पुस्तक परिचय: The Art of Living: भाग २ -- लग्न

श्रीगणेशा's picture
श्रीगणेशा in जनातलं, मनातलं
29 Dec 2022 - 6:40 pm

----

संदर्भ

ही लेखमाला "The Art of Living" या पुस्तकाचा परिचय/भाषांतर म्हणून लिहिली आहे.

ते इंग्रजी भाषेतील पुस्तक इथे PDF स्वरूपात वाचता येईल:

The Art of Living

या लेखमालेतील आधीचा लेख:

पुस्तक परिचय: The Art of Living: भाग १ -- प्रेम

----

लग्न

लग्नबंधन मग ते लवचिक असो वा जाचक, लग्न समारंभ किंवा कायदेशीर संमतीपत्र हे सर्वत्र स्वीकारले गेले आहे.

----

सर्वप्रथम लग्न विरोधाची बाजू:

लग्न संस्थेला विरोध असणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. आणि त्यातही पुरुषांची संख्या निश्चितच जास्त असेल.

जर प्रेम हे खरंच कायदेशीर बंधनात बांधता न येणारे असेल तर मग अशा बंधनाचा अट्टाहास का? विरोधी गटाचं म्हणणं असं की, "असं बंधन फक्त स्त्रीच्या हिताचं असतं कारण त्यामुळे तिला तिच्यावर उत्स्फूर्तपणे, विचार न करता, प्रेम करणाऱ्या पुरुषास बांधून ठेवता येतं"

लेखक Bernard Shaw म्हणतो की, "लग्न बंधन हे पुरुष इच्छेविरुद्ध सहन करतात, तर स्त्रिया मात्र ते उत्कटतेने इच्छितात."

प्रेम ही एक नैसर्गिक प्रेरणा आहे पण शाश्वत प्रेम हे नक्कीच तेवढे नैसर्गिक व सहज नाही.

लग्न माणसाला कमकुवत बनवते कारण त्यामुळे त्याला सामाजिक आयुष्यातील बऱ्याच वादळांना सामोरं जावं लागतं.

विवाहित जोडप्याचं आयुष्य त्या दोघांमधील सर्वात जास्त सामान्य जोडीदाराच्या मानसिक पातळीवर जगलं जातं.

----

एवढे सगळे आघात होऊनही, आणि राजकीय, धार्मिक आणि आर्थिक गोंधळातही लग्न ही संस्था हजारो वर्षे टिकून आहे. त्याची मूलभूत सामाजिक कारणे पुढे लिखाणात चर्चिली आहेत.

माणूस हा निसर्गतः स्वार्थी (egoist) आहे. आणि तो गुन्हा नाही, त्याने तसंच असलं पाहिजे, टिकून राहण्यासाठी.

स्वसंरक्षण (self-preservation) ही एक सहजप्रेरणा (instinct) आहे, स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी, ज्यातून माणूस, दुसऱ्यांना मागे टाकून, सुरक्षितता, अन्न आणि निवारा मिळवतो. माणसात फक्त ही एकच सहजप्रेरणा असती तर मानव समाज तयार करणं आणि टिकवणं अशक्य झालं असतं, माणूस एक हिंस्र आणि धोकादायक प्राणी झाला असता. सुरुवातीच्या प्राथमिक समाजशैलीत स्वसंरक्षणाच्या (self-preservation) सहजप्रेरणेतून अजून एका तितक्याच ताकदीच्या सहजप्रेरणेचा उदय झाला - ती म्हणजे समूहप्रेरणा (tribe/herd instinct)

माणूस समूहात राहू लागला कारण तो एकटाच स्वतःचं संरक्षण करू शकत नव्हता. सुरक्षिततेसाठी समूहाला त्यातील प्रत्येक व्यक्तीचं सहज समर्पण अपेक्षित असतं आणि ते मिळवलंही जातं.

पण जेव्हा जगण्यातील आणि अन्न मिळवण्यातील धोके कमी होतात, जंगली प्राणी जंगलातच राहतात, जेव्हा भौगोलिक सीमांचा कमी अधिक प्रमाणात आदर केला जातो, तेव्हा ही समूहप्रेरणा (herd instinct) कमी होऊन स्वार्थीपणाला (egoism) बळ मिळतं. पण हे स्वार्थीपण नियंत्रणात ठेवलं नाही तर मानव समाज अशक्य होईल. संपत्ती वाटली जाणार नाही, शक्तीचा बेसुमार वापर होईल आणि मग कमकुवत गुलाम होतील. असं स्वार्थीपण कसं नियंत्रित करणार, तर स्वसंरक्षणाच्या सहजप्रेरणेला इतर तितक्याच ताकदीच्या सहजप्रेरणेसोबत झुंजवून. तशा फक्त दोनच सहजप्रेरणा आहेत -- भिन्नलिंगी आकर्षण आणि मातृत्व.

