जीऐ मराठीतील मैलाचा दगड - जन्म शताब्दी वर्ष

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जनातलं, मनातलं
5 Jul 2023 - 1:15 pm

दिव्याचे तेज, डोळ्यांचे वेज
कोण तिथे जाळीत आहे

शंभर वर्षांनंतर कोण माझी
कविता वाचीत आहे?

माझी उन्हे मावळली आहेत
माझी फुले कोमेजली आहेत

कालचा प्रकाश कालचा सुवास
मात्रा वेलांटीत शोधीत आहे

शंभर वर्षांनंतर कोण माझी
कविता वाचीत आहे?

आजची फुले आजच्या उन्हात
पाखरांचा शब्द पिकला रानात

माझी कविता तिथे वाचा
जिथे ती दिनरात घडत आहे

शंभर वर्षांनंतर कोण माझी
कविता वाचीत आहे?

वा.रा कांत

शतकवीर फक्त क्रिकेट मधेच नसतात तर इतर प्रांतातही आसतात.असेच एक साहीत्य क्षेत्रातील दिग्गज शंभर वर्षापुर्वी जन्माला आले आणी आपल्या प्रतीभेचा ठसा जनमानसात सोडून गेले. जीए, गुरूनाथ आबाजी कुलकर्णी. वर्ष २०२२-२३ हे जन्म शताब्दी वर्ष म्हणून साजरे होत आहे.आज शंभर वर्षांनंतरही यांचे साहित्य अभ्यासले जात आहे, वाचले जात आहे,त्यावर विचार मंथन होत आहे.

जीए प्रेमींनी १० मार्च ते १२ मार्च २०२२ कायप्पावर ग्रुप करून जवळ पास १२० कथांवर सांगोपांग चर्चा केली आहे.याचे संकलन इसाहित्य. काॅम या संस्थळावर जीए- कथा आवकाश भाग-१ या नावाने उपलब्ध आहे .

माझा वाचन प्रवास,जर आजच्या भाषेत बोलायचे झाले तर एका ऑडिओ बुक ने सुरू झाला.आई म्हणजे माझे पहिले किंडल व पहिली कवीता मी ऐकली ती दत्तू घाटे यांची "रवी गेला रे सोडूनी आकाशाला".याच बरोबर "चांदोबा चांदोबा भगलास का".आजोबा, मामा,मावशी अशा वेगवेगळ्या "किडंलां",कडून गोष्टी ऐकत माझा सुरवातीचा वाचन प्रवास समृद्ध झाला."शामची आई",हे पुस्तक मराठी घराघरातुन वाचन करता येणार्‍या लहान मुलांना वाचण्यास देत,तद्वत मलाही मिळाले.माझे वाचनात आलेले पहिले छापील पुस्तक. पुढे हा प्रवास चालू राहीला वयोमानानुसार त्यात बदल होत गेले.कमी वयातच महाराष्ट्रा बाहेर जावे लागल्याने वाचन प्रवास मराठी पुरता खंडीत होउन त्याची जागा हिन्दी व आंग्ल भाषेने घेतली.असो प्रस्तुत लेख प्रसिद्ध साहित्यिक जीए यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आठवण आणी आदरांजली वाहाण्या करता आहे.

त्यांच्या आयुष्यावर काही लिहीणार नाही.त्या बद्दल विपुल माहीती अंतरजालावर उपलब्ध आहे. मिपावर सन्माननीय सदस्यांनी सुद्धा या आगोदर भरपुर लिहीले आहे. जरूर वाचा,सुदंर लिहीले आहे.

