पुस्तक परिचय: The Art of Living: भाग ३ -- कुटुंब

श्रीगणेशा's picture
श्रीगणेशा in जनातलं, मनातलं
25 Feb 2023 - 6:19 pm

----

संदर्भ

ही लेखमाला "The Art of Living" या पुस्तकाचा परिचय/भाषांतर म्हणून लिहिली आहे.

ते इंग्रजी भाषेतील पुस्तक इथे PDF स्वरूपात वाचता येईल:

The Art of Living

या लेखमालेतील आधीचे लेख:

पुस्तक परिचय: The Art of Living: भाग १ -- प्रेम

पुस्तक परिचय: The Art of Living: भाग २ -- लग्न

----
कुटुंब

कुटुंब या विषयावर प्रवचन द्यायचं झाल्यास, Paul Valery च्या खालील शब्दांत देता येईल:

"प्रत्येक कुटुंबात एक विशिष्ट कंटाळा (boredom) लपलेला असतो, ज्यातून बाहेर पडून, कुटुंबातील सदस्य, स्वतःचं स्वतंत्र असं आयुष्य जगण्याचा प्रयत्न करतात. तसेच प्रत्येक कुटुंबात एक प्राचीन शक्ती अस्तित्वात असते, जी की कुटुंबातील सदस्य एकत्र आल्यावर, त्यांना कोणताही आव न आणता, पूर्णपणे मोकळं वाटताना, व्यक्त होते."

एक विशिष्ट कंटाळा आणि सहसंवेदनेची खोल जाणीव, या दोन्ही, अगदी वेगळ्या भावना, जवळ जवळ प्रत्येक कुटुंबात सापडतील.

मित्र तुमच्या बुद्धीवर प्रेम करतात, जोडीदाराला तुमची भुरळ पडते, पण कुटुंबाचं प्रेम मात्र विनाअट असतं. कुटुंबात तुमचा जन्म होतो, आणि तुम्ही कायमच त्याचा अविभाज्य भाग म्हणून राहता. तरीसुद्धा जगातील इतर कोणत्याही लोकांपेक्षा तुमचं कुटुंबच तुम्हाला जास्त त्रासदायक वाटतं. असं क्वचितच कोणी असेल, जो त्याच्या तारुण्यात असं म्हणाला नसेल की, "माझा श्वास कोंडतो इथे. मी कुटुंबासोबत राहू शकत नाही आता. ते मला समजून घेत नाहीत आणि मी त्यांना समजून घेऊ शकत नाही." एवढं असूनही, अनोळखी व्यक्तींच्या सहवासात माणसाला फक्त दुर्लक्षीत जरी केलं गेलं, तरी ज्यांच्यासाठी तो जग आहे, अशा स्वतःच्या माणसात त्याला परतावंसं वाटतं.

सत्य परिस्थिती ही आहे की, कुटुंब ही लग्नसंस्थेसारखीच, अशी एक संस्था आहे, जिचं महत्वाचं असणंच तिला गुंतागुंतीचं बनवतं. कुटुंब ही काही कायद्याने तयार केलेली स्वैर संस्था नाही, ती एक भिन्नलिंगी नैसर्गिक आकर्षणावर आधारलेली, मानवी मुलाच्या प्रदीर्घ असहाय्यतेच्या गरजेतून तयार झालेली, मातृत्वाच्या सहजप्रेरणेतून आणि पितृत्व प्रेमातून तयार झालेली संस्था आहे. त्यातील पितृत्व प्रेम हे कृत्रिम आणि अगदी अलीकडच्या काळात पुढे आलं आहे, आणि ते जेवढं लहान मूलाप्रती असतं, तितकंच ते त्याच्या आईप्रतीही असतं.

कुटुंब आणि लग्नसंस्था या दोन्हीत एक समानता आहे -- ती म्हणजे, या दोन्ही संस्था सहजप्रेरणेच्या मजबूत पायावर उभ्या आहेत. कुटुंब म्हणजे नैसर्गिक किंवा सहजप्रेरणेवर आधारित समूह, ज्याला कायदा आणि परंपराचं बळ मिळाल्याने, त्याचं रूपांतर एका दीर्घकाळ टिकणाऱ्या समूहात होतं. पालकांची अपत्यांप्रती असणारी जबाबदारी, अपत्यांची पालकांप्रती असणारी जबाबदारी, वारसाहक्काला मिळालेली कायद्याची मान्यता, आणि हे सगळं जोपासलं जातं ते एका नैसर्गिक भावनेभोवती, इतकी नैसर्गिक भावना की जी बऱ्याच प्राण्यांमध्ये सापडते -- मातृत्वाची सहजप्रेरणा!

