009 - 10:59 am

त्याच्या बायको विषयी कुतुहल मात्र आता प्रकर्षाने पुढे आलेले होते. याचा छडा लावायचाच असें माझ्या मनांत आले.

पुढच्याच रविवारच्या सुट्टीत मी ते आमलात आणले. हिंगण्याच्या अलिकडेच विठ्ठलवाडीला माझा एक नातेवाईक रहात असे त्याच्या कडे जायच्या निमित्ताने मी शृंगारपुरेच्या घरी जाऊन धडकलो. मला पहाताच शृंगारपुरे चकितच झाला. नुसताच चकित नव्हे तर पुरता भांबावला. या या म्हणत त्याने मला घरांत घेतले आणि "बसा. मी पाणी आणतो तुमच्यासाठीं" म्हणत स्वयंपाक खोलीत गेला. मी सभोवताली नजर टाकू लागलो. शृंगारपुरेच्या एरवीच्या नीटनेटकेपणाचा मागमूसही तिथे कुठे दिसत नव्हता. दोनच पण जरा मोठ्या खोल्यांची ती जागा होती. दरवाज्या लगतच एक खिडकी आणि खिडकी खाली एक पलंग. पलंगावरची चादर सुरकुतलेली, पांघरुणाची चादर अस्ताव्यस्त पसरलेली. पलंगाच्या उशालगतच्या दांडीवर एक लेडीज नाईट गाऊन लटललेला. पलंगाच्या काटकोनातील भिंतीलगत एक आरशाचे कपाट. कपाटाशेजारी एक टीपॉय, त्यावर विस्कटून पडलेली कांही पुस्तके. छताला लटकणारा पंखाही बराचसा धुळकटलेला. दरवाज्यालगतच्या कोपर्‍यात कांही पादत्राणांचे जोड. एकूणातच एखाद्या कुटुंबवत्सल घराला विसंगत ठरावे असें चित्र. मी कांहीसा विस्मयचकित आणि कांहीसा गोंधळलेला.

" घ्या सर. पाणी घ्या." शृंगारपुरेच्या आवाजाने मी भानावर आलो. गणिताच्या पेपरला निघालेल्या विद्यार्थ्यासारखा त्याचा चेहरा झाला होता.
" शृंगारपुरे... वहिनी..?" मी चेहरा शक्य तितका कोरडा ठेवण्याच्या प्रयत्नात.
" हां! त्याचं काय झालं. फॅमिली जरा गावाला गेलीय."
" कधी? काल ऑफीसमध्ये कांही बोलला नाहीत."
" नाही. बोललो नाही..पण तसं कांही बोलण्या सारखं नव्हतं म्हणून....."
" अच्छा, अच्छा! कांही विशेष?"
" कांही नाही हो. फॅमिली तिच्या एका मैत्रिणीच्या मंगळागौरीला गेली आहे"
" मंगळागौरीला? आत्ता? मार्गशीर्षांत..?
" ओह्‌ ! आय एम सॉरी.एक्स्ट्रीमली सॉरी. डोहाळजेवणाला."
" म्हणजे?"
" अहो, माझं हे असं होतं बघा. फॅमिली नसली ना की मी अगदी गोंधळून जातो. सो मच आय मिस्‌ हर."
"............."
" ती गेलीय नाशिकला. तिच्या एका जीवश्च कंठश्च मैत्रिणीकडे. डोहाळजेवणाला. सर, तुम्ही बसा कोपर्‍यावरून दूध घेऊन येतो. आपण चहा घेऊ"
" छे, छे. चहाचं राहू द्या हो. परत कधी येईन चहाला. मलाही थोडी घाईच आहे. मी निघतो.."
" सर, प्लीज. माझाही चहा व्हायचाच आहे. आत्ता येतो. पटकन्‌ दोन मिनिटात. तोवर हे बघा जरा."

