आव्वाज आव्वाज..

आजी's picture
आजी in जनातलं, मनातलं
13 May 2025 - 2:26 pm

आमच्या सोसायटीत सगळे बंगलेच आहेत. आपापली घरं फक्त कामवाल्यांसाठी उघडून आणि त्या कामं करून गेल्यावर ती पुन्हा बंद करून सगळ्या गृहिणी टीव्हीवर, आणि आताशा ओटीटीवर सिनेमे किंवा हिंदी भाषेतल्या कौटुंबिक मालिका बघत बसतात.

पण त्या अधुनमधून बंगल्याबाहेरही पडतात. भिशी,किटी पार्टी, हळदीकुंकू,बारशी, वाढदिवस,भजन, सत्यनारायणाची पूजा, इत्यादी त्या थाटामाटात आणि एकत्र येऊन साजरे करतात.

यात थोडा बदल म्हणून मी त्यांना घरपोच लायब्ररी चालू करणे, रीडर्स क्लब, साहित्य कट्टा, चांगल्या वक्त्यांची भाषणे, चांगल्या गायकांच्या गाण्याचे कार्यक्रम असे अनेक कार्यक्रम सुचवून पाहिले पण त्याला शून्य प्रतिसाद मिळाला.

मग एकटं न पडण्यासाठी मी काय केलं? तर मीच त्यांच्या भिशीत जायला लागले. एक दोन किटी पार्ट्याही अनुभवल्या. पण तिथला दिखाऊपणा, अवेळी खाणं वगैरे काही माझ्याच्याने जमेना. मग मी तिथे जाणं थांबवलं.

भजन, सत्यनारायण पूजा हेही मला कंटाळवाणे वाटायला लागले. वाढदिवस आणि तत्सम समारंभावर केलेले अवाढव्य खर्च पटेनात. मग संबंध संपताहेत की काय असं वाटायला लागलं. संबंध वाढविण्यासाठी काय प्रयत्न करावेत याचा मी विचार करायला लागले.

माझ्याकडे त्यांच्या इतके दागिने नव्हते. पार्टी वेअर्स नव्हते. मेकअपचं सामान नव्हतं. माझं घर साधं होतं. त्यात भारी फर्निचर, एक्स्लुजिव्ह डेकोरेशन नव्हतं. पण मी निराश न होता त्यांच्याशी संवाद, संपर्क चालूच ठेवायचा असं ठरवलं.

मला एकदा एका बंगल्यातून "भजनाला या", असं निमंत्रण आलं. म्हटलं जाऊ या.

मी माझ्याकडे असलेल्या इन मिन साडे तीन "पार्टी वेअर्स"पैकी एक परिधान केला. एक मोत्यांची माळ घातली. उंच टाचांच्या चप्पल्स की सॅंडल्स की काय ते माझ्याकडे नाहीत. फार फार पूर्वी एकदा माझ्या नवऱ्याने हौसेने माझ्यासाठी आणले होते, पण ते घालून मला चालता आलं नाही. माझे दोन्ही पाय आळीपाळीने मुरगळले. तेव्हापासून मी हाय हील्सचा धसका घेतला आहे. तर एकूण मी आपली माझ्या क्षमतेनुसार, वकुबानुसार नटून भजनाला गेले.

बघते तर काय!

घराचा हाॅल अत्यंत लॅव्हिशली डेकोरेट केला होता. मध्यभागी दुर्गेची मूर्ती होती. त्या मूर्तीचे मखर रंगीबेरंगी फुलांनी सजवलेले होते. त्या मूर्तीच्या अंगाखांद्यावरच इतके दागिने घातले होते की काही विचारू नका. पण देवीच्या चेहऱ्यावरचे भाव प्रेमळ, सौम्य आणि प्रसन्न,हसरे होते. मी आजवर अनेक देवींच्या मूर्ती पाहिल्या. एकदम कडक. काळ्याभोर रंग, चेहरा उग्र, भयंकर रागीट आणि डोळे वटारलेले. देवींच्या अशा मूर्ती का घडवतात कोण जाणे! तिला आईसारखं प्रेमळ, आश्वासक चेहऱ्याचं का घडवत नाहीत?

हाॅलमध्ये बैठक व्यवस्था चांगली होती. भरपूर सोफे, खुर्च्या होत्या. खाली एक भारी गालिचाही अंथरला होता. मी एक सिंगल सोफा पकडून बसून राहिले. त्यांनी चार वाजता भजनाला बोलावलं होतं. मी शार्प चार वाजता तिथं हजर होते. अर्थात तिथे वेळेत पोचणारी मी एकटीच होते.

हळुहळू बायका जमायला लागल्या. एक बाई हातात ढोलकी घेऊन आली. त्यावरून होणाऱ्या भावी ध्वनीकल्लोळाच्या तीव्रतेचे डेसिबल्स माझ्या लक्षात आले. सगळ्या बायका जमेपर्यंत साडेचार आणि कहर म्हणजे पाचही वाजले. मला येऊन एक तास झाला होता. मला चेहऱ्यावरचा कंटाळा लपवणं कठीण जाऊ लागलं. येणारी प्रत्येक बाई लग्नसोहळ्याला यावं तशी नटून आली होती. प्रत्येकीच्या हातात निरनिराळी वाद्यं होती. झांजा, चिपळ्या, वगैरे वगैरे. त्यात भरीस भर म्हणून भजनाच्या निमंत्रक यजमानीण बाईंनी प्रमुख गाणाऱ्या बाईंसमोर माईक ठेवला. आणि दोन स्पीकर्स जोडले. ते पाहून मला धडकीच भरली. मग एकदाची भजनाला सुरुवात झाली.