आईची आपल्या अपत्याप्रती असलेली भावना पूर्णपणे निर्मळ आणि सुंदर असते, यात काहीच शंका नाही. अपत्यासाठी आई म्हणजे देव, सर्वात शक्तिशाली. जर तिने अपत्याचा प्रेमाने सांभाळ केला, तर ती एक आनंदाचा स्रोत होते, आयुष्यभर. जरी तिने फक्त काळजी घेतली, तरी ती वेदना दूर करून आनंद देते, ती एक सर्वोच्च आश्रय होते, ती प्रेमाची ऊब, सुखाची भावना, संयम आणि प्रेम आणते. आईसाठीही तिचं मूल म्हणजेच तिचा देव. प्रेमाप्रमाणेच मातृत्वातही समर्पण आणि ममत्व अगदी सहजतेने येतात कारण त्यात स्वतःचा विचार, मीपणा असतो. आई स्वतःहून मुलासाठी त्याग करते, कारण ते मूल तिचा स्वतःचाच एक भाग असते. मानवी समाजरचना शक्य करण्यासाठी रानटी माणसाला आधी प्रेम शिकणं भाग होतं. भिन्नलिंगी आकर्षण आणि मातृत्वप्रेम यातून ते शिकणं सहज शक्य झालं. मातृत्वप्रेम हे त्यागावर आधारलेलं आणि सर्वात निर्मळ प्रेम असतं. स्त्रीच्या पुरुषाविषयीच्या प्रेमालाही मातृत्व प्रेमाची झालर असते.

लहान मूल आपल्या आईकडून, आयुष्याच्या अगदी सुरुवातीलाच, पूर्ण आणि निस्वार्थी प्रेम कसं असावं, हे शिकतं. आईच्या प्रेमातून लहान मुलाला दिसतं की, जग पूर्णपणे विरोधी नाही, दयाळूपणा आणि प्रेम हे नेहमी सापडतं, आणि जगात अशी माणसं आहेत की ज्यांच्यावर पूर्णपणे आणि निरागसतेने विश्वास टाकता येतो, आणि ते तुमच्यासाठी त्याग करतात, कशाचीही अपेक्षा न करता. अशा वातावरणात आयुष्याची सुरुवात करणं, ही खूप मोठी गोष्ट असते. आशावादी माणूस, जो आयुष्यावर नेहमी विश्वास ठेवतो, दुःख आणि दुर्भाग्य वाट्याला आलं तरी, तो बहुधा विवेकी आणि प्रेमळ आईचंच मूल असतं.

कौटुंबिक जीवन प्रेमाचं शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध करून देतं, आणि त्यामुळेच कितीही तक्रारी असल्या तरी, कुटुंबात परत जाण्यात एक वेगळ्याच प्रकारचा आनंद असतो. पण फक्त एवढंच एक कारण नसतं, आपल्याला कुटुंबाबद्दल विश्वास वाटायला; कुटुंब खरं तर अशी एक जागा असते, जिथे आपल्याला, आपली खरी ओळख जगता येते.

कुटुंब खरंच एवढं महत्वाचं असतं? कुटुंबाच्या बाहेर आपण आपली खरी ओळख जगू शकत नाही? याचं उत्तर नाही असंच आहे. आयुष्यात आपण फक्त आपल्याला दिली गेलेली भूमिका जगतो. आपलं मूळ स्वत्व, आपली खरी ओळख जगण्याचा आपल्याला अधिकारच उरत नाही.

एकत्र कुटुंबात तर आपली सामजिक भूमिका खूप कमी होते. संध्याकाळी सर्वजण एकत्र जमतात. वडील आराम खुर्चीत बसून वर्तमानपत्र वाचतात; आई विणकाम करत मोठ्या मुलीशी नेहमीच्याच विषयांवर गप्पा मारते; एक मुलगा एखादी गुप्तहेर कथा वाचता वाचता गुणगुणतो; दुसरा मुलगा इलेक्ट्रिक स्विच दुरुस्त करतो; तिसरा विनाकारणच रेडिओचं बटण फिरवतो. यातील प्रत्येक गोष्ट शांतता भंग करते. रेडिओच्या आवाजाने वडिलांच्या वाचनात व्यत्यय येतो; वडिलांचं शांत असणं आईला सहन होत नाही; आई-मुलीच्या बडबडीने मुलं वैतागतात. आणि या त्राग्याच्या भावना लपलेल्याही नसतात, कारण कुटुंबात शिष्टाचार, कृत्रिमता अजिबातच नसते, साहजिकपणे.

कुटुंबातील प्रत्येकाला मनापासून वाटतं, की इतर सर्व कुटुंबीय विचित्र आहेत, त्यांना सहन करणं अशक्य असूनही आपण त्यांना सहन करतो, समजून घेतो. त्याचबरोबर प्रत्येकाला हेही माहीत असतं की इतर सर्व त्याच्याविषयी अशीच कुरबूर करत असणार, असंच सहन करत असणार.

कौटुंबिक जीवनात खूप आनंद मिळतो असं नाही, पण आपलं स्वत्व तिथे सापडतं, ते स्वत्व जगायला मिळतं, तिथे समजून घेतलं जातं, आणि खरा निवांतपणा तिथे सापडतो.

कुटुंबातील प्रत्येकाला माहीत असतं की सर्वांना एकमेकांची सवय झाली आहे, आणि गरज पडली तर सर्वजण एकमेकांच्या कठीण प्रसंगी धावून येतील. जर अचानक कोणी आजारी पडलं, तर सर्वांना काळजी वाटते. बहीण त्याच्या वाट्याचं काम करायला घेते, आई आजारी सदस्याला काय हवं नको ते पाहते, भाऊ औषधं आणायला जातात. आजारी सदस्याला अजिबात एकटं वाटत नाही.

कुटुंब नसेल तर माणूस एकाकी पडतो. ज्या देशांमध्ये कौटुंबिक जीवन हे कमी तीव्रतेचं असतं, तिथे माणसं समाज समूहाकडे ओढली जातात; कुटुंबातील उबदार, मैत्रीपूर्ण वातावरणाची कसर भरून काढण्यासाठी.