असं म्हणत त्याने कपाटातून एक फोटोचा अल्बम काढला आणि माझ्या हातांत देऊन तो पसार झाला. तो अल्बम त्याच्या लग्नात काढलेल्या फोटोंचा होता. म्हणजे या इसमाला बायको होती तर, या विचाराने मला जरा बरं वाटलं. मी एक एक पान उलटीत फोटो पाहू लागलो. कोणत्याही लग्नातला ठराविक स्वरूपाचा असतो तसा तो अल्बम होता. पहिल्याच पानावर त्याचा आणि त्याच्या बायकोचा जोडीने काढलेला फोटो होता. शृंगारपुरेची बायको मात्र हिन्दी सिनेमातल्या मधुबालानेही हेवा करावी इतकी सुंदर होती. गौर वर्ण, भव्य कपाळ, टपोरे डोळे, चाफेकळी नाक आणि या सगळ्या सौंदर्यावर कडी करणारा डाव्या गालावरचा तीळ. नशीबवान आहे बेटा, मी मनांतल्या मनांत पुटपुटलो. पुढे नित्यनेमाचे फोटो झाल्यावर खास पोझ देउन काढलेले दोघांचे फोटो तर अप्रतिम होते. जवळ जवळ सगळ्याच ठिकाणी अत्यंत भावस्पर्शी डोळ्यांनी त्याची बायको त्याच्याकडे प्रेमार्द्र नजरेने पहात होती. कांही वेळापूर्वी त्याच्या बायकोबद्दल एक अनाकलनीय शंका माझ्या मनांत उद्भवली होती तिची मला लाज वाटली आणि त्याच्या फॅमिलीला भेटण्याची उत्सुकता वाढली.

दुसरे दिवशी मी ऑफीसला गेलो तेंव्हा खाजगीत बापटला ती हकीकत सांगितली. तो तर चाटच पडला. त्याने त्याच्या स्वभावाला अनुसरून ती बातमी हळू हळू सगळ्यांपर्यंत पोहोचवली देखील. त्या दिवसापासून बहुतेक सार्‍यांचीच शृंगारपुरेकडे पहाण्याची नजर जरा बदलली. जो तो त्याच्याशी मैत्री करण्याची अहमहमिका करूं लागला. पालेकर तर त्याचा खास मित्र बनला. कारण पालेकरचे अजून लग्न झालेले नव्हते आणि तो बोहोल्यावार उभा रहायच्या तयारीत होता. शृंगारपुरेला जणू त्याने गाईड बनवले आहे असे वाटावे असे त्यांचे आपसात कुजबुजणे चाललेले असायचे. शृंगारपुरेने त्याला एकदा आपल्या बटव्यातला बायकोचा फोटो दाखवला होता. तसा तो, ते लावण्य पाहून, अगदी वेडावलाच. आपल्यालाही अशीच बायको मिळावी असे स्वप्न पाहू लागला. मध्येच एकदा पालेकर चार दिवस रजा टाकून मुलगी पहायला गेला तेंव्हा त्याने शृंगारपुरेलाही बरोबर चलण्याची विनंती केली पण ती त्याने, फॅमिली घरी एकटी कशी राहील या सबबीवर, नाकारली.

चार दिवसांची रजा संपवून पालेकर कामावर पुन्हा रुजू झाला त्या वेळी शृंगारपुरे त्याच्या फॅमिलीने आदल्या दिवशी केलेल्या चिरोट्याचा डबा सर्वांना वाटण्यासाठीं उघडत होता. पालेकरला पहाताच त्याने " या पालेकर. अगदी वेळेवर आलांत. आमच्या फॅमिलीने..." शृंगारपुरेने एवढे शब्द उच्चारले असतील नसतील एवढ्यात पालेकर तिरासारखा त्याच्या अंगावर धावला. त्याने तो डबा उधळून दिला आणि शृंगारपुरेची कॉलर पकडून मारण्यासाठीं मूठ उगारली. काय होते आहे ते कुणाच्याच लक्षात येइना. पण एका अनाकलनीय सावधतेने मी वेगांत पुढे धावलो. पालेकरच्या कमरेला हातांचा विळखा घालीत त्याला मागे खेचला आणि ओढत ओढत ऑफिसच्या बाहेर घेऊन गेलो.

