सेव्हन पाउंडस् - एक अस्वस्थ करणारा अनुभव.

मुशाफिर's picture
मुशाफिर in जनातलं, मनातलं
5 Feb 2009 - 12:00 am

विशेष सुचना: ज्यांनी अजून 'सेव्हन पाऊंडस्' हा चित्रपट पाहिला नसेल आणि ज्यांना तो पाहण्याची ईच्छा असेल, त्यांनी वाचताना ह्या लेखाखालील अवांतर टिपा श़क्यतो वगळाव्यात. तसेच, माझा चित्रपट समिक्षा लिहिण्याचा कोणताही हेतू नाही. केवळ एक चांगला अनुभव इतरांबरोबर वाटून घ्यावा, म्हणून हा प्रपंच!
**************************************************************

गेल्या वर्षीचे शेवटचे दोन आठवडे खरचं खुप छान गेले. मला आणि माझ्या अर्धांगिनीला आपापल्या कामांमधून बर्‍यापैकी वेळ मिळाला होता. कुठेही फिरायला न जाता घरीच सुट्टी साजरी करावी, असे ठरल्यामुळे मी एकदम खुशीत होतो. अर्थात, त्यामुळे पुढे थोडा मनस्ताप झाला पण ह्या निर्णयामुळे जे कमावलं ते फारच मोलाचं आहे. तर आता नमनाला घडाभर तेल जाळून झाल्याने मुळ मुद्द्याकडे येतो.

२४ डिसेंबरला चित्रपट पहायला जाऊया, असा विचार पुढे आला. म्हणजे मला तशी आज्ञाच झाली !:) (कुणाकडून? असे विचारणार्‍या व्यक्तिचे अजून लग्न झाले नसावे, हा जाणकारांचा अंदाज अतिशय योग्य आहे ;)). तेव्हा त्या रात्री चित्रपट पहायला जाणे भाग होतं. त्यामुळे, जवळच्याच एका चित्रपटग्रुहात कोणते हिंदी चित्रपट दाखवत आहेत? ह्याचाही आंतरजालावर शोध सुरु झाला. तिथे 'रब ने बना दी जोडी' दाखवत होते (हाय रे कर्मा!). तो पहायला जाऊया, अशी फर्माईश झाली. तेव्हा तिकीटं आरक्षित करुन ठेवली. आठ वाजता चित्रपटग्रुहात पोहोचलो, तर ही गर्दी! त्यातून वाट काढत कसाबसा तिकीट घ्यायला तिकिट खिडकीपाशी पोहचलो, तर तिथली बया म्हणाली, "तू जे कार्ड वापरुन आरक्षण केलंस ते कार्ड आम्ही इथे स्विकारत नाही. तिकीट आरक्षित करणारी कंपनी वेगळी असल्याने तुला त्यांचाशी बोलावे लागेल". तीला म्हटलं, "बाई, आता असतील तुझ्याकडे दोन तिकिटं, तर दे ती मला दुसरं कार्ड घेउन. आरक्षण करणार्‍या कंपनीशी मी नंतर बोलेन." त्यावर तीने विचारलं, "कुठल्या खेळाची तिकीटं हवीत तुला?" ईथे एकाच वेळी बर्‍याच भाषातील चित्रपट साधारणपणे एकाच वेळेस सुरु होतात. आणि प्रचंड गर्दी असल्याने बोललेलं नीट ऐकूही येत नव्हतं. त्यामुळे स्पष्टतेसाठी मी तीला, "टू टिकेट्स फॉर रब ने बना दी जोडी ऍट एट फिफ्टीन" असं सांगितलं. तिने काय ऐकलं देव जाणे. कारण, खेळ सुरु होणार म्हणून रांगेतून घाईघाईत बायको उभी होती तिथे आलो आणि तिकिटं पाहिली, तर चक्क 'घजिनी' ची आठ पन्नास वाजताच्या खेळाची तिकीटं माझ्या हातात होती. तेव्हा उलगडा झाला की तीने "एट फिफ्टी" ऐकलं असावं. आणि अमेरिकेतल्या क्रुष्णवर्णीय ललनेला हिंदी चित्रपटाचे नावं कळेलं, ही माझी अपेक्षा फोल ठरली होती. त्यामुळे, त्या दिवशी 'घजिनी' बघणे आलेचं! तो चित्रपट पाहून भरपूर मनस्ताप करून घेवून घरी परतलो आणि उतारा म्हणून दुसर्‍या दिवशी घरी 'मेंमेटो' पाहिला, तोही तीनदा! (आमिरने इतक्या सुंदर चित्रपटाची अशी वाट का बरं लावावी?).