लिंक्स

जी.ए. कुलकर्णी - अज्ञात आढावा
यकु
https://www.misalpav.com/user/9247

जीएच्यां लेखन शैलीचा विस्तृत उहापोह केला आहे.डाॅन ही कथा उचकटून सांगीतली आहे.

https://misalpav.com/node/type/story
चैत्र
मुक्तसुनित

आयुष्यात चालताना आपण शक्यतो चिखल टाळावा. शिवाय आपल्या साध्या चालण्याने इतरांवरही तो उडणार नाही याची काळजी घ्यावी.

https://www.misalpav.com/user/23651
जीऐ एक वेदना
अतुल ठाकूर

Shallow people demand variety — but I have been writing the same story throughout my life, every time trying to cut nearer the aching nerve. Strindberg
(पिंगळावेळ – जी.ए. कुलकर्णी)

https://www.misalpav.com/user/220
आकाशफुले
दिनेश ५७

जीएंच्या कथांनी तरुणाईच्या उंबरठ्यावरच वेड लावलं असल्याने, मधल्या,एवढ्या वर्षांच्या कालखंडा नंतर पुन्हा एकदा जीएंच्या घरात बसून, त्यांच्या भगिनीकडून जीए नव्याने ऐकू लागलो.

https://www.misalpav.com/node/44504/
अन्या बुद्धे

https://www.misalpav.com/user/26729
अश्विनी वैद्य
प्रिय जीए

सेवानिवृत्तीनंतर लेखकाचे दोन कथासंग्रह वाचनात आले.एक पिंगळावेळ व दुसरा काजळमाया. दोन्ही बद्दल लिहीत बसलो तर मोठी लेखमाला होईल.मला सर्वात जास्त आवडलेल्या दोन्ही कथासंग्रहातील अनुक्रमे "ऑर्फीयस"व"अंजन"या कथां बद्दल चार शब्द लिहावेत असे वाटले. तुम्ही म्हणाल की हेच कथासंग्रह का? मला या लेखका बद्दल फारसे माहीत नव्हते. जेंव्हा अक्षरधारा या दुकानात पुस्तके घेत होतो तेंव्हा जीए च्यां जन्मशताब्दीचे पत्रक वाचले.वाटले यांचे एखादे पुस्तक घ्यावे.म्हणून गुगल वर शोधले तर कळाले काजळमाया हा कथासंग्रह साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित आहे म्हणून खरेदी केला. (दिल्लीच्या साहित्य अकादमीचा पुरस्कार,पुढे टीका झाल्यामुळे जी.एं.नी प्रवास खर्चा सकट परत केला).पिंगळावेळ हे पुस्तक मिपा सदस्य चित्रगुप्त यांनी सुचवले.

पिगंळावेळ

You do not know,
The unspoken voice of sorrow in the ancient bedroom At three o'clock in the morning.

-T. S. Eliot

सूर्यास्ताच्या वेळी किंवा पहाटेच्या वेळी पिंगळा दिसतो म्हणून या वेळांना पिंगळावेळ असे म्हटले जाते.लहानपणी पहाटे रामप्रहरी पिगंळा जोशी कुडमुडे(डमरू) वाजवत आमच्या गावात गल्ली गल्लीतून फिरायचा.अध्यात्म साध्या सोप्या भाषेत सांगायचा.पिंगळा या पक्ष्याची भाषा समजते व त्याआधारे तो भविष्य सांगतो असे मानले जात असे.मान्यता अशी की सकाळी याच्या मुखातून बाहेर पडणारी वाणी सत्य होणार.त्याच्या मुखाने आपले पुर्वज संदेश देतात अशी श्रद्धा/अंधश्रद्धा होती. पिंगळा पक्षी घरातील मृत्यूची पूर्वकल्पना देतो असाही समज आहे.या पक्ष्याला अशुभ मानतात.पिंगळा हे लक्ष्मीचे वाहन मानले जाते. ही सर्व ऐकीव माहीती.या पाठीमागचे संदर्भ शोधण्याचा प्रयत्न केला नाही.आमची आई पसा दोन पसा धान्य त्याच्या झोळीत टाकून कुटुंबातील सर्व लोकांसाठी आशीर्वाद घ्यायची.

साखरझोपेत, कुडमुड्या जोशीचा सुमधुर आवाज आणी डमरू वाजवायची ती एक विषेश लकब खुप गोड वाटायची.गोधडीची उब, पहाटेची निरव शांतता आणी पिंगळ्याचा आवाज,थोड्यावेळा पुरती जाग यायची व पुन्हा निद्रा देवीच्या कूशीत.स्वप्नवत वाटायचे. माझ्या आयुष्यातील एक सुखद अनुभव होता.आजही हे सर्व आठवले की रोमांचित होतो.