खूप स्वार्थी असणाऱ्या माणसाला, एका छोट्या सामाजिक गटात, कुटुंबात, बांधून ठेवण्याचा, एकत्र आणण्याचा चमत्कार सहज शक्य होतो तो वर उल्लेखलेल्या दोन सहजप्रेरणांमुळे, कारण त्यातून निस्वार्थीपणा अगदी सहज जपला जातो.

आताची लग्न पद्धती अस्तित्वात येण्याआधी, भटकणाऱ्या टोळ्यांमध्ये पुरुषांना टोळीशी बांधील राहण्यासाठी सक्तीने शपथ घ्यायला लावायची पद्धत होती. वेळेसोबत ही पद्धत सुधारत जाऊन, समूह आकार लहान होत जाऊन, स्त्रीची सुरक्षितता, मुलांचं पालनपोषण आणि ज्येष्ठांचा सांभाळ असं स्वरूप असलेली एक सामाजिक अलिखित करार पद्धत अस्तित्वात आली, ज्याला आपण आज लग्न किंवा विवाह पद्धती म्हणतो. अशा प्रकारे कुटुंब नावाची सामाजिक ऊती (social tissue) निर्माण झाली, ज्यामधे केंद्रस्थानी होते दोघेजण -- पती, पत्नी!

लग्न पद्धत पुरुष व स्त्रीला एक समाधानी नातं तयार करण्याची सर्वात चांगली संधी मिळवून देते. यातील सामाजिक, कौटुंबिक बंधामुळे, प्रेमात बाधा न येता उलट त्याला बळ मिळते. लग्न हा एकच असा बंध आहे जो वेळेसोबत मजबूत होत जातो.

हळू हळू बहुपत्निकतेवर आधारित समाज मागे पडून एकपत्नित्व सर्वत्र स्वीकारले गेले आहे. बहुपत्निकत्व माणसाला कमकुवत करते आणि असे समाज कमी लेखले जातात, आणि तसेही बहुपत्नीत्व आधुनिक स्त्रीच्या गरज आणि आवडी-निवडी विरुद्ध आहे.

बऱ्याचदा प्रेमातील स्वतंत्र विचार किंवा प्रेमच लग्नाचा पाया असते. पण नेहमीच नाही. एकोणिसाव्या शतकात फ्रान्समधे बहुतेक विवाह जमवले (arranged) जायचे. कधी पुजारी, कधी लग्न जमविणारे व्यावसायिक, परंतू, बहुतेक वेळा दोन कुटुंब मिळून लग्न जमवायचे. यातील बहुतेक विवाह यशस्वी, सुखी व्हायचे, बऱ्याचदा प्रेम विवाहापेक्षा जास्त.

उत्कट प्रेम वास्तवातल्या माणसांची एक आभासी प्रतिमा तयार करतं. आकंठ प्रेमात बुडालेली माणसं लग्नातून असाधारण आनंदाची अपेक्षा करतात आणि मग दुःखी होतात. अमेरिकेत जगातील सर्वात जास्त प्रेमविवाह होतात आणि सर्वात जास्त घटस्फोटही.

तरुण लोक लग्नातून परिपूर्ण प्रेमाची अपेक्षा करतात. सिनेमातून दाखविल्या जाणाऱ्या प्रतिमा पाहून त्यांना असं वाटतं की प्रेम म्हणजे सुंदर कपडे परिधान केलेल्या सुंदर मुलीला घेऊन सुंदर प्रदेशातून सफर करणं. आणि प्रेमींच्या प्रत्येक भांडणाचा शेवट गोड होतो. त्यांना कोणी सांगितलं नसतं की वैवाहिक आयुष्यात त्यांना बऱ्याचदा साधे कपडे घातलेल्या, अव्यवस्थित केस असणाऱ्या आणि महत्वाचं म्हणजे चटकन रागावणाऱ्या स्त्रीला पाहावे लागेल, सहन करावे लागेल. तरुण पत्नीला कोणी सांगितलं नसतं की पुरुष स्वार्थी असतात, कामामुळे दमून जातात, अधीर आणि चिडचिडेही असतात.

याचा परिणाम काय तर लवकरच दोघेही निराश होतात. या जगात काहीच परिपूर्ण नाही, प्रेमही परिपूर्ण नाही असं स्वतःला सांगायच्या ऐवजी, त्यांना असं वाटतं की त्यांची निवड चुकली, परिपूर्णता कोणा दुसऱ्यात सापडेल, मग ते विभक्त होतात, दुसऱ्या जोडीदाराचा शोध घेण्याकरिता. अर्थातच नवीन नातंही, कधीच शोधता न येणाऱ्या, परिपूर्णतेच्या जवळपासही नसतं. आणि शेवटी तो अनुभव त्यांना वैवाहिक तडजोड स्वीकारायला भाग पाडतो ज्याचा स्वीकार त्यांनी अगदी सुरुवातीलाच करायला हवा होता.