दणादण ढोलकी बडवत बाई गाऊ लागल्या. तिला इतर बायका आपापल्या हातातली वाद्यं बडवत कोरसमध्ये साथ देऊ लागल्या.

गाणी बहुभाषिक होती. प्रामुख्याने हिंदी, गुजराती, पंजाबी, थोडी मराठी. बऱ्याचशा चाली हिंदी सिनेमातल्या गाण्यांच्या होत्या. "मैं तो भूल गयी बाबूलका देस","तन डोले मेरा", "परदेसिया ये सच है पिया", वगैरे वगैरे . पण ते ऐकून मला जराही दचकायला झालं नाही. कारण मी "दिलके झरोकेंमें तुझको बिठाकर"च्या चालीवर गणपती बाप्पाची आरती ऐकलेली तर आहेच शिवाय इतरही फिल्मी चालीवरची गणेशगीतं ऐकली पचवलेली आहेत.

आता भजनं म्हणणाऱ्यांना उन्माद चढला. आवाज अधिक, कर्कश्श झाले. दोन बायका तर उठून अचानक नाचायलाच लागल्या. त्या लहानशा हाॅलमधला भजनजल्लोष आता विकोपाला गेला. हाॅलच्या भिंतींना तडे देत तो सगळ्या सोसायटीभर पसरला. स्पिकर्स दणदणू लागले. सोसायटीत असणाऱ्या सर्व बंगल्यांच्या खिडक्यांच्या काचा थरथरु लागल्या. ढोलकीवर ताणून बसवलेलं कातडं आता फाटणार असं मला वाटायला लागलं.

मनात आलं, आवाजाचा घणाघात केल्या शिवाय आपण आपला आनंद व्यक्त करु शकत नाही का? बारसं, वाढदिवस, लग्न,हळद, संगीत सगळं आवाजी उत्साहात करायचं. पूर्वी भाद्रपदात येणाऱ्या गणपतीचं महत्त्व होतं. आता माघी गणपतीचाही उत्सव साजरा होतो. पूर्वी नवरात्र फक्त घराघरात साजरं व्हायचं. आता देवीची प्रचंड आकाराच्या मूर्ती आणल्या जातात. मंडप उभारले जातात. नवरात्रंही दोन झाली.

पूर्वीचं अश्विन शुद्ध प्रतिपदा ते अश्विन शुद्ध नवमीला येणारं. आणि नव्याने सुरु झालेलं चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा ते रामनवमीपर्यंत चालणारं. आता ही दोन्ही धुमधडाक्यात साजरी केली जातात. डी जे,नाच, गरबा, दांडिया, सगळीकडे कर्णकटु आवाजाचा घणाघात, ध्वनीचा धुमाकूळ.

यांत कुठलाही धर्म, पंथ, मागे नाही. कोणत्याही एका धर्माला विरोध करण्याचं,दोष देण्याचं कारण नाही. इथे सर्व धर्म समानता आहे. कानांवर आघात करत वाद्यं बडवली जात असतात. त्यावर उंच पट्टीत गायक, गायिका घसा खरवडून गात असतात. आणि ह्याला वेळेची मर्यादा नाही. रात्री दोन, अडीच वाजेपर्यंत हे भयसंगीत चालू असतं. कुणीही तक्रार करत नाही. सगळे निमूटपणे सहन करतात. कुणी तक्रार केलीच आणि पोलिस आलेच तर तेवढ्यापुरतं संगीत थांबवलं जातं आणि पोलिस गेले की पुन्हा ते सुरु होतं. कुठेही धाक नाही, भीती नाही, बंधन नाही. इतरांना त्रास होत असेल याची लाज नाही.

वाईट वाटतं!

भजन रंगात आलं होतं. मी बराच वेळ अवघडून बसले होते. मी यजमानीण बाईंना खूण करून जवळ बोलावून घेतलं. म्हटलं, "मी प्लीज घरी जाऊ का ? जास्त वेळ बसलं की वयपरत्वे माझी पाठ दुखते."

"अहो,पण भजन संपल्यावर नाश्ता आहे. तो खाऊन जा ना!"
"नको.अवेळी खाल्लं की मला त्रास होतो. वयपरत्वे."

तिनं मला जायची परवानगी दिली. मी घरी परतले. माझ्या खोलीत आले. खिडकीच्या थडथड करणाऱ्या काचांचा आवाज सहन करत सोफ्यावर गप्प बसून राहिले.

वाटलं,आवाजाची ही नशा, ही झिंग का चढतेय आपणा सर्वांना?या आवाजामागे आपण मनाच्या तळाशी असलेलं काही लपवतोय का? झाकतोय का?

देव बहिरा नाहीये जनहो! मनातल्या मनात केलेला विचारही त्याला ऐकू जातो. समजतो.

साहित्यिकसमाजजीवनमानप्रकटनविचारप्रतिसाद

प्रतिक्रिया

प्रकाश घाटपांडे's picture

14 May 2025 - 7:15 pm | प्रकाश घाटपांडे

हे कबीर भजन पहा https://youtu.be/fdxnwyg2W7w?si=Zgekl3df8HTQ8AKx

आनंदाच्या प्रमाणात डेसिबल्स वाढतात हल्ली लोकांचे.
परीक्षांचा कालावधी, म्हातारी माणसे, अर्भके, शाळा, दवाखाने, काळ-वेळ याचे काही सोयर-सुतक नसते लोकांना.

खूप मोठा आवाज केल्याशिवाय कोणताच कार्यक्रम सुफळ संपूर्ण होत नसतो अशी एक समजूत वाढते आहे हे नक्की. देवाचे तर कान बधिर झाले असतील कंठाळी भक्तिगीते ऐकून. त्याने कान बंद करून घेतले आहेत यात आश्चर्य नाही.