पालक आणि मुलं अशा छोट्या कुटुंबातील एकता, त्याबाहेरही पोहोचते बऱ्याचदा. रोमन लोकांमध्ये तर फक्त नातेवाईकच नाही तर लग्नाने नातेवाईक झालेले, कुटुंबावर अवलंबून असलेले, असे अनेक लोक, एका जमातीच्या स्वरूपात एकत्र येतात. आधुनिक समाजात कुटुंब विखुरलं गेल्यामुळे अस्थिरपणा असतो खरा, पण त्यामुळे नात्यातला उत्साह मात्र कमी होत नाही. फ्रेंच कुटुंबात एखादं भावंड, किंवा एखाद्या काकू आपलं बरचसं आयुष्य विस्तारित कुटुंबासाठी देतात. विस्तारित कुटुंबे अगदी तीन चार पिढ्या, एकोप्याची भावना जपत, समूहातील सर्वांच्या मदतीला धावून जातात, व्यवसाय-नोकरी, फायदा-तोटा यात सहभागी होतात. अशा प्रकारे, विस्तारित कुटुंबे सामूहिक स्वार्थाच्या अवनतीत जातात, जे की प्रेम नसून, बाह्य जगापासून सुरक्षा करण्यासाठीची युती असते.

असा सामूहिक स्वार्थ जर टोकाला गेला, तर निश्चितच तो एक सामाजिक धोका बनतो, पण हेही खरं आहे की सामाजिक जडणघडणीच्या सुरुवातीच्या काळात कुटुंब व्यवस्था मातृत्व सहजप्रेरणेवर आधारलेली होती, आणि पितृत्व सहजप्रेरणा खूप नंतर उदयास आली.

कौटुंबिक जीवनातही धोके असतात, जसे की तरुणाईतील बंडखोर प्रवृत्ती. कुटुंब म्हणजे फक्त प्रेमच नसतं, तिथे तिरस्कारही जन्माला येतो, आणि परस्पर विरोधी हितसंबंधांमुळे त्याला खतपाणीही घातलं जातं.

कुटुंबात स्वातंत्र्याने ओतप्रोत, तरीही शांत अशी संध्याकाळ अनुभवायला मिळते. पण ते स्वातंत्र्य आपल्याला कुठे घेऊन जातं? इतर कुठल्याही अमर्यादित स्वातंत्र्याप्रमाणे, या स्वातंत्र्यांतूनही गोंधळाचं वातावरण तयार होतं, ज्यामुळे आयुष्य अजून अवघड होतं.

कुटुंबातील सर्वात सामान्य सदस्यासाठी केल्या जाणाऱ्या सामूहिक त्यागातून कुटुंबाची बौद्धिक पातळी खालावते. परंतू, कोणी नवीन पाहुणा घरात येताच, हे चित्र पूर्णपणे बदलतं. जे सदस्य इतर वेळी शांत असतात किंवा फुटकळ गप्पा मारतात, ते अशावेळी प्रतिभाशाली का बनतात? कारण ते नवीन पाहुण्याच्या अगत्यासाठी प्रयत्न करतात, पण स्वतःच्या कुटुंबासाठी मात्र ते एवढे कष्ट घेत नाहीत. त्यामुळेच कुटुंबाने स्वतःत गुंतून राहणं चांगलं नाही. बाहेरच्या नवीन विचारप्रवाहासाठी घराचा दरवाजा नेहमी उघडा ठेवायला हवा. साधी धार्मिक निष्ठा, कला-संगीत प्रेम, समान राजकीय विश्वास, आणि एखादं सर्वांनी मिळून केलेलं काम, या सर्वातून कुटुंबाचा बौद्धिक स्तर उंचावला जातो.

अजून एक धोका म्हणजे कुटुंबाला एखाद्या सदस्याला गंभीरतेने घेणं कठीण जाणं. यात असूया किंवा वैरभाव नसतो, फक्त एवढंच की, कुटुंबाला, त्या व्यक्तीला, तशा प्रकारे पाहण्याची सवय झालेली असते.

Bronte कुटुंबातील बहिणींचा जीवनपट वाचल्यावर लक्षात येतं की, वडिलांच्या दृष्टीने त्या कादंबरीकार कधीच नव्हत्या. त्यांच्यासाठी त्यांचं काम व कला, त्यांच्या वडिलांच्या दृष्टीने फक्त एक खेळ होता, त्याचं महत्व समजण्यापासून ते खूप दूर होते.

Tolstoy च्या पत्नीने त्याची अलौकिक बुद्धिमत्ता ओळखली होती, त्याची मुलं त्याची प्रशंसकही होती, आणि त्याला समजून घेण्याचाही त्यांनी प्रयत्न केला. एवढं असूनही, त्याच्या पत्नी आणि मुलांनी त्याच्याकडे, फक्त लेखक म्हणून नाही, तर एक विचित्र व काहीसा वेडसर माणूस म्हणूनही पाहिलं.

