श्रद्धांजली
एसटी थांबली . तो शाळेपाशी उतरला. तो गावी आला होता .
रात्रीची वेळ. सगळीकडे शांत. असणारच ना .गाव छोटं होतं. मुख्य रस्त्यावरची दुकानं बंद झालेली. वर्दळ नाहीच . तशीही गावातली बरीचशी मंडळी शहराकडे. त्याच्या वयाची तर बहुतेक सारीच. काही अपवाद सोडता .
एक छोटा चौक आला .छेदणारे दोन रस्ते म्हणून चौक म्हणायचं . चारी बाजूला सारं मोकळंच. माळरान नुसतं. कोपऱ्यावर चहाची एक टपरी. अर्थात तीही बंद झालेली. एकुलता एक लाईटचा खांब. अंधुक प्रकाश फेकणारा आणि त्या खांबाला लावलेला एक बॅनर . त्याच अंधुक प्रकाशात दिसणारा ...
श्रद्धांजलीचा . त्यावर फोटो - एकनाथचा ...
त्याचा शाळेतला खास मित्र. ते वाचून त्याला रडूच आलं . त्या अंधारात, त्या शांततेत तो ओरडला -एक्क्या ! ...
तो त्याच्यासाठी एक्क्या होता . शाळेत पोरं कोणाला धड हाक मारतील या तर शपथ .
बॅनरवर त्याचा फोटो . दहाव्याची तारीख . ती उद्याचीच होती . त्याला त्याही परिस्थितीत बरं वाटलं . निदान दहावा तरी घावला .
मग बाकी गावातले मार्गदर्शक , आधारस्तंभ अन बाकी तथाकथित ,तरुण पुढारी पोरांचे फोटो किंवा गावटवाळांची नावं .
त्याला एक्क्याची खूप आठवण आली ...
दोघे एकाच वर्गात शिकले . पण एक्क्या दहावीला गचकला . हा कॉलेजसाठी शहरात गेला . पुढे त्याचा अन एक्क्याचा संपर्क राहिला नाही . एक्क्या पुढे शिकला नाही. पुढे तर त्याच्या डोक्यावर परिणाम झाला म्हणे . कशामुळे ? ते कळलं नाही . कोणी म्हणायचं आपोआप . कोणी म्हणायचं शिक्षणात आलेलं अपयश . तर कोणी म्हणायचं - प्रेमभंग !
नली ! ... त्याला ती आठवली . आता त्यांच्या त्या वयात, गावातली सुंदर पोरगी तीच म्हणल्यावर, ती साऱ्यांनाच आवडायची . यात नवल ते काय ? अन ती एक्क्याला लय आवडायची ,हे तर त्याला माहिती होतंच .
खरी गोष्ट राम जाणे ! पण लोक त्याला वेडा म्हणायचे खरे . अर्थात त्याला तो तसा कधीच वाटला नाही . हं ! एक होतं - एक्क्या काही म्हणता काहीच करत नव्हता . केस वाढलेले , दाढी वाढलेली. अंगात गचाळ, ढगळ, घाणेरडे कपडे अन अकाली आलेलं पोक्तपण .एक्क्या कोणाशी बोलत नसे, ओळख दाखवत नसे . हा गावाकडे कधी आला ,तर ह्यालासुद्धा .
एक्क्या म्हणजे तो लाईटचा खांब होता . चौकातला . अंधुक का होईना प्रकाश देतोय म्हणून त्याचं अस्तित्व मान्य करायचं. नाहीतर नसल्यात जमा .
हा घरी पोचला. दादा आणि आईशी बोलण्यात वेळ गेला .पण त्याला एक्क्याचा विषय काढावासा वाटला नाही. त्याला ते दुःख आता तरी नको होतं.
----------
सकाळी तो पेपर वाचण्यासाठी आणि चहासाठी म्हणून , त्या चौकातल्या चहाच्या टपरीवर गेला. टपरी उघडलेली तर होती ; पण दिसत नव्हती. कारण कोणी शहाण्याने एक टेम्पो आडवा लावला होता. जसा हा जवळ पोचला, त्याला आईमाईवरून शिव्या ऐकू येऊ लागल्या .मोठ्या , रागीट आवाजात. काय प्रकार होता , कोणास ठाऊक ?
तो टेम्पोच्या पलीकडे पोचला आणि ? -
तिथे स्वतःच्या श्रद्धांजलीच्या बॅनरच्या खाली , स्वतः एक्क्या उभा होता ! शिव्या देत . गावातल्या पोरांच्या आयाबहिणी उध्दारत .
त्याला काहीच कळेना . पण तो होता - जिवंत होता .
त्यावर एक्क्याने ओळख दाखवली ,' विज्या , ओळखलंस का मला ? का विसरला दोस्ताला ? '
'काय म्हणतोस एक्क्या ? ' तो म्हणाला .
' बघ रे. तूही बघ- भाडखावांनी माझा श्रद्धांजलीचा बॅनर लावलाय . तेबी मी जिवंत असताना ... आणि हा बॅनर माझ्याच हाताने लावून घेतलाय . साल्यांनी बॅनर लावेपर्यंत फोटो आणि नाव झाकून ठेवलं होतं .