पिंगळा महाद्वारीं बोली बोलतो देखा ।
डौर फिरवितो डुगडुग ऐका ॥ ध्रु०॥

वरल्या आळीला तुम्ही सावध रहावें ।
पाटीलबुवाला मग लावून सवें ।....

-एकनाथ महाराज

असो.....

पिगंळावेळ कथासंग्रहातील,ऑर्फीयस,स्वामी,कैरी,वीज, फुंका, तळपट, मुक्ती, कवठे,घर,यांत्रिक, लक्ष्मी या ११ कथा. वाचल्यानंतर लक्षात येते जीए नीं कथासंग्रहाला किती समर्पक नाव दिले आहे.

ऑर्फीयस ही पहिलीच कथा,नाव वाचून कदाचित अनुवाद असावा असा समज झाला,नंतर बघू म्हणून वाचन सोडून दिले.पुढे बरेच दिवस पुस्तका कडे लक्ष गेले नाही.

अनुवाद हा प्रकार सर्वात आवघड प्रकार.सहसा मी याच्या नादी लागत नाही.अन्य भाषेतील अभिव्यक्ती जशीच्या तशी,गुणअवगुणांसह वाचकांपर्यंत पोहचवणे फार कठीण. शांताबाई शेळके या आवडत्या लेखीकेचे अनुवादित चारचौघी हे पुस्तक संग्रही असुनही अजुनही वाचले नाही.

ऑर्फीयस

अचानक एक दिवस ऑर्फीयस ही कथा वाचायला घेतली.नेटाने पहिले तीन चार परिच्छेद वाचल्यावर मन कथानकात गुंतत गेले,मग एका बैठकीत गोष्ट पुर्ण वाचली आणी पुस्तकही.बाकीच्या कथा सुद्धा खुपच भारी आहेत.

ग्रीक मिथक कथेचा अनुवाद जी ए नीं इतका सुंदर केला आहे की तो अनुवाद वाटतच नाही.किबंहूना मुळ कथा पाॅवर ऑफ म्युझिक आधारित आपल्या स्वतंत्र शैलीत त्यांनी ऑर्फीयस कथा लिहीली आहे असे वाटते.

ऑर्फीयस,ही कथा वाचताना मला सत्यवान सावित्री या पौराणिक कथेची आठवण झाली.का,याचे कारण पुढे सांगतो.

आपल्यापैकी बर्‍याच सन्माननीय सदस्यांनी जीएचें साहित्य नक्कीच वाचले असणार.कथेचा संक्षिप्त गाभा इथे नमूद करतो. कुठे चुकत असेल तर दुरूस्त करावे.

ऑर्फीयस, सुदंर गुढकथा आहे.मुळ कथा माहीत नसल्याने पहिल्यांदा वाचताना गोंधळ उडाला.दोन तीन वेळेस वाचल्यावर मात्र समजली.

कथानक सारंश

ऑर्फीयस व युरिडीसी पती पत्नी, युरिडीसीचा मृत्यू सर्पदंशाने होतो. विरहाने व्याकुळ ऑर्फीयस तीला परत आणण्यासाठी थेट देवाकडे पोहोचतो.देवांकडे मागणे करतो, युरिडिसीला परत द्या नाहीतर मला इथे ठेवून घ्या.देव त्याची मागणी नियतीने घालून दिलेल्या मर्यादेमुळे पुर्ण करण्यास असमर्थता दर्शवतात.

ऑर्फीयस हा एक उत्तम संगीतज्ञ, कलाकार,विलक्षण प्रतिभेचा धनी. लायेर (Lyre) हे ऑर्फीयसचे वाद्य. संगीत कलेचा पुरेपूर उपयोग तो आपल्या या अभूतपूर्व प्रवासात करतो. देवी देवतां त्याच्या अद्भुत संगीतावर प्रसन्न होतात,नियतीच्या नियमा विरूद्ध जाऊन युरिडिसीला सशर्त घेऊन जाण्याची परवानगी देतात. देवी देवता व दिवंगत पत्नी बरोबर झालेले संभाषण,आपले उद्दिष्ट साध्य झाले असताना देवांनी घातलेली अट ऑर्फीयस मोडतो त्यावेळेस मनाची झालेली उलघाल, युरिडीसीचा तर्क,अनपेक्षित निर्णय, मृत्यूलोक ते कृष्णलोक प्रवासात ऑर्फीयसला आलेले अनुभव या सगळ्याचे विलक्षण वर्णन जीएच्यां सिद्धहस्त लेखणीतून उतरले आहे.