Balzac च्या पुस्तकातील पात्र एक चांगला विचार व्यक्त करतं, "लग्न आयुष्याला दिशा देते, तर प्रेम फक्त आभासी आनंद. लग्न टिकून राहतं, सुरुवातीचं आकर्षण संपलं तरीही, आणि आयुष्यातील मौल्यवान गोष्टीही जपून ठेवतं. म्हणूनच, आनंदी वैवाहिक आयुष्य अशा मैत्रीच्या पायावर उभारलं जाऊ शकतं, जिच्या प्रकाशात, दोघांच्याही उणीवा आपसूकच झाकोळल्या जातात."

----

पुरुष सिद्धांत आणि कल्पना शोधतो. तो एक गणिती आणि तत्वज्ञ असतो. वास्तवात बुडालेल्या स्त्रीला मात्र अशा अमूर्त कल्पनांचं काहीही घेणं-देणं नसतं.

स्त्रीचा संवाद म्हणजे बऱ्याचदा खऱ्या, आजूबाजूच्या माणसांबद्दलचे किस्से, व्यक्ती निरीक्षणं, कृतीतल्या, वास्तवातल्या गोष्टी. बरेचसे पुरुष मात्र अशा वास्तवापासून चटकन दूर जात, कल्पनेत, सिद्धांतात रमतात.

----

पुरुषाचं व्यक्तिमत्त्व दृढ व संपूर्ण करण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे स्त्रीची साथ मिळणे. तिच्यातून तो माणसाच्या गहन संकल्पनांशी जोडलेला राहतो. तिच्याशिवाय मात्र त्याचं त्या संकल्पनांकडे दुर्लक्ष होतं.

पुरुषाचे विचार अवकाशातून अन् वेळेतूनही प्रवास करतात. त्यातून खूप मोठं चित्र तयार होतं खरं, पण ते वास्तवाशी तितकसं जोडलेलं नसतं, बऱ्याचदा ते शब्दांच्या पेंढ्यालाच धान्य समजण्यासारखं असतं. स्त्रीचे विचार मात्र जमिनीवर चालत जातात.

पुरुषाची निष्ठा विचारांशी असते; स्त्रीची माणसांशी!

----

लग्न अशी गोष्ट नाही की जी एकाच वेळी पूर्ण करता येते, ती सतत जगावी लागते. जोडप्याने कधीही निष्क्रिय शांततेत गुंतून असं म्हणू नये की, "खेळ जिंकला आहे आपण, आता आराम!" हा खेळ कधीच जिंकला जात नाही. यशस्वी लग्न ही एक मोठी भव्य इमारत असते, जिची दररोज पुनर्बांधणी करावी लागते. पण ते करताना स्पष्टीकरण, विश्लेषण आणि कबुली याची मदत घेणं चुकीचं. परस्पर टीका करण्यातही खूप धोके असतात. स्त्रीला अशा सर्व धोक्यांची जाणीव लगेच होते. आणि त्यावर उपायही तिला अगदी मनातून सुचतात. पुरुषालाही माहित असतं की फक्त तिच्याकडे पाहणं किंवा स्मितहास्य करणं हे स्पष्टीकरण देण्यापेक्षा जास्त चांगलं असतं. पद्धत काहीही असो, नातं सतत बांधत राहिलं पाहिजे. दुर्लक्ष केलं तर आयुष्यात कोणतीच गोष्ट टिकू शकत नाही -- घर, मैत्री, प्रेम. घराचं छत कोसळतं, मैत्री, प्रेमही संपतं. कौलं परत बांधावे लागतात, सांधे भरावे लागतात, गैरसमजुती निवळाव्या लागतात. नाहीतर कडूपणा निर्माण होतो, मनात खोलवर जखमा होतात, आणि एके दिवशी भांडणात, भावनांचा बांध फुटतो. आणि आपली समोरच्याच्या मनातील अनपेक्षित अशी प्रतिमा पाहून प्रचंड धक्का बसतो.

----

एकमेकांच्या आवडीनिवडीचा आदर केल्याशिवाय कोणतंही लग्न सुखी होऊ शकत नाही. दोन माणसांचे विचार, मतं आणि इच्छा सर्व काही तंतोतंत जुळावं, असं म्हणणं हास्यास्पद होईल. तसं होणं अशक्य आहे आणि अश्रेयस्करही. सुरुवातीला दोघांनाही वाटतं की आपल्या खूप गोष्टी जुळतात. पण अशी वेळ येतेच जेव्हा दोघांतील ठळक गुणदोष वर डोके काढू लागतात.