कुटुंबात आपल्याला स्वत्व जगता येतं. पण आपल्याला इतर, दुसरी ओळख मात्र जगता येत नाही. जगासाठी आपण भलेही महान असू, पण कुटुंबात मात्र तो महानपणा मिरविता येत नाही. याचा अर्थ असा नाही, की कुटुंबीय त्याला कमी लेखतात, पण स्तुती करताना त्याचे पाय जमिनीवर राहतील, हे ते पाहतात, जी की एक चांगली गोष्ट असते. एखादा यशस्वी राजकारणी झाला, म्हणून त्याचे कुटुंबीय त्याच्या राजकारणातील योगदानाने प्रभावित होत नाहीत, त्यांना फक्त त्याचा अभिमान वाटतो. एखादी म्हातारी मावशी तिच्या पुतण्याचे भूगोल विषयातील व्याख्यान ऐकते, तिला भूगोल विषय आवडतो म्हणून नाही, तर फक्त पुतण्याच्या प्रेमापोटी.

सामान्यपणाचा स्वीकार आणि मनोविकासाच्या सर्वोच्च महत्वाला विरोध, अशा मध्यमतेच्या आग्रहामुळेच, बऱ्याचदा कौटुंबिक बंड होतं. बऱ्याचदा माणसाला असं वाटतं की, आपली स्वप्ने प्रत्यक्षात आणण्याकरिता, कौटुंबिक ऊब व आरामाच्या चौकटीतून बाहेर पडणं गरजेचं आहे.

पण अशा बाहेर पडण्याचे फायदे मात्र काल्पनीकच असतात. असं स्वतःच्या कुटुंबापासून दूर जाणं म्हणजे, सुरुवातीचे नैसर्गिक व नंतर स्वतःहून स्वीकारलेले बंध मागे ठेवून; दुसरे, नवीन, कमी नैसर्गिक बंध स्वीकारणं; कारण माणसाचा जन्मच मुळी एकटा राहण्यासाठी झालेला नाही. कोणी अध्यात्मिक किंवा साहित्यिक एकांतवासातही जातं, पण तिथेही गुंतून जाणं, गुलामी, त्याग असे बंध येतातच. कोणी Nietzsche प्रमाणे वेडेपणातही वाहवत जातं. Marcus Aurelius म्हणतो त्याप्रमाणे, खरं ज्ञान, जगापासून दूर गेल्याने मिळू शकत नाही. कुटुंबापासून दूर जाणं जेवढं सोपं, तेवढंच निरुपयोगी; कौटुंबिक जीवनाची पातळी उंचावणं मात्र खूप अवघड. परंतू तरीही, एका विशिष्ट, अवघड वयात, तरुणपणात, माणसाला कुटुंबात बांधल्यासारखं वाटणं साहजिक आहे; त्यामुळे कुटुंबानेही त्यातील वेगवेगळ्या पिढ्यांतील नात्याचा काळजीपूर्वक विचार केला पाहिजे.

आईचं सहजप्रेरणेतून येणार अमर्याद प्रेम, मुलाची पालकांप्रती असणारी ओढ आणि विश्वास, यातून दोन पिढ्यांतील नात्याचा प्रवास सुरू होतो. वरवर निरुपद्रवी वाटणारी चूक, ज्यासाठी पालक जबाबदार असतात, ती म्हणजे मूल बिघडणं. म्हणजेच मुलाला स्वतः खूप प्रभावशाली असल्याचं वाटतं, प्रत्यक्षात मात्र तो त्याच्या पालकांचा कमकुवतपणा असतो. माणसाचा स्वभाव आयुष्याच्या अगदी पहिल्या काही महिन्यातच आकार घ्यायला लागतो. पहिल्या एका वर्षातच ते मुल शिस्त स्वीकारायला शिकतं किंवा शिस्तीला दादंच देत नाही. पालकांचा मुलांवर अगदी थोडासाच प्रभाव असतो, त्यांचं व्यक्तिमत्त्व सर्वस्वी त्यांच्याच हाती असतं, पालक त्यात खूप काही बदल करू शकत नाहीत.

परंतू बऱ्याचदा, सुरुवातीच्या शिक्षणातून असा बदल घडवणं शक्य असतं, पण त्याचा फारसा विचार केला जात नाही. मुलांना अगदी सुरुवातीपासूनच नियमानुसार जगणं शिकवलं पाहिजे. जर त्यांनी शिस्तीला प्रतिसाद दिला नाही, तर शेवटी त्यांच्या वाट्याला दुःख हे अपेक्षितच असतं. समाज, न बदलणाऱ्या नियमांवर चालतो. प्रत्येकाला आपला रस्ता स्वतःच तयार करायचा असतो -- जे की अवघड, वेदनादायी काम असतं, त्यासाठी सहनशीलता, समर्पित भावना आणि दृढता आवश्यक असते. बिघडलेलं मूल एका कल्पनेतील दुनियेत जगतं, त्याला विश्वास वाटतो की, अगदी आयुष्याच्या शेवटपर्यंत आपलं हास्य आणि आपला राग, आपल्याला हवं ते मिळवून देईल. त्याला प्रत्येकाकडून निस्वार्थी प्रेमाची अपेक्षा असते, जे निस्वार्थी प्रेम त्याला पालकांकडून मिळालेलं असतं, कधीही न रागवता. अशी मुलं खूप मोठी होतातही, पण सर्व गमावतात, आपल्या बालिश स्वभावामुळे. अगदी साठीतील म्हातारीलाही असं वाटतं, की चिडचिड करून ती काहीही मिळवू शकते. यावर एकच उपाय म्हणजे, आईने मुलांना आयुष्याच्या अगदी सुरुवातीलाच नियम, शिस्त शिकवणं.