कथेतील पात्रांचे व स्थळ काळाचे वर्णन ही कथेची मोठ्ठी जमेची बाजू आहे.मुख्य पात्रे ऑर्फीयस,युरिडिसी व सबंधित ग्रीक देवी देवता आहेत. प्लुटो व सरव्हिरस या दोनच ग्रीक देवतांची नावे कथेत आहे.

कथा वाचताना बरेच वेळा मन काही ठिकाणी आडकून पडते.काही वाक्ये अंतरमुख करतात.मन अनाहूतपणे या वाक्यांचा संदर्भ स्वताच्या आयुष्यात घडलेल्या घटनांशी लावण्याचा,पडताळून पहाण्याचा प्रयत्न करतो. उदाहरणार्थ....

" जिवंत असता वैतागाने अनेकदा मृत्यूला साद घालणारी माणसे, मृत्यू खरोखरच आल्यावर पुन्हा त्याच दाहक आयुष्याकडे जाण्यासाठी हैराण होतात, हे पाहून त्याला फार विस्मय वाटला व जे आहे ते मात्र नको, ही भावना मानवी जीवनाचा शापच आहे की काय"
" मृत्यूपूर्वी वेदना,मृत्यूत वेदना, मृत्यूनंतर वेदना आणि तरीही हे सगळे ज्याचा परिणाम आहे त्याच आयुष्याकडे पुन्हा परत जाण्याची एवढी आसक्ती"

मुळ कथा माहीत नसल्याने अजून वेगळे काही संदर्भ कळतील या उद्देशाने अंतरजाल खंगाळले.संबधीत ग्रिक देवी देवतांची नावे आढळली. ती खाली नमूद केली आहेत.

अरीस्टौस (Aristaeus) : युरीडीसीचा पाठलाग करणारा देव
सरव्हीरस (Cerberus) : पाताळलोकीच्या दारावरचा रक्षक कुत्रा
प्लुटो (Pluto) : मृत्यूचा देव
हेडस (Hades) : मृत्यूदेव प्लुटोचे दुसरे नाव
पर्सिफोन (Persephone) : मृत्यूदेव प्लुटोची पत्नी
झ्यूस (Zeus) : वीज आणि वादळांचा देव, डिमीटरचा नवरा आणि वेगवेगळ्या पत्नीकडून पर्सिफोन, अपोलो आणि हेर्मेझ चा पिता
डिमीटर (Demeter) : शेती आणि सुगीची देवी, झ्यूसची पत्नी आणि पर्सिफोन ची आई
अपोलो (Apollo) : झ्यूसचा वेगळ्या पत्नीकडून झालेला मुलगा आणि खेळांचा देव
हेर्मेझ (Hermes) : झ्यूसचा वेगळ्या पत्नीकडून झालेला मुलगा आणि खेळांचा देव
सूर्यदेव (Helios) : पर्सिफोनला प्लुटो पाताळात घेऊन गेला हे डिमीटरला सांगणारा देव.

(अंतरजालावरून साभार)

ऑर्फीयस,ही कथा वाचताना मला सत्यवान सावित्री कथेची आठवण झाली कारण दोन्ही मध्ये काही साम्य आहे.सत्यवानाचा मृत्यू झाल्यावर नंतर सावित्री यमराजच्या पाठोपाठ यमलोका पर्यंत गेली होती.यमराज तीला सत्यवानाचे प्राण परत देण्यास नकार देतो पण त्या ऐवजी तीन वर माग असा उपाय सुचवतो.सावित्री बुद्धिमान स्त्रि,तीने चातुर्याने यमराजास नियतीच्या विरूद्ध जाऊन सत्यवानास परत देण्यास भाग पाडले.