२५ डिसेंबरला आणि त्यानंतर सलग तीन दिवस सुट्टी असल्याने त्यादिवशी संध्याकाळी एकदमं दोन चित्रपट पहायचं ठरलं (म्हणजे 'रब ने बना दी जोडी' पासून काही केल्या सुटका नव्हतीच! :)) सध्यांकाळी साधारण सात वाजता पुन्हा त्याच चित्रपटग्रुहात पोहोचलो. त्यादिवशी तर खुपचं जास्त गर्दी होती आणि ती 'घजिनी' पहायला आलेल्यांची होती हे तिकीटासाठी रांगेत उभा राहताच लक्षात आलं. 'रब ने बना दी जोडी' साठी फार लोकं नव्हतेचं. त्याचवेळी त्याच रात्रीच्या दुसर्‍याही चित्रपटाच्या खेळाची (शक्यतो ईंग्रजी चित्रपटाची) ति़कीटं काढून ठेवावी, म्हणून तिथे असलेला फलक पाहीला. 'सेव्हन पाऊंडस्' हा विल स्मिथचा चित्रपट तिथे लागलेला दिसला. तो जमल्यास पहायचा हे आम्ही आधीच ठरवलं होतं. तेव्हा तीही तिकिटं त्याच वेळी विकत घेतली.

'रब ने बना दी जोडी' कसाबसा पूर्ण पाहून (म्हणजे मी! आमच्या कुटूंबाला तो आवडला :)) बाहेर पडलो आणि 'सेव्हन पाऊंडस्' च्या खेळाला जाऊन बसलो. तिथे आम्ही दोघे वगळता केवळ ५-६ लोकचं होती. त्यामुळे, हा पडेल चित्रपट आहे की काय? अशी शंका आली.

चित्रपट सुरु झाला आणि सार्‍या शंका पार फिटून गेल्या! चित्रपटाची कथा साधरण अशी आहे: एक आय. आर. एस. (ईंटर्नल रेव्हेन्यू सर्विसेस म्हणजे अमेरिकन सरकारचं भारतातील आयकर खात्याशी समकक्ष खातं) अधिकारी (विल स्मिथ) सात गरजू लोकांच आयुष्य कायमचं बदलून टाकतो. तो आपल्या फुप्फुसाचा एक भाग (लंग लोब) त्याच्या भावाचा जीव वाचवण्यासाठी देतो. लहान मुलांसाठी काम करणार्‍या हॉली नावाच्या कार्यकर्तीला तो आपल्या यक्रुताचा काही भाग दान करतो. त्यांनंतर तो शोध घेतो अशा इतर गरजू आणि असहाय्य लोकांचा ज्यांना जगण्यासाठी कुणाच्यातरी मदतीची गरज आहे. एक अंध पियानो वादक ज्याला एखादा नेत्रदाता द्रुष्टी देवू शकेल, एक निराधार स्त्री जी आपल्या प्रियकराकडून होणारी मारहाण निमुटपणे सहन करत आपल्या मुलांचा सांभाळ करत असते, एक लहान मुलगा ज्याला मज्जातंतू रोपणाची (बोन मॅरोची) आवश्यकता आहे, एक 'हॉकी' प्रशिक्षक ज्याला मुत्रपिंडाची गरज आहे, एक शुभेच्छापत्रकर्ती (ग्रीटिंग कार्ड प्रिंटर) जीला ह्रूदय दात्याची गरज असते अशा पाच जणांची निवड तो करतो आणि त्यांना मदतही करतो. हे करताना अतिंमतः तो स्वत:ला त्यासाठी संपवून टाकतो.

तो हे का करतो? हे चित्रपटाच्या शेवटी दाखवलयं. ते इथे सांगून रसभंग करत नाही.

या कथेच्या संपूर्ण प्रवासात लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे विल स्मिथ ह्या अभिनेत्याचा सहजसुंदर अभिनय. त्याचे ते विलक्षण बोलके डोळे सतत आपल्याला अस्वस्थ करून सोडतात. त्यात फार मोठी वेदना दडलेली आहे, असं सतत वाटंत राहातं. ती वेदना काय आहे? हे अर्थातच चित्रपटाच्या शेवटी उलगडतं. ह्यात तो खरोखरं कोण असतो? हाही भाग आलाच.

माणूस आपल्या मनातल्या अपराधी भावनेवर मात करताना किंवा आपण केलेल्या चुकीचं परिमार्जन करताना; इतर कितीतरी आयुष्य सुंदर बनवू शकतो, ही ह्या चित्रपटाची मध्यवर्ती कल्पना मला फार भावली. एक सुंदर आणि जीवंत अनुभव घेतल्याच समाधान आम्हाला ह्या चित्रपटाने दिलं. आणि आपल्या आयुष्यात आपल्यामुळे दुखावल्या गेलेल्या व्यक्तिंसाठी आपण काही करू शकतो का? हाही विचार मनात आला. आधी पाहिलेल्या तद्दन टुकार हिंदी चित्रपटांनंतर 'सेव्हन पाऊंडस्' हा सुखद शिडकावा ठरला.