कुटुंबातील मुलांच्या वयातील फरक, त्यांचं व्यक्तिमत्त्व घडवण्यात महत्वाची भूमिका बजावतो. बऱ्याचदा पहिलं मूल बिघडलेलं असतं. त्याच्या प्रत्येक गोष्टीचं पालकांना अवास्तव कौतुक वाटतं. ते मूल कुटुंबाचा केंद्रबिंदू बनतं, आणि त्या मुलालाही हे चांगलं ठाऊक असतं. उलट आपल्याला मिळत असलेलं लक्ष आणि महत्व, आपल्या हक्काचं आहे, अशी त्याची धारणा होते. कुटुंबात जेव्हा दुसरं मूल जन्माला येतं, तेव्हा पहिल्या मुलाला आई वडिलांचं प्रेम वाटून घ्यावं लागतं, किंवा पहिल्या मुलाकडे दुर्लक्ष होतं, त्यावेळी त्याला वाईट वाटतं. आईला लहान मुलाकडे जास्त लक्ष द्यावसं वाटतं, आणि ते नैसर्गिकही असतं. पहिल्या मुलाला मोठं होताना पाहून आईला थोडंसं वाईट वाटतं, ते मूल मोठं होऊच नये असं तिला वाटतं. पण दुसरं मूल येताच, तिचं लक्ष दुसऱ्या मुलाकडे जातं. हा अचानक बदल, पहिल्या मुलाच्या मनात कटुता निर्माण करतं.

लहान मुलांच्या बाबतीत अशा भावना खूप खोलवर रुजतात. इतक्या की पहिल्या मुलाला भांवडाविषयी टोकाचा द्वेष निर्माण होतो. चिडचिड करणं, आजारी असल्याचं नाटक करणं अशा गोष्टीतून ते मूल मग स्वतःकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतं. आतापर्यंत व्यवस्थित, सामान्य वागणाऱ्या मुलाचं वागणं, भावंड आल्यानंतर मात्र असह्य होतं; आई वडिलांना संताप येईल, एवढ्या विक्षिप्तपणे ते वागतं. खरं म्हणजे, हा मूर्खपणा नसून, स्वतःकडे लक्ष वेधून घेण्याची धडपड असते.

भूतकाळात असणारा रस, बदल न स्वीकारण्याची वृत्ती, औदासीन्य, लहानपणीच्या गोष्टी सांगायची आवड, अशा गोष्टीतून पहिल्या/मोठ्या मुलाची मानसिकता लक्षात येण्याजोगी असते. याउलट, लहान मूल भविष्यकाळात रमतं, जगतं. त्याला बऱ्याचदा कमी लेखलं जातं. त्याच्या कल्पना जास्त चांगल्या विकसित झालेल्या असतात.

सर्वात लहान मुलही बिघडलेलं असतं, विशेषतः जेव्हा ते भावंडांपेक्षा खूप लहान असतं. पण ते आनंदी असतं, कारण त्याची जागा कोणी हिरावून घेत नाही. मोठी भावंडं त्याला अपत्याप्रमाणे जपतात. ते बऱ्याचदा यशस्वी होतं, कारण त्याच्याकडे आत्मविश्वास असतो, समोर मोठ्या भावंडांची उदाहरणं असतात. तसेच ते गंभीर आणि मुत्सद्दी असतं, कारण ते सर्वात कमकुवत असतं आणि बऱ्याचदा त्याला सर्वांशी जुळवून घ्यावं लागतं.

मुलांना आईवडील आपल्या सर्वांवर समान प्रेम करतात, असं वाटणं महत्वाचं असतं, तसेच आई वडीलांदरम्यानची भांडणं त्यांच्यापर्यंत न पोहोचू देणंही तेवढंच महत्वाचं असतं. तसं झालं नाही, तर मुलांना दुःख होतं, तसेच आईवडिलांप्रती आदर कमी होतो, कधी कधी संपतोही.

जी माणसं नंतर आयुष्यात प्रत्येक गोष्टीविरुद्ध बंड करतात, त्यांनी लहानपणी आईवडिलांच्या वागणुकीत आणि शिकवणुकीत खूप फरक पाहिलेला असतो. मुलगी, जीला स्वतःच्या आईविषयी द्वेष वाटतो, ती इतर सर्व स्त्रियांचीही निंदा करते. बऱ्याचदा, लग्न म्हणजे गुलामगिरी, असा मुलांचा, खासकरून मुलींचा, समज होण्यामागे, वडिलांची हुकुमशाही प्रवृत्तीच कारणीभूत असते. वडिलांनी नेहमी, इतर कोणत्याही गोष्टींपेक्षा, मुलांना ज्या प्रकारचे जीवन जगायचे आहे, त्याला प्रोत्साहन देण्याचा, अगदी लहानपणापासूनच प्रयत्न करायला हवा. हे गरजेचं आहे, कारण आयुष्य खूप छोटंसं असतं, आणि लहानपणीच्या आठवणी खूप मौल्यवान असतात. दडपलेल्या आणि उदास बालपणाचे दुःख, मुलांच्या पुढील आयुष्यात सोबत करतं.