ऑर्फीयस सुद्धा आपली पत्नी युरिडिसीला कृष्णलोकातून परत आणण्या साठी गेला होता. आपल्या सुमधुर सांगितने युरिडिसीला परत मिळवतो.

मृत सत्यवान व सावित्री यांच्या मधे काय संभाषण झाले अथवा नाही हे कुठे वाचले नाही.

पती पत्नी मधील संवाद झाले व त्यांनी घेतलेले निर्णय हे अनपेक्षित होते.

समजा सत्यवान व सावित्री यांच्या मधे संभाषण झाले असते तर सत्यवानाने काय निर्णय घेतला असता?असे युरिडिसी व ऑर्फीयस चे संभाषण वाचल्यावर प्रश्न मनात आला.

म्हणून ही कथा सत्यवान सावित्री या भारतीय पौराणिक कथे बद्दल विचार करावयास लावते.

ऑर्फीयस यशस्वी झाला किंवा नाही, देव या दाम्पत्याच्या निर्णयावर काय बोलले हे कळण्यासाठी जीए च्यां खास शैलीत लिहीलेली कथा वाचलीच पाहीजे.अक्षरशः डोक्यात हजार बल्ब लागल्या सारखा प्रकाश पडतो.

काजळमाया

If a man does not keep pace with his companions, perhaps it is because he hears a different drummer.

-Thoreau

अंजन

गुढ,रहस्याचा भेद घेणे, मानवी मनाचे कंगोरे उलगडणे हा लेखकाचा प्रिय विषय. तो त्यांनी प्रदक्षिणा,अंजन, शेवटचे हिरवे पान, स्वप्न आशा निरनीराळ्या कथा मधून परिणाम कारक रीतीने मांडला आहे.

भैरू,कथेचे मध्यवर्ती पात्र,भवताली पार्वती,जानकी, जोत्या, दादूभट, नाडगौडाची सून,बाबुराव,भिमूकाका, डाॅ.इनामदार,लंगडा वकील इ. अस्सल ग्रामीण भागातली विवीध स्वभावाची ही पात्रे. ग्रामीण भागातली अशिक्षित पण शिक्षितापेक्षा हुशार व बेरकी मनावर कायमचा ठसा सोडून जातात.

साधारण कुटुंबा पासून सुरवात झालेली कथा एका वेगळ्याच विश्वात घेऊन जाते. मुख्य कथा आणी त्या भोवती उपकथा कोळ्याचे जाळ्या प्रमाणे विणल्या सारखे वाटते.एक एक प्रसंग वाचकांच्या डोक्यात चक्री वादळा सारखे गोल गोल फिरत रहातात.

मल्हारी, भैरू दुकानदाराचा बाप, गावातल्या देवळाचा वहिवाटदार. देवाचे दागीने चोरल्याच्या आरोपा वरून भावकीने वहिवाटीचे हक्क काढून घेतले व दोन महीने तुरुंगाची हवा खायला पाठवले. मल्हारीचा जादूटोणा व मंत्रतंत्रावर पुर्ण विश्वास.तो अंजनाचे( विषेश प्रकारचे अभिमंत्रित काजळ) वेड मनात बाळगून होता.अंजना द्वारे भरपुर संपत्ती व दिव्यदृष्टी कमवण्याच्या नादात एका पावसाळी रात्री कुठे गायब होतो ते कळत नाही.

भैरू दुकानदार,दुकान नावालाच. बापा प्रमाणेच भैरू अंजना मागे वेडा असतो.व्यवसाय दुकान न चालल्याने व बायको, मुलीच्या वाह्यात वागण्याने बेजार.महिनाभर केवळ आठ रूपडे कमावतो पण एवढ्या कमी पैशात कुटुंब कसे चालते यावर स्वतःच चकित होतो.

त्याची चवचाल बायको पार्वती आणी आई सारखीच, वळणावर गेलेली जानकी,वर्षापुर्वीच लग्न झालेली, काडीमोड घेऊन माहेरी परत येते व रंग उधळते त्यावर भैरू हतबल दाखवला आहे. पार्वतीला तांदूळ कांडण्या करता घरी बायको नसताना डॉक्टर का बोलावतो हे त्याच्या लक्षात येत नाही. बाबुराव ला आपल्या घरी पाहून सुद्धा तो काही करू शकत नाही.