बाहेर जिन्याच्या पायरीवर पालेकर ओंजळीत चेहरा झाकून धरीत मटकन बसला. कसल्या तरी संतापाचा उद्रेक त्याला आवरता येत नव्हता. " पालेकर काय झालंय ?" मी त्याच्या खांद्यावर थोपटत विचारले. चेहर्‍यावरचा हात काढीत लालबुंद डोळ्यांनी पालेकर उसळला,

" फ्रॉड आहे साला हा हलकट. कसली फॅमिली अन्‌ कसलं काय. च्यूत्या बनवतो साला आपल्याला. याच्या तर........."

पालेकरने हळूं हळूं शांत होत जे कांही मला सांगितलं ते असं होतं. पालेकर नाशिकला जी मुलगी पहायला गेला होता तिथे पहाण्याच्या कार्यक्रमाच्या वेळी मुलीकडच्या बायकांत एक तरूण स्त्री हुबेहूब शृंगारपुरेच्या बायकोसारखी दिसली होती. शृंगारपुरेच्या बायकोचा फोटो पालेकरनेही पाहिला होता. तिच्या गालावरचा तीळही त्याच्या लक्षांत राहिलेला होता. आधी असेल कुणीतरी, असतात कांही माणसे एका सारखी एक दिसणारी, म्हणून पालेकरने जरा तिकडे दुर्लक्ष केले. पण ती इकडून तिकडे वावरतांना पालेकरने तिच्या गालावरही तसाच तीळ पाहिला आणि तो चक्रावला. मग त्याने सरळच चौकशी केली तेंव्हा..... ती पूर्वाश्रमीची शृंगारपुरेचीच बायको होती. सध्या घटस्फोटित होती. लग्नानंतर तिला एका विदारक सत्त्याला सामोरे जावे लागले होते. लग्नापूर्वी भावी पतीचे गोरेगोमटे रूप पाहून ती हरखली होती. पण तिची भयानक फसगत झालेली होती. तिच्या स्वप्नांचा ढग अभ्रकाचा आहे हे तिला पहिल्या रात्री समजले तेंव्हाच ती उध्वस्त झाली होती. पण कांही औषधोपचाराने सुधारणा होईल या आशेवर दीडदोन वर्षे गेली. पण ती होणारच नव्हती. कारण तो दोष जन्मजात होता आणि हे शृंगारपुरेलाच काय पण त्याच्या मातापित्यांनाही माहिती होता. पण लग्नानंतर कदाचित कांही चमत्कार होईल या आशेवर त्यांनी त्याचे लग्न करून दिले होते. शृंगारपुरेने सुरुवातीस दादापुता करीत दत्तक मूल घेण्याबाबत बायकोअचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. पण तिने घटस्फोटाची मागणी करतांच तिचा छळ चालू केला होता. शृगारपुरेच्या आईवडिलांनीही त्याला त्यातच साथ दिली. पण दुसर्‍याच वर्षी त्यांना कोर्टात आरोपीच्या पिंजर्‍यात उभे रहावे लागले होते. शृंगारपुरेच्या वकिलांनी अटोकाट प्रयत्न करून त्याची फसवणुकीच्या आरोपाखालील सक्तमजुरीची शिक्षा टाळली होती पण घटस्फोट अगदी सहजगत्या मंजूर झाला होता.

सुन्न झालेले डोके जरासे हलके झाले तसे आम्ही दोघेही आपापल्या जागेवर परत आलो तेंव्हा सेक्शनमध्ये सगळे आपापल्या कामांत गर्क होते. निदान तसें दाखवीत होते. एक विचित्र शांतता आसमंतात पसरलेली होती. मी शृंगारपुरेच्या टेबलाकडे पाहिलं. शृंगारपुरे नव्याने तासलेल्या शिसपेन्सिलच्या टोकाकडे एक टक पहात निश्चल उभा होता. त्याची पेन्सिल जराही बोथट झालेली त्याला चालत नसे. अधून मधून तो नेहेमी पेन्सिलींना टोक करत असलेला दिसायचा. ही त्याची संवय मला तेंव्हा चमत्कारिक वाटली होती तरी त्या क्षणी मला त्यात कांही अर्थ दिसायला लागला होता. मला पाहून तो जवळ आला.