अवांतरः 'जेलीफिश' च्या दंशांनंतरही ह्रुदय दान करता येवू शकतं का? हा प्रश्ण मला नंतर पडला पण तो फार मोठा मुद्दा नाही. ह्या चित्रपटाविषयी आधिक माहिती इथे पहा: http://en.wikipedia.org/wiki/Seven_Pounds
ह्या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहता ह्या सुंदर चित्रपटाकडे कोणाचंच फारसं लक्ष गेलेलं नाही, असं वाटतं राहातं.

अतिअवांतरः हा चित्रपट पाहताना क्लिंट ईस्टवूड आजोबांच्या 'ग्रॅन टोरिनो' ह्या चित्रपटाची जाहीरात पाहिली. तो ही गेल्या आठवड्यात पाहिला. पण त्याविषयी पुन्हा केव्हातरी!

चित्रपटप्रकटनविचारलेखअनुभवआस्वादविरंगुळा

प्रतिक्रिया

प्राजु's picture

5 Feb 2009 - 12:28 am | प्राजु

इंटरनेट वर कुठे मिळेल का सिनेमा बघायला?
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

मुशाफिर's picture

5 Feb 2009 - 12:43 am | मुशाफिर

मी काही संकेत स्थळांवर जावून हा चित्रपट पाहायचा प्रयत्न केला होता. पण नीट दिसत नव्हता. जमल्यास एखद्या खात्रीलयक संकेतस्थळाचा दुवा लवकरच देईन.

मुशाफिर.

इथे मिळाला. प्रिंट चांगली वाटत आहे.

दूवा

चकली
http://chakali.blogspot.com

माझी दुनिया's picture

10 Feb 2009 - 8:01 am | माझी दुनिया

दुव्याबद्दल धन्यवाद. परिक्षण आवडलं, चित्रपट पहायला हवाच.
___________
माझ्या लिखाणावर सर्व प्रकाशकांची मोजकी प्रतिक्रिया असते : साभार परत !
_____________
माझी दुनिया

भास्कर केन्डे's picture

5 Feb 2009 - 12:35 am | भास्कर केन्डे

मुशाफिर साहेब, मस्त लेखन. आवडले.

सेवन पाऊंड आता आमी पण बघणार. कारण घजनी व रब ने बना दी जोडी कडून स्वतःचा छळ करवून घेतला आहे. :)

अवांतर व अतिअवांतर एकत्र : लोकांना येवढाले चित्रपट इतक्या पटापट कसे काय पहायला जमतात बॉ? आमच्या वर्षभराच्या कोट्याला हे लोक एका आढवड्यात वरपतात. नशीबवान आसतात काही काही लेकाचे.

श्रावण मोडक's picture

5 Feb 2009 - 12:42 am | श्रावण मोडक

पहावाच लागेल हा चित्रपट. कथा पूर्ण कुठं मिळेल का हा महत्त्वाचा प्रश्न. या चित्रपटातले इंग्रजी उद्गार डोक्यावरून जातात. कानात शिरण्याचा तर प्रश्नच नाही. तेव्हा त्यांचा अर्थ तर कोसो दूर.

मुशाफिर's picture

5 Feb 2009 - 12:50 am | मुशाफिर

http://en.wikipedia.org/wiki/Seven_Pounds
पण खरं सांगयच तर, हा चित्रपट पाहताना संवाद नाही कळले तरी चालतील इतका सुंदर अभिनय विल स्मिथने केलाय. बर्‍याचदा त्याचे डोळे फार काही सांगून जातात त्याला शब्दांची गरजच नाही.

मुशाफिर.

श्रावण मोडक's picture

5 Feb 2009 - 12:56 am | श्रावण मोडक

त्याचसाठी म्हटलं, की पहावाच लागेल. डोळ्यांतून बरंच काही व्यक्त होतंय म्हणून तर पहायचा चित्रपट. कथासुद्धा मला थोड्या वेगळ्या कल्पनेची वाटली. म्हणून तीही स्वतंत्रपणे वाचायची आहे. तिचा दुवा दिल्याबद्दल धन्यवाद.

चकली's picture

5 Feb 2009 - 12:46 am | चकली

लगेच पहावासा वाटत आहे. "विल स्मिथ" माझा आवडता हिरो आहे.

चकली
http://chakali.blogspot.com

विसोबा खेचर's picture

5 Feb 2009 - 12:50 am | विसोबा खेचर

तो हे का करतो? हे चित्रपटाच्या शेवटी दाखवलयं. ते इथे सांगून रसभंग करत नाहीत.