अंजनाच्या वेडापायी उपकथे मधली सुचक वाक्ये भैरूच्या डोक्यात शिरतच नाही.किंवा जाणून बुजून डोळेझाक करतो.कथा किती गुढ आहे,वानगीदाखल एकच परिच्छेद खाली देतो त्यावरून याचा अंदाज येईल.

"सातव्या महिन्यात बाळंत होऊन मुलासकट बाई गेली; तीही अगदी वाईट नक्षत्रावर ! अशा प्रसंगासाठी बापाने तीसचाळीस वर्षे जीव टाकला होता आणि शेवटी तो प्रसंग, तो -असताना घडलाच नाही. स्वतः भैरूनेदेखील कितीतरी वर्षे डोळ्यांत जीव आणून तसल्या मरणाची वाट पाहिली होती व ते पाहण्याचे आपल्या नशिबी नाही असे त्याला वाटू लागले होते. तोच अचानक दादूभट येतो आणि ही बातमी सांगून जातो! ही गोष्ट खास आपल्यासाठीच घडली असे वाटून भैरू एकदम खूष"

भैरू घरातील अंजन घेऊन स्मशानात जातो.तिथे मल्हारी व इतर मेलेल्या लोकांची भुते दिसतात. जिवंतपणीची भांडणे विसरून गळ्यात गळे घालताना बघून तो चकित होतो.

"हे बघ भैऱ्या , त्याचं असं आहे," मल्हारी त्याला समजावत म्हणाला, "एखाद नाटक असतं, असतं की नाही? त्यात माणसं भांडतात, खून मारामाऱ्या करतात, विष देतात, प्रीती करतात, द्वेष करतात; पण नाटक संपलं की सगळं विसरून बसतात की नाही एका जागी बोलत? हे तस्सचं आहे बघ सगळा हा मामला! माझं नाटकातलं काम संपलं, त्याचंही संपलं; नाटकात आम्ही काय केलं याची आता रे पोटदुखी कशाला? कसं म्हणतोस बेट्या भैऱ्या ?'

पण भैरूच्या मनात उफाळलेला द्वेष कमी झाला नाही. उलट सोन्याच्या तोड्यासाठी आयुष्यभर कणकण झिजवणाऱ्या मल्हारीत इतका बदल कसा काय झाला हे त्याला कळेना. एक अशक्त पोर पुढे आले व बारीक भेदरलेल्या आवाजात म्हणाले, “जेवायला तयार झालंय म्हणं!" राघूअण्णा, मल्हारीने माना हलवल्या व ते पोर निघून गेले. मल्हारी म्हणाला, "

भैरूचा शेवट अतंर्ज्ञान व अतींद्रिय शक्ती मिळवण्याच्या नादात स्मशानात होतो.सामान्य माणसाची सुख मिळवण्या साठी अविरत धडपड या व इतर कथेत स्पष्ट दिसून येते.

जीए चीं सशक्त लेखणीतून साकार झालेल्या या चौदा कथा,"प्रदक्षिणा,अंजन,शेवटचे हिरवे पान,स्वप्न,दूत,वंश, ठिपका, कसाब,भोवरा,गुलाम,कळसूत्र,पुनरपि,रत्न आणी विदुषक".साहित्य आकादमीला न आवडतील तरच नवल.

अशा या अवलियास, जन्म शताब्दी निमित्त शतशः नमन.
आता बाकीचे कथासंग्रह वाचण्यास मन उताविळ झाले आहे.

मुक्तकसाहित्यिकविचारआस्वादलेख

प्रतिक्रिया

कुमार१'s picture

5 Jul 2023 - 1:58 pm | कुमार१

जन्म शताब्दी निमित्त शतशः नमन.
+११

मुक्त विहारि's picture

5 Jul 2023 - 2:21 pm | मुक्त विहारि

जबरदस्त लिहिले आहे

राजेंद्र मेहेंदळे's picture

5 Jul 2023 - 3:14 pm | राजेंद्र मेहेंदळे

अजुनही जी एंच्या कथा/कादंबर्‍या वाचल्या नाहीत, पण कधीतरी हात घालीन म्हणतो. शिवाय लेखात दिलेल्या सगळ्या लिंक्स वाचायच्या आहेत, मोठाच बॅकलॉग.