" काय झालं? काय म्हणाले पालेकर?"
" अं‌‍ऽऽ कांही नाहीं. असंच. त्याला जरा बरं वाटंत नाहीये"
" तो माझ्या बद्दल कांही बोलला?"
" नाही... तसं कांही नाही.. नाही म्हणजे तुमच्या बद्दल कांही नाहीं. जस्ट पर्सनल..."
" म्हणजे सगळंच"
" कां तुम्हाला असं कां वाटतं"
" मला माहिती आहे.... तो कुठे गेला होता हे माहिती आहे. मीच त्याला ते स्थळ संगितलं होतं..."
"..........."
".....चुकून. म्हणूनच मी...... जाउ दे, माणसाला आपली सांवली फक्त अंधारातच टाळता येते....."

असं कांहीसं पुटपुटत तो सेक्शनबाहेर गेला. बराच वेळ तो परत आला नाही म्हणून मी त्याच्या टेबलाकडे पाहिलं. मी टेबलाजवळ गेलो . टेबलावर चिरोट्याचा डबा तसाच होता. डब्याखाली शृंगारपुरेचा चार ओळीचा राजिनामा होता.

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

चंबा मुतनाळ's picture

30 May 2009 - 12:55 pm | चंबा मुतनाळ

भन्नाट कथा. आवडली.

- चंबा

परिकथेतील राजकुमार's picture

30 May 2009 - 1:03 pm | परिकथेतील राजकुमार

एकदम अनपेक्षीत वळण !

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

चिरोटा's picture

30 May 2009 - 1:17 pm | चिरोटा

माणसाला आपली सांवली फक्त अंधारातच टाळता येते

मस्तच.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न

लिखाळ's picture

30 May 2009 - 1:42 pm | लिखाळ

सुंदर कथा ..

>>कारण पालेकरचे अजून लग्न झालेले पण तो बोहोल्यावार उभा रहायच्या तयारीत होता.<<
हे वाक्य पालेकरचे लग्न झालेले नव्हते असे असावे असे वाटले.

-- लिखाळ.
या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)

अरुण वडुलेकर's picture

30 May 2009 - 2:18 pm | अरुण वडुलेकर

चूक ध्यानांत आणून दिल्या बद्दल धन्यवाद.
योग्य ती सुधारणा केलेली आहे.
कृपया नोंद घ्यावी.

वडुलेकर

रेवती's picture

30 May 2009 - 5:04 pm | रेवती

बापरे!
वाटत होतं त्यापेक्षा वेगळ्याच मार्गाने जाते कथा!
रेवती

आलीच होती पण पुढचे फसवणुकीचे प्रकरण आणि तीच मुलगी बायको म्हणून दुसर्‍याला सुचवणे हा प्लॅन मस्त रंगलाय! छानच कथा अरुणकाका.
तुमची लेखनशैली रसाळ आहे! :)

चतुरंग

सुमीत's picture

1 Jun 2009 - 10:25 am | सुमीत

अरूण काका, कथा आवडली.
पण कथेचे वळण थोडेसे अपेक्षीत होते, कारण कथेच्या सुरुवातीलाच मदन ची ओळख करून देताना तुम्ही तसे सुचविले होते.

मदनबाण's picture

1 Jun 2009 - 10:33 am | मदनबाण

कथा आवडली पण, या भागाचा अंदाज आला होता !!!

मदनबाण.....

I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.

स्वाती दिनेश's picture

1 Jun 2009 - 12:40 pm | स्वाती दिनेश

कथा काहीतरी वेगळा टर्न घेणार याचा अंदाज आला होता आणि उत्सुकताही होती. कथेने घेतलेले हे अनपेक्षित वळण वेगळेच होते.
गोष्ट आवडली.
स्वाती

सहज's picture

1 Jun 2009 - 1:41 pm | सहज

वडुलेकरांच्या कथा वेगळ्याच धाटणीच्या असतात.

जरुर वाचाव्याशा असतात.

धमाल मुलगा's picture

1 Jun 2009 - 2:50 pm | धमाल मुलगा

:O

आयला, ही काय पिडा म्हणायची राव!
अवघडच आहे की मदन!

भारी लिहिलंय काका.

----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::