पण त्याचवेळी वडिलांनी खंबीरही राहीले पाहिजे, त्यांनी मुलांना अगदी लहानपणापासून जाणीव करून दिली पाहिजे की, जग जिंकणं, तिथे टिकाव लागणं, सोपं नाही. जर पुरेसे कष्ट, प्रयत्न केले नाही, तर मोठी निराशा पदरी पडणं निश्चित. आईने खूप जपलेली मुलं, व्यावहारीक, कठोर सहकाऱ्यांच्या, मित्रांच्या सहवासात येताच निराश होतात. आयुष्याशी जुळवून घेणं, त्यांना खूप कठीण जातं आणि स्वतःला अपयशाच्या स्वाधीन करून ते मोकळे होतात.

काम आणि वागणुकीचे काही नियम कसोशीने पाळण्याचा आग्रह धरणं, आणि त्याचवेळी मुलांच्या आनंदासाठी सर्वकाही करणं, हाच मुलांचा बालपणातून किशोरावस्थेचा प्रवास, कमी त्रासदायक करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे.

आई व मुलाची आयुष्यभराची जवळीक, कदाचित सर्वात श्रेष्ठ नातं असावं. वर्चस्वी स्वभावाच्या आईचं प्रेम मात्र, तिच्या मुलाचा आनंद आता त्याच्या पत्नीची काळजी घेण्यात आहे, हे समजण्यात कमी पडतं.

आई आणि मुलीचं नातं मात्र वेगळं असतं. कधी कधी एवढं जवळचं की, लग्नानंतरही मुलीला आईशिवाय राहणं कठीण जातं. दुसऱ्या टोकाला, आई मुलीच्या नात्यात कमीपणाच्या भावनेतून स्पर्धा निर्माण होऊ शकते, अशावेळी मन मोठं करून एक पाऊल मागे घेणं, ही आईची जबाबदारी असते.

वडिलांचं प्रेम मात्र एक खूप वेगळी भावना असते. तिथे नैसर्गिक बंध असतो, पण तो पुरेसा मजबूत नसतो. वडील म्हणजे कुटुंबासाठी बाह्य जग पाहण्याचा आरसा असतात. मुलांना ते दिशा दाखवतात, त्यांना कामात गुंतवून ठेवतात. मुलांना ते कठोर वाटतात, कारण बऱ्याचदा वडिलांना स्वतःला हवं तसं आयुष्य जगता आलेलं नसतं, त्यामुळे त्यांना असं वाटतं की, जिथे आपण अपयशी झालो होतो, तिथे निदान आपल्या मुलांनी तरी यशस्वी व्हावं. जर ते स्वतः यशस्वी असतील, तर त्यांच्या स्वभावात एक वर्चस्वीपणा असतो. त्यांना आपली मुले परिपूर्ण व्हावीत असं वाटतं, आणि तसं शक्य नसतं, त्यामुळे वडिलांची अती काळजी शेवटी निष्ठुरतेचं रूप घेते. त्यांना नेहमी असं वाटतं की मुलांनी आपले, आपण सांगू तेच आदर्श स्वीकारावेत, पण तसं क्वचितच होतं. त्यामुळे पुढे जाऊन बऱ्याचदा वडील मुलाच्या नात्यात कटुता येते. वडील-मुलीच्या नात्यात मात्र, आई-मुलाच्या नात्याप्रमाणे, नैसर्गिक जवळीक असते.

पालक जेव्हा मुलांना व्यावहारिक जगातील कठीण प्रसंगातून जाताना पाहतात, त्यावेळी त्यांना स्वतःच्या चुकांची आठवण होते. त्यांना मुलांच्या सुरक्षिततेची चिंता सतावते. आपल्या अनुभवातून आलेल्या ज्ञानाचा मुलांना उपयोग व्हावा, यासाठी ते प्रयत्न करतात. पण असे अनुभव क्वचितच दुसऱ्यांसाठी उपयोगी पडतात. प्रत्येकाने स्वतःचं आयुष्य स्वतःच जगायचं असतं, कारण वर्षागणिक जगण्याच्या कल्पना बदलतात आणि आयुष्याच्या संध्याकाळी येणारं शहाणपण, एवढ्या लहान वयात मिळवणं अशक्य असतं.

अनुभवाला किंमत तेव्हाच येते, जेव्हा त्यासोबत यातना येतात, आणि आपल्या मनावर कायमचं घर करून जातात. वस्तुस्थितीशी संघर्ष करत जागून काढलेल्या रात्री, मुत्सद्दी माणसाला वास्तववादी बनवतात. असे अनुभव, आदर्शवादी, ज्यांना प्रयत्न न करता जग बदलायचं असतं, अशा पुढील पिढीकडे कसे देता येणार? शेक्सपियरच्या हॅम्लेट नाटकातील पोलोनियसचे सल्ले म्हणजे अगदी सामान्य, क्षुल्लक गोष्टी; आणि जेव्हा आपण सल्ले द्यायला लागतो तेव्हा आपणही पोलोनियस होतो. पालकांसाठी त्या उपदेशांमध्ये अर्थ, आठवणी आणि दूरदृष्टी असते, मुलांसाठी मात्र असे उपदेश म्हणजे अमूर्त, कंटाळवाणी गोष्ट.