चित्रगुप्त's picture

5 Jul 2023 - 3:50 pm | चित्रगुप्त

जीएंच्या साहित्याचा निस्सीम भक्त असूनही मला जन्मशताब्दी असल्याचे ठाऊक नव्हते.
नुकतेच Don Quixote या (स्पॅनिश लेखक Servates इ. स. 1547-1616) याच्या) सुप्रसिध्द ग्रंथासाठी थोर फ्रेंच चित्रकार Gustave Dore याने 1852 मधे प्रकाशित केलेल्या 190 चित्रांचे संकलन खरेदी केले, आणि त्या संदर्भातील जीएंची 'यात्रिक' कथा पुन्हा एकदा वाचायचे ठरवून काल 'रमलखुणा' काढून ठेवले आणि आज तुमचा हा लेख आला. तुम्ही दिलेले सगळे दुवे वाचायचे आहेत. अनेकानेक आभार.
मिपावर काही जणांना रुचि असल्यास Gustave Dore ची निवडक चित्रे इथे डकवू शकतो.
'रमलखुणा' मधे 'प्रवासी' आणि 'यात्रिक' या दोनच दीर्घकथा आहेत. हे माझे सर्वात आवडते पुस्तक.

माझ्या वरील प्रतिसादात चूक झाली आहे. रमलखुणा या १६० पृष्ठांच्या पुस्तकात प्रवासी आणि इस्किलार या दोन कथा आहेत. 'यात्रिक' पिंगळावेळ मधे आहे.

कंजूस's picture

5 Jul 2023 - 3:54 pm | कंजूस

जीएंच्या कथा आवडतात. जवळपास सर्वच कथासंग्रह वाचून झाले आहेत. आता प्रसंग,कथा,पात्रे आठवत नाहीत.

टर्मीनेटर's picture

5 Jul 2023 - 4:15 pm | टर्मीनेटर

छान लिहिलंय 👍
न कळत्या वयात जिएंचे पुस्तक हातात पडल्याने असेल कदाचित पण मलातरी तेव्हा त्यांचे लेखन आवडले नसल्याने पुढे त्यांचे काहीच वाचले नाही. पण ह्या लेखात त्यांच्या 'अंजन' ह्या कथेबद्दल वाचल्यावर उत्सुकता निर्माण झाली आहे.
'ऑर्फिअस' हि (मुळ इंग्रजी) कथा नववी की दहावीत असताना आम्हाला इंग्रजी विषयात धडा म्हणुन होती.

कर्नलतपस्वी's picture

5 Jul 2023 - 9:30 pm | कर्नलतपस्वी

जरूर वाचा. वा रा कांत यांच्या कविता पण खूप सुंदर आहेत.

जीए शेवटची दोन वर्षे बहिणीकडे राहात असलेलं घर पाहिलं. साकेत सोसायटी, सिद्धार्थ हॉल समोरच आहे.

चित्रगुप्त's picture

5 Jul 2023 - 8:55 pm | चित्रगुप्त

'चैत्र' या जीएंच्या कथेवरील लघुपटाचा आणि त्याबद्दल मुक्तसुनीत यांच्या लेखाचे दुवे
लेखः
https://misalpav.com/node/4704?page=1#comment-1166465

लघुपटः
https://www.youtube.com/watch?v=6HARYeqw5I8

कर्नलतपस्वी's picture

5 Jul 2023 - 9:27 pm | कर्नलतपस्वी

आकाशफुले
दिनेश ५७ त्यांच्या घरी गेले होते व त्यांच्या बहिणीशी बोलले होते. त्यावर लेखही इथे डाकावला आहे. सुंदर गप्पा, जरूर वाचा

जीएंचं लेखन एकेकाळी वाचण्याचा प्रयत्न करुन पाहिला होता पण लेखन काही झेपलं नाही. त्यामुळे नाद सोडून दिला.