"जर तुम्हाला लग्न हा एक सुरक्षित आसरा म्हणून हवा असेल तर, प्रेमाची जागा हळू हळू मैत्रीने घेतली पाहिजे"

खऱ्या आनंदी वैवाहिक जीवनात मैत्री प्रेमाची जागा घेते, आपण बौध्दीक आणि वैचारिक दृष्टीने वेगवेगळे आहोत असं दोघेही जाणतात पण हा स्वभावातील फरक ते आनंदाने स्वीकारतात, आणि मग त्यात त्यांना अध्यात्मिक, मानसिक विकासाची संधीही गवसते.

मानवी मनांचा गुंता सोडविण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणाऱ्या पुरुषास, स्त्रीमनाच्या जवळीकतेची मदत होते कारण ते मन जागृत, हुशार, विवेकी, निर्मळ असतं. आणि यातून त्याच्या मनातील काहीशा अंधाऱ्या कोपऱ्यात प्रकाशही पडतो, तो कोपरा म्हणजे त्याच्या मनातील स्त्रीविषयीचे विचार.

----

प्रेमी युगुले जशी कल्पना करतात तसं लग्न अजिबातच नसतं. लग्न ही एक संस्था आहे, सहजप्रेरणेच्या पायावर उभी, ते यशस्वी करण्यासाठी परस्पर आकर्षणाचीच नाही तर प्रबळ इच्छाशक्ती, चिकाटी आणि नेहमी कठीण वाटणारी गोष्ट म्हणजे दुसऱ्याला स्वीकारणं, अशा सर्वांची गरज असते.

या सर्वांची पूर्तता झाल्यास प्रेम, मैत्री व आदर यांचा समजण्यापलीकडीचा अद्वितीय संगम असलेलं एक सुंदर नातं फुलतं, बहरतं!

----

साहित्यिकसमीक्षाशिफारस

प्रतिक्रिया

कंजूस's picture

29 Dec 2022 - 7:49 pm | कंजूस

बिचारे.

कर्नलतपस्वी's picture

26 Feb 2023 - 8:15 am | कर्नलतपस्वी

वास्तव हे एकमेकांपासून खुप दुर त्यामुळेच संसारगाडा वंगण नसलेल्या गाड्या प्रमाणे सारखा खडखडत असतो.

कुमार१'s picture

27 May 2023 - 2:15 pm | कुमार१

पुस्तक परिचय छान.

आज दोन्ही भाग वाचले. भाषांतर छानच केले आहे!

लग्न अशी गोष्ट नाही की जी एकाच वेळी पूर्ण करता येते, ती सतत जगावी लागते. जोडप्याने कधीही निष्क्रिय शांततेत गुंतून असं म्हणू नये की, "खेळ जिंकला आहे आपण, आता आराम!" हा खेळ कधीच जिंकला जात नाही. यशस्वी लग्न ही एक मोठी भव्य इमारत असते, जिची दररोज पुनर्बांधणी करावी लागते. पण ते करताना स्पष्टीकरण, विश्लेषण आणि कबुली याची मदत घेणं चुकीचं. परस्पर टीका करण्यातही खूप धोके असतात. स्त्रीला अशा सर्व धोक्यांची जाणीव लगेच होते. आणि त्यावर उपायही तिला अगदी मनातून सुचतात. पुरुषालाही माहित असतं की फक्त तिच्याकडे पाहणं किंवा स्मितहास्य करणं हे स्पष्टीकरण देण्यापेक्षा जास्त चांगलं असतं. पद्धत काहीही असो, नातं सतत बांधत राहिलं पाहिजे. दुर्लक्ष केलं तर आयुष्यात कोणतीच गोष्ट टिकू शकत नाही -- घर, मैत्री, प्रेम. घराचं छत कोसळतं, मैत्री, प्रेमही संपतं. कौलं परत बांधावे लागतात, सांधे भरावे लागतात, गैरसमजुती निवळाव्या लागतात. नाहीतर कडूपणा निर्माण होतो, मनात खोलवर जखमा होतात, आणि एके दिवशी भांडणात, भावनांचा बांध फुटतो. आणि आपली समोरच्याच्या मनातील अनपेक्षित अशी प्रतिमा पाहून प्रचंड धक्का बसतो.

👍
हा परिच्छेद फार आवडला!

आधिच्या भागवरील एका प्रतिसादात तुम्ही लिहिले आहे,

१) The Art Of Living म्हटलं की साहजिकच अध्यात्माची जाहिरात समजून दुर्लक्ष केलं जाईल ही शक्यता गृहीत धरली होती.

+१
शीर्षक वाचुन माझाही तसाच गैरसमज झाला असावा, त्यामुळे पहील्या भागाकडे दुर्लक्ष झाले असावे 😀

श्रीगणेशा's picture

18 Jun 2023 - 11:31 pm | श्रीगणेशा

धन्यवाद कर्नल साहेब, कुमार सर, टर्मीनेटर!