Vauvenargues म्हणतो, "वडीलधाऱ्यांचे सल्ले म्हणजे हिवाळ्यातील सूर्य, तो प्रकाश देतो खरा, पण उष्णता मात्र नाही"

तरुण लोक बंड करतात, तर प्रौढ लोक निराश होतात, आणि त्यातून चिडचिडेपणा आणि दुसऱ्याला दोषी ठरवण्याचं वातावरण तयार होतं. मुलांच्या अपरिहार्य अशा बालिशपणाची तक्रार पालक कधीच करत नाहीत. Coventry Patmore च्या The Toys कवितेत, अनेक वेळा सांगूनही न ऐकल्याने, वडील मुलाशी कठोरतेने वागतात, रागावतात. जेव्हा संध्याकाळी ते मुलाच्या खोलीत जातात, तेव्हा मुलगा रडून-रडून झोपी गेलेला असतो आणि त्याने शेजारी टेबलवर आपली आवडती खेळणी ठेवलेली असतात, स्वतःचं सांत्वन करण्यासाठी. मुलाचं काळजाला स्पर्शणारं वागणं पाहून, वडिलांना स्वतःच्या कठोर वागण्याबद्दल अपराधी वाटतं, आणि मुलाच्या दृष्टिकोनाचा त्यांना साक्षात्कार होतो.

मुलांच्या पौगंडावस्थेत, आपण आपलं त्या वयातील वागणं आठवायला हवं; त्यांच्या विचार, भावना व लहरीपणाची तक्रार करण्याऐवजी. पण हे कठीण असतं. विशीमधे आपण म्हणतो, मला जर मुलं झाली तर मी त्यांच्याशी जवळीक ठेवण्याचा प्रयत्न करेन, जे माझ्या स्वतःच्या वडिलांना कधीच जमलं नाही. पण पन्नाशी गाठताना आपण आपल्या पालकांसारखेच होतो. आणि पुढे जाऊन आपली मुले आणि पुढील पिढ्याही तेच चक्र सुरू ठेवतात.

लहान मूल परिकथेतील वयातून जातं, जिथे देवाची सेवा केली की अन्न, प्रेम, आणि खेळ हे सर्व आपसूक मिळतं. बऱ्याच मुलांना, बाहेरचं जग आणि जगण्यासाठी काम करण्याची गरज हे पहिल्यांदा कळतं, तेव्हा हा त्यांच्यासाठी एक धक्का असतो. शाळेत मित्र बनतात, आणि त्यांच्या नजरेतून मूल स्वतःच्या कुटुंबाकडे पाहायला सुरुवात करतं. त्याला समजतं, की ज्यांना आपण नेहमी गृहीत धरलं, आणि जी माणसं त्याच्यासाठी अक्षरशः हवा आणि पाण्याइतकी आवश्यक होती, ती माणसं त्याच्या मित्रांच्या दृष्टीने क्षुल्लक ठरतात. अनेक नवीन नाती जोडली जातात, आणि हळू-हळू मुलाचा पालकांशी असलेला बंध सैल होऊ लागतो, पण कधीच तुटत नाही. आता, कुटुंबाच्या बाहेरील माणसांचा प्रभाव सर्वात जास्त असतो, आणि तो तसा असायलाही हवा. या दशेतही मूल बंड करतं, पण अशा वेळी, पालकांनी मुलाप्रतीचं प्रेम अबाधित ठेवलं पाहिजे.

कौटुंबिक जीवन, धर्म आणि कलेशिवाय, खूप भावनाशून्य आणि कंटाळवाणं होतं. पौगंडावस्थेतील, आदर्शवादी मुलाला, वडिलांच्या पोलोनियस सारख्या सल्ल्यांनी राग येतो. कुटुंब आणि त्यातील नियमांचा त्याला तिरस्कार वाटायला लागतो. ते नियम न्याय्य असावेत असं त्याला वाटतं. प्रेम ही एक महान आणि सुंदर गोष्ट आहे, असा ते मूल विचार करतं, आणि त्याला मैत्री आणि प्रेमाची गरज वाटायला लागते. समर्पण आणि गुपचूप विश्वासू माणसे शोधण्याचा हा काळ असतो. निराशा पदरी पडते, विश्वासाला तडा जातो, वचनं तोडली जातात, आणि प्रेमात फसवणुकही होते, ती याच काळात. एखादी चांगली गोष्ट करायला जावं तर नेहमीच काहीतरी वाईट घडतं. विफल आदर्शवाद आणि स्वतःची स्वप्ने व वस्तुस्थितीतील फरक, या निराशेतून संशयी प्रवूत्ती तग धरू लागते.

प्रत्येकाच्या आयुष्यातील हा एक शोकांतिक आणि अवघड काळ असतो. तरुण मुलांकडे खूप साऱ्या कल्पना असतात खऱ्या, पण जबाबदारी मात्र शून्य. ते फक्त शब्द आणि वाक्ये जुळवितात, यातून ते जगाविषयी एक पुसटसं चित्र तयार करतात, उत्तुंग पण बरचसं चुकीचं. स्त्री आणि समाज त्यांच्या कल्पनेपेक्षा खूप वेगळे आहेत, हे समजल्यावर त्यांना दुःख होतं. तारुण्यावस्थेतून ते बाहेर येतात, लग्न आणि मुलांचा जन्म यामुळे त्यांच्या अमूर्त बुद्धीमत्तेला कुटुंबाच्या जबाबदारीतून मजबूती व आधार मिळतो. हळू-हळू, कुटुंब, काम, आणि सार्वजनिक आयुष्यातील कठीण शाळेत तावून-सुलाखून, एक जबाबदार माणूस तयार होतो, जो की त्याच्या मुलांना या सर्व अनुभवातून तारून नेऊ शकतो.

