पाहिले म्यां डोळा..

आजी's picture
आजी in जनातलं, मनातलं
8 Aug 2023 - 9:23 am

मृत्यू! एक भयभीत करणारा शब्द! पण जन्मलेल्या प्रत्येकाला तो अटळ आहे. मृत्यूचा विषय निघाला की बरेच जण रादर सगळेच गंभीर होतात. नको तो अभद्र विषय अशीच बहुतेकांची प्रतिक्रिया असते. काहीजण मात्र थोड्या वेगळ्या प्रतिक्रिया देतात, अर्थात् त्यातली अटळता स्वीकारुन. "येईल तेव्हा बघू. आत्तापासूनच कशाला काळजी?" "मरणाच्या भीतीने काय काही मजा करायचीच नाही?" "भीतीपोटी काय घाबरत घाबरत जन्म काढायचा की काय?" "येऊ दे. यायचा तेव्हा येईल. तेव्हाचं तेव्हा बघता येईल. " "प्रत्येकाला जायचंच आहे. कुणीही अमरपट्टा घेऊन जन्माला आलेलं नाही. "

"मरणात खरोखर जग जगते." कुणीतरी मरतं त्याचवेळी कुणीतरी जन्म घेतं. मृत्यू नसताच तर कायमस्वरूपी जगणं किती कंटाळवाणं झालं असतं! मृत्यू आहे म्हणून नावीन्याला जागा आहे. मृत्यू आणि नवनिर्मिती एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.
मृत्यूला पण एक उदात्त बाजू आहे. "मरावे परि कीर्तीरुपे उरावे,"असं वचन आहे. "देशासाठी बलिदान करा." "सामाजिक कार्य करता करता जीवन संपवा."जन्मभर एक ध्येय ठरवा आणि त्यासाठी वेळ पडल्यास मृत्युलाही कवटाळा." असे उदात्त विचारही काहीजण मांडतात.

मृत्युची भीती मात्र प्रत्येकालाच वाटते. आपल्याला मरताना यातना होतील का ,ही ती भीती असते. आपण जिथं जगलो ते जग,आपली माणसं पुन्हा कधीच दिसणार नाहीत याचं दुःख असतं. पण भीती वाटते म्हणून प्रत्येकजण कंटाळून किंवा घाबरून आत्महत्या करत नाही. आत्महत्या हे पातक समजतात. मृत्यू झटकन यावा,आपण आजारानं खितपत पडायला नको, कंटाळलेल्या नातेवाईकांनी आपल्या मृत्युसाठी वाट बघू नये. "विनादैन्येन जीवनं,अनायासेन मरणं"यावं अशी प्रत्येकाचीच इच्छा असते.

काही माणसे मात्र दुर्दैवाने मरणाची वाट बघत असतात. कवि सुरेश भटांच्या शब्दात वर्णन करायचं तर

इतुकेच मला चढताना सरणावर कळले होते,
मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते

अशी वेळही येते. जिवंतपणी मरणयातना भोगणारे अनेकजण असतात. हिटलरच्या छळछावणीतील बंदीवान, शत्रू देशातील कारागृहातील कैदी, अंदमानच्या सेल्युलर जेलमधले काळ्या पाण्याची शिक्षा झालेले कैदी या सगळ्यांनी जिवंतपणी मरणयातना सोसल्या.

अर्थात् काहीजण सुखानं मरतात. दीर्घ आयुष्य, मनःस्वास्थ्य, सुखसमृद्धी भोगून, कर्तव्यपूर्तीचं समाधान मनात बाळगून, कष्टाला फळ आलेलं बघून,जीवनाचा चांगल्याप्रकारे उपभोग घेऊन, प्रियजनांच्या सहवासात! असं मरण प्रत्येकाला हवं असतं.

आता थोडी गंमत!!

मी नोकरीत असताना एका कार्यालयात एक भित्तीपत्रक चालवत असे. छंद, मजा,चेंज म्हणून. (म्हणजे मी कामं सोडून नसते उद्योग करत होते असं नाही बरं!)

त्यात एकेदिवशी मी सहज सुचलं म्हणून एक कोडं घातलं. किंवा प्रश्न टाकला म्हणा.

"मरणे"अशा अर्थाचे शब्द लिहा. त्यात आमच्या बाॅसपासून (त्यांना आम्ही त्यांच्या मागे काय म्हणायचो ते सांगत नाही. अहो,त्याचीच एक शब्दावली होईल.) हां तर बाॅसपासून शिपायापर्यंत सर्वांनी भाग घेतला. विविध धर्मीय, विविध भाषिकांनीही त्यात भाग घेतला. काही अजून आठवणारे शब्द असे-
मरणे, मृत्यू पावणे,निजधामास जाणे, देवाज्ञा होणे, वारणे,चचणे,खपणे, देवाघरी जाणे,अल्लाको प्यारा होना, वैकुंठवासी होणे, कैलासवासी होणे, चितेवर चढणे, सरणावर चढणे ,नाश होणे, परलोकी जाणे, मसणात जाणे,ढगात जाणे, बाप्पाकडे जाणे, ताटीवर पडणे, मृत्युमुखी पडणे, मृत्यूला कवटाळणे, देहांत होणे, परलोकी जाणे, इहलोकीची यात्रा संपवणे.

रोज मी पाहायची दोन/चार शब्दांची तरी भर पडलेली असायची. एका क्लार्कने तर "फाईल क्लोज होणे"असा शब्द लिहिला तर आमच्या टकलू ने-ऊर्फ-बाॅसने "वरुन मेमो मिळणे"असा शब्द लिहिला. (सांगू का आम्ही त्यांना काय काय म्हणायचो ते! जाऊ दे.फिर कभी!) शेवटी मी शब्द मोजले ते बावन्न भरले. सगळ्यांनीच एन्जॉय केलं.

"रोते हुए आते हैं सब
हॅंसता हुवा जो जाएगा ।
वो मुकद्दरका सिकंदर
जानेमन कहलाएगा!"

धोरणमांडणीप्रकटनविचार

प्रतिक्रिया

विजुभाऊ's picture

8 Aug 2023 - 10:25 am | विजुभाऊ

इथे लिहा की ते शब्द. आमचाही शब्द संग्रह वाढेल तेवढाच.
मरणे याला " ग्रंथ आटोपणे " असाही एक शब्द आहे

नचिकेत जवखेडकर's picture

8 Aug 2023 - 11:46 am | नचिकेत जवखेडकर

आमच्या ओळखीतील एक जण `शिट्टी उडणे` असा वाक्प्रचार करायचे!

आजी स्टाईल खुसखुशीत लेख!!

'गवि' नावाच्या महान मिपाकराने हे काम पूर्वीच करुन ठेवले आहे.
https://www.misalpav.com/node/15454

काय मेमरी आहे. प्रणाम...

अथांग आकाश's picture

8 Aug 2023 - 2:14 pm | अथांग आकाश

लेख आवडला!
-

चौथा कोनाडा's picture

10 Aug 2023 - 7:37 pm | चौथा कोनाडा

व्वा, छान खुसखुषीत मार्मिक लेख !

जन्मणे या शब्दावर लिहायला स्कोप आहे असे जाणवले !

पुलेप्र.