त्याला हसावं का रडावं, तेच कळेना . त्याने आश्चर्याने डोळे विस्फारले ,'अरे, मग काढत का नाहीस तो ? '
त्यावर तो शहाणा म्हणाला ,''राहू दे रे. तेवढीच मजा त्या आई XXX पण तुला एक सांगू का ? मी काय मरत नाय. सगळ्यांना पोचवल्याशिवाय मी काय जात नाय . अरे ,या भाडूंचे बॅनर मीच लावणार आहे - श्रद्धांजलीचे ! '
प्रतिक्रिया
15 Jul 2024 - 10:16 am | सौंदाळा
मजेशीर
यावरुन एक सत्य घटना आठवली. काही वर्षांपूर्वी पुण्यात कात्रज भागात एका महिलेचे मंगळसूत्र मारले होते आणि काही दिवसांनी त्या मंगळसूत्र चोराचा फोटो कोणाच्या तरी बॅनरवर शुभेच्छुक म्हणून झळकला होता. महिलेने पोलिसांना दाखवून नंतर चोरट्याला अटक झाली होती.
16 Jul 2024 - 10:23 am | टर्मीनेटर
+१ मजेशीर आहे!
मंगळसूत्र चोराचा किस्सा भारीच.
मला ह्या कथेवरुन मध्यंतरी त्या 'ढिंच्याक पुजा'ने केलेली स्वतःच्या मॄत्युच्या पोस्टची नौटंकी आठवली 😀
16 Jul 2024 - 6:52 pm | पॅट्रीक जेड
ढिन्च्याक पुजा की पुनम पांडे?
16 Jul 2024 - 9:28 pm | टर्मीनेटर
स्मरणशक्ती आता दगा द्यायला लागली कि काय असा संशय आल्याने खात्री केल्यावर लक्षात आले कि ह्या दोन्ही 'पू' च्या बाबतीत घडलेली घटना थोडीफार सारखीच असल्याने प्रतिसादातल्या तपशिलात थोडासा घोळ झाला आहे 😀
कथा वाचताना ढिंच्याक पूजाच आठवली होती त्यासाठी कदाचित 'एक्क्या' प्रमाणेच पूजाच्या बाबतीत सहा एक वर्षांपूर्वी कुठल्याशा चॅनलने तिच्या मृत्यूची बातमी चालवण्याचा केलेला खोडसाळपणा कारणीभूत ठरला असावा आणि त्या घटनेच्या आठवणीत पूनम पांडेने मध्यंतरी स्वतःच केलेल्या चीप पब्लिसिटी स्टंटच्या संदर्भाची भेसळ झाली असावी 😂
तपशिलातला घोळ लक्षात आणून दिलात त्यासाठी आपले आभार!
16 Jul 2024 - 9:45 am | बिपीन सुरेश सांगळे
वाचक मंडळी नमस्कार आणि आभार .
जसं सुचतो तसं लिहितो .
अजूनही मला कथा प्रकार गवसत नाही असंच वाटतं .
पुन्हा धन्यवाद .
स्नेह असावा .
16 Jul 2024 - 10:44 pm | कर्नलतपस्वी
अजूनही मला कथा प्रकार गवसत नाही
विषय चांगला आहे पण वर्णन स्केची आहे. प्रसंग ,स्थळ,काळ,वातावरण निर्मिती यावर अजून स्पष्टीकरण हवे होते. कथेतील किरदार मनावर पकड घेण्या आगोदरच संपले आहेत. व्यक्तीचित्रांचे रेखाटन विस्तारपूर्वक केल्याने त्या आपल्या बरोबरच आहेत असे वाटते. आणी मग वाचक सुद्धा कथेतील एक किरदार बनून जातो. कथा प्रवाही बनते.
मी काही तज्ञ वगैरे नाही पण कथा वाचून झाल्यावर प्रतिसाद वाचताना,
जसं सुचले तसं लिहिले .
एसटी थांबली . तो शाळेपाशी उतरला. तो गावी आला होता .
नायक कुठून आला,गावाशी काय संबंध, एस टी स्टॅन्ड नाही का? शाळेपाशी उतरला तर काही जुन्या आठवणी, मुक्कामाची होती का पुढे जाणारी, किती दिवसांनी गावात आला,कोणी ओळखीचे भेटले का नाही......
अशा अनेकविध अंगाने कथा फुलवून सांगायची.
मुळात कथा या प्रकारात दोन मुख्य पात्र कथाकार आणी वाचक. या दोघांमधे संवाद घडला तर ती कथा. एकांगी कथा ,मग कथानक कितीही सशक्त असले तरी मनावर पकड घेत नाही. वाचक बिटवीन द लाईन आपल्या पद्धतीने वाचतो व कथा मुळ कथानका पासुन भरकटण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कथा आवडली.
16 Jul 2024 - 10:49 pm | कर्नलतपस्वी
म्हणण्यापेक्षा, कथा सांगणारा व कथा ऐकणारा असे जास्त प्रासंगिक ठरेल. कथाकार वाचक एकमेकांना बघत ,जवळ नसून सुद्धा एकमेकाची सान्निध्यात आहेत असे भासले की कथा जमली असे वाटते. अर्थात हे माझे मत आहे.
17 Jul 2024 - 8:21 pm | चौथा कोनाडा
हा ... हा .... हा ....
भारी अॅण्टी-क्लायमॅक्स !
गावात अश्या खोडया, कुरापती लै चालतात ! नुसती धमाल असतेय !
आमच्या गावात यात्रेनंतर च्या व्यापारयांच्या / सेवकांच्या जेवणावळीत भांग टाकून घडलेले किस्से कित्येक महिने चघळले जायचे ! ते आठवत ! पुढ्चे दोन चार महिने येड्यासारखे हसत सुटायचे !
बिपीन सुरेश सांगळे// मस्त झकास किस्सा !
तुमचा अश्या कथालेखनात हात खंडा आहेच !
मजा आली !