या सर्व कारणांसाठी, माणसाने आयुष्यातील अवघड वयातील बराचसा काळ कुटुंबापासून दूर राहून जगला पाहिजे, जेणेकरून बाहेरच्या जगाची ओळख घराबाहेर राहून, शाळेतून झाली, की मग घर म्हणजे एक आश्रयाचं, आधाराचं ठिकाण वाटू लागतं. तसं शक्य नसेल, तर पालकांनी त्यांचे तरुणपणीचे दिवस आठवावेत, आणि मुलांच्या उणीवांना समजावून घ्यावं. कधी कधी पालकांना अशी सौम्यता दाखवणं अवघड असतं, अशा वेळी आजी आजोबांना नवीन पिढीला समजून घेणं जमतं, कारण त्यांचं मन जास्त मोकळं आणि मुक्त झालेलं असतं.

कौटुंबिक जीवनाची कला खूप महत्वाची असते. संगोपन नीट न झालेली मुलं, कधी कधी व्यक्तिमत्त्वात चांगला बदल घडवू शकतात, हे खरं. स्थिरतेच्या अभावातून क्वचित एखादा प्रतिभावंतही तयार होतो, हेही खरं. पण आपण मुलांना सोप्या सरळ आयुष्याची खात्री देऊ शकतो, जर आपल्याला हे माहीत असेल, की मुलांना एक शांत, स्थिर आणि आनंदी बालपण कसं द्यायचं ते.

आनंदी बालपणामागे, मुलांमधे कुठलाही भेदभाव न करता, हळुवार प्रेम करणारे, त्यांना आवश्यक शिस्तीची नियमित सक्ती करणारे, मुलांना स्वतः समान वागणूक देणारे, आणि मनापासून, सुखाने संसार करणारे, आई वडील असतात. मुलांच्या व्यक्तिमत्त्वात अपरिहार्य असे बदल वयानुसार होत जातात, त्यावेळी पालकांनी खूप सुज्ञपणे आणि अगदी थोड्या प्रमाणातच सल्ला दिला पाहिजे, खरं तर सर्वात चांगला सल्ला म्हणजे स्वतःच्या जगण्यातून समोर ठेवलेलं उदाहरण. शेवटी, कुटुंबातील वातावरण, बाह्य जगातील विचारांच्या प्रवाहाला अधून-मधून सामावून घेऊन, मोकळं ठेवणं, खूप गरजेचं असतं.

आता शेवटचा प्रश्नही विचारला पाहिजे: कुटुंब ही संस्था काळाच्या कसोटीवर टिकून राहील का? कुटुंब संस्थेची जागा इतर कुठलीही गोष्ट घेऊ शकत नाही, याचं कारणही तेच आहे जे लग्नसंस्थेला अजोड बनवतं -- कारण या दोन्ही संस्था स्वार्थाच्या सहजप्रेरणेला सामाजिक संवेदनशीलतेच्या साच्यात बांधून ठेवतात.

तरुणाईतील काही वर्षे कुटुंबापासून दूर राहणं चांगलं आहे खरं, पण आयुष्यातील कठीण प्रवास आणि शिकवणीतून गेल्यावर तो क्षण येतोच, ज्यावेळी प्रत्येक माणूस नैसर्गिक ओढीने, आनंदाने, आपल्या मूळाशी परततो.

कठोर आणि असंवेदनशील जगात, कठीण दिवस व्यतीत केल्यावर, विद्यार्थी, तत्वज्ञ, राजनीतिज्ञ, सैनिक आणि कलावंतही परत एकदा मुलं, पालक, आजी आजोबा, किंवा केवळ साधी माणसं होतात, जेव्हा ते कुटुंबासोबत संध्याकाळचं जेवण करण्यासाठी एकत्र जमतात!

----

साहित्यिकसमीक्षाशिफारस

प्रतिक्रिया

कर्नलतपस्वी's picture

26 Feb 2023 - 8:20 am | कर्नलतपस्वी

अनुवाद आवडला. संक्षेप मधे एवढा प्रभावी तर संपूर्ण पुस्तक अनुवादले तर खुप मनोरंजक व प्रबोधनात्मक ठरू शकते. प्रयत्न करा. शुभेच्छा.

श्रीगणेशा's picture

26 Feb 2023 - 11:48 am | श्रीगणेशा

धन्यवाद कर्नल साहेब _/\_
"कुटुंब" या विषयावर पूर्ण (ओळ नी ओळ) अनुवाद करायचा प्रयत्न केला आहे. खरं म्हणजे, सुरुवात करताना पुस्तक परिचय म्हणून केली पण आता पूर्ण अनुवाद करावा असा मानस आहे.

कुमार१'s picture

18 May 2023 - 8:10 am | कुमार१

अनुवाद आवडला.

श्रीगणेशा's picture

24 May 2023 - 8:10 pm | श्रीगणेशा

धन्यवाद कुमार सर!

खरं तर इंग्रजी मधील हे पुस्तक, एका अमेरिकन लेखकाने मूळ फ्रेंच मधील पुस्तकाचा केलेला अनुवादच आहे. पण तो इंग्रजी अनुवाद, मूळ पुस्तक वाटावा, एव्हढा छान झाला आहे.

(अर्थातच मूळ फ्रेंच पुस्तक वाचलं, तर ते वाचन अजून प्रभावी ठरेल, पण त्यासाठी फ्रेंच भाषा शिकावी लागेल :-))