श्रद्धांजली
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
श्रद्धांजली
एसटी थांबली . तो शाळेपाशी उतरला. तो गावी आला होता .
रात्रीची वेळ. सगळीकडे शांत. असणारच ना .गाव छोटं होतं. मुख्य रस्त्यावरची दुकानं बंद झालेली. वर्दळ नाहीच . तशीही गावातली बरीचशी मंडळी शहराकडे. त्याच्या वयाची तर बहुतेक सारीच. काही अपवाद सोडता .
एक छोटा चौक आला .छेदणारे दोन रस्ते म्हणून चौक म्हणायचं . चारी बाजूला सारं मोकळंच. माळरान नुसतं. कोपऱ्यावर चहाची एक टपरी. अर्थात तीही बंद झालेली. एकुलता एक लाईटचा खांब. अंधुक प्रकाश फेकणारा आणि त्या खांबाला लावलेला एक बॅनर . त्याच अंधुक प्रकाशात दिसणारा ...
श्रद्धांजलीचा . त्यावर फोटो - एकनाथचा ...
त्याचा शाळेतला खास मित्र. ते वाचून त्याला रडूच आलं . त्या अंधारात, त्या शांततेत तो ओरडला -एक्क्या ! ...
तो त्याच्यासाठी एक्क्या होता . शाळेत पोरं कोणाला धड हाक मारतील या तर शपथ .
बॅनरवर त्याचा फोटो . दहाव्याची तारीख . ती उद्याचीच होती . त्याला त्याही परिस्थितीत बरं वाटलं . निदान दहावा तरी घावला .
मग बाकी गावातले मार्गदर्शक , आधारस्तंभ अन बाकी तथाकथित ,तरुण पुढारी पोरांचे फोटो किंवा गावटवाळांची नावं .
त्याला एक्क्याची खूप आठवण आली ...
दोघे एकाच वर्गात शिकले . पण एक्क्या दहावीला गचकला . हा कॉलेजसाठी शहरात गेला . पुढे त्याचा अन एक्क्याचा संपर्क राहिला नाही . एक्क्या पुढे शिकला नाही. पुढे तर त्याच्या डोक्यावर परिणाम झाला म्हणे . कशामुळे ? ते कळलं नाही . कोणी म्हणायचं आपोआप . कोणी म्हणायचं शिक्षणात आलेलं अपयश . तर कोणी म्हणायचं - प्रेमभंग !
नली ! ... त्याला ती आठवली . आता त्यांच्या त्या वयात, गावातली सुंदर पोरगी तीच म्हणल्यावर, ती साऱ्यांनाच आवडायची . यात नवल ते काय ? अन ती एक्क्याला लय आवडायची ,हे तर त्याला माहिती होतंच .
खरी गोष्ट राम जाणे ! पण लोक त्याला वेडा म्हणायचे खरे . अर्थात त्याला तो तसा कधीच वाटला नाही . हं ! एक होतं - एक्क्या काही म्हणता काहीच करत नव्हता . केस वाढलेले , दाढी वाढलेली. अंगात गचाळ, ढगळ, घाणेरडे कपडे अन अकाली आलेलं पोक्तपण .एक्क्या कोणाशी बोलत नसे, ओळख दाखवत नसे . हा गावाकडे कधी आला ,तर ह्यालासुद्धा .
एक्क्या म्हणजे तो लाईटचा खांब होता . चौकातला . अंधुक का होईना प्रकाश देतोय म्हणून त्याचं अस्तित्व मान्य करायचं. नाहीतर नसल्यात जमा .
हा घरी पोचला. दादा आणि आईशी बोलण्यात वेळ गेला .पण त्याला एक्क्याचा विषय काढावासा वाटला नाही. त्याला ते दुःख आता तरी नको होतं.
----------
सकाळी तो पेपर वाचण्यासाठी आणि चहासाठी म्हणून , त्या चौकातल्या चहाच्या टपरीवर गेला. टपरी उघडलेली तर होती ; पण दिसत नव्हती. कारण कोणी शहाण्याने एक टेम्पो आडवा लावला होता. जसा हा जवळ पोचला, त्याला आईमाईवरून शिव्या ऐकू येऊ लागल्या .मोठ्या , रागीट आवाजात. काय प्रकार होता , कोणास ठाऊक ?
तो टेम्पोच्या पलीकडे पोचला आणि ? -
तिथे स्वतःच्या श्रद्धांजलीच्या बॅनरच्या खाली , स्वतः एक्क्या उभा होता ! शिव्या देत . गावातल्या पोरांच्या आयाबहिणी उध्दारत .
त्याला काहीच कळेना . पण तो होता - जिवंत होता .
त्यावर एक्क्याने ओळख दाखवली ,' विज्या , ओळखलंस का मला ? का विसरला दोस्ताला ? '
'काय म्हणतोस एक्क्या ? ' तो म्हणाला .
' बघ रे. तूही बघ- भाडखावांनी माझा श्रद्धांजलीचा बॅनर लावलाय . तेबी मी जिवंत असताना ... आणि हा बॅनर माझ्याच हाताने लावून घेतलाय . साल्यांनी बॅनर लावेपर्यंत फोटो आणि नाव झाकून ठेवलं होतं .
त्याला हसावं का रडावं, तेच कळेना . त्याने आश्चर्याने डोळे विस्फारले ,'अरे, मग काढत का नाहीस तो ? '
त्यावर तो शहाणा म्हणाला ,''राहू दे रे. तेवढीच मजा त्या आई XXX पण तुला एक सांगू का ? मी काय मरत नाय. सगळ्यांना पोचवल्याशिवाय मी काय जात नाय . अरे ,या भाडूंचे बॅनर मीच लावणार आहे - श्रद्धांजलीचे ! '
प्रतिक्रिया
मजेशीर
मजेशीर आहे!
ढिन्च्याक पुजा की पुनम पांडे
दोन्ही 'पू' च्या बाबतीत घडलेली घटना
वाचक मंडळी नमस्कार आणि आभार .
@बिपीन सांगळेजी
कथाकार आणी वाचक...
हा .... हा .... हा .... !