या कथेच्या संपूर्ण प्रवासात लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे विल स्मिथ ह्या अभिनेत्याचा सहजसुंदर अभिनय. त्याचे ते विलक्षण बोलके डोळे सतत आपल्याला अस्वस्थ करून सोडतात. त्यात फार मोठी वेदना दडलेली आहे, असं सतत वाटंत राहातं. ती वेदना काय आहे? हे अर्थातच चित्रपटाच्या शेवटी उलगडतं. ह्यात तो खरोखरं कोण असतो हाही भाग आलाच.

सुरेख लेखन बर्र का मुशाफिरराव! सिनेमा नक्की पाहणार. आपले अजूनही असेच उत्तमोत्तम लेखन कृपया येऊ द्या मिपावर.

च्यामारी त्या सकस लेखनाचं तुणतुणं वाजवणार्‍यांना आता आणा पकडून माझ्यासमोर! बघतो एकेकाला! :)

तात्या.

मुशाफिर's picture

5 Feb 2009 - 1:09 am | मुशाफिर

हा माझा आंतरजालावरिल लेखनाचा (प्रतिक्रियांव्यतिरिक्त)पहिलाचं प्रयत्न आहे. जमेल त्याप्रमाणे लिहितं राहीन. आपण केलेल्या कौतुकाबद्दल आभारी आहे.

मुशाफिर.

सूर्य's picture

5 Feb 2009 - 1:29 am | सूर्य

चांगला चित्रपट दिसतोय. बरे झाले माहीती दिलीत मुशाफिर राव. ग्रॅन टोरिनो बद्दल सुद्धा लिहा लवकरच.

- सूर्य.

धनंजय's picture

5 Feb 2009 - 5:33 am | धनंजय

हल्लीच विल स्मिथचा "सिक्स डिग्रीज ऑफ सेपरेशन बघितला" - गुणी कलाकार आहे.

वर्णन ऐकून "सेव्हन पाउंड्स" बघायचे कुतूहल बळावले आहे. धन्यवाद.

मुक्तसुनीत's picture

5 Feb 2009 - 5:42 am | मुक्तसुनीत

परीक्षण आवडले. चित्रपट बघितलाच पाहिजे असेच म्हणतो. विल स्मिथचा "पर्स्युट ऑफ हॅपिनेस" हा अविस्मरणीय चित्रपट आहे !

सहज's picture

5 Feb 2009 - 8:03 am | सहज

परीक्षण आवडले. चित्रपट बघितलाच पाहिजे असेच म्हणतो. विल स्मिथचा "आय एम लिजंड" हा टाळण्यायोग्य चित्रपट आहे. :-)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

5 Feb 2009 - 10:45 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

परीक्षण आवडले. आणि इतर चित्रपटांबद्दल थोडक्यात माहिती देणार्‍या प्रतिसादकर्त्यांचे आभार!

अदिती
आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.

राघव's picture

12 Feb 2009 - 8:31 am | राघव

"पर्स्युट ऑफ हॅपिनेस"
अप्रतीम चित्रपट आहे. २ आठवड्यांपुर्वीच बघीतला.
मुशाफिर म्हणतात तसे या माणसाचे डोळे विलक्षण बोलके आहेत.
मुमुक्षु

शितल's picture

5 Feb 2009 - 7:59 am | शितल

परिक्षण आवडले. :)

मुशाफिर's picture

12 Feb 2009 - 12:43 am | मुशाफिर

सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकर्त्यांचे मनःपूर्वक आभार!

मुशाफिर.

परिकथेतील राजकुमार's picture

10 Feb 2009 - 11:29 am | परिकथेतील राजकुमार

काल रात्रीच ह्या चित्रपटाचा टोरँट डाउनलोडला लावुन गेलो होतो. आता तुमचे सुंदर परिक्षण वाचुन चित्रपट बघायचा उत्साह अजुनच वाढला आहे.

|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य

मुशाफिर's picture

12 Feb 2009 - 12:45 am | मुशाफिर

आपण केलेल्या कौतुकाबद्दल आभार.

मुशाफिर.

भडकमकर मास्तर's picture

15 Feb 2009 - 3:41 pm | भडकमकर मास्तर

परीक्षण वाचले त्यादिवशीच ठरवले हा चित्रपट पहायचा...
...
आजच पहिला...
उत्तम सिनेमा आहे.. आवडला...
एका निरीक्षणाशी सहमत की या सुंदर चित्रपटाकडे थोडेसे दुर्लक्ष झाले आहे...
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

स्वानन्द's picture

15 Feb 2009 - 6:42 pm | स्वानन्द

खरंच, अप्रतीम चित्रपट आहे. गंमत म्हणजे, Persuit of Happiness, Seven Pounds हे दोन्ही चित्रपट एकाच आठवड्यात पाहिले आणि त्यामुळे 'दुगना आनन्द